शालेय शिक्षण – एक अभिनव प्रयोग (उत्तरार्ध)

भावनिक आरोग्याच्या शिक्षणाचे स्वरूप
वरील पद्धतीने प्रशिक्षण घेतलेले शिक्षक ‘द लिव्हिंग स्कूल’ मधील मुलांना भावनिक आरोग्याविषयी जे शिक्षण देत असत, त्यात मुख्यतः कोणत्या संकल्पनेचा समावेश करण्यात आला होता, ते पाहू. या संदर्भात प्रथम असे स्पष्टपणे नमूद करावयास हवे, की मुलांना भावनिक आरोग्याचे शिक्षण देताना शिक्षक विवेकनिष्ठ मानसोपचारातील एका मूलभूत संकल्पनेवर भर देत असत. आणि वस्तुतः ती संकल्पना म्हणजे पूर्वेकडील व प िचमेकडील अनेक देशांमधील बऱ्याच तत्त्ववेत्त्यांनी वारंवार प्रतिपादलेल्या एका सिद्धान्ताची पुनर्मांडणी आहे. तो सिद्धान्त असा, की माणूस केवळ त्याच्या जीवनात घडणाऱ्या घटनांमुळेच भावनिकदृष्ट्या प्रक्षुब्ध होत नसतो; त्या घटनांचे तो आपल्या मनातील अविवेकी दृष्टिकोणांनुसार किंवा अविवेकी जीवनतत्त्वज्ञानानुसार जे विशिष्ट विवरण आणि मूल्यमापन करतो, त्यामुळे स्वतःला प्रक्षुब्ध करून घेतो. तेव्हा त्याला आनंदाने व कार्यक्षमतेने जीवन जगावयाचे असेल, तर त्याने स्वतःच्या मनातील अविवेकी दृष्टिकोणांमध्ये किंवा जीवनतत्त्वज्ञानामध्ये आमूलाग्र परिवर्तन केले पाहिजे.
शाळेतील शिक्षक वरील सिद्धान्ताचा उपयोग करून, अगदी पहिल्या इयत्तेतील मुलांनाही त्यांच्या भावनिक अस्वास्थ्यावर मात करण्यास कसे साहाय्य करीत असत, ते पुढील उदाहरणावरून समजावून घेता येईल. समजा एक मुलगा अ टप्प्यावर अंकगणितात नापास झाल्यावर, क टप्प्यावर विषण्णतेच्या भावनेने अतोनात अस्वस्थ झाला आहे. अशा वेळी त्याचे अंकगणिताचे शिक्षक त्याच्या असे निदर्शनास आणतील, की त्याच्या मनातील विषण्णतेची भावना त्याच्या अंकगणितातील अपयशामुळे उत्पन्न झालेली नसून, त्याच्या मनात ब टप्प्यावर दृढमूल होऊन बसलेल्या अविवेकी दृष्टिकोणातून उत्पन्न झाली आहे. आणि तो अविवेकी दृष्टिकोण सारांशाने अशा रीतीने मांडता येईल : “मी अंकगणितात नापास व्हावयास नकोच होते. तरी मी नापास झालो आहे. ही गोष्ट महाभयंकर आहे. त्यावरून असे सिद्ध होते, की मी म्हणजे एक नालायक व कुचकामी मुलगा आहे.” नंतर त्या मुलाचे शिक्षक त्याला ड टप्प्यावर त्याच्या मनातील वरील दृष्टिकोणाची सत्यासत्यता पारखून घेण्यास शिकवतील. परिणामी तो मुलगा स्वतःला पुढील प्र न नेटाने विचारू लागेल : “मी अंकगणिताच्या परीक्षेत नापास व्हावयास नकोच होते, असे समजण्यास कोणता पुरावा उपलब्ध आहे? तसेच, मी नापास झालो आहे ही गोष्ट भयंकर कशी काय आहे? आणि अंकगणितातील माझ्या अपयशामुळे मी म्हणजे एक नालायक व कुचकामी मुलगा आहे, असे कसे काय सिद्ध होते?”
