आधुनिक विज्ञान: स्वरूप आणि स्थिती

विसाव्या शतकात कितीतरी प्रचंड महत्त्वाच्या घडामोडी झाल्या आणि जगाचा चेहरामोहरा बदलून गेला. दोन महायुद्धे, रशियन क्रांतीचा उदयास्त, जुना वसाहतवाद संपुष्टात येऊन झालेली नवस्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती, आणि चीनमधील क्रांती वगैरे. परंतु 21 व्या शतकात प्रवेश करताना जाणवते की या घडामोडी कमी लेखणे शक्य नसले तरी आर्थिक, सामाजिक क्षेत्रांत घडून आलेल्या प्रचंड बदलात अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे तो आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्यांच्या कर्तृत्वाचा. पृथ्वीचे स्वरूप एक ‘जागतिक खेडे’ म्हणून रूपांतरित होत आहे त्यात कोणत्याही तत्त्वज्ञानापेक्षा, विचारप्रणालीपेक्षा विज्ञानाधिष्ठित तंत्रज्ञानाचे योगदान अधिक पायाभूत आहे. जागतिक अर्थव्यवस्था, तसेच सत्तास्पर्धा यांतही विज्ञान-तंत्रज्ञानाचे स्थान कळीचे झाले आहे.
विज्ञानाच्या अनेक पैलूंपैकी दोन महत्त्वाचे पैलू विचारात घेऊ. एक, विज्ञान ही आपल्या भोवतालचे जग समजून घेण्याची, तत्संबंधी ज्ञान संपादण्याची एक पद्धती आहे. यात विश्वरचनेसंबंधीचा एक दृष्टिकोन पण अनुस्यूत आहे. दुसरा पैलू आहे उपयोजनाचा. विज्ञानाद्वारे प्राप्त झालेले विश्वव्यवहारांचे ज्ञान वापरून तंत्रज्ञाननिर्मिती करणे आणि त्यायोगे मानवी जीवन अधिकाधिक समृद्ध करणे. (आधुनिक विज्ञानाचा उदय होण्यापूर्वी पारंपारिक विज्ञान होतेच. परंतु त्याचे यश तुलनात्मकरित्या मर्यादितच होते. आधुनिक विज्ञानाची वाढ आणि प्रसार फारच स्फोटकपणे झालेला आहे, आणि त्याचा आवाकाही खूपच व्यापक व सखोल आहे.)
यातील उपयोजनाचा पैलू सर्वपरिचित असून उठावदार, नजरेत भरणारा आहे. अनेकांची तर तंत्रज्ञान म्हणजेच विज्ञान अशी समजूत असते. त्या मानाने विज्ञानाचे सैद्धान्तिक स्वरूप, संशोधनपद्धती, दृष्टिकोन हा काहीसा दबलेला पैलू राहिला आहे. व्यावहारिक पातळीवर तर एक साधन म्हणून तंत्रज्ञानाचा उपयोग (अधिकांशी दुरुपयोगच) अनेक प्रकारच्या गोष्टींसाठी केला जातो. त्यामुळे विज्ञान हे प्रस्थापित शक्तीचे एक हत्यार म्हणून अधिक प्रभावीपणे वापरले जाते असेही वाटू लागते. वैज्ञानिक दळण दळतात व सत्ताधारी आणि प्रस्थापित पीठ बळकावतात अशी स्थिती दिसते.
विज्ञानवाढीची प्रक्रिया सध्या अनेकांगांनी जोमात चालू आहे, आणि समाज-व्यवहाराच्या सर्व अंगांत विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढता आहे. त्यामुळे या प्रक्रियेवर सर्वच समाजगटांचा अंकुश कसा प्रभावीपणे राहील या दृष्टीने प्रगती झाली पाहिजे. त्यासाठी विज्ञानाचे स्वरूप, त्याचे सध्याचे सामाजिक स्थान इत्यादींची जाण सार्वत्रिक प्रमाणावर वाढणे आवश्यक आहे.
ह्यासाठीचा हा एक अल्प प्रयत्न.
