मानवतेविरुद्ध गुन्हा (लेख-२)

स्त्रियांवरील अत्याचार

“गोध्यातील मदतछावणीतील एका बलात्कारितेची कहाणी एक वारंवार घडलेला घटनाक्रम नोंदते. तिचे मूल तिच्यासमोर मारले गेले, तिला मारहाण केली, जाळले व मृत समजून सोडून दिले. कुठेकुठे वैविध्यासाठी अॅसिड टाकले गेले.” “प्रांताभरातील लैंगिक हिंसेच्या घटनांची संख्या तर अचंबित करणारी आहेच, पण मुख्यमंत्री, मंत्री, गुजरातेतील अधिकारी व सर्वात वाईट म्हणजे भारत सरकारचे मंत्री यांनी ज्या थातुर-मातुर आणि उपेक्षागर्भ (trivial and dismissive) त-हेने हे हाताळले, त्याने अचंबित होणे दुणावते.”
“जॉर्ज फर्नाडिस लोकसभेत म्हणाले (30 एप्रिल 2002), ‘गुजरातेतील हिंसेत काही नवीन नाही … गर्भार बाईचे पोट फाडणे, आईच्या पुढ्यात मुलीवर बलात्कार करणे, हे नवीन नाही.’ फर्नाडिस पुढे म्हणाले की हे 54 वर्षे होत आहे.” [या प्रकरणातील तपशीलही ‘अमानुष’ वर्णनांनी व्याप्त आहे, व देण्याचे टाळत आहोत. संपादक, आ. सु.]
आर्थिक हिंसा
स्टार न्यूजवर एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, “वहाँ फॅक्टरी में आग लगी है, जी.आय.डी.सी. में . . . फॅक्टरी हिंदु मुस्लिम मिक्स थी, इस में एक पार्टनर मुस्लिम था, बाकी के सब पार्टनर हिंदू थे।”
“कॉपर चिमनी उपाहारगृह पंजाबी हिंदूचे असूनही (विध्वंसाचे) लक्ष्य ठरले. हल्ला करणारे चांगलेच माहीतगार असणार, कारण उपाहारगृहाच्या मालकाने आखातातील एका शेखशी सौदा केल्याचे फारच थोड्यांना माहीत होते.”
“मुस्लिम अंदाजांप्रमाणे दुकाने, उद्योग व व्यापारी संस्था दीर्घकाळ बंद पडल्या-मुळे झालेले नुकसान तीन हजार कोटी रुपयांपेक्षा कमी नाही. (गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री दोन हजार कोटींचा आकडा सांगते).” इथे ट्रायब्यूनलचा तपशीलवार हिशोबातून आलेला आकडा आहे, रु. 3,800 कोटी! “हॉटेल उद्योगाचे नुकसान सहाशे ते सातशेसाठ कोटी आहे, यातून वीस हजार माणसांची रोजी बुडाली —– आणि यांपैकी बहुसंख्य बिगर मुस्लिम आहेत.”
