स्वातंत्र्योत्तर भारतीय विज्ञानाचे यशापयश (भाग १)

विषयप्रवेश
काळात भारताचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला. या विकासात विज्ञानाचा मोठा हातभार होता. आपण केलेला हा विकास पुरेसा झाला की नाही, आपल्या क्षमतेएवढा झाला की नाही, ज्या क्षेत्रात हवा त्या क्षेत्रात झाला की नाही, समाजातील निम्नस्तरांना फायदेशीर झाला की नाही, या प्र नांना होकारार्थी उत्तरे मिळतीलच असे नाही. पण विकास झालाच नाही असे कोणी म्हणू शकणार नाही. आपल्याला हवी तशी व हवी तेवढी प्रगती का झाली नाही या प्र नाचा शोध आपल्याला राज्यकर्ते व त्यांची धोरणे, समाज व सामाजिक परिस्थिती त्याचप्रमाणे व्यक्तिशः आपण स्वतः यांच्यापर्यंत नेऊन पोचवतो. विज्ञान हादेखील यातीलच एक पैलू आहे. या पैलूने आपल्याला दगा तर दिला नाही ना, हा मुद्दा विचारात टाकतो. भारतीय विज्ञानाच्या प्रगतीचा आढावा घेणारे पुस्तक म्हणूनच महत्त्वाचे वाटते. ‘द सागा ऑफ इंडियन सायन्स सिन्स इंडिपेडन्स, इन अ नटशेल,’ लेखक पुष्पमित्र भार्गव व चंदना चक्रवर्ती, प्रकाशक युनिव्हर्सिटी प्रेस, हे पुस्तक अशाच प्र नांचा शोध घेत लिहिले आहे. हा ग्रंथ म्हणून महत्त्वाचा आहे, शिवाय तो उद्बोधक पण आहे.

लेखक व पुस्तक:
या पुस्तकाचे दोन्ही लेखक नावाजलेले व अनुभवी वैज्ञानिक आहेत. जीवशास्त्र या विषयाशी संबंधित त्यांचे संशोधन आहे. हैदराबादच्या सेन्टर फॉर सेल्युलर अॅन्ड मॉलेक्युलर बायोलॉजी या संस्थेशी त्यांचा संबंध आहे. पुष्पमित्र भार्गव यांनी तर ही संस्था निर्माण केली आहे. पृष्पमित्र भार्गव यांनी आपल्या प्रदीर्घ कार्यकालात स्वातंत्र्योत्तर विज्ञानाची प्रगती जवळून पाहिली आहे. कित्येकदा वैज्ञानिक मंडळी समाजाभिमुख नसतात. श्री भार्गव यांचे तसे नाही. कला, विज्ञान, सामाजिक विज्ञान यांमध्ये त्यांना रस आहे. सर्वसामान्यांपर्यंत विज्ञान पोचवणे, वैज्ञानिक जाणिवा निर्माण करणे, वैज्ञानिकांमधील नीतिमत्ता, अशा चळवळीत ते सहभागी झाले आहेत. चंदना चक्रवर्ती या स्तंभलेखिका पण आहेत. त्यांच्या लिखाणात विविध विषय असतात. असे पुस्तक लिहिण्यास दोघेही पात्र आहेत हे जाणवते.

एकच बाजू मांडण्यासाठी हे पुस्तक लिहिले गेले नसावे असे वाटते. विज्ञानाचे यशापयश व त्याची कारणमीमांसा हा पुस्तकाचा गाभा आहे. पुस्तकातील सुरुवातीचा काही भाग जंत्रीवजा आहे. सरकारी संस्थांच्या माहितीपत्रकातून तो घेतल्यासारखा वाटतो. विज्ञानाच्या विविध शाखांचा विभागवार आढावा न घेता संस्थावार आढावा घेतल्यामुळे पुस्तकातील काही भाग विस्कळीत वाटतो. या पुस्तकात सरकारी संस्थांवर जास्त भर दिला आहे हाही जाणवते. भारतीय विज्ञानदेखील मोठ्या प्रमाणात सरकारी संस्थामधून विकसित झाले आहे, याचीच जाण होते. बिगरसरकारी उद्योगांमुळे होणारा विकास या पुस्तकात फार कमी चर्चिला आहे. लेखकद्वयाचा या बाबतीतला अनुभव व माहिती कमी पडते आहे, असेही यातून जाणवते. सामाजिक विज्ञानांना लेखकांनी या पुस्तकात स्थान दिलेले नाही. सामाजिक विज्ञानाने विज्ञानाच्या लोकप्रिय प्रतिमेत (पांढरा कोट, प्रयोगशाळा) अजून प्रवेश केला नसल्यामुळे हे अपेक्षित ठरावे.

