आजचे विज्ञान आणि अध्यात्म

रस्तोरस्ती कानाला मोबाईल फोन लावून चालणारी सुशिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत माणसे पाहिली म्हणजे जाणवते, विज्ञानाची किती झपाट्याने घोडदौड चालू आहे! परवा आमचा एक तरुण भाचा लग्न ठरल्याचे सांगत आला, आणि खिशातला फोन काढून, ‘बोला ना तिच्याशी’ असे म्हणत, बटने वगैरे न दाबता, नुसते ‘नीलिमा’ अशी हाक मारून आपल्या भावी बायकोला आमची ओळख करून देऊ लागला, तेव्हा अवाक् झालो! ‘माझ्या हाकेला हा फोन ओ देतो, दुसऱ्या कुणी अशीच हाक मारली तर देणार नाही’ अशी आणखी माहिती त्याने पुरविल्यावर आम्ही पुन्हा अवाक् झालो. पण हे अत्युच्चशिक्षित प्रेमविद्ध वधूवर लग्न ठरवताना दूरच्या एका सिद्ध पुरुषाकडे मोठ्या श्रद्धेने जाऊन त्याचा आशीर्वादच नव्हे, तर संमती घेऊन आल्याचे लगेच समजले, तेव्हा मात्र तिसऱ्यांदा अवाक् होण्याची आमची पाळी होती. आजचे विज्ञान आणि अध्यात्म आमच्यासमोर मूर्तिमंत उभे होते! जनमानस
जीवनाच्या अंगोपांगांना विज्ञान जो जो अधिकाधिक स्पर्श करीत आहे, तो तो जनमानसात विज्ञानाविषयीचे कुतूहल वाढत आहे ही चांगली गोष्ट आहे. वैद्यकीय क्षेत्रातल्या प्रगतीसंबंधीचे व्याख्यान ऐकायला लोक आता आवर्जून येतात, आणि पृथ्वीजवळ आलेला मंगळ दुर्बिणीतून पाहायला शेकड्यांनी गर्दी करतात. इस्राईलने शेतीत केलेल्या क्रांती-विषयी ऐकायला आणि ती अंमलात आणायला खेड्यातला शेतकरी उत्सुक असतो, तर नॅनोतंत्रज्ञानावरचा लेख दैनिकाच्या रविवार-आवृत्तीत छापला जातो. त्याचबरोबर, कुंभमेळ्याला लाखो लोक जमतात, आणि तिथल्या चेंगराचेंगरीत बरोबरीची शंभर माणसे मेली तरी दुसऱ्या दिवशीच्या पवित्र स्नानासाठी त्यांना भक्तिभावाने जायचेच असते. आपल्याला मलगा व्हावा म्हणन ते दसऱ्याच्या कोवळ्या पोराचा बळी देतात आणि पिराला नवस केल्याशिवाय किंवा सकाळी देवदर्शन केल्याशिवाय आपण परीक्षा पास होणार नाही याची त्यांना खात्री असते. उद्योगपती इंजिनियर, स्वामींच्या चरणावर माथा ठेवून आल्याशिवाय नव्या प्रकल्पाला सुरुवात करीत नाही, आणि सिद्धहस्त डॉक्टर ऑपरेशनची वेळ ठरवताना ग्रहांचा सल्ला घेतो.
