भारतीय समाजासाठी विज्ञान

सामाजिक स्थिती
सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन व त्यांचे सहकारी ड्रेझ व गझदार यांनी उत्तर प्रदेशातील परिस्थितीच्या मूल्यमापनाचा अहवाल सादर केला आहे. तेथील स्थितीचे वर्णन करताना त्यांनी काही धक्कादायक निष्कर्ष काढले आहेत. या राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण दर हजारी 160 आहे. (हेच प्रमाण अमेरिकेत केवळ 15 आहे.) अकाली मृत्युच्या बाबतीत या राज्याचा क्रमांक भारतात दुसरा आहे. गर्भवती स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाणही इतर राज्यांच्या तुलनेने फार आहे. गेल्या तीस वर्षात तळागाळातील लोक निकृष्ट जीवन जगत आहेत. राज्यातील बहुसंख्या लोकांना दारिद्र्याचे चटके बसत असले तरी काही जण मात्र ऐषारामाचे जीवन जगत आहेत. त्यांना आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यात संकोच वाटत नाही. दृष्य स्वरूपातील विषमता व दुःस्थिती यांची कारणे समाजरचनेत शोधायला हवी, असे ड्रेझ यांना वाटते. हा समाज विभागलेला आहे. प्रत्येक गटाच्या विशिष्ट रूढी, परंपरा आहेत. सामाजिक नीतिनियम आहेत. आखून दिलेल्या सीमारेषा ओलांडण्याचे धैर्य कुणाकडेही नाही. स्त्रियांची स्थिती तर फारच खालावलेली आहे. अनेक कुटुंबातील मुलींना शाळेत पाठवले जात नाही. कारण या मुलींना शिकवण्यासाठी त्यांना स्त्रीशिक्षिकाच हवी असते. पुरुष शिक्षकांवर त्यांचा विश्वास नाही. मुली शिकल्याशिवाय शिक्षिका कशा होणार हे न उलगडणारे कोडे आहे.
समाजातील उणीवांचे विश्लेषण करून नेमके काय चुकत आहे हे निदर्शनास आणणारी यंत्रणा अस्तित्त्वात नाही. पूर्ण समाज हजारो वर्षापूर्वीच्या रूढी-परंपरांचे ओझे घेऊन कसेबसे जीवन जगत आहे, असे वाटते. समाजातील सुशिक्षित व सुस्थितीतील वर्गाला इतरांशी देणे घेणे नाही. कदाचित इतरांना आहे त्याच स्थितीत ठेवण्यातच त्यांचा स्वार्थ आहे. तळागाळातील लोकांची, अस्पृश्यता, निरक्षरता, परिस्थितीशरणता यांचाच लाभ घेत हा वर्ग चैन व ऐषआरामाचे जीवन जगत आहे. त्यामुळे समाजसुधारक वा सामाजिक चळवळींची येथे कमतरता आहे. सर्व समाज जणु मनुस्मृतीच्या काळात वावरत आहे की काय, असे वाटू लागते. सधन लोक बाबर औरंगजेब यांच्या काळातील संरजामशाही जीवनपद्धती विसरण्यास तयार नाहीत. वर्तमान स्थिती विसरण्यातच हा समाज धन्यता मानत आहे.
