परस्परावलंबनाविषयी आणखी काही (१)

अंदाजे दोन वर्षांपूर्वी मी काही अर्थकारणविषयक लेख लिहिले. ह्या लेखांची सुरुवात खादीपासून केली असली तरी त्यांचा प्रतिपाद्य विषय ‘अर्थकारणातील सुधारणा’ हा आहे. माझ्या ह्या लेखांवर काही चांगल्या प्रतिक्रिया आल्या. त्यांमध्ये मुख्यतः डॉ. चिं. मो. पंडित आणि श्री. भ. पां. पाटणकर ह्या दोघांनी माझ्या लेखांत मनापासून स्वारस्य दाखविले. पाटणकरांच्या आणि पंडितांच्या काही मुद्द्यांवर माझे म्हणणे मी सुधारकाच्या अंकांमधून मांडले असले तरी त्यांच्या सर्व मुद्द्यांचा परामर्श व्यवस्थितपणे घेण्याची गरज आहे.

डॉ. पंडित ह्यांनी माझ्या सर्व लिखाणाचा अत्यन्त साक्षेपाने विचार केलेला आहे. अनेक ठिकाणी त्यांना माझ्याकडून अधिक स्पष्टीकरण हवे आहे; त्याचप्रमाणे जेथे त्यांचा-माझा मतभेद आहे, असेही मुद्दे त्यांनी निःसंकोचपणे मांडले आहेत. त्यांचा मुद्देसूद परामर्श घेण्याचा यत्न मी ह्यापुढे करणार आहे. सोयीसाठी माझे एक विधान–(क) त्यावर पंडितांचे म्हणणे–(ख) व त्यांना माझे प्रत्युत्तर–(ग) असा क्रम ठेवला आहे.

१. (क) मोहनी: अभावाकडून विभवाकडे जाण्याची मनुष्यमात्राला आस आहे ही आस त्याला अठराव्या शतकातील औद्योगिक क्रान्तीनंतर लागलेली नाही. पूर्वीपासूनची आहे. उदा. शिकारी अवस्थेकडून पशुपालनाकडे आणि नंतर शेतीकडे माणसाने केलेली वाटचाल. आजचा चंगळवादही त्याचीच परिणत परन्तु स्वाभाविक अवस्था आहे.
(ख) पंडित : त्या वेळच्या आत्यंतिक हलाखीकडून भौतिक सुखी समृद्ध जीवनाकडे जाण्याची धडपड आणि आजची धडपड यांचे स्वरूप एक नाही. तसे ते एक असते तर अतिसमृद्धीत लोळणाऱ्या माणसात एक प्रकारचे हरवलेपण आले नसते. आज एकीकडे परस्परावलंबनाची आत्यंतिक गुंतागुंत आणि दुसरीकडे जीवघेणी स्पर्धा असे आन्तरविरोधी चित्र दिसले नसते.
(ग) मोहनी: पंडितांचा रोख मानवी मनाच्या उत्क्रान्तीकडे आहे. मला वाटते की, ही उत्क्रान्ती कुठल्याही नियमानुसार झालेली नाही. ती अव्यवस्थित आहे. कारण माणसे एकाच काळामध्ये विकासाच्या भिन्न भिन्न टप्प्यांवर नांदताना दिसतात. ज्या ठिकाणी परस्परावलंबनाची आत्यन्तिक गुंतागुंत दिसते, असे प्रदेश थोडेसे आहेत. मुख्यतः युरोपीय राष्ट्रांमधील समाज ह्या गुंतागुंतीत सर्वांत पुढे दिसतो. उत्तर व दक्षिण अमेरिका, आफ्रिका व ऑस्ट्रेलिया येथील मूळ निवासी ह्या गुंतागुंतीपासून फार दूर आहेत. आशियामध्ये जपानचा अपवाद केल्यास बाकीच्या सगळ्या राष्ट्रांमधील प्रजा ही युरोपीय लोकांचे अनुकरण करण्यातच गुंतली आहे. रेल्वे आणि पोस्ट आफिसमधील सगळे व्यवहार सुद्धा युरोपीय लोकांनी स्वतःची बुद्धिमत्ता वापरून निर्माण केले. आणि आम्ही बाकी सारे त्यांची केवळ नक्कल करीत आहोत.
