स्वातंत्र्योत्तर भारतीय विज्ञानाचे यशापयश (भाग २)

विज्ञानाची सद्य:परिस्थिती:
विज्ञानविश्वातील परिस्थिती गेल्या पन्नास वर्षांत झपाट्याने बदलली. पूर्वीचे वैज्ञानिक बरेचदा स्वतःच साधनसामुग्री जमवून संशोधन करीत असत. संशोधनातला त्यांचा रस त्यांना तसे करण्यास उद्युक्त करी. सी. व्ही. रमण, भाभा (सुरवातीच्या काळात) हे याच पठडीतील संशोधक, गेल्या पन्नास वर्षांत संशोधन हे मोठ्या प्रमाणावर संस्थांच्या माध्यमांतून सुरू झाले. त्यामुळे संशोधनातील संघटन वाढले. काय करायचे, कधी करायचे व किती पैशांत करायचे हे आधी ठरवून मग संशोधन करायचे असे सुरू झाले. थोडक्यात म्हणजे विज्ञानाचे व्यवसायीकरण झाले. संघटित विज्ञानात ज्येष्ठता, कनिष्ठता, अग्रक्रमाविषयीची चढाओढ आणि आपल्या संशोधनास पैसा मिळविण्याची धडपड ओघानेच आली. विज्ञानाचा वापर दैनंदिन जीवनात शिरल्याने सर्वसामान्यांनाही विज्ञानाकडून अपेक्षा निर्माण झाल्या. विज्ञानाला पुरवल्या जाणाऱ्या आर्थिक पाठबळात लक्षणीय वाढ झाली.विसरभोळ्या वा वेंधळ्या वैज्ञानिकाची प्रतिमा आता राहिली नाही. वैज्ञानिक आता समाजाभिमुख, व्यावसायिक, श्रीमंत होऊ लागले आहेत. विज्ञानाच्या कार्यकक्षा रुंदावल्या. शुद्ध विज्ञानाचे मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीयीकरण झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकीय भिंतींना न जुमानता विचारांचे आदानप्रदान वाढले. सोव्हिएट युनियनच्या विघटनानंतर आणि आता माहिती-क्रांतीनंतर हे विचारमंथन अधिक वेगाने वाढले.
तंत्रज्ञान-क्षेत्रात थोडे वेगळे घडू पाहत आहे. जागतिकीकरणामुळे आणि खुल्या होणाऱ्या बाजारपेठेमुळे तंत्रज्ञानातील व्यापारी नफा मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. एका बाजूला तंत्रज्ञानविकासाचा दर वाढला, तर दुसऱ्या बाजूने तंत्रज्ञानाच्या हक्कांमुळे तंत्रज्ञानाची मक्तेदारी निर्माण झाली. जुन्या पारंपारिक औषधांचे देखील तंत्रहक्क (पेटंट) मिळवू बघणारे तंत्रवैज्ञानिक दिसू लागले आहेत. नवीन तंत्रज्ञान तयार होताच त्याची प्रतिकृती तयार करण्याकडे कल होऊ लागला. भारतीय औषध-कंपन्यांनी हे तंत्र चांगले विकसित केले. असाच प्रकार सर्व क्षेत्रांत जगभर घडत आहे. हे दोन्ही प्रकार कायद्यात बसत नाहीत किंवा बसायला नकोत असे मत प्रचलित होत आहे.
सॉफ्टवेअर क्षेत्रात कॉपीराइट कायदा याच प्रकारची भूमिका बजावतो. तंत्र हक्काचा कायदा ह्या प्रतिकृतींवर बंदी घालतो व ही बंदी सर्वसाधारणपणे 15 वर्षे असते. कॉपीराइट कायद्यात ही मर्यादा 90 वर्षे असते. तंत्रज्ञानातील चढाओढीमुळे एकाच विषयात काम करणाऱ्यांची संख्या वाढली. अशा वेळी पहिला हक्क बजावणारा व दुसरा, यात बरेचदा कमी अंतर राहू लागले. अशा वेळी एकासच कायद्याचे संरक्षण मिळणे हे जाचक वाटू लागले. यातून मोठी मक्तेदारी निर्माण झाली. (उदा. मायक्रोसॉफ्ट). यावर उपाय म्हणून कॉपीलेफ्ट म्हणजे मुक्तपणे कॉपी करण्यास परवानगीहक्क देणारे संशोधक होऊ लागले. विंडोज विरुद्ध लायनक्स हा यातीलच प्रकार.
