स्त्री-पुरुष संबंध

मानवजातीची दोन अंगे म्हणजे स्त्री आणि पुरुष. एकाच नाण्याच्या दोन बाजू. दोघांचीही संख्या जवळपास सारखीच आहे. मानववंशाच्या सातत्यासाठी आणि एकूण जगण्यासाठी दोघांची आवश्यकता एकाच मापाची आहे. माणसाच्या ह्या दोन जातींची शरीरे एकमेकांना पूरक आहेत. असे सर्व असूनही ते समान पातळीवर आहेत असे कुणीही म्हणू शकणार नाही. खरे तर कुठल्याही दोन व्यक्ती दीर्घ कालपर्यंत सतत एकत्र आल्या, एकत्र काम करत असल्या की त्यांच्यात सम पातळी राहणे कठीण असते. एक मालक, दुसरा नोकर, एक वरिष्ठ दुसरा कनिष्ठ, एक नेता दुसरा अनुयायी एक Robinson Crusoe आणि दुसरा Friday असा भेद कळत नकळत थोड्याफार प्रमाणात होणे अपरिहार्य असते. परंतु जगाच्या इतिहासाचा प्रारंभापासून आढावा घेतला तर समस्त स्त्रीजातीला सातत्याने आणि सर्वत्र नेहमीच दुय्यम स्थान मिळत आलेले आहे. कुठल्या देशात आणि कुठल्याही काळात स्त्री-पुरुष समानता असल्याचे अपवादानेसुद्धा उदाहरण नाही. एखाद्या समाजात पुरुषापेक्षा स्त्रीचे स्थान वरचे आहे असे म्हणणे वदतोव्याघातच ठरावा अशी एकूण परिस्थिती आहे.
डॉ. अश्विनी धोंगडे ह्यांनी आपल्या स्त्रीपुरुषसंबंध ह्या पुस्तकात महाराष्ट्राच्या संदर्भात गेल्या शंभर दीडशे वर्षांच्या कालावधीतील स्त्रीपुरुषसंबंधाचा आढावा घेतला आहे. स्त्रीमुक्तीचे वारे वाहू लागल्यावर सर्व सामाजिक संदर्भाकडे त्या दृष्टिकोनातून बघितले जाणे ही अगदी साहजिक अशी गोष्ट आहे. आपल्या देशात स्त्रीवर होत असलेले व झालेले अन्याय नीटपणे जाणून घेण्यासाठी सर्व संदर्भात ह्या संबंधाचा विचार व्हायलाच हवा. बऱ्याच गोष्टी आपल्या नित्यपरिचयाच्या असल्याने इतक्या अंगवळणी पडल्या असतात की त्या अन्यायकारक असूनही स्त्रियांनासुद्धा त्यांत काहीच वावगे वाटत नाही. अशा वेळी जनमानसाला चेतवण्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न व्हायला हवेतच. त्या दृष्टीने ह्या पुस्तकाचे महत्त्व आहे.
आपली भूमिका लेखिकेने प्रस्तावनेत स्पष्ट केली आहे. लिंगभेद (sex) हे नैसर्गिक असतात. पण लिंगभाव (gender) हे सामाजिक परिस्थितीने निर्माण होतात. ह्या लिंगभावाचे विश्लेषण हे मानवी विकासाचे साधन आहे. स्त्रीपुरुषांबद्दलचे वास्तव हे अशा प्रकारच्या लिखाणातून अधोरेखित होते. ह्या लिखाणाचा हेतू पुढील पिढीचे जीवन अधिक सौहार्द-पूर्ण व समजूतदार व्हावे, हा असावा. अशा प्रकारची जाणीव जागवण्याचा प्रयत्न म्हणून काही नव्या-जुन्या साहित्यकृतींचे स्त्रीवादी दृष्टिकोनातून त्यांनी मूल्यमापन केले आहे. लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा स्त्रीच्या प्रगतीला लागलेला हातभार ह्या-विषयी पण त्यांनी लिहिले आहे. मराठीतील लोकप्रिय संगीत प्रकार, भावगीते, ह्यांचा नव्याने वेध घेतला आहे. पुरुषांच्या साहित्यातले स्त्रीचे स्थान व त्यांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन ह्या-बरोबर स्त्रियांच्या साहित्यातल्या पुरुषचित्रणाचे विवेचन त्या करतात. त्याही पुढे जाऊन समाजात प्रचलित असणाऱ्या आचारांमधून त्यातील स्त्रीच्या स्थानाबद्दलचे विचार ‘अग ए आणि अरे’ ह्या लेखात मांडले आहेत. स्त्रीशिक्षणामुळे स्त्रियांचे सबलीकरण झाले की नाही, ह्या प्रश्नाचा ऊहापोहही आहे. आजच्या नव्या शतकात स्त्रीपुरुषांच्या स्थानांची तुलनाही त्यांनी नव्याने केली आहे. एकंदरीत स्त्रीपुरुषसंबंधाचा सर्व बाजूंनी स्त्रीवादी दृष्टिकोनातून माग घेण्याचा हा प्रयत्न आहे.
