हे छोटे सरदार की खोटे सरदार

गुजरात राज्यातील हिंदूराष्ट्राच्या प्रयोगशाळेचे मुख्य संचालक नरेंद्र मोदी यांनी रा.स्व.संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद वगैरे परिवाराच्या सहकार्याने आणि संपूर्ण सरकारी यंत्रणा वेठीस धरून २७ फेब्रुवारी २००२ च्या गोध्रा हत्याकांडानंतर जो बहात्तर तासांचा अभूतपूर्व नरसंहार त्या राज्यात घडवून आणला त्याबद्दल प्रधानमंत्री, उपप्रधानमंत्री, अशोक सिंघल आणि प्रवीण तोगडिया प्रभृती श्रेष्ठींनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले. या देशाने गेल्या पन्नास वर्षांत जेवढे म्हणून मुख्यमंत्री पाहिले त्यांत सर्वोत्तम मुख्यमंत्री नरेंद्र मोदीच असल्याचे शिफारसपत्र अडवाणींनी दिले. मोदींनी गुजरातेत यशस्वी केलेला प्रयोग भारतभरच्या गावोगावी आणि खेडोपाडी करू असा दृढसंकल्प तोगडियांनी व्यक्त केला. हजारो निरपराध मुसलमानांची कत्तल, त्यांच्या उपजीविकेच्या साधनांची जाळपोळ आणि त्यांच्या स्त्रियांवर निघृण अत्याचार आणि अमानुष बलात्कार त्या बहात्तर तासांत झाले. या पराक्रमाचे मुख्य संयोजक आणि शिल्पकार असलेल्या नरेंद्र मोदींच्या सन्मानार्थ त्यांच्या पक्षकार्यकर्त्यांनी त्यांची गौरवयात्रा काढली. त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. अनेक अतिशयोक्त विशेषणांची खैरात केली. त्यांपैकी बहुतेक विशेषणे बोलणारांच्या भावनांचा भाग म्हणून सोडली तरी ‘छोटे सरदार पटेल!’ असा जो मोदींचा अनेकांनी गौरव केला तो मात्र ऐतिहासिक तथ्यांच्या निकषांवर घासून पाहावासा वाटला. कारण मोदींचा त्यात सन्मान असला तरी सरदार पटेलांचा अपमान— किमानपक्षी अधिक्षेप—होत आहे हे तत्क्षणी जाणवल्यावाचून राहिले नाही. नरेंद्र मोदींचे त्यांच्या चाहत्यांना सरदार पटेलांशी कोणत्या बाबतींत साधर्म्य जाणवले असावे? ते दोघेही हिंदुत्वाचे कैवारी होते म्हणून की गृहमंत्री या नात्याने पटेलांनी जसा हिंदू-मुस्लिम प्रश्न हाताळला होता तसे काही मोदींनी २००२ साली गुजरातेत केले होते म्हणून? पटेल हे मोदींच्या अर्थाने हिंदुत्वाचे कैवारी होते काय? त्यांच्या हिंदुत्वाचा आधारही मुस्लिमद्वेष हाच होता काय? त्यांनी कधी हिंदू व मुस्लिम भारतीयांत भेदभाव केला होता काय? धर्माबद्दल त्यांची भूमिका कशी होती? त्यांच्या मुस्लिमिवषयक धोरणाचे स्वरूप आणि त्याची कारणे कोणती दिसतात? सरकारने धार्मिक दंगलींच्या काळात पार पाडावयाच्या भूमिकेबद्दल मोदी आणि पटेल यांची मते सारखीच होती काय? खुद्द अयोध्या मुद्द्यांवर पटेलांनी काय म्हटले होते आणि ते परिवाराच्या वर्तनाशी कितपत जुळते? अल्पसंख्यकांबाबत बहुसंख्यकांची जबाबदारी सरदार पटेलांनी कशी सांगितली होती? मोदी प्रयोगातून तीच व्यक्त झाली आहे काय? अशा अनेक प्रश्नांची वस्तुनिष्ठ उत्तरे शोधल्यावरच मोदींना छोटे सरदार म्हणावे की म्हणू नये याचा निर्णय घेता येईल.