अंकगणितात नापास झालेल्या वरील मुलाला नंतर त्याचे शिक्षक गृहपाठही देतील. उदाहरणार्थ, ते त्या मुलाला अंकगणिताच्या आणखी काही परीक्षांना मुद्दाम बसण्यास उत्तेजन देतील. असे केल्याने त्या मुलाला समजू लागेल, की एकतर त्याला त्या परीक्षांमध्ये पास होता आले; किंवा तो त्या परीक्षांमध्ये नापास झाला, तरी त्याला स्वतःची निर्भर्त्सना न करता, आपले अपयश पचविता येते. इतकेच नव्हे, तर शिक्षक त्याला एखाद्या उपक्रमात मुद्दाम नापास होण्याचा, अपयशी होण्याचा गृहपाठ देतील. अशा प्रकारे शिक्षक त्याला इतरही काही गोष्टी गृहपाठ म्हणून करण्यास उद्युक्त करतील. शिक्षकांनी दिलेले वेगवेगळे गृहपाठ करून, तो मुलगा आपल्या मनातील विषण्णतेच्या मुळाशी रुजलेल्या अविवेकी दृष्टिकोणावर विचार, भावना आणि प्रत्यक्ष कृती या तिन्ही मार्गांनी हल्ला चढवून त्याचा समूळ उच्छेद करू शकेल.
अशा प्रकारे त्या मुलाने ड टप्प्यावर आपल्या मनातील अविवेकी दृष्टिकोणाचे उच्चाटन केले, म्हणजे तो इ टप्पा गाठेल. या टप्प्यावर त्याच्यामध्ये दोन प्रकारचे बदल झाल्याचे दृष्टोत्पत्तीस येईल. पहिला बदल म्हणजे त्याच्या मनात आता विवेकी दृष्टिकोण मूळ धरून फोफावू लागले. तो विवेकी दृष्टिकोण सामान्यतः असा असेल : “मी अंकगणितात नापास होणे ही गोष्ट नक्कीच अहितकारक व अडचणीची आहे. पण त्यात भयंकर असे काहीच नाही. मी अंकगणितात नापास व्हावयास नकोच होते, असे समजण्यास कोणतेच सयुक्तिक कारण दिसत नाही. अर्थात अनेक कारणे देऊन असे म्हणता येईल, की मी अंकगणितात नापास झालो नसतो, तर बरे झाले असते. आणि मी केवळ परीक्षेत नापास झाल्यामुळे असे अजिबात सिद्ध होत नाही, की मी म्हणजे एक नालायक व कुचकामी मुलगा आहे. घडलेल्या घटनेवरून फारतर असे म्हणता येईल, की माझ्यामध्ये काही दुर्दैवी गुणविशेष आहेत. उदाहरणार्थ, माझ्यामध्ये काही प्रमाणात शिस्तीचा अभाव आहे. त्याचप्रमाणे मी अभ्यास व इतरही काही गोष्टी करण्यात तत्पर व कार्यक्षम नाही.” आणि त्या मुलात इ टप्प्यावर जो दुसरा बदल झाल्याचे आढळून येईल तो असा, की त्याच्या मनातील विषण्णता व अस्वस्थता नाहीशी झालेली आहे. आणि त्याला नापास झाल्या-बद्दल खंत वाटत असली, तरी तो अधिक शांत चित्ताने अंकगणितात पुढील परीक्षेत पास होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू लागला आहे. शिक्षणाची प्रक्रिया सुलभ नाही
एखाद्या मुलाचे शिक्षक त्याला त्याच्या भावनिक अस्वास्थ्यावर मात करण्यास कसे शिकवीत असत, हे वरील उदाहरणावरून समजून येईल. मात्र येथे एक खुलासा करणे उपयुक्त होईल. तो असा, की वरील उदाहरणात शिक्षक मुलांना कोणत्या रीतीने मदत करीत असत, याची केवळ एक ढोबळ रूपरेषा येथे सादर केली आहे. परंतु मुलांना भावनिक आरोग्याचे शिक्षण देण्याचे काम सुलभ, चुटकीसरशी होणारे नसते. पहिली गोष्ट म्हणजे, एखाद्या मुलाला असे शिक्षण देताना त्याचे वय, त्याच्यापुढील समस्या, त्याची आकलनशक्ती इत्यादी बाबी विचारात घ्याव्या लागतात. उदाहरणार्थ, लहान मुलांना ड टप्प्यावर त्यांच्या मनातील अविवेकी दृष्टिकोणांची काटेकोरपणे परीक्षा घेण्यास शिकविणे सोपे नसते. म्हणून वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग करून, मुलांना विवेकी रीतीने विचार कसा करावा याचे शिक्षण क्रमाक्रमाने देता येते. उदाहरणार्थ, मुलांच्या गटात पुढील दोन त-हेच्या वाक्यांवर चर्चा घडवून आणून, शिक्षक त्यांना विवेकी विचार कशास म्हणावे आणि अविवेकी विचार कशास म्हणावे, हे समजावून सांगू शकतात : (१) मला शाळेतील अभ्यासक्रमात चांगली प्रगती करावयास आवडेल. कारण त्यामुळे माझ्या वाट्याला काही विशिष्ट फायदे येतील. (२) मी शाळेच्या अभ्यासात चांगली प्रगती केलीच पाहिजे; नाहीतर मी म्हणजे मी म्हणजे एक कुचकामी, नालायक मुलगा आहे असे सिद्ध होईल.