विकसित व विकसनशील देशांत तंत्रज्ञानाची दरी पूर्वी पासूनच होती. यामुळे विकसनशील देशांतील संशोधक हे मागे असणार हे स्वाभाविकच आहे. विकसित देशांत मोठी बाजारपेठ असल्याने तेथे खपणाऱ्या वस्तू तयार करणे हा तंत्रज्ञानविकासाचा एक मोठा पैलू आहे. तंत्रज्ञानविकासाची दिशा कमी कामगार, जास्त गुंतवणूक, उत्तम दर्जा व वेळ पडल्यास जास्त किंमत, अशी राहिली. भारतासारख्या देशासाठी ही दिशा योग्य नव्हती. पण हव्या त्या दिशेने संशोधन होण्याच्या दृष्टीने संशोधकांना कुठलेच आकर्षण नव्हते. भारतातील विज्ञान/तंत्रज्ञानाच्या अपयशांकडे बघताना या सर्व बाबी ध्यानात घेतल्या पाहिजेत. भारतीय विज्ञानाची परंपरा भारतीय विज्ञानाला भारतीय संस्कृतीएवढी जुनी परंपरा आहे. भारतीय संस्कृतीच्या उगमाच्या वेळेच्या इतर संस्कृतींच्या तुलनेत भारतीय विज्ञान हे काही बाबतीत पुढारलेले होते असे मानण्यास जागा आहे. गणित, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, शस्त्रक्रियाशास्त्र, वनस्पतिशास्त्र, भूगर्भशास्त्र, धातुशास्त्र या विषयांत भारतीयांना चांगली गती होती. हे पुढारलेपण मात्र टिकले नाही. ते न टिकण्याचे कारण (विदेशी) परकीयांची आक्रमणे असे सांगितले जाते, पण ते खरे नाही. विज्ञानातील पुढारलेपण न टिकण्याची कारणे भारतीय संस्कृतीतच आहेत. जातिव्यवस्थेमुळे ज्ञानाची विभागणी झाली. तंत्रज्ञानाशी संबंधित जातींना (लोहार, कुंभार, सुतार वगैरे) उत्तम शिक्षण न मिळणे हा या संस्कृतीचा भाग होता. त्यामुळे तंत्रज्ञान विषयातील ग्रंथ वाचणे व लिहिणे यांची परंपरा राहिली नाही. ज्ञानाची विभागणी व उत्तम शिक्षणाचा अभाव यामुळे ज्ञानाचा हास झाला. गुरुशिष्यपरंपरा ही देखील ज्ञानाच्या विकासास मारक होती. पोथीनिष्ठता व गुरूस अडचणीचे प्रश्न विचारण्यास बंदी या दोन्ही गोष्टी वैज्ञानिक वृत्तीस घातक ठरतात. भारतातही तेच घडले. ज्ञान लोकभाषेत न येता संस्कृतमध्ये बंद राहिले हे देखील एक कारण सांगता येईल. एकंदरीत भारतीय विज्ञान हे मागासलेले राहिले.
सध्याचे भारतीय विज्ञान हे जवळपास पूर्णपणे इंग्रजी परंपरेतून आलेले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात काही विश्वविद्यालयांची स्थापना झाली, 1835 मध्ये वैद्यकशास्त्राची महाविद्यालये सुरू झाली. एशियाटिक सोसायटी, बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी, अॅग्रीकल्चर सोसायटी याच काळात सुरू झाल्या. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस भारतीय विज्ञानाची प्रगती दिसू लागली. भारतीय वैज्ञानिक रॉयल सोसायटीत निवडून येऊ लागले. स्वातंत्र्योत्तर भारतीय विज्ञानाचा पाया याच सुमारास घातला गेला. स्वातंत्र्योत्तर काळात विशेषतः नेहरूंच्या प्रयत्नांनी यात मोठी भर घातली गेली.