ही उत्तरे शोधत असतानाच रफिक झकेरिया यांनी लिहिलेले ‘सरदार पटेल आणि भारतीय मुसलमान’ या शीर्षकाचे एक छोटेखानी पुस्तक हाती पडले. भारताच्या फाळणीपूर्वी आणि नंतरच्या काळात सरदार पटेलांच्या मुस्लिमांशी असलेल्या संबंधांचे सप्रमाण विश्लेषण प्रस्तुत पुस्तकात आढळले. वर उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या कामी हे विश्लेषण उपयुक्त ठरले. सरदार पटेल त्यांच्या समकालीनांपैकी नेहरू, आझाद, जयप्रकाश एवढेच नव्हे तर गांधीजींनाही हिंदूंचे पक्षपाती वाटत होते. रफिक झकेरियासुद्धा पटेलांना प्रारंभी मुस्लिमविरोधकच समजत असत. पण प्रत्यक्ष इतिहासाचे जेव्हा त्यांनी सूक्ष्म अवगाहन केले तेव्हा त्यांचे मत बदलले. आपल्या या मतांतराबाबत लेखकाने पारदर्शी प्रतिपादन केले आहे. गांधी-नेहरूंपेक्षा पटेलांचा मुस्लिमविषयक दृष्टिकोन निराळा होता हे खरेच आहे. हिंदू व मुस्लिम यांची एकजूट हा गांधी नेहरूंना भारतीय स्वातंत्र्याचा पाया वाटत होता, तर ब्रिटिशांचे राज्य या देशावर असेपर्यंत हिंदू व मुसलमान यांच्यात खरी एकजूट होऊच शकत नाही कारण त्या दोहोंतील एकोपा हे साम्राज्यसत्तेवरील गंडांतर आहे हे ब्रिटिश राजकर्त्यांना पक्के माहीत असल्यामुळे त्यांच्या एकजुटीला सुरुंग लावण्याचा ते राज्यकर्ते सतत प्रयत्न करणार, हे पटेल पुरते ओळखून होते. लीगने सुरू केलेले फुटीरतेचे राजकारण हा ब्रिटिश राजकर्त्यांचाच कुटिल डाव आहे हे ज्यांनी अचूक ओळखले होते त्या भारतीय नेत्यांत सरदार पटेल अग्रेसर होते.
ब्रिटिशांनी सांगितल्यावरून काँग्रेसने मुस्लिम लीगशी जुळवून घेणे पटेलांना नामंजूर होते. जात-जमातीय प्रतिनिधित्व देऊन केलेला समझौता अंगलट येऊ शकतो असा इशारा पटेलांनी दिला होता. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी जेव्हा मुस्लिम व शीख अल्पसंख्यकांनाच नव्हे तर अनुसूचित जातींना व जनजातींनाही विभक्त मतदारसंघ दिले तेव्हा पटेलांनी निदर्शनास आणलेली चूक गांधीजींच्याही लक्षात आली होती. राजकारणाने जमातवादी वळण घेतले तसतसे गांधी-पटेल यांच्या भूमिकांमधील अंतर वाढत गेले. तडजोडीच्या प्रयत्नांतील वैयर्थ्याची जाणीव पटेलांना झाली होती. बॅ. जिनांच्या नादी लागून मुस्लिम जनता स्वतःची कबर खोदत आहे याचे पटेलांना दुःख होते. लीगच्या ‘प्रत्यक्ष कृती’च्या कार्यक्रमाने एकात्मिक भारताच्या स्वप्नाचा तर चुराडा झालाच पण सर्वाधिक जीवितवित्त हानी मुस्लिमांचीच झाली, या घटनेने पटेल व्यथित झाले होते. प्रत्येक प्रश्नाकडे हिंदू-मुस्लिम वादाच्याच चष्म्यातून पाहणाऱ्या जिनांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे पटेलांना दुःख झाले होते, तेवढाच संतापही आला होता. हुरळलेल्या मेंढ्यांनी लांडग्याच्या मागे लागावे तसे बॅ. जिनांमागे धावणाऱ्या मुस्लिमांबद्दल त्यांना द्वेषापेक्षा कणवच अधिक वाटत होती. त्यांचा अनुनय करण्यापेक्षा त्यांना हडसून खडसून त्यांची दिशाभूल होत असल्याचे लक्षात आणून देणे पटेलांना गरजेचे वाटत होते. काँग्रेसतर्फे तसे प्रयत्न होत नव्हते हे पाहिल्यावर पटेलांनी त्या प्रकरणातून लक्ष काढून घेतले. त्यांच्या या औदासीन्यामुळे ते लीगपुढे हताश झाले किंवा ‘त्यांनी अधिक ताणले असते तर फाळणी टळू शकली असती’ असे काही आरोप पटेलांनी स्वतःवर ओढवून घेतले.
