अर्हतार्जनाची आकांक्षा (विल टु डिझर्व)

अंक 14:4 मध्ये प्रा. दि. य. देशपांडे यांनी तव्य (ऑट) आणि कर्तव्य (ड्यूटी) संकल्पनांचे स्पष्टीकरण व ‘नीतीची अनुभववादी उपपत्ती’ मांडली आहे. या लेखाचा मथितार्थ (1) मुळात शिक्षेच्या भयाने (वा पारितोषिकाच्या आशेने) विधिदत्त कर्तव्यांचे पालन होते. (2) पालनाच्या सवयीने प्रत्यक्ष शिक्षा/पारितोषिक उपस्थित नसतानाही पालनाच्या कल्पनेचे अनुकरण होते. (3) हे करताना माणसे स्वतःला किंवा इतरांना विध्यर्थक/आज्ञार्थक भाषेत तव्य कर्तव्य ही विधिपालनापासून साधित (डिराइव्हड) पदे वापरून आवाहन करतात. (4) कर्तव्यांचा आशय ‘बहुमताने’ लोकांना काय वाटते यावर ठरतो. (5) सदसद्विवेक यांसारख्या गोष्टी अतिगामी (ट्रान्सेण्डेंटल) म्हणून आपल्याला वयं आहेत.
थोडक्यात, कर्तव्यभावना आढळते खरी पण तिचा वर्तनवादी खुलासा करता येतो. हा खुलासा करण्यापलीकडे या भावनेचे स्वतोमूल्य सिद्ध करण्याला काही अर्थ नाही अशी देशपांडे यांची भूमिका दिसते. तथ्येच प्रमेय असतात. मूल्ये अप्रमेय असतात. मूल्यविधानांचे तथ्यविधानांत भाषांतर करता आले की अतिगामीपणा टळतो. खुलासा हे एकमेव कार्य मानल्याने कुठेच-न-गामी अशी जीवनदृष्टी नकळत प्रसृत केली जात आहे व मानवाच्या स्वभावाचे नको इतके अवमूल्यन केले जात आहे असा माझा आक्षेप आहे. हा आक्षेप मी अनुभववादी चौकटीत राहून व्यक्त करायचा प्रयत्न करीत आहे.
इच्छानिदर्शक विधाने अनुभववादाला चालतात कारण माणसांना इच्छा असतात हे एक तथ्य असते. कमी अधिक प्रमाणात माणसांमध्ये आढळणारी एक इच्छा म्हणजे फलेच्छेबरोबर फलाच्या अर्हतेचीही इच्छा.
मी हातबाण (डार्ट) खेळतो आहे. एकटाच आहे. मी उठून लक्ष्याच्या जवळ जाऊन मध्यवर्तुळाच्या मध्यबिंदूवर डार्ट खोचून परत आलो तर मला “काय नेम मारलाय” हा आनंद होऊच शकत नाही. मी नेम मारणे या कल्पनेचाच व्याघात केलेला असतो. बुद्धिबळे खेळताना समोरच्याचे लक्ष नाहीसे पाहून पटावरील घडामोड न घडणाऱ्या भागातले एखादे दुर्लक्षित प्यादे हळूच सरकवले (एक मूव्ह जास्त व लपवून केली) समोरच्याच्या लक्षात आले नाही. भोवती (इहलोकातले किंवा परलोकातले) कोणीच नाही आणि मी जिंकलो! समोरच्याला तो/ती हरल्याचे सच्चे दुःख पण चांगली लढत दिल्याचा सच्चा आनंद मिळेल. मला काय मिळेल? मी जिंकल्याचा भास मी समोरच्याला दिला आहे पण माझ्या लेखी मी जिंकलेलोच नाही. अनार्हफल हे फल म्हणूनही फुसके ठरते. अर्हता अर्जित करण्याची आकांक्षा माणसाला असते व ती साधन म्हणून नव्हे. (अर्हता दाखवली तरच फळ मिळेल त्यामुळे दाखवू या झाले, असे नव्हे) तर स्वतःसाध्य म्हणून असते.