या राज्यात अजूनही जातपातीचा पगडा आहे. क्षुल्लक कारणावरून जातीजातीत तेढ निर्माण होते. मारामाऱ्या होतात. पूर्ण समाजात विटाळ, शिवाशिविच्या अतिरेकी कल्पना आहेत. जातिभेद, लिंगभेद यासारख्या बुरसटलेल्या विचारांना खतपाणी घातले जाते. शिक्षणाबद्दल आस्था नाही. दलित वर्गात तर शिक्षणाबद्दल घृणा आहे. करण शिक्षित वर्गाची मनमानी व अमानुषता हा वर्ग पिढ्यानपिढ्या भोगत आला आहे. याचबरोबर शिक्षित-वर्गसुद्धा दलितांना शिक्षित होण्यास मज्जाव करतो. कारण हा वर्ग शिकून शहाणा होणे हे त्यांच्या हितसंबंधांना धक्का देणारे आहे. अशा प्रकारे समाजव्यवस्था मध्ययुगीन काळात वावरत आहे. परिवर्तन कमीजास्त प्रमाणात हीच स्थिती काही शहरी भाग वगळल्यास सर्व राज्यांत आहे. या स्थितीत मोठा बदल न झाल्यास एके दिवशी या समाजालासुद्धा आफ्रिकेतील टोळीसमाजासारखे निकृष्ट जीवन जगावे लागेल. वेळीच काही उपाय न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. समाजाच्या रचनेत आमूलाग्र परिवर्तन होण्याची गरज आहे. त्याची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे.
परंतु हे परिवर्तन कशा प्रकारचे हवे याबाबत मतभिन्नता आहे. काहींना आपल्या भारतीय परंपरेचे पुनरुत्थान करण्यात रस आहे. त्यासाठी ते कालचक्राचे काटे मागे फिरवू पाहत आहे. तथाकथित सुवर्णकाळाची आठवण करून देत लोकांची दिशाभूल करत आहेत. इतर काहींना प्रस्थापित व्यवस्थेत फार मोठे बदल न करता, आहे त्या स्थितीत राहणे पसंत आहे. काही लोकांचा बळी देऊन स्वतःची पोळी भाजून घेण्याचा विचार यामागे आहे. सुखसोई हव्यात, परंतु त्यासाठी आपण श्रम न करता! सत्तेच्या जोरावर किंवा शोषणातून उभ्या केलेल्या पैशांच्या जोरावर आयुष्य जगावे, ही मानसिकता यातून व्यक्त होते. काही विचारवंतांना मात्र हा समाज विवेकी झाल्याशिवाय सर्वजण सुखी व समाधानाने नांदू शकणार नाहीत असे वाटते. विवेकी समाजाची स्वप्ने पाहणाऱ्यांना समाजातील प्रत्येक व्यक्ती बुद्धिप्रामाण्यवादी, विचारी व वैज्ञानिक दृष्टी असलेली हवी असते. यासाठी समाजापर्यंत विज्ञान पोचवण्याची गरज आहे. असे त्यांना वाटते. आज जरी हे काम फार कठिण वाटत असले तरी अशाच विचारांचा विजय झालेला
आहे, याला इतिहास साक्षी आहे. प्रगत समाज व विज्ञान आधुनिक जगातील पुढारलेल्या देशांच्या इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास या देशांच्या प्रगतीत विज्ञान-तंत्रज्ञानांचा सिंहाचा वाटा आहे, हे लक्षात येईल. एकेकाळी या देशांतील समाजसुद्धा रानटी अवस्थेत होते. सरंजामशाही व धार्मिक अनाचारांचे बळी होते. परंतु या निद्रिस्त समाजाला जागे करण्यासाठी काही तत्त्वज्ञांनी पुढाकार घेतला. कसोशीने प्रयत्न केले. प्रसंगी राजसत्तेचा, धर्मसत्तेचा रोष ओढवून घेतला. आपल्याला कशा प्रकारे फसवले जात आहे हे हळूहळू समाजाच्या लक्षात येऊ लागले. वैज्ञानिकांनी नैसर्गिक क्रियांमागचे रहस्य शोधले. धार्मिक सत्ता खिळखिळी होऊ लागली. मध्ययुगीन सामाजिक, धार्मिक रूढींना झुगारून शे दीडशे वर्षाच्या कालावधीत हा समाज आधुनिकीकरणा-कडे गरूडझेप घेऊ शकला. विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती झाली. विज्ञानाची फळे सर्व समाजापर्यंत पोचवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले. स्वर्ग-नरक, पाप-पुण्य, आत्मा, पुनर्जन्म इत्यादींऐवजी आजचे जीवन जगण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा यावर लोक लक्ष केंद्रित करू लागले. विचारपूर्वक कृती करण्याचा पायंडा पडला. कार्यक्षमता व कार्यसंस्कृती रूजली. विज्ञानाने या समाजाला कुठल्याकुठे नेऊन ठेवले. याचा विचार केल्यास विज्ञानाचे महत्त्व कळू शकेल.
