राजकीय व अर्थविषयक व्यवस्था : काही विचार व सूचना (लेख-१)

१. मूल्ये
न्याय, स्वातंत्र्य व समता या तीन मूल्यांवर कोणतीही मानवी व्यवस्था आधारलेली असावी. त्यामधील न्याय हे मूल्य सर्वात महत्त्वाचे आहे. कारण फक्त न्याय हे एकच तत्त्व घेतल्यास त्यातून स्वातंत्र्य व समता या दोन्ही गोष्टी योग्य प्रमाणात आपोआप विकसित होतात. न्याय म्हणजे फक्त कायद्याचे बंधन व पालन या अर्थाने नाही, तर मूलभूत अर्थाने न्याय हे तत्त्व घेतल्यास त्याचा
अतिरेक होऊ शकत नाही. त्यामुळे स्वातंत्र्य व समता नष्ट होऊ शकत नाहीत. न्यायामुळे स्वातंत्र्य व समता यांचा प्रमाणबद्ध विकास होऊ शकतो. उलटपक्षी स्वातंत्र्याचा अतिरेक झाल्यास ते विषमता व अन्याय दोन्हीला कारणीभूत होऊ शकते व पूर्ण समतेचा हट्ट धरल्यास स्वातंत्र्य व न्याय यांचा बळी जातोच, पण अखेर समताही बळी पडते.

२. इतिहास व उगम
न्याय, स्वातंत्र्य, समता ही मूल्ये विचारवंतांनी विचार करून निर्माण केलेली मूल्ये नाहीत, ही मानवाला जीवनसंघर्षामध्ये टिकण्यासाठी, वाढण्यासाठी उपयोगी पडली म्हणून त्यांचा उगम व विकास झाला. माणूस प्रथमपासूनच (उत्क्रांतीमध्ये माणूस या संज्ञेला पात्र झाला, तेव्हापासूनच किंवा त्याही आधीपासून) सुटा सुटा, एकेकटा किंवा एक एक कुटुंब म्हणून स्वतंत्रपणे राहाणारा कधीच नव्हता अशी माझी कल्पना आहे. तो प्रथमपासूनच टोळीने राहाणारा होता. टोळी म्हणून तो पंचमहाभूतांना, इतर प्राण्यांना व इतर टोळ्यांना तोंड देत होता. टोळीच्या यशावर त्याचे वंशसातत्य अवलंबून होते. टोळीच्या अंतर्गतही थोडीफार स्पर्धा चालू असे, वैयक्तिक स्वार्थ असे, पण वंशसातत्य टोळीच्या यशावर अवलंबून असल्यामुळे, वैयक्तिक स्वार्थाला उपयोगी पडणाऱ्या गुणांबरोबरच (जेनेटिक ट्रेटस) किंवा त्याहीपेक्षा जास्त प्रमाणावर टोळीच्या इतर सभासदांबरोबर जुळवून घेण्याचे, त्यांच्याशी सहकार्य करण्याचे, त्यांच्याशी झालेली भांडणे विकोपाला जाऊ न देण्याचे, टोळीशी इमान राखण्याचे, टोळीसाठी स्वार्थत्याग करण्याचे, प्रसंगी टोळीसाठी आपला जीव धोक्यात घालण्याचे, नेतृत्व करण्याचे, नेतृत्व मानण्याचे व या सर्व गोष्टींसाठी टोळींमध्ये निर्माण झालेल्या परंपरा, नीती व न्यायव्यवस्था यांना मानण्याचे (व न मानणाऱ्या व्यक्तींना शिक्षा करण्याचे) गुण विकसित झाले. किंवा दुसऱ्या शब्दांत—-ज्या टोळ्यांतील व्यक्तींमध्ये हे गुण होते, त्या टोळ्या अधिक यशस्वी झाल्या. ज्या टोळ्यांमधील व्यक्तींमध्ये हे गुण नव्हते किंवा कमी प्रमाणात होते, त्या व्यक्ती नामशेष झाल्या. माणसांमधील जीवनसंघर्ष व्यक्तिात पातळीवर कधीच नव्हता, तो टोळीच्या पातळीवर होता, हे लक्षात घेतल्याशिवाय आजच्या मानवातील स्वार्थत्याग, राष्ट्रप्रेम, नेतृत्व मानण्याची व करण्याची प्रवृत्ती, न्याय,परंपरा, नीती मानण्याची प्रवृत्ती यांचा अर्थ लावता येत नाही.
इतर टोळ्यांशीदेखील संबंध सतत संघर्षाचे असत असे नाही. संघर्ष टाळण्यासाठी सीमा आखून घेणे, शिकारीचे, मासेमारीचे, जनावरे चारण्याचे हक्क ठरवणे वगैरे करार झाले असतीलच. शिवाय आंतर्विवाहाचे (इनब्रीडींगचे) तोटे व बाह्यविवाहाचे फायदे फार पूर्वीच लक्षात आले असावे. त्यामुळे वधू-वरांची देवघेव फार पूर्वीपासून चालू असावी व त्यामुळे टोळ्यांमधील वैरावर बंधने आली असावी. पण टोळीमधील व्यक्तंकरता एक न्याय व टोळीबाहेरील व्यक्तीकरता दुसरा न्याय अशी व्यवस्थाही पूर्वीच विकसित झाली असावी. हे गुण टोळीने रहाणाऱ्या प्राण्यातदेखील विकसित झाल्याचे दिसून येते. फक्त माणसात दिसतात असे नाही. टोळीच्या अंतर्गत संघर्ष फक्त एक सत्ता-उतरंड (पेकिंग-ऑर्डर) तयार होईपर्यंतच राहातो, नंतर सलोखा नांदतो.