पण अर्हतेची सक्ती आहे का? अजिबात नाही. कायद्याने अनिवार्यपणे शिक्षा होते असे देशपांडे म्हणतात पण अनिवार्यता तर सोडाच, संभाव्यताही (प्रॉबेबिलिटी) खूप कमी असते (हे अनुभववादी पद्धतीने पडताळता येईल). यू कॅन गेट अवे विथ. प्रत्यक्ष जगात भरपूर अन्याय आहे व भरपूर भाग्यवशता (‘भाग्य’ अतिगामी वाटल्यास चान्सवशता म्हणा) देखील आहे. या जगात अर्हतेला फाट्यावर मारून यशाचे धनी होता येते. धनी होता येते पण धन्य होता येत नाही. धन्यता, सार्थकता या गोष्टी अर्हतार्जनाशिवाय (इहवाद्याला) मिळत नाहीत. अनार्हयशाचा मोह दांडगा आहे व संधीही भरपूर आहेत. अर्हतार्जनाची आकांक्षा इतर आकांक्षांपुढे फिकी पडू शकते पण यावरून ती नाहीच असे म्हणता येत नाही. माणसाला एक अलौकिक ऋतवानता प्राप्तच आहे हे म्हणणे खरे नाही. पण माणसाला ऋतेषणा (हंगर फॉर रॅशनॅलिटी) आहे हे नि िचत. ही सुसंबद्धतेची ओढच एक रूप अर्हतार्जनाकांक्षेचे घेऊन येते. ऋतेषणा नाहीच, ती फक्त दंड-प्रलोभनाची अलंकारिक अभिव्यक्ती आहे असे म्हणून आपण काय साधतो? अतिगामीपणा टाळण्यासाठी माणसाला यंत्रवर्ती ठरविलेच पाहिजे असे नाही.
अनुभववादाला जर तर ची इच्छाविधाने चालतात. आता ऑटचा अर्थ (हायपोथेटिकल इम्परेटिव्हमध्ये) मांडता येईल. जर मला ‘य’ हवे असेल तर ‘क्ष’ करणे भाग आहे पण जर मला य आणि य-अर्हता हे दोन्ही हवे असेल तर ‘क्ष’ करणे हे माझे कर्तव्य ठरते. जे अर्हताकांक्षी नसतील ते कर्तव्यदक्षही नसतील. पण जो जो जेव्हा जेव्हा जितपत अर्हताकांक्षी आणि कर्तव्यदक्ष असतो तेव्हा त्याला आपण “तू ही आडून शिक्षा/बक्षिसाच्या मागे आहेस बरे का” असे का सांगावे? तुला साक्षात् जाणवणारी स्वतोमूल्य कर्तव्यनिष्ठा तुला साक्षात् (इमॅनेट) असेल पण तुला साक्षात् नसलेले तुझे खरे (ट्रान्सेंडेंटल) स्वरूप दुष्फलाचे भय व सुफलाची आशा हेच आहे असे म्हणणेदेखील अतिगामी नाही काय? उदात्त गोष्ट साक्षात् असली तरी ती अतिगामी आणि निरुदात्त गोष्ट साक्षात् नसली तरी ती मात्र अनुभववादी. हा कोठला न्याय?
आता ‘बहुमता’कडे वळू. मी असे विधान करतो की अहेतुक निष्काळजीपणातून इतरांस इजा पोहोचवण्यापेक्षा सहेतुकपणे इतरांस इजा पोहोचविणे हे जास्त दण्डार्ह आहे. या दाव्याची सत्यता बहुमत न घेता तुम्हाला पटते की नाही? मी पिस्तूल दाखवून पैसे लुटतो तेव्हा मी समोरच्याची नैसर्गिक ऊर्मी त्याचे शबलस्थान बनवतो. पण जेव्हा मी निरपराध्यांना ओलीस ठेवून ‘शत्रू’ला त्याचा अपराधभाव जागा करून नामोहरम करतो तेव्हा मी जास्त मोठे दुष्कृत्य (दहशतवाद) करत असतो. कारण मी सद्गुणाला शबलस्थान बनवतो. यातले सत्य स न घेता प्राप्त होते की नाही? एखाद्या स्त्रीला फशी पाडण्या पेक्षा बलात्कार जास्त वाईट आहे हे संस्कृतिनिरपेक्षपणे खरे नाही का? नीतिक्षेत्रातली कित्येक सत्ये घटित-अनावलंबीपणे (ए प्रायोराय) प्राप्त होऊ शकतात. विधिमंडळाने बहुमताने लोकशाही रद्द करणे हे शक्य आहे (हिटलर) पण अयोग्यच आहे (स्वयंव्याघाती). अशा वेळी नीतिशास्त्र हे “बहुमत का बरे असे वळले?” याचा खुलासा देणारे मानस-शास्त्रच असणार आहे की बहुमत निरपेक्षपणे सत्याग्रह करण्यातले स्वतोमूल्य उद्घोषित करणार आहे? की हुकू मशाही सोसण्याचा अनुभव जनतेला घेऊ द्यावा असा अनुभव वाद मोडणार आहे?
