परस्परावलंबनाविषयी आणखी काही (३)

१०. (क) मोहनी : उपयोग्य वस्तूंची विपुलता निर्माण करूनसुद्धा समता आणणे शक्य आहे.
(ख) पंडित: अमेरिकेमध्ये सुद्धा हे शक्य झालेले नाही. तेव्हा किती विपुलता आणखी आणावयाची? मुळात समानता आणणे हेच चुकीचे ध्येय असू शकेल.
(ग) मोहनी: उपभोग्य वस्तूंची जोपर्यंत वाण असते तोपर्यंत स्पर्धा आणि तिच्या निमित्ताने होणारी हाणामारी कायम राहणार. म्हणून गरजेच्या वस्तूंचे पुरेसे (adequate-optimum) उत्पादन करणे आवश्यकच आहे. जोपर्यंत एकाला जेवावयाला मिळते आणि दुसऱ्याला काबाडकष्ट करूनही ते मिळत नाही. तोपर्यंत समतेच्या गोष्टी बोलणे फोल आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत अन्नधान्याचा उत्पादनाचे हुकमी तंत्र मानवाला उपलब्ध झालेले नव्हते. त्याचप्रमाणे कुटुंबनियोजनाच्या पद्धती माहीत झाल्या नव्हत्या तोपर्यंतही माल्थसचा सिद्धान्त खरा ठरण्याची भीती लोकांच्या मनांत कायम होती. अंदाजे एकाच सुमाराला जन्माचे प्रमाण घटविणे, तांत्रिक प्रगतीच्या साह्याने अन्नधान्यांच्या उत्पादनामध्ये हुकमी वाढ करणे आणि प्रतिजैविकांच्या साह्याने रोगांवर मात करून पर्यायाने आयुमान वाढविणे ह्या तीन गोष्टी मानवाला साध्य झाल्या. त्या आज उपलब्ध झाल्यामुळेच मी समतेच्या गोष्टी बोल शकत आहे: आज माझ्या शब्दांना थोडेतरी वजन आले आहे असे मला वाटते. एकोणिसाव्या शतकापर्यंत तर त्या वायफळ गप्पाच होत्या. आज एकविसाव्या शतकाच्या आरंभी समता आणण्याचा प्रश्न निर्मितीच्या क्षेत्रातून आम्हाला वाटपाच्या क्षेत्रात ओढून आणावा लागणार आहे. तसा तो आता आणता येऊ शकेल. पूर्वीच्या मर्यादांकडे (constraints) समता आणण्याच्या मार्गातील अडथळ्यांकडे आज आम्ही पूर्ण दुर्लक्ष करू शकू अशी स्थिती आहे असे मला स्पष्टपणे जाणवते.
उत्पादनाची विपुलता फक्त अन्नधान्याच्या बाबतीत हवी. तेवढे मिळाले की आणि तेवढे प्रत्येकाला अल्पप्रयत्नाने मिळणारच असा विश्वास प्रत्येकाच्या मनात निर्माण झाल्यासच आपल्या सर्वांच्या मनात अजूनपर्यंत उपबोधाच्या पातळीवर (subconcious level) वर जिवंत असलेली उद्याची भ्रांत नष्ट झाली तरच आपल्या कार्यपद्धतीचा पाया स्पर्धेऐवजी सहकार्यावर रचणे शक्य होईल. वस्त्रे, निवारा आणि इतर उपभोग्य वस्तू निर्माण करण्याच्या बाबतींत आणि नंतर आपले सर्वांचे मिळून जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही पूर्ण परस्पर-सहकार्य करू शकू अशी मला खात्री आहे. पण त्यासाठी आम्हाला आमचा दैन्यदारिद्र्याचा इतिहास विसरावा लागेल. आमच्या मनांना पूर्वसंस्कारमुक्त करावे लागेल. येथेच आमची शिक्षणपद्धती कसोटीला लागणार आहे. एक विचार असाही डोकावून जातो की देवावरचा विश्वास ढळल्यास दैवावरचाही कमी होईल. विषमता दैवजात आहे असे न वाटल्यामुळे ती दूर करणे सोपे होईल. समता आणणे हे ध्येय चुकीचे आहे असे मला मुळीच वाटत नाही. समतेमध्ये विविधता कायम ठेवता येईल आणि एकूण मानवजातीचे जीवन अधिक सुखी आणि समृद्ध करता येईल ह्याविषयी शंका बाळगण्याचे कारण नाही. आमचा देश (पुढेमागे जग) आमचा सर्वांचा आहे, ते एक कुटुंब आहे, एका संयुक्त कुटुंबामध्ये कमीजास्त क्षमतेचे लोक असेल तरी त्यांचे राहणीमान समान असते तसेच देशभरातल्या लोकांचे राहणीमान समान राहू शकेल.

