विज्ञानाचे रूपांतरण

कालिदासाच्या ‘शाकुंतला’त एक प्रसंग आहे. दुष्यंत शिकारीच्या नादात कण्वाच्या आश्रमाजवळ येऊन हरणावर बाण रोखतो तेव्हा आश्रमवासी त्याला सांगतात की तसे करू नये, कारण पवित्र वनांत प्राण्यांची व झाडांची हिंसा निषिद्ध आहे. 1801 सालानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा फ्रान्सिस बुकॅनन कारवारच्या देवरायांबाबत लिहितो की देवरायां-मधील झाडे तोडायला गावप्रमुखामार्फत देवाची परवानगी घ्यावी लागते. परवानगी फुकट मिळते, पण ती न घेतल्यास देवाचा कोप होतो. पुढे तो म्हणतो की सरकारने ती मालमत्ता (देवराई) काबीज करू नये यासाठी घडवलेली ही क्लृप्ती आहे.
मला देवराया, देवतळी, पवित्र पशुपक्षी यांच्याबद्दल कालिदासाची भूमिका बुकॅननच्या भूमिकेपेक्षा कितीतरी श्रेष्ठ वाटते.
भारतात व इतरत्रही वड-पिंपळ-उंबर-अंजीर वगैरेंची ‘फायकस’ प्रजाती पवित्र मानली जाते. आजचे परिसरशास्त्रही या प्रजातीला एक विविधाधारी संसाधन मानते. 1976 साली बंदीपुर अभयारण्यात हत्तीवरून फिरत असताना मी माहुतांच्या चर्चा ऐकल्या, की हत्ती फायकस वृक्षांच्या फांद्या तोडतात, ही पक्षी, खारी, माकडे, यांच्यावर आपत्तीच असते. यानंतर दहा वर्षांनी जॉन टरबोर्गने ‘विविधाधारी संसाधन’ ही संज्ञा घडवून फायकसचे परिसरशास्त्रीय महत्त्व नोंदले, की वर्षाचा बराच काळ फळे धरणारे हे वृक्ष अनेक इतर प्राणिजातींचे ‘आधारवड’ असतात. माहुतांच्या आधीही हजारो वर्षे फायकसचे महत्त्व माणसांना ज्ञात आहेच. मला हे असे पारंपारिक ज्ञान आदरपूर्वक आधुनिक वैज्ञानिक ज्ञानात सामावून घेणे व जोपासणे अधिकाधिक महत्त्वाचे वाटू लागले आहे. ज्ञान ही शक्ती आहे.
माणसे माणसांशी कशी वागतात, कोण कोणावर हुकूमत गाजवतो, हे ठरण्यात ज्ञान अपार महत्त्वाचे असते. साठेक हजार वर्षांपूर्वी माणसांनी प्रतीकात्मक भाषा घडवल्या असाव्या. तेव्हापासून दहाएक हजार वर्षांपूर्वी शेतीचा उगम होईपर्यंत माणसे काही हजार माणसांच्या टोळ्यांमध्ये वाटलेली होती. प्रत्येक गटाचा ज्ञानसाठा असे, आणि तो अनेकदा गुरव-देवाचार-शमान’ अशा व्यक्तींच्या अखत्यारीत असे. ग्रहगोलांची हालचाल, औषधी वनस्पती, हे सारे ज्ञान ‘गुरवां’च्या ‘इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स’चा भाग
असे. संकलनातून शेती घडताना अशा अनेक टोळ्यांचे ज्ञान संकलित होऊन टोळीवार बंधने तुटली असणार. आता गटवार ज्ञानसाठ्यांऐवजी विषयवार ज्ञानसाठे घडू लागले असणार. अनेक ‘प्राकृत’ भाषांपासून ‘संस्कृत’ भाषा घडली, तसाच प्रकार इतर ज्ञानाबद्दलही झाला असणार. ख्रिस्तपूर्व 1500 ते इ.स. 500 मध्ये घडलेली सुश्रुत-संहिता सांगते की गोपाल, तापस, व्याध व इतर वनचरांकडून वनौषधींची माहिती वैद्यांनी गोळा करावी.