शिक्षकांनी मुलांना भावनिक आरोग्याविषयीचे शिक्षण समजणे सोपे जावे म्हणून ते विविध पद्धतींचा अवलंब करून पायरी-पायरीने दिले, तरी आणखी दोन अडचणी उद्भवतात. पहिली अडचण म्हणजे माणसाच्या मनात क टप्प्यावर निर्माण होणारी भावनिक अस्वस्थता केवळ त्याच्या बाह्य जगात घडणाऱ्या घटनांमुळे—-म्हणजेच अ टप्प्यावर घडणाऱ्या घटनांमुळे—-उत्पन्न होत नसते; ती ब टप्प्यावर त्याच्या मनात खोलवर रुजलेल्या अविवेकी दृष्टिकोणांमुळे उत्पन्न होत असते, हा विवेकनिष्ठ मानसोपचाराचा मूलभूत सिद्धान्तच काही मुले शिकण्यास राजी होत नाहीत. हा सिद्धान्त सूत्ररूपाने असा सांगता येतो : अ X ब = क. उलट, त्या मुलांना वाटते, की अ टप्प्यावर बाह्य जगात घडणाऱ्या घटनांमुळेच त्यांच्या मनात क टप्प्यावर भावनिक अस्वस्थता निर्माण होत असते. त्यांच्या मनातील ही कल्पना सूत्ररूपाने अशी सांगता येते : अ -> क. दुसरी अडचण म्हणजे, जरी काही मुले तत्त्वतः अX ब = क हे सूत्र शिकतात व मान्य करतात, तरी त्यानुसार आपल्या भावनिक उद्रेकावर मात करण्यास राजी होत नाहीत.
अशा वेळी शिक्षक अशी समजूत करून घेत नाहीत, की मुलांच्या या विरोधामागे त्यांच्या मनातील शिक्षकांबद्दलचा दुस्वास आहे किंवा त्यांना भावनिकदृष्ट्या प्रक्षुब्ध राहण्यातच रस आहे. उलट, शिक्षक असे समजतात, की मुलांच्या विरोधाच्या मुळाशी त्यांच्या अविवेकीपणे विचार करण्याचा निसर्गदत्त वारसा असतो. आणि त्यांच्यामधील या जन्मजात प्रवृत्तीला, त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीनेही हातभार लावलेला असतो. तेव्हा त्यांचे विवेकी दृष्टिकोणांविरुद्धचे बंड व आपल्या नेहेमीच्याच अकार्यक्षमतेने वर्तन करण्याचा परिपाठ, म्हणजे त्यांची दूरवरच्या हिताचा विचार न करता केवळ नजीकच्या फायद्याचा विचार करून वागण्याची प्रवृत्ती असते. त्याचप्रमाणे त्यांच्या बंडाच्या मुळाशी त्यांची स्वतःच्या भावनिक उद्रेकाच्या अधीन जाण्याची प्रवृत्ती असते. शिवाय, त्यांच्या विरोधाला आणखीही एक कारण असते. ते म्हणजे, आपल्या अविवेकीपणे विचार करण्याच्या आणि आत्मघातकी वर्तन करण्याच्या सवयीने त्यांना जखडून टाकलेले असते. आणि मुख्य म्हणजे त्यांची अशी इच्छा असते, की आपण काही कष्ट न घेता जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे आपल्यापुढील समस्यांचे निराकरण होऊन आपल्या परिस्थितीमध्ये व आपल्या स्वतःमध्ये सुधारणा झाली, तर काय बहार होईल!
