विवेकवादी मनुष्याला कधी हसू येते काय?

विवेकवादाविषयी प्रचलित असलेल्या अनेक विलक्षण आक्षेपांपैकी एक आक्षेप असा आहे की विवेकवादी माणसे भावनाहीन असतात. हा आक्षेप इतका विपरीत आहे की सामान्यपणे शहाणी असणारी माणसेही जेव्हा त्याचा पुरस्कार करतात, तेव्हा हसावे की रडावे हे कळेनासे होते. वस्तुतः विवेकवाद ही एक अतिशय शहाणपणाची भूमिका असून तिचे स्वरूप नीट लक्षात घेतल्यास तिच्यात शंकास्पद किंवा विवाद्य असे काही शोधूनही सापडणार नाही अशी आमची समजूत होती. तिच्याविषयी अनेक खोटेनाटे, सर्वथा गैरलागू, असमंजस आक्षेप कोणी का घ्यावेत हे अनाकलनीय आहे. या (कु)प्रसिद्ध आक्षेपांपैकी या लेखाच्या शीर्षकात व्यक्त झालेला आक्षेप एक आहे.
हा आरोप केला जातो याचे एक कारण असे असावे की आपण भावनांच्या आहारी जाऊ नये असे विवेकवादाचे आग्रहाचे सांगणे आहे. हे खरे आहे, परंतु त्याचा अर्थ भावनांना मानवी जीवनात स्थान नाही असे अभिप्रेत नसते. शृंगार, अपत्यस्नेह, क्रोध, भय इ. भावनांना त्यांचे त्यांचे स्थान आहे. परंतु त्या भावना अस्थानी प्रगट करणे गैर आहे हे सहज लक्षात येण्यासारखे आहे. उदा. एखादे गंभीर व्याख्यान चालू असताना हसणे किंवा शाळेत वर्ग चालू असताना आरडाओरड किंवा मारामारी करणे. शाळा सुटल्यावर मुलांनी परस्परांची थट्टामस्करी किंवा गोंगाट करणे क्षम्य असते. एवढेच नव्हे तर स्वाभाविकही असल्यामुळे काही प्रमाणात उत्तेजनीयही असते, असे म्हणता येते. म्हणजे भावनांच्या आहारी जाऊन विवेकविरोधी कृत्ये करणे चूक आहे असे म्हटल्याने भावनांचा धिक्कार केला जातो असे नाही. परंतु जसे भावनांचे स्वतःचे क्षेत्र असते, तसे विवेकाचेही क्षेत्र असते. ते काय हे आता सांगितले पाहिजे.
विवेक म्हणजे reason. त्याचे दोन प्रांत आहेत. (1) ज्ञानाचा आणि (2) कर्मांचा. पहिल्या प्रांतात सत्य काय आहे, असत्य काय आहे, सत्यप्राप्तीचे उपाय काय आहेत, सत्यान्वेषणातील अडचणी काय आहेत, इ. प्र नांचा ऊहापोह केला जातो. दुसरा प्रांत भावनांच्या तारतम्याचा. त्यात कोणती कर्मे केल्याने मनुष्याला जास्तीत जास्त समाधान मिळू शकेल याचा विचार केला जातो. मानवी मनाचे घटक स्थूलमानाने पुढील आहेत. (1) विकार किंवा भावना; यांत काम, क्रोध, मत्सर, भय इत्यादींचा समावेश होतो; (2) विवेक नावाची आलोचक (reflective) आणि नियामक (controlling) शक्ती. ही शक्ती ज्ञान आणि कर्म दोन्हींचे नियमन करते. या जगात सत्य ज्ञान जवळ असल्याशिवाय क्षणभरही मनुष्याचा निभाव लागणे अशक्य आहे. आपल्या भोवती असलेल्या लक्षावधि वस्तूंचे गुण काय आहेत हे माहीत नसेल तर आपण इष्टप्राप्तीसाठी काय करावे आणि काय करू नये हे कोणालाही कळू शकत नाही. कोणत्या वस्तू पोषक आहेत आणि कोणत्या मारक आहेत हे माहीत असेल तर आपण स्वतःचे रक्षण करू शकतो. विषारी वनस्पति खाल्याने किंवा घाणेरडे पाणी प्याल्याने आजार आणि मृत्यू अटळ असतात, हे सत्यज्ञान आपल्याला मिळवून देण्याचे काम विवेक करतो. हे सत्य आहे, हे सत्य नाही, अमुक कर्म केल्याने अमुक फळ मिळते इ. ज्ञान आपल्याला डोळा, कान, नाक इ. इंद्रियांनी मिळणाऱ्या संवेदनांवर सामान्यीकरण, अनुमान इत्यादींचे संस्कार झाल्यामुळे प्राप्त होते.