न्याय, स्वातंत्र्य, समता यांचा इतिहास अशा मानवी टोळ्यांमध्ये कसा शोधता येईल?

टोळीची एकसंधता टिकण्यासाठी समन्याय आवश्यक होता. स्वातंत्र्य तर होतेच—-त्याच्यावर बंधन फक्त टोळीच्या म्होरक्याचे निर्णय मानण्याचे व टोळीच्या परंपरा, नीती, न्याय मानण्याचे व टोळीशी इमान राखण्याचे होते. समतादेखील होतीच—- विषमता फक्त कोणीतरी एकाने नेतत्व करण्याची आवश्यकता व सैल अशी सत्तेची उतरंड निर्माण होईल तेवढीच असे. शारीरिक व बौद्धिक गुणांचे सरळ प्रतिबिंब या नेतृत्वात व सत्तेच्या उतरंडीत पडल्यामुळे ही विषमता जाचक नव्हती व तात्पुरती होती. आजार, अपघात, अल्पायुष्य यामुळे नेतृत्व सतत बदलते असे व बहुधा वंशपरंपरेने नसे—-निदान सुरुवातीला तरी. पैसा नव्हताच, जमीन सर्वांची होती. झोपडी सहज उभारता येई. अन्न, वस्त्र यांचा पुढील पिढीपर्यंत टिकेल असा साठा करणे अशक्य होते. त्यामुळे वंशपरंपरेने संपत्ती मिळण्याचा प्र न नव्हता. वयात आलेली मुले स्वतंत्र झाल्याने व संचय करता येईल अशी खाजगी मालमत्ता नसल्यामुळे, वारसा हक्क हा प्रकारच नव्हता. त्यामुळे जन्मतः प्रत्येकजण जवळ जवळ समान पातळीवर होता. टोळीतील किंवा टोळी समूहातील सर्वांत उत्तम स्त्रीला सर्वात उत्तम पुरुष नवरा म्हणून मिळण्याची व त्यामुळे तिला सर्वात उत्तम गुण असलेली मुले होण्याची व ती जास्त जगण्याची व पुढे नेतृत्व करण्याची शक्यता जास्त होती. एवढीच काय ती नैसर्गिक विषमता होती व ती उत्क्रांतीला उपकारक होती.