मुलांना भावनिक आरोग्याचे शिक्षण देताना अशा अडचणी उद्भवणार आणि त्या उद्भवल्या की त्यांचे निराकरण कसे करावे, हे प्रशिक्षित शिक्षकांना माहीत असते म्हणून विरोधी सूर लावणाऱ्या मुलांना त्यांचा विरोध कोणत्या अविवेकी दृष्टिकोणां-तून निर्माण झाला आहे, हे शिक्षक त्यांना समजावून देतात. तसेच ते मुलांच्या असेही निदर्शनास आणून देतात, की त्यांच्या अविवेकी बंडखोरीमुळे त्यांच्या पदरात फायद्याहून तोटेच अधिक पडतील. म्हणून त्यांनी आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्या बंडखोरीच्या मुळाशी धुमसत असलेल्या अविवेकी दृष्टिकोणांचे उच्चाटन करून, त्यांच्या विरुद्ध वर्तन करण्याचा नेटाने सराव करावा, हे उत्तम.
थोडक्यात असे म्हणता येईल की प्रशिक्षित शिक्षक मनाशी अशी खूणगाठ बांधून असतो, की आपल्या समुपदेशनाला मुलांकडून विरोध होणारच. परंतु त्यांच्या विरोधामुळे आपण उद्विग्न होऊन, आपले प्रयत्न सोडून द्यावयाचे नाहीत. त्यामुळे तो मुलांच्या विरोधाशी चिकाटीने मुकाबला करतो. म्हणजे माणसाच्या भावनिक अस्वस्थतेचे मूळ त्याच्या मनातील अविवेकी दृष्टिकोणात असते; आणि त्याला आपल्या भावनिक अस्वस्थतेतून स्वतःची सुटका करून घ्यावयाची असेल, तर त्याने आपल्या मनातील अविवेकी दृष्टिकोण उपटून टाकून त्यांच्या ठिकाणी विवेकी दृष्टिकोणांची स्थापना केली पाहिजे, हा सिद्धान्त तो मुलांना पुन्हापुन्हा शिकवितो. अर्थात हे काम सोपे नाही. परंतु ‘द लिव्हिंग स्कूल’ मधील अगदी पहिल्या इयत्तेतील, म्हणजे सहा वर्षांच्या काही मुलांनीही, भावनिक आरोग्याच्या अभ्यासक्रमाचा फायदा करून घेतल्याचे शिक्षकांना आढळून आले. कोणाला याचे आ चर्य वाटेल. कारण काहींच्या मनात अशी शंका उत्पन्न होईल, की प्राथमिक शाळेतील लहान मुलांना भावनिक आरोग्याच्या या शिक्षणाचा अर्थ कितपत समजला होता. आणि समजलेल्या भागाचा ती मुले फायदा कशी करून घेत होती? ही शंका रास्तच म्हटली पाहिजे. आणि तिच्या निराकरणार्थ असे नमूद करावयास हवे, की शाळेतील प्रशिक्षित शिक्षक मुलांना भावनिक आरोग्याचे धडे केवळ व्याख्याने देऊन, शुष्क पद्धतीने देत नसत. उलट, विषय सोपा व मनोरंजक करून मुलांना शिकविता यावा, म्हणून शिक्षक शाळेतील अनेक शैक्षणिक साधनांचा उपयोग करीत असत. उदाहरणार्थ, ते मुलांना मुद्दाम त्यांच्यासाठी लिहिलेल्या गोष्टी, नाटिका, परीकथा इत्यादी साधनांबरोबर इतर दृक्श्राव्य माध्यमांचा उपयोग करून, त्यांच्या मनातील अविवेकी दृष्टिकोणांचे निर्मूलन करून, त्यांच्या जागी विवेकी दृष्टिकोणांची पेरणी व निगराणी करण्यास शिकवीत असत.