अपयश शुद्धविज्ञानातले
प्रत्येक व्यक्तीचा कल आपले यश सांगण्याकडे जास्त असतो. अपयश हे काढून घ्यावे लागते. यशामुळे आपण सुखावतो तर अपयश चिंतेत टाकते. भारतीय विज्ञानाचे तसेच आहे. भारतात पसरलेले विज्ञानाचे प्रमाण आनंददायी होत असेल तर वैज्ञानिक जाणिवांचा अभाव हा आपल्याला ताळ्यावर आणू शकतो. लेखकद्वयाने याबद्दल सार्थ चिंता व्यक्त केली आहे. सायन्स टुडे व सायन्स एज (मराठीतील सृष्टिज्ञान) या दोन नियकालिकांचे बंद पडणे जनमानसातील विज्ञानाचे बदलते स्थान दाखवतात. विज्ञान-वृत्तीचा अभाव, ढासळत्या वैज्ञानिक जाणीवा काही प्रसंगांतून जास्त दिसतात. रमर पिल्लई या तरुणाने काही वरिष्ठ वैज्ञानिकांना फसवले हा प्रसंग यातलाच. रमर पिल्लई याने वनस्पतींपासून पेट्रोल बनविण्याचा दावा केला होता. अर्थात हा शुद्ध हातचलाखीचा प्रकार होता. पण या हातचलाखीच्या जोरावर त्याने कित्येक विज्ञानशिक्षितांच्या मनांत आशा निर्माण केल्या. गणपतीचे दुग्धप्राशन हे पण तसेच झाले. याच प्रकारचा एक प्रसंग (पुस्तकात नसलेला) प्रस्तुत लेखकाला आठवतो. कोल्ड फ्यूजन नावाचा गैरप्रकार (दोन हायड्रोजन अणूंपासून हेलियम तयार होणे पण अगदी लहान प्रमाणात) आंतरराष्ट्रीय पातळीवर झाला होता. ज्या वैज्ञानिकांनी हे दावे केले होते त्यांचे पितळ पुढे उघडे पडले होते. भारतात एका वेळी काही संशोधकांनी यास दुजोरा दिला होता व तसे प्रयोग ही केल्याचा दावा होता.
एका बाजूला भारत वैज्ञानिक-मनुष्यबळात जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश झाला. पण या मनुष्यबळाचा दर्जा नेहमीच संदेहास्पद राहिला. लेखकांच्या मते भारतातील पीएच.डी. प्रबंधांत हा दर्जा अतिशय कमी आहे. त्यांच्या मते 5 टक्केही प्रबंध त्या दर्जाचे नसतात. बहुतेक प्रबंधांतील लिखाण कुठल्याही प्रथम दर्जाच्या संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध होण्याच्या लायकीचे नसते. सर्वसाधारणपणे संशोधकांमध्ये निदान 10 टक्के संशोधकांनी दर्जेदार संशोधन करावे ही अपेक्षा अयोग्य नाही. भारतात हे प्रमाण खूप कमी आहे. यामुळे जवळपास कुठल्याच विभागात भारतीय वैज्ञानिकांना उच्च दर्जा गाठता आला नाही.
भारतीय संशोधन-नियतकालिकांची वाढलेली संख्या समाधानकारक आहे व ते एक यश समजावयास हरकत नाही. पण भारतात प्रसिद्ध होणाऱ्या 1900 नियतकालिकांपैकी एकानेही आंतरराष्ट्रीय दर्जा गाठला नाही. बहुतेक भारतीय संशोधन, पदव्या, नियतकालिके सर्वच काही कनिष्ठ दर्जाचे आहे हे दिसते. यांतील बऱ्याचशा गोष्टी कागदी घोडे नाचवण्यासाठी आहेत. नोकरी मिळविण्यासाठी, नोकरीतील प्रगती साधण्यासाठी किंवा सरकारी मदत मिळविण्यासाठी (आणि बऱ्याचदा तिचा गैरवापर करण्यासाठी) हे केले जाते. प्रतिभावान, दर्जेदार संशोधनास येथे स्थान नाही ही भावना नवीन संशोधकांच्या मनात घर करून राहते. थोडक्यात म्हणजे, आपल्या परंपरेनुरूप, उपलब्ध सोयीना व संधींना अनुसरून वा संशोधकांच्या वैयक्तिक गुणवत्तेनुसार भारतात काहीतरी नवा मार्ग दाखवणारे, मूलभूत संशोधन व्हावयास हवे होते ते झाले नाही.