बहमत असो वा अल्पमत. मते बनविताना माणसे फक्त “मला वाटते . . .” अशा वाटण्यांची बेरीज करून सरासरी काढत नाहीत. ती एकमेकांशी वादही घालतात. वाद घालताना सुतर्क कोणता व कुतर्क कोणता हे ठरविण्याची सोय त्यांच्यात उपलब्ध असते. काही सत्यता घटित-अनावलंबीपणे पटण्याचा अनुभव त्यांना येत नसता तर ही सोयच नसती. हाही अनुभवच आहे. इहलोकीचा आहे, सर्वांना आहे, साक्षात् आहे. तो ‘वेदनदत्त’ नाही म्हणून तो अनुभवच नाही असे म्हणणे मात्र वेदनादायक आहे.
श्री. साने यांना उत्तर
श्री. राजीव साने यांनी आ. सु. अंक 14:4 मध्ये प्रकाशित झालेल्या माझ्या ‘तव्य आणि कर्तव्य’ या लेखावर काही आक्षेप घेतले आहेत. मी आक्षेपांना नेहमीच स्वागतार्ह मानतो, कारण आपला लेख कोणीतरी वाचला, त्यावर आक्षेप त्याने घेतले, आणि तो दुर्लक्ष करण्याइतका उपेक्षणीय नाही असे त्याला वाटले असल्याचे ते द्योतक असते. म्हणून मी श्री. साने याचे आभार मानतो.
लेखारंभी सान्यांनी माझ्या लेखातील प्रमुख मुद्द्यांचा सारांश दिला आहे. तो स्थूलमानाने बरोबर आहे असे मी समजतो. त्यावरील आपले आक्षेप मला मान्य असलेल्या अनुभववादी चौकटीत व्यक्त करण्याचा प्रयत्न आपण केला आहे असे ते म्हणतात. त्यांनी दिलेल्या अर्हतार्जनाकांक्षेचे उदाहरणाचे प्रयोजन मला नीट कळले नाही. अर्हता किंवा अर्हतार्जनाकांक्षा अनुभववादी चौकटीत उत्पन्न होत नाही असे त्यांना सुचवायचे आहे काय? नसेल, तर त्या उदाहरणाचे प्रयोजन मला कळले नाही. अर्हतेची आपली कल्पना काय आहे? एखादी गोष्ट अर्य आहे म्हणजे काय? मला वाटते ती अशी कृती असते की जिच्यात काही अटी पूर्ण व्हाव्या लागतात. त्या पूर्ण झाल्या नाहीत तर ती अद्य होत नाही. प्रामाणिकपणे अटी पूर्ण न करणे म्हणजे अर्हतार्जन नव्हे. त्या पूर्ण झाल्या आहेत की नाहीत हे जाणण्याचे उपाय पूर्णपणे आनुभविक आहेत. कोण अर्हत् आहे हे जाणण्याचे उपाय पूर्णपणे अनुभवक्षेत्रात आहेत, त्याबाहेरचा कोणताही उपाय वापरावा लागत नाही, आणि निरनुभवी उपायही शक्य नाही.
एखादी कृती केल्याने आपण अर्हता प्राप्त केली असे म्हणण्याकरिता ती कृती प्रशंसनीय असावी लागते. आपण ती कृती बुद्ध्या केली आहे हे आपल्याला माहीत असावे लागते; एखादी कृती कौतुकास्पद आहे हे जाणण्याकरिता आपली तिच्याविषयी अनुकूल वृत्ती आहे, आणि बहुतेक लोकांचीही वृत्ती आहे हे माहीत असावे लागते, काही लोकांना अर्हता प्राप्त करण्याची इच्छा असते हे खरे; पण म्हणून त्यांच्या जवळ काही अलौकिक ज्ञान असेल हे सिद्ध होत नाही. त्यामुळे काही लोकांना अर्हतार्जनाची आकांक्षा असते हे मान्य केल्याने माझ्यावर काय आपत्ति कोसळते हे कळले नाही.
साने म्हणतात: ‘ऑटचा अर्थ हायपोथेटिकल इंपेरेटिव्हमध्ये मांडता येईल. जर मला य हवे असेल तर क्ष करणे मला भाग आहे, पण जर मला य आणि य अर्हता दोन्ही हवे असेल तर क्ष करणे माझे कर्तव्य ठरते’ या वाक्यातील कर्तव्य हा शब्द म्हणजे नैतिक कर्तव्य नव्हे. ते केवळ तार्किक अर्थी कर्तव्य म्हणजे अनिवार्य आहे.
