अनुभववादी नीतिमीमांसेवरील आक्षेपांस उत्तर

फेब्रुवारी 2003 च्या आजचा सुधारक मधील माझ्या लेखात मी अनुभववावादी नीतिमीमांसेचे विवरण आणि समर्थन केले. त्या लेखाच्या शेवटी अनुभववादाच्या टीकाकारांचे काही आक्षेप आहेत असे मी म्हणालो. त्या आक्षेपांना उत्तरे देण्याचा प्रयत्न या लेखात करावयाचा आहे.
पहिला आक्षेप असा होता की नैतिक वाक्यांचे प्रमुख कार्य कर्मोपदेश आहे ही सर्वमान्य गोष्ट आहे. ती सर्व वाक्ये स्पष्टपणे किंवा व्यंजनेने, उपदेशपर, आदेशपर किंवा prescription असून आपण काय करावे हे सांगणारी आहेत. शुद्ध कथनात्मक किंवा निवेदक (indication) वाक्याप्रमाणे ती वस्तुस्थितीचे वर्णन करणारी नसतात. पण हे म्हणणे पूर्णपणे खरे नाही, कारण बहुतेक नैतिक वाक्यांना वर्णनपर अर्थही थोडाफार असतो. उदा. ‘ही गोष्ट चांगली आहे’ हे वाक्य उघडच एका गोष्टीच्या ठिकाणी एक गुण आहे असे सांगणारे आहे असे प्रथमदर्शनी त्याच्या निवेदक रचनेवरून वाटते; आणि मी माझ्या विवरणात ‘हे चांगले आहे’ या आकाराच्या वाक्याचे उदाहरण मुख्यतः घेतल्यामुळे ते निवेदक वाक्य आहे असा गैरसमज होतो; आणि ‘हे चांगले आहे’ म्हणजे ते मला आवडते असे म्हटल्याने तो गैरसमज बळावतो. पण वस्तुतः ‘हे चांगले आहे’ म्हणजे ते मला आवडते असे म्हणताना ते तुम्हालाही आवडावे अशी माझी इच्छाही व्यक्त होते. ती इच्छा जर व्यक्त झाली नाही तर ते वाक्य नैतिक होणार नाही. नैतिक वाक्यांचे आणखीही अनेक प्रकार आहेत, आणि त्या प्रकारात कर्मोपदेशक अंग स्पष्टपणे व्यक्त होते. ‘खरे बोलावे’, ‘अहिंसा पाळावी’, ‘कोणाला दुःख देऊ नये’ इत्यादि वाक्ये उघडच कर्मोपदेशक आहेत, आणि त्यांचा प्रधान अर्थ उपदेशपर आहे हे स्पष्ट आहे.
खरी गोष्ट अशी आहे की बहुतेक नैतिक वाक्ये संमिश्र प्रकारची असतात. त्यांचा प्रधान अर्थ उपदेशपर असला तरी त्यांना वर्णनात्मक किंवा निवेदक प्रकारचा गौण अर्थही असतो. ही गोष्ट चांगली आहे’ या वाक्याचा अर्थ ‘मला ती आवडते’ असा असला तरी तो त्याचा संपूर्ण अर्थ नव्हे, आणि ‘खरे बोलावे’ याचा स्पष्ट अर्थ प्रयोजक असला तरी ‘ते मला संमत आहे’ हा निवेदक अर्थही त्यांत व्यंजित (implied) आहे. अशी वस्तुस्थिति असल्यामुळे नैतिक वाक्यांच्या प्रयोजक अर्थाकडे माझे दुर्लक्ष झाले असे म्हणता येणार नाही. त्या अर्थाचे पुरेसे विवरण झाले नाही असे फार तर म्हणता येईल.
आता दुसऱ्या आक्षेपाकडे वळायचे तर तो असा आहे की नीतीचे प्रधान उद्दिष्ट आपण स्वतःचे जास्तीत जास्त सुख प्राप्त करणे हे नसून ते प्रामुख्याने इतरांचे सुख निर्माण करणे हे आहे. केवळ स्वहितपर कर्मे करणे म्हणजे नीतीचे वागणे नव्हे. या उद्दिष्टाकडेही माझे दुर्लक्ष झाले आहे असा हा आक्षेप आहे. माणसे सामान्यपणे स्वार्थी असतात. त्यामुळे ती स्वसुख शक्यतो जास्तीत कसे होईल अशा अनुरोधाने वागतात. स्वतःचे कमाल सुख हे सर्वांच्या धडपडीचे लक्ष्य असते. पण यात नीति कुठे येते? जे आपण स्वाभाविकपणे करतो ते करणे म्हणजे नीति नव्हे. नीति म्हणजे कर्तव्य करणे. पण कर्तव्याविषयी तुम्ही काहीच बोलला नाहीत.