पण एवढ्याने हे चित्र पुरे होत नाही. अनेक प्रथितयश वैज्ञानिक व अध्यात्मवादीही आपापल्या परीने त्यात नवनवे रंग भरत असतात. दोन्हीही क्षेत्रांत सारख्याच अधिकारवाणीने बोलणाऱ्या एका सुप्रसिद्ध वैज्ञानिकाने, व्याख्यानाच्या वेळी एका अभ्रिकेचे (नेब्यूलाचे) तीन फोटो दाखवले : नेहमीच्या प्रकाशातला, अतिनील प्रकाशातला आणि सूक्ष्मतरंगीय. तिन्ही वेगवेगळे दिसत होते, यावरून ते श्रोत्यांना एक ‘आध्यात्मिक सत्य’ पटवून देत होते, की मानवाच्या ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे विश्वात काहीतरी आहे. आता याला काय म्हणावे? अभ्रिका ‘मुळात’ कशी दिसते; किंवा ‘आहे,’ ते त्यांचे त्यांनाच माहीत असणार. वरील ‘सत्य’ पटवण्यासाठी काही जण, आपल्याला ऐकू येत नाहीत ते ध्वनी वटवाघळाला ऐकू येतात हे उदाहरण देतात. पण ही विश्वातली घटना तुम्हाला (किंवा कुणा शास्त्रज्ञाला) कशी कळली? तुमच्या (किंवा त्याच्या) ज्ञानेंद्रियांकरवीच ना? उपकरणांच्या साह्याने, पण अखेरीस ज्ञानेंद्रियांकरवीच.
हजारो वर्षांपूर्वी आमच्या ऋषिमुनींनी कथन केलेल्या भारतीय तत्त्वज्ञानाकडेच आजचे विज्ञान चाललेले आहे या मताचा उत्कटतेने प्रसार करणाऱ्या, व्यासंगी साहित्यिकाची ही वक्तव्ये पाहा:
“इलेक्ट्रान स्थिर आहे का? नाही. तो ठराविक कक्षेतच फिरतो का? नाही. … असे सर्वत्र ‘नेति, नेति’ असेच उत्तर येते. प्रयोगापासून इलेक्ट्रॉनचे निरीक्षण होऊ शकत नाही. हे सारे ‘अनुभवा’वेच लागते. ईशोपनिषदात ब्रह्माचे वर्णन केले आहे, त्याच्या जवळ हे वर्णन जाते.
“. . . इथे क्वांटम थिअरी आली. बंदुकीतून गोळीमागून गोळी सुटावी तसे हे कणपुंज बाहेर पडतात. पुंजरूपात एनर्जी अशी बाहेर पडत जाते. प्रत्यक्षात त्यावरही काही प्रयोग करता येत नाहीत—-ते केवळ ‘अनुभवा.’ हीच आमच्या अध्यात्माची भाषा आहे. ईशतत्त्व काय आहे हे सांगता येत नाही. त्यावर प्रयोग करता येत नाहीत.” इलेक्ट्रॉन …. नेति नेति …. क्वांटम …. ईशतत्त्व …. ऐकताना वाटले, ब्रह्म, ईशतत्त्व या सुंदर कल्पनांना हे का म्हणून त्या यःकश्चित इलेक्ट्रॉनच्या पंक्तीला नेऊन बसवीत आहेत? विज्ञान
विज्ञान म्हणजे भौतिकशास्त्रे—-पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र इत्यादि—-असा अर्थ हल्ली सर्वसाधारणपणे रूढ आहे. समाजविज्ञान, मनोविज्ञान, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, असेही शब्द वापरले जातात. शास्त्र व विज्ञान या दोन्ही नामाभिधानांच्या वापरामुळे कधीकधी काहीसा संभ्रम निर्माण होतो. (इंग्रजीत ‘सायन्स’ हा एकच शब्द सर्वत्र वापरल्यामुळे ही समस्या सहसा येत नाही.) वास्तविक तर्कशुद्ध, सुसूत्र मांडणी केलेली नियमबद्ध, सिद्धान्तग्रथित ज्ञानशाखा, अशी ‘शास्त्रा’ची व्याख्या केलेली आहे. धर्मशास्त्रे, अध्यात्मशास्त्रेही आपापल्या परीने हे करीत असतात—-सृष्टीची उत्पत्ति-स्थिति-लय यांविषयी, सजीवांच्या परस्परांसंबंधाविषयी, जन्म-मरण याविषयी . . . सिद्धान्त मांडत असतात. परंतु विज्ञान, वैज्ञानिक