हे असूनही सर्व माहिती एकत्रित वाचायला मिळणे हे या पुस्तकाचे यश समजले पाहिजे. पुस्तकात ज्यांचा उल्लेख आहे त्या अपयशांची यादी उद्बोधक वाटते. पुस्तकाचा मानबिंदू म्हणजे कारणमीमांसा. ही मात्र बरीचशी दोषविरहित आहे. बऱ्याचदा ती प्र नांच्या मूळ गाभ्याला स्पर्श करते, वाचकांना अंतर्मुख करते. लेखकांच्या अनुभवाचा पूर्ण उपयोग करून ती पुढे सरकते. अपयश टाळण्यासाठी यात रामबाण उपाय नाहीत. सर्वांनी विशेषतः वैज्ञानिकांनी जागे व्हावे, असा त्यातील अन्वयार्थ आहे. वैज्ञानिकांची कमकुवत नीतिमत्ता हादेखील यातील एक महत्त्वाचा भाग आहे. वैज्ञानिक, न्यायाधीश, नोकरशहा, अशा काही मंडळीना चबुतऱ्यावर बसवण्याची आपली एक रीत आहे. ही-देखील आपल्यासारखीच माणसे असतात. त्यांनाही राग, लोभ, हेवेदावे, भय आणि यांतून येणारे भ्रष्ट आचरण, खोटेपणा, फुशारक्या, अंतर्गत राजकारण, कंपूगिरी वगैरेपासून मुक्तता नसते. वैज्ञानिकांमध्ये हे दोष कसे दिसतात हे या पुस्तकात बरेचदा दिसते. दर्जा सुधारणे हे आपल्या विज्ञानासमोरील एक मोठे आव्हान आहे, हे या पुस्तकातून जाणवते.

या पुस्तकपरिचयाचे तीन भाग केले आहेत. यश, अपयश, व कारणमीमांसा हे ते तीन भाग. काही वेळेस या पुस्तकाच्या बाहेरचा मजकूर विषयानुरूप येईल. मात्र बहुतांशी याच पुस्तकाचा आधार प्रस्तुत लेखात असेल.

विज्ञान व तंत्र
खरे तर एखाद्या माणसाच्या विकासात विज्ञानाचा हातभार असायलाच पाहिजे असे नाही. उद्योगी, काटकसरी, नेतृत्वगुण असलेला व एखादी विद्या (स्किल) जाणणारा सह गारा सहसा प्रगती करायला चुकत नाही. अशा व्यक्तीस तिच्या कामात विज्ञानाचा वापर करता आला तर होणारा फायदा अधिक होतो. देशासाठी, एखाद्या उद्योगासाठी व समाजासाठी विकासात विज्ञानाचा सहभाग एखाद्या व्यक्तीच्या मोठ्या मोलाचा आहे. याचे कारण जगभरातील चढाओढ ही समहांसाठी जास्त तीव्र असते. हल्ली व पूर्वी झालेल्या युद्धात असे जाणवते की विज्ञानबळाने मनुष्यबळावर मात केली आहे.

