क्रिकेट हा खेळ की स्वार्थाचा बाजार

दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या काही घटनांचे अस्तित्व आपल्या देशात आज ही कायम आहे. ब्रिटिशांनी जाता जाता आपल्या देशाची फाळणी केल्यामुळे न भरून निघणाऱ्या जखमांचे व्रण आजही आपल्याला त्रास देत आहेत. तसेच ब्रिटिशांनी आपल्या देशाला क्रिकेट या खेळाची देणगी दिल्यामुळे या खेळाने सध्या कहर माजविला आहे. 1975 पासून सुरू झालेल्या विश्वचषकामुळे अलिकडच्या काळात क्रिकेटच्या स्पर्धा ह्या खेळाडू वृत्तीने खेळण्याच्या स्पर्धा न राहता त्यामध्ये व्यावसायिक व धंदेवाईक प्रवृत्तीने शिरकाव केला आहे. क्रिकेटच्या वेडाने शालेय विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, शासकीय कार्यालयातील शिपायापासून ते वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत, तसेच लहान मोठ्या विविध व्यावसायिकांना झपाटून टाकले आहे. क्रिकेटची झिंग एवढी विकोपाला गेली आहे की, देशातील ही सर्व मंडळी आपआपले व्यवहार सोडून या नशेत गुंग आहेत.
क्रिकेट या खेळाला शासकीय आश्रय व प्रसारमाध्यमांनी उचलून धरल्यामुळे कमालीची प्रसिद्धी मिळाली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या या खेळावर ताबा मिळवून आपली उत्पादने विकून भरघोस नफा कमावत आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्या या खेळाचे सामने वारंवार घेऊन आपली निकृष्ट व आरोग्यास लाभदायक नसलेली उत्पादने भारतीय जनमानसात अधिक लोकप्रिय करीत आहेत. क्रिकेट खेळाडूंना नायक बनवून त्यांच्या कडून ही मंडळी जाहिरातीद्वारे असंख्य ग्राहकांना लुबाडीत आहे. एका अंदाजानुसार विश्वचषक स्पर्धेत आठशे कोटी रुपये जाहिरातीवर खर्च होणार आहेत. त्यातील दूरदर्शनच्या जाहिरातीवर सहाशे कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. विश्वचषक स्पर्धेमध्ये 45 हजार कोटी रुपयाचे देश विदेशात बेटिंग लावण्यात आलेले आहे. या खेळावर आपल्या देशात-देखील अगदी गल्लीबोळापासून ते देशाच्या राजधानीपर्यंत बेटिंग लावण्यात आले आहे. आपल्या देशात 2000 ते 2800 कोटी रुपयाचा धंदा प्रत्येक सामन्याच्या वेळी केला जातो. मुंबई महानगरीत हाच धंदा सुमारे 1000 कोटी रुपयापर्यंत चालतो. एवढा भयंकर पैसा या खेळावर खेळला जात असल्याने हा खेळ राहिला आहे का, हा प्र न तुम्हा आम्हाला पडतो. तसेच असंख्य प्र नाशी झुंज देणारे आपले राष्ट्र गरीब आहे का, हाही प्र न पडतो.