महाराष्ट्रात, किंबहुना भारतात स्त्रीसुधारणा करणारे अग्रणी सर्व पुरुषच होते. आगरकर, फुले, कर्वे वगैरे समाजसुधारकांना स्त्रीच्या परावलंबी, हतबल जीवनात बदल घडावा ह्याचा ध्यासच होता. भारताच्या स्त्रियांना सुरुवातीला सर्व गोष्टी आयत्या मिळत गेल्या. पुरुषांनीच त्यांच्यासाठी लढा दिला व त्यांच्या हक्कांकरता पुरुषांनीच खटपटी केल्या. त्यामुळे स्त्रियांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. मतदानाचा हक्क मिळाला. फुले, आगरकर, कर्वे, इत्यादी लोक कळवळ्याने हे कार्य करीत असताना तत्कालीन थोर पुढारी लोकमान्य टिळक ह्यांची मते मात्र बुरसटलेली होती. स्त्रियांची स्थिती सुधारावी असे त्यांनाही वाटत असले तरी परक्या सरकारने आपल्या लोकांच्या रीतीभातीत ढवळाढवळ करून संमति-वयाचा, सतीची चाल बंद करण्याचा वगैरे कायदे करावे हे त्यांना मंजूर नव्हते. स्त्रीचे समाजातील दुय्यम स्थान व तिची कर्तव्ये ह्याबद्दल त्यांच्या कल्पना पारंपरिक होत्या. काही गोष्टी त्यांच्या सहृदय अंतःकरणाला पटत असल्या तरी समाजमनाला धक्का देण्याची किंवा दुखवण्याची त्यांची तयारी नव्हती. पितृप्रधान संस्कृतीचे अध्वर्यु म्हणून श्रीमती धोंगडे त्यांची संभावना करतात. त्यांची भूमिका वेगळी असती आणि त्यांनी आगरकरांना साथ दिली असती तर आज स्त्री-सुधारणेचा इतिहास वेगळा—अधिक वेगवान—झाला असता, असे त्या म्हणतात. टिळकांचा लोकांवर जास्त प्रभाव असल्याने असे घडू शकले असते असे त्यांना वाटते. पण टिळकांना समाजाची नाडी बरोबर सापडली होती. त्यांनी असे काही केले असते तर मग ते कदाचित तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी झाले नसते. त्यामुळे हे विधान तितकेसे पटत नाही.
बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या स्त्रीला तिचे हक्क देण्यासाठी फारच मोठे योगदान दिले आहे. हिंदू कोड बिलाचा परिश्रमपूर्वक पाठपुरावा करून त्यांनी स्त्रीला न्याय मिळवून दिला. भारतीय परंपरेत स्त्रीचे स्थान अगदी निम्न आहे. तिचे शोषण जातिव्यवस्थे-द्वारे होते, हे त्यांनी लोकांसमोर आणले. स्वतः बौद्ध धर्म स्वीकारून स्त्रीविषयक जाणिवा त्यांनी स्पष्ट केल्या. त्या धर्मात स्त्रीपुरुषसमभाव आहे. तसेच एकपत्नीकत्वाचा कायदा, वारसा हक्क, घटस्फोट, पोटगी वगैरे स्त्रियांना अनुकूल बाबींना त्यांनी कायद्याचा आधार दिला. दलितांबरोबरीच्या स्थानावर असलेल्या स्त्रियांसाठीही त्यांनी तेवढ्याच कळकळीने व कळवळ्याने कार्य केले. परंतु कायदे झाले तरी समाजातल्या रूढी अजून तशाच टिकून आहेत, ह्याचे प्रत्यंतर आपल्याला वारंवार येत राहते. पितृप्रधान व्यवस्था अजूनपर्यंत तरी अबाधित आहे. सर्व जातिधर्मांना एकत्र आणणारे नेतृत्व जसे पुरुषांमध्ये आता आढळून येत नाही तसे स्त्रियांमध्ये ते तयारच झाले नाही. ह्याचे काय कारण असावे हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे.
जुन्या साहित्यकृतींची नव्या स्त्रीवादी दृष्टिकोनातून समीक्षा श्रीमती धोंगडे ह्या पुस्तकात करतात. समीक्षात्मक लिखाण म्हणून त्याची गुणवत्ता अपेक्षित अशी नसली तरी समाजात स्थित्यंतर होत असताना, जीवनाशी संबंधित अशा वाङ्मयात त्याचे प्रतिबिंब पडणे स्वाभाविकच असते. अशी समीक्षा झाल्याने समाजमनावरची जळमटे झटकली जातात व नव्या प्रवाहांकडे त्याचे लक्ष वेधले जाते. नवी दृष्टी प्राप्त होते आणि चांगले बदल घडून येण्याच्या प्रक्रियेस वेग यायला त्याची निश्चितपणे मदत होते. त्यामुळे स्त्रीवादी किंवा दलितवादी समीक्षा ही वाङ्मयीन घडामोडींची निकड ठरते.
आचार्य अत्र्यांची दोन नाटके लेखिकेने निवडली आहेत. ‘घराबाहेर’ व ‘उद्याचा संसार’. वरवर पाहता ह्यातल्या नायिका बंडखोर वाटतात व नाटके क्रांतिकारी—पण तो आभासच ठरतो. स्त्रियांच्या परवशतेबद्दल आणि त्यांच्या दयनीय अवस्थेबद्दल अत्र्यांना कळवळा असला तरी परंपरांची बंधने ते झुगारू शकत नाहीत. म्हणून त्यांच्या नायिका शेवटी मातृत्वभावनेचा आसरा घेऊन संसाराच्या बंधनात राहणेच पत्करतात. नाटककार व समाजसुधारक दोन्ही दृष्टीने अत्रे थिटे पडतात. शेवटी अत्र्यांचा मुख्य उद्देश हा लोक-रंजनाचा होता. समाजसुधारणेचा नव्हताच. त्यामुळे स्त्रिया, त्यांच्या समस्या व त्या समस्यांचे समाधान ह्या सर्व दृष्टीने पाहता त्यांची ही नाटके अतिशय दिखाऊ व खोटी वाटतात.
‘नारायण सुर्वे व ना.धों. महानोर ह्यांच्या कवितांमधील स्त्री’ हा एक चांगला लेख आहे. पारंपरिक कवींच्या मनात स्त्रीबद्दल एक भोगवस्तू हीच प्रतिमा असल्याचे ठळकपणे दिसते. तिच्या शरीराभोवतीच त्यांचे लक्ष केंद्रित झालेले असते. तिच्या मनाचा ठाव घेतानाही तो पुरुषी दृष्टिकोनातून घेतला जातो. पुरुषाच्या आधाराची, त्याच्या मीलनाची आस तिच्या मनात असते. कातर, हळुवार, नाजुक, त्याच्या वृक्षावर वेलीप्रमाणे असलेली, असहाय अशी तिची प्रतिमा पुरुष म्हणून त्याचे स्थान उंचीवर नेणारीच असते. महानोरांच्या काव्यातल्या स्त्रीप्रतिमा अशाच पूर्णतः शारीर असतात. स्त्रीपुरुषांचा शृंगार व त्यातून होणारी निर्मिती हा त्यांच्या स्फूर्तीचा विषय आहे. तिच्या इतर अवस्थांचा वेध ते घेत नाहीत. याउलट सुर्त्यांच्या कवितांतून स्त्री एक व्यक्ती म्हणून येते. तिचे अंतरंग त्यांना जास्त भावते. त्यामुळे त्यांच्या शृंगारिक कविता कमी आहेत. त्यांतला शृंगारही सम-पातळीवरचा आहे. त्यांच्या भाविवश्वातले स्त्रीचे स्थान केवळ रमणीचे नाही तर सहचारिणीचे आहे. त्यांच्या कवितेत स्त्री केवळ— फुलवाल्याकडील एक पुडी, एक कुडी, एक गुडिया नसते. ती हाडामांसाची सुखदुःख भोगणारी, झुंजणारी व्यक्ती असते.