वस्तुतः तंत्रज्ञान आणि विज्ञान एकमेकांपासून भिन्न आहेत. वारंवारता बघणे, अनुमाने करणे, ती तपासणे व वैज्ञानिक तथ्यांची मांडणी करणे, हे विज्ञानाचे काम, विज्ञानाने प्रस्थापलेली तथ्ये प्रत्यक्ष उपयोगात आणणे हे तंत्रज्ञानाचे काम, या व्याख्यांमुळे दोघांमध्ये गल्लत करायचा प्र नच उद्भवत नाही. पण प्रत्यक्षात ही गल्लत नेहमी होते. याच्यामुळे काहीजण विज्ञानाचे दोन भाग करतात एक शुद्ध (प्युअर) विज्ञान तर दुसरे तंत्र (अप्लाइड) विज्ञान. तंत्रविज्ञानाची प्रगती आणि समाजाचा विकास यांचा एकमेकांशी जवळचा (अन्योन्य) संबंध आहे. तर दुसऱ्या बाजूला, तंत्रज्ञानाची प्रगतीसुद्धा विज्ञानाच्या भक्कम पायावर उभी असते. सर्वसामान्यांसाठी गणकयंत्रे, माहितीजाल, रॉकेट्स, अणुभट्टया, दूरसंच, औषधे, शस्त्रक्रिया, पूल, धरणे हीच विज्ञानाची दृश्य रूपे आहेत. विज्ञानाचे सिद्धान्त यात मोडत नाहीत. विज्ञानावर व समाजावर दूरगामी परिणाम करणारे शुद्धविज्ञानातील गुरुत्वाकर्षण, उत्क्रांती, विद्युत्चुंबकी, क्वांटम यासारखे सिद्धान्त समाजासमोर प्रतिमेच्या स्वरूपात उभे राहत नाहीत. यामुळे सर्वसामान्यांसाठी तंत्रज्ञानाचा विज्ञानात समावेश करणे सोयीचे ठरते. एकच व्यक्ती तंत्रज्ञान व विज्ञान यांत सहभागी असणे हे मोठ्या प्रमाणावर घडते. बरेचदा गुंतागुंतीमुळे ती व्यक्ती आपल्या कामाची विभागणी ‘हे विज्ञान व हे तंत्रज्ञान’ अशी करू शकत नाही. अशा लोकांसाठीही विज्ञानात तंत्रज्ञानाचा समावेश सोयीचा ठरतो.

या पुस्तकाच्या लेखकांनीही हाच दृष्टिकोन ठेवून हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकात तंत्रज्ञानालाही विज्ञानाचाच भाग मानले आहे व त्यातील बराचसा भाग तंत्र-ज्ञानातील प्रगतीसंबंधी आहे. शुद्धविज्ञानात काम करणारे तंत्रविज्ञानात काम करणाऱ्यांना बरेचदा कमी लेखतात असे लेखकांनी म्हटले आहे. याचे कारण शुद्धविज्ञानात मूलभूत संशोधन होत असते तर तंत्रज्ञानात तसे काही नसते, असे मानले जाते. विज्ञानाचा मुख्य उद्देश जगाची माहिती मांडणे असा सांगता येईल. ‘डिस्कवरी’ म्हणजे विश्वाच्या अस्तित्वात असलेल्या बाबींचा शोध, हेच विज्ञानाचे मुख्य अंग आहे. तंत्रज्ञानात ‘इन्व्हेन्शन’ असते. म्हणजे अस्तित्वात नसलेल्या गोष्टींची निर्मिती करणे हे तंत्रज्ञानाचे मुख्य अंग आहे. नवनिर्मिती पहिल्यांदा करणारे आद्य संशोधक हे तंत्रज्ञानात आघाडीचे समजले जातात (उदा. मार्कोनीचा रेडिओ, राईट बंधूंचे विमान, इंटेलच्या मायक्रोचिप्स). ही नवनिर्मिती मात्र व्यापारिक व इतर कारणांसाठी सर्वांना खुली नसते. मग इतर मंडळी याच गोष्टींची पुनर्निर्मिती (रिइंजिनियरिंग) करतात (उदा. कोरियन किंवा जपानी मायक्रोचिप्स, भारतीय रॉकेट्स, अणुभट्ट्या). काहीजण तंत्रज्ञान विकत घेऊन ते आत्मसात करतात (उदा. बजाजची स्कूटर). तंत्रज्ञानाच्या दर्जाची ही उतरती भाजणी म्हणता येईल (नव-निर्मिती, पुनर्निर्मिती, आत्मसात करणे). तंत्रज्ञानाचा वापर सहसा सामान्य माणसे करतात. पण कधी कधी त्यासाठी प्रशिक्षित तंत्रज्ञांचीच गरज भासते. (उदा. कॅटस्कॅन वापरणे, हरित-क्रांतीतील संकरित बियाण्याचा वापर). अशा वापरासदेखील तंत्रज्ञान म्हणण्याचा प्रघात आहे.
संशोधनातील हा तरतम भाव महत्त्वाचा आहे. मात्र त्यात सहभागी होणाऱ्या व्यक्तींना तोच तरतम भाव लावणे चुकीचे ठरते.