वाहतूक, कारउद्योग, शेती वगैरेंची कथाही अशीच आहे. “सरकारच्या निष्क्रियते-मुळे आर्थिक नुकसान झाले हे अत्यंत स्पष्ट आहे…. पण सरकारने नुकसानीचे अंदाजही बांधलेले नाहीत व नुकसानभरपाईचे नियमही ठरवलेले नाहीत. दुर्दैवाने विमा कंपन्याही उद्योजकांच्या वैध मागण्या मान्य करत नाही आहेत.’ “मदत व पुनर्वसनाची तातडीची आणि वास्तव गरज तर दुर्लक्षित आहेच, पण हिंसेचे प्रणेते व त्यांचे अनुयायी गुजरातच्या अनेक भागांत आज मुस्लिमांवर आर्थिक बहिष्कार टाकत आहेत,’ असे करणाऱ्या अनेक मंत्र्यांची नावेही ट्रायब्यूनल नोंदते—-त्या यादीत (कै!) हरेन पंड्याही आहेत. ‘बाटवाबाटवी’ आणि सांस्कृतिक विध्वंस मशिदी, दर्गे यांना ध्वस्त करण्याची 270 उदाहरणे आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्या जागी हुल्लाडिया हनुमानाच्या मूर्ती बसवल्या गेल्या. हे भारतीय संविधान व 1954 च्या हेग कन्व्हेन्शनच्या विरोधात जाते. वली गुजराती हा आधुनिक उर्दू कवितेचा जनक मानला जातो. त्याचा मृत्यू 1701 साली अमदाबादेत झाला व त्या जागी गुजराती लोकांनी त्याचे स्मारक उभारले. हे स्मारक अमदाबादच्या पोलीस कमिश्नरच्या कार्यालयाला लागूनच आहे. 1 मार्चला स्मारक पाडून त्या जागी हरेन पंड्यांच्या नेतृत्वाखालील जमावाने भगवा झेंडा लावला —– व 2 मार्चला झेंडा काढला. उस्ताद फैयाझ खाँच्या कबरीवर जळत्या टायरांची रास रचली गेली. 1912 साली वडोदऱ्याच्या गायकवाडांनी खाँसाहेबांना थोर शास्त्रीय गायक म्हणून आश्रय दिला होता. आर्थिक विध्वंसाप्रमाणेच इथेही मुस्लिमांचे ‘नामोनिशान’ जमावाने मिटविण्याचा प्रयत्न केला. हिंसेची पूर्वतयारी “गेल्या काही वर्षांत संघ परिवाराशी संलग्न असलेल्या संस्थांचा प्रभाव देशभर वाढत आहे. कारण सत्ता, सत्तेशी संलग्न असे लाभ आणि पैसा त्यांना सहजपणे उपलब्ध होत आहे. पण अशा संस्थांच्या सक्रियीकरणाची गुजरातेतील व्याप्ती व त्याचे प्रमाण कायदा आणि सुव्यवस्थेच्या यंत्रणांना काळजीत लोटणारे आहे.”
“गुजरातच्या तीन शेजारी प्रांतांनी (मध्यप्रदेश, राजस्थान व महाराष्ट्र) बजरंग दल दहशत व दहशतवादी उत्पन्न करत असल्याने त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. दोन्ही संप्रदायातील अनेक साक्षीदारांनी ट्रायब्यूनल समोर दिलेली माहिती शेजारी प्रांतांच्या यंत्रणांच्या (या) मूल्यमापनाला दुजोरा देते. एक साक्षीदार म्हणतो, “हिंदू व मुस्लिम, अनेक गुजरात्यांनी सांगितले की त्यांच्या मते बजरंग दलाने सामान्य नागरिकांना दहशतवादी बनवायचा धंदाच आरंभला.
बजरंग दलाच्या कार्यपद्धतीबद्दल चार आजी-माजी सदस्यांकडून मिळालेल्या माहितीचा गोषवारा असा—-
“नव्या सदस्याला शाखेत भरती होण्यासाठी पंचावन्न रुपये द्यावे लागतात. सदस्यांनी रोज रात्री आठ वाजता एका सभेला हजर राहणे अपेक्षित असते. सभा बहुतेक खाजगी (घरांमध्ये) जागी व कधीकधी लहानशा देवळांमध्ये भरतात. काही निवडक लोकांच्या गुप्त सभा आठवड्यातून एकदा, जरा उशीराने म्हणजे रात्री दहाला भरतात. सदस्यांना ते बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचे एक ओळखपत्र दिले जाते. दहा नवे सदस्य आणणाऱ्यास ‘विहिंप’ चा मंत्री केले जाते. सदस्य होताक्षणी तुम्हाला एक त्रिशूळ दिला जातो व तो देवळात ठेवून पुजण्यासाठी नाही असे सांगितले जाते. हिंदुधर्माच्या रक्षणासाठी पण ‘बांधवांना’ मारण्यासाठी नव्हे, असे त्रिशूळाबद्दल सांगितले जाते.”