म्हणजेच पूर्वीच्या मानवी टोळ्यांमध्ये व आजच्या शिकारी—गोळा करणाऱ्या–संकलक आदिवासींमध्ये स्वातंत्र्य, समता व न्याय या गोष्टी होत्या व आहेत. हे जर मान्य केले तर आदिवासी वगळता अन्य समाजांमध्ये ही मूल्ये कमी-अधिक प्रमाणात नष्ट का झाली, याची कारणे शोधावी लागतील.

३. मूल्ये (स्वातंत्र्य, समता व न्याय) कमी/अधिक प्रमाणात नष्ट होण्याची कारणे:

कारण १: टोळी नष्ट होणे:
टोळीच्या हितामध्ये सभासदांचे हित असणे व त्यामुळे टोळीच्या हिताचे गुणधर्म सभासदांमध्ये निर्माण होणे, यांमध्ये वरील मूल्यांचा उगम होता. टोळीला पंचमहाभूतांशी, इतर प्राण्यांशी, भुकेशी, इतर टोळ्यांशी सामना करायला सक्षम ठेवण्यासाठी या गुणांची आवश्यकता होती.

मानवी भौतिक प्रगतीबरोबर यातील बरेच संघर्ष कमी झाले. दैनंदिन जीवनात पंचमहाभूतांशी आता सामना क्वचितच करावा लागतो. प्राण्यांशी सामना तर जवळजवळ कोठेच करावा लागत नाही. टोळीचा विस्तार होत होत तिला राष्ट्राचे रूप आले. शेजारच्या टोळीशी युद्ध ही कल्पना इतिहासजमा झाली. शेजारच्या राष्ट्राशी युद्ध ही दैनंदिन जीवनातली घटना राहिली नाही व युद्धात प्रवीण अशा खास सैन्याची निर्मिती झाल्याने, युद्ध झाले तरी सर्वसामान्य व्यक्तीचा त्यात सहभाग बेताचाच, लांबूनच राहिला. टोळीचे अस्तित्व रोज जाणवणारे, पार्थिव होते. त्याऐवजी राष्ट्राचे अस्तित्व हे बुद्धिगम्य, भावनात्मक पातळीवर व अमूर्त राहिले. टोळीइतकी निष्ठा राष्ट्राला वाहणे त्यामुळे अवघड झाले व अनावश्यकही झाले. पूर्वी टोळीकडून मिळणारे फायदे व टोळीतील नियम पाळणे या निकटपणे परस्परावलंबी गोष्टी होत्या. नियम न पाळल्यास त्याचे परिणाम लगेच, तेथेच भोगावयास लागायचे. टोळी सोडून स्वतंत्र अस्तित्व जवळपास अशक्यच होते. आता मोठा समाज निर्माण झाल्यावर जवळपास स्वतंत्र अस्तित्व शक्य झाले आहे. समाजाचे नियम मोडल्यानंतरही समाजाकडून मिळणारे फायदे चालूच राहातात. पूर्वीचा टोळी (किंवा काही प्रमाणात नंतरची खेडेगावेदेखील) म्हणजे एक प्रकारचे शारीर, सजीव व एकसंध अस्तित्व होते. त्या मानाने आजचा समाज फार जड, विस्कळीत, संवेदना क्षीण असलेला जमाव बनला आहे. जलद प्रतिसाद देणारी मज्जासंस्था व मेंदू त्यामध्ये अजून तरी नाही. त्यामुळे समाजाचे नियम मोडूनही समाजाला ते लवकर कळतच नाही व कळले तरी त्याचा प्रतिसाद दिरंगाईने व अपुऱ्या तीव्रतेने व्यक्त होतो.