आधुनिक विज्ञानाचा उदय 17 व्या शतकात गॅलिलिओ-न्यूटन यांच्या काळात युरोपात झाला, असे मानले जाते. ही सुरुवात प्राथमिक पातळीवरच्या भौतिकी क्षेत्रात झाली. उत्तरोत्तर अधिकाधिक अचूक प्रयोग आणि गणिताचा ठाम पाया यांच्या आधारावर भौतिकीचे स्वरूप अधिकाधिक प्रगल्भ होत गेले. विसाव्या शतकात तर सापेक्षतावाद आणि पुंजसिद्धान्ताने अभिजात न्यूटनीय यांत्रिकीच्या पार पलीकडे झेप घेतली, आणि स्थलकालाच्या आणि पदार्थाच्या स्वरूपाविषयीच्या संकल्पनांत मूलभूत बदल घडवून आणला.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून रसायनशास्त्रानेही मोठी प्रगती साधली. नैसर्गिक पदार्थ कृत्रिमरीत्या प्रयोगशाळेत बनविण्याच्या किमयेने लोखंडाचे सोने करण्याचे किमयागारांचे पुरातन स्वप्न प्रत्यक्षात येण्याची आशा निर्माण झाली, आणि रसायनशास्त्राद्वारे अणुरेणूंची जुळवाजुळव करून निसर्गात अस्तित्वात नसलेले, नवीन गुणधर्मांचे पदार्थही निर्माण करता येतील ही उमेद वाढली.
त्यामानाने जीवशास्त्र बराच काळ वर्णनात्मक पातळीवरच घोटाळत होते. डार्विनच्या उत्क्रांतिवाद सिद्धान्ताने एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात खूप खळबळ माजविली. परंतु या सिद्धान्ताची मूलभूत पातळीवरील प्रगती विसाव्या शतकातच सुरू झाली ती जनुकशास्त्रा-तील महत्त्वाच्या घडामोडींनंतरच. विसाव्या शतकाच्या मध्यावर क्रिक आणि वॉटसन यांनी डीएनेची दुहेरी हेलिक्स रचना शोधून काढली आणि विज्ञानक्षेत्राचा गुरुत्वमध्य भौतिकी-पासून जीवशास्त्राकडे झुकला.
गणित हा विषय तसा अडीच-तीन हजार वर्षांचा जुना. विज्ञानाचे माध्यम म्हणून त्याचा होणारा उपयोग मात्र आधुनिक काळातला. सुरुवातीपासूनच आधुनिक सैद्धान्तिक भौतिकीचा कणा असलेल्या गणिताचा इतर विज्ञानक्षेत्रांत होणारा वापरही वाढत्या
प्रमाणात आहे. संख्याशास्त्र सांख्यिकी हा विषय मात्र विसाव्या शतकातच बहरला आणि त्याचे विविध क्षेत्रांतील उपयोजनही महत्त्वपूर्ण आहे.
विसाव्या शतकात एकूणच अनेक पातळ्यांवर, अनेक आघाड्यांवर विज्ञानाची जोमदार वाढ झाली. अधिकाधिक व्यामिश्र प्रणालींचे स्पष्टीकरण देण्यात अधिकाधिक यश मिळत गेले. म्हटले तर हे वरच्या व्यामिश्र पातळीवरील विज्ञानशाखांचे भौतिकीकरण होते, म्हटले तर वरच्या पातळीवरील रसायनशास्त्र, जीवशास्त्र वगैरेंनी भौतिकीला आपल्यात पचवून टाकले होते. विविध विज्ञानक्षेत्रांची परस्परांशी जोडलेली, परस्परांत गुंतलेली साकल्यवादी जडणघडण स्पष्ट करणारी ही प्रक्रिया आहे.
मात्र जनमानसातील विज्ञानाची प्रतिमा बहुतांशी भौतिकीने व काही प्रमाणात रसायनशास्त्राच्या प्रभावानेच प्रकाशित झालेली दिसते. विज्ञानाचे स्वरूप, तत्त्वज्ञान, विज्ञानाचा वापर-गैरवापर याबद्दलच्या व्यापक जगातील चर्चा या परिघातच घोटाळत राहिलेल्या दिसतात. जीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र, तसेच इतर व्यामिश्र स्वरूपाच्या विज्ञानशाखांतील महत्त्वाच्या घडामोडींचा प्रभाव फार झिरपलेला दिसत नाही. येथे पुंजयांत्रिकीचे एक जनक अर्विन ,यडिंगर यांचे एक वाक्य आठवते. पुंजयांत्रिकीतील समीकरणांचा बोर (Bohr) लावीत असलेला अर्थ त्यांना पटत नव्हता. त्यांनी लिहिले : “भौतिकी म्हणजे केवळ पुंजयांत्रिकी नव्हे, त्यापेक्षा अधिक काही आहे, विज्ञानातही भौतिकीव्यतिरिक्त बरेच काही आहे आणि जीवनात विज्ञानाव्यतिरिक्त बरेच काही आहे.” असो! अलीकडे अलीकडे जनुकीय अभियांत्रिकी, जनुकीय बदल केलेले (genetically modified) अन्नधान्य वगैरे संबंधी उद्भवलेल्या वादविवादांमुळे व शंकाकुशंकांमुळे जीवशास्त्रही चर्चेत येऊ लागले आहे ही एक समाधानाची गोष्ट.