११. (क) मोहनी: ऐपत वाढविण्यासाठी दोनतीन गोष्टी आवश्यक असतात. सरकार आपले असणे. सरकारला प्रजेविषयी आपलेपणा असणे आणि प्रारंभी नुकसान सोसून उत्पादन वाढते ठेवणे.
(ख) पंडित: कोणी? त्याचे infrastructure काय?
(ग) मोहनी: कोणी ह्या प्रश्नाचे उत्तर– सरकारने. सरकारला प्रजेविषयी आणि प्रजेला सरकारविषयी आपलेपणा वाटला की प्रजा आणि शासन ह्यांच्यामध्ये अद्वैत निर्माण होते. थोडक्यात सांगायचे झाले तर अशा अद्वैतामुळे आम्ही सारे स्वयंशासित होतो. पैशातल्या रूपामधले नुकसान सरकार सोसते तेव्हा ती तूट सगळी प्रजा स्वतःच भरून काढत असते. त्यासाठी वेगळ्या infrastructure ची गरज नाही. शासक आणि शासित ह्यांमधले अद्वैत आणि परस्परावलंबन ह्यांमध्ये फरक नाही. हे अद्वैत ज्याप्रमाणे शासक आणि शासित ह्यांच्या एकमेकांविषयी वाटणाऱ्या आपलेपणामुळे त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते तसेच ते उत्पादक (कारखानदार) आणि उपभोक्ता (ग्राहक) ह्यांमध्ये होऊ शकते; ते व्हावयाला पाहिजे. ते कसे होईल ह्याच्या पद्धती शोधावयाला लागतील.

१२. (क) मोहनी: गिरण्यांमध्ये तयार होणारा माल ग्राहकाने मागणी नोंदण्याच्या आधीच बहुधा तयार होतो. (उदा. चहा गिरण्यांनी ग्राहकाला याची मुद्दाम सवय लावली.) हा अगोदर तयार झालेल्या माल गिरण्या अथवा कंपन्या ग्राहकाच्या गळ्यांत बांधतात. असा माल ग्राहकाला फुकट मिळतो.
(ख) पंडित: फुकट कसा?