शुद्धविज्ञानातील प्रगतीवर तंत्रविज्ञानातील प्रगती अवलंबून असते. तंत्रविज्ञान हे शुद्धविज्ञानानंतर विकसित होते, हा त्याचा मथितार्थ. अर्थात असा समज इतिहासास धरून होणार नाही. कित्येकदा सहजप्रेरणेने किंवा अपघाताने नवीन तंत्रज्ञान तयार होते मग शुद्धविज्ञान त्याचा पाठपुरावा करून निष्कर्ष काढते (उदा. पारंपारिक औषधे, स्टीम इंजिन). विज्ञानाचा आढावा घेताना या सर्व मुद्द्यांचा विचार महत्त्वाचा ठरतो.

भारताचे विज्ञानक्षेत्रातील यश
भारतीय विज्ञानाचे यश अनेकविध आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करणाऱ्या अनेक व्यक्ती भारतीय आहेत. 36 संशोधकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजण्याजोगी कामगिरी केली व रॉयल सोसायटीचे सभासद झाले. रामानुजन, जगदीशचंद्र बोस, सी. व्ही. रमण, भाभा, भटनागर, सत्येन्द्रनाथ बोस, ही त्यातील काही नावे. स्वातंत्र्योत्तर काळात नोबेल पारितोषिक कुठल्याच भारतीय वैज्ञानिकास मिळाले नाही. पण खुराना व चंद्रशेखर या भारतात जन्मलेल्या वैज्ञानिकांना ते मिळाले. खगोलविज्ञान या क्षेत्रात भारतीय वैज्ञानिकांची मोठी कामगिरी झाली. नारळीकरांप्रमाणे इतर भारतीय शास्त्रज्ञही या क्षेत्रात नावाजलेले आहेत.

स्वातंत्र्याच्या वेळी भारत उद्योगांबाबत फारच कमकुवत होता. त्यावेळी भारतात पोलाद, वस्त्रे व कृषिउत्पादने याशिवाय फारसे काही बनत नव्हते. सुया, फौंटनपेने, चिनी मातीची भांडी, कागद, अशा गोष्टी आयात केल्या जात असत. भारताने स्वयंपूर्णतेत मोठी आघाडी मारली. आता कार, कंप्युटर, फ्रिज, रेडिओ, दूरसंच, विमाने, बोटी अशा अनेकविध वस्तू बनतात. हे भारताचे मोठेच यश होय.

शिक्षण
स्वातंत्र्याच्या वेळी भारतात 21 विद्यापीठे होती त्यांची संख्या वाढून आता (2000साली) 260 झाली आहे. विद्यार्थ्यांची संख्या सव्वा दोन लाखांवरून एकाहत्तर लाख झाली आहे. अभियांत्रिकी विद्यालये याहूनही मोठ्या प्रमाणात वाढली. गेल्या काही वर्षांत, मुख्यतः खाजगीकरणाने हा बदल झपाट्याने झाला. आंध्रप्रदेशात पाच वर्षांत पाचपट या वेगाने ती वाढली. वैद्यकशास्त्राच्या 28 महाविद्यालयांची संख्या 175 झाली. पदव्युत्तर, पीएच. डी. व त्यापुढील शिक्षणाच्या सोयी यामुळे अधिक झाल्या. भारत वैज्ञानिक क्षेत्रात मोठे मनुष्यबळ असणारा देश झाला आहे. हे मनुष्यबळ जसे देशात काम करते तसेच परदेशातही. परदेशस्थ भारतीयांमध्ये विज्ञानक्षेत्रात काम करणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यांचे कार्यही तेथे नावाजले गेले आहे. भारतीय शिक्षणास परदेशांतही (मुख्यतः विकसनशील देशांत) मागणी असते. तेथून भारतात विज्ञानविषयक शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी येथे येतात.