असे एकत्रीकरण झालेले ज्ञान नवनव्या संदर्भात वापरले गेल्याने त्याचा प्रवाह झपाट्याने वाढत गेला असणार. पण भारतीय शेतकरी समाज अनेक बेटी-व्यवहाराने मर्यादित जातींमध्ये वाटला गेला. ज्ञानाची मक्तेदारी ब्राह्मणांकडे गेली, आणि त्यात आयुर्वेदही होता. या बांधबंधाऱ्यांमुळे ज्ञानाचा प्रवाह डबक्यांमध्ये वाटला गेला. काही केरळी अपवाद सोडता वैद्यांना वनौषधी गोळा करणे, माणसांच्या व प्राण्यांच्या प्रेतांशी संबंध ठेवणे, वगैरे क्रिया वर्ण्य ठरल्या. औषधे गोळा करणाऱ्यांना प्रक्रिया व वापराची माहिती नसे, तर ज्ञान राखणाऱ्यांना वनस्पतींच्या जन्मस्थानाची व वाढीची माहिती नसे.
ज्ञानाची ‘पारख’, त्याचे प्रमाणीकरण, हे मुळात प्रत्यक्षात आढळणाऱ्या बाबींच्या आणि तार्किक सुंसगती असलेला ज्ञान घटकांच्या रचनांच्या ताळेबंदाचे रूप असते. हे सांधे जातिव्यवस्थेने तुटले. मग अनेक वनस्पतींना एकाच नावाखाली नोंदणे, वनस्पतींची चित्रे व आकृत्य यांना मुळीच महत्त्व न देणे, रोगांचे नीट व नेमके वर्णन न करणे, औषधींच्या मात्रा व परिणाम यांचे काटेकोर नियम न घडवणे, असे सारे दोष आयुर्वेदात शिरले. प्रत्यक्ष ज्ञानाऐवजी आयुर्वेद चरक आणि सुश्रुतांच्या संहितांमध्ये अडकला.
प्रत्यक्षाशी अत्यंत मर्यादित संपर्क, धूसर वर्गीकरण आणि ‘बाबा वाक्या’लाच महत्त्व; यातून नवे वर्ग स्थापणे, नवे संबंध घडवणे, जुन्या संकल्पना गरजेनुसार बाद करणे, हे सारे अवघड होऊन ज्ञान-प्रवाह संथ होतो, चरक आणि सुश्रुतांच्या संहितांनंतरचे शेवटचे तात्त्विक ग्रंथलेखन इ.स. 600 च्या आसपासचे, फारतर इ.स. 900 मधील आहे. इतर सर्व ग्रंथरचना तत्त्वे न मांडणारी, औषधांच्या याद्या न सुधारणारी, अशीच आहे. इथे ‘ज्ञान’ म्हणजे सत्ययुगात देवाने ऋषींना दिलेले आणि नंतर उत्तरोत्तर घटतच जाणारे ‘प्रकरण’ आहे. वनचरांकडून नवे ज्ञान कमावण्याची सुश्रुताची शिकवण बाद ठरली आहे. अनेक टोळ्यांच्या ज्ञानाचे ब्राह्मणांनी केलेले संकलन, कधीच तपासले वा सुधारले न गेलेले, म्हणजे आयुर्वेद. याला एक अपवाद आहे.
केरळात निम्नवर्णीय इळवा (ezhava) वैद्य आहेत. ते वाग्भटाने इ.स. सातव्या शतकात रचलेली ‘अष्टांगहृदय’ ही रचना प्रमाण मानतात. वाग्भट स्वतः बौद्ध असावा. तो बौद्ध शाळेत शिकला, हे तर नि िचतच आहे. सिंधमधील हिंदूंनी नाकारल्याने तो केरळात आला. त्याने आधीच्या चरक-सुश्रुत संहितांमध्ये नव्या औषधांची भर घालून ते ज्ञान नायर आणि इळवा या अब्राह्मण जातींपर्यंत पोचवले. ताडीचे उत्पादन करणाऱ्या कष्टकरी इळवांचा आयुर्वेद ‘जिवंत’ राहिला. प िचमेतही ग्रीक वैद्यक ख्रिस्ती धर्मगुरूंनी असेच तेराव्या-चौदाव्या शतकांपर्यंत बंदिस्त करून हासमान केले. पण या काळापर्यंत युरोपीय जंगले नष्टवत झाली होती आणि युरोपीय जगभर नवी संसाधने शोधत सफरी करू लागले होते. हा ज्ञानाचे बांध फोडून मोकळा केलेला प्रवाह आज वेगाने वाढताना दिसत आहे.