आणखी एक गंमत म्हणजे जीवशास्त्राचे ‘भौतिकीकरण’ होत असतानाच सैद्धान्तिक पातळीवर भौतिकी मात्र उलट दिशेने चाललेली दिसते. जीवशास्त्रात बिनागरजेचे ठरलेले आत्मा वगैरे भौतिकीच्या अतिसूक्ष्म पातळीवर डोके वर काढताहेत का, अशी शंका येते. प्रत्येक मूलकणाच्या दुहेरी तिहेरी संभाव्यतेबरोबर संपूर्ण विश्वाचे दुहेरी तिहेरीकरण होणे (multiple universes) वगैरे काढले जाणारे अर्थ (interpretations) तर भन्नाटच आहेत. तंतू सिद्धान्तामध्ये (string theory) तर भौतिकी आणि गणित यातील सीमारेषाच धूसर झालेली दिसते.
ही विरोधी, द्वंद्वात्मक घडामोड विज्ञानाची खूप मोठी मजल अजून बाकी आहे हेच दर्शविते.
या विशेषांकातील लेखांतून आधुनिक विज्ञानाच्या स्वरूपाशी निगडित विविध पैलूंवर प्रकाश पडेल अशी आशा आहे. विषयाचा आवाका लक्षात घेता हा प्रयत्न खूपच अपुरा आणि तुटपुंजा आहे याचीही आम्हांस जाणीव आहे. परंतु मराठीतून या विषयावरील चर्चेला अधिक चालना मिळाल्यास समाधान वाटेल.
विज्ञान संक्षेपणवादी (reductionist) आहे आणि त्यामुळे जीवनाचे ‘संपूर्ण दर्शन’ घडविण्यास अपुरे आहे ही साकल्यवादी (holistic) टीका बरीच जुनी आहे. न्यूटनीय यांत्रिकवादाच्या समोर ती बरीचशी खरीही होती. परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीसच न्यूटनीय यांत्रिकवाद संपुष्टात आला. आता संक्षेपणवाद विरुद्ध साकल्यवाद असे (निदान) विज्ञानात तरी परस्परविरोधी द्वंद्व नसून दोहोंचे एक प्रकारचे संश्लेषण (synthesis) झालेले आहे. परस्परांत गुंतलेल्या स्तरांची/पातळ्यांची एक उतरंड आहे, आणि झाडाची पाहणी करत असताना बनाकडे दुर्लक्ष झालेच पाहिजे असे काही अपरिहार्यपणे होत नाही. कधी कधी तसे होत असल्यास ती एक व्यक्तिगत मर्यादा वा त्रुटी असते, आणि ही एक टाळता येणारी गोष्ट आहे, हे माधव गाडगीळांच्या लेखातून स्पष्ट होते.
आधुनिक विज्ञानाच्या झपाट्याने झालेल्या वाढीमुळे माणसाची भौतिक प्रगती साधण्याबरोबरच त्याची जगाकडे बघण्याची दृष्टीही मोठ्या प्रमाणावर विस्तारली आणि सखोल झाली. साहजिकच अनेक तत्त्वज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ यांची दृष्टीही विज्ञानाच्या प्रक्रियेकडे वळली. विज्ञान म्हणजे नक्की काय, वैज्ञानिक कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य काय, वैज्ञानिक ‘सत्य’ नेमके कशा प्रकारचे असते इत्यादी प्रश्नांवर विचारमंथन सुरू झाले. सतराव्या शतकातील फ्रान्सिस बेकनपासून आजतागायत ते चालू आहे. मात्र येथेही मतामतांचा खूप गलबला आहे. विज्ञानाची वाढ आणि समाजव्यवहारातील त्याचा वाढता प्रभाव याबरोबरच विज्ञानप्रक्रियेकडे बघण्याची दृष्टीही उत्क्रांत होत गेलेली दिसते. हेमचंद्र प्रधान यांनी याचा तपशीलवार आढावा घेतला आहे. बेकनपासून पॉपरपर्यंतचा कालखंड येथे आला असून पुढील अंकात कून आणि कूनोत्तर घडामोडींचे विवेचन येईल.