शाहे ”
“आठवडी सभांमध्ये जास्त उघडपणे सांगितले जाते की दंग्याच्या वा मारामारीच्या वेळी त्रिशूळ मुस्लिमांविरुद्ध वापरण्यासाठी आहे. तुम्ही मुस्लिमांना मारले तर (दलाची) संघटना तुम्हाला शिक्षेपासून वाचवेल, तुम्हाला काही झाले तर संघटना तुमच्या कुटुंबाची काळजी घेईल, तुम्हाला दंग्याच्या संदर्भात अटक झाल्यास दलाचे कार्ड दाखवल्यास पोलीस तुम्हाला सोडून देतील, असेही सांगितले जाते.” “विहिंपच्या मंत्र्यांना रोज साठसत्तर मुलांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी दिलेली असते. प्रशिक्षण म्हणजे काय, तर प्रामुख्याने एखाद्या वस्तीतील मुस्लिमांची यादी बनविणे, राहायच्या जागा, मालमत्ता, धंदे-पेशे, कुटुंबे अशांची माहिती गोळा करावयाची असते…. याचा लेखी अहवाल मंत्र्याला द्यायचा असतो.” ।
“चार रंगरुटांच्या या तपशिलवार साक्षीसोबतच अनेक जागच्या इतर साक्षी-दारांनीही प्रशिक्षण-शिबिरांचे अहवाल ट्रायब्युनलला दिले आहेत. सर्वच घटनांमध्ये बद/ विहिंप कार्यकर्त्यांचे प्रखर (intensive) प्रशिक्षण सप्टेंबर 2001 नंतर सुरू झाल्याचे नोंदले आहे. (त्याच) ऑगस्टमध्ये ‘संदेश’ या गुजराती दैनिकात तरुणांनी मोठ्या संख्येने बजरंग दलात भरती व्हावे अशी जाहिरात आलेली होती.” ‘(बजरंग दल सदस्यत्वाच्या) शुल्कासोबत त्रिशूळ दिले जात, तर तलवारींसाठी सदस्यांना रु. 310/- देण्यास सांगितले जाई. आठवडी गुप्त प्रशिक्षणसभांमध्ये तलवारी बाळगणे वैध असल्याचे सांगितले जाई. . . . प्रशिक्षणाच्या पुढील टप्प्यावर अनुभवी सदस्यांना ‘दंगा-फसाद, लढाई-झगडा’ यात भाग घ्यावा लागेल हे सांगितले जाई. रात्री बेरात्री उठवल्यावर तात्काळ तयार होण्यासाठी सांगितले जाई. दंग्यात भाग घेण्यामुळे जी रोजी बुडेल तिच्या दुप्पट भरपाई संघटना देईल, असेही आश्वासन दिले जाई.”
“सभांमधील भाषणे एका मूळ नमुन्याची असत. ट्रायब्युनलपुढील साक्षी दाखवतात की मुस्लिमांची सैतान म्हणून स्थापना (demonization) आणि तरुण, सशस्त्र पोथी पारंगत (indoctrinated) हृदयात द्वेष भरलेले आणि अधमात अधम शारीरिक त्रास देण्यास सज्ज असे दल उभारणे, असा एक-कलमी कार्यक्रम असे.”
या मानसिक तयारीचा बराच तपशील आहे —- ज्यात आजचे बहुसंख्य फिल्मी हीरो मुस्लिम असण्याचा उल्लेखही होत असल्याचे सांगितले आहे. मुस्लिमांबद्दल मने कलुषित करणे, हिंदू-मुस्लिम समन्वयाचे प्रयत्न हाणून पाडणे, हा मूलमंत्र दिसतो.
“गोध्रा घटनेच्या दोनेक महिने आधी वडोदऱ्यात भरलेल्या एका दोन-तीन हजारांच्या सभेचा वृत्तान्त ट्रायब्युनलपुढे साक्षींतून नोंदला गेला आहे. . . . आक्षेपार्ह व गुन्हेगारी स्वरूपाची भाषणे झाली व दूरदर्शनने (केबल चॅनेल) ती प्रक्षेपित केली. भाषण करणाऱ्यांत प्रवीण तोगडिया व एक धार्मिक नेता होते. साक्षीदार सांगतात की मुस्लिमांशी सामान्य संबंध न ठेवण्यावर भर होता. …. पण ज्या मुस्लिमांच्या बायका सुंदर असतील त्यांच्याशी चांगले संबंध ठेवून योग्य वेळी जे करावयाचे करण्यास सांगितले गेले.”