(ग) मोहनी: ज्यावेळी नैसर्गिक वस्तूवर प्रक्रिया करून कोणताही माल तयार होतो, तेव्हा तो दुसऱ्या माणसाच्या उपभोगासाठी-उपयोगासाठीच तयार होतो. चित्रकाराने स्वान्तः सुखाय एखादे चित्र काढले तरीदेखील ते पुढेमागे विकले जावे, इतरांनी बघून त्याची वाहवा करावी अशी इच्छा त्याच्या मनात वसत असते. गिरण्यांनी तयार केलेल्या वस्तू दुसऱ्यांपर्यंत पोचवाव्याच लागतात. त्यांच्या मोबदल्यात काहीही परत मिळाले नाही तरी देखील. ज्यावेळी प्रत्येकच क्षेत्रात वस्तूंचे भरमसाठ उत्पादन होते (उदा. सायकली, मनगटी घड्याळे, ट्रान्झिस्टर्स, रेडिओज वगैरे) त्यावेळी ह्या सर्व वस्तू ज्यांची पूर्वी ते विकत घेण्याची ऐपत नव्हती, अशांजवळ ही पोचतात आणि हा माल गिरण्यांमध्ये पडून राहू नये व ग्राहकांपर्यंत पोचावा यासाठी त्या कर्जाऊ अथवा हप्तेबंदीने, दिल्या जातात आणि ते कर्ज फेडता यावे यासाठी वेतनवाढ किंवा महागाई भत्ता दिला जातो. ___ एखाद्या कंपनीने (उदा. टेल्को किंवा टिस्को) आपल्या नोकरांना घरे बांधून दिली, आणि त्या घरांची किंमत हप्तेबंदीने त्यांच्याकडून वसूल करण्यासाठी त्यांना तेवढी वेतनवाढ दिली, तर ते घर ज्याप्रमाणे कंपनीच्या नोकरांना फुकट पडेल त्याच पद्धतीने इतरही क्षेत्रात हे सारे घडत असते! ह्या झपाट्याने निर्माण होणाऱ्या नवीन वस्तू ग्राहकाला विकत घेता याव्यात यासाठी आपण सारे एकमेकांना पैसेही वाढवून देत असतो! हे पैसे जेव्हा वाढवून दिले जातात, तेव्हा त्यासोबत व त्याप्रमाणात ग्राहकाला श्रम अधिक करावे लागत नाहीत. किंबहुना अजिबातच अधिक करावे लागत नाहीत. म्हणजेच पूर्वीइतक्याच श्रमात नवनवीन वस्तू त्यांच्या घरात दाखल होतात. याचाच अर्थ त्या त्यांना फुकट मिळतात असा होत नाही काय?
(अपूर्ण)

श्री. भ.पां. पाटणकर यांचे एक पत्र आले आहे. त्यातील एकेका मुद्द्यावर माझे म्हणणे विशद करून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यांचे एक वाक्य किंवा विधान त्यावर माझे विवेचन असा क्रम योजिला आहे.
१. (क) पैसा उभा करणे म्हणजे कर्ज घेणे आणि पैसा निर्माण करणे म्हणजे संपत्ती निर्माण करणे. कर्जफेड ही निव्वळ आकड्यांची देवाणघेवाण आहे.
(ख) मोहनींच्या लिखाणात पैसा हा शब्द एका निश्चित अर्थाने वापरला नाही. अर्थशास्त्रात पैसा हा शब्द केवळ क्रयशक्ती या अर्थाने वापरतात. मोहनींचा अर्थ अर्थशास्त्राला मान्य नाही. कर्जफेड ही केवळ देवाणघेवाण आहे हे विधान अर्थशास्त्रातही बसत नाही आणि व्यवहारातही बसत नाही. मोहनींनी जर कर्ज घेतले आणि त्यांनी ते न वटणाऱ्या चेकने केवळ आकड्यांनी फेडण्याचा प्रयत्न केला तर त्यांना घरातल्या भांड्याकुंड्यांनाही मुकावे लागेल.
(ग) मोहनी: मी पैसा हा शब्द थोड्या शिथिल अर्थाने वापरला हे खरे. पैसा हा शब्द कधी चलन म्हणून, कधी क्रयशक्ती म्हणून तर कधी संपत्ती म्हणून वापरला जातो तसा तो माझ्याकडूनही अनवधानाने वापरला गेला आहे. त्याबद्दल मी दिलगीर आहे.
