मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव

‘ज्याने विश्वाचा मनुष्यास सुखद होणारा हा चांगला भाग निर्मिला तो देव; मनुष्यास दुःख देणारा तो दुसरा वाईट भाग निर्मिला तो राक्षस. मनुष्याच्याच लांबीरुंदीचा गज घेऊन विश्वाची उपयुक्तता, बरेवाईटपणा मोजला असता ह्या मोजणीचा हा निकाल फारसा चुकत आहे असे काही म्हणता येणार नाही. विश्वाची उपयुक्तता आपल्या मापानेच मनुष्याने अशी मापावी हेही अपरिहार्यच होते.’ (पृ.1)
विश्वाचा देव
‘जर ह्या विश्वातील यच्चयावत् वस्तुजाताच्या मुळाशी त्यांना धारण करणारी, चालन करणारी, किंवा जिच्या क्रमविकासाचे ते परिणाम होत आले आहेत अशी जी शक्ती आहे तिला देव म्हणावयाचे असेल तर त्या देवाने हे सारे विश्व मनुष्यास त्याचा मध्यबिंदू कल्पून केवळ मनुष्याच्या सुखसोयीसाठीच निर्मिले ही भावना अगदी भाबडी, खुळी आणि खोटी आहे असे मानल्यावाचून वरील विसंगतीचा उलगडा होऊच शकत नाही (पृ.7)
ती विश्वाची आद्यशक्ती ज्या काही ठराविक नियमांनी वर्तते आहे ते तिचे नियम समजतील ते समजून घेऊन, त्यातल्या त्यात आपल्या मनुष्यजातीच्या हिताला नि सुखाला पोषक होईल तसा त्याचा साधेल तितका उपयोग करून घेणे इतकेच मनुष्याच्या हातात आहे. मनुष्यजातीच्या सुखाला अनुकूल ते चांगले, प्रतिकूल ते वाईट अशी नीति-अनीतिची स्पष्ट मानवी व्याख्या केली पाहिजे. देवास आवडते ते चांगले, आणि मनुष्यास जे सुखदायी ते देवास आवडते ह्या दोन्ही समजुती खुळचट आहेत, कारण त्या असत्य आहेत. विश्वात आपण आहोत पण विश्व आपले नाही; फार फार थोड्या अंशी ते आपणास अनुकूल आहे; फार फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे — असे जे आहे ते नीटपणे, धीटपणे, समजून घेऊन त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी आहे! आणि विश्वाच्या देवाची खरी खरी तीच पूजा!! (पृ. 7-8)
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर विज्ञाननिष्ठ निबंध, ‘समग्र सावरकर’, खंड 9 (1993)
एक अव्यक्त गृहीतक
‘कनिष्ठ स्तरापासून उच्चतम स्तरापर्यंत जाणारी जीवांची लांबलचक उतरंड हे एक व्यापक प्रमाणावर स्वीकारले गेलेले परंतु अव्यक्त असे गृहीतक आहे. यानुसार मानवाला विश्वाच्या बरोबर केंद्रस्थानाची वंदनीय जागा बहाल केली गेली आहे. माणूस या उतरंडीच्या मध्यभागी स्थानापन्न आहे — देवाच्या खाली आणि दगडाच्या वर. या मानवकेंद्रित संकल्पनेचा पगडा धार्मिक विचारांवर आहेच, परंतु धर्मविचार नाकारून त्या जागी वैज्ञानिक विश्वदृष्टी (worldview) बाळगण्याचा दावा करणाऱ्यांवरही या गृहीतकाचा प्रभाव आढळून येतो.
—– लिन माणुलीस
p.3, ‘Symbiotic Planet’, 1998

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.