अशा रीतीने टोळी नष्टप्राय झाल्याने टोळी जीवनातून निर्माण झालेले मानवी गुणधर्मही नष्टप्राय होऊ लागले व त्यांची जागा निखळ स्वार्थ—-स्वतःचा व्यक्तिशः व कुटुंबाचा, दीर्घ कुटुंबाचा—-त्या गुणधर्मांची जागा येऊ लागला. टोळी-जीवनाचा मानवी इतिहास लाखो वर्षांचा असल्याने हे गुणधर्म अद्यापही मानवी जनुकामध्ये टिकून आहेत. तुलनेने टोळी जीवन संपून काही हजारच वर्षे झाल्याने त्या गुणधर्मांचा जनुकीय हास अजून झालेला नाही. पण त्या गुणांचा परिपोष जो प्रत्यक्ष जीवनात व्हायला पाहिजे, तसा होत नाही व ते सुप्त राहातात, इतर व्यक्तिकेंद्री गुणधर्म त्यांच्यावर मात करतात.

कारण २: टोळीनिष्ठेच्या विकासातील आडवाटा
टोळीनिष्ठेचे मानवी विकासानुसार रूपांतर राष्ट्रनिष्ठेकडे झाले असते, तर कदाचित निःस्वार्थी गुणांना अधिक वाव मिळाला असता व तसे बहुधा इंग्लंड, फ्रान्स, बरेच युरोपीय देश, जपान यांच्यामध्ये झाले. कारण ही राष्ट्रे क्षेत्रफळाने लहान असल्याने त्यांचे शेजारच्या राष्ट्रांशी सतत संबंध आले व बऱ्याच वेळा हे संघर्ष, स्पर्धा, युद्ध असे संबंध राहिले. या सततच्या बाह्य धोक्यामुळे बहुधा या देशांमध्ये टोळीनिष्ठेचे रूपांतर सुलभपणे राष्ट्रनिष्ठेत झाले व त्यामुळे निःस्वार्थी (व्यक्तिातदृष्ट्या निःस्वार्थी) गुणधर्माचा परिपोष होऊ शकला.

पण भारतासारख्या खंडप्राय देशात राष्ट्रभावना निर्माण होणे अवघड गेले. बहुसंख्य लोकांचा परदेशांशी, परकीयांशी काही संबंध येत नसे. युद्धे होत ती सीमा- प्रांतात, परकीयांशी होत—-पण देश—-राष्ट्र हीच भावना नसल्याने सीमा या शब्दालाही अर्थ नव्हता. पंजाब, सिंध, अफगाणिस्तान या भागातील लोकांना इराण, मंगोलिया हे शेजारचे प्रदेश होते. परराष्ट्र नव्हती. हूण, ग्रीक, मंगोल, मोगल वगैरे आक्रमणे झाली त्यावेळी भारतीय जनतेला हे आपल्यावर परराष्ट्राचे आक्रमण आहे असे जाणवलेच नाही. एक राज्यकर्ते जाऊन दुसरे आले इतकाच फरक त्यांच्या दृष्टीने झाला. देश खंडप्राय मोठा असल्याने हे झाले हे खरे, पण त्याचबरोबर टोळीनिष्ठा ही राष्ट्रनिष्ठेमध्ये विकसित होण्याऐवजी ती जात, धर्म, भाषाभिमान वगैरे आडवाटांना लागली व तेथेच फसली—- गुंतली. या आडवाटांमुळेही राष्ट्राच्या सर्व समाजाच्या स्वार्थापुढे स्वतःचा स्वार्थ काही प्रसंगी दुय्यम मानण्याची वृत्ती क्षीण झाली—- किंबहुना ‘एकसंध समाज’च निर्माण झाला नाही, की ज्याच्याबद्दल निष्ठा बाळगावी. भारताप्रमाणेच चीन, ब्राझील, मेक्सिको या मोठ्या देशांत ही परिस्थिती असावी असे वाटते.

