तव्य (ought) आणि कर्तव्य (duty)

नीतिशास्त्रातील प्रमुख संकल्पना म्हणजे ‘साधु’ (good) आणि ‘तव्य-कर्तव्य’ (ought-duty) या. त्यांपैकी ‘साधु’ म्हणजे काय याविषयी मी अनेक लेखांत (विशेषतः गेल्या दोन लेखांत) लिहिले आहे. परंतु ‘तव्याविषयी मात्र फारसे स्पष्टीकरण झाले नाही अशी माझी समजूत आहे. ती चर्चा या लेखात करण्याचा मानस आहे.
‘कर्तव्य’ किंवा ‘तव्य’ म्हणजे काय? प्रथमदर्शनी उत्तर सुचते ते म्हणजे त्या कल्पनेत बंधकत्वाची, एखादे कर्म करण्यास बद्ध करण्याची, कल्पना प्रामुख्याने समाविष्ट आहे असे दिसते. ‘अमुक कर्म माझे कर्तव्य आहे’ म्हणजे ते कर्म करण्यास मी बांधील आहे, ते मला आवडो की न आवडो, ते कर्म करण्याची इच्छा असो की नसो. हा अधिकार किंवा सामर्थ्य त्या कल्पनेत कोठून येते? सामान्यपणे एखादे कर्म करण्यास मी बाध्य असेन तर ते मी न केल्यास त्याबद्दल काहीतरी अनिष्ट घडेल असे त्यातून ध्वनित होते. हे अनिष्ट शिक्षेच्या किंवा दंडाच्या स्वरूपाचे असते. एखाद्या दरवडेखोराने सोटा दाखवून पैशांची मागणी केली, तर पैसे न दिल्यास तो माझ्यावर हल्ला करील हे मला दिसते. पण कर्तव्यकल्पनेत आपण कर्तव्य न केले तर कोणी आपल्याला शिक्षा करील असे अभिप्रेत नसते. म्हणून कर्तव्याचे बंधकत्व म्हणजे ते न केल्यास शिक्षेची अनिवार्यता नव्हे. मग ते बंधकत्व काय आहे?
कर्तव्यांचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे कायद्याने आज्ञापलेली (म्ह. legal duties), आणि दुसरा म्हणजे जी कायद्याने अनिवार्य नसूनही बंधनकारक असतात अशा म्हणजे नैतिक कर्तव्यांचा (moral duties). माझे असे मत आहे की त्यांपैकी कायद्याने निषिद्ध केलेल्या कर्तव्याची कल्पना प्राथमिक असून नैतिक कर्तव्याची कल्पना त्यापासून साधित (derived) आहे. माणसाला कायद्याने किंवा सक्तीने आदिष्ट कर्तव्याची कल्पना प्रथम प्राप्त प्राप्त झाली, आणि तिच्या साह्याने नैतिक कर्तव्याची कल्पना बनविली गेली.