हा स्त्रीवादी समीक्षात्मक लेख एका दिवाळी अंकात प्रसिद्ध झाल्यावर महानोरांनी नंतरच्या कवितांमध्ये स्त्रीचे चित्रण वेगळ्या अंगाने केले, असे धोंगडे म्हणतात. पूर्वीची रानातली तरुण बिनधास्त शृंगाररसात न्हालेली स्त्री आता स्त्रीजीवनाचे करुणामय रूप बनून येते. ‘तुझ्या कारुण्यगीताची, कधी सांगतो कहाणी’. पण इथेही त्यांचा दृष्टिकोन मात्र पारंपरिकच आहे. पूर्वी भोग देणारी स्त्री होती आता स्त्रीचे भोग आहेत एवढाच फरक. भोग आणि त्याग ह्या दोन बिंदूंमध्ये स्त्री फिरते. पण ह्या स्त्रीचे दुःख हृदयाला भिडणारे नाही. ह्या स्त्रिया पुरुषाचा आधार संपल्याने कोसळलेल्या आहेत.
कवितांचे असे रसग्रहण धोंगड्यांना स्वतःलाच कुठेतरी अप्रस्तुत वाटते. स्त्रीवादी दृष्टिकोनातून बघितल्याने कवितेचे कवितापण कदाचित हरवत असेलही. पण शेवटी साहित्याला समाजाशी फटकून राहता येत नाही. ते समाजातून येते व समाजासाठीच असते. म्हणून नीति-अनीतीचे मोजमाप साहित्यासाठी अनिवार्य असते, असे त्या म्हणतात. जर साहित्य नैतिकदृष्ट्या उच्च दर्जाचे असेल तर त्यातली वाङ्मयीन मूल्येही उच्च आहेत असे म्हणता येईल का, हा प्रश्न समोर येतो. सामाजिक नैतिकता आणि वाङ्मयीन नैतिकता ह्या दोन पूर्णतः वेगळ्या गोष्टी आहेत. साहित्य वाङ्मयीन कसोट्यांवर श्रेष्ठ असेल तर तत्कालीन नैतिकतेचे मुद्दे वगैरे गोष्टी तिथे गैरलागू असतात. ह्या सर्व कवितां-मधून दिसणारी स्त्री व त्यावरून त्या कवींचा स्त्रीविषयक दृष्टिकोन काय आहे व स्त्री-वादाच्या दृष्टीने तो योग्य आहे की नाही, हे तपासणे अगदीच स्वीकरणीय आहे. पण त्यावरून कवितांचे वाङ्मयीन मूल्य ठरत नाही. सुर्वे कवी म्हणून श्रेष्ठ आहेत हे वादातीत. त्यांच्या कवितांमधले स्त्रीचे चित्रण त्यांच्यातल्या पुरुषाला निश्चितपणे थोरपणा देणारे आहे. पण ह्याच कारणाने त्यांच्या कविता जास्त चांगल्या आहेत असा निष्कर्ष काढता येणार नाही.