यापूर्वी या खेळात खेळकर वृत्ती व खेळाडूपणाची भावना होती. खेळणारे खेळाडू देखील जे मानधन देतील त्यावर संतुष्ट रहायचे. परंतु मीडियाने क्रिकेट जसजसा लोकप्रिय केला तसतशा या खेळात अपप्रवृत्ती वाढल्या व खेळाडूंमध्ये कमालीचा स्वार्थ वाढला, हे नुकतेच मॅचफिक्सिंग प्रकरणाने जगजाहीर झाले आहे. क्रिकेट खेळात कमालीचा स्वार्थ व धंदेवाईकपणा शिरूनही आमच्या देशवासीयांनी क्रिकेट खेळाडूंचे सर्व गुन्हे माफ करून त्यांना डोक्यावर घेतले आहे. देशवासीयांना क्रिकेट-फीवरने ग्रासून टाकले आहे. सर्व कार्यालयांतील कामकाज ठप्प आहे. कार्यालये ओस पडली आहेत, कामाच्या फाईली जिथल्या तिथे आहेत, बाबू मंडळी व प्रशासकीय अधिकारी स्कोअर, विकेट, शतक, विश्वचषक कोण जिंकणार, हरणार या चर्चेशिवाय दुसरे कोणतेही काम करत नाही. खेड्यापाड्यातील दुरून गेलेला खेडूत आपल्या कामाविना रिकाम्या हाताने परतत आहे. क्रिकेटची आवड आपण समजू शकतो पण, सर्व कामधंदे सोडून दुसऱ्याला अडचणीत आणणाऱ्या चुका आपल्याकडून होत असतील तर ते कृत्य गैर आहे. आपण सामना जिंकलो की फटाके वाजवतो, जल्लोष करतो. परंतु कर्तव्य सोडून हे सर्व करणे कोठेतरी चुकते, याबद्दल आपण क्रिकेटप्रेमींनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
शालेय व महाविद्यालीन विद्यार्थी परीक्षा तोंडावर आल्या असताना क्रिकेटच्या कैफात बुडाले आहेत. भावी आयुष्याचा विचार न करता ही मंडळी रात्रंदिवस टी. व्ही. समोर बसून आहेत. आयुष्यातील अत्यंत उमेदीचा व महत्त्वाचा काळ वाया घालवीत आहेत. खेळाडूंनी मारलेल्या चौकार-षटकाराने व घेतलेल्या विकेटने स्वतःच्या आयुष्यात असा कोणता बदल होणार आहे वा त्याच्याकडून काय प्रेरणा मिळणार आहे, याचे विद्यार्थ्यांना भान राहिले नाही.
जे देशवासी खेळाडूंवर व खेळावर आपला जीव ओवाळून टाकीत आहेत त्यांची भावना निःस्पृह आहे. अनेक लोकांनी भारत पाक सामन्याचे वेळी भारताने सामना जिंकावा म्हणून नवससायास केले, यज्ञ, अभिषेक, उपासतापास करून परमेश्वराला भारत जिंकावा म्हणून साकडे घातले. भारत पाक सामन्याचे वेळी युद्धजन्य परिस्थिती दोन्ही देशांत होती. या सामन्याच्या वेळी देशातील, महानगरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. बाजारपेठा बंद होत्या. भारताने विजय मिळवल्यावर देशात दिवाळी साजरी झाली. देशाभिमानाने जल्लोश साजरा करणे व खेळाडूंचे कौतुक करणे यात गैर नाही. परंतु सर्व काही बाजूला सारून फक्त खेळावर लक्ष केंद्रित करून विजयाने हुरळून जाऊन, मद्य घेऊन, बेधुंद होणे म्हणजे राष्ट्रनिष्ठा जोपासणे नव्हे.
आपणांकडे या खेळाला खेळ म्हणून न पाहता त्याला जे किळसवाणे स्वरूप आले आहे ते गैर आहे, क्रिकेटवर प्रेम करणे म्हणजे राष्ट्रनिष्ठा जोपासणे, ही भावना आपल्याकडे दृढ होत आहे. देशात हजारो खेड्यांत पाण्याचा प्र न भेडसावत असताना खेळाडू हे नायक देशवासीयांना बहुराष्ट्रीय कंपन्यांचे शीतपेय घेण्याचा संदेश देत आहेत, ही कसली आली राष्ट्रनिष्ठा? खेळाडू स्वतःसाठी खेळत आहेत की बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी? येथे राष्ट्रनिष्ठा गौण आहे असेच त्यांच्या जाहिरातबाजीवरून व भोगवादी व चंगळवादी संस्कृतीचा प्रसार करणाऱ्या कृत्यावरून दिसून येत आहे. क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, नियामक मंडळाकडे हजारो कोटी रुपयांची मालमत्ता आहे, हे मंडळ देशातील गरीब बांधवांना व गरजूंना दोन रुपये मदत करील का, हा या क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्र न पडला आहे.
मु. पो. मुळी, ता. गंगाखेड, जि. परभणी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.