पैशाचे अस्तित्व केवळ मानवी मनात आहे. हा मुद्दा मला प्रामुख्याने मांडावयाचा आहे. देवाचे अस्तित्व ज्याप्रमाणे आपल्या मनात असते त्याप्रमाणे पैशाचेही अस्तित्व मानवाच्या मनात असते. त्या पैशाचे बाह्यस्वरूप क्वचित भौतिक वस्तूंमध्ये दिसते. जेव्हा ती वस्तू विक्रीला काढलेली असेल आणि तिच्या मोबदल्यात दुसरी वस्तू द्यायला कोणी दुसरी व्यक्ती तयार असेल तर. कोणत्याही वस्तूला बाहेर मागणी नसेल तर तिची किंमत शून्य होय. सोने-रूपे काय किंवा हिरे-माणके काय; त्यांना जर मागणी नसेल तर त्यांची किंमत शून्यच. पैशाची हाव प्रत्येक माणसाला असते आणि ती कोणत्याही परिस्थितीत कमी होत नाही या गृहीतकावर आपले सगळे व्यवहार रचलेले आहेत. माझा प्रयत्न हे गृहीतक कसे बदलता येईल याची चर्चा करण्याचा आहे. त्यासाठी माणसाच्या गरजेच्या भौतिक वस्तूंचे वाटप आपणाला साध्य झाले तर पैसा आज जो आपल्या बोकांडी बसला आहे त्याला तिथून उतरवता येईल. अशी एक अत्यंत दूरची (remote) शक्यता मला वाटत असते. कर्जाच्या परतफेडीबद्दलचा मुद्दा अगोदर घेऊन पैसा उभा करणे किंवा पैसा निर्माण करणे याविषयीची चर्चा मागाहून करू. धनकोकडून ऋणको ज्यावेळी कर्ज घेतो त्यावेळी तो काय घेतो? तो रोख रक्कम घेतो. अथवा एखादी वस्तू घेतो पण त्याची फेड मात्र बहुधा पैशात करतो. ही फेड क्वचितप्रसंगी न केली तरी चालेल. धनकोला एवढ्या रकमेचे अपलेखन (writing off) करून दुसऱ्याला कर्जमुक्त करता येते. कर्जफेड करण्यासाठी आपल्या संपत्तीची विक्री करणे अर्थात आपली भांडीकुंडी गमावणे हा आणखी एक पर्याय आहे. हे श्रीयुत पाटणकरांनी माझ्या ध्यानात आणून दिले. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. परंतु मला असे म्हणायचे आहे की, कर्जफेड जर ऋणको आकड्यात करू शकला नाही तर धनको त्यासाठी त्याच्या मालमत्तेचा लिलाव करतो आणि जो त्याला चलन देईल, म्हणजेच कागदावर छापलेला आकडा देईल त्याच्या मालकीची ती भांडीकुंडी होतात. अखेरीस देवाणघेवाण आकड्यापर्यंत येऊन ठेपतेच. ऋणकोच्या भांड्याकुंड्यांना बाजारात अजिबात मागणी नसेल तर धनकोला काहीच करता येत नाही. ज्यावेळी त्याचे कर्ज आकड्यात फिटत नाही. त्यावेळी तो ऋणकोला शासन करतो. हे शासन ऋणकोला घराबाहेर काढून किंवा त्याला तुरुंगात डांबून केले जाते.
सांगण्याचा मुद्दा असा आहे की, कर्ज हे आकड्यात दिलेले असते व त्याची परतफेड धनकोला आकड्यातच हवी असते. त्यासाठी तो दुसऱ्याच्या मालमत्तेचा लिलाव करतो आणि आपले खाते बंद करतो. ऋणकोला तुरुंगात पाठवल्यामुळे त्याच्या खात्यावरची रक्कम भरून येत नाही. त्याला तेवढ्या रकमेचे अपलेखन करून जमा-किंवा नावे बरोबर करून घ्यावे लागतो. हा व्यवहार अखेरीस आकड्यातच पूर्ण होतो. एवढेच मला सांगायचे आहे.