आधुनिकीकरण
विज्ञानास समाजापर्यंत पोचवणे म्हणजे नेमके काय, हा प्रश्न विज्ञानाच्या पातळी-वरून हाताळता येईल. प्रगत विज्ञान तंत्रज्ञानांचा वापर करून तयार झालेल्या आधुनिक सोई-सुविधा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजेच विज्ञानाला समाजापर्यंत पोचवणे असे ढोबळमानाने मानले जाते. या सुविधा वापरता येणे म्हणजेच समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजत आहे असा अर्थ काढला जातो. सुविधांच्या वापरात वैज्ञानिक जाणिवेपेक्षा कौशल्याचाच भाग जास्त असतो. मुळातच कुठलाही अशिक्षित अर्धशिक्षित माणूससुद्धा वापरू शकेल याच उद्देशाने सुविधांची रचना केली जात असते.
प्रत्येकाकडे मोबाइल, घरोघरी टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन्स, दारासमोर आलिशान गाड्या, गावोगावी काँक्रीटचे रस्ते, गावांना जोडणारे द्रुतगती मार्ग, लाखो लोकांना विस्थापित करून बांधलेली मोठमोठी धरणे, टोलेजंग शॉपिंग-कॉम्प्लेक्स, आधुनिक वैद्यकीय सुविधा-सेवायुक्त अनेक खाटांची हॉस्पिटल्स, यांची रेलचेल म्हणजेच विज्ञान समाजापर्यंत पोचले, असा अर्थ काढला जात असल्यास तो चुकीचा ठरेल. मुळात आपल्यासारख्या समाजात या अत्याधुनिक सोई-सुविधा आणण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा ओतावा लागेल. बाजारव्यवस्था बळकट करावी लागेल. ग्राहकांची क्रयशक्ती वाढवावी लागेल. आजच्या स्थितीचा विचार केल्यास या गोष्टी कार्यस्वरूपात आणणे कदापि शक्य होणार नाही. ज्या समाजातील 40-50 टक्के लोक अजूनही दारिद्र्यरेषेखाली आहेत त्यांना अत्याधुनिक सोई-सुविधांची लालूच दाखवणे ही क्रूर चेष्टा ठरेल. खरे पाहता ‘आधुनिकते’ची हाव सोडून गरिबांच्या प्राथिमक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. वेळप्रसंगी यासाठी त्याग करण्याची तयारी ठेवावी लागेल. त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर पर्यावरणास हानिकारक ठरत आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ दिसत असताना समाज पुनर्रचनेसाठी या मार्गाचा अवलंब करणे विनाशाला आमंत्रण देण्यासारखे ठरेल. या सोई-सुविधांचा वापर करणाऱ्यांनीच आता विवेक बाळगण्याची गरज भासत आहे. सुविधांच्या वापरात तारतम्य न बाळगल्यास हा संपूर्ण डोलारा कोसळून पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रस्थापितांची मानसिकता
समाजापर्यंत विज्ञान पोचवण्याचा विचार आणखी एका पातळीवरून केला जातो. समाजाच्या चौकटीला धक्का न लावता विज्ञान प्रसार करावा अशी अपेक्षा असते. आजचा हा भारतीय समाज कित्येक वर्षापासून विकसित होत आलेला आहे. टक्केटोणपे खात, परकीयांच्या अंमलाखाली खितपत पडत आजच्या अवस्थेला पोचला आहे. जे चालले आहे त्यात बदल करण्यासारखे काहीही नसून आहे ती व्यवस्था योग्य आहे असे अनेकांना वाटते. फारफारतर सैद्धान्तिक स्वरूपामध्ये काही किरकोळ बदल केल्यास त्यांची हरकत नसते. संपूर्णपणे आदर्श व्यवस्था जगातच कुठेही नाही. काही तक्रारी असणारच. त्यामुळे काही जणांची नाराजी पत्करून आहे ती व्यवस्था तशीच पुढे चालवण्यास का हरकत असावी, असा प्रश्न उपस्थित केला जात असतो. व्यवस्थेतील बदल प्रस्थापितांना रुचत नसतो. व्यवस्थेचा लाभ उठवण्यात प्रस्थापितांचा पुढाकार असतो. म्हणूनच विज्ञान-तंत्रज्ञान या गोष्टी पाठ्यपुस्तके, चर्चा, दवाखाने या पातळीवरच असाव्या त्यांचा जीवनव्यवहाराशी संबंध नसावा, अशी आग्रहाची मांडणी केली जाते.