प्रत्यक्षात क्रियाशील वैज्ञानिक स्वतःचे विशिष्ट संशोधन करताना वैज्ञानिक पद्धती, वैज्ञानिक सत्य वगैरे तात्त्विक गोष्टींचा फार सखोल विचार करीत बसत नाहीत. व्यामिश्र पातळीवरील विषयांत काम करणाऱ्यांना तर ते अनेकदा शक्यही नसते. एखादे ‘मिथक्’ एखादी प्रचलित ‘कथा’ कामचलाऊ म्हणून स्वीकारून ते संशोधन चालू ठेवतात—उद्गामी, अवगामी पद्धती आणि अंतःप्रेरणा (intuition) याचा जमेल तसा एकत्रित वापर करत. खऱ्याखोट्याचे विश्लेषण नंतर होतेच. फार भरकटल्यास मार्ग बदलण्याचा संतुलितपणा विज्ञानप्रक्रियेत अनुस्यूत आहेच. या विषयीच्या चिंतनाची एक झलक कॉलिन टज् यांच्या उताऱ्यावरून यावी.
डार्विनच्या ‘survival of the fittest’ प्रमाणेच हायझेनबर्ग च्या ‘अनिश्चितता तत्त्वा’चा अर्थ लावण्यावरून त्या त्या विषयक्षेत्रांबाहेर गैरसमज आढळतात, आणि सामाजिक स्तरावर तर गैरवापरही झाला आहे. एकाचा साम्राज्यवादी विस्ताराला ‘वैज्ञानिक आधार’ पुरविण्यासाठी वापर केला गेला, तर दुसऱ्याचा माणसाचे ‘इच्छास्वातंत्र्य’ ही चीज अगदी मूलभूत पातळीवरील मूलकणांच्या हालचालींतील अनिश्चिततेशी जोडून ‘मनःशक्ती पदार्थावर मात करू शकते’ हे सिद्ध करण्यासाठी केला गेला. एका पातळीवरचा नियम वरच्या, अधिक व्यामिश्र पातळीवर थेट लागू करण्यातील धोका आणि घसरण येथे अधोरेखित होते. याबाबतचा गोंधळ कमी करण्याचे काम सुधीर पानसे व हेमचंद्र प्रधान यांच्या लेखाने साधावे ही आशा.
आत्म्याची गरज नाही इतकेच नव्हे, तर तो नसतोच! — हे सांगताना मिलिंद वाटवे यांनी अत्यंत आक्रमकपणे जीवशास्त्राबाबत संक्षेपणवादी भूमिका मांडलेली आहे. वरवर पाहता वाटवे गाडगीळांच्या विरुद्ध भूमिका मांडताहेत असे वाटते. पण तसे नाही. गाडगीळ स्थूलातून सूक्ष्मात जाताजाता वेगवेगळ्या पातळ्यांची गुंतागुंत मोकळी करतात, तर वाटवे रचनेला ऊर्जा मिळाल्यास ती कार्यरत होते या अत्यंत मूलभूत प्रश्नाला हात घालतात. व्यामिश्र रचनेचा एक उगवता (emergent) गुणधर्म म्हणून ‘जाणीव’ प्रकट होते. अचेतनात चेतना भरण्यास वेगळ्या, स्वतंत्र अशारीरिक आत्म्याची गरज उरत नाही, हे अतिशय परिणामकारकरीत्या येथे जाणवून येते.
येथेच आमची एक मोठी उणीव लक्षात आली. रसायनशास्त्रातील घडामोडींचा आढावा घेणारा लेख येथे नाही. मोठ्या रेणूंमध्ये त्यांच्या व्यामिश्र, गुंतागुंतीच्या रचनेमुळे बराच माहितीचा (information) साठा भरलेला असतो. त्यामुळे महारेण्वीय रसायनशास्त्र (Supramolecular chemistry) म्हणजे निर्जीव आणि सजीव यांना जोडणारा सांधाच आहे. या पायरीवरच कोठेतरी निर्जीवाची उत्क्रांती सजीवात झाली असावी. याविषयी ज्याँ मारी लेन या नोबेल पारितोषिक विजेत्याने जानेवारी 2000 मध्ये पुण्यात भरलेल्या भारतीय विज्ञान परिषदेच्या अधिवेशनातील आपल्या भाषणात केलेले विधान उद्धृत करावेसे वाटते : “कृत्रिमरीत्या अनेक भिन्न मार्गांनी उत्क्रांती घडवून आणणे रसायनशास्त्राला शक्य आहे.” (Chemistry can synthesize evolution along many paths.) म्हणजे पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या उत्क्रांतीचा प्रत्यक्षातील मार्ग हाच एकमेव मानण्याची गरज नाही, आणि माणूस म्हणजे विश्वातील उत्क्रांतीचे शिखर असा अहंभावही व्यर्थच!