[“The Tribunal notes with horror, the level of impunity that such unlawful, armed organizations have come to enjoy in BJP ruled Gujerat”.] “ट्रायब्युनल नोंदते की राजकीय पाठिंबा आणि कायद्यापासून या संस्थांना मिळणारे अभयदान यासोबतच अशा संचलनासाठी भरपूर पैसा उपलब्ध आहे. वाढत्या अवैध आणि असंवैधानिक अशा या कारवायांसाठी पैसा कोठून येतो हेही तपासायला हवे.’
भविष्याची चाहूल: बेताल द्वेष भडकवणारी वक्तव्ये
“सहा मार्चला (2002) हिंदुस्तान टाईम्स ने विहिंपचे उपाध्यक्ष हरेनभाई भट यांचे वक्तव्य नोंदले, ‘वर्षानुवर्षे आम्हाला त्रास देऊन आमच्यावर हल्ले केले गेले. कायदे त्यांना संरक्षण देतात आणि भाजपच्या नेतृत्वातल्या सरकारसकट (सर्व) सरकारे त्यांचे तुष्टीकरण करतात.’ चौकशीची कल्पना तुच्छतेने डावलत ते म्हणाले ‘चौकशी? कसली चौकशी. चौकशी गुन्ह्यानंतर होते. गोधऱ्याला घडला तो गुन्हा होता—-नंतरची ती प्रतिक्रिया. विहिंपने दीर्घकाळासाठी धोरण ठरवले आहे की हिंदू हे मुसलमानांवर आर्थिक, व्यापारी व सामाजिक बहिष्कार टाकतील. मुस्लिमांना इथे राहायचे असेल तर त्यांना त्यांच्या मनोधारणा बदलाव्याच लागतील.”
“28 सप्टेंबरला विहिंपचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक सिंघल यांनी गुजरातचे वर्णन ‘एक यशस्वी प्रयोग’ असे केले. ते म्हणाले, 27 ला गोध्रा घडले आणि दुसऱ्याच दिवशी 50 लक्ष हिंदू रस्त्यावर आले. आम्हाला हिंदू जाणिवा (conscionsness) जागवता आल्या आहेत आणि आता हा यशस्वी प्रयोग राष्ट्रभर केला जाईल.”
“1 सप्टेंबरला मेहसाणा जिल्ह्यात एका सभेत नरेंद्र मोदी म्हणाले, ‘मदत-छावण्या फक्त मुले उत्पन्न करायचे कारखाने झाल्या आहेत. अशी लोकसंख्या वाढवणाऱ्यांना धडा शिकवायला हवा.’ (पुढे) गुजरात सरकारने या भाषणाच्या टेप्स नसल्याचे सांगितले. स्टारन्यूजने टेप्स प्रसारित केल्या . . . आणि प्रवीण तोगडियांनी पत्रकार परिषदेत म्हटले, ‘विहिंप मोदींच्या भाषणाच्या लाखावर प्रती देशभरात वाटणार आहे, म्हणजे लोकांना तथाकथित सेक्युलर पक्षांच्या, ज्यात काँग्रेसही आली, दुहेरी मापदंडाची जाणीव होईल.”
या सर्व मांडणीतील प्रत्येक अन् प्रत्येक मुद्दा शंकास्पद आणि चुकीचा आहे, हे वारंवार दाखवले जाऊनही जहरपेरणी करणारी अशी वक्तव्ये बेबंदपणे केली जातच आहेत. [कोणत्याही व्यक्तीला जात, धर्म, लिंग, वगैरेंचा शिक्का मारून तिच्या बद्दल मते घडवणे सर्वथा अविवेकीच मानायला हवे, हा या संदर्भात सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा आहे.
