उपयोगितावादाचे टीकाकार

उपयोगितावाद ही उपपत्ति नीतिमीमांसाक्षेत्रात जाहीर झाल्याबरोबर तिच्यावर नीतिमीमांसक तुटून पडले. त्यांत विविध मतांचे बहुतेक सर्व नीतिमीमांसक होते. उप-योगितावादाचे खंडन हा नीतिविचारक्षेत्रात तत्त्वज्ञांचा प्रधान उद्योग होता. उपयोगिता-वादाचे विरोधक नवनवीन आक्षेप हुडकून काढीत होते, आणि ते आक्षेप प्रतिपक्ष्याला निरुत्तर करणारे आहेत असे या क्षेत्रात सामान्य मत होते. आ चर्य हे की या हल्ल्यातून उपयोगितावाद बचावला. आणि दीडदोनशे वर्षानंतर आजही तो निर्भयपणे, ताठ मानेने उभा आहे.
हे आक्षेप काय होते? ते खरोखर निरुत्तर करणारे होते काय? इ. प्र नांचे उत्तर आज द्यायचे आहे. विवेचनाच्या सोयीसाठी येथे फक्त महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या तीन-चार आक्षेपांचा विचार करणार आहे. एक सामान्यपणे घेतला गेलेला आक्षेप असा होता की उपयोगितावादाची पहिली प्रतिज्ञा, आपण सर्व सुखार्थी आहोत ही, खोटी आहे. आपण सर्वदा सुखामागे लागतो, अन्य कशाच्याही कदापि नाही, हे म्हणणे खरे नाही. ‘तुला काय हवंय?’ असे कोणालाही विचारले तर उत्तर ‘सुख’ असे तो कधीही देत नाही. आपल्याला भूक लागली की आपण म्हणतो की मला खाण्याची इच्छा आहे. तहान लागली की मला पाणी हवे आहे असे म्हणतो. ‘मला सुख हवे आहे’ असे आपण कधी म्हणत नाही. म्हणजे आपल्या इच्छांचा विषय सुख कधीही नसतो. तो अन्न, पाणी, पैसा, कीर्ति, सामर्थ्य, ज्ञान, इत्यादि काही तरी असतो. पण या दीर्घ यादीत सुख या गोष्टीचा मागमूस नाही. या आक्षेपाला काय उत्तर आहे?
कदाचित् हा आक्षेप शब्दशः खरा असेल. पण त्याने उपयोगितावादाच्या पहिल्या प्रतिज्ञेचे खंडन होत नाही. आपल्याला जेव्हा कोणतीही इच्छा होते तेव्हा ती पुरी करण्याकरिता आपण धडपडत असतो. ती पुरी होईपर्यंत आपण अस्वस्थ असतो. अस्वस्थपणा कोणालाही आवडत नाही. त्यातून मुक्त होईपर्यंत आपल्याला चैन पडत नाही. त्या असंतुष्ट अनुभवातून सुटण्याकरिता आपण प्रयत्नशील असतो. म्हणजे आपल्या सर्व कर्मांचे उद्दिष्ट सुख नसले तरी दुःखपरिहार असतेच. आणि उपयोगितावादी हेच म्हणत असतो. आपले अंतिम साध्य सुख किंवा दुःखनिवृत्ति आहे असे तो वारंवार म्हणतो. हे लक्षात ठेवले म्हणजे आपण सर्वदा सुखार्थी असतो हे म्हणणे बरोबर वाटते.
आता आपण दुसऱ्या आक्षेपाकडे वळू. हा आक्षेप असा आहे की आपल्या सर्व इच्छा स्वसुखार्थ असतात हे मत विपर्यस्त आहे. ज्याला आपण निःस्वार्थी कर्म म्हणतो त्याची अनेक उदाहरणे आक्षेपक देतात. दुसऱ्यांच्या दुःखाने व्यथित होणारे आणि त्या दु:खाचा परिहार करण्याकरिता झटणारे लोक, आपल्याला वाचविण्याकरिता प्राणही देणारे आईबाप, देशाकरिता बलिदान करणारे देशभक्त हे केवळ स्वतःच्या सुखासाठी प्रयत्नशील असतात असे म्हणणे सर्वथा अर्थशून्य आहे असे ते म्हणतात. परंतु हे आक्षेपक ‘निःस्वार्थी’ कर्माचे स्वरूप पूर्णपणे लक्षात घेत नाहीत. अपत्याकरिता किंवा देशबांधवांकरिता स्वार्थत्याग करणारे लोकही स्वसुखार्थच कर्मे करीत असतात. त्या कर्मांनी इतरांना सुख होते हे खरे आहे; पण त्यांना जर त्या कर्मांपासून वंचित ठेवले तर त्यांना अत्यंत दु:ख होते. तुरुंगात डांबले गेल्याने देशभक्तांना होणारे दुःख तुरुंगात होणाऱ्या हालअपेष्टांनी मुख्यतः होत नाही. ते होते देशाकरिता लढण्याची तीव्र इच्छा अपुरी राहते म्हणून. देशासाठी लढणाऱ्या लोकांना अत्यंत दुःखद अनुभवांचा सामना करावा लागतो; पण कर्तव्यपूर्तीचे गाढ समाधान त्यांना लाभते. ब्रह्मप्राप्तीकरिता कठोर तप करणारे ब्रह्मानंदाकरिता अनेक दुर्धर पीडा सोसतात. पण त्यांना होणारा ब्रह्मानंद त्यांनाच होतो, इतर कोणाला नाही. म्हणून तपस्व्यांना मिळणारा आनंद त्यांच्या स्वतःकरिताच असतो असे म्हणण्यात वावगे काही नाही.
