हॅरी पॉटर आणि बुद् प्रौढ लोक

हॅरी पॉटर बद्दलच्या पुस्तकांच्या ‘स्फोटक आणि जागतिक’ यशाचे रहस्य काय? ती मुलांना समाधान का देतात? आणि त्याहून अवघड प्र न म्हणजे इतकी प्रौढ माणसे ती का वाचतात? मला पहिल्या प्र नाचे उत्तर सुचते ते हे, की पोरकट मानसशास्त्रावर घट्ट पकड राखून ती पुस्तके मुलांच्या नजरेतून जगाकडे पाहतात. पण हे उत्तर दुसऱ्या प्र नाला उत्तर देणे अधिकच कठीण करते—-एक बाब दुसरीला काट मारते.
आधी आपण सोपे उत्तर तपासू. फ्रॉईडने ‘फॅमिली रोमान्स’ चे वर्णन केले आहे—-आपल्या साध्या घर-कुटुंबाने समाधान न मिळणारे मूल एका उच्चकुलीन, जगाला वाचवणाऱ्या नायकाभोवती एक परीकथा बेतते. रॉलिंग्जच्या पुस्तकांतील हॅरी हा त्याला वाचवताना मारल्या गेलेल्या जादुगार आईबापांचा अनाथ मुलगा आहे. तो काही नीटसे स्पष्टीकरण नसलेल्या कारणांमुळे कंटाळवाण्या डी कुटुंबात राहतो. हे बहुधा त्याचे खरे ‘वास्तव’ कुटुंब असावे. त्यांचे वर्णन रॉलिंग्ज सततच्या विखारी अतिशयोक्तीने करते. डी लोक हे हॅरीचे खरे शत्रू. तो जेव्हा जादुगारांच्या शाळेत जातो तेव्हा मात्र तिथले सारे सुष्ट आणि दुष्ट लोक त्याचे महत्त्व जाणून त्याचे रक्षण किंवा नाश करायचा प्रयत्न करतात. फॅमिली रोमान्स हा सुप्ततेच्या काळातला कल्पनाविलास असतो, सात वर्षांपासून ते पौगंडावस्थेपर्यंतच्या काळातला. ‘ऑर्डर ऑफ द फिनिक्स’ या पाचव्या पुस्तकात पंधरा वर्षांचा हॅरी पौगंडावस्थेत पोचलेला आहे. पुस्तकाचा बराच भाग तो आपल्या विरोधकांवर आणि मित्रांवरही रागावलेला आहे. त्याला आपले वडील ‘आदर्श’ नव्हते, तर इतरांची छळणूक करणारे होते, हे नुकतेच समजलेले आहे. आपल्या मुख्य शत्रूशी, लॉर्ड व्हॉल्डेमॉर्टशी आपल्या मनाचा सांधा जुळलेला आहे, हे समजून त्याला व्हॉल्डेमॉर्टच्या दुष्कृत्यांना आपणही जबाबदार आहोत, असे वाटायला लागले आहे.
मानसोपचाराच्या भाषेत बोलायचे, तर डी कुटुंबातील हास्यास्पद व्यक्तिरेखांवर आपला राग लादून स्वतःचा भोळा चांगुलपणा टिकवताना आता त्याचा राग मित्रांवर बरसायला लागला आहे. हे वाढत्या वयाचे चित्र आहे का? खरे तर नाही. आजही दृष्टिकोन बालिशच आहे. प्रौढत्वाच्या उंबऱ्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या मनाला उजळणारे कोणतेही झरोके नाहीत. हॅरीची पहिली वहिली मैत्रिणीसोबतची ‘डेट’ कल्पना करवत नाही इतकी पुळचट आहे. त्यावेळचे संवाद एखाद्या आठ वर्षाच्या पोराला शोभतीलसे आहेत.
