रस्ते आणि मोटारी: एक न संपणारी शर्यत

1908 साली अमेरिकेत फोर्ड मोटारीच्या कारखान्यातून पहिली मोटार बाहेर पडली आणि माणसाच्या भ्रमंतीला क्रांतिकारी वेग प्राप्त झाला. दुसरे महायुद्ध संपेपर्यंत या मोटारींचा म्हणावा तितका प्रसार शहरांमध्ये झाला नव्हता. शेतकरी मात्र या वाहनांवर खूष होते. त्यांचा ताजा शेतीमाल शहरांत आणावयाला हे वाहन फार उपयोगी ठरले होते. शिवाय त्या काळात युरोप-अमेरिकेतील सर्व शहरांमध्ये रुळांवरून ट्राम, मेट्रो, आणि उंच पुलांवरून धावणारी छोटी रेल्वे यांसारखी सार्वजनिक आणि स्वस्त वाहतूक-साधने उपलब्ध झाली होती. यामुळे मोटारी या प्रामुख्याने खेड्यांमध्ये प्रचलित झाल्या होत्या हे आज खरे वाटणार नाही.
दुसऱ्या महायुद्धानंतर मुख्यतः अमेरिकेमध्ये शहरातील जुन्या सार्वजनिक वाहतूकव्यवस्थांशी खाजगी मोटारींची शर्यत सुरू झाली. वेगवान, गर्विष्ठ सशाप्रमाणे या वाहनशर्यतीमध्ये मोटारीने चांगलीच आघाडी घेतली. घोडा, टांगा, सायकलींचा तर आधीच पराभव झाला होता. गेल्या पाऊणशे वर्षांत मोटारींचा वेग, संख्या आणि प्रकार वाढतच गेले. माल वाहतुकीसाठी मालमोटारींचे नाना आकार, प्रकार निर्माण झाले. त्याच बरोबर प्रत्येक घरी एक मोटार हे स्वप्न विकून झाल्यावर प्रत्येक माणशी एका मोटारीचे स्वप्न विकावयाला अमेरिकेतील कारखानदारांनी सुरुवात केली. या मोटारींच्या दौडीत त्यांना साथ दिली ती रस्ते-बांधणीच्या व्यवसायाने; आणि या सर्वांना पैशांचे पाठबळ पुरविले ते अमेरिकेच्या सरकारने. रस्ते आणि वाहतूक-नियोजनाचे शास्त्र आणि तंत्रज्ञान मुख्यत्वे अमेरिकेत अधिक विकसित झाले. अमेरिकेत जाऊन आलेल्या किंवा व आलेल्या सर्वांना तेथील शहरांतील रुंद रस्ते. तसेच सर्व शहरांना जोडणारे, सिग्नलरहित लांबरुंद हायवे आणि त्यावरून वेगाने धावणाऱ्या मोटारी या गोष्टी अचंभित करतात आणि त्यांचे अनुकरण करावयाला प्रोत्साहन देतात. मोटारींचा, त्यासोबत अशा संलग्न तंत्रज्ञानाचा आणि तथा-कथित स्वातंत्र्यदायी मोटारीच्या स्वप्नाचा प्रसार अमेरिकेपाठोपाठ आज जगभर झाला आहे तो याचमुळे. आपल्याकडेही अरुंद, अपुरे रस्ते असूनही मोटारींची संख्यावाढ आणि वाहनांची गर्दी आपण गेली दहा-बारा वर्षे प्रकर्षाने अनुभवतो आहोत. बदललेल्या आर्थिक धोरणामुळे आज भारतात मोठ्या संख्येने मोटारी बनविल्या, विकल्या जात आहेत. शहरांमध्ये रस्तांवरची वाहनांची गर्दी वाढली की अडथळे वाढतात आणि प्रवासाचा वेग कमी होतो. ताशी 100-125 कि.मी. वेगाने धावण्याची क्षमता असणारी मोटार तासाभरात 20-30 कि.मी. सुद्धा पळू शकत नाही, याचा राग येतो. रस्त्यांचे, गाड्यांचे प्रवाहीपण सांभाळण्यात येणाऱ्या अडचणींचे खापर मग आपले रांगडे, ओबडधोबड देशी रस्ते, नगरनियोजन, सरकार, भ्रष्टाचार, वाहकांची बेशिस्त या सर्वांवर फोडले जाते.