दृष्टी, वैज्ञानिक पद्धत इत्यादि शब्द हल्ली आपण ज्या ज्ञानशाखांना अनुलक्षून वापरतो, त्यांत आणखीही काही गोष्टींचा अंतर्भाव होतो. मानवी ज्ञानेंद्रिये व त्यांना साह्य करणारी उपकरणे वापरून सृष्टिव्यापाराचे निरीक्षण केले जाते; तर्कबुद्धीचा वापर करून त्या निरीक्षणात काही सुसूत्रता आढळते काय याचा अभ्यास केला जातो व काही नियम मांडले जातात. त्याचबरोबर, अशा नियमांचा समावेश करू शकणाऱ्या सर्वसाधारण सिद्धान्ताचा शोध घेतला जातो. असा सिद्धान्त कधीकधी मोठाच बौद्धिक पराक्रम ठरतो—-जसे गेल्या शतकातले सापेक्षतासिद्धान्त, पुंजसिद्धान्त, इत्यादि. हा पराक्रम महत्त्वाचा ठरण्याची मुख्य कारणे दोन. एकतर विश्वरूपाचे अधिक स्वीकारार्ह दर्शन त्यातून घडते—-जसे अवकाश-काळाचे चतुर्मिती रूप, वस्तुमान-ऊर्जेचे समीकरण, इत्यादि. दुसरे म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या व उपयोगी (संहारकही?) चिजा त्यातून निघू शकतात—-जसे अणुऊर्जा, मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स, जनुक-नकाशा इत्यादी.
प्रयोगशाळेतील वा बाह्य सृष्टीतील एक जरी निरीक्षण स्वीकृत वैज्ञानिक सिद्धान्ताच्या विरुद्ध गेले, तरी तो सिद्धान्त सुधारला तरी जातो, किंवा पूर्ण टाकूनही दिला जातो, आणि नव्याचा शोध घेतला जातो. या प्रक्रियेतून विसाव्या शतकाच्या आरंभा पासून विज्ञानक्षेत्रात मोठ्या उलथा-पालथीला सुरुवात झाली. आइन्स्टाइनचा सापेक्षता सिद्धान्त, प्लॅन्कचा मुजसिद्धान्त, अणूच्या अंतरंगाविषयीचे सिद्धान्त, हायजेनबर्गचे अनिश्चितता तत्त्व, कण-लहर यांचे द्वित्व, दूरदूरच्या तारकाविश्वांचे वेध घेणाऱ्या अनेक प्रकारच्या दुर्बिणी, उपग्रह आणि याने, विश्व प्रसरण पावत आहे हा शोध, विश्वाच्या उत्पत्ति-स्थिति-भवितव्याविषयीचे महास्फोट, स्थिरस्थिती इत्यादि सिद्धान्त, कृष्णविवरे, तंतुसिद्धान्त हे त्या उलथापालथीतले काही टप्पे.
‘हें विश्वचि माझें घर’, किंवा ‘सण भेटावा सणें । विश्वाचेंचि’, असे ज्ञानेश्वरांच्या शब्दांत ज्या विश्वाविषयी म्हणायचे, त्या विश्वाची सातशे वर्षांपूर्वीच्या त्यांच्या काळी किंवा सात हजार वर्षांपूर्वीच्या ऋग्वेदकाळी जी माहिती होती, तिच्यापेक्षा कितीतरी जास्त माहिती आता आपल्याला झाली आहे. आपल्या आकाशगंगेत सर्यापेक्षा सहस्रपटींनी तेजस्वी ताऱ्यांसह शंभर अब्ज तारे आहेत. अशा अब्जावधी आकाशगंगा, त्यांचे समूह आणि महासमूह आहेत आणि ते सर्व एकमेकांपासून दूर जात आहेत हे आमच्या द्रष्ट्या पूर्वजांना अंतर्ज्ञानाने ठाऊक होते असे ज्यांना मानायचे असेल त्यांनी खुशाल मानावे. तसे त्या द्रष्ट्या मंडळींनी कुठे नमूद करून ठेवलेले मात्र आढळत नाही. ‘सर्व विश्वाला उजळवून टाकणाऱ्या’ सूर्याचा उल्लेख तेवढा ठिकठिकाणी येतो. ‘आध्यात्मिक’ अर्थ
इलेक्ट्रॉनबरोबरच विज्ञानातील आणखी ज्या गोष्टींचा ‘आध्यात्मिक’ अर्थ लावला जातो, त्यांतील प्रमुख म्हणजे अनिश्चितता तत्त्व व महास्फोट सिद्धान्त. या तिन्हींविषयी थोडे सविस्तरपणे पाहणे उचित होईल.