परस्परावलंबनाची आत्यंतिक गुंतागुंत व दुसरीकडे जीवघेणी स्पर्धा ही एकाच वेळी एकाच समाजात दिसतात हे डॉ. पंडितांचे निरीक्षण बरोबर आहे. परंतु समृद्धीची खरी कारणे आम्हाला अजून समजली नाहीत ह्यामुळे हे सारे घडते. स्पर्धेमुळे समृद्धी वाढत नाही. परन्तु उद्यम वाढतो. आणि उद्यमामुळे समृद्धी वाढते. कोणत्याही उद्यमासाठी परस्परसहकार्याची आवश्यकता असतेच. आणि ते सहकार्य ज्या समाजात जास्त आहे, तेथे समृद्धी आली आहे. समृद्धीचे श्रेय त्या परस्परसहकार्याला दिले न जाता चुकीने स्पर्धेला दिले जाते असे माझे ह्या समस्येचे आकलन आहे. स्पर्धेशिवाय पूर्ण परस्परावलंबनाने सुद्धा समृद्धी येऊ शकते किंबहुना त्यानेच येते हे समजाविण्यासाठीच हा सारा लेखनप्रपंच आहे. स्पर्धेमुळे उद्यम वाढत असला तरी तो काहींचाच वाढू शकतो—-बळी तो कानपिळी हा नियम तेथे काम करतो. व दुसरा दोष असा की स्पर्धा ही कितीही निकोप म्हटली तरी तिच्यामुळे व्यक्ती-व्यक्तींमध्ये द्वेष वाढतो.

२. (क) मोहनी: सर्वांच्या कल्याणातच माझे कल्याण आहे; समष्टीच्या हितामुळे व्यक्तीचे हित होतेच. एकेकट्या व्यक्तीच्या हितामुळे सकलांचे हित होत नाही हे समजत नाही.
(ख) पंडित: समष्टीचे नेमके हित अगम्य आहे. शिवाय ते परोक्ष आहे. आपले हित हे प्रत्यक्ष अनुभवाला येते—कळते— आणि म्हणून स्वहित हीच मूळ प्रेरणा धरली आहे. Capitalism an Unknown Ideal मध्ये Ayn Rand यांना आजचा Capitalism हा Statism च्या अंगाने जात आहे—-व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात येत आहे अशी भीती वाटत आहे.
(ग) मोहनी: समष्टीचे नेमके हित अगम्य आहे. हे माणसाला कळत नाही; निदान आज तरी कळत नाही हे अगदी खरे आहे. त्यामुळे पंडितांचे म्हणणे माझ्या म्हणण्याला पूरक आहे. ते मला विरोध करीत आहेत असे मला ह्यात जाणवत नाही. समष्टीचे हित व व्यक्तीचे हित ह्यात विरोध असू नये, अशी माझी कितीही इच्छा असली, तरी ते समजावून देण्यात मी अजून उणा पडतो ह्याचे कारण माणसाचा आजवरचा विकास स्पर्धेमधून झाला आहे हा समज मला घालविता आलेला नाही. स्पर्धाहीन परस्परावलंबन ही गोष्ट माणसाने अजून अनुभवलेलीच नाही. ती आता फार थोड्यांच्या कल्पनेत आलेली आहे—-म्हणजे फार थोड्यांची कल्पना आज तिथवर पोचलेली आहे. ज्यांच्या कल्पनेची धाव तेथपर्यंत गेली, त्यांच्या लेखनाला utopia असे म्हणून आजवर हिणविण्यात आले आहे. आणि त्याचा कुणी गंभीरपणे विचार केलेलाच नाही. पूर्वसंस्कारांतून मानवी मन बाहेर पडू शकत नसल्यामुळेच ह्याला इतका वेळ लागतो.

