शाळा

शिक्षणाचा विचार करायला लागले की एक कविता आठवते. मिरोस्लाव होलब नावाचा झेकोस्लोव्हाकिया देशातला एक झक्क कवी आहे. तो डॉक्टर होता. आधी पॅथॉलॉजिस्ट म्हणून काम करायचा, नंतर इम्युनॉलॉजीच्या शास्त्रात त्याने संशोधन केले. त्याच्या बऱ्याच कविता विज्ञानाशी संबंधित आहेत. ‘ऑक्सिडेशन’, ‘मायक्रोस्कोपखाली’, ‘अग्नीचा शोध’ अशी त्याच्या कवितांची नावे. शिक्षणावरच्या या त्याच्या कवितेचे नाव आहे ‘शाळा’. तिच्यामध्ये बाराव्या ओळीत थोडासा बदल करून घेऊन तिचा अनुवाद असा आहे:
एक झाड दारातून प्रवेश करतं, वाकून नमस्कार करत म्हणतं, मी झाड आहे. एक अश्रूचा काळा थेंब, (4)
आकाशातून खाली पडतो अन् म्हणतो, मी पक्षी आहे.
आणि आता कोळ्याच्या रुपेरी जाळ्यावरून प्रेमासारखे काहीतरी जवळ येतं आणि म्हणतं, (8) मी निःशब्दता आहे. पण त्या तिथं फळ्यासमोर उभा ठाकलेला असतो, एक सांस्कृतिक राष्ट्रवादी (12)
तो पुन्हा म्हणतो, कान टवकारून चारी दिशांना, पुन्हा पुन्हा घोकतो, (16) मी इतिहासाची सनातन प्रेरणा आहे आणि आपल्या सगळ्यांना विकास प्रिय आहे. आणि धीरोदात्त रणवीरांचे पराक्रम. (20) तेव्हा वर्गाच्या दाराखालून वाहात असतो रक्तचा एक ओघळ कारण आता सुरू झालेलं असतं शिरकाण, कापाकापी निष्पापांची. (24) खरे पाहिले तर एखादे लहान मूल जगण्यातून शिकत असते. जगताना जग त्याला सामोरे येते. साक्षात. आणि तेच त्याला स्वतःबद्दल सांगते, समजून देते, शिकवते. झाड असे त्याच्यासमोर येते, आणि पोरगेही झाडाला आत्मसात करते, आकळून घेते, आपलेसे बनवून टाकते. त्या झाडाचे निखळ कौमार्यावस्थेतले झाडपण पोराला थेट कळूनच जाते. झाडाचे सत्यच समजून जाते.
आता हा जो सत्याचा साक्षात्कार होतो तो नेहमीच पुरेसा असतो असे नाही. तो गोंधळात टाकणारा किंवा वरवरचा, अपुरा देखील असू शकतो. शिक्षणाचे काम इथे असते. अशा ठिकाणी मध्यस्थी करण्याचे असते. जगण्याचा व जगाचा अर्थ निष्पापपणाने, साक्षातपणाने, ताजेपणाने जाणून घेण्याची क्रिया मुलांची, माणसांची चालूच असते. ती जास्त समर्थ व परिणामकारक बनवण्याचे काम शिक्षणाचे असते. समोर दिसते आहे त्याच्या मागे, पुढे, आजूबाजूला आणि आतमध्ये खोलात जाऊन काय आहे ते पाहण्याची क्षमता मुलाला देण्याचे. देखाव्यांना न भुलण्याचा सावधपणा त्याला देण्याचे. त्याला सत्याचे आकलन जास्त चांगल्या प्रकारे करता यावे याकरता झाडाची सगळी उपलब्ध माहिती व ज्ञान शिक्षणातून त्याला मिळायला हवे. पण खुद्द झाड काय म्हणते आहे ते ऐकण्याची, झाडाला उराउरी भेटण्याची पोराची क्षमताही वाढायला हवी. कारण झाड सारखे नवे नवे काय काय म्हणत असते.
आकाशातून एखादा थेंब पडतो. तो नेहेमीच असे नाही सांगत की मी पावसाच्या पाण्याचा थेंब आहे. कधी कधी थेंब असतो एक अश्रू. कोणाच्या डोळ्यातून तो ओघळलाय? कोण कसले दुःख करते आहे? आणि तो अश्रू म्हणतो, मी एक पक्षी आहे! शक्य आहे. पक्षी आकाशात असतो, काळाही असतो. पण पक्षी पंख पसरून तरंगत असतो, भरारत असतो, विहरत असतो. तो असा सरळ खाली कसा पडतोय? ते पोरगे या सगळ्या भानगडीनेसुद्धा अजिबात डगमगत नाही. कारण त्याच्या कडे कल्पकता आहे. स्वप्न पाहण्याची शक्ती आहे. आणि स्वप्नात तर काहीही घडू शकते! अश्रू पक्षी असतो किंवा फूल किंवा चांदणी. तो आकाशात असेल किंवा माझ्या डोळ्यातही असेल. स्वप्नात काय वाट्टेल ते चालते. स्वप्न पहाण्यातून, जादुई नगरी उभारण्यातून, कल्पनेने हवे ते नवे निर्माण करण्याद्वारा, समोर असलेल्या जगाला माणूस एका वेगळ्याच विलक्षण त-हेने आकळून घेत असतो. आपलेसे बनवत असतो. आटोक्यात आणत असतो. आणि या निर्मितीमध्येच स्वतःमध्ये लपलेले अथांग भावविश्व देखील उलगडून ठेवत असतो.
