तंत्रज्ञान आणि विचारांची पद्धत

भौतिकी, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रातले अनेक तज्ञ आजच प्रयोगांचे निष्कर्ष काढायला आणि समजून घ्यायला इलेक्ट्रॉनिक तर्कशास्त्राची मदत घेत आहेत. समाजशास्त्री आणि अर्थशास्त्री संगणकांशिवाय कामे करू शकत नाही आहेत. मानव्यशास्त्री, विचारवंत आणि सर्जनशील लेखकांना आज तरी या यंत्राचा फारसा वापर करता येत नाही. पण हे लवकरच बदलेल, कारण संगणकाने मजकुराचे संपादन करणे कागद-लेखणी वा टंकलेखकाने तसे करण्यापेक्षा खूपच सोपे जाते. प्रकाशन उद्योगाला इलेक्ट्रॉनिक अक्षरजुळणीचे फायदे आधीच कळलेले आहेत. पुढे साहित्यिक आणि वैज्ञानिक ग्रंथालयेही इलेक्टॉनिक रूपात संगणकावर उपलब्ध होतीलच. साहित्य, तत्त्वज्ञान किंवा इतिहासाचा अभ्यास अंकबद्ध करून संगणक हुकूमनाम्यांमध्ये साठवता येईल का, हा प्र नच नाही आहे—-मुळात संवाद साधायला शास्त्रीपंडितांना संगणक हेच महत्त्वाचे साधन उरणार आहे. युरोप व उत्तर अमेरिकेत तर हे आजच घडले आहे. येत्या शतकातले साहित्य आणि तत्त्वज्ञान संगणकांच्या कीबोर्डावरच लिहिले जाणार आहे आणि छापले जाणार आहे. एखाद्यावेळी छपाईऐवजी चुंबकीय चकत्यांवर साठवले जाऊन संगणकाच्या मदतीने वाचले जाणे छपाईलाही बाद करेल. दीर्घकाळ आणि दररोज या माध्यमाचा वापर करणारे मानव्यशास्त्री आणि साहित्यिकही माध्यमाच्या क्षमतांमुळे तरलपणे प्रभावित होतील, त्याच्या ताकदी व मर्यादा ओळखतील. सर्वच संवाद-माध्यमांच्या बाबतीत हे घडते.
एक मध्ययुगीन संताची तसबीर डोळ्यांपुढे आणा. (आपण भारतीय-मराठी परंपरेत बसायला एकनाथांची तसबीर कल्पनेने उभी करू.) पंचा नेसलेले गृहस्थ मांडी घालून, तीवर फळी ठेवून एका लहानशा खोलीत लिहीत बसले आहेत. शेजारी एकदोन पोथ्या मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात दिसत आहेत. शेजारीच शाईची दौत व तासून ठेवलेले बोरू आहेत. एखादे पंचांग व एखादे घटिकापात्रही शेजारी आहे. या चित्रातील प्रत्येक घटकाचा लेखकाच्या दैनंदिन आणि आधिभौतिक जीवनावर परिणाम होतच असणार ना!
पंचा आणि खोलीचा लहानखुरा आकार विद्वानांची सामाजिक स्थिती दाखवतो. दौत-टाक आणि भूर्जपत्र-कागद लिपीसुद्धा ठरवतात.(तामिळ ‘गोलगोल’ लिपी टाकाने भूर्जपत्रे फाटू नयेत यासाठी घडवली गेली, असे आठवते.) छापील पुस्तकांऐवजी हस्तलिखित पोथ्यांचा वापर त्या मोजक्याच ग्रंथांचे महत्त्व ठसवतो. भरवशाचा स्पष्ट उजेड नसणे, कालमापनाच्या उपकरणांचा साधेपणा, या साऱ्यातून लेखकाच्या साहित्यावर परिणाम होतच असतात. एकाच तसबिरीने सारे काही समजणार नाही. पण अनेक तसबिरी, अनेक परिसर, अनेक उपकरणे-अवजारे यांच्या मदतीने आपण ‘तत्कालीन’ साहित्यामागची जीवनशैली समजावून घेऊ शकतो. असेच एक मूलगामी चित्र आज संगणकापुढे बसलेल्या शास्त्रीपंडिताचे छायाचित्र पुरवते. खोलीतला मंद उजेड पुढ्यातल्या ‘मॉनिटर’वरची प्रकाशाक्षरे स्पष्ट करतो आहे. खोलीत इतर सामान जवळपास नाहीच, कारण सर्व संदर्भ संगणका मार्फत शोधता येतात. पडद्यावरचा लुकलुकता ‘कर्सर’ चुका दुरुस्त करण्यात टाक-बोरूंपेक्षा सक्षम आहे. मानवी लेखनिकापेक्षा बिनचूक संपादन फेरबदलाचे हुकूमनामे हाताशी आहेत. अशा साऱ्या हत्यारांनी काम करणारा विद्वान साध्या कागद-लेखणी-फळी-टिवळीवाल्या विद्वानापेक्षा वेगळ्याच त-हेने विचारही करेल. त्याचे प्र नही वेगळे असतील, आणि उत्तरेही!
[जे. डेव्हिड बोल्टरच्या ‘ट्युरिंग्ज मॅन’ (पेंग्विन 1984) या पुस्तकातील संगणकाच्या संभाव्य परिणामांबद्दलचा हा उतारा आहे.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.