संशोधनसंस्था, संघटना:
अत्युच्च शिक्षणक्षेत्रात अनेक संस्था सुरू झाल्या किंवा नावारूपाला आल्या. वैद्यकक्षेत्रात 27, कृषिक्षेत्रात 64, उद्योगाच्या व विज्ञानाच्या क्षेत्रात 41, संरक्षणक्षेत्रात 51, विज्ञान-तंत्रज्ञानक्षेत्रात 12, अशी प्रयोगशाळांची यादी आहे. याशिवाय टी. आय. एफ. आर., आयुका, सी. सी. एम. बी. अशा संशोधनसंस्था स्थापन झाल्या. संशोधकांची संख्या वाढली त्यामुळे त्यांचे संघटन सुरू झाले. पूर्वी व्यावसायिक संघटनांच्या जोडीला (उदा. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स) सायन्स काँग्रेससारख्या संघटना होत्या. गुहा रिसर्च कॉन्फरन्स ही मालिका सुरू झाली. या संघटनेने जीवशास्त्र व जीवतंत्र विषयातील संशोधकांना आपले विचार एकमेकांना पोचवण्याची मोठी संधी दिली व कामही मोठे केले. सर्वसाधारण विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यक, कृषि या भागात अकादम्या तयार झाल्या. मराठी विज्ञान मंडळासारख्या इतरही संघटना कार्यरत आहेत.

विज्ञानविषयक नियतकालिके हा विज्ञानाच्या प्रगतीचा महत्त्वाचा भाग आहे. आपल्या संशोधनाविषयी लिहिणे हे वैज्ञानिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे काम असते. कुठल्या नियतकालिकात आपला लेख आला आहे व त्या लेखाचा वापर किती जण करतात, हे कामाचा दर्जा ठरवणारे दोन महत्त्वाचे निकष आहेत. भारतात विज्ञानविषयक नियत-कालिकांची संख्या वाढणे हेदेखील सर्वसाधारण वैज्ञानिक प्रगतीचे द्योतक आहे. 2000 साली भारतात 1871 वैज्ञानिक नियतकालिके प्रकाशित होत होती. यातील 95 टक्के नियतकालिके स्वातंत्र्योत्तर आहेत.

तंत्रज्ञानविषयक :
कृषिक्षेत्रात हरित व दुग्ध, माहिती तंत्रज्ञान, अवकाश, अणुऊर्जा, जीवतंत्रज्ञान, संरक्षण, औषध व संदेशवहन अशा महत्त्वाच्या क्रांत्या झाल्या. यातील प्रत्येक क्रांतीने सर्वसाधारण लोकांच्या आयुष्यात मोठे फेरबदल झाले. यातील काही क्रांत्या परदेशस्थ तंत्रज्ञानाच्या मदतीने झाल्या. हरित, दुग्ध यांमध्ये मुख्यतः विदेशी तंत्रज्ञानाचा मोठा हातभार होता. संकरित बियाणे व संकरित जनावरे यांच्यामुळे या दोन क्रांत्या भारतात घडल्या. त्यांचा परिणाम दूरगामी झाला व उत्पादन काही पटींत वाढले.

विदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती तंत्रज्ञानक्षेत्रात क्रांती आली. पण काही वर्षात या क्रांतीने भारताचे नाव जगात आघाडीवर आणले. आज या क्रांतीमुळे भारताची आर्थिक परिस्थिती व सर्वसाधारण जीवनमान यात फरक पडला आहे. संदेशवहन क्षेत्रात प्रथम परदेशी सहभाग उत्तेजनात्मक नव्हता. म्हणून भारताने स्वस्त व दर्जेदार असे तंत्रज्ञान विकसित करण्यास सुरुवात केली. लहानसे एक्स्चेंज निर्माण करून संदेशवहनात क्रांती आणण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान आयात होऊन या क्षेत्रात क्रांती घडत आहे.
अवकाश व अणुऊर्जा या दोन क्षेत्रात सुरुवातीस परदेशी हातभार होता, पण त्यानंतर परदेशी विरोधच जास्त होता. या विरोधास न जुमानता येथील वैज्ञानिकांनी तंत्रज्ञानाचे पुनर्निर्माण केले. स्वतंत्र अणुभट्ट्या तयार झाल्या, ज्यांत परदेशी सहभाग काहीही नव्हता. अण्वस्त्रे तयार होणे, हेदेखील याच क्षेत्रातले यश. अवकाशाच्या क्षेत्रात रॉकेटस् व कृत्रिम उपग्रह हे दोन भाग पडतात. या दोन्हींमध्ये असाधारण प्रगती होऊन स्वयंपूर्णता येत आहे. विकसित देशांच्या मागोमाग हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा एक पुढे असलेला देश ठरला आहे. संरक्षणक्षेत्रात भारताचा भर स्वयंपूर्णतेकडे होता. विमान, रणगाडा, पाणबुड्या, क्षेपणास्त्रे आपल्या स्वविकसित तंत्रज्ञानातून व्हाव्या ही या क्षेत्रातील मागणी होती. यातील बऱ्याच मागण्या अद्याप पूर्ण नाहीत, तरीही त्यांच्यातील प्रगती ही महत्त्वाची आहे. या क्षेत्रात परदेशी तंत्रज्ञानाचा सहभाग होता व अजूनही आहे. पण भारत त्यापुढे जाऊन एक स्वयंपूर्ण शक्ती होत आहे.