आता हे खरे आहे की ‘परार्थ’ कर्म केल्याने कर्त्याखेरीज इतरांनाही सुख होते, आणि त्यामुळे आपण त्या कर्माला केवळ स्वार्थ केलेल्या कर्मापेक्षा अधिक मूल्यवान समजतो, आणि आपण त्या कर्माला केवळ स्वार्थी कर्मापेक्षा उच्चतर म्हणतो. तिसरा आक्षेप असा आहे: आपली सर्व कर्मे सुखार्थ असतात हे क्षणभर मान्य केले तरी सुखासुखांत भेद असतो, केवळ मात्रेचा म्हणजे कमीअधिकतेचा नव्हे, तर गुणाचा किंवा प्रकाराचा भेद असतो. काही सुखे उच्चप्रतीची असतात आणि काही निम्न कोटीची असतात. घाणीत लोळण्याने डुकराला लाभणारे सुख आणि काव्याचा आस्वाद घेणाऱ्या, देशाकरिता बलिदान करणाऱ्या किंवा परदुःखाने व्यथित होऊन ते दूर करण्याकरिता झटणाऱ्या मानवांनाही सुख होते. पण डुकराचे सुख आणि वरील मानवांचे सुख यांत जमीन अस्मानाचा फरक असतो. कोणीही मनुष्य उच्च सुखांचा त्याग करून पशुंची सुखे स्वीकारणार नाही, एवढेच नव्हे तर पशूना कधीही न होणारी उच्च कोटीची अनेक दुःखे मानवप्राणी पत्करतात. पण या गोष्टीकडे उपयोगितावादाचे दुर्लक्ष होते. ‘जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख’ हे आपल्या कर्मांचे नैतिक अंतिम साध्य आहे असे म्हणणाऱ्या उपयोगितावाद्याला सुखांतील फक्त मात्रेचे भेदच अभिप्रेत असू शकतात, गुणाचे असू शकत नाहीत. कारण सुखांत गुणात्मक भेद असतील तर केवळ मात्रात्मक भेद असलेली आणि गुणात्मक भेद असलेली सुखे यांच्यापैकी कोणते सुख मोठे हे सांगणे अशक्य आहे. या आक्षेपाला उपयोगितावादी काय उत्तर देऊ शकेल?
सकृद्दर्शनी हा आक्षेप निरुत्तर करणारा दिसतो खरा. निम्न कोटीचे एक सुख आणि उच्चकोटीचे एक यांची तुलना करून त्यांपैकी कोणते सुख मात्रेने मोठे आहे हे सांगणे अशक्य आहे हे खरेच आहे. पण ते कळल्यावाचून आपल्या कर्माने जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख निर्माण होईल की नाही हेही कोणाला सांगता येणार नाही. अशा परिस्थितीत उपयोगितावादाने हार मानावी काय?
मला वाटते की याही आक्षेपातून सुटण्याचा मार्ग आहे. भिन्न प्रकारच्या सुखांची बेरीज करावी लागल्याचे प्रसंग कोणते असतात? सर्वांत परिचित उदाहरण द्यायचे झाल्यास एखाद्या कुटुंबप्रमुखाचे देता येईल. आईबाप आणि दोनतीन अपत्ये एवढ्यांचे बनलेले लहानसे कुटुंब असले तरी त्याच्या सदस्यांना भिन्न प्रकारची सुखे हवी असतील. बाप सुशिक्षित असेल तर त्याच्या आवडीची कर्मे वाचन, सौंदर्यास्वाद इ. असतील. पत्नी थोडे शिकलेली असल्यास तिची सुखे नवऱ्याच्या सुखांहून भिन्न असणार. उदा. धार्मिक पुस्तके, वर्तमानपत्रे, गोष्टींची पुस्तके यांच्या पलीकडे तिचे वाचन जात नसणार. मुलांपैकी शाळेत शिकणारा मुलगा/मुलगी यांच्या आवडी बऱ्याच भिन्न असणार. कोणाला संगीत आवडत असेल तर दुसऱ्याला वादविवाद, खेळ इ. आवडत असतील, सर्वांत लहान अपत्य खाणे, पिणे, खेळणे याखेरीज कशाचाही विचार करू शकत नसेल. पण घटकांच्या आवडी इतक्या भिन्न असूनही कुटुंबप्रमुख सर्वांच्या गरजा शक्यतो समान प्रमाणांत पुऱ्या करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे त्याला साधने पुरविणे, आणि ती अपुरी असल्यास त्यांची वाटणी करणे असा त्याचा प्रयत्न असतो. सामान्यपणे त्याला कुटुंबा-बाहेरच्या लोकांचा विचार करावा लागत नाही. आपल्या अल्प साधनसामग्रीचा कुटुंबाच्या महत्तम सुखनिर्मितीसाठी उपयोग करणे एवढेच त्याला करता येते.