या आक्षेपाला माझे उत्तर काय आहे? कर्तव्य म्हणजे काय? त्याची बंधनकारकता (obligatoriness) कशात आहे?
या प्र नांना नीतिमीमांसकांनी दिलेले उत्तर असे आहे की नीतीची बंधनकारकता आपल्याला एका प्रकारच्या साक्षात्काराने (intuition) कळते, आणि ही नीतीची प्रधान संकल्पना आहे. ती केवल किंवा निरवयव (simple) असल्यामुळे तिचे वि लेषण करता येत नाही, आणि म्हणून तिची व्याख्याही करता येत नाही. पण ती काय आहे हे आपणा सर्वांना साक्षात् कळते. परंतु हे म्हणणे अतिभौतिकीय (metephysical) किंवा अतिक्रांतवादी असल्यामुळे आपण त्याला मान्यता दिली नाही, हे योग्यच झाले. पण मग बंधनकारक (obligatory) म्हणजे काय? या प्र नाला पर्यायी उत्तर काय आहे? ते उत्तर देणे अनुभववाद्याला शक्य आहे काय? मनुष्य स्वभावतः स्वसुखवादी आहे हे जर खरे असेल तर त्याला कर्तव्य असू शकेल काय? सकृद्दर्शनी असे वाटते की त्याला कर्तव्य असू शकत नाही. कारण एखादे कर्म कर्तव्य असेल तर ते करणे त्याला शक्य असले पाहिजे. म्हणजे स्वसुखाखेरीज अन्य कशानेही तो आकृष्ट होऊ शकत नसेल तर स्वसुखेतर काहीही त्याचे लक्ष्य असू शकणार नाही. तसेच तो एवीतेवी स्वाभाविकपणे स्वसुखार्थ प्रयत्न करणार असेल तर स्वसुखसाधन हेही त्याचे कर्तव्य असू शकणार नाही. आणि स्वसुख त्याचे स्वाभाविक साध्य असल्यामुळे ते प्राप्त करणे हेही त्याचे कर्तव्य असू शकणार नाही. पण मग कर्तव्याची कल्पना म्हणजे एक भ्रम असे होणार नाही काय?
या प्र नाला दोन उत्तरे आहेत.
1. एक उत्तर असे आहे की मनुष्य जर स्वभावतः स्वार्थी असेल तर केवळ सुख नव्हे, तर जास्तीत जास्त सुख प्राप्त करणे ही त्याची धडपड असणार. पण स्वसुखप्राप्तीच्या या उद्योगात अज्ञानामुळे किंवा चुकीच्या समजुतीमुळे महत्तम सुख प्राप्त न होणे सहज शक्य आहे. अदूरदर्शीपणामुळे लांबचे मोठे सुख, जवळच्या अल्पसुखाच्या पाठीस लागल्यामुळे, गमावण्याची त्याच्यावर पाळी येऊ शकते. त्यामुळे महत्तम सुखप्राप्ती-साठी केवळ भ्रांत कर्मे करणे चुकीचे आहे हे त्याच्या लक्षात येऊन ती चूक त्याला दुरुस्त करावी लागेल. अधिक सुख प्राप्त करणे शक्य असताना अल्पसुखामागे लागणे ही चूक तर खरीच! पण तिला नैतिक चूक म्हणता येईल का? मला वाटते म्हणता येणार नाही. ती विवेकाची चूक म्हणता येईल, आणि ती दुरुस्त करण्याचे कर्तव्य त्याचे असेल. या काहीशा दुर्बल अर्थाने त्याला कर्तव्य असू शकेल असे म्हणता येईल.
2. दुसरे उत्तर असे आहे की इतरांना सुख दिल्याने आपल्यालाही एक गाढ समाधान लाभते ही अनुभवसिद्ध गोष्ट आहे. आपण वर पाहिले की मनुष्य निर्भेळ स्वार्थी नसतो. इतरांच्या दुःखाचा परिहार करणे परिहारकर्त्यालाही सुखदायक होते. म्हणजे केवळ स्वसुखार्थ केलेल्या कर्माव्यतिरिक्त परसुखार्थ केलेल्या कर्मांनीही काला सुख होते. गरीब, दीनदुबळ्या, दुर्दैवी लोकांचे दुःख हरण करण्याने त्यांना सुख होतेच, पण ते करणाऱ्या व्यक्तीलाही एका दुर्लभ प्रकारच्या सुखाची प्राप्ती होते. परोपकार करणाऱ्या मनुष्यास केवळ स्वतःकडे लक्ष देणाऱ्या मनुष्यापेक्षा जग चांगले म्हणते, आणि त्यामुळे मिळणारे सुख उपेक्षणीय नसते. या दोन सुखांचा विचार आपण केला तर केवळ स्वहितार्थ केलेल्या कर्मापेक्षा परहितार्थ केले जाणारे कर्म अधिक भरू शकते असे आपल्या लक्षात येईल. आता हे खरे आहे की अदूरदर्शिपणामुळे माणसे सामान्यपणे केवळ स्वसुखाच्या मागे लागतात. परोपकारी कर्मे करणेही स्वहिताचे होते अशी शिकवण माणसाला लहानपणा पासूनच दिली गेली तर त्यांच्या लक्षात येईल की परहितार्थ कर्म करणे स्वहितसाधनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. हे म्हणणे जर बरोबर असेल, निदान विचारणीय असेल, तर दुसऱ्या आक्षेपाला उत्तर देता येईल. म्हणजे नीतीचे प्रधान कार्य लोकांना परहितार्थ कर्मे करण्यास उत्तेजन देणे हे असेल तर ते अनुभववादी नीतीलाही करता येऊ शकेल.
एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली. अनुभववादी नीतिमीमांसा स्वीकारल्यास आपण नीतित्व सोडल्यासारखे आहे असा आक्षेप घेतला जाईल. त्याला उत्तर म्हणून अतिभौतिकीय नीतीवर आधारलेल्या प्रचलित समाजव्यवस्थेची तुलना आपण अनुभववादी नीतिमीमांसा स्वीकारणाऱ्या समाजव्यवस्थेशी करू या. समजा की अतिभौतिकीय नीति सध्या प्रचलित असलेल्या समाजाने स्वीकारली आहे. असे असल्यास आपणास काय दिसावयास हवे? सध्या समाजात माणसे परहितार्थ झटत आहेत, स्वार्थाकडे फारच मर्यादित प्रमाणात लोकांचे लक्ष आहे. पण वस्तुतः काय दिसते? तर सगळीकडे स्वार्थाचा बुजबुजाट. दानधर्म करणारे लोक आपल्याला मरणोत्तर सद्गति मिळावी या हेतूने करतात. काही लोक शाळा, कॉलेजे किंवा अशा संस्थांना दान देतात, पण त्याचबरोबर त्या संस्थांना आपले नाव दिले पाहिजे अशी अट घालतात. म्हणजे त्यांना कीर्तीचा लाभ तर होतोच, पण आश्रित संस्थांच्या कारभारावर स्वामित्वही मिळविता येते. आणि तो मिळविण्यास कोणीही चुकत नाही. याप्रमाणे प्रत्येकजण स्वार्थ कसा साधेल या दृष्टीने वागताना दिसतो. तसे नसते तर जगात आढळणारे दारिद्र्य, गरिबांचे आजार, एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला विलास, चैन, उधळपट्टी, प्रतिपक्षावर येन केन प्रकारेण कुरघोडी, कायद्याचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन, अन्यायी वागणूक—-हे सर्व दिसले नसते. म्हणजे नीतिमीमांसा अतिभौतिकीच किंवा अतिक्रांत असण्याने व्यवहारात काही फरक पडत नाही.
या संदर्भात आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ही गोष्ट म्हणजे परोपकार माफक प्रमाणात केला तर कौतुकास्पद होतो. पण जर एखादा माणूस मोठ्या प्रमाणात परोपकार करू लागला, तर लोक त्याला वेडा म्हणतात. एका अर्थाने निःस्वार्थीपणा हे abnormal असण्याचे लक्षण मानतात. जो पुरेशा प्रमाणात स्वहितदक्ष नसतो तो मनुष्य normal नाही असे सामान्यपणे समजतात. एवढेच नव्हे तर कायद्याच्या दृष्टीनेही ते विवेकी (rational) नसण्याचे गमक मानले जाते. समर्सेट मॉमच्या ‘Sheppy’ या नाटकात हे फार चांगल्या रीतीने दाखविले आहे. त्या नाटकाचा नायक एक मोठी लॉटरी जिंकतो आणि ती गरजू लोकांना वाटू लागतो, तेव्हा ‘शहाणी’ माणसे त्याला वेडा म्हणतात आणि त्याला डॉक्टरांच्या हवाली करण्याचे ठरवितात. आणि आपणही आपला लहान भाऊ किंवा मुलगा जेव्हा गरीब, निराधार मनुष्याची दुरवस्था पाहून त्याला जवळजवळ आपले सर्वस्व देऊ लागतो तेव्हा त्याला ‘वेडाच’ म्हणतो. स्वार्थ सांभाळणे शहाणपणाचे, normal असण्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे असे आपण समजतो, याही गोष्टीचा आपला स्वभाव बनण्याच्या प्रक्रियेत मोठा भाग असतो. त्यामुळे उपजत सहानुभूतीला पायबंद बसतो. कर्मयोग, प्लॉट नं. 4, बलराज मार्ग, धंतोली, नागपूर — 440 012

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.