औषधांच्या क्षेत्रात झालेली व जीवतंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेली क्रांती फार महत्त्वाची आहे. औषध-क्षेत्रात मोठ्या प्रमाणात निर्यात होते. विकसित देशांपेक्षा भरपूर कमी किंमतीला भारत औषधे तयार करतो. तांत्रिक दृष्ट्या कठिण औषधांचे उत्पादन भारतात होते. जीवतंत्रज्ञान क्षेत्राचा आवाका मोठा आहे. औषध, कृषि व वैद्यकक्षेत्रात त्याची पोहोच आहे. जगभर ही क्रांती सुरू आहे आणि यात भारत मागे पडणार नाही असे दिसते.

अभियांत्रिकी क्षेत्रात भारताने चांगली प्रगती केली. जागतिकीकरणाच्या काळातही हे क्षेत्र वाढते आहे. पूल, रस्ते, धरणे, इमारती. रेल्वे या बांधकामक्षेत्रात मोठी प्रगती झाली. या सर्व बाबतींतल्या तंत्रज्ञानात भारत स्वयंपूर्ण असून त्याची निर्यातही करतो. जागतिकीकरण करण्याच्या काळात रसायन. यंत्रसामग्री करणे. पोलाद. अशा क्षेत्रांत पीछेहाट झाली. यातन ही क्षेत्रे बाहेर पड बघत आहेत. कारखान्यात लागणारी यंत्र-सामुग्री, खते, सिमेंट, पोलाद, रिफायनरी अशासारख्या क्षेत्रांत भारतीय तंत्रज्ञान आघाडी घेत आहे.

यशाचे मूल्यमापन
विज्ञानक्षेत्रात भारताने यश संपादन केले आहे ही गोष्ट निर्विवाद आहे. पुस्तकात यावर अधिक सखोल माहिती आहे. वरील माहितीवरून या यशाचा आवाका कळतो. पण या यशाची गुणवत्ता कळत नाही. जसे समाजाच्या प्रगतीसाठी विज्ञानाचे योगदान असते तसेच समाज, सरकार व उद्योग हे विज्ञानाच्या प्रगतीसाठी झटत असतात. आर्थिक व मनुष्यबळाच्या रूपाने ही मदत विज्ञानास पोचत असते. या मदतीचे वैज्ञानिकांनी काय केले, हे विचारण्याचा समाजाला हक्क आहे. ते तुमच्या आवाक्याबाहेरचे आहे, देशाच्या गोपनीय कार्यक्रमातले आहे, इतरांनी ते केले आहे म्हणून तुम्ही त्यात नाक खुपसणे योग्य नाही अशी पांघरुणे वैज्ञानिकांनी ओढणे साफ चुकीचे आहे. योग्य मूल्यमापनाचा फायदा समाजाला व वैज्ञानिकांनाही होईल. आपल्याकडे अशा मूल्यमापनाची पद्धत नसल्यासारखीच आहे. समाजात त्याची चर्चा होत नाही. हे मूल्यमापन वस्तुनिष्ठ झाले पाहिजे. ते विभागवार झाले पाहिजे. तसेच ते त्या त्या क्षेत्रातील अधिकारी पण स्वतंत्र व्यक्तींनी केले पाहिजे. ते नेहमी करण्याची प्रथा असली पाहिजे. लेखकद्वयाने ते काही प्रमाणात केले आहे. पुढील भागात या मूल्यमापनाचा भाग म्हणून अपयशांकडे आपण बघणार आहोत.

ब ४/११०१, विकास कॉम्प्लेक्स, ठाणे — ४००६०१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.