ते पुढे म्हणतात: ‘जो जो . . . अर्हताकांक्षी असतो त्याला “तूही आडून शिक्षा/बक्षिसाच्या मागे आहेस” असे का सांगावे? तुला जाणवणारी स्वतोमूल्य कर्तव्यनिष्ठा तुला साक्षात् (इमॅनंट) असेल, पण साक्षात् नसलेले तुझे खरे (ट्रान्सेंडेंटल) स्वरूप असणाऱ्या दुष्काळाचे भय आणि सुफलाची आशा हेच आहे असे म्हणणेदेखील अतिगामी नाही काय? उदात्त गोष्ट साक्षात् असली तरी ती अतिगामी, आणि निरुदात्त गोष्ट साक्षात् नसली तरी ती मात्र अनुभववादी. हा कोठला न्याय?’ या वाक्यातील साक्षात् म्हणजे इमॅनेंट हे म्हणणे मला आक्षेपार्ह वाटते.
उदात्त गोष्ट साक्षात् आहे म्हणजे काय? माझे मत तिच्या बाजूचे आहे, तसेच बहुतेकांचेही आहे, आणि तिला मानवी जीवनात महत्त्व आहे असे मी आणि बहुतेक लोक मानतात, याखेरीज काही नाही. कर्तव्यनिष्ठा स्वतोमूल्य व ती म्हणजे काय? कोणाला तरी ती केवळ तिच्याकरिताच हवी आहे याहून ‘स्वतोमूल्यवान’ या शब्दाला अर्थ नाही. स्वतोमूल्य ही वस्तुनिष्ठ विषयनिरपेक्ष गोष्ट नाही.
पुढे साने म्हणतात : ‘नीतिक्षेत्रातील कित्येक सत्ये घटितानवलंबीपणे (ए प्रायोराय) प्राप्त होऊ शकतात.’ येथे ते एका अत्यंत बिकट वादग्रस्त समस्येस हात घालीत आहे. ‘ए प्रायोराय’ म्हणजे काय ही चर्चा करण्याचे हे स्थळ नव्हे. तो फार मोठा विषय आहे. येथे एवढेच म्हणतो की नैतिक वाक्ये सत्य/असत्य असत नाहीत. या गोष्टीचे विवेचन मी पुढील लेखांत केले आहे. (पाहा, आ.सु 13:8, ‘नीतीची भाषा’ आणि आ.सु 13:12, ‘अनुभववादी नीति’) त्यातील युक्तिवादात काय चुकले आहे ते सान्यांनी दाखवावे अशी त्यांना विनंती आहे.
एखादा नैतिक नियम स्वीकारणे आहे की नाही हे बहुतांच्या ऐकमत्याने ठरते या माझ्या मताविषयी साने म्हणतात : ‘बहुमत असो की अल्पमत, मते बनविताना माणसे “मला वाटते. . .” अशा वाक्यांची बेरीज करून सरासरी काढत नाहीत. ती एकमेकांशी वाद ही घालतात. वाद घालताना सुतर्क कोणता आणि कुतर्क कोणता हे ठरविण्याची सोय त्यांच्यात उपलब्ध असते.’ हे जर खरे असते तर नीतीच्या क्षेत्रात मतभिन्नता आढळलीच नसती. पण या क्षेत्रात जेवढी मतभिन्नता आहे तेवढी अन्य क्षेत्रांत आढळत नाही. विज्ञानात आरंभी मतभिन्नता असली तरी शेवटी ती नाहीशी होते. पण नीतीची चर्चा करणाऱ्यांमध्ये एकमताचा मागमूसही नसतो. याचे कारण नीतीच्या क्षेत्रात कोणते मत चूक आहे आणि कोणते बरोबर आहे हे ठरवायचा निर्णायक निकष नसतो. सुतर्क कोणता आणि कुतर्क कोणता हे ठरविण्याची सोय उपलब्ध असते असे साने म्हणतात. . . पण सत्य साधकांवरूनच (Premises) फक्त सत्य निष्कर्ष निघू शकतो एवढेच फक्त तर्कशास्त्र सांगते. पण साधके सत्य आहेत की नाहीत हे ठरविण्याचा उपाय तर्काजवळ नसतो. त्यामुळे अनुमान वैध असले तरी त्याचा निष्कर्ष सत्य आहे असे म्हणता येत नाही. – दि. य. देशपांडे 2, स्नेह क्लासिक्स्, 7/1 एरंडवणा, पाडळे पॅलेस समोरील रस्ता, पुणे — 411 004

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.