तंत्रज्ञानातील अपयश
तंत्रज्ञानात भारत आणि विकसित देश यातील दरी दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र येथेही कुठल्याच भागात नवीन काही भारतात झाले आहे असे नाही. सॉफ्टवेअर क्षेत्रात भारताने बरीच आघाडी मिळवली खरी पण तेथेही मनुष्यबळ हेच महत्त्वाचे ठरते. या क्षेत्रातही भारतातील कुठलेही उत्पादन आंतरराष्ट्रीय दर्जा गाठू शकले नाही. गेल्या लेखात आपण तंत्रज्ञानातील यश हे कृषिक्षेत्रात हरित व दुग्ध क्रांती, माहिती तंत्रज्ञान, अवकाश, अणुऊर्जा, जीवतंत्रज्ञान, संरक्षण, औषध व संदेशवहन या बाबतीत मांडले होते. यातील कृषिक्षेत्रातील यश हे बहुतकरून विदेशी तंत्रज्ञानाच्या जोरावर मिळविले होते. तंत्रविषयक बदल जगभर आले तसेच ते भारतातही आले अशी संभावना माहिती-तंत्रज्ञान, जीव-तंत्रज्ञान, संदेशवहन व संरक्षण याही बाबतीत करता येईल.
अवकाश व अणुऊर्जा हे भारतीय संशोधनाचे मानबिंदू. सुरुवातीपासून या क्षेत्रात भारताने मोठी गुंतवणूक केली. असे असूनही या दोन्ही क्षेत्रांत योजनेप्रमाणे प्रगती झाली नाही. शास्त्रज्ञांनी योजना व तिची लक्ष्ये मांडावीत व त्यानुसार देशाने त्यासाठी साधनसंपत्ती पुरवावी, पण अपेक्षित यश त्यात मिळू नये असे काहीसे चित्र यातून तयार झाले. अर्थात परिस्थिती वाईट आहे असा याचा अर्थ नाही. पण यशाचे नीट अवलोकन झाले नाही असे दिसते. उपग्रहामार्फत भूनिरीक्षण व त्याची छायाचित्रे आणि कमी उंचीचे उपग्रह अवकाशात सोडणे या दोन गोष्टी भारताला जमलेल्या आहेत. भूस्थिर उपग्रह तयार करणे, सोडणे व त्याचा वापर करणे हे अजून पूर्णपणे साध्य झालेले नाही. हा महत्त्वाचा टप्पा आपण पार केल्यावर जगात या उद्योगाचे व्यावसायिकीकरण होऊ शकेल. त्याची वाट पाहणे आपल्याला भाग आहे. या संशोधनाचा एक दुसरा भाग आहे. तो म्हणजे संरक्षणक्षेत्रातील मिसाइल्स. भारतीय संरक्षण दलासाठी मिसाइल्सच्या आयातीची गरज अद्याप संपलेली नाही. भारतीय मिसाईल्सचे हवे तेवढे व चांगले परीक्षण अद्याप झालेले नाही.
अणुविज्ञान-क्षेत्रात भारत सुरुवातीस ऊर्जेस प्राधान्य देत होता. भाभांनी अणुऊर्जेबाबत खूप अपेक्षा निर्माण केल्या होत्या. त्यांच्या मते अणुविद्युत् प्रकल्पातून लवकरच भारताला पुरेशी वीज मिळेल. सुरुवातीची कित्येक वर्षे ही अपेक्षा पूर्ण झाली नव्हती. गेल्या दहा वर्षांत न्युक्लिअर पॉवर कॉरपोरेशन वीज निर्माण करून नफा कमावत आहे. हे यश असले तरी सुरुवातीला अपयश आले होते हे अमान्य करता येणार नाही. भारताच्या अणुस्फोटांच्या क्षमतेबाबत काही शंका आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथितयश नियतकालिकांनी घेतल्या होत्या. त्यांचे निरसन झाले नाही. गुप्ततेच्या आवरणांचे आपल्या अपयशांवर पांघरूण तर घातले जात नाही ना, अशी सार्थ शंका त्यामुळे आल्यास नवल नाही.