– संपादक विहिंप आणि बद यांचा इतिहास
1964 साली विहिंप घडली आणि ती प्रामुख्याने ईशान्य भारतातील ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर तोडगा म्हणून काम करत असे. 1981 मध्ये मीनाक्षीपुरम्ला दलितांना इस्लामची दीक्षा दिली गेल्यानंतर मात्र सर्व हिंदू मठ व पंथांना एकत्र करण्यासाठी विहिंपने मार्गदर्शक मंडळ व धर्मसंसद अशा दोन समित्या घडवल्या. मुळात विहिंप हा शंभर सदस्यांच्या नियंत्रणाखालील ‘न्यास’ (trust) आहे आणि सोबत एक्कावन सदस्यांची एक प्रशासन समितीही आहे. आज न्यासाच्या विश्वस्तांमध्ये एकच संन्यासी आहेत —- स्वामी चिन्मयानंद. पण हे चिन्मय मिशनचे स्वामी नव्हेत. [आज हे स्वामी गृहराज्यमंत्री झाले आहेत. हे सन्यासाश्रमात कसे ‘बसते’? —- संपादक —- म्हणजे पारंपारिक धर्मगुरूंकडे सत्ता नसून ती संघ परिवाराने नियुक्त केलेल्यांकडे आहे. 1983 पासून विहिंपने रामजन्मभूमीच्या मुद्द्यावरील सर्व हलचालींचे नियंत्रण केले आहे—-अपवाद फक्त भाजपप्रणीत अडवाणींच्या रथयात्रेचाच आहे.
या सर्व प्रयत्नांमागील ‘हिंदु’ धर्मग्रंथ म्हणजे ‘मनुस्मृती’ (जी चातुर्वर्ण्य व पुरुषसत्ताक समाजाचा पुरस्कार करते) आणि ‘अर्थशास्त्र’ (जी मुळात एका राजाने समाजाच्या सर्व अंग-उपांगांचे नियंत्रण कसे करावे ते सांगणारी आचारसंहिता आहे.)
“(पण) जरी विहिंप ही भाषा वापरत नसली तरी तिचा मुख्य भर आदिवासींना आणि दलितांना हिंदू उपासनापद्धतीकडे वळवण्याचाच आहे. ‘विहिंप : एम्स, अॅक्टिव्हिटीज अँड अचीव्हमेंट्स’ या ग्रंथात रघुनंदन प्रसाद ‘वनवासी, गिरिजन व हरिजनां’मध्ये ‘प्रमुख धार्मिक संस्कारां’चा प्रसार करायला सांगतात. सध्याच्या धारणा व पद्धतींऐवजी एका ‘होमोजिनाइज्ड’ (एकजिनसी) धर्मावताराकडे जाण्याचा हा प्रयत्न आहे, हे उघड आहे.”
बजरंग दलाचा रोख तरुणांच्या प्रशिक्षणावर आहे. http: // Www. hinduunity. org / bajrangdal ही वेबसाईट सांगते —- “विहिंपने समाज-जागरणासाठी 1 ऑक्टो. 1984 ला राम-जानकी रथयात्रा काढायचे ठरवले . . . अनेक समाजघटकांनी रथयात्रेला संरक्षण देण्यास नकार दिला. धार्मिक संतांनी तरुणांना रथयात्रींना संरक्षण देण्याचे आवाहन केले. त्या तरुणांनी हे काम उत्तमपणे पार पाडले. अशा त-हेने उत्तर प्रदेशातील तरुणांना जागृत करून रामजन्मभूमी चळवळीत समाविष्ट करून घेण्याच्या मर्यादित हेतूने बजरंग दल घडले. 1986 मध्ये विहिंपने इतरही प्रांतात आपली तरुणांची शाखा म्हणून बजरंग दल घडवले.”
[रथयात्रींना कोणापासून धोका होता? माझे निरीक्षण असे की यज्ञ असोत वा तबलीगी मेळावे, त्यांच्यापासून संरक्षण लागते—-त्यांना संरक्षण लागत नाही!