वस्तुस्थिती अशी दिसते की मुस्लिमांनी हिंदूंचा आणि हिंदूंनी मुस्लिमांचा पूरेपूर द्वेष करावा हे जिनांच्या राजकारणाचे सूत्रच पटेलांना नामंजूर होते. मुस्लिमच फाळणीला जबाबदार आहेत या धारणेतून त्यांनी मुस्लिमांवर राग जरूर केला, पण यच्चयावत् मुसलमान राष्ट्रद्रोही आहेत अशा तर्कदुष्ट विचाराला पटेलांनी कधीच थारा दिला नाही. उलटपक्षी जेव्हा सुहावर्दीनी भारतीय मुस्लिमांचे रक्षण केल्याबद्दल पटेलांचे अभिनंदन केले होते तेव्हा समस्त भारतीय मुस्लिम आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले याची कृतज्ञता-पूर्वक नोंद पटेलांनी घेतली होती. देशद्रोही मुसलमान वगळता अन्य कोणत्याही मुसल-मानांशी सरदार पटेल निष्ठुरपणे वा अन्यायाने वागले याचे एकही उदाहरण त्यांच्या उभ्या आयुष्यात आढळत नाही हे झकेरियांनी आवर्जून नमूद केले आहे. तथाकथित छोट्या सरदारांची करणी या तुलनेत तपासून पाहण्याजोगी आहे!
‘हिंदु-मुस्लिम ऐक्य हे नाजुक रोपटे आहे आणि त्याला जिवापाड जपायला हवे’ याची जाणीव सरदार पटेलांनी आजन्म बाळगली होती. या दोन्ही जमातींची मने परस्परांविषयी स्वच्छ असावीत, त्यांच्यातील संशयवृत्तीचा निरास व्हावा आणि त्यांच्यात केवळ तकलुपी समझौता नव्हे तर खरेखुरे ऐक्य व्हावे असे पटेलांना वाटत होते. गांधींनी सुरू केलेली खिलाफत चळवळ ही हिंदु मुस्लिमांमधील मनोमालिन्य दूर करण्याची सुवर्णसंधी आहे असे समजून पटेलांनी स्वतःला त्या चळवळीत झोकून दिले होते. १९३१ च्या कराची अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात पटेल म्हणाले होते की “मला ऐक्य हवे आहे ते अगदी मनापासन. अगदी क्षल्लक कारणाने संपुष्टात येणारी केवळ कागदी तडजोड नको आहे.’ त्यांच्या मते ते ऐक्य बहुसंख्यकांनी आपल्या दोन्ही हातांचे बळ वापरून अल्पसंख्यकांची परिस्थिती व स्थान सुधारण्याचा प्रयत्न केला तरच साध्य होऊ शकणार होते. हिंदूंकडून त्यासाठी त्यांना धाडसाची अपेक्षा होती. हे धाडस म्हणजे मोदीप्रयोगा-तील आक्रमक उन्माद नक्कीच नव्हता!