भांडीकुंडी गमावण्याचे संबंध पैशाशी नसून खासगी मालकीशी आहे. एखाद्या शेतकऱ्याने बियाण्यासाठी काही धान्य कर्जाऊ घेतले आणि हंगामावर त्याची तिपटी चौपटीने परतफेड करण्याचे वचन दिले. त्याच्या दुर्दैवाने त्याला काही पिकलेच नाही. अशा परिस्थितीत सावकार त्याची भांडीकुंडी आणि गाडगी-मडकी घेऊन जाऊ शकतो. तेव्हा पैशांचा संबंध आकड्याशी आहे. हे माझे म्हणणे चुकीचे ठरते असे मला वाटत नाही. अर्थात त्या आकड्याला सर्वमान्यता हवी हे मी कधीच नाकारले नाही. माझा सगळा प्रयास पैशाची देवघेव करताना आपण केवळ आश्वासनांची देवघेव करतो. कुठल्याही मूल्यवान भौतिक वस्तूंची नाही. ज्यावेळी खोट्या नोटा चलनात वापरल्या जातात त्यावेळी आम्ही पोकळ आश्वासनांची देवाणघेवाण करीत असतो परंतु आमचे आर्थिक व्यवहार निर्वेधपणे पार पडतात. याउलट ज्यावेळी पर्यायी चलन (अनिल गोऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे) आम्ही वापरतो त्यावेळी त्या चलनाला सरकारी पाठिंबा नसला तरी एकमेकांचा पाठिंबा असतो. तो पाठिंबा कागदाच्या कपट्याला दिल्याशिवाय देखील म्हणजेच कोणत्याही आकड्यांची देवाणघेवाण केल्याशिवाय करता येईल कारण ही देवघेव फोल आहे, असे माझ्या मनात येत असते. असो.
२. (ख) पाटणकर: मोहनींचे म्हणणे वाचकांना समजत नसेल किंवा त्या म्हणण्यातून पोरकट चर्चा निर्माण होत असतील तर त्याचा दोष वाचकांकडे नाही. असे पाटणकर म्हणतात.
(ग) मोहनी: ह्या वाक्यामध्ये सर्वस्वी हा शब्द जास्तीचा घातल्यास मला त्यांचे म्हणणे मान्य आहे. मला सर्व वाचकांना समजेल असे लिहिणे अद्याप जमले नाही. माझे म्हणणे वाचकांना समजत नाही, त्याअर्थी ते चुकीचे आहे असे नाही. दोन्ही पक्षांनी त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. थोडे अवघड असले तरी समजून घेण्याची गरज आहे एवढेच मला या ठिकाणी सांगायचे आहे.

३. (ख) पाटणकर: मोहनींच्या विवेचनातील पुष्कळ विधाने बरोबर आहेत पण बरोबर असणे म्हणजे उपयोगी असणे नव्हे. मी जर असे विधान केले की, आम्ही कोणीही गुन्हा केला नाही तर पोलीस खाते बंद करता येईल आणि ती माणसे रस्ते बांधणीसाठी व वृक्षलागवडीसाठी वापरता येतील तर ते विधान असत्य आहे असे कोणी म्हणू शकणार नाही. (दि.य.देशपांडे यांनी निवाडा द्यावा) पण त्या विधानाचा उपयोग काय? मोहनींचे म्हणणे असे की, आम्ही सर्वांनी एकमेकांसाठी कामे केली तर. . . (समस्या सुटतील) विधान बरोबर आहे पण उपयोग काय? (उ.का.) एवढ्यापुरतीच ही उपमा आहे. अशा आंशिक उपमा काव्यशास्त्राला मान्य आहेत.
(ग) मोहनी: मोहनी जेव्हा बरोबर विधाने करतात तेव्हा ती उपयुक्त (सद्यःफलदायी) पडण्याची जबाबदारी ते एकटे घेत नसतात. आज त्यांची विधाने बरोबर आहेत की, चूक आहेत एवढेच ते आपल्या वाचकांना विचारत आहेत. मोहनींनी केलेली विधाने उपयोगी ठरतील यासाठी काय करावे ह्याची चर्चा करण्याच्या अगोदर थोडेसे विषयांतर करू. एवढेच म्हणतो की, मोहनींचे विधान असत्य आहे असे कोणी म्हणू शकणार नाही. या वाक्यातील असत्य या शब्दाऐवजी चुकीचे हा शब्द वापरणे योग्य होईल असे दि.य. देशपांडे सांगतात. पाटणकरांनी असत्य हा शब्द चुकीच्या अर्थाने वापरला आहे.
