सतीची चाल, पुनर्विवाह बंदी, बालविवाह आणि . . . जातिभेद??

एकोणिसाव्या व विसाव्या शतकात जातिभेदावर बऱ्याच चर्चा झाल्या आणि त्याची जरूरही होती, कारण अस्पृश्यतेने त्यापूर्वी धुमाकूळ घातला होता. ब्रिटिश राज्यात जगभर त्याला कुप्रसिद्धी मिळून एकूण हिंदू धर्मीयांची निंदा झाली. हिंदू म्हटले की ‘काहीतरी किळसवाणे’ असा सर्वत्र समज झाला. तसे पाहता सर्वच समाजात class consciousness किंवा काही त-हेची गुलामी होती. परंतु जन्मतःच जातिभेदाने फुटीर होणारा समाज भारताशिवाय जगाच्या पाठीवर कोठेच नव्हता. येथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती ही की 1945 सालच्या सुमारास प्रसिद्ध विदुषी कै. इरावतीबाई कर्वे यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जातीतील लोकांच्या चेहऱ्यावर 19 मोजमापे घेऊन जातीनुसार त्यात काही फरक आढळतो का ते पाहिले होते व संख्याशास्त्रानुसार असा निष्कर्ष काढला की त्यात फरक नव्हता. समाजसंस्थेला जातिभेदाने दौर्बल्य आले.
ही जातिसंस्था दृढमूल होण्याची बरीच कारणे सांगितली जातात. भारतात राज्यसंस्था प्रबळ व प्रभावी कधीच झाली नाही. जाती व ग्रामसंस्था आपला सामाजिक व्यवहार राज्यव्यवस्थेशी कोठल्याही तहेचा संबंध न येता चालवीत. त्यामळे सबंध समाज एकरूप कधीच झाला नाही. वेगवेगळ्या जातीजमातींचे आर्थिक व्यवहार जोडलेले असले तरी सामाजिक संबंध नव्हतेच. प्रत्येक जमात आपले कायदेकानू ठरवी व त्याप्रमाणे वागे. जगात इतरत्र राजकीय सत्ता व सामाजिक जीवन यांचा घनिष्ठ संबंध येऊन राजकीय व सामाजिक असे सर्व व्यवहार एकमेकात गुंतलेले, मिसळलेले, एकरूप झालेले होते त्यामुळे जातिभेदामुळे जो दुरावा निर्माण होतो तो त्यांच्यात नव्हता. भारतात मात्र जातिभेद दृढावला व त्याने अस्पृश्यतेसारखे रौद्र स्वरूप धारण केले.
खाजगी वैयक्तिक जीवनात सहविवाह किंवा सहभोजनाने होणारी सर्वव्यापी मैत्रीची वाढ भारतात झाली नाही. —- बंधुत्वाचे नाते दृढ झाले नाही. असा विखुरलेला, पोखरलेला, आपापसात जवळीक व स्नेहसंबंध नसलेला समाज बाहेरून येणाऱ्या शत्रूला तोंड देऊ शकला नाही. ब्रिटिशांनी भारतात येऊन ह्या परिस्थितीचा फायदा उठविला. ह्या परिस्थितीची जाणीव महाराष्ट्रात इतर पुढाऱ्यांनी करून दिली. तरी त्याला खरी धार डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांनी मिळवून दिली. आज पूर्वीची परिस्थिती राहिलेली नाही. स्वातंत्र्यानंतर हळूहळू का होईना पण परिस्थिती नक्कीच सुधारलेली आहे, परंतु जातिभेदामुळे समाजात काय काय होऊ शकते व तो भेद समूळ नष्ट झाला पाहिजे, याची समज आजही समाजात पूर्ण रुजली जाऊन समाजाने जागरूक राहणे जरूर आहे.
ह्या जातिभेदाचे परिणाम किती दूरवर पोहचू शकतात याचे एक उदाहरण खाली देत आहे.
सामान्यपणे काही गोष्टी कोणी कोठेतरी दाखवून दिलेल्या असल्या तरी त्या सर्वदूर पुरेशा माहीत असतातच असे नाही. उदाहरणार्थ (1) सतीची चाल (2) पुनर्विवाहास बंदी व (3) बालविवाह, ही तीन पापे भारतातच फक्त आली कोठून? त्याचा उगम कोठे आहे? याविषयी जे तर्क केले जातात त्यात डॉ. आंबेडकरांनी केलेले तर्क थोडे धक्का देणारेच आहेत. पण त्यात तथ्यही आहे.