इलेक्ट्रॉनवरचा एक सुप्रसिद्ध व अर्थगर्भ प्रयोग असा : एका प्रकाशस्रोतासमोर दोन समांतर फटी असलेली एक फळी व पलीकडे एक पडदा आहे. दोन फटींतून निघून पडद्यावर एका बिंदूवर पोचणारे प्रकाशकिरण साधारणपणे कमीजास्त लांबीचे मार्ग आक्रमतात, त्यामुळे प्रकाशलहरींचे उच्चनीच भाग एकत्र येतील त्यानुसार तिथल्या प्रकाशाची तीव्रता ठरते, आणि परिणामी पडद्यावर कमीजास्त तीव्रतेचे पट्टे तयार होतात. विशेष गोष्ट अशी की प्रकाशस्रोताऐवजी इलेक्ट्रॉनचा स्रोत ठेवला तरी तसेच पट्टे मिळतात. म्हणजे इलेक्ट्रॉन हा केवळ कणच नव्हे तर लहरही असला पाहिजे.
हायजेनबर्गचे अनिश्चितता तत्त्व सांगते की कणाचे स्थान व गती दोन्ही एकाच वेळी सारख्याच अचूकतेने मोजणे अशक्य आहे. त्यातील एक जितक्या अधिक अचूकतेने मोजायला जावे, तितक्या कमी अचूकतेने दुसरे मोजता येते. याचा एक अर्थ असा लावला गेला, की परमेश्वराने निर्मिलेले विश्व मानवाला पूर्णपणे कळणे केवळ अशक्य आहे. किंबहुना, या आध्यात्मिक सत्याचा ते तत्त्व हा विज्ञानाने दिलेला पुरावाच आहे.
या गोष्टीवरचे सुप्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांचे भाष्य असे : “नवे पुंजसिद्धान्त मांडून पुंजयांत्रिकीने या परिस्थितीतून मार्ग काढला. त्या सिद्धान्तात कणाला विशिष्ट स्थान आणि गती नसते, तर कण हा एक लहर असतो….. आपण त्या लहरींचा अर्थ कणांचे स्थान आणि गती यांच्या रूपात लावू पाहतो, तेव्हाच अचूक भाकीत करता न येणे आणि अनियमितता या गोष्टी डोके वर काढतात. पण कदाचित ती आपलीच चूक असेल — कदाचित कणांची स्थाने आणि गती असा काही प्रकार नसेलच, असतील त्या केवळ लहरीच असतील…..”
अनिश्चितता-तत्त्वाचा प्रभाव अणूच्या अंतरंगाएवढ्या सूक्ष्म आकारातील घडामोडींसाठीच महत्त्वाचा असतो; मोठ्या आकारमानासाठी तो नगण्य असतो. किती नगण्य? एक ग्रॅम वस्तुमानाच्या एका छोट्या गोळीचे स्थान मिलिमीटरच्या हजाराव्या भागापर्यंत अचूक मोजण्याचा प्रयत्न केला, तर तिच्या गतीच्या मापनातील अनिश्चितता सेकंदाला दशकोटी-दशकोटी-अब्जांश मिलिमीटर इतकी असेल. (किती अनिश्चित हेही निश्चित, हेही महत्त्वाचे! नाहीतर, ‘आत्ता जाऊन येतो’ म्हणणारा केव्हा येणार ते परमेश्वरालाच माहीत असे पुटपुटत आपल्याला त्याची वाटच पाहात बसावे लागते.)