३. (क) मोहनी: खादी विचारात देवाचे अस्तित्व अमान्य न करता पैसा आणि मोठी यंत्रे यांच्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न आहे.
(ख) पंडित: की त्यांना त्यांच्या योग्य ठिकाणी ठेवण्याचा यत्न आहे?
(ग) मोहनी: मुळीच नाही. पैसे आणि मोठी यंत्रे म्हणजे काय, तसेच साऱ्या पैशाचा आधार असणारी कांचनतृष्णा आणि मोठी यंत्रे निर्माण करण्यासाठी लागणारे अमाप परस्परावलंबन ह्या तिन्ही गोष्टी खादीच्या पुरस्कर्त्यांना समजलेल्या नाहीत. एवढेच नव्हे तर त्यानंतर 50-60 वर्षांनंतर आजसुद्धा आपल्या समाजातील समाजधुरीणांना त्यांचे आकलन झालेले नाही. ते झाले असते तर आपला देश आज पुष्कळ भरभराटीला आला असता आणि आपण परदेशी कर्जात बुडलो नसतो.
शंभर वर्षांपूर्वी आमच्या देशात जेवढे परस्परावलंबन होते, त्यापेक्षा त्याचे प्रमाण आज बरेच वाढलेले आहे. त्यामुळे परदेशात निर्माण झालेली यंत्रे आपण चालवू शकत आहोत. त्यांच्या आणि काही आपल्या देशात निर्माण झालेली विमाने आकाशात उडवू शकत आहोत. परंतु आपल्या ह्या क्षमतांचा वापर सर्वांच्या कल्याणासाठी करण्याचा यत्न अजून दिसून येत नाही.

४. (क) मोहनी: आपल्यापुरते पाहण्याचा भारतीयांचा स्वभाव फार जुना आहे. आपला राजकीय इतिहास फंदफितुरीने बरबटलेला आहे. आपली जातिसंस्था व बलुतेदारी-संस्था आपल्या ह्या स्वभावाला टिकवून ठेवीत आहेत. गांधीजींनी स्वावलंबनावर जोर दिल्यामुळे “आम्ही आणि ते’ ह्या द्वंद्वभावनेतून आम्ही अजून बाहेर पडलेलो नाही. पैसा आणि मोठी यंत्रे ह्यांचा वापर आपणा समस्तांच्या हितासाठी आम्ही अजून करू शकलेलो नाही. पैशांचा आणि मोठ्या यंत्रांचा बहिष्कार करायचा एवढेच आम्ही शिकलो. परिणाम असा झाला की अभावाकडून विभवाकडे जाण्याच्या आमच्या मनातील आसेचा नायनाट झाला नाही. ती दडपण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आम्ही ढोंग करू लागलो. आमच्या खऱ्या प्र नांना सामोरे जाण्याऐवजी आम्ही त्यांना बगल दिली.
(ख) पंडित: आमची व्यक्तिात आकांक्षा मोक्ष व जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका ही असल्यामुळे आपण आयुष्याकडे निराशावादीपणे अनुत्साहाने पाहतो.
(ग) मोहनी: हा आपला भारतीयांचा दृष्टिकोण आहे हे मान्यच आहे. इतकेच नाही तर आम्हाला दारिद्र्यात राहणे भूषणास्पद वाटते. निदान तसे दाखवावेसे वाटते कारण आमचे जीवनाचे तत्त्वज्ञानच तसे आहे. म्हणून एकीकडे मनातून विभवाची स्वाभाविक आस व दुसरीकडे दारिद्र्याचा आदर्श ह्या दोहोंच्या कचाट्यात सापडल्यामुळे आमच्यात प्रचंड प्रमाणात ढोंग निर्माण होते. आपल्या आदर्शाचीच गोष्ट निघाली म्हणून आठवले, की “ठेविलें अनन्ते तैसेंची राहावें, चित्तीं असों द्यावें समाधान” हाही आपला एक आदर्श आहे. ह्या साऱ्यांमुळे आपापल्यापुरते पाहणारे—-संकुचित दृष्टीचे असे आपण बनलो आहोत. स्वावलंबन हा आमच्या स्वभावाशी सुसंगत असा विचार आहे व परस्परावलंबन आमच्या विचाराशी—-स्वभावाशी—विसंगत आहे.