पण मनुष्याच्या जीवनांत इंद्रियांच्या संवेदनांखेरीज अन्यही घटक असतात. उदा. भावना. यांच्यामुळे आपल्या मनांत काम, क्रोध, भय, इ.नी आपल्या मनाचा ताबा घेतला जातो. क्रोधाचे काम शत्रूचा प्रतिकार करण्याचे असते, तर भयाचे काम शत्रू आपल्याहून अधिक बलवान असल्यास त्याच्या वाटेला जाऊ नये हे सांगण्याचे असते. कोणतीही भावना कमीअधिक तीव्रतेने आपला ताबा घेते. भावनांच्या बाबतीत आपली भूमिका अकाची, सहन करण्याची असते, कर्त्याची नसते. ‘मला भीति वाटली’, असे आपण म्हणतो, मी भीति केली असे नाही. मला राग आला असे म्हणतो, मी राग केला असे म्हणत नाही. त्यामुळे आपल्या भावना आपल्यावर कमीअधिक ताबा मिळवू शकतात. एखाद्या वेळी क्रोध एवढा बेफाम होतो की त्याच्या भरात आपण असे काही करतो की जे क्रोध उतरल्यावर आपल्या प चात्तापास कारण होते. भयभीत मनुष्य विवेक न राहून स्वतःचे नुकसान करून घेतो. म्हणजे भावना आपल्याला इष्टकार्यांत मदत करतात की अवसानघात करतात हे सांगता येत नाही. भावनांचे कार्य आलोचनाचे किंवा नियमनाचे नसते. म्हणून त्यांना एखाद्या आलोचक-नियामक शक्तीच्या नियंत्रणाखाली ठेवणे अवश्य असते. भावना सौम्य असू शकतील; तीव्र असू शकतील, किंवा त्या उच्छृखलही होऊ शकतील. पण त्या कोणत्या स्वरूपात प्रकट होतील हे मनुष्याच्या तत्कालीन अवस्थेवर अवलंबून असते, आणि त्यांची मात्रा किंवा तीव्रता त्याच्या स्वभावाने ठरते. एखादा मनुष्य थोडे जरी मनाविरुद्ध झाले, तरी क्रोधाविष्ट होतो, पण दुसरा त्याकडे दुर्लक्ष करतो. भावना मनुष्याच्या स्वभावानुसार तीव्र किंवा सौम्य स्वरूपात उद्भवतात; पण त्यांच्यात आलोचनाची, विचार करण्याची, शक्ती नसल्यामुळे त्या स्वतःचे स्वरूप ओळखू शकत नाहीत. विचार करणारी शक्ती म्हणजे विवेक. अमुक प्रसंगी क्रोध बेफाम होऊ देणे चुकीचे, आत्मघातकी आहे हे तोच फक्त सांगू शकतो. म्हणून भावना आवरण्याचे काम विवेकाला करावे लागते.
परंतु भावनांना मोकाट सोडणे आत्मघातकी असले तरी त्याचे पूर्ण दमनही अनिष्ट आहे. कारण भावनाशून्य जीवन म्हणजे शुष्क, नीरस होणार हे उघड आहे. काम, क्रोध, भय, हास्य इ. भावनांना त्यांचे त्यांचे स्थान आहे. त्या जर मनात निर्माण झाल्या नाहीत तर जीवनांत जगण्यासारखे काहीच उरणार नाही. पण भावनांची निर्मिती जरी अत्यावश्यक असली तरी त्यांचे नियमन न केल्यास त्या अनावर होऊ शकतात. त्यांना आवरण्याचे काम विवेकाला करावे लागते. भावनाशून्य विवेक आणि विवेकशून्य भावना दोन्ही हानिकारक आणि अनिष्ट आहेत.
विवेकवादी मनुष्याला कधी हसू येते काय हा प्र न विवेकवादाचे म्हणणे काय आहे ते नीट लक्षात न घेतल्यामुळे विचारला जातो.
कर्मयोग, प्लॉट नं. 4, बलराज मार्ग, धंतोली, नागपूर — 440 012

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.