लहान मुलांमध्ये आणि मोठ्या माणसांमध्येही अशी गोष्टींनी विलक्षण त-हेने भारून जाण्याची शक्ती असते. मोकळ्या, उत्सुक व मुक्त मनाने अशी कलात्मक निर्मिती करण्याची, इतरांनी केलेल्या अशा निर्मितीमध्ये रंगून जाण्याची त्यांची क्षमता वाढवणे हे शिक्षणाचे काम असते. कविता घोकून पाठ करण्यासाठी नसते, चित्र कॉपी करण्यासाठी नसते, गाणे बक्षिस मिळवण्यासाठी नसते. जादूच्या नगरीत शुभ्र पांढऱ्या घोड्यावरून, फुलांची गाणी ऐकत, स्वतःच्या मस्तीत उडत जाण्याची शक्ती तुमच्यात यावी, यासाठी हे सगळे असते. तुम्हाला कुणाच्या काळ्या अछूना, आणि त्यांच्या मागे असलेल्या दुःखाच्या गुंतागुंतीच्या स्ट्रक्चरला, आपलेसे करता यावे म्हणून असते.
शिक्षण यासाठीसुद्धा लागते की माणसाला इतर माणसाशी जास्त चांगली नाती जोडता यावी. रुपेरी जाळ्याच्या हलत्या नाजूक धाग्यांसारख्या संबंधांनी माणसे जोडली जावी. हवे तर त्याला प्रेम म्हणा, दुसरे काही म्हणा. नेमके त्याला नाव देणे अवघडच. पण प्रेमासारखे काहीतरी स्वभावतःच त्या पोराला दुसऱ्याबद्दल वाटते. सुंदर नक्षीकामासारख्या जाळ्यात वावरावसे वाटते. त्याला शब्दांच्या प्रचंड भडिमाराने गारद कशाला करायचे? नात्यांना महान मातृत्व किंवा स्वर्गीय प्रेम असली नावे देण्यापेक्षा, ती पाठ करायला लावण्यापेक्षा, त्याला हे प्रेमासारखे काहीतरी प्रत्यक्षात अनुभवता यायला हवे. कधी कधी, कदाचित बऱ्याचदा, ते मुळीसुद्धा न बोलताच अनुभवाला येते. थेट समजते. या प्रेममय माणूसपणाचा विकास घडून येण्यासाठी शिक्षण हवे.
तर असा कोवळा, जिवंत, रसरसलेला आणि जगाशी समर्थपणे सर्वांगांनी भिडणारा माणूस शिक्षणातून निर्माण व्हायला हवा. ज्याच्यामध्ये सत्य शोधण्याची वैज्ञानिक दृष्टी, कला निर्माण करण्याची सर्जनशीलता, प्रेमस्वरूप नाती जोडण्याची क्षमता, एकसंधपणे नांदतात. असा माणूसच खऱ्याअर्थाने माणूस असतो.
सुशिक्षित.
शिक्षणाद्वारे माणसाला काही एक माहिती, ज्ञान, कौशल्य मिळावे, समाजोपयोगी काहीतरी क्षमता लाभावी, त्याने तिचा वापर करून समाजाला काहीतरी द्यावे, आणि त्या बदल्यात स्वतःचे जीवन फुलवण्यासाटी त्याला काहीतरी मिळावे, यात गैर काहीच नाही. हे आवश्यक आहे. पण जर या सगळ्याची व्यवस्था अशी असेल की शिकताना व नंतर जगताना माणूस स्वतःमधल्या या मूळ मानवी क्षमताच गमावून बसत असेल तर काय उपयोग?
सध्याचा सगळा शिक्षणव्यवहार म्हणजे असा एक भला मोठा उद्योग झाला आहे. धंदा. वर्गात मुले का असतात? शिक्षणातून चांगले मार्कस् पाडून चांगली नोकरी मिळते, म्हणजे पैसा मिळतो, म्हणून. शिक्षक शिकवतात पगार मिळतो म्हणून. म्हणून वर्ग भरतात, शाळा चालते, कॉलेजे व विद्यापीठे चालतात. ही व्यवस्था पैशांनी अशी बांधलेली आणि तारलेली असल्याने तोच तिचा आधार आणि उद्दिष्टही बनला आहे. फक्त पैसा नाही. पैसा व त्या अनुषंगाने येणारी प्रतिष्ठा, सत्ता, मानसन्मान, बड्या बड्या लोकांना उपकुलगुरू, संचालक, शिक्षणमहर्षी, गेला बाजार विद्वान प्राध्यापक म्हणून मिरवता येते. देशाच्या विकासाला चालना दिल्याबद्दल पद्मश्री वगैरे मिळते, सत्कार पुरस्कार लाभतात. आणि विकास आपल्या सगळ्यांना प्रिय असतोच! सध्या तर खाजगीकरण व जागतिकीकरण यांचा जबरदस्त रेटा आहे. केवळ देशच नव्हे तर मी सुद्धा महासत्ता बनायला हवे अशी ईर्षा, किलर इन्स्टिक्ट, यांच्यावर भर आहे. शिक्षण हा या इंधनावर चालणारा व्यवहार बनतो आहे. जास्तच बनणार आहे. अधिक मोठा.
