विरोधकांबाबतचा अभिमान (राजर्षि शाहू गौरव ग्रंथातून)

छत्रपतींनी “आमच्या स्वराज्यातील कोणत्याही धर्मपीठावरील अधिपती नेमण्याचे अधिकार छत्रपतींचे आहेत. त्याचप्रमाणे चालावे,’ असा लेखी हुकूम जारी केला. “काय जाधवराव, तुम्ही तर कानांवर हात ठेवले होतेत, पण कोदंडाने दिलाच ना पुरावा काढून!” महाराजांच्या या टोमण्यावर जाधवरावादी आम्ही सगळेच हसलो. संध्याकाळी पन्हाळा लॉजवर पुराव्याचे पुस्तक पाठवून दिले.
या घटनेपूर्वी करवीर शंकराचार्यांच्या पीठावर महाराजांनी डॉ. कुर्तकोटींची स्थापना केली होती आणि त्याबद्दल केवळ भारतातूनच नव्हे, तर इंग्लंड अमेरिकेतून शाहूमहाराजांवर अभिनंदनाचा वृत्तपत्री वर्षाव झाला होता. पण वरील प्र न नेमका काय हेतूने त्यांनी विचारला, त्याचे इंगित मात्र माझ्या, जाधवरावांच्या किंवा दिवाणसाहेबांच्या अटकळीत त्या वेळी मुळीच आले नाही. एक वर्षाने (सन 1921) त्या गूढाचा उलगडा झाला तो असा :
वृत्तपत्रात अचानक एके दिवशी बातमी झळकली की, अखिल मराठा जमातीच्या उद्धारासाठी शाहूमहाराजांनी क्षात्रजगद्गुरूंच्या नवीन पीठाची स्थापना करून, त्यावर इंटरपर्यंत शिकलेल्या बेनाडीकर पाटील नावाच्या एका तरुण मराठ्याची स्थापना केली. त्यासाठी कोल्हापूर येथे राजेशाही थाटाचा समारंभ झाला. तोवर शाहूमहाराजांच्या फारसे मेहरबानीत नसणारे अण्णासाहेब लढे त्या दरबाराला हजर होते आणि विशेष म्हणजे, क्षात्रजगद्गुरूंना मराठा उपाध्ययांनी वैदिक मंत्रांनी अभिषेक केल्यानंतर लागलीच स्वतः अण्णासाहेबांनी सोन्याने मढविलेल्या गव्याच्या शिंगातून क्षात्रजगद्गुरूंच्या चरणांवर समंत्रक जलधारांचा निराळा अभिषेक केला.
सर्व विधि यथासांग उरकल्यानंतर खुद्द शाहूमहाजांनी क्षात्रजगद्गुरूंसमोर जाऊन कंबर वाकवून तीनदा मुजरा केला. इतकेच नव्हे, तर दरबारात जमलेल्या यच्चयावत असामींनी तसेच मुजरे करावे, असे तोंडी फर्मान सोडले. सर्वांनी केले, पण जाधवराव मात्र बसल्या जागचे मुळीच हलले नाहीत. कोणी तरी कुचाळ्याने ती गोष्ट महाराजांच्या नजरेला आणली, “जाधवराव, मुजरा” महाराजांनी डरकाळी फोडली. जाधवराव शांतपणे म्हणाले, “छत्रपतिमहाराज, आपण छत्रपती म्हणून एक सोडून शंभरदा मी माझे मस्तक आपल्यापुढे अगत्य वाकवीन. एक प्रामाणिक सत्यशोधक व स्वर्गस्थ महात्मा जोतीराव फुल्यांचा इमानी शागीर्द या नात्याने, जगद्गुरू व त्यांचे पीठ या संस्थाच मला अमान्य आहेत. सबब मुजरा करण्याचे मला काही कारण नाही.”
छत्रपती म्हणाले, “माझ्या आज्ञेची अवज्ञा? चालते व्हा इथनं.”
महाराजांना लवून तीनदा मुजरा करून, “जशी छत्रपतींची आज्ञा” असे म्हणून जाधवराव बाहेर पडले. सगळ्या दरबारात खळबळ उडाली. आता कोल्हापुरातून जाधवरावांची कायम हकालपट्टी होणार, असे जो तो एकमेकांत बोलू लागला. दरबार आटोपताच काही वेळाने महाराजांची गाडी जाधवरावांच्या बंगल्यासमोर आली. जाधवरावांना हाक मारली. तात्काळ ते गाडीजवळ गेले. मुजरा केला. “या, बसा गाडीत.” हुकूम झाला. जाधवरावांना घेऊन गाडी निघून गेली. राजवाड्यात गेल्यावर महाराज म्हणाले, “जाधवराव, शाब्बास! भर दरबारात महात्मा फुल्यांच्या सत्य तत्त्वांचा एवढा करारीपणा दाखविलात तुम्ही. मला फार आनंद झाला. आमच्या संस्थानात तुमच्या सारखे सडेतोड निःस्पृही आहेत, याचा आम्हांला फार अभिमान आहे समजलात. जावा आता घरी.”
[महाराष्ट्र शासनाच्या ‘राजर्षि शाहू गौरव ग्रंथा’तील हा उतारा. याचा अनेक अंगांनी विचार करता येईल. सध्या एक ‘सर्वेसर्वा’ राजा आपल्या प्रजेतील आपल्या विरोधकाचे कौतुक करतो, याचे कौतुक करू या. आज अशा सहिष्णुतेची अपार गरज आहे, कारण बुश-बिन लादेन-तोगडिया “जो आमच्या सोबत नाही तो आमचा शत्रूच आहे”, इथपर्यंत पोचले आहेत. हा उतारा आम्हाला कोल्हापूरच्या श्री. प्रभाकर गोखल्यांनी उपलब्ध करून दिला.
—- संपादक
Padmavati, 20, Shirgaonkar Society, 8th lane Rajarampuri (Extn.), Takala, Kolhapur – 416 008

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.