व्यामिश्रतेच्या वरच्या पातळीवरील विज्ञानक्षेत्रांची अशा प्रकारे सखोल वाढ चालू असताना त्यात गणिताचे उपयोजनही व्यापक प्रमाणावर होऊ लागले आहे. वापरण्यास मैत्रीपूर्ण (user friendly) असे संगणकाचे साधन हाती आल्याने तर या ‘गणितीकरणा’च्या प्रक्रियेला वेग आला आहे. विविध पॅकेजेस उपलब्ध आहेत. त्यामुळे “वैदिक” गणिता-प्रमाणेच झपाट्याने आकडेमोड करणे म्हणजे गणित अशी समजूतही होणे शक्य आहे.
याबरोबरच गणितज्ञांविषयीची सर्वसाधारण माणसाची धारणाही टिकून आहे : साहित्यिकांत जसे कवी, तसे वैज्ञानिकांत गणिती, जगाकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या विश्वातच मश्गुल असलेले, गणिताचे कार्य आणि स्वरूप यांवरचे रघुनाथन यांचे अधिकारवाणीने केलेले भाष्य येथे आहे. भारतातील सध्याच्या परिस्थितीवरचे त्यांचे विवेचन पुढील अंकात येईल. संख्याशास्त्र/सांख्यिकी हा गणिताचाच एक भाग आहे अशी सर्वसाधारण समजूत आहे. बहुतेक संख्याशास्त्रज्ञांना हे आवडते, परंतु अस्सल ‘शुद्ध’ गणिती मात्र हे ठामपणे झिडकारतात. ह्यामध्ये विद्याक्षेत्रातील आणि विद्यापीठक्षेत्रातील सत्तास्पर्धा आणि श्रेष्ठत्वाच्या व मानाच्या कल्पना यांचा बराचसा वाटा आहे. परंतु तरीही या दोहोत एक मूलभूत फरक आहेच. गणित हे अवगामी (deductive) पद्धतीने चालते (पहा : रघुनाथन लेख), तर सांख्यिकी उद्गामी (inductive) पद्धतीने. उपलब्ध वा जमा केलेल्या आकडेवारीवरून अनुमान काढणे, अंदाजबांधणी करणे हे मुख्य काम. त्यामुळे वास्तवाची कसोटी अनिवार्य. या बाबतीत सैद्धान्तिक भौतिकीशी अधिक जवळीक.
सैद्धान्तिक विज्ञानशाखा म्हणून सांख्यिकीचा जन्म जेमतेम शंभर वर्षांपूर्वीचा. मात्र आकडेवारी गोळा करणे आणि तिचा उपयोग करणे खूप जुने. इ.स. पूर्व चौथ्या शतकापासून मौर्य साम्राज्यात आकडेवारी गोळा करण्याची कार्यक्षम यंत्रणा होती, याचे वर्णन कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्रा’त आहे. इंग्रजीतील ‘statistics’ शब्दाचा अर्थही statecraft शी (राज्यकारभार, प्रशासन चालविण्याची कला) संबंधित आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आपल्याकडे प्रशांतचंद्र महालनवीस यांनी सांख्यिकीचा आर्थिक उन्नतीसाठी अत्यावश्यक साधन (tool) म्हणून जोरदार पुरस्कार केला. शास्त्राची उदयोन्मुखता आणि महालनवीस यांचे आक्रमक आणि द्रष्टे व्यक्तिमत्त्व या दोन घटकांमुळे सांख्यिकीतील भारतीयांचे योगदान जागतिक पातळीवर फार मोठे आहे.