पुरुषवादी कादंबरीचा स्त्रीवादी विचार म्हणून विजय तेंडुलकरांची कादंबरी एक धोंगड्यांनी विचारात घेतली आहे. हा लेख वाचल्यावर बरेच गोंधळायला झाले. ३-४ वर्षांपूर्वी ही कादंबरी वाचली तेव्हा तेंडुलकरांनी स्त्री-पुरुषसंबंधांचा एका विशिष्ट दृष्टिकोनातून घेतलेला वेध असे काहीसे वाटले होते. एक पुरुषी वृत्तीचा सामान्य पुरुष जन्मभर पत्नीबरोबर राहतो. घरात त्याची मुलगीही असते. पण आयुष्यात उशिरा जेव्हा तो स्त्रीचा शोध घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा तिच्या शरीरापलीकडे तो जाऊ शकत नाही. ह्या त्याच्या शोधयात्रेत ह्या अडथळ्यामुळे त्याची किती अधोगती होत जाते आणि स्त्री कशी त्याला हाती लागतच नाही, त्याच्या संकुचित आत्ममग्नतेमुळे आपल्या पत्नीचीच ओळख त्याला पटत नाही, असा ह्या कादंबरीचा विषय आहे. ह्यातला ‘मी’ म्हणजे लेखकाचे मुखपत्र आहे असा धोंगड्यांनी केलेला आरोप धक्कादायक वाटतो. काहीसा बालिशही वाटतो. वाङमयीनदृष्ट्याही कादंबरी कुठल्या स्तरावर आहे हा पूर्णतः वेगळाच विषय आहे. पण त्यातल्या थीम (द्यण्ड्डड्ड) चे असे अर्थबोधन झाल्याने ह्या कादंबरीला एक वेगळेच रूप आले आहे. Sex आणि स्त्रीपुरुष संबंध त्याचे तेंडुलकरांचे आकर्षण संपलेले नाही असे धोंगडे म्हणतात. ते संपण्यासारखे आहे का? एखाद्या लेखकाला ह्या विषयाचे आकर्षण असेल तर त्यामुळे त्याचे साहित्य कमी दर्जाचे होऊ शकत नाही. ह्या विषयाला इतर मानवी संबंधांसारखीच बहुआयामी परिमाणे आहेत व त्यांचा वेध घेणे हे एखाद्या लेखकाचे जन्मभराचे काम होऊ शकते. स्त्रीवादी दृष्टिकोनातूनही केवळ ह्या कारणाने त्यांच्या वाङ्मयाचे महत्त्व कमी होऊ शकत नाही. खरे तर हा स्त्रीवादी दृष्टिकोनच नाही.
ह्यातील protagonist ‘मी’ व विजय तेंडुलकर ह्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन एकच आहे, असे ठाम विधान लेखिका करते. हे पटणारे नाही. ‘मी’ चे चित्र असे आहे की त्याची कीव वाटू लागते, तिरस्कार वाटतो असे त्या म्हणतात. हाच तर तेंडुलकरांचा उद्देश आहे. जो पुरुष स्त्रीचा सर्वार्थाने विचार करू शकत नाही तो असाच असणार. हे चित्रण त्यांचे स्वतःचे नाही की ‘मी’चे समर्थनही ते करत नाहीत. पुरुष शरीरापलीकडे जाऊन स्त्रीला बघू शकत नाही तेव्हा तो स्वतः हुशार, स्वार्थी, कातडीबचाऊ, पळपुटा, संधीसाधू, नीच, क्षुद्र मनाचा केवळ ‘नर’ ठरतो—हेच त्यांना सांगायचे आहे. ‘मी’ म्हणजे पुरुषाचा प्रातिनिधिक नमुना आहे. पण ह्याचा अर्थ समाजातील सर्वच पुरुष असे असतात असा नाही. त्यातला मी—मुखवट्याखालचा पुरुष. आस्वाद घेताना विषाद वाटण्याइतका ‘मी’चा प्रवास होतो. एकेका स्त्रीच्या देहाशी जवळीक करत असता ‘मी’ला स्वतःची अधिकाधिक ओळख पटत जाते. पण स्त्रीची ओळख होत नाही. त्याच्या पत्नीच्या आयुष्यातही पूर्वी काहीतरी प्रकरण घडले होते असे त्याला कळते. हे तेंडुलकर केवळ धक्का देण्या-साठी करतात, असे धोंगडे म्हणतात. कारण तेंडुलकरांना असे धक्के आवडतात. आपल्याला पटू शकत नाही. ‘मी’ला ती—म्हणजे त्याची पत्नी शेवटपर्यंत कळलेलीच नाही, हेच तर महत्त्वाचे आहे. शिवाय जन्मभर एकत्र राहूनही बायकोची ओळख न पटणारे पुरुष काही अल्पसंख्यक नसतात.