आम्ही “पैशाचा बहिष्कार” करतो असे जे वर विधान आहे, त्याचेही येथे स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे. गांधीजी, विनोबाजी, कुमारप्पा ह्यांनी प्रतिपादिलेला स्वावलंबनाचा विचार आम्हाला ग्रामस्वराज्यापर्यंत नेऊन पोचवितो. ग्रामस्वराज्याच्या आराखड्यात बाजाराचाच अभाव असल्यामुळे पैशाचा वापर शून्यवत आहे. एका गावातल्या गावकऱ्यांनी गावाला लागणाऱ्या सर्व वस्तू निर्माण करायच्या आणि त्या वाटून घ्यायच्या असे ग्राम-स्वराज्याचे स्वरूप आहे. गावात जितके चलन उपलब्ध असेल, त्यातील एक पैही बाहेर जाऊ द्यायची नाही असा दृढ संकल्प केल्यासारखे मला तेथे भासते. हा पैशावरचा बहिष्कारच नव्हे काय?
The Future Shock चा कर्ता म्हणतो की भविष्यकाळी जो उपभोक्त असेल, तोच निर्माता होईल. (हीच कल्पना ग्रामस्वराज्याच्या विचारातही अन्तर्निहित आहे.) त्यासाठी त्याने ‘prosumer’ हा नवीन शब्द निर्माण केला आहे. पण त्यांच्यात जमीन-अस्मानाइतका फरक आहे. कारण ग्रामस्वराज्यवाले स्वावलंबनाच्या आधारे विचार करतात तर Future Shock वाले परस्पस्परावलंबनाची परिणती त्यात पाहतात. सगळे जग परस्परांच्या मदतीने वस्तू निर्माण करणार व सगळे जग त्याचा उपभोग घेणार म्हणजे त्या सर्वांना वाटून देणार.
अण्णासाहेब सहस्रबुद्धे एका ठिकाणी म्हणतात, “गांधीवाद म्हणजे ‘विचित्र, एककल्ली लोकांचे अजब तत्त्वज्ञान’ असा समज लोकांत पसरला आहे तो उगीच नाही. आम्ही मंडळींनी गांधीजींना गरीब लोकांच्या उन्नतीचा पथदर्शक मानले नाही. ते दरिद्री लोकांचे कैवारी स्वतः कमीत कमी खर्चात राहण्याचा प्रयोग करीत स्वतः हरिजनांबरोबर राहत. आम्ही गांधीजींकडून दारिद्र्याची पूजाच शिकलो. गरिबीचे उदात्तीकरण हा मला गांधीजींचा अनादर वाटतो. जुनी अवजारे कालबाह्य झाली आहेत, यांत्रिक व तांत्रिक सुधारणा करून उत्पादन वाढविले पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. नव्या अवजारांना विरोध म्हणजे दारिद्र्य कायम ठेवण्याची अभिलाषा असे मी मानतो.