कारण ३ : खाजगी मालमत्तेचा उदय व विकास
मानवाने पशुपालकाच्या अवस्थेत प्रवेश केल्यावर कदाचित प्रथमतः जनावरे सामाईक मालकीची होती. पण जनावरांसाठी जमीन खूप जास्त लागते. कळपामागून लांबवर फिरावे लागते, या कारणाने जनावरांवर खाजगी मालकी व जनावरे कोणी, केव्हा कोठे चारावयाची याबद्दलचे नियम व हक्क निर्माण झाले असावे.

शेतीच्या शोधानंतर शेत जमिनीची खाजगी मालकी, पक्क्या घरांची मालकी, घराच्या जागेची मालकी, 2-4 वर्षे टिकणाऱ्या धान्याची मालकी या गोष्टी ओघानेच आल्या, त्याच बरोबर वारसाहक्काने बापाच्या मृत्यूनंतर मुलाला मालमत्ता मिळणे हेही सुरू झाले असावे. तरीही लोकसंख्या कमी व जमीन मुबलक होती, तोपर्यंत गरीब-श्रीमंत हा फरक फारसा नव्हता. वस्तू-वस्तू, श्रम-वस्तू किंवा श्रम-श्रम असा विनिमयाचा प्रकार असल्याने व पैसा हे विनिमयाचे साधन नसल्याने व्यापारही कोणाला फार श्रीमंत बनवू शकत नव्हता. सर्वच वस्तू नाशवंत असल्याने त्यांचा साठा करून फारसा फायदा नव्हता. विषमता मर्यादित असल्याने न्याय व स्वातंत्र्य यांच्यावर फार मर्यादा नव्हत्या.

कारण ४ : पैसा
तांबे, रूपे, सोने या धातूंचा शोध लागल्यापासून त्यांच्या तुकड्यांचा उपयोग वस्तू, सेवा यांच्या विनिमयाचे साधन म्हणून वापरण्यास सुरुवात झाली व हे चित्र पालटले. एक तर श्रम-मूल्य (वस्तूचे मूल्य किंवा सेवांचे मूल्य हे अखेर श्रममूल्यच असते.) साठवण्याची—-जवळ जवळ अविनाशी स्वरूपात अमर्याद कालपर्यंत साठवण्याची—-सोय झाली. पैसापूर्व कालात साठा करावयाच्या वस्तूंच्या नाशवंत स्वरूपामुळे मानवाच्या संग्रह करण्याच्या प्रवृत्तीवर एक नैसर्गिक मर्यादा आली होती. अति तेथे माती ही म्हण शब्दशः खरी होती. पण पैशाच्या शोधाने ही संग्रहवृत्ती मोकाट सुटली.

कारण ५ : राजसत्तेचा उगम
‘पैसा’ या गोष्टीचा दुसरा परिणाम म्हणजे चोऱ्या, दरोडेखोरी यांची सुरुवात झाली. पैसापूर्व कालातील मालमत्ता सहज पळवता येण्याजोगी नसे. ‘पैसा’ आल्यापासून दरोडेखोरीला सुगीचे दिवस आले. दरोडेखोरांपासून संरक्षण मिळण्यासाठी म्हणा किंवा प्रमुख दरोडेखोराच्या व्यवसायाला नियमबद्ध, कायदेशीर समाजमान्य रूप देऊन म्हणा, राजसत्तेचा उगम झाला. म्हणजेच राजस्वाचा —करांचा उगम झाला. या राजस्वाचे स्वरूप पूर्वीही राजाने पुरवलेल्या सेवांचा मोबदला (संरक्षणाचा मोबदला) असे नव्हते व आजही नाही. ती निखळ खंडणी होती व आहे. आजही करांच्या मोबदल्यात योग्य ती सेवा पुरवली नाही म्हणून तुम्ही शासनाला ग्राहक न्यायालयात खेचू शकत नाही. असो. हे विषयांतर झाले. पण राजसत्तेच्या उगमापासून विषमतेला आणखी एक क्षेत्र मिळाले– –सत्तेमधील विषमता. त्यामुळे समता, न्याय व स्वातंत्र्य या तीनही मूल्यांना आणखी एक ग्रहण लागले.