कुटुंबाबाहेरील व्यक्तींच्या सुखदुःखांचा विचार करता येण्याकरिता सामान्यपणे साधनसामग्री विपुल असावी लागते. तो विचार करण्याचे प्रसंग श्रीमंत, अधिकारी, शिक्षक, राज्यकर्ते इ. व्यक्तींच्या जीवनांत येतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांच्या जास्तीत जास्त सुखाचा विचार करावा लागण्याचे प्रसंग येतात. पण ते तो विचार कसा करतात? या ठिकाणी एक मुख्य सूत्र हे लक्षात ठेवण्यासारखे आहे, ते म्हणजे अर्थशास्त्रात गरजांचे Necessaries (अत्यावश्यक), Comforts (आराम) आणि Luxuries (विलास) असे केले जाणारे विभाजन लक्षात ठेवल्यास जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख निर्माण करण्याचा एक महत्त्वाचा उपाय सापडू शकेल. Necessaries म्हणजे जीवनाला अत्यावश्यक साधने, उदा. अन्न, वस्त्र, निवारा. त्यांच्यावाचून मनुष्य जिवंत राहू शकत नाही. ती सर्वांना न मिळाली तर अर्थात जास्तीत जास्त सुखवृद्धि होऊ शकणार नाही. जगण्याला आवश्यक गोष्टी न मिळाल्यामुळे होणारी दु:खे सुखांतून वजा करावी लागतील. अत्यावश्यक सुखसाधने प्राप्त झाल्यावर मग कोणालाही comfortsची, म्हणजे आरामदायी गोष्टींची अपेक्षा असणार आणि त्याही मिळाल्यावर शेवटी luxuries म्हणजे विलासांचा नंबर लागेल. या क्रमाने इच्छापूर्ती झाल्यास मोठ्या प्रमाणात महत्तम सुख-निर्मिती होऊ शकेल यांत शंका नाही.
आता मनुष्यांना विविध प्रकारची सुखे आवडतात. शारीरिक गरजा तर सर्वांनाच असतात. पण त्याशिवाय कोणाला ज्ञान, साहित्य, संगीत, सौंदर्य, परोपकार इ.मध्ये रस असेल, आणि त्यांपैकी एका किंवा अधिक गोष्टींच्या प्राप्तीकरिता ते प्रयत्नशील असतील, तर अशा भिन्न प्रकृतींच्या महत्तम सुखाचा हिशेब करताना ते कसे ठरविता येईल? ज्यांना शारीरिक सुखांबरोबर उच्चतर प्रतींच्या सुखांचा परिचय आहे अशा लोकांचे उच्च-प्रतींच्या सुखांविषयी बरेच एकमत आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. ती सुखे शारीरिक सुखांहून उच्चतर आहेत याविषयी त्यांच्या मनात कसलाही संदेह नसतो, मग उच्चप्रतींच्या सुखांपैकी कोणती इतरांहून श्रेष्ठ आहेत याविषयी त्यांचे एकमत नसेना का. या उच्च-प्रतीच्या सुखांविषयी लक्षात घेण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या सुखांचे क्षेत्र शारीरिक सुखांच्या क्षेत्रापेक्षा व्यापक असते. म्हणजे त्यांच्या प्राप्त्यर्थ केल्या जाणाऱ्या उद्योगाने केवळ काला सुख होते असे नसून काहून भिन्न अशा अनेक लोकांनाही ते प्राप्त होते. उदा. ज्ञानप्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नाचे लाभ हजारो इतर लोकांना मिळू शकतात. संगीत गाणाऱ्या मनुष्याखेरीज अगणित व्यक्तींना त्याचे सुख अनुभवता येते. तीच गोष्ट चित्र, शिल्प इ. कलांची आहे. परोपकारी माणसाचा तर अन्य लोकांना उघडच लाभ होतो. तेव्हा कर्त्याबरोबर अन्यांचाही विचार केला तर उच्चतर सुखे शारीरिक सुखांपेक्षा मात्रेनेही मोठी असतात असे म्हणता येते. हे लक्षात घेतले तर सुखासुखां-मध्ये असणारा उच्चनीचतेचा भेद मात्रेचाही असतो असे म्हणावे लागते. म्हणजे उपयोगिता-वादावर घेतल्या जाणाऱ्या याही आक्षेपापासून सुटका होते.
विरोधकांनी आणखीही अनेक आक्षेप घेतले आहेत. पण वरील तीन आक्षेपांखेरीज अन्यांचा विचार करण्याची जरूर नाही असे वाटते.
कर्मयोग, प्लॉट नं. ४, बलराज मार्ग, धंतोली, नागपूर — ४४० ०१२

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.