कोणतेही विधान एकाच वेळी बरोबर आणि उपयोगी नसते. हे बरोबर विधान उपयोगी पडण्यासाठी पुष्कळदा एकाची बुद्धी पुरेशी नसते, अनेकांना आपली कल्पकता लढवून बरोबर विधाने उपयोगी कशी पडतील याविषयीच्या सूचना कराव्या लागतात. ज्याला समाजसुधारणा घडवून आणण्याची इच्छा आहे त्याला सतत उपयोगी पडून बरोबरच्या दिशेने आपली वाटचाल ठेवावी लागते. नुसते उपयोगी जे असेल तेच करत राहिल्यास सुधारणा घडवून आणता येतील असे वाटत नाही. त्याचा परिणाम उलट होण्याचाही संभव असतो. भाजपाला रामजन्मभूमीचा मुद्दा आणि गुजरातेतील हिंसाचार उपयोगी पडला, पण त्यांचे तसे करणे बरोबर नव्हते. आज तरी बरोबर काय हे ठरविणे एवढाच मोहनींचा हे लेख लिहिण्यामागचा हेतू आहे. समाज आज ज्या स्थितीमध्ये आहे ते लक्षात घेऊन जर आपल्या समाजसुधारणेच्या योजना आखल्या तर काहीच परिवर्तन होऊ शकणार नाही असे वाटते. आज आमचा समाज लाचखाऊ आहे. त्याला गावातल्या पाणीपुरवठ्याच्या योजना नीट राबवता येत नाहीत. म्युनिसिपालिटीच्या प्राथमिक शाळांपासून थेट पीएच. डी. पर्यंतचे शिक्षण पोकळ आहे. हे जाणून आणि त्याची ती स्थिती आम्ही गृहीत धरून चाललो तर कोणत्याही शिक्षणविषयक सुधारणा सुचवण्याला अर्थ काय? तेव्हा नवीन सूचना करता काही ना काही आदर्शवाद त्यात येणारच आणि आजवर जे घडले नाही ते घडवण्याची इच्छा त्यात व्यक्त होणारच. असे मला तरी आज वाटते.

४. (ख) पाटणकर: संपन्नता ही परस्परावलंबित्वाने येते असे मोहनीच म्हणतात. आज जगात परस्परावलंबित्वाच्या ज्या लांबच लांब साखळ्या तयार झाल्या आहेत त्यात मूळ उत्पादकांचा परस्परांशी साक्षात व्यवहार होतच नाही तो पैशाच्याद्वारे होतो. भलेही तो पैसा म्हणजे अनिल गोरे यांनी दाखवून दिलेले पर्यायी चलन असेल. मोहनी यांना परस्परावलंबित्व स्वीकारायचे असेल तर त्यांनी पैसा ही वस्तू आणि तिची शिस्त स्वीकारली पाहिजे. अन्यथा त्यांनी स्वावलंबनाचा प्रचार करावा आणि मग ते स्वावलंबन लोकांमध्ये घडवून आणण्याची जबाबदारी सरकारवर टाकू नये.