अल्पसंख्यकांसमोर कोरा स्वदेशी कागद आणि पेन ठेवून पटेलांनी त्यांना खुले आवाहन केले होते की त्यांनी आपल्या मागण्या लिहाव्यात, “मी त्यांना मंजुरी देईन!” संविधानसभेला पटेलांनी सादर केलेल्या अल्पसंख्यक समितीच्या अहवालात अल्प संख्यकांबद्दलची जी समंजस भूमिका व्यक्त झाली आहे ती छोटे सरदार म्हणवून घेणाऱ्यांच्या सपशेल आकलनापलिकडची आहे. सरदार पटेल म्हणतात, “अल्पसंख्यकांच्या कोणत्याही भावना अवास्तव जर नसतील तर त्या मुळीच दुखावल्या जाणार नाहीत या दृष्टीने आपण जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. तसेच असमाधानी अल्पसंख्यक म्हणजे ओझे आणि धोका आहे हेदेखील आपण विसरता कामा नये.” अल्पसंख्यकांसाठी भूतकाळ विसरून त्यांच्यात आत्मविश्वास वाढावा या दृष्टीने बहुसंख्यकांनी उदारवृत्ती दाखवावी यावर पटेलांचा कटाक्ष होता. हिंदूंना ते सल्ला देतात की “अल्पसंख्यकांना सध्या ज्या पद्धतीने वागवले जाते त्या पद्धतीने आपल्यालाही वागवले तर आपल्याला काय वाटेल याचा विचार करून अल्पसंख्यकांच्या भावना आपण जाणून घेतल्या पाहिजेत.” (झकेरिया, पृ. १२५).
बहुसंख्यकवादाच्या अहंकारास्तव कायदा हाती घेऊन मुस्लिम अल्पसंख्यकांना ‘राष्ट्रद्रोहा’ची शिक्षा करायला निघालेल्या हिंदू अतिरेक्यांना पटेलांनी स्पष्ट शब्दांत असे ठणकावले होते की “देशद्रोही मुस्लिमांचा समाचार घेणे हे तुमचे काम नाही… त्यांचा समाचार घेण्याची पुरेशी ताकद सरकारपाशी आहे.” मुसलमानांवर अविश्वास दाखवू नका हे हिंदूंना सांगताना पटेल म्हणतात : “देशभक्त मुसलमानांचा ते केवळ मुसलमान आहेत या कारणास्तव जर तुम्ही छळ करणार असाल तर आपल्या स्वातंत्र्याला अर्थच उरणार नाही.” तेवढे सांगूनच पटेल थांबत नाहीत पुढे ते असेही बजावतात की तसे वर्तन करणाऱ्यांची मुळीच गय केली जाणार नाही, तर त्यांचा कडक समाचार घेतला जाईल.
आपल्या या शब्दांना जागून त्यांनी हिंदू वा शीख गुन्हेगारांचा यथोचित समाचार घेतला आणि अडचणीत सापडलेल्या मुसलमानाला मदत केली अशी कित्येक उदाहरणे आहेत. भारतातील सात कोटी मुस्लिम समाजाची सुरक्षितता ही त्यांनी सरकारची आणि बहुसंख्यक हिंदूंची जबाबदारी मानली होती. बॅ. जिनांचा प्रभाव आणि शिकवण पुसून टाकण्याचा पटेलांनी गृहमंत्रिपदावरून हरत-हेने प्रयत्न केला होता.
ज्या अयोध्येच्या कारसेवकांना जिवंत जाळल्याच्या निषेधार्ह ‘क्रिये’तून गुजरातच्या अभूतपूर्व हिंसाचाराची ‘प्रतिक्रिया’ उद्भवली त्या अयोध्येच्या बाबरी मशिदीत रामलल्लाची १९४९ साली प्रतिष्ठापना केली तेव्हाच या घटनेला पुढे फार वाईट वळण लागेल, कदाचित लोक आपल्या हाती कायदा घेतील, अशी भीती द्रष्ट्या सरदार पटेल यांना वाटली होती. उत्तर प्रदेशचे तेव्हाचे मुख्यमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत यांना पटेलांनी लिहिलेले ९ जानेवारी १९५० चे एक पत्रच झकेरियांनी उद्धृत केले आहे. (पृ. १२२-३). आजच्या संदर्भात ते पत्र उद्बोधक आहे.