संरक्षणसंशोधन क्षेत्रात मोठी अपयशे पदरी पडली आहेत. मुख्य युद्ध-रणगाडा व हलके लढाऊ विमान तयार करण्याचे दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारताने हातात घेतले आहेत. त्यांत बऱ्याच वर्षांच्या प्रयत्नानंतरही अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. या दोन्ही प्रकल्पांत पूर्ण अपयश आले असे म्हणावयाला जागा आहे. इतर मुद्दे, वैज्ञानिकांचे पाय जमिनीवर असायला पाहिजे. त्यांनी प्रयोगांचे निष्कर्ष मानायला पाहिजेत. विज्ञानातील ज्ञानाचा स्रोत हा प्रत्यक्ष प्रयोगातून/अनुभवातून आला पाहिजे असे त्यांचे मत असणे आवश्यक असले पाहिजे. समाजात असलेल्या अंधश्रद्धांबद्दल त्यांनी (त्यांना बळी न पडता) आपले मत मांडले पाहिजे. या माफक अपेक्षांनाही भारतीय वैज्ञानिक उतरले नाहीत. 1964 साली सोसायटी फॉर सायंटिफिक टेम्पर स्थापन झाली. या संस्थेचा सभासद होण्यासाठी एका घोषणावाक्यावर सही करणे आवश्यक होते. त्या वाक्याचा गोषवारा असा : माझा असा विश्वास आहे की ज्ञानाचा स्रोत हा फक्त मनुष्याच्या प्रयत्नांतून येतो आणि कुठल्याही साक्षात्कारांतून येत नाही. सर्व प्रकारच्या समस्यांचा सामना मनुष्याच्या नीतीने वा बुद्धीने केला पाहिजे आणि त्यात अतिनैसर्गिक (सुपरनॅचरल) शक्तीस स्थान नाही. या विधानावर स्वाक्षऱ्या करण्यास बहुसंख्य वैज्ञानिकांचा नकार होता. शीतपेयांमधील कीटकनाशकांच्या तपासणीचा घोळ भारतातील अविकसित असलेल्या नियंत्रणव्यवस्थेकडे बोट दाखवतो. जेनेटिक्स, अणुशक्ती, संदेशवहन, अन्न, प्रदूषण अशा वेगवेगळ्या गटांत आधुनिक नियंत्रणनियमांची व व्यवस्थेची आज गरज आहे. ही गरज अ णीकरणाची (स्टँडर्डायझेशन) गरजही अशीच मोठी आहे. प्रमाणीकरणांचे नियम बदलण्यास होणारा उशीर किंवा त्यांचे न बदलणे याचेही दुष्परिणाम होत आहेत.
अपेक्षा जास्त असतील तर अपयशांची यादी मोठी असते. एकच परिणाम एकाच्या दृष्टीने यश किंवा अपयश असू शकतो. याचे कारण प्रत्येकजण परिणामांची परीक्षा अपेक्षांच्या आधारे करतो. जर अपेक्षा गुणवत्तायादीत येण्याची असेल तर प्रथम वर्ग मिळणे हे अपयश होऊ शकते. या उलट तृतीय वर्ग मिळविणे हे देखील काही जणांसाठी यश असू शकते. अपेक्षा सार्थ आहेत की नाहीत हे ठरविण्यासाठी फारसे निकष नाहीत. इतर लोकांच्यापेक्षा आपण उत्तम काम करावे ही कदाचित योग्य अपेक्षा असू शकेल. मात्र या अपेक्षेतही इतर कोण, विकसित देश की अविकसित देश हा प्रश्न राहतोच. आपल्या अपेक्षांत आपण अविकसित देश धरू या म्हणजे वैज्ञानिकांना ते फारसे अन्यायकारक वाटणार नाही. मात्र आपल्या परंपरेनुसार किंवा आपल्या साधनसामुग्रीनुसार या देशात आपला अव्वल क्रमांक यावा, विकसित देशांत आपली दखल घेतली जावी या अपेक्षा अनाठायी असू नयेत. हे का झाले नाही याच्या संभाव्य कारणांची चर्चा आपण पुढील भागात करणार आहोत.

बी 4/1101, विकास कॉम्प्लेक्स, ठाणे — 400 601

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.