दूरवरचे उद्दिष्ट
एखादा मुलगा भावनिकदृष्ट्या अस्वस्थ झाला, तर त्याचे शिक्षक त्याला वरीलसारख्या अनेक साधनांचा अवलंब करून समुपदेश करीत असत. मग त्या मुलाचा भावनिक प्रक्षोभ वर्गातील अभ्यासाशी निगडित असो, नाहीतर त्याच्या इतर मुलांबरोबरच्या बोलण्या-वागण्यातून उद्भवलेला असो. त्याचप्रमाणे मुलाच्या भावनिक उद्रेकाचे मूळ त्याच्या वर्गाबाहेरील किंवा शाळेबाहेरील जीवनात असले, तरी त्याचे शिक्षक त्याला समुपदेश करण्याच्या कामात तत्पर असत. म्हणजे मुले क्रीडांगणावर खेळत असताना, सहलीला गेली असताना, एखाद्या वस्तुसंग्रहालयाला भेट देण्यास गेली असताना किंवा अशाच त-हेच्या इतर प्रसंगी त्यांचे वर्तन विघातक दिशेने होऊ लागले, तर शिक्षक ती गोष्ट त्यांच्या लक्षात आणून देऊन, त्यांना अधिक विधायक प्रकारे वागण्यास प्रवृत्त करीत असत. परंतु शिक्षक मुलांना भावनिक आरोग्याचे शिक्षण देताना, प्रतिबंधक उपाय म्हणून सामूहिक समुपदेशनाच्या पद्धतीचाही अवलंब करीत असत. शिवाय, अशा सत्रांमधून शिक्षक अनेक उदाहरणे देऊन असे दाखवून देत असत, की ब टप्प्यावर ती आपल्या मनात, मूर्खपणे कित्येक अविवेकी दृष्टिकोण कोणत्या प्रकारे स्वतःला पढवीत असत. अर्थात शिक्षक नंतर त्यांना असेही दाखवून देत असत, की त्यांनी चिकाटीने प्रयत्न केला, तर त्यांना त्यांच्या मनात घट्ट रुतून बसलेल्या दृष्टिकोणांची हकालपट्टी करता येईल. परिणामी ती मुले आपण पुढील जीवनात उद्भवणाऱ्या अनेक कठीण प्रसंगी भावनिकदृष्ट्या उद्ध्वस्त होऊ नये, म्हणून काही प्रतिबंधात्मक उपायही योजू शकतील. सारांश सामूहिक समुपदेशनाच्या माध्यमातून मुलांनी त्यांच्या मनात असा दृष्टिकोण बिंबविणे अपेक्षित होते, की त्यांना स्वतःचे विघातक भावनिक उद्रेक खूपच सौम्य करता येतील. त्यामुळे त्यांना निसर्गतःच लाभलेल्या क्षमतांचा उत्तम प्रकारे विकास करून घेऊन, स्वतःचे जीवन आनंदाने जगता येईल.
यावरून असे दिसून येईल, की सामूहिक समुपदेशनाच्या सत्रांमधून, शिक्षक मुलांच्या केवळ तात्कालिक समस्यांवरच लक्ष केंद्रित करीत नसत. उलट, मुलांनी प्राप्त करून घेतलेल्या भावनिक आरोग्याची संपदा टिकवून ठेवून, तिचा उपयोग त्यांनी भविष्य-काळात उद्भवणाऱ्या अनेक प्रसंगी कशा रीतीने करावा, या प्र नाकडेही शिक्षक आवर्जून लक्ष पुरवीत असत. याचा अर्थ असा, की सामूहिक समुपदेशनाच्या सत्रांमार्फत शिक्षक मुलांना विवेकी जीवनदृष्टी हाडीमासी मुरवून घेण्यास साहाय्य करीत असत. त्या जीवन-दृष्टीचा गोषवारा असा, की कोणतीही प्रतिकूल परिस्थिती महाभयंकर समजू नये. सर्व माणसांचा—-अगदी स्वतःसकट सर्व माणसांचा—-त्यांच्या बऱ्यावाईट गुणविशेषांसकट सहिष्णुतापूर्वक स्वीकार करावा. कोणत्याही मनुष्याचे वर्तन कितीही दोषास्पद असले, तरी तो मनुष्यही एक मानवी व्यक्ती आहे, हे ध्यानात ठेवून तिचा धिक्कार न करण्याची खबरदारी घ्यावी. तसेच, आपले जीवन आनंदाने जगावे पण आपण कोणी श्रेष्ठ मानव आहोत, असे सिद्ध करण्याच्या जिद्दीने झपाटल्याप्रमाणे वागू नये. आपण सदैव सामाजिक रूढींचे दास्य स्वीकारून वागण्याऐवजी, आपल्या इच्छेनुसार वागावे आणि असे करतानाही इतरांशी समजूतदारपणे, सहृदयतेने व प्रेमाने वागावे. शिवाय आपली उद्दिष्टे विवेकी मार्ग अनुसरून साध्य करून घेताना, सामाजिक हिताचा म्हणजे इतरांच्याही भल्याचा विचार करून, जीवनाची