फाळणीमुळे ओढाताण झालेल्या मुस्लिम समाजाच्या निष्ठा नुकत्याच कोठे स्थिरावू लागल्या असताना पुन्हा अस्थिरता निर्माण होईल असे काही करणे गैर असल्याचे सांगून बाबरी मशिदीत रामाची मूर्ति ठेवण्याच्या कृत्याचे संभाव्य भावनिक परिणाम कसे भयंकर ठरू शकतात याचा निर्देश पटेलांनी या पत्रात केला आहे. “उत्तर प्रदेशात या प्रश्नावरून गट पडले असून कोणत्याही गटाला त्याचा फायदा उचलू दिला तर ते खूपच दुर्दैवी ठरेल. या सर्व पार्श्वभूमीवर दोन्ही जमातींमध्ये परस्परसहिष्णुता, सद्भाव तसेच समजुतदारपणाच्या आधारेच हा प्रश्न सुटावा असे मला वाटते. जे कृत्य घडले त्याच्यामागे फार मोठ्या भावना गुंतल्या आहेत… मुस्लिमांचे आपल्या बाजूने जर मन वळवले तर हा प्रश्न उभय बाजूंना समाधानकारकरीत्या सहज सोडवता येईल. असे विषय बलप्रयोगाने निकालात काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र तशी वेळ आली तर कोणत्याही प्रकारची किंमत देऊन कायदा व सुव्यवस्थेची स्थिती कायम राखली जाईल. म्हणूनच शांततापूर्ण आणि सामंजस्याचा मार्ग अवलंबावयाचा असेल तर आक्रमक अथवा एकतर्फी कृतीला अजिबात उत्तेजन देता कामा नये.’ या पत्रातून पटेलांची मुस्लिमांबाबतची सहानुभूती, मशिदीत राममूर्ती आणून बसवण्यामागचा खोडसाळपणा, त्या कृत्याचे संभाव्य गंभीर परिणाम, त्या प्रश्नाची रास्त सोडवणूक करण्याचा मार्ग, आणि त्याऐवजी कोणी आगळीक करून त्या प्रश्नाला विकृत वळण दिल्यास सरकारच्या गृहखात्याने पार पाडावयाची जबाबदारी या गोष्टींचे स्वच्छ भान स्पष्टपणे व्यक्त झाले आहे. रथयात्रा काढून वातावरण पेटवणारे, बाबरी मशीद रात्रीतून तोडणारे, त्याचप्रमाणे त्या भीषण प्रकाराकडे कानाडोळा करणारे या सर्वांनीच पटेलांचे हे पत्र वाचून ध्यानात ठेवले असते तर किती बरे झाले असते आणि केवढा अनर्थ टळला असता असा विचार मनात आल्यावाचून राहत नाही.
पटेलांनी धर्मनिरपेक्षतेची मांडणी कधी केली नसली किंवा त्या संकल्पनेचे त्यांना फारसे आकर्षण वाटले नसले तरी त्यांना अभिप्रेत असलेल्या राष्ट्राचा पाया निखालसपणे धर्मनिरपेक्षतेचाच होता. हिंदु राष्ट्र ही कल्पना त्यांना सपशेल वेडगळपणाची वाटत होती. शस्त्रपूजक आणि मुस्लिमद्वेषावर आधारित सावरकरवाद ही त्यांच्या मते हिंदू महासभेच्या पिसाट शाखेची विचारप्रणाली होती. २७ फेब्रुवारी १९४८ रोजी गृहमंत्री पटेलांनी प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंना पत्र लिहून असे कळवले होते (सरदार पटेलांचा पत्रव्यवहार खंड सहावा, १९७३) की गांधीजींना ठार मारण्याचा कट, हिंदू महासभेची जी पिसाट शाखा सावरकरांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली क्रियान्वित होती, तिनेच रचला आणि अंमलात आणला होता. स्वतःला छोटे सरदार म्हणवून घेऊ पाहणारे नरेंद्र मोदी यांनी नेमक्या २७ फेब्रुवारी रोजीच घडलेल्या गोध्राच्या ‘क्रियेची’ ‘प्रतिक्रिया’ गुजरात राज्यात सुरू केली हा योगायोगच म्हणावा लागेल! गोध्रा हत्याकांडात अर्धवट जळालेली प्रेते तिथेच विल्हेवाट न लावता त्याच गाडीने अहमदाबादला नेण्याचा निर्णय या कथित छोट्या सरदारांचा होता! जिल्हाधिकाऱ्याचा सल्ला डावलून