(ग) मोहनी: स्वावलंबनासाठी पैशाची गरज नाही किंवा पैसा नको असेल तर स्वावलंबन करावे हे सांगण्यात नवे काहीच नाही. हे सारे पूर्वी घडून चुकले आहे. आमची बलुतेदारीची मर्यादा अशी आहे की, तिचा स्वीकार केल्यास कोणालाही पंचक्रोशीच्या बाहेर जाता येणार नाही. त्यामुळे स्वावलंबी समाजात शस्त्रास्त्र तर सोडाच कंदील किंवा सायकलसुद्धा निर्माण होऊ शकत नाही. आमच्या समाजाने काही दिवस ह्या वस्तू परदेशातून आणून आपला कार्यभार चालवला. इतकेच नाही तर आपण कापडदेखील परदेशांतून आणत होतो हे आपणास ठाऊक आहे. पण हे परावलंबन आहे. ज्याप्रकारच्या परस्परावलंबनाची स्वप्ने मी पाहतो. ते आजच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी घडविलेल्या परस्परावलंबनापेक्षा अगदी वेगळे आहे. आजच ज्या प्रकारचे उत्पादन आणि उत्पादित मालाचे [ मिळवण्याची प्रेरणा आहे. कोणत्याही व्यवहारापासन नफा मिळवण्यासाठी निर्माता आणि उपभोक्ता असे द्वैत असावे लागते. आणि निर्मात्याने आपल्या मालाच्या किमती सतत वाढवत न्यायच्या, त्यासाठी लांड्या-लबाड्या करायच्या. समाजाच्या गरजेपेक्षा माल कमी कसा निर्माण होईल अथवा मालाची मागणी वाढती कशी राहील ह्याकडे लक्ष ठेवून पुन्हा लांड्या-लबाड्या करायच्या. ते न साधल्यास मालाची किंमत स्थिर ठेवून खर्च कमी करायचे. त्यासाठी बेकारी वाढवायची. एकूणच एकमेकांवर अन्याय करायचा असे धोरण अवलंबावे लागते आणि त्यामुळे या जगातील दुःख वाढत जाते. एका बाजूला वस्तूंची विपुलता होत जाते आणि दुसऱ्या बाजूला त्या प्रत्येकापर्यंत पोहोचणार नाही अशी खबरदारी घ्यायची असल्यामुळे त्यांच्या निर्मितीत, हात आखडता घ्यावयाचा आणि मागणीपेक्षा पुरवठा कमी कसा राहील याची विवंचना करावी लागते. परिणामी अधिकाधिक पैसा आणि नफा ह्या दोन प्रलोभनांमळे आमच्या एकण दःखात विलक्षण भर पडली आहे. आणि पर्यायी व्यवस्था आम्हाला सचत नाही वा कुणी सुचवलेली आम्ही सगळे मिळून स्वीकारत नाही तोपर्यंत सद्यःस्थिती कायम राहील. समाजाची उभारणी कोणत्याही तत्त्वावर करता येते. समाज-उभारणीसाठी कोणताही एक धर्मच लागतो असे नाही. समाज-उभारणीची तत्त्वे जितकी अशुद्ध तितके त्या समाजातील दुःख जास्त. जितकी समाजधारणेमागची तत्त्वे शुद्ध तितकेच समाजामध्ये दुःख कमी.
येथे एक उदाहरण देण्याचा मोह आवरत नाही. बाजारात सोन्याच्या खरेदीचा आणि विक्रीचा भाव एकच असतो. प्रत्येक सोनाराने शुद्ध सोने विकत घेताना जो भाव दिला त्याच भावाने शुद्ध सोने त्याला विकावे लागते. हा त्याच्यावर प्रचंड अन्याय आहे. अन्यायाचा विचार मागाहून करू. पण परिणाम असा होतो की, दिवसाला दहा-वीस किलो सोने घेतले आणि विकले तरी त्याला त्या व्यवहारात एक पैसाही मिळत नाही. त्याचा सचोटीने उदरनिर्वाहच होऊ शकत नाही. अशा वेळी त्याला खोटे बोलावेच लागते. जे शुद्ध सोने असेल त्यात भेसळ आहे असे सांगून शुद्ध सोन्याला भाव वाजवीपेक्षा कमी देणे, विकताना भेसळ केलेला माल शुद्ध म्हणून विकणे असे केल्याशिवाय म्हणजे गि-हाईकावर अन्याय केल्याशिवाय त्याला पोट भरणे शक्य नाही आणि आपली साऱ्यांची अन्यायजन्य दुःखातून सुटका नाही.
(अपूर्ण)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.