कारण ६ : व्याज
‘पैसा’ या गोष्टीचा तिसरा परिणाम म्हणजे सावकारी करता येऊ लागली, व्याज घेता येऊ लागले. म्हणजेच श्रम न करता श्रम-मूल्य मिळवता येऊ लागले. पैशाकडे पैसा जाऊ लागला. विषमतेचे पाऊल पुढे पडले.

कारण ७ : वारसा हक्क
मुलांना हक्क मिळाल्याने पालकांना अमाप संपत्ती जमा करण्यास मूलभूत संग्रही वृत्तीबरोबर अपत्यप्रेमाचेही कारण मिळाले, अपघात, आजार, व्यवसायातील चढउतार, नैसर्गिक फटके (पूर, वादळ, दुष्काळ वगैरे) यांना तोंड देण्यासाठी, वृद्धाप-काळाची सोय म्हणून काही प्रमाणात संग्रह हा विवेकी, रास्त म्हणता येईल. पण आपल्या आयुष्यात आपण चैनीने उधळपट्टीने वागूनही खर्च करता येणार नाही, इतकेच काय, पुढील अनेक पिढ्याही संपवू शकणार नाहीत इतका पैसा अनेक व्यक्ती निव्वळ व्यसन म्हणून जमा करू लागल्या.

संपत्तीबरोबरच राजसत्ता व इतर समाजातील सत्तेची पदेदेखील वारसा हक्काने मिळाल्यास जन्मजात विषमतेत कमालीची भर पडते व स्वातंत्र्य व न्याय या गोष्टी दुबळ्या लोकांपासून आणखी दुरावतात. जन्मजात दरिद्री मुलांना आरोग्य, शिक्षण, आहार, वस्त्र, निवारा या प्राथमिक गोष्टींचीच इतकी कमतरता असते की स्वातंत्र्य व न्याय या गोष्टी तर आकाशातील ताऱ्यांप्रमाणे लांब राहातात. संपत्ती, राजकीय सत्ता व हत्यारबंद शारीरिक बळ यांचा सहयोग सहजच घडून येतो. राजकीय सत्ता संरक्षणाबरोबरच पायाभूत सेवा व न्यायव्यवस्था पुरवते पण या सर्व गोष्टी बहुतांशी धनवंतांच्या उपयोगाच्या असतात. शिवाय धनवंत लोक खाजगी सेनादेखील उभारतात. बिहारमध्ये तर अशा सेना आहेतच, पण महाराष्ट्रात देखील आहेत. हल्ली महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा नेहमी गोंधळ, गडबड, मारहाण यामध्येच संपतात. सर्व ठराव आवाजी मतदानाने 5 मिनिटांत मान्य होतात. विरोधकांना बोलूच दिले जात नाही. छुप्या खाजगी सेनांचाच हा पुरावा आहे.

राज्यशासन सर्वांकडून कर घेऊन पायाभूत सेवा, शिक्षण व मालमत्तेला संरक्षण या गोष्टी पुरवते, त्यांचा फायदा धनवंतांनाच मोठ्या प्रमाणावर मिळतो. पण आयुष्याच्या शेवटी समाजाने (शासनामार्फत) पुरवलेल्या या सेवांबद्दल धनवंत व्यक्ती आपल्या मालमत्तेचा काही भाग समाजाला परत करत नाही. सर्वच मालमत्ता आपल्या मुलांना देते!

कारण ८ : जन्मजात विषमता
वारसा हक्काबरोबरच जन्मजात व पिढीजात विषमता निर्माण होते. या जन्मजात, पिढीजात विषमतेमुळे न्याय, स्वातंत्र्य व समता या तिन्ही मूल्यांचा सर्वात जास्त संकोच होतो. वारसा हक्कामुळे दारिद्र्य जन्मजात व पिढीजात होते व संपन्नतादेखील जन्मजात व पिढीजात होते. समाजाची विभागणी पिढीजात श्रीमंत व पिढीजात दरिद्री अशा दोन वर्गात होते.