महास्फोट सिद्धान्ताचा संबंध थेट ऋग्वेदातील नासदीय सूक्ताशी लावला गेला आहे. या गोष्टीला केवळ दैवदुर्विलास हेच नाव देता येईल. विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले, तर विश्वाच्या उत्पत्तीविषयी दुसरा कोणताही अधिक चांगला सिद्धान्त अजून पुढे आलेला नाही, म्हणून नाइलाजाने महास्फोट सिद्धान्त (बिग बँग थिअरी) काही प्रमाणात स्वीकारण्यात आलेला आहे. प्रथमपासूनच अनेक वैज्ञानिकांचा त्याला विरोध होता व आहे. मुळात, विश्व एका स्फोटातून उत्पन्न झाले या कल्पनेची हेटाळणी करण्यासाठी, विख्यात वैज्ञानिक जयंत नारळीकर यांचे गुरू फ्रेड हॉएल यांनी तो वापरला; आणि इतका लोकप्रिय झाला की बक्षिसे जाहीर करूनही त्याला अधिक चांगला पर्याय लाभला नाही! अध्यात्माच्या दृष्टीने पाहिले, तर नासदीय सूक्त हे मानवाच्या सर्वांत पुरातन, उच्च प्रतिभेचा एक मानबिंदू आहे. सृष्टीच्या उत्पत्तीविषयी ऋग्वेदाच्या एकंदर 1028 सूक्तांपैकी फक्त पाच सूक्तांत उल्लेख आहे, त्यातील नासदीय सूक्त हे सर्वस्वी त्या विषयाला वाहिलेले सर्वोत्कृष्ट काव्य आहे. त्याच्या पहिल्या काही ओळी अशा आहेत:
(सूत्रकर्ता ऋषी परमेष्ठिन प्रजापती म्हणतो,) : “सृष्टीच्या मुळारंभी असत नव्हते आणि सतही नव्हते. अंतरिक्ष नव्हते आणि त्यापलीकडचे आकाशही नव्हते. रात्र आणि दिवस यांचा भेद कळण्यास काही साधनही नव्हते. जे काही होते ते एकले एकच आपल्या शक्तीने वायूशिवायच स्फुरत होते. त्याखेरीज किंवा त्यापलीकडे दुसरे असे काहीच नव्हते.’
प्रथमतः हे लक्षात घेऊ या, की ऋग्वेद म्हणजे ऋचांचा (म्हणजेच मंत्रांचा किंवा कवनांचा) संग्रह, कवनांच्या समूहांना सूक्ते म्हटले आहे. कवनकर्ता कवी म्हणजे ऋषी. ऋषी म्हणजे कुणी रानावनात वा गिरिकंदरात राहणारा सिद्धपुरुष, अशी सर्वसाधारण कल्पना दुरुस्त करून घेतली पाहिजे. सध्याच्या पंजाबच्या स्थानी राहणाऱ्या, शेतीभाती (आणि युद्धे व प्रेमही) करणाऱ्या नागर वस्तीतल्या कवींनी रचलेली ही कवने आहेत. सूर्य ही आकाशातील एकच महातेजस्वी वस्तू ते जाणत होते, सूर्यावर बरीच कवने आहेत. त्यापलीकडे काही नक्षत्रे त्यांना माहीत होती, इतकेच. आपल्या अवतीभोवती जे दिसते ते कसे निर्माण झाले असेल या विषयीचे कुतूहल, आपल्याला असते तसे त्यांनाही असणारच. विचार, संवेदनशीलता यांच्याबरोबर प्रतिभा असली की परमेष्ठिन् प्रजापतीसारखा कवी निर्माण होतो. नाइलाज म्हणून स्वीकारलेला, अधिक चांगला मिळताच ज्याला फेकून देण्यात येईल असा, हेटाळणीयुक्त नामाभिधान मिरवणारा महास्फोट सिद्धान्त आमच्या ऋषिमुनींनी हजारो वर्षांपूर्वीच सांगितला होता असे म्हणणे ही त्या थोर कवींची हेटाळणीच नव्हे काय? उद्या वैज्ञानिक दुसरा सिद्धान्त स्वीकारतील, तेव्हा आध्यात्मिक मंडळी कोणत्या ऋषींना शोधतील?