महाम
खरेतर अमेरिकेत काय किंवा भारतात काय वाहतूक नियोजनकारांची मोटारींमुळे होणारी दमछाक आणि गोची क्वचितच कोणाला माहीत असते. रस्त्यांवरची गर्दी कमी करणे आणि रस्ते वाहते ठेवणे हा रस्ते-नियोजनाचा हेतू असतो. ही गर्दी कमी करण्याचे दोन मार्ग असतात. एक म्हणजे रस्ते रुंद करणे व वळणे कमी करून,बांधकामतंत्र सुधारून रस्त्यांची गुणवत्ता वाढविणे, म्हणजेच रस्त्यांची वाहनक्षमता वाढविणे. दुसरा म्हणजे उपलब्ध रस्त्यांच्या क्षमतेशी सुसंगत अशी वाहनसंख्या आणि वेग राखणे. रस्त्यावरील अडथळे कमी करून प्रवाहीपणा राखणे आणि गर्दी मर्यादित करण्याचे उपाय योजणे. यातच वाहकांनी शिस्त लावणे, पादचारी व मंद गतीने धावणारी वाहने मर्यादित करणे, त्याचप्रमाणे रस्ते अरुंद असतील आणि प्रवाशांची संख्या मोठी असेल तर खाजगी मोटारींच्या ऐवजी जास्त प्रवासी नेऊ शकणाऱ्या वाहनांना प्राधान्य देणे इत्यादी अनेक उपाय असू शकतात.
यांपैकी अमेरिकेने पहिला मार्ग चोखाळला. तो त्यांच्या चंगळवादी, त्या काळात झपाट्याने विस्तारणाऱ्या अर्थव्यवस्थेला तसेच भौगोलिक रचनेला आणि वित्त-भांडवली उद्योजकांना आकर्षक वाटला म्हणून. एकदा हा मार्ग पत्करल्यावर मोठ्या प्रमाणावर रस्ते रुंदीकरण, नव्या रस्त्यांची आखणी, सुधारित बांधणी, नियोजनाचा अभ्यास आणि विकास व्हावयाला लागला. सबंध देशभर हा प्रकल्प सरकारी भाडवलगतवणूकीच्या साहाय्याने झपाट्याने राबवायला सुरुवात झाली. दूरदूर वेगाने प्रवास करावयाचा तर अडथळेरहित महामार्ग हवेत. त्या काळात वळणेरहित, सिग्नलरहित, क्रॉसिंगरहित रस्ते बांधणी हा नियोजनाकारांच्या अस्मितेचा आणि आव्हानाचा प्र न झाला. आणि त्यांनीही रस्ते-अभियांत्रिकीच्या साहाय्याने हे प्रकल्प मोठ्या झपाट्याने विकसित केले. वाटेत येणारे गावांचे, शहरांचे, लोकांच्या राहत्या घरांचे, इमारतींचे, जंगलांचे, शेतांचे, नद्यांचे, डोंगर दऱ्यांचे सर्व अडथळे अतिशय निघृणपणे दूर करीत महामार्गाच्या आडव्या उभ्या रेषांनी अमेरिकेचा भूभाग आच्छादून टाकला. केन्स या अर्थशास्त्रज्ञाचे मंदीवर मात करण्याचे, सरकारी वित्त गुंतवणुकीचे धोरण या रस्ते-उभारणीला उपयोगी ठरले. अशा प्रकारच्या विकासाला काही लोकांचा विरोध तेव्हाही होता पण तो क्षीण होता. शिवाय शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभर युद्धसाहित्य आणि सैनिकांची वाहतूक करावयाला महामार्ग आवश्यक आहेत या कारणाने जनसामान्यांचा होणारा विरोध मोडीत काढला गेला. गंमत म्हणजे जेव्हा 11 सप्टेंबरला अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा मात्र हेच महामार्ग संपूर्णपणे ओस पडले होते!
जसजसे रस्ते वाढायला लागले, सुखकर व्हावयाला लागले तसे लोक सार्वजनिक वाहतूकव्यवस्थांचा त्याग करून खाजगी मोटारींच्या स्वप्नामागे धावायला लागले. मोटारींची संख्या वेगाने वाढली. परिणामी रस्त्यांवरची मोटारींची गर्दी परत वाढायला लागली. गर्दी वाढली म्हणून अजून रस्ते बांधण्याची गरज वाढायला लागली. रस्ते-मोटारींच्या वाढीचे हे एक मोठेच दुष्टचक्र अमेरिकेत निर्माण झाले. या दुष्टचक्राच्या जोडीने आणखी काही दुष्टचक्रे निर्माण झाली. कार्यालये, कारखाने, रहिवासी जागा, विद्यापीठे, शाळा, विमानतळ, स्टेशने, बाजार, मोठी दुकाने, याचप्रमाणे करमणूक केंद्रे, प्रार्थनास्थळे, स्मशाने, हॉटेल्स, मोटेल्स याचप्रमाणे महामार्गावरील विश्राम-केंद्रे, या सर्व ठिकाणी शेकडो, हजारो मोटारी उभ्या करण्यासाठी प्रचंड पसरलेला अथवा बहुमजली वाहनतळ बांधणे क्रमप्राप्त झाले. त्यासाठी मोठ्या जमिनींवरील झाडे तोडणे आलेच.