जन्मजात दरिद्री मुलांना आरोग्य, आहार, शिक्षण, वस्त्र,निवारा, सुरक्षितता या सर्वांची टंचाई जाणवते. अनारोग्य, निरक्षरता किंवा अपुरे शिक्षण यामुळे अक्षमता व अक्षमतेमुळे दारिद्र्य असे दुष्टचक्र निर्माण होते.

विषमतेचे तीन प्रकार असतात,
पहिला प्रकार: प्रयत्नवशात् —- म्हणजे व्यक्तीने प्रयत्नांनी, शारीरिक व बौद्धिक कष्ट आणि उच्च गुणवत्ता यांच्या सहाय्याने पैसा मिळवणे, श्रीमंत होणे, ही विषमता प्रेरक म्हणून व समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे.
दुसरा प्रकार: दैववशात् —- म्हणजे लॉटरी लागणे, जुगारात, घोड्यांच्या शर्यतीत पैसे मिळणे वगैरे अचानक धनलाभ की, ज्यात त्या व्यक्तीची उच्च गुणवत्ता किंवा तिने घेतलेले परिश्रम यांचा काही संबंध नसतो. याचाच व्यत्यास म्हणजे आकस्मिक मृत्यू, गंभीर आजार, अपघात, दरोडा पडणे वगैरे गोष्टीमुळे अचानक धन-क्षय होणे. समाजातील एकूण विषमतेमध्ये दैववशात् विषमतेचा वाटा फारच कमी असल्याने त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य होईल. पण तरीही दैववशात् येणाऱ्या विषमतेचे परिणाम सौम्य करण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत.
तिसरा प्रकार: जन्मवशात् —- म्हणजे वारसाहक्कामुळे येणारी विषमता. वारसाहक्काने मिळणारी संपत्ती किंवा दारिद्र्य ही सर्वात वाईट परिणाम घडवून आणणारी विषमता आहे. जन्मापासूनच ही विषमता काम करते. समाजातील बऱ्याच मुलांना त्यांचा काही अपराध नसताना, अवगुण नसताना दारिद्र्य भोगायला लागणे व त्यामुळे पोषण, निवारा, शिक्षण, आरोग्य सेवा यांच्यापासून वंचित राहावे लागणे हे अन्याय्य व माणुसकीला काळिमा फासणारे आहे. जन्मजात येणाऱ्या दारिद्र्याचा उपशम केल्याशिवाय कोणत्याही समाजात न्याय, स्वातंत्र्य व लोकशाही यांचा खरा विकास होणे शक्य नाही.
वरिल विवेचनात आपण न्याय, स्वातंत्र्य व समता या तीन मूल्यांचा उगम माणसाच्या टोळीनिष्ठेतून झाला हे पाहिले. या मूल्यांचा हास होण्याची दोन महत्त्वाची कारणे आपण पाहिली. एक होते टोळीनिष्ठेचा विकास राष्ट्रनिष्ठेत न होणे. दुसरे होते जन्मजात विषमता. खाजगी मालमत्तेचा उदय, पैशाचा (विनिमयासाठी चलन निर्मीतीचा) शोध व वारसा हक्क या तीन घटना जन्मजात विषमतेला प्रामुख्याने कारणीभूत आहेत हेही आपण पाहिले.

आपल्याला जर न्याय, स्वातंत्र्य व समता या तीन मूल्यांची पुनःस्थापना करावयाची असेल तर आपल्याला राष्ट्रनिष्ठेत/समाजनिष्ठेत वाढ करावी लागेल व जन्मजात विषमता नष्ट करावी लागेल. (क्रमशः)

25, नागाळा पार्क, कोल्हापूर — 416 003

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.