शिक्षणव्यवस्था
भारतीय समाजाचाच विचार केल्यास ही समाजव्यवस्था अत्यंत मोडकळीस आली असून हा समाज एकसंध असा राहिलेला नाही. हा समाज विभागलेला असून प्रत्येक गट एकमेकावर कुरघोडी करत सत्ता काबीज करण्यात श्रम, शक्ती व वेळ खर्ची घालत आहे. धार्मिक विद्वेष, प्रदेशवाद, पाणीवाटप इत्यादीवर भर देऊन समाजात असंतोष माजवला जात आहे. समाजाचा फार मोठा हिस्सा हिंदूधर्मीयांचा असून इतर अल्पसंख्यकांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याची मानसिकता वा सहिष्णुता हळूहळू लोप पावत आहे. या धर्मात आता मूलतत्त्ववाद्यांचे वर्चस्व असून त्यांची बेबंद वर्तणूक चीड आणणारी, अमानुषतेकडे झुकणारी आहे. मूलतत्त्ववाद्यांमध्ये उच्चवर्णीयांचेच वर्चस्व असल्यामुळे दलित भरडला जात आहे. दलितांची असहाय्यता व उच्चवर्णीयांची पावित्र्याची कल्पना या बाबी अनाकलनीय आहेत. दैववाद, धर्मवाद, प्रारब्धवाद, कर्मवाद इत्यादींना खालच्या वर्गाच्या माथी मारून आपणच सर्वश्रेष्ठ म्हणून उच्चवर्णीय शेखी मिरवत जीवन जगत आहेत. या समाजातील अनेक अंधश्रद्ध कल्पना उच्चवर्णीयांच्या सुपीक डोक्यातून आलेल्या आहेत. समाजाची स्थिती अशीच राहिल्यास प्रगती, विकास यांना काही अर्थ उरत नाही. तटबंदी, शिक्षणबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी इत्यादींमुळे तळागाळातील समाज अपंग झाला आहे. या दुरवस्थेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी सैद्धान्तिक स्वरूपातील विज्ञानाचा प्रसार करून चालणार नाही. समाजातील प्रत्येक व्यक्तीत विचार करण्याची, विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता आल्यास स्वातंत्र्य, समता, निर्भयता, अहिंसा, मानवता इत्यादी चिरंतन मूल्ये रुजतील. माणसाला विचार करण्याची ताकद शिक्षणातूनच मिळू शकते. शिक्षण म्हणजे केवळ अक्षरओळख किंवा घोकंपट्टी नसून प्रश्न विचारणे, उत्तर शोधणे, निरीक्षण करणे, विचारांती निर्णय घेणे, इत्यादी गोष्टी आहेत. यासाठी शिकत असलेले सर्व विषय वैज्ञानिक कसोटीवर आधारलेले असावेत. पाठ्यपुस्तकातील अवैज्ञानिक गोष्टी गाळून जनमनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे गरजेचे आहे. तर्कशुद्ध विचाराच्या आधारे निर्णय घेत असल्यास शोषणव्यवस्थेला धक्का बसेल यासाठी शिक्षण व्यवस्थेत मूलभूत बदल करावे लागतील.