इतरांच्या ज्ञानातील, पारंपारिक ज्ञानातील घटक तपासून ग्राह्य ठरतील ते घटक आत्मसात करण्यानेच ज्ञान वाढते. टिपू सुलतानाने चीनकडून मिळवलेले अग्निबाणांचे तंत्रज्ञान वापरून आधी इंग्रजांना हरवले. मग इंग्रजांनी न उडलेले अग्निबाण तपासून ते तंत्रज्ञान कमावले, व टिपूला हरवले. याचवेळी मराठे मात्र होकायंत्रासारख्या इंग्रजी तंत्रज्ञानाला ‘खेळणी’ समजत राहिले. इंग्रजही नेहेमीच नवे ज्ञान आत्मसात करत नसत. देवराया व देवटाक्यांना केवळ सरकारपासून मालमत्ता वाचवण्याची क्लृप्ती समजणे, ही
अशीच एक गफलत. दोन ज्ञान-प्रवाह (पारंपारिक) संथ ज्ञान-प्रवाहांना ‘सुकून जाण्या’पासून वाचवून योग्य ते श्रेयही देता येईल का? एक उत्तर हे की आधुनिक विज्ञानाला नाकारायचे आणि लहानखुऱ्या खेड्या-पाड्यांना सुटसुटे जगण्यासाठी योग्य असे वातावरण घडवायचे. मला हे उत्तर अंमलात येण्याचे मार्ग दिसत नाहीत. मला ज्या उत्तराचा पुरस्कार करावासा वाटतो ते असे—-आधुनिक विज्ञान, बहुराष्ट्रीय कंपन्या, आधुनिक पेटंट यंत्रणा, हे सारे मान्य करून त्यातल्या मदतगार अंगांच्या आधाराने पुढे जायचे. आधुनिक विज्ञानाचा खुलेपणा, बाबा-वाक्यांना नकार, आव्हाने व चर्चेची तयारी, हे सारे घ्यावे. बहुराष्ट्रीय कंपन्यांनीही औद्योगिक सांडपाण्याच्या शुद्धीकरणासारख्या क्षेत्रांमध्ये गरीब देशांना उपयुक्त कामे केली आहेत. ही अंगे पारंपारिक ज्ञानाने स्वीकारायला हवी.
आधुनिक प्रवाही विज्ञानात त्रुटीही आहेत. यशाने आलेल्या गुर्मी आणि संथ विज्ञानाबद्दलची तुच्छता या बाबी आज निरोगी साशंकपणापेक्षा बऱ्याच जास्त झालेल्या दिसतात. हे वैज्ञानिक खुलेपणाच्या वृत्तीच्या विरुद्ध आहे.
जसे, आधुनिक विज्ञानाला क्लिष्ट रचनांच्या व्यवस्थापनात संथ विज्ञानाइतके यश मिळालेले नाही, हे नम्रतापूर्वक मान्य करायलाच हवे. वनव्यवस्थापनात देवराईची संकल्पना, मानसिक आरोग्यासाठी योगाचा उपयोग, यांना तुल्यबळ असे काही आधुनिक विज्ञानाने आजवर घडवलेले नाही. जे. डी. बर्नाल “द सोशल फंक्शन्ज ऑफ सायन्स’ (रुटलेज अँड कीगन पॉल, 1939) मध्ये म्हणतात.
“विज्ञानाच्या पद्धतीचा गाभा आहे चिकित्सा, आणि तिचा अंतिम निकष आहे प्रात्यक्षिकातून, प्रयोगातून सत्यता तपासणे. विज्ञानाचा खरा उपयुक्त भाग, शोध लावण्याचा, हा विज्ञानाच्या पद्धतीच्या बाहेर आहे. विज्ञानाची पद्धत शोधांना योग्य ‘जमीन’ तयार करणे आणि त्यांचा खात्रीलायकपणा सिद्ध करणे, यांच्याशी निगडित आहे. आजच्या विज्ञानाचा आणखी एक दोष म्हणजे ज्यांना सहजगत्या अंकबद्ध करता येत नाही अशा नवसर्जनाच्या घटनांची हाताळणी नीटशी न जमणे, हा होय. हा दोष दूर करण्यासाठी विज्ञानाची व्याप्ती सामाजिक प्र नांना सामावून घेण्याइतकी वाढवायला हवी, म्हणजे विज्ञानाचा अधिकाधिक भाग सामान्य संस्कृतीत सामावला जाईल.” मी याला पुस्ती जोडतो की विज्ञानाची व्याप्ती परिसरशास्त्रीय प्र नांमधील वारंवार भेटणाऱ्या ‘नवलांना’ सामावून घेण्याइतपत वाढवायला हवी. क्लिष्टता क्लिष्ट संरचना समजून घेण्यात आधुनिक वेगवान विज्ञान पारंपरिक ज्ञानापेक्षा कसे कमी पडते, हे जरा तपशिलात पाहायला हवे. अशा क्लिष्ट रचनांचे वर्णन करायला अनेक घटकांची (parameters) दखल घ्यावी लागते; आणि त्या घटकांची प्रमाणेही खूप बदलू शकतात. यामुळे एखाद्या परिणामाची पुनरावृत्ती घडवणे सोपे नसते. दुसऱ्या बाजूस एकच परिणाम अनेक वेगवेगळ्या परिस्थितींमधून उद्भवू शकतो.