कायद्याने आज्ञापिलेल्या कर्माची कल्पना अतिशय स्पष्ट आणि सुबोध आहे. कायदा म्हणजे कुणाही व्यक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यशाली अशी प्रस्थापित शक्ती. तिचा आदेश न पाळल्यास शिक्षा होणे अनिवार्य असते हे स्पष्ट आहे. पण कायद्याने अनुज्ञेय (permitted) कर्म नैतिक दृष्टीने बंधनकारक असते हे मात्र बुचकळ्यात टाकणारे आहे. कायद्याने अनुज्ञेय कर्म नैतिक दृष्टीने मात्र मी करता कामा नये या म्हणण्याचा अर्थ काय? यावर असे उत्तर दिले जाते की नैतिक कर्तव्याचे हे बंधन आपण स्वतःवर लादून घेतो, आणि म्हणून आपण ते पाळले नाही तर आपण आपल्या स्वतःच्या इच्छेविरुद्ध वागतो आहोत असे होईल. हे उत्तर ज्यांना पटेल त्यांना असे विचारावेसे वाटते की आपण स्वतःवर अनिवार्य कर्तव्य लादून घेतो याचा अर्थ काय आणि त्याचे समर्थन कसे करता येईल? साधारणपणे असे मानले जाते की कोणती कर्तव्ये नैतिक आहेत हे ठरविणारी सदसद्विवेक (conscience) नावाची एक शक्ती प्रत्येक माणसाजवळ असते. पण हे उत्तर समाधानकारक नाही. कारण अशी शक्ति आपल्याजवळ असती तर नैतिक कर्तव्य काय आहे या प्र नाचे एकच उत्तर झाले असते. परंतु भिन्न लोकांचे सदसद्विवेक परस्परविसंगत, परस्परविरुद्ध उत्तरे देताना दिसतात. त्यामुळे त्याचा अधिकार मान्य करता येत नाही. खरे म्हणजे सदसद्विवेक नावाची एक अस्खलनशील शक्ती माणसामध्ये असते हे मत अतिगामी (transcendental) किंवा आतिभौतिक (metaphysical) आहे असे म्हणावे लागते; आणि अतिगामी किंवा आतिभौतिक गोष्टी आपल्याला वयं आहेत. सदसद्विवेकबुद्धीचे अस्तित्व आपण स्वीकारू शकत नाही. पण मग नैतिक कर्तव्याची कल्पना कायद्याने अपेक्षित कर्तव्यकल्पनेपासून निष्पन्न होणारी कल्पना आहे हे मत स्वीकारावे लागेल काय?
कायद्यानुसार बंधनकारक कर्माचे स्वरूप अतिशय स्पष्ट आणि निःसंदिग्ध आहे. कायद्यात अभिप्रेत कर्तव्य म्हणजे एका सार्वभौम शक्तीने केलेली आज्ञा. अशी सार्वभौम शक्ति मानवसमाजाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर टोळी, जमात किंवा राज्य यांच्या ठिकाणी असते. त्यांच्याविरुद्ध कोणीही व्यक्त निर्धास्तपणे वागू शकत नाही. त्यांच्या आज्ञांचे उल्लंघन शक्य असले तरी त्याची शिक्षा मात्र टाळता येत नाही. अशी सक्ती करणारी शक्ती नैतिक क्षेत्रात अंशतः सापडते. ती म्हणजे कर्तव्याचे उल्लंघन केल्यास निंदा, दुलौकिक, बहिष्कार इत्यादिच्या साह्याने नीतीचे (अर्थात प्रचलित नीतीचे) उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे जीवन समाज अतिशय कष्टमय, असह्य करतो.
आता बहिष्कारासारख्या शिक्षा फर्मावणाऱ्या समाजाची शक्ती फार मोठी असते हे खरे आहे. पण तिचा उपयोग क्वचितच केला जातो. आचरण रूढ धर्माविरुद्ध—-तेही अतिरेकी—-असेल तरच बहिष्काराची शिक्षा ठोठावली जाते. बाकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मांबद्दल निंदा, बदनामी, सारख्या शिक्षा फारशा प्रभावी होऊ शकत नाहीत. मग अशी कर्मे कर्तव्य आहेत या म्हणऱ्याचा अर्थ काय? उदा. खोटे बोलू नये, कोणी कोणाला फसवू नये, इ. नियमांचा वापर सामान्य असत्य भाषण, किंवा जनावरांना मारहाण करण्याची कर्मे कोणी फारशी आक्षेपार्ह मानीत नाही. म्हणजे नैतिक समजली जाणारी बहुतेक कर्मे लोक करीत नाहीत. मग ती कर्तव्ये, म्हणजे ‘केली पाहिजेत’ अशी, हे कशावरून ठरते? नैतिक कर्तव्याची कल्पना कायद्याला अभिप्रेत कर्तव्याच्या कल्पनेवरून सुचली असेल कदाचित्. पण त्या दोन कर्तव्यांचे स्वरूप तत्त्वतः भिन्न आहे. कायदेशीर कर्तव्ये बंधनकारक असतात, कारण त्यांचे उल्लंघन केल्यास शिक्षा अनिवार्यपणे होते. पण नैतिक कर्तव्यास चुकणाऱ्या मनुष्याला शिक्षा सामान्यपणे होत नाही. कारण ती कर्तव्ये मनुष्य स्वतःवर लादून घेतो. पण त्याने हे का करावे? हे केवळ त्याच्या मर्जीवर अवलंबून असते काय?