मात्र इतर उद्योगांपेक्षा शिक्षणाचा दुसराही एक उपयोग असू शकतो, करून घेतला जात असतो. शिक्षणाच्या आधी वर्णन केलेल्या खऱ्या उद्देशाच्या नेमका उलट हा उद्देश असतो. तो म्हणजे निष्पाप, कोवळ्या मनांची कत्तल. सत्याचा शोध घेण्याची, कल्पनेने अचाट नव्या जगाची रंगचित्रे काढण्याची, मैत्री व प्रेम करण्याची, अशी सगळी माणसाची शक्ती मारून काढण्याचे दुष्ट कामही शिक्षणातून होऊ शकते, केले जात असते. कारण आजच्या जगाच्या सूत्रधारांना माणसाविषयीच मुळात दुस्वास असतो. पार अविश्वास असतो. त्यामुळे त्यांना इंजिनिअर हवा असतो, इंजिनिअरिंग येणारा माणूस नको असतो. काटछाट करून, तासून घडवलेले, भांडवलशाही समाजयंत्राचे पार्टस् त्यांना हवे असतात. मानवी समाजात राहणारी व काम करणारी माणसे त्यांना नको असतात. आणि याकरता तुमच्या स्वतःहून विचार करण्याच्या, नवनिर्मितीच्या, प्रेम करण्याच्या शक्तींचे खच्ची-करण करावे लागते. पण एवढेच नाही तर तुमच्या मनोविश्वाची खांडोळी करावी लागतात. तुकडे करावे लागतात. तुमची वैज्ञानिकता, कलात्मकता व प्रेममयता एकमेकांपासून तोडून अलग करावी लागतात. वस्तुतः विज्ञानाच्या व्यवहारात नवनिर्मितीसाठी मुक्त कल्पकता लागते, माणुसकीचे अस्तर लागते. कलेला तर माणूसपणाची उपस्थिती लागतेच व वास्तवतेचे कठोर भानही असावे लागते. आणि ज्ञानविज्ञान आणि सुसंस्कृत सुंदरता यांच्यामुळे भाबड्या व तोकड्या प्रेमभावनेला उंची व समृद्धी प्राप्त होते. नपेक्षा माणूस आधाअधुरा, रिता व तुकडेबंद बनतो. यांत्रिक बनतो. क्रूर बनू शकतो किंवा दुबळा बनू शकतो.
सध्याचे शिकवणे आणखी एका त-हेने माणसाला शतखंड करून टाकते आहे. येत्या काळात तर असे होण्याची भीती जास्तच आहे. जगातल्या सर्व माणसांबद्दल मित्रता बाळगणाऱ्या एकसंध माणुसकीची खांडोळी केली जाताहेत. जात, धर्म, राष्ट्र, यांच्यात माणूस वाटून टाकला जातो आहे. निष्पाप असणे किंवा द्वेष न करणे हे भाबडेपणाचे व बावळटपणाचे समजले जाते आहे. यासाठी इतिहासातल्या महापुरुषांचे साफ गैरलागू दाखले काढून आत्मसन्मान, शौर्य व पराक्रमांच्या बेगडी गोष्टी केल्या जाताहेत. आजच्या शिक्षणामध्ये हे होत आहे. उद्याच्या शिक्षणात जास्त होण्याचा धोका आहे.
मुलांच्या डोक्यांची रिकामी खोकी बनवून त्यात भरला जाणार आहे माणसामाणसामधल्या द्वेषावर आधारलेल्या एका बंदिस्त विचारसरणीच्या विषाने संपृक्त कापूस, भुसभुशीत व कधीही पेट घेणारा. कारण त्यायोगे सत्ता व मत्ता मिळवता येते आणि टिकवता येते. एखाद्या तथाकथित शास्त्रज्ञाला राष्ट्रपती बनवता येते. आणि तथा कथित कवीला पंतप्रधान. आणि एखाद्या पाषाणहृदयसम्राटाला मुख्यमंत्री. शिक्षणाचा उपयोग यासाठी व्हायला हवा. मग वर्गाच्या दाराखालून रक्तचे ओघळ पसरत गेले म्हणून काय झाले?
पण हे कायम असेच चालत राहणार नाही. कारण रोज वर्गाच्या दारातून झाड आत येते आणि म्हणते, मी झाड आहे. अश्रूचा थेंब खाली उतरतो आणि म्हणतो, मी पक्षी आहे. आणि माणुसकीच्या धाग्यांनी रुपेरी जाळे विणले जात असते. . . .
13, गीताली कॉलनी, 768/9/96 शिवाजीनगर,पुणे — 411 004

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.