मोटारींच्या उपलब्धतेमुळे गजबजलेल्या शहरांतून निवासी घरे दूरदूरच्या प्रदेशांत पसरावयाला लागली. त्यामुळे कार्यालये आणि निवासी विभागांमधील अंतरे वाढली. मोठी दूरदूर वसविलेली घरे, मोटारी यांच्यासाठी लोकांचे कर्जे काढणे वाढले. परिणामी स्त्रियांना नोकरी करणे अनिवार्य झाले. त्यांच्यासाठी वेगळी गाडी आली. गृहिणींनाही बाजारहाट, मुलांच्या शाळा, यांसाठी वेगळ्या गाडीची गरज निर्माण झाली. कॉलेजमधील मुलांनाही गाडी गरजेची झाली. घरोघरी गाड्या वाढल्या आणि त्यांसाठी लागणाऱ्या पेट्रोलचा खर्च आवश्यक झाला. आजच्या घडीला अमेरिकेतील सर्व माणसांना मैलोनमैल गाडी पळविण्याशिवाय आता पर्यायच उरलेला नाही. इतके करूनही लोकांचा प्रवासाचा वेळ वाढत जातो आहे, पण वेग मात्र कमी होत आहे. अनेक शहरांत काही रस्त्यांवरची वाहनांची गर्दी कमी न होता वाढतेच आहे. तर काही जुन्या भागातले रस्ते लोकसंख्या आणि वाहतूक कमी असूनही सांभाळावे लागत आहेत. या सर्व दुष्टचक्रांमुळे अमेरिकेचे खनिज तेलावरचे अवलंबित्व आज इतके वाढले आहे की त्याचा तुटवडा होण्याच्या कल्पनेनेही तेथील लोक आणि सरकार घाबरून जातात. त्यापायी मग दुसऱ्या देशांतील तेलसाठ्यांवर ताबा मिळविण्यासाठी लढाया करणे आणि जगभर दहशत माजविणे अमेरिकेला आवश्यक बनले आहे.
इतक्या लोकांच्याकडे गाड्या असूनही काही गरीब, वृद्ध, अपंग यांच्यासाठी सार्वजनिक वाहतूक चालू ठेवणे आजही आवश्यक ठरले आहे. आधी मोटारींच्या स्पर्धेमध्ये खाजगी बस, ट्राम, आणि रेल्वे सेवा यांचा पराभव झाला. काही शहरांतून त्यांचे समूळ उच्चाटन केले गेले. त्यामुळे गाडी बाळगू न शकणारे गरीब लोक नोकरीपासून वंचित रहावयाला लागले. त्यांच्या सामाजिक असंतोषाच्या भीतीने परत सार्वजनिक वाहतूक सुरू करणे शहरांना, सरकारला भाग पडते आहे. पण या व्यवस्थांना पुरेसे प्रवासी नसल्याने खूप तोटा सहन करावा लागतो आणि त्यासाठी सरकारी अनुदान देणे टाळता येत नाही. इतकेही करून या व्यवस्था काही स्वस्त नाहीत कारण या व्यवस्था सांभाळावयाला लागणारे मनुष्यबळ महाग आहे. मोटारधारकांना सार्वजनिक सेवांकडे वळविणे ही एक मोहीम अनेक शहरांत राबविली जाते. दोनपेक्षा अधिक प्रवासी असलेल्या मोटारींसाठी, बसेससाठी वेगळी लेन या सारखी प्रलोभने दाखविली जातात. तरी पण स्वतःच्या वाहनाचे व्यसन लागलेल्या लोकांना स्वतःच्या वृत्तीमध्ये बदल करणे सध्यातरी अवघड दिसते आहे.