मला वाटते नैतिक कर्तव्याचे नियम शेवटी अनुभवाने ठरतात. काही कर्मे करणे उचित आहे, आणि काही न करणे उचित आहे, हे शेवटी बहुमताने ठरते. दुसऱ्याच्या धनाचा अपहार करू नये, एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याची हत्या करू नये, इ. नियम बंधनकारक आहेत, कारण ते तसे आहेत हे बहुमताने ठरते. म्हणजे एखाद्या कर्माच्या नैतिकतेबद्दल एखाद्या सभेत मतदान होते असे नव्हे. एखादे कर्म बहुतेक सर्व व्यक्तींना अवश्य वाटते. तर दुसरे एखादे कर्म बहुतेक सर्वांना त्याज्य वाटते. हे टोळी, जमात किंवा राज्य यांतील व्यक्तींना सहजच कळते. कायदा काय असावा हे ज्याप्रमाणे विधानसभेत बहुमताने ठरते, तसेच नीतीच्या क्षेत्रात कोणते नियम मनुष्यांस बंधनकारक असावेत हेही बहुमताने ठरते.
राजकीय (political) नियम आणि नीतीचे नियम हे सामान्यपणे भिन्न असतात. आधी नीतीचे नियम असणाऱ्या नियमांना अनेकदा विधिकारी मंडळ कायद्यांचे रूप देते. म्हणजे आधी नीतिव्यवस्थेचा भाग असलेल्या नियमांना कायद्याचे संरक्षण देणे आवश्यक वाटल्यास विधिकारी मंडळी ते त्यांना देतात; आणि अनेकदा कायद्याचा अधिकार काढला जाऊन ते कायदा म्हणून रद्द केले जातात, आणि फार तर रूढी म्हणून ते उरतात. नीतीचे नियम आणि कायदे यांतील भेद पुढीलप्रमाणे असावा. जेव्हा एखाद्या प्रकारचे कर्म सर्वांनी करावे किंवा एखादे कर्म कोणीही करू नये असे विधिकारी मंडळींना वाटते, तेव्हा त्यांना कायद्याने रूप देण्यात येते आणि कायद्याने आज्ञापिलेले कर्म जरी पूर्वी आवश्यक असले, तरी नंतर ते न केले तरी फारसे बिघडत नाही असे सामान्य मत बनते तेव्हा तो कायदा रद्द करण्यात येतो. नीतीच्या नियमांची भिन्न देशांतील आणि भिन्न काळातील विविधता पाहिली की याचा प्रत्यय येतो. पण या सामान्य नियमाला काही कर्मांचा अपवाद असतो हेही लक्षात ठेवावयास हवे. मनुष्यस्वभाव सर्वत्र एकच आहे, आणि म्हणून माणसांना आवश्यक किंवा निषेध्य वाटणारी कर्मे सर्वदा आणि सर्वत्र स्थूलपणे अंती समान असतात.
नीतीच्या अतिगामी आणि आतिभौतिक उपपत्ती आपण गूढ म्हणून नाकारल्या. त्यांच्या जागी अनुभववादी उपपत्ती देण्याचा प्रयत्न वर केला आहे. तो कितपत सफल झाला हे याविषयी विचार करणाऱ्यांनी ठरवायचे आहे. ते ते करतील अशी आशा आहे. त्यांनी ते करावे अशी त्यांना प्रार्थना आहे. कर्मयोग, प्लॉट नं. 4, बलराज मार्ग, धंतोली, नागपूर — 440 012

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.