त्यांनी अखेर दुसऱ्या गाडीने का होईनात ती प्रेते अहमदाबादला नेलीच आणि काही तासांतच प्रसिद्धि-माध्यमांतून गोध्रा प्रकरणी आयएसआयचा हात असल्याचे जाहीर करून ते मोकळे झाले! केंद्रीय गृहमंत्री आडवाणी आणि संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनाही तेथे परकीय हात दिसला. गोध्रा येथे जे घडले ते निषेधार्ह होते याबद्दल दुमत नाही. पण ते गोध्रापुरते सीमित ठेवणे सरकारला सहज शक्य होते. गोध्रा येथील प्रसंग पूर्वनियोजित होता की नाही याचा अद्यापही पुरावा पुढे आलेला नाही. त्याची ‘स्वाभाविक प्रतिक्रिया’ म्हणून संपूर्ण गुजरात राज्यात जे अभूतपूर्व वंशसंहारनाट्य घडले ते मात्र निःसंशयपणे पूर्वनियोजित होते असे शेकडो पुरावे पुढे आले आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांनी राज्यव्यापी बंद पुकारणे, ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निष्क्रिय राहण्याच्या तोंडी सूचना देणे, मंत्र्यांनी पोलीस नियंत्रण कक्षांचा ताबा घेणे, संपूर्ण सरकारी यंत्रणा जमातवादी दहशत आणि उन्माद पसरवण्यासाठी वापरणे, लोकांच्या आक्रोशाकडे व त्यांनी केलेल्या मदतीच्या याचनांकडे दुर्लक्ष करणे असे, सुसंस्कृत राज्यकर्त्यांना मुळीच न शोभणारे कितीतरी प्रसंग नागरिकांच्या वतीने नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगाच्या द्विखंडात्मक अहवालात नमूद केले गेले आहेत. ते वाचून संवेदनशील माणसांच्या अंगावर शहारे येतात!
घरादारांची राखरांगोळी आणि आप्तस्वकीयांची क्रूर कत्तल झालेल्या मुस्लिमांना मदत-शिबिरांत जीव मुठीत धरून राहण्याची पाळी आली असताना जो मुख्यमंत्री ‘ही मदत शिबिरे म्हणजे अपत्यनिर्मितीचे कारखाने आहेत’ अशा बेजबाबदार शब्दांत त्यांची हेटाळणी करतो, एवढेच नव्हे तर गोध्रा हत्याकांडात बळी पडलेल्या कारसेवकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख तर गुजरात वंशसंहारात मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक लाख सरकारी मदत देण्याचा पक्षपाती निर्णय बेशरमपणे घेऊ शकतो तो नक्कीच उलट्या काळजाचा असला पाहिजे! गुजरात हा हिंदु राष्ट्राचा नमुना जर असेल तर तसे राष्ट्र सिंघल तोगिडयांनाच लखलाभ असो, असेच म्हणावे लागते. केवळ विशिष्ट धर्मात जन्म घेण्याच्या अपराधासाठी या राष्ट्रात काही लोकांना देहान्ताची सजा दिली जाईल, ती शिक्षा ठोठावण्याचा अधिकार न्यायाधीशांना नव्हे तर गावगुंडांच्या हाती सोपवलेला असेल, कायद्याचे अधिराज्य वगैरे तेथे असणार नाही तर ज्यांचे राज्य आहे ते म्हणतील तोच कायदा असेल, राज्यसत्तेच्या सर्व शाखा आणि पाशवी बळाची सर्व सशस्त्र दळे बहुसंख्याकांची पक्षपाती असतील, संविधानातील तत्त्वांपेक्षा शासक-प्रशासकांची बांधीलकी राज्यकर्त्या पक्षांशी असेल, त्या पक्षाच्या उन्मत्त कार्यकर्त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची एकतर दखलच घेतली जाणार नाही आणि घेतलीच तर त्यांचे अत्यंत किरकोळीकरण केले जाईल, बहुसंख्यक जमातीतील मृतांच्या आयुष्याचे मोल अल्पसंख्यकांतील मृतांच्या तुलनेत किमान दुप्पट मोठे असेल, जिवंतपणीही त्यांचा दर्जा असाच विषम