वाटचाल चालू ठेवावी. सामूहिक समुपदेशनाच्या सत्रांमधून वरील विवेकी आणि मानवतावादी जीवनदृष्टी मुले शिकतील आणि पुढील शिक्षणासाठी शाळेचा निरोप घेण्याच्या वेळेपर्यंत, त्या जीवनदृष्टीची पाळेमुळे त्यांच्या मनात खोलवर रुजलेली असतील, अशा दूरदृष्टीने शिक्षक सामूहिक समुपदेशनाचा अभ्यासक्रम राबवीत असत. या अभ्यासक्रमाच्या मुळाशी एक तत्त्व गृहीत धरलेले होते. ते असे, की मुले कालांतराने प्रौढ होईपर्यंत, त्यांना कमी-अधिक प्रमाणात भावनिक समस्यांना सामोरे जावे लागते. आणि वस्तुतः त्यानंतरही त्यांना कधीकधी समुपदेशनामार्फत मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा किफायतशीरपणे उपयोग करून घेता येणे शक्य असते. साहजिकच शाळेने मुलांना भावनिक आरोग्याचे शिक्षण देण्यासाठी उपलब्ध करून दिलेला सामूहिक समुपदेशनाचा उपक्रम, केवळ विशिष्ट काळापुरता मर्यादित नव्हता. उलट, शाळेतील सर्व मुलांना शाळा सोडून जाईपर्यंत सामूहिक समुपदेशनाच्या सत्रांमध्ये नियमितपणे सहभागी होणे
अनिवार्य होते.
प्रयोगाची फलश्रुती
येथवरच्या सर्व विवेचनावरून असे समजून येईल, की डॉ. एलिस यांनी १९७१ साली त्यांच्याच संस्थेत स्थापन केलेल्या ‘द लिव्हिंग स्कूल’ चे खास उद्दिष्ट व कार्यपद्धती, त्या शाळेच्या नावाला शोभेल अशीच म्हणजे जीवनाभिमुख होती. साहाजिकच शाळेची अशी अपेक्षा होती, की जी मुले शाळेत अगदी पहिल्या इयत्तेत दाखल होऊन कालांतराने प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर शाळेतून बाहेर पडतील, ती अमेरिकेतील इतर प्राथमिक शाळांमधून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या मुलांच्या तुलनेने भावनिकदृष्ट्या कमी असंतुलित असतील. परंतु शाळेची अशी भ्रामक अपेक्षा नव्हती, की ती मुले चिंता, विषण्णता, वैरभाव इत्यादी आत्मघातकी भावनांच्या तावडीतून पूर्णपणे मुक्त झालेली असतील आणि त्यांच्या वागण्यात कोणत्याही उणिवा दिसून येणार नाहीत. अर्थात्, त्यांच्या आत्मघातकी भावनांमध्ये व वर्तनामध्ये बरीच सुधारणा झाल्याचे दिसून येईल, अशी शाळेची अपेक्षा होती; शाळेतील मुले पुढे देवदूत होणे नक्कीच अपेक्षित नव्हते. ती मुले माणसे होती आणि म्हणून सर्व माणसांप्रमाणे अपूर्ण आणि प्रमादशील राहूनच जीवन जगणार होती.
तथापि ‘द लिव्हिंग स्कूल’ अनेक बाबतींत यशस्वी झाल्याचे आढळून येऊ लागले होते. मात्र दुर्दैवाने आर्थिकदृष्ट्या शाळा अयशस्वी होत होती. आणि अखेर याच कारणासाठी ती शाळा १९७५ साली बंद करावी लागली. कारण शाळेच्या स्थापने-पासून पाच वर्षांच्या कालावधीत तिला एक लाख डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला होता. तरीदेखील पाच वर्षांच्या कालावधीत एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात आली. ती अशी, की शाळेत प्रचलित विषय शिकविणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले, तर ते शिक्षक सहा ते बारा वर्षांच्या मुलांना विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्रावर आधारित समुपदेशन परिणामकारकपणे करू शकतात. शिवाय, या कालावधीत डॉ. एलिस यांच्या संस्थेतील मानसशास्त्रज्ञांनी, मुलांना भावनिक शिक्षण देण्यासाठी उपयोगी पडेल अशा बऱ्याच साहित्याची निर्मिती केली. त्यांपैकी काही पुस्तके व इतर साहित्य अजूनही विक्रीसाठी उपलब्ध आहे.