वैज्ञानिक दृष्टी
आणखी एका पातळीवरून समाजात विज्ञान पोचवण्याचा विचार केल्यास प्रत्येक व्यक्तीत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची गरज आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनात वस्तुनिष्ठता आणि बुद्धिप्रामाण्यवादी चिकित्सा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आयुष्यात घडत जाणाऱ्या प्रत्येक घटनेकडे, भेटत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे, चिकित्सक भूमिकेतून पाहण्यास वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवतो. एखाद्या गोष्टीबद्दल काही ठाम भूमिका घ्यावयाची असल्यास पुरेसे निरीक्षण करणे, फाजील अभिमान न बाळगणे, भावनाविवश न होणे, पूर्वग्रहदूषित नजरेने न पाहता तटस्थ वृत्तीने विचार करणे, ग्रंथप्रामाण्य-शब्दप्रामाण्य न मानणे, इत्यादी पथ्ये पाळली जातात. शास्त्रीय ज्ञान व शास्त्रीय दृष्टी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांची गल्लत करता कामा नये. आपल्या वैयक्तिक व सामाजिक जीवनात वैज्ञानिक दृष्टि-कोनाचा अभाव आहे. काही ग्रंथ अपौरुषेय आहेत. काही व्यक्तीमध्ये देवाचा अंश आहे, जगात चमत्कार घडू शकतात. एखाद्याच्या आशीर्वादाने आपले आयुष्य उजळले जाते, अशा भाकड गोष्टींवर विश्वास ठेवण्याची सवय जडली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे मानवी आकलनात परिपक्वता येते. विचार करून निर्णय घेण्याची क्षमता वाढते. स्वतःच्या मर्यादांची कल्पना येते. कालबाह्य नीतिनियम, रूढीपरंपरा यांच्यासाठी जीवाचे रान करण्याची गरज भासत नाही.
विज्ञानयुगात विकसित होत असलेल्या भारतीय समाजातील परिस्थितीचा विचार केल्यास एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आपली स्थिती आणि त्यातून निर्माण होत असलेले संघर्षाचे प्रसंग विज्ञान निर्माण करत नाही. समाज समृद्ध होण्यासाठी विज्ञानाची नितांत आवश्यकता आहे. आधुनिक विज्ञानाला टाळून किंवा वगळून हा समाज पुन्हा प्राचीन काळात जाऊ शकणार नाही. कोणाची कितीही इच्छा असो, आजच्या परिस्थितीचे काटे उलट दिशेने फिरवता येत नाहीत. शिवाय प्राचीन काळातील (त्या तथाकथित सुवर्णकाळात!) सर्वत्र सुखशांती नांदत होती, समाजजीवन समाधानी होते, हे चित्रही खरे वाटत नाही. अज्ञान, असहाय्यता, भीती इत्यादीमुळे निसर्गशक्तीला मानववंश बळी जात असे. अशीच इतिहासात नोंद आहे. आजही आपल्यापुढे अनेक समस्या आहेत. आपल्यालाच त्यांची उत्तर शोधावयाची आहेत. अत्यंत कठिण परिस्थितीत काम करायचे आहे. त्यामुळे विज्ञानाची फळे सर्वां पर्यंत पोचवण्यासाठी उपहास, दहशत, आर्थिक झीज, कठोर टीका सहन करावी लागणार आहे. त्यासाठी विज्ञाननिष्ठ विवेकी विचारवंताच्या संख्येत वाढ होणे अपेक्षित आहे.
[आपला येता अंक ‘आधुनिक विज्ञानाचे स्वरूप’ यावरचा विशेष जोडअंक असेल. त्या विषयाच्या सामाजिक संदर्भाकडे लक्ष वेधणारा हा लेख —- संपादकट
8, लिली अपार्टमेंट्स, वरदायिनी स.गृ.र. संस्था, पाषाण-सूस रोड, पुणे — 411 021

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.