व्यामिश्र स्वरूपाच्या नैसर्गिक विज्ञानाच्या, तसेच समाजशास्त्राच्या क्षेत्रात महत्त्वाचे साधन म्हणून सांख्यिकी अल्पावधीतच पुढे आली आहे. हे स्थान भौतिकी आणि अभि-यांत्रिकी ह्यांसारख्या क्षेत्रांत (निदान त्यांच्या अभिजात स्वरूपात) गणिताला होते आणि आहे. सांख्यिकीच्या व्यापक उपयोजनक्षमतेची हसत-खेळत ओळख, तसेच संभाव्यता (probability) आणि यादृच्छिकता (randommess) या मूलभूत सैद्धान्तिक संकल्पनांची प्राथमिक जाणीव अनिल गोरे यांनी करून दिली आहे.
विज्ञान आणि धर्म यांबाबत आइनस्टाइन यांचा विचार महत्त्वाचा आहे. त्यांच्या मते धर्म आणि विज्ञान यांमागील मूलभूत प्रेरणास्रोत एकच आहे : आपल्या भोवतीचे विश्व, त्याचे अस्तित्व आणि त्याच्या व्यवहारामागील संगती समजून घेण्याचा प्रयत्न करणे. याला त्यांनी ‘वैश्विक धर्मभावना’ (cosmic religious feeling) म्हटले आहे. त्यांच्या विचारसूत्राप्रमाणे विज्ञान हे प्रचलित धर्मांच्या तुलनेत उत्क्रांतीच्या वरच्या पातळीवरचा दृष्टिकोन दर्शविते.
विज्ञानाला अध्यात्माची जोड हवी असे सांगण्याची फॅशन सध्या बोकाळली आहे. आणि प्रत्यक्षात जुन्या धार्मिक रूढी आणि रिवाजांचे आधुनिक वेशभूषेत पुनरुज्जीवन होतानाही दिसते. परस्परविरोधी गोष्टी एकत्र नांदविण्याच्या आपल्या कौशल्यामुळे आपली संस्कृती दीर्घकाळ तग धरून राहिली असली तरी फार पुढेही जाऊ शकली नाही, असे काही विचारवंतांचे मत आहे. वि. शं. ठकार यांनी अतिशय संयतपणे आणि तितक्याच ठामपणे या नाजुक विषयावर लिहिले आहे.
विज्ञान हे लिंग-उदासीन (gender neutral) क्षेत्र आहे असा समज आहे. एकूणच मग पुरुषप्रधान संस्कृतीमुळे वैज्ञानिकांत पुरुषांचे प्रमाण जास्त असा निष्कर्ष त्यातून निघतो. विसाव्या शतकाच्या सुरुवातीसच मारी क्यूरी एक आख्यायिका बनल्या. भौतिकी आणि रसायनशास्त्र अशा दोन विषयांत त्यांनी नोबेल पारितोषिकेही कमावली. तरी पण स्त्री म्हणून त्यांनी बरोबरीच्या इतर पुरुषांपेक्षा काही वेगळ्या प्रकारचे, वेगळ्या धाटणीचे विज्ञान केले असे मानले जात नाही. मोजक्या स्त्री गणितज्ञांबाबतही हेच म्हणता येईल.
अधिक व्यामिश्र क्षेत्रांतही हे खरे आहे का? खरे म्हणजे यावर फार विचारच झालेला नाही. स्त्री-वैज्ञानिकांच्या कार्याचा मागोवा घेताना त्यांच्या स्त्री असण्यामुळे त्यांच्या संशोधनाचे विषय आणि दिशा काही वेगळे मार्ग उघडताहेत का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सुलक्षणा महाजनांच्या लेखात या प्रश्नाला हात घातला गेला आहे हे निश्चित. यावर अधिक काम व्हायला हवे.
तसे पाहता हा प्रश्न अधिक व्यापकही आहे. तथाकथित ‘पाश्चात्त्य’ विज्ञानातील संशोधन पाश्चात्त्य नसलेली, बिनगोरी, तिसऱ्या जगातील माणसेही करतात. त्यात काय फरक जाणवतो? आणि सात दशकांच्या काळातले सोविएत विज्ञानही गुणात्मक पातळीवर वेगळे होते का? त्यात समाजवादी छटा नेमकी कोणती होती? हे प्रश्नही आहेतच.
विज्ञानाचे स्वरूप वैश्विक आणि आंतरराष्ट्रीय किती आणि सामाजिक परिस्थितीने घडविलेले (socially constructed) किती, याचे उत्तर अंशतः तरी यात दडलेले आहे.
21-सी, शुभेच्छा, विवेकानंद रोड, ठाणे (पश्चिम) — 400 602

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.