“विनोबांचे प्रयोग तर याहीपलीकडचे असायचे, कृषि नव्हे तर ऋषि-शेती! म्हणजे यंत्रच नव्हे तर जनावरांचाही उपयोग घडायचा नाही! माझा विरोध प्रयोगांना नाही. पण प्रयोग कशासाठी? उत्पादनवाढीसाठी की ऋषितुल्य जीवनासाठी?” —- आपले अण्णासाहेब — रमाकान्त पाटील

५. (क) मोहनी: आम्ही सतत अभावाकडून विपुलतेकडे जाण्याच्या प्रयत्नांत असतो. गेल्या शतकात आम्ही त्या दृष्टीने मोठी मजल मारली आहे. आमच्याजवळ एकीकडे पुष्कळ धान्य शिल्लक आहे. आम्ही अन्नाच्या बाबतीत पुष्कळ प्रमाणात स्वयंपूर्ण आहोत, सुरक्षित आहोत. पण दुसरीकडे आमची मने भूतकाळात आहेत! त्यामुळे, भौतिक सुरक्षितता आली असली तरी आमच्या मनांतल्या असुरक्षितपणाचा भाव नष्ट होत नाही ! परिणाम असा होतो की आम्ही आमचे उत्पन्न Share करीत नाही—-आमच्या उत्पादनाचे नीट वाटप होऊ देत नाही. नवीन नोकऱ्या निर्माण करीत नाही. कत्तिनींचा रोजमुरा वाढवून देणे तर दूरच; त्यांना कामावरूनच दूर करतो! शाळेत जास्त शिक्षक नेमत नाही; एकेका वर्गात 70-80 मुले कोंबतो!
(ख) पंडित: पैशाचे सोंग आणता येत नाही.
(ग) मोहनी: व्यक्तिशः एकेका माणसाला किंवा एखाद्या सार्वजनिक संस्थेला पैशाचे सोंग आणता येत नसले तरी एका देशाला पैशाचे सोंग आणता येत नाही असे मानणे म्हणजे आपल्याच सामर्थ्याचे आपल्यालाच आकलन नाही अशी स्थिती आहे.
आम्ही सार्वभौम राष्ट्र आहोत; आम्हाला आमच्या गरजेप्रमाणे पैसा निर्माण करता आलाच पाहिजे. मानवाच्या इतिहासात पैशाचा वापर फार जुना नाही. पैशाशिवायच आपले व्यवहार मानव शतकानुशतके करीत आला आहे. वस्तुविनिमय करण्यास सुरुवात झाल्यानंतर पुष्कळ दिवसपर्यंत मानवाच्या व्यवहारात समता असली पाहिजे. वापरातले पैशाचे प्रमाण आणि विषमतेचे प्रमाण हे बरोबरीने वाढत गेले असणार. कोणत्या वस्तूचा वापर पैसा म्हणून झाला हे पाहिल्यास कोणत्याही वस्तूचा वापर पैसा म्हणून झाला आहे असे लक्षात येते. कोणत्याही वस्तूला मूल्य येते ते मानवाच्या मनात त्याविषयी अभिलाषा असते म्हणून येते. जितकी अभिलाषा अधिक तितके त्याचे मूल्य अधिक असे मानले जाते. सर्व धातूंपेक्षा सोन्याची अभिलाषा जास्त म्हणून त्याचे मूल्य अधिक. चांदी व इतर धातू यांच्याविषयी अभिलाषा कमी; पण त्यांचा औद्योगिक वापर जास्त आणि त्यामुळे त्यांची गरज जास्त. या अभिलाषेमुळेच चलन म्हणून वापरल्या जाणाऱ्या त्या त्या वस्तूवर आपण क्रयशक्तीचा (purchasing power) आरोप करतो. हा सारा मानवी मनाचा खेळ आहे. मानवी मन ज्याप्रमाणे कोणत्याही भौतिक वस्तूवर क्रयशक्तीचा आरोप करून आर्थिक व्यवहार करू शकते, त्याचप्रमाणे ते अधिकोषांमधील खतावण्यांत लिहिलेल्या आकड्यांद्वारेही आर्थिक व्यवहार करू शकते. याप्रमाणे धातूंच्या ठिकाणी असलेल्या काही गुणांमुळे मानवाला सुरुवातीला वाटलेली अभिलाषा पुढे पुढे शासनाने आपली मोहोर छापून प्रसृत केलेल्या व ज्याचे ठिकाणी दुसरा कोणताही अंगभूत गुण नाही अशा कागदाच्या तुकड्यांबद्दलचीही (कागदी चलन) करण्यास मानवी मन शिकले. असे बँकेतील आकडे व कागदाचे छापील तुकडे यांच्यावर क्रयशक्तीचा आरोप करून आर्थिक व्यवहार सध्या चालू आहेत. पैशाचे वास्तव स्वरूप असे आहे हे समजल्यावर एखाद्या देशाला पैशाचे सोंग आणता येत नाही असे म्हणणे किती निरर्थक आहे हे लक्षात येईल.