असेल, अल्प-संख्यकांना धाकात ठेवण्यासाठी हिंसाचार, बलात्कार, जाळपोळ, नरसंहार अशा ‘उपक्रमां’ मागे प्रायोजक म्हणून सरकार उभे राहील —- गुजरात राज्यात हिंदुत्वाच्या प्रयोगातून मिळालेली ही हिंदू राष्ट्राची चुणूक आहे! आणि या प्रयोगाचे लेखक-दिग्दर्शक-निर्माते स्वतःला आजच्या काळातील सरदार पटेल म्हणवून घेणार! खरे तर ते बॅ. जिनांचेच राजकीय वारसदार आहेत. धर्म संकटात असल्याचा खोटा आकांत पसरवून सत्तेचे राजकारण करणे आणि तात्कालिक स्वार्थासाठी राष्ट्राच्या दूरगामी हिताची तिलांजली देणे हे जिनांप्रमाणेच संघपरिवाराचेही धोरण आहे. जिनांना जसे खऱ्या इस्लामशी काहीही देणेघेणे नव्हते तसे या तथाकथित हिंदुत्ववाद्यांनाही खऱ्या हिंदुत्वाचे सोयरसुतक नाही. त्यांच्या हिंदुत्वाचे पितळ गुजरातच्या प्रयोगात उघडे पडले असून हिंदुत्व नव्हे तर ‘मोदीत्व’ हाच त्यांचा आदर्श आहे हे स्पष्ट झाले आहे. मुस्लिमद्वेषापलीकडे कोणताही सकारात्मक कार्यक्रम त्यांच्यासमोर नाही. सरदार पटेलांशी त्यांचे कोणत्याच बाबतीत साधर्म्य नाही. सरदार पटेलांचा मुस्लिमांशी फारसा संबंध नव्हता, त्यांनी मुस्लिमांसाठी फार काही केले नव्हते, इस्लामविषयक ज्ञान जुजबी होते. पण भारताच्या समृद्ध संमिश्र वारशाचे त्यांना केवळ भानच नव्हते तर अभिमानही होता. विशिष्ट जमातीचे नव्हे तर संपूर्ण राष्ट्राचे हित हाच त्यांच्या कायम आस्थेचा विषय होता.
गांधी-नेहरूंचे कितीही मर्यादेपर्यंत जाऊन मुस्लिमांचा अनुनय करण्याचे तड-जोडवादी धोरण पटेलांना नामंजूर होते. त्या बाबतीत त्यांची भूमिका कर्तव्यकठोर प्रशासकाची होती. पण ती पूर्वग्रहदूषित किंवा द्वेषमूलक मुळीच नव्हती. खरे तर त्यांनी धार्मिक अंधश्रद्धा व अनिष्ट रूढीपरंपरा यांच्या संदर्भात हिंदू व मुसलमान या दोन्ही समाजांची जी परखड कानउघाडणी केली आहे ती पाहता त्यांचा पिंड धर्मनिरपेक्ष व वस्तुनिष्ठ प्रशासकाचा होता असाच निष्कर्ष निघतो. प्रत्येक प्रश्नाकडे हिंदु मुस्लिमवादाच्या दृष्टीने पाहणे पटेलांना मुळीच मान्य नव्हते. शेती-शेतकरी व अर्थकारण याबाबतचा धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन त्यांच्या ठिकाणी होता, एका भाषणात शेतकऱ्यांना उद्देशून ते म्हणतात, “शेतकरी बंधूंनो, जमीनदार आणि पुजारी यांच्या जुलूमशाहीला तुम्ही स्वेच्छेने बळी पडत आहात. तुम्ही शेतकरी म्हणवून घेण्यास लायक नाही आहात. शेतकरी हा खराखुरा उत्पादक मालक असतो. तो शूर असलाच पाहिजे. तो दणकट असलाच पाहिजे. तो निर्भय असावा आणि मर्द पुरुषही असावा.” (झकेरिया, पृ. ३६-७). संघपरिवाराच्या सूत्रधारांपैकी एकाच्याही ठिकाणी या देशी वस्तुनिष्ठेचा पुसटसाही पुरावा आढळत नाही.
भावना भडकवणाऱ्या नेत्यांच्या मागे फाळणीच्या वेळी मुसलमान गेले तेव्हा पटेलांच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली होती, तशीच ती आज बेगडी व क्रूर हिंदुत्ववाद्यांच्या कच्छपी मोठ्या प्रमाणावर हिंदू जनता जाताना पाहिल्यावर गेली असती याबद्दल शंकेला मुळीच जागा नाही.
१६/ब, विद्याविहार कॉलनी, राणा प्रताप नगर, नागपूर – ४४० ०२२

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.