स्त्रीवादी दृष्टिकोन घेतल्याने एखादी साहित्यकृती समजण्यातच असा अडथळा निर्माण होतो, असे हा लेख वाचल्यावर जाणवते. म्हणजे आस्वादक किंवा समीक्षक आपल्या भूमिकेच्या इतका आहारी जातो की त्याच्या डोळ्यांवर पडदा पडतो किंवा रंगीत चष्मा चढतो म्हणा. आणि मग ती समीक्षा राहत नाही. अश्लीलता-विरोधकाने एखाद्या पुस्तकातले केवळ असभ्य शब्द गोळा करावे व त्याच्या आशयाकडे पूर्ण दुर्लक्ष व्हावे, तसा हा प्रकार आहे. तेंडुलकरांची ही कादंबरी फार श्रेष्ठ आहे असे नाही. पण लेखिकेचे विवेचन चुकीचे वाटते. शेवटी त्या म्हणतात ‘स्त्री म्हणून ही कादंबरी वाचताना हाती काय लागते?’ पण स्त्री म्हणून कशाला वाचायची? पुरुषही स्त्रीवादी दृष्टिकोनातून वाचू शकतो. अट्टाहासाने स्त्री म्हणूनच वाचली तर हाती काहीच लागणार नाही. हेही खरेच!
‘स्त्रियांच्या साहित्यातले पुरुष’ हे विवेचन करताना धोंगड्यांचा मुख्य प्रश्न असतो स्त्रिया पुरुषांच्या वर्चस्वाला आव्हान देतात की ते मुकाट्याने स्वीकारतात, हा. त्या दृष्टिकोनातून त्यांनी निवडलेल्या लेखिका ह्या स्त्रीवादी आहेत. विभावरी शिरूरकर, गौरी देशपांडे. सानिया. मेघना पेठे. ह्यांचा विचार त्या करतात. शिरूरकरांच्या साहित्यात पुरुष व्यक्ती म्हणून फारसा येत नाही. पण समाजचौकटीचा तो कणा आहे. त्याने निर्माण केलेल्या रूढिबंधनांच्या सापळ्यातून सुटून स्त्री आपल्या माणूसपणाचा शोध घेऊ बघते आहे. ह्या सर्व लेखिकांच्या समाजाभिमुख लिखाणाचा उद्देशच स्त्रीविमोचन असल्याने त्यांच्या नायिका त्यांचीच भाषा बोलतात. मनाचा ठाव घेणाऱ्या कथा त्यांच्या तळमळीतून येतात. पुरुषांची ठसठशीत चित्रे दिसत नाहीत. गौरी देशपांड्यांचे पुरुष तर एकच मिती असलेले असतात. विभावरींना स्त्रीबद्दल कळवळा जास्त आहे तर गौरी, सानिया आदींना स्वातंत्र्याची आच जास्त आहे. मेघना पेठ्यांच्या साहित्यात पुरुषांची शारीरिक वर्णने ठळकपणे येतात. धोंगड्यांना ती फार ‘पारंपरिक’ वाटतात. म्हणजे बलदंड, पिळदार पुरुष वगैरे. शारीरिक वर्णने देणे वा न देणे ही प्रत्येक लेखकाची स्वतःची अशी गरज असते. त्याला स्त्रीवादी वगैरे मथळे देता येणार नाहीत.