शाळेतील मुलांच्या भावनिक आरोग्यावर होणारे सुपरिणाम मुलांना व पालकांनाही पसंत पडत होते. असे सुपरिणाम मोठ्या वयोगटातील मुलांवर तुलनेने अधिक झाल्याचे दिसून आले. तरी काही सहा वर्षांच्या, म्हणजे पहिल्या इयत्तेतील मुलांनाही शाळेतील शिक्षणाचा फायदा झाल्याचे आढळून आले. इतकेच नव्हे, तर पुढे कित्येक वर्षांनी शाळेतील मुले डॉ. एलिस यांना अचानक कधी भेटतात, तेव्हा आपण ‘द लिव्हिंग स्कूल’ मध्ये होतो आणि आपल्याला त्या शाळेतील शिक्षणाचा जसा त्या वेळी फायदा झाला तसाच आजही होत आहे, असे सांगण्यास विसरत नाहीत.
मात्र त्या शाळेतील भावनिक आरोग्याच्या शिक्षणाचा मुलांवर कोणता परिणाम झाला, याविषयी पद्धतशीर संशोधन करून काही निष्कर्ष काढण्यापूर्वीच शाळा बंद करावी लागली. आणि जेव्हा शाळा कार्यरत होती, तेव्हा पद्धतशीर संशोधन करण्याच्या मार्गात काही अडचणी निर्माण होत असत. एकतर शाळेत मुळातच मुलांची संख्या कमी होती. आणि पालकांना आपली मुले मोठ्या शाळेत घालावी असे वाटत असे. कारण मोठ्या शाळांमधून संगीताचे, विविध प्रकारच्या खेळांचे, व्यायामाचे वगैरे शिक्षण देण्यासाठी जेवढ्या सुविधा उपलब्ध असतात, तेवढ्या ‘द लिव्हिंग स्कूल’ मध्ये नव्हत्या. त्यामुळे काही विद्यार्थी दोन किंवा तीन वर्षांनी शाळा सोडून गेले. अशाच त-हेच्या इतर अडचणींमुळे शाळेतील भावनिक आरोग्याच्या शिक्षणाचा मुलांवर काय परिणाम झाला, याविषयी पद्धतशीर अभ्यास होऊ शकला नाही. परंतु डॉ. एलिस यांनी ‘द लिव्हिंग स्कूल’ ची स्थापना करून शिक्षणक्षेत्रात जो एक अभिनव प्रयोग केला, त्यावरून स्फूर्ती घेऊन काही शाळांनी विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्रावर आधारित असा भावनिक आरोग्याच्या शिक्षणाचा उपक्रम आपल्या शाळेत चालू केला. उदाहरणार्थ, कनेक्टिकटमधील एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेत असा अभ्यासक्रम चालू करण्याचा मनोदय डॉ. एलिस यांच्याजवळ व्यक्त केला. तेव्हा त्या शाळेतील शिक्षकांना, विवेकनिष्ठ मानसोपचारावर आधारित समुपदेशन कसे करावे, याचे प्रशिक्षण डॉ. एलिस यांनी आपल्या संस्थेमार्फत दिले. त्याचप्रमाणे इतरही काही शाळांनी आपल्या मुलांना भावनिक आरोग्याचे शिक्षण देण्यासाठी ‘द लिव्हिंग स्कूल’ मधील अभ्यासक्रमाच्या धर्तीवर उपक्रम सुरू केले. यावरून असे म्हणता येईल, की डॉ. एलिस यांनी शिक्षणक्षेत्रात केलेल्या अभिनव प्रयोगाने इतरांना स्फूर्ती मिळाली, हीदेखील त्यांच्या प्रयोगाची एक मोठी फलश्रुती होय.
४४ डी-११६, मनीषनगर, जे.पी.रोड, अंधेरी, प िचम मुंबई – ४०० ०५३

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.