आज एका देशातले चलन दुसऱ्या देशात चालत नाही याचे कारण त्या कागदावरील किंवा धातूवरील आकड्याना स्वतोमूल्य (intrinsic value) नसल्यामुळे दुसऱ्या देशातील लोकांच्या मनाचे संमोदन (sanction) त्याला नसते. सोन्या-रुप्याच्या नाण्यांच्या बाबतीत असे कधी घडत नसे व आठवडी बाजारात बसणाऱ्या पोतदारांचा निरनिराळ्या चलनांच्या किंमती ठरवून त्यांचा विनिमय करण्याचा हा उद्योग चांगला चालत असे. असो. आपला मुद्दा वेगळा आहे. तो असा की कोणत्याही बँकेतील आकड्याची किंवा कागदाच्या छापील तुकड्याची मदत न घेताही मानवी व्यवहार करता येणे शक्य आहे व आपल्याला ते करता आले पाहिजेत ह्या निष्कर्षाप्रत आपल्याला यावे लागते आणि मानवी व्यवहारांची यापुढील वाटचाल ह्याच दिशेने केली पाहिजे असेही लक्षात येते.
दोघाचौघांच्या मान्यतेने हे काम होऊ शकत नाही. तर एकाच वेळी जगातील सर्वांनीच त्याला मान्यता दिली पाहिजे व तसे होण्यासाठी पैशाचे वास्तव स्वरूप त्यांना नीट समजले पाहिजे. पैशाच्या ठिकाणी जी क्रयशक्ती आम्हाला आज आलेली दिसते व त्यामुळे आम्हाला पैशाविषयी जी हाव आमच्या मनात निर्माण होते, ती केवळ आपल्या मनांवरील तशा संस्कारामुळेच (conditioning of mind); व ती नष्ट करायची असेल तर ते पूर्वसंस्कार बाजूला सारून स्वच्छ मनाने विचार केल्यानेच (deconditioning of mind) ते साध्य होईल याविषयी माझे मन पूर्णपणे निःशंक आहे.
कोणत्याही लहान समूहाने (उदा. एखादे गाव, एखादा देश) हा प्रयोग करून पाहण्यास हरकत नाही. ज्या वेळी पैशाचा वापर न करता उपभोग्य वसूंचा विनिमय एखादा समूह करतो तेव्हा तो आपल्यापुरता आपल्या नकळत पैसाच निर्माण करीत असतो (उदा. बलुतेदारी) कारण उपभोग्य वस्तूंचा विनिमय घडवून आणणे हे पैशाचे जे कार्य तेच तेथे साध्य होत असते. एखादे काम जेव्हा श्रमदानाने केले जाते तेव्हा त्यांना नकळत पैशाची अदृश्य निर्मितीच होत असते व अशी निर्मिती सहजशक्य आहे. किंबहुना आपण आताही ती करीत आहोत—-म्हणजे पैशाचे होणारे कार्य पैशाशिवाय करीत आहोत. एखादा देश किंवा एखादे गाव वरीलप्रमाणे विनिमयाचे किंवा निर्मितीचे कार्य करते तेव्हा तेथे पैशाची निर्मितीच होते असे मला वाटत असल्याचे यापूर्वीच्या लेखातून मी जे मांडले, त्याचे स्पष्टीकरण वरीलप्रमाणे आहे असे समजावे. __पैशाचे हे वास्तव स्वरूप समजल्यानंतर आम्ही शिल्लक टाकतो व त्या शिलकीतून भांडवलनिर्मिती करतो म्हणजे नेमके काय करतो, याचा खोलात जाऊन विचार करणे आवश्यक