ऑडेन (W. H. Auden) आणि टॉल्कीन (J.R.R. Tolkein) ‘दुय्यम वि वे’ कल्पनेने घडवण्याच्या कौशल्यांचा उल्लेख करतात. रॉलिंग्जचे विश्व ‘दुय्यम दुय्यम’ आहे. चलाखीने बालवाङ्मयातील प्रतिमा जोडून बनवलेली ती गोधडी आहे. शाळकरी हॉकी मॅचेसपासून स्टार वॉर्स आणि अनेकानेक बालकथांमधल्या कल्पना इथे भेटतात. टोनी मॉरिसनने (‘नोबेल’ साहित्यिक) म्हटले होते की घासून गुळगुळीत झालेल्या वाक्प्रचारांना व कल्पनांना टिकाऊपण मिळते, कारण त्यांच्यात सत्यांश असतो. उसन्या कथानात्मक ‘घिश्यापिट्या’ कल्पना मुलांसाठी लिहिताना उपयोगी ठरतात, कारण त्या मुलांच्या कल्पनाशक्तीच्या आटोक्यात असतात आणि मुलांना सुपरिचित असतात. रॉलिंग्जच्या दुय्यम विश्वाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की ते आजच्या जगासोबत जगते. परीकथा आणि मिथ्यकथांमधली जादू ही मानवेतर सजीव प्राण्यांबाबतची, झाडा-प्राण्यांबद्दलची असते. बहुतेक परीकथांमध्ये यंत्रे नसतात. रॉलिंग्जचे जादूगार ही यंत्रे टाळून जादू वापरतात—-पण त्यांचे विश्व हे वास्तव विश्वाचे व्यंग्यचित्र आहे. त्यात रेल्वेगाड्या, वृत्तपत्रे, इस्पितळे आणि क्रीडास्पर्धा आहेत. नंतरनंतरच्या पुस्तकांमधला बराचसा दुष्टावा वृत्तपत्रातल्या ‘कुजबुज’ वार्ताहरांमुळे घडतो. त्यातून हॅरी ही एक शंकास्पद कारणांसाठी गाजणारी व्यक्ती बनते—-आजच्या जगात याला ‘नायक’ म्हणतात. व्हॉल्डेमॉर्टचे कारभार वगळता इतर सारा दुष्टावा शालेय व्यवहारात नोकरशाहीने ढवळाढवळ करण्यातून घडतो. रॉलिंग्जची जादुई दुनिया देव-स्पर्शी व्यवहाराबाबत नाही—-ती आहे दूरदर्शन वाहिन्यांवरील कार्टून्स, मालिका, ‘सत्यदर्शन’ आणि प्रसिद्ध व्यक्तींबद्दलच्या कुजबुजी-बद्दल– –फक्त व्यक्तिात’ पातळीवरची दुनिया आहे, ही. सारे काही फक्त हॅरी आणि त्याच्या मित्रांना मारक किंवा तारक आहे, त्यापलिकडचे नाही. त्यामुळे या सवयीच्या, विनोदी, ‘हव्या तेवढ्याच’ भीतिदायक गोष्टी मुलांना सक्षम असण्याचा, नेहमीच्या जगातून सूट मिळण्याचा अनुभव देणाऱ्या आहेत, एवढेच.
जॉर्जेट हेयर एकेकाळी स्त्री-पुरुष संबंधांना असे माणसाळवून मृत्यूला झाकत असे. आज ही पुस्तके बालपणातल्या भीतीला शमवतात. या पातळीवर ती चांगली पुस्तके आहेत. पण प्रौढ माणसांना ही ‘इनोदी’, सुप्ततेच्या वयासाठीची पुस्तके का आवडावी? मला वाटते की ओळखीने, सवयीने येणारे समाधान इथे आश्वस्त करते. बालपणातील पुस्तकांचे वाचन प्रौढांना नेहमीच सुखावते. बीबीसीने मध्ये शंभर सर्वात जास्त वाचल्या जाणाऱ्या पुस्तकांबाबतचे सर्वेक्षण केले—-त्यातली पंचविसाहून जास्त पुस्तके बालवाङ्मयातील होती. आपल्याला ‘मागे जाणे’ आवडते. मी स्वतः आजारी असताना पुन्हा टॉल्कीन वाचते याचे एक कारण म्हणजे, त्या पुस्तकांत लैगिकता मुळीच नसते, आणि हे मला सुखावते.
पण गेल्या काही थोर बालकथांमध्ये याला पूरक असे गांभीर्य असायचे. खरीखुरी गूढता, प्रचंड शक्ती आणि जंगलातील हिंस्र पशू असायचे. सूझन कूपरच्या पौगंडावस्थेतल्या जादुगाराला जेव्हा आपल्या जादुई शक्तींची जाणीव होते, तेव्हाच त्याला वैश्विक सुष्ट दुष्ट शक्तींच्या संघर्षाचीही जाणीव होते. त्या विश्वातले प्रत्येक झाड आणि प्रत्येक ढग अर्थपूर्ण गूढतेने लखलखीत होतात. अॅलन गार्नरच्या कथांमध्ये अमानुष लहानखुरे जीव माणसांची शिकार करतात. अशा लेखकांच्या कृती वाचताना आपण आपल्या मुळांकडे, आपल्या संस्कृतीच्या प्राचीन भागाकडे जातो आहोत, असे वाटते—-ज्या काळी अमानुष, अतिनैसर्गिक प्राण्यांमार्फत आपण आपल्या नियंत्रणापलिकडच्या विश्वा-बद्दल भल्याबुऱ्याचे निकष घडवले, अशा काळात. आपण जेव्हा असे मागे जातो तेव्हा आपण विश्वाबद्दलच्या. महत्त्वाच्या भावना गमावल्याबाबत हळहळत असतो. अर्सला के लेग्वींच्या जगात मानववंशशास्त्राशी ससंगत रूपातच जादू ही एक लक्षणीय क्षमता असते. रॉलिंग्जच्या जगात असे गमावलेल्या विश्वांशी कोणतेच नाते जुळत नाही. ते लहानसे विश्व आहे—-लेखिका सांगते, या कारणानेच ते धोकादायक वाटते. याअर्थी ती आपल्याच काळासाठी योग्य अशी जादू आहे. रॉलिंग्ज अशा पिढीसाठी लिहिते, की जिला खरी गूढता ना माहीत आहे, ना तिच्याशी घेणेदेणे आहे. ती शहरी जंगलांची प्रजा आहे, खऱ्या जंगलांची नाही. तिला खऱ्या जादूपासून कृत्रिम जादू सुटी करता येत नाही. आपल्या तुटपुंज्या कल्पनाशक्तीने कृत्रिम जादूला खरी करण्याचा प्रयत्न करणारी ही पिढी.