विज्ञानाविषयी आणखी काही गोष्टींची दखल घेणे आवश्यक आहे. वैज्ञानिक सिद्धान्त हे केवळ निसर्गाच्या मर्यादित भागाच्या निरीक्षणानंतर त्यावर आधारित प्रतिकृती असतात; ते ‘सत्य’ (म्हणजे जे काही असेल ते) सांगत नाहीत. कधीकधी अत्यंत क्लिष्ट गणिती रूपात मांडलेल्या त्या प्रतिकृतींकरवी आज समोर असलेल्या निरीक्षणांचे अंशतः स्पष्टीकरण मिळते, नवीन निरीक्षणे काय मिळतील याचे भाकीतही करता येते. (उदाहरणार्थ, दूरच्या ताऱ्याकडून येणारा प्रकाशकिरण सूर्याजवळ येताना वळला पाहिजे हे सापेक्षता सिद्धान्ताचे भाकीत निरीक्षणांनी खरे ठरवले.) न्यूटनचे नियम, गुरुत्वाकर्षण, या गोष्टी सृष्टीतील सत्याची वर्णने आहेत अशी आपली लहानपणापासून समजूत असते; वास्तविक त्या केवळ अशा प्रतिकृती आहेत. त्या कशा सुधारल्या पाहिजेत ते सापेक्षता इ. सिद्धान्तांनी सांगितले; आणखी एखादा सिद्धान्त कदाचित त्या सर्वच प्रतिकृतींना मोडीत काढील.
माणूस चंगळवादी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा बनत चालला आहे, प्रेम, सहिष्णुता इत्यादी मानवी मूल्ये विसरला आहे, या सर्वांचे खापर विज्ञाननिर्मित सुखसाधनांवर फोडले जाते. विज्ञानाने दिलेला चाकू तुम्ही हातातला आंबा कापून खाण्यासाठी न वापरता आंबेवाल्याचा गळा कापन त्याचे सगळेच आंबे लबाडण्यासाठी वापरला तर तो विज्ञानाचाच गन्हा?