आहे. ह्या सगळ्याचा संबंध खाजगी मालकीशी आहे. ज्या समाजामध्ये सर्व वस्तू सार्वजनिक मालकीच्या आहेत, तेथे पैशाची शिल्लक पडू शकत नाही. कारण तेथे पैशाची गरजच नाही. रानावनात राहणारे समाज अश्या सार्वजनिक मालकीच्या वस्तूंचा उपभोग घेतात त्व्हा शिल्लक सर्वांच्याच मालकीची असते. झाडावर मध असतो, तलावात किंवा नदीत मासे असतात व झाडांवर फळे असतात इत्यादी. उपभोग्यवस्तू सार्वजनिक मालकीच्या झाल्या की भांडवलाचे स्वरूप बदलते एवढेच येथे नमूद करून ठेवतो. भांडवलनिर्मिती म्हणजे संचय व संचय म्हणजे कुणाचा तरी उपभोग कमी करणे, त्यांना उपभोगापासून वंचित ठेवणे असे आहे. तसे करण्याची गरजच कशी राहत नाही याचा विस्तार पुढे करू.

६. (क) मोहनी: आम्ही गैरसमजुतीतून विषमता टिकवून ठेवली आहे. शोषणाशिवाय भांडवलनिर्मिती होऊ शकत नाही ही ती गैरसमजूत आहे. ही समजूत दूर झाल्याशिवाय समता येऊ शकत नाही.
(ख) पंडित: मुळात विषमता आणि विभिन्नता यात फरक करता यायला हवा. भिन्नत्वात वाईट काही नाही. खरे तर भिन्नत्वामुळेच Permutations-Combinations होऊन उत्क्रान्ती होते. सर्वच जर डॉली मेंढ्या झाल्या तर उत्क्रान्ती थांबेल.
(ग) मोहनी: विषमता नष्ट करणे म्हणजे छापाचे गणपती निर्माण करणे नव्हे. विविधता म्हणजे विषमता नव्हे. विषमता ही स्तरातील किंवा दर्जातील भिन्नता आहे व ती लादलेली आहे. उंच वकील व ठेंगणा वकील, रंगाने काळा वकील व गोरा वकील ह्यांच्यात शारीरिक भिन्नता असली तरी दर्जाने ते समान आहेत. त्याला विषमता म्हणता येणार नाही. पण अन्य बाबतीत समान असूनही एक मालक म्हणून श्रेष्ठ व दुसरा नोकर म्हणून कनिष्ठ असेल तर ती विषमता आहे. एक सुवासिनी व दुसरी विधवा ह्या दोघीही सगळ्या क्षमतांमध्ये सारख्या असूनही समाजात त्या दोघींच्यात विशेषतः मंगलप्रसंगी जो भेद मानला व दर्शविला जातो, ती विषमता आहे. विविधता ही निसर्गनिर्मित बाब आहे तर विषमता ही मानवनिर्मित आहे हा त्यांतील अत्यंत महत्त्वाचा आणि मूलभूत फरक आहे. विषमता मानवनिर्मित असल्यामुळे पूर्वसंस्कारविरहित मनाने प्रयत्न केल्यास ती नष्ट होऊ शकते व ती नष्ट केलीच पाहिजे असे माझे मत आहे. विषमता नष्ट करायची म्हणजे विविधताही नष्ट होईल हे म्हणणे कसे चुकीचे आहे हे यावरून स्पष्ट होईल. (क्रमशः)

६, सुरुची, संत जनाबाई पथ,
मोहनीभवन, खरे टाऊन, धरमपेठ, पूर्व विलेपार्ले, मुंबई — ४०० ०५७
नागपूर — ४४० ०१०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.