मैसूर जिल्ह्यातील एका डोंगरपट्टीत आवळ्याची झाडे का वाढत नाही आहेत, याचा अभ्यास केला गेला. प्रमाणाबाहेरचे फल-संकलन, बियांचे नगण्य अंकुरणे, रोपांचे अल्पायुष्य, पाऊस व तापमानाची बदलती प्रमाणे, रोपांवर वाढणारी बुरशी, अशी अनेक स्पष्टीकरणे शक्य होती. आवळ्याच्या झाडांच्या संख्येत झालेले आणि होणारे बदल या घटकांशी जोडायला निरीक्षणाची एक खूप तपशिलातील पद्धत घडवली गेली—-पण स्थानिक आदिवासींनी वेगळेच कारण सुचवले. त्यांच्या मते वनखात्याने वणवे लागू न दिल्याने नवी आवळ्याची झाडे घडत नव्हती. आज अभ्यासक या आदिवासी मताजवळ येत आहेत.
संथ विज्ञान संधिसाधू निरीक्षणे (opportunistic observations) आणि चुका (trial & error) यांच्या मदतीने पुढे जाते. आधुनिक विज्ञान नियंत्रित प्रयोगांवर आग्रह धरते. पण अनेक घटकांच्या आंतरसंबंधातून उभ्या झालेल्या रचनांना अशी ‘शिस्त’ लावणे सोपे नसते. आधुनिक परिसरशास्त्र फारशी सामान्य तत्त्वे मांडू शकलेले नाही, आणि जी सूत्रे मांडली गेली आहेत त्यांच्या वापरातून फारसे निष्कर्षही काढता आलेले नाहीत. म्हणूनच आज परिसरशास्त्र सामान्यीकरणापेक्षा ‘उदाहरणे तपासण्याची’ (case study) भाषा बोलू लागले आहे. आधुनिक विज्ञान आज (वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन सायन्स, 1999, बुडापेस्ट घोषणापत्र) इतर ज्ञानप्रवाहांचा आदर करायची गरज मान्य करू लागले आहे.
आजवर ऋण मान्य न करताच ‘संथ’ ज्ञानाला आधुनिक ज्ञान सामावून घेत होते. याऐवजी यापुढे अशा ज्ञानाचे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स मान्य केले जायला हवेत—-व गरजेनुसार त्याचा आर्थिक फायदाही ‘ज्ञात्यांना दिला जायला हवा. याची यंत्रणा उभारणे सोपे नसले तरी तशा शक्यता आहेत. जसे, आज पेटंटचे अर्ज करताना सोबत शोधाची पूर्ण माहिती द्यावी लागते. याच टप्प्यावर त्या शोधाचे ‘जुन्या’ ज्ञानातले आधार नोंदले जायला हवेत. हळदीची जखमा भरतानाची उपयुक्तता जर पेटंट करायची, तर हे ज्ञान विस्तृत प्रमाणात होते—-पण (आम्ही) काही नवे टप्पे गाठले आहेत—-असे नोंदणे आवश्यक केले जायला हवे.
जैविक विविधतेची नोंदणी, उपयुक्त संसाधनांचा अवाजवी आणि मारक वापर टाळायच्या यंत्रणा घडवणे, इतरांचे संथ ज्ञान आर्थिक दृष्ट्या ‘हडपणे’ टाळायच्या यंत्रणा उभारणे—-हे सारे व्हायला हवे. यातूनच संसाधन व्यवस्थापन सुधारू शकेल.