एकंदरीत लेखिकांच्या लिखाणात येणारे पुरुषचित्रण फार मर्यादित असते. नवरा त्या भूमिकेत पुरुष जास्त वेळा येतो. पण वडील, मित्र, किशोरवयीन मुले, आजोबा, दीर, सहकारी, श्रमिक, शेतकरी, कामगार वगैरे ह्यांचे चित्रण अभावानेच येते. पुरुषांच्या दृष्टिकोनातून कुठल्याही घटनेकडे पाहणे त्यांना जमत नाही. त्यांचे साहित्य स्त्रीकेंद्री असते. अनुभवात तोकडेपणा असतो. आपल्या क्षमतेविषयी त्यांनाच विश्वास वाटत नाही. पुरुषाच्या आधाराची गरज असणारी स्त्री, असे चित्रण जास्त दिसते. नात्यातल्या विविध स्तरांचा शोध घेणाऱ्या कथा स्त्रियांच्या साहित्यात कमी आढळतात, हे धोंगड्यांचे मत पटण्यासारखे आहे.
पु. ल. देशपांडे ह्यांच्या साहित्यातील स्त्रीचित्रण ह्यावर पूर्ण एक प्रकरणच आहे. पुलंच्या विनोदी वाङ्मयात स्त्री एक घन्द्रड्ड म्हणूनच येते. विनोदनिर्मितीसाठी काही मद्यदृड़त्र झवडडद्यद्म विनोदी साहित्यात सर्वसाधारणतः वापरले जातात. त्यात स्त्रीची म्हणून असलेली तथाकथित वैशिष्ट्ये असतात–तिचा बडबडेपणा, कुरूपता, लठ्ठपणा, स्त्रीबुद्धी वगैरे. पुलंच्या सर्वच विनोदी साहित्यात ह्यांचा विपुल वापर केलेला दिसून येतो. त्यांच्या व्यक्तिचित्रांमध्ये अभावानेच स्त्रीचित्रण केलेले आढळते. आत्मीयतेने व सहृदयतेने केलेले स्त्रीचित्रण त्यांच्या वाङ्मयात दिसत नाही. नंदा प्रधान, नारायण जसे मनाला चटका लावून हृदयात घर करतात तसे स्त्रीचित्रण त्यांच्या हातून झालेले नाही. उलट विनोदी चित्रणात तर स्त्रीचे फार विकृत रूप येते. धोंगडे म्हणतात त्याप्रमाणे हे विनोद पूर्णतः निरागस वाटत नाहीत. टिंगलटवाळी, कुजकटपणा, टर उडवण्याची वृत्ती, अतिशयोक्ति, विडंबन, स्त्रीचे अनैसर्गिक व असत्य चित्रणच त्यात जास्त दिसते. स्त्रीचे पारंपरिक रूप त्यांना जास्त भावते. स्त्रियांकडून संस्कृतिसंवर्धन, सौंदर्य, सेवावृत्ती, ह्यांच्या अपेक्षा ते करतात. परदेशातील स्त्रिया भारतीय संस्कृतीच्या विपरीत वागतात, त्याचा त्यांना मना-पासून राग येतो पण असेच वागणाऱ्या परदेशातील पुरुषांबद्दल ते जास्त बोलत नाहीत. मनाचा थांग न घेता पुलंच्या विनोदी साहित्याची मर्यादा म्हणजे त्यात येणारे स्त्रीचे चित्रण केवळ धन्द्रत्कृट आहे. पण पुलंसारखे यशस्वी लेखक नेहमी असे लिहितात तेव्हा कालांतराने ‘बायकी स्वभाव’ म्हणून अशी वैशिष्ट्ये जनमानसात स्थिरावतात व ह्या विरोधात पुरुष म्हणजे ह्या दोषांपासून मुक्त व म्हणून जास्त श्रेष्ठ असे समीकरण आपोआप तयार होते.
विनोद हा अधोगामी असतो. म्हणजे समाजरचनेत वरच्या थरावरचे लोक खालच्या स्तरातील लोकांवर विनोद करतात. म्हणून स्त्रिया व दलित ह्यांच्या वाङ्मयात विनोद अभावाने आढळतो.