— संपादक
“यावरून दिसून येते की विहिंप असो की बजरंग दल असो की दुर्गावाहिनी असो, एका एकजिनसी हिंदू समाजाविरुद्धचे ‘अन्याय’ दाखवून अल्पसंख्यांकांविरुद्ध भावना भडकवल्या जातात; मग हे अल्पसंख्यक अलीगड–मुरादाबादचे कारागीर असोत, फैजाबादचे नागरिक असोत की गुजराती धंदा-पेशा करणारे किंवा शेतकरी असोत. भारतीयांविरुद्धची आक्रमकता, हाच या संस्थांच्या कार्यक्रमांचा अध्याहृत भाग असतो.”
दुर्गावाहिनी ही विहिंपची स्त्रीशाखा आहे, तर दलितांचे ‘वाल्मीकी गट’ असतात.
पैसा–उभारणी
“गुजराती अनिवासी भारतीय ही गुजरातेतील हिंदुत्ववादी संस्थांची जीवनरेखा आहे! यांच्याकडून मिळालेल्या प्रचंड धनाबाबत खूपसा पुरावा ट्रायब्यूनलपुढे आला. जाहिराती, द्वेष-साहित्य, त्रिशूळ-दीक्षा, सशस्त्र शिबिरे, यातूनच लाखो निःशुल्क आणि पगारी काम करणारे कार्यकर्त्यांचे संच (cadres) उभे राहिले आहेत.’
हिंदु सेवक संघ (यूनायटेड किंग्डम), विहिंपच्या अमेरिकन (USA) आणि इंग्रजी (UK) शाखा आणि इतर अनेक ‘धर्मादाय’ संस्थांमार्फत प्रचंड पैसा विहिंप उभा करते. यातूनच बजरंग दल व इतर ‘उपसंस्था’ही चालवल्या जातात.
“ “हिंदु स्वयंसेवक संघ’ आणि त्याची राजकीय सक्रियतेची शाखा ‘फ्रेंड्ज ऑफ इंडिया सोसायटी इंटरनॅशनल’ या अमेरिकेत ‘इंडिया डेव्हलपमेंट अँड रिलीफ फाऊंडेशन’ या अमेरिकन कायद्याने करमुक्त असलेल्या संस्थेसोबत काम करतात. या संस्थेचे प्रमुख काम भारतात ‘ग्रामीण विकास, आदिवासी-कल्याण आणि शहरी गरीबांसाठी’ पैसे उभारणीचे आहे. सन 2000 मध्ये या संस्थेने 38 लक्ष डॉलर्स (रु. 19 कोटी) उभारले व त्यापैकी 17 लक्ष डॉलर्स (रु. 8.50 कोटी) वितरित केले.” “प्रत्यक्षात ह्या संस्थांचे पैसे संघ-परिवारातच वाटले जातात, आणि याचे माध्यम ‘सेवा इंटरनॅशनल’ आहे. “या छत्राखाली 2,000 प्रकल्पांमध्ये 50,000 स्वयंसेवक 76 वेगवेगळ्या प्रकारची कामे करतात.” युनायटेड किंग्डम (ग्रेट ब्रिटन) येथील ‘सेवा इंटरनॅशनल’ बद्दल लॉर्ड ॲडम पटेल म्हणतात की “सेवा इंटरनॅशनल हा आक्रमक हिंदू संस्थांचा मुखवटा आहे, हे मला पटले आहे आणि म्हणून (गुजरात हिंसाचारानंतर) मला या संस्थेच्या यजमानपदावरून निवृत्त होणे आवश्यक झाले आहे.”
“स्वातंत्र्य व फाळणीनंतरच्या जवळपास सर्व न्यायालयीन आयोगांनी भारतातील अल्पसंख्यकांविरुद्धच्या हिंसेचा रास्वसं, विहिंप, बद, भाजप व महाराष्ट्रातील त्यांचे साथीदार शिवसेना यांच्यावर ठपका ठेवला आहे. पण भारतीय शासन याबाबत कायदेशीर कारवाई करण्याबाबत निरुत्साही (reluctant) आहे आणि ही निष्क्रियता संगनमताच्या दर्जाची असून नागरिकांना न्याय मिळवून देण्याबाबत शासकीय निरुत्साह दाखवते.”

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.