हे व्यवस्थापन परिस्थितीशी अनुरूप होत जाणारे, adaptive, असेल. प्रांतभर किंवा देशभर लागू पडणारी ‘धोरणे’ न घडवता एकेका चौरस किलोमीटरापुरती धोरणे घडवावी लागतील. त्या धोरणांचा सतत पुनर्विचार करावा लागेल. असे न करता क्लिष्ट रचनांमध्ये हस्तक्षेप केल्यास अनपेक्षित परिणाम उद्भवू शकतात, हे कार्ल पॉपर या तर्कशास्त्रज्ञाने नोंदले होते. वैज्ञानिक गुर्मीत याकडे दुर्लक्ष करून मोठमोठे हस्तक्षेप केले गेले. आज त्याऐवजी माहिती शक्यतो परिपूर्ण रूपात एकत्रित करून ‘धन’ (दूरदृष्टीने फायदेशीर) घटकांना उत्तेजन देणारी, ‘ऋण’ (दूरदृष्टीने तोटेवाईक) घटकांना सौम्य करणारी धोरणे आखण्याकडे आपण जात आहोत.
एक उदाहरण पाहा—-सतलजच्या काठावरील नंज (हिमाचल प्रदेश) या गावात 1990 पासून साक्षरता मोहीम सक्रिय आहे. याचा भाग म्हणून एका चौकात एक फळा उभारण्यात आला आहे. त्यावर लोक ‘लेखी’ चर्चा करतात. चर्चेचा एक मुद्दा जैविक विविधतेच्या नोंदणीतून पुढे आला, की ‘कळंब’ वृक्षांची पानखतासाठी (mulching) खूप हानी केली जात आहे, आणि ती जीवजात मरू घातली आहे. चर्चेनंतर भाताचे तणस पानखतासाठी वापरायचे ठरले आणि आज कळंबांची प्रजा वाढीला लागली आहे. लोकांमध्ये साठलेले ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा संगम दोन्ही प्रवाहांना लाभदायक ठरेल असे दिसते. भारतीय विज्ञान अभ्यासक या समन्वयाच्या वृत्तीतून सामाजिक प्र नांना जास्त थेटपणे भिडू शकतील. ती वृत्ती आपला सांस्कृतिक वारसा जपण्यालाही उपयुक्त आहे, असा माझा दृढविश्वास आहे.
आरोग्यसंवर्धन (आयुर्वेद) आणि निसर्गसंवर्धन (वनव्यवस्थापन) या दोन क्षेत्रांतील आपल्या जन-परंपरा आणि सांस्कृतिक परंपरांबाबतचा काही पुरावा मी इथे मांडला. असेच पुरावे इतरही क्षेत्रांत असतीलच. त्यांची दखल घेतल्यास एकूण व्यवस्थापन सुधारण्यास चालना मिळेल.
[माधव गाडगीळ व रामचंद्र गुहा यांच्या ‘धिस फिशर्ड लँड’ या पुस्तकाचा सारांश आ.सु.ने अकरा लेखांमधून प्रकाशित केला. त्यातील काही मुद्द्यांवर निखिल व राजीव जोशी यांनी काही प्र न उपस्थित केले (अंक 13.10 व अंक 14.4).
त्यांवर उत्तर म्हणून माधव गाडगिळांनी ‘जे. डी. बर्नाल शताब्दी परिसंवादा’त (मिथिक सोसायटी, बंगलोर) 26 मे 2001 रोजी दिलेले ‘ट्रान्सफॉर्मिंग सायन्स’ हे भाषण आमच्याकडे पाठवले. त्याचे हे संक्षिप्त भाषांतर आहे.
क्लिष्ट रचना रमजून घेण्यातल्या अडचणींबाबत स्ट्युअर्ट कॉफमनच्या ‘अॅट होम इन द युनिव्हर्स’ (ऑक्सफर्ड 1995) या पुस्तकातील हा उताराही लक्षणीय आहे—-“In such a poised world, we must give up the pretense of long term prediction. We cannot know the true consequences of our own best actions. All we players can do is be locally wise, not globally wise. All we can do, all anyone can do, is to hitch up our pants, put on our galoshes, and get on with it the best we can.”
“अशा काट्यावरच्या जगात आपण दूरवरच्या भविष्यकथनाची ‘नाटके’ सोडून द्यायला हवीत. आपल्याला आपल्या सर्वोत्तम क्रियांचे खरे परिणाम समजू शकत नाहीत. आपण सर्व खेळाडू स्थानिक शहाणपण दाखवू शकतो, वैश्विक शहाणपण नाही. आपण एवढेच करू शकतो, सगळे जण एवढेच करू शकतात, की पँट सावरायची, बूट चढवायचे आणि उत्तमात उत्तम जे करू शकतो ते करत रहायचे.”!!! —- संपादक]
कल्पकुंज, राधाकृष्ण वसाहत, पारेख मेडिकल स्टोअर्सजवळ, सांगली — 416 416

अभिप्राय 2

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.