1916 साली डॉ. आंबेडकरांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील मानववंशशास्त्राच्या अभ्यासकांपुढे एक संशोधनात्मक निबंध वाचला. त्यांच्या मते रोटीबेटी व्यवहारात (विवाह फक्त जातीतच करणे, जातीबाहेरील विवाह निषिद्ध मानणे) वरील तीनही पापांचे मूळ आहे, ते पुढीलप्रमाणे:
एखाद्या बंदिस्त समाजात विवाहयोग्य असा एक वयोगट व तो ही असाच बंदिस्त असणार. आपण हा वयोगट 15 ते 55 मानू या. अशा बंदिस्त वयोगटात एखाद्या स्त्रीचा नवरा मेल्यास ती एकत-हेने उपरी (surplus) होते. तिचे करायचे काय? ती मेल्यास —- सती गेल्यास —- तिच्या उपरेपणाचा प्र न मिटतो. परंतु ती सती गेली नाही तर तिच्या पुनर्विवाहावर बंदी घालण्याने— -(एक त-हेचे हे मारणेच आहे) ही तो प्र न मिटतो. अशा त-हेने सतीची चाल व पुनर्विवाहास बंदी करण्याने बाहेरच्या जातीत शिरण्याची वेळ येत नाही.
स्त्रीच्या बाबतीत हिंदूंमध्ये किती सहज प्र न मिटविता आला! ह्याच समाजात स्त्रीला देवतेसमान वागविले जात होते असे म्हटले जात असे, हे विशेषत्वाने नोंदविणे जरूर आहे.
अशाच समाजात —- बंदिस्त समाजात —- एखाद्या पुरुषाची बायको मेली तर तोही उपरा (surplus) होतो. आता अशा उपऱ्या पुरुषाला ‘सती’ पाठविणे शक्य आहे का? त्याचे उत्तर सहज -सोपे म्हणजे ‘नाही’ असे आहे. त्याचप्रमाणे त्याच्या पुनर्विवाहाला बंदी घालता येते का? तरीही उत्तर ‘नाही’ असेच येते. ह्या समाजात ‘पुरुष’ हे जातीचे सामर्थ्य आहे —- बळ आहे, ते घालवून चालणार नाही. मग उपऱ्या पुरुषाचे करायचे काय? अशा परिस्थितीत त्याला उपाय म्हणजे बंदिस्त वयोगटाबाहेर परंतु आपल्या जातीतच विवाह करणे. थोडक्यात बालविवाह करणे! म्हणून वरील तीनही पापांचा उगम बंदिस्त रोटीबेटीव्यवहारातच असावा, हा अंदाज डॉ. आंबेडकरांनी केला.
लेखिकेच्या मते बरोबर अशीच परिस्थिती पारशी समाजात उद्भावली असताना त्याना ‘सहज’ उपाय सुचले नाहीत कारण स्त्रीची कोठल्याही त-हेने गळचेपी करणे त्याना अवगत नव्हते. हिंदू धर्मात ते सहज होई. हा ह्या दोन समाजातला फरक येथेच भारतात अनुभवास आला. त्यामुळे पारशी समाजात एकूण विवाह करणेच —- मग स्त्रिया असो की पुरुष —- खूप कमी झाले. त्यांना हिंदूधर्मातले सहजसाध्य उपाय सुचले नाहीत.
डॉ. आंबेडकरांच्या तर्काबद्दल एक गोष्ट नोंदविणे जरूर आहे. हे लक्षात ठेविले पाहिजे की प्रथम एखादे तत्त्व किंवा theory ठरवून मग त्याबरहुकूम कृती केली जाते, असे सामान्यपणे होत नाही. प्रथम कृती केली जाते —- तीही सहज केली जाते व त्यावर ही कृती का असू शकेल याचा अंदाज उभारला जातो. त्यामुळेच डॉ. आंबेडकरांना सतीची चाल, पुनर्विवाहावर बंदी व बालविवाह यांचा उगम बंदिस्त रोटीबेटी व्यवहारात दिसला.
वरील अंदाज 1916 साली केला गेला. त्यावेळी त्यावर कोणी —-कधी—- प्रतिक्रिया व्यक्त केली का, याची कल्पना लेखिकेला नाही.
820/2 शिवाजीनगर, ऋणानुबंध, भांडारकर रोड, पुणे — 411 004

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.