रॉलिंग्जचे काही प्रौढ वाचक पूर्वी एनिड ब्लायटनच्या एक-आयामी मुलांवर स्वतःच्या इच्छा-आकांक्षा कलम करत असत—– आज रॉलिंग्जच्या विश्वावर करतात. अनेक लोक तुम्हाला सांगतात, की ते खरे कधी पुस्तकांमधून जगलेलेच नाहीत, आणि यात अनेक साहित्याचे अभ्यासकही असतील. त्यांचे पुस्तकात जगण्याचे अनुभव बालवाङ्मया-सोबतच संपले. कधीकधी साहित्य शिकवले जाण्याने पुस्तकांमधून जगणे संपते, हे खिन्न करणारे आहे. पण आज सांस्कृतिक अभ्यासांचा आणि सुलभीकरणाचा काळ आहे. पूर्वी एनिड ब्लायटन आणि जॉर्जेट हेयरची समीक्षा होत नसे. आज आधिभौतिक बुद्धी वापरणाऱ्या, ऊर्जस्वल दुय्यम विश्वे घडवणाऱ्या टेरी पँचेटची समीक्षा होत नाही. उसन्या प्रतीकांऐवजी अनेकविध, बहुआयामी विडंबन तो करतो. पण आज खऱ्या नायकत्वाची जागा ‘गाजण्याने’ घेतली आहे. साहित्यिक गुणवत्तेची जागा वृत्तपत्री ‘टाईप’ ने घेतली आहे. हे अतिसुलभी-करण सांस्कृतिक अभ्यासांच्या नावाने होत आहे. आता ब्राँटे भगिनींची तुलना पोलकी फाडणाऱ्यांशी करणे . . . ‘चलता है।’ आज पुस्तकांना वाचक नव्हे, ‘ग्राहक’ असतात. यात गैर काही नाही . . . पण पण आपण कीट्सच्या ‘जादुई झरोके/घातक समुद्रांच्या फेसावर उघडणारे विमनस्क परीराज्यांमधले’ (magic casements, opening on the foam/of perilous seas, in fairy lands forlorn) यांना मुकलो आहोत.
झए. एस. बायँट ह्या कादंबरीकार लेखिकेच्या ‘हॅरी पॉटर अँड द अनईटेलिजंट अॅडल्ट’ या इंटरनेट लेखाचे हे भाषांतर.
याच अंकात एक भाषांतरच फक्त वाचून, मूळ पुस्तकांकडे न जाताच, ‘हॅरी पॉटर’ पुस्तकांमधील बीभत्सपणावर टीका करणारे एक पत्र आहे. एका संस्कृतीला गर्हणीय वाटणारी (उष्टे खाणे, इ.) बाब दुसऱ्या संस्कृतीला ‘मान्य’ असेल, हे न जाणवता लिहिलेले ते पत्र आहे. मुळात जादू, चेटूक, या बाबी युरोपीय संस्कृतीत आज ख्रिस्तपूर्व धर्माचे अवशेष मानल्या जातात. मराठीत हडळ, भूत, चेटूक, या शब्दांभोवती असणारे अभद्रतेचे वलय आज युरोपीय दृष्टिकोनात नाही. ते तसे आहे, असे मानून टीका करणे गैर. त्या मानाने बायँटची टीका योग्य —- पण तीही खरे तर विशिष्ट कलाकृतींवर नसून आजच्या व्यापारीकृत लघुतम साधारण विभाज्याच्या पातळीवर पोचलेल्या समाजमनावर आहे. —- खूपशी उच्चभ्रू चष्म्यातून केलेली. — संपादक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.