मानवाच्या अपप्रवृत्तींना केवळ अध्यात्मज्ञानच आळा घालू शकेल, त्यासाठी विज्ञान व अध्यात्म यांचा समन्वय घडवणे ही ‘काळाची गरज आहे’, असा एक भाबडा प्रचार हल्ली चालू असतो. अतिरेकी तयार करण्यासाठी मदरसे उघडले आहेत, तसे शांतिप्रिय तयार करण्यासाठी अध्यात्मशाळा उघडल्या म्हणजे काम होईल असा विश्वास त्यामागे असावा. अध्यात्माचे बाळकडू पाजले म्हणजे हिटलर आणि रूझवेल्ट, ट्रमन आणि जनरल ग्रोव्हज निर्माण होणार नाहीत, आपल्या मुलींची छेडछाड होणार नाही, आणि बँकेतले पैसे सुरक्षित राहतील अशी श्रद्धाही त्यामागे असावी. परंतु परंपरागत अध्यात्म-विचारांच्या प्रसारामुळे कायकाय घडू शकते, घडलेले आहे, त्याचा विचार आपण पुढे करणारच आहोत. अध्यात्म
अध्यात्म नेमके कशाला म्हणावे? गीतेत म्हटले आहे की प्रत्येक वस्तूचा स्वतःचा असा जो मूळ भाव (ब्रह्माची सहजस्वरूपस्थिती) त्याला अध्यात्म म्हणावे. अध्यात्माची साधना म्हणजे आत्मज्ञान/ब्रह्मज्ञान/पारमार्थिक ज्ञान यांची साधना— प्रत्यक्षात मात्र, जनसामान्यांच्या दृष्टीने खालीलपैकी एखादी गोष्ट (किंवा सर्व मिळून) म्हणजे अध्यात्म-साधना असते : वेद/उपनिषदे/भारतीय तत्त्वज्ञान यांचा अभ्यास, ज्ञानेश्वर-तुकाराम आदि संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास/वाचन/पठण, गावोगावचे संतमहंत/स्वामी/बाबा यांचे शिष्यत्व/अनुग्रहप्राप्ती, सत्संग, शुद्धाचरण, भजनपूजन, तीर्थाटन, इत्यादि-इत्यादि.
‘भारतीय तत्त्वज्ञान/अध्यात्म’ या शीर्षकाखाली या बहुतेकांची गणना होऊ शकते, तेव्हा त्याचाच थोडा आढावा घेऊ. या तत्त्वज्ञानाची सुरुवात ऋग्वेदापासून झाली. लोकमान्य टिळकांच्या मते, मानवजातीच्या या पहिल्या ज्ञानलेखाचा काळ इसवी सनापूर्वी साडेचार हजार वर्षे असावा. नासदीय सूक्त या ऋग्वेदातील एका प्रमुख तत्त्वज्ञानपर सूत्राचा उल्लेख वर आपण केलेलाच आहे. त्यातूनच भारतीय तत्त्वज्ञानाचा पुढील प्रवास सुरू झाला. त्यातील पहिले जे सांख्य तत्त्वज्ञान, त्यांचा प्रमुख सिद्धान्त म्हणजे प्रकृती व पुरुष अशी सृष्टीची दोनच अनादिसिद्ध स्वयंभू व स्वतंत्र अशी मूलतत्त्वे आहेत, त्यांखेरीज ईश्वर आदि कोणतेही तिसरे तत्त्व नाही. प्रकृती ही सत्त्व-रज-तम अशी त्रिगुणात्मक आहे, तर पुरुष हा निर्गुण, अविकारी आहे. प्रकृतीचा आणि पुरुषाचा संयोग झाला म्हणजे प्रकृती आपल्या गुणांचा पसारा पुरुषासमोर मांडू लागते, हीच सृष्टीची उत्पत्ती.
यानंतर आलेल्या वेदान्ती (अद्वैती) तत्त्वज्ञानाने असा सिद्धान्त केला की प्रकृती व पुरुष यांच्यापलीकडे विश्वाचे परब्रह्मरूपी एकच मूलतत्त्व असून, त्यापासूनच प्रकृती आणि पुरुष यांसह सर्व सृष्टी निर्माण झाली आहे. याखेरीज सांख्यांचे सर्व सिद्धान्त वेदान्त्यांनाही मान्य आहेत. सर्व सृष्टीच्या पलीकडील इंद्रियातीत वस्तूला वेदान्तात आत्मा, परमात्मा, ब्रह्म, परब्रह्म इ. नावांनी संबोधले आहे. आत्म्याचे ज्ञान तर्काने प्राप्त होत नाही; आपले मन शुद्ध व अंतर्मुख करून थोर ऋषींनी मिळवलेल्या अनुभवाचे वर्णन त्यांनी उपनिषदादि ग्रंथांतून केले आहे, ते या बाबतीत ग्राह्य समजावे. यातील एक सर्वपरिचित वर्णन म्हणजे ‘नेति, नेति’. निर्गुण व अचिंत्य आहे. हे अविनाशी तत्त्व आणि आपल्या शरीरातले आत्मतत्त्व ही दोन्ही एकच आहेत (‘अहं ब्रह्मास्मि’), हे वेदान्ताचे रहस्य समजतात.