स्त्रीपुरुष एकमेकांना कसे संबोधतात ह्यावरूनही यांचे समाजातील स्थान स्पष्ट होते, हे धोंगडे उदाहरणांनी दाखवून देतात. पूर्वी नवऱ्याचे नाव घेणे तर दूरच त्याचा उल्लेखही फार दूरान्वयाने होत असे. ‘पागोटे दिसत नाही’, ‘इकडून येणे झाले’, असे बोलण्याची पद्धत होती. आता हे चित्र खूपच पालटले आहे. स्त्रियांना शिक्षणाचे मार्ग मोकळे झाले आहेत. पण हे सर्व मुख्यतः शहरांमध्ये घडते. खेड्यांमध्ये, मागासलेल्या प्रांतांमध्ये वास्तव चित्र किती भयानक आहे, ह्याचे चित्रण ह्या पुस्तकात फारसे आलेले नाही. मूठभर पुस्तकी लोकांसाठी लिहिलेले हे पुस्तक आहे. त्याच्यात हाताळण्यात आलेल्या समस्या व त्यांचा घेतलेला आढावा अतिशय मर्यादित वाटतो. तळागाळातल्या स्त्रियांचा तर त्यात उल्लेखही येत नाही. दलित वाङ्मयात स्त्री कशी चित्रित केलेली आहे हे पाहणेही तेवढेच आवश्यक असावयास हवे असे वाटते.
स्त्रीमुक्तीविषयी विचार करताना एक मोठा प्रश्न मनासमोर येतो. आदिकाळापासून आजपर्यंत जगातल्या अर्ध्या लोकसंख्येवर जातिभेद किंवा लिंगभेद म्हण या—या भेदामळे दमन करणे शक्य झाले का? केवळ शारीरिक दुबळेपणामुळेच स्त्री अशी दयनीय होते, हे पटत नाही कारण स्त्रीपुरुषांचे अनेक स्तरांवर अनेक नात्यांनी एकमेकांशी संबंध असतात. स्त्री कितीही स्वतंत्र झाली तरी ती बलवान होतेच असे दिसत नाही. ह्याच्या मागचे खरेखरे कारण काय असावे? तिची मानसिकताच अशी स्त्रीला राजकीय सत्ता मिळाली तर ती खरी स्वतंत्र होईल असेही एक विधान ह्या पुस्तकात येते. ही सत्ता द्यायची कुणी? ‘देऊन’ मिळालेली सत्ता ह्या कामी येऊ शकेल का? शिवाय आज निदान आपल्या देशात तरी ज्या स्त्रियांजवळ निर्विवादपणे राजकीय सत्ता आलेली आहे त्यांचे कार्य पाहता अशा प्रकारचा आशावाद किती तकलादू आहे ह्याचीच जाणीव होते. अमेरिकेसारख्या प्रगत देशात स्त्रियांना इतके स्वातंत्र्य आहे; तसेच नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी, त्यांच्या मुलांसाठी भरपूर सुविधा आहेत; पाळणाघरे, डे-केअर सेंटर्स वगैरे. तरीही तिथल्या पुष्कळशा स्त्रिया आज नोकरी सोडून गृहिणी म्हणून राहणे पत्करतात. एका स्त्रीचे विधान फार बोलके वाटते. ती म्हणते – “नोकरीमध्ये मी कितीही वरच्या पदावर गेले तरी माझ्या म्हातारपणी मी एकटी असेन तेव्हा बोर्डरूमध्ये घेतलेले निर्णय, माझे यश, माझ्या फाइली ह्यांच्या आठवणी मला दिलासा देऊ शकणार नाहीत. माझी मुले–नातवंडे ह्यांचीच आठवण तेव्हा मला होईल.”—एखादा यशस्वी पुरुष अशा प्रकारे विचार करू शकेल हे संभवनीय वाटते का?
धोंगड्यांचे पुस्तक वाचल्यावर असे प्रश्न मनात येतात. हेच त्या पुस्तकाचे प्रयोजन ठरावे.
वैशाली अपार्टमेंटस्, ए-४०३, अमरावती रोड, टिळक नगर, नागपूर — ४४० ०१०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.