या मोटारींच्या हव्यासापायी आणि रस्ते बांधणीच्या अतिरेकापायी अनेक प्रकारे पर्यावरणाचा नाश झाला आहे. रस्ते बांधणीसोबतच आता 40-50 वर्षांच्या जुन्या रस्त्यांची दुरुस्ती, देखभाल यांचा खर्च अवाढव्य झाला आहे. नव्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक समस्यांना उत्तरे शोधण्यासाठी विद्यापीठांमधून खूप खर्चिक संशोधनही करावे लागते आहे. अशाच संशोधनातून एक वेगळीच जरा गंमतीशीर गोष्ट संशोधकांच्या लक्षात आली. रस्त्यांची वाहतूकक्षमता त्यावरून एका तासात प्रवास करू शकणाऱ्या वाहनसंख्येवरून मोजली जाते. जास्त वेगाने मोटारी पळविल्या तर रस्त्यांची वाहनक्षमता वाढेल ही शास्त्रज्ञांची अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात ताशी 40 आणि 100 मैल वेगाने रस्त्यांवरून वाहने पळविली तरी वाहनसंख्या मात्र वाढतच नाही हे संशोधकांच्या लक्षात आले. याचे कारण मोटारीचा वेग जास्त झाला की दोन मोटारींमधील अंतर वाढत जाते. अपघात टाळण्यासाठी वेगाने धावणाऱ्या मोटारीला ब्रेक दाबून थांबविण्याचा वेळ हा माणसाच्या शरीराच्या आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असतो आणि या वेळाशी सुसंगत अधिक अंतर दोन गाड्यांमध्ये ठेवणे वाहकाला आवश्यक बनते. म्हणूनच गर्दीच्या वेळीही रस्त्यांवरून जास्त वेगाने जाणारी वाहने मध्ये जास्त अंतर ठेवून चालवावी लागतात. हे अंतर कमी करावे यासाठी मोटारींचे नियंत्रण संगणकाकडे देऊन मार्ग काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. हे मोठे खर्चिक संशोधन आहे. असे हे संशोधनखर्चाचेही एक दुष्टचक्र बनले आहे. अशा एकमेकांशी निगडित अनेक दुष्टचक्रांपायी अमेरिकेची अर्थ व्यवस्था गेल्या काही वर्षात अस्थिर बनून वारंवार संकटात सापडते आहे.
भारतातील शहरांच्या वाहतुकीचे नियोजन करताना अमेरिकेचा हा अनुभव आणि त्यातून आता कालांतराने उद्भवलेले प्र न यांच्याबद्दल नियोजनकारांना आणि तज्ञांना, संशोधकांना चांगली जाणीव असते. पण आपले राजकारणी आपल्या तज्ञांपेक्षा खाजगी विदेशी सल्लागार कंपन्या, आणि मक्तेदारी मोटारकंपन्यांच्या सल्ल्यांना अधिक किंमत देतात. असे सल्लागार तेथील वाहतूक क्षेत्रात उद्भवत असलेल्या दुष्टचक्रांची, संकटांची जाणीव आपल्या राजकीय सत्ताधारी ग्राहकांना करून देत नाहीत. उलट नाना तंत्रे वापरून कालबाह्य तंत्रज्ञान देशी शहरांच्या माथी मारण्यासाठी वाटेल ते मार्ग काही परदेशी सल्लागार अवलंबितात.
याशिवाय परदेशी सल्लागार कंपन्यांना आपल्या गुंतागुंतीच्या, खास भारतीय प्र नांची नीट जाणीव नसते आणि आकलनही नसते. त्यांच्या दृष्टीने आदर्श असलेल्या योजना आपल्या खास भारतीय प्रवासी-ग्राहकांच्या वर्तणुकीशी मेळ शाधू शकत नाहीत. मोठा गाजावाजा करून मुंबई-पुणे महामार्ग बांधला गेला. दहापदरी रस्ता बांधावा लागेल असा सल्लागारांचा सल्ला असतानाही शहाणपणाने सहापदरी रस्ताच बांधला, तरीही अपेक्षेप्रमाणे वाहनसंख्या वाढली तर नाहीच पण त्यामुळे आर्थिक दृष्ट्या हा प्रकल्प आतबट्ट्याचा ठरला आहे. त्यासाठी उभारलेल्या कर्जरोख्यांचे पैसे परत कसे करावयाचे याची विवंचना सरकारपुढे उभी राहिली आहे.
खरे तर आपल्याला अजूनही मोटारींच्या वापरावर विविध प्रकारे निबंध घालण्याचे, सार्वजनिक वाहतूक सुधारण्याचे, या सरकारी सेवांचे आर्थिक व्यवस्थापन जुन्या बंदिस्त चौकटीतून सोडविण्याचे मार्ग उपलब्ध आहेत. त्याचबरोबर खाजगी वाहतूकदारांनाही त्यात सामील करून घेता येइल. आतापर्यंत नवीन रस्तेबांधणी, उड्डाणपूल, महामार्ग या सारखे खर्चिक प्रकल्प राजकारणी लोकांना आकर्षक वाटलेले आहेत पण त्यांचे फायदे फार काळ टिकत नाहीत हे त्यांना कळत नाही. शिवाय भारतातील शहरांच्या अफाट लोकसंख्येला आणि गरीब अर्थव्यवस्थेला अमेरिकेतील वाहतुकीचे गणित लागू पडणारे नाही. काळही खूप पुढे गेला आहे. आणि शंभर वर्षांपूर्वीच्या नियोजनसंकल्पनांची वेळही निघून गेली आहे. सार्वजनिक वाहतूकव्यवस्था राबवितानाही भ्रष्ट सरकारी किंवा अत्यंत लोभी खाजगी मक्तेदारीचे संकट आहेच पण या ठिकाणी ती चर्चा अप्रस्तुत ठरेल म्हणून टाळली आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.