कोणत्याही कार्यातले गुण त्याच्या कारणात असलेच पाहिजेत हा सांख्यांचा सिद्धान्त वेदान्त्यांनीही मानला. परंतु मग निर्गुण ब्रह्मापासून सगुण सृष्टी कशी उत्पन्न झाली? याचे तर्कदृष्ट्या स्पष्टीकरण देण्यासाठी वेदान्त्यांनी एक नवा सिद्धान्त केला : कार्यकारणभावाचा सिद्धान्त. हा कार्य आणि कारण दोन्हीही सत्य असतील तेव्हाच ग्राह्य समजावा. या सिद्धान्तानुसार नाशवंत दृश्य सृष्टी ही परमात्म्याने इंद्रियांना दाखवलेला केवळ देखावा आहे, ‘माया’ आहे, मिथ्या आहे, असे ठरले. (‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ हे त्यावरील एका कवीचे सुपरिचित वर्णन.)
वर अत्यंत सारांशरूपाने सांगितलेले तत्त्वज्ञान, हेच भगवद्-गीतेतील व पुढील सर्व संतवाङ्मयातील अध्यात्म/तत्त्वज्ञानविषयक निरूपणाचा पाया आहे. गीतेत भगवंत अनेक वेगवेगळ्या तन्हांनी अर्जुनासाठी या तत्त्वज्ञानाचे स्पष्टीकरण करतात. नंतरची संत-मंडळी आपापल्या परीने रोजच्या जीवनातील नवनवीन दृष्टान्तांची भर घालून जनसामान्यांना रुचेल, पटेल असे (काही वेळा उत्कृष्ट काव्याच्या तोडीस पोचणारे) निरूपण करतात.
सिद्धान्त म्हणून हे सर्व तत्त्वज्ञान ठीकच आहे. ऋषिमुनींनी सांगितले म्हणून ग्राह्य मानायची एकदा तयारी ठेवली, म्हणजे काही प्रतिप्रश्नही उद्भवत नाही. तसे पाहिले तर समोर जे दिसेल त्यामागे काय असेल, याचे कुतूहलच मानवाला सतत प्रगतिपथावर ठेवत आले आहे. त्याविषयी सिद्धान्त करणे ही त्यापुढची साहजिकच येणारी पायरी. हातातला रुमाल खाली पडला तर माझ्यासारखा अल्पमति मनुष्य सिद्धान्त करू शकतो, की रुमाल ज्या कापसापासून झाला आहे त्यात आणि खालच्या फरशीच्या दगडात काहीतरी आकर्षण असले पाहिजे. दुसरा कुणी म्हणू शकतो, की रुमाल खाली पडणे ही परमेश्वराची इच्छा होती. दोन्हीही सिद्धान्त हास्यास्पद ठरवण्याचे अजिबात कारण नाही. प्रयोग व निरीक्षणे यातून पडताळा येतो की नाही, हाच खरे तर सिद्धान्त स्वीकारार्ह आहे की नाही ते ठरवण्याचा एकमेव मार्ग आहे. वेगळ्या परिस्थितीत केलेल्या प्रयोगाने, पहिल्या सिद्धान्ताचा पडताळा येत नाही असे कळून नवा सिद्धान्त करावा लागेल (गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धान्ताचा उगम यापेक्षा काही फार वेगळ्या त-हेने झाला असे म्हणण्याचे कारण नाही.) पण दुसऱ्या सिद्धान्ताचा मात्र पडताळा शक्य नाही — तो श्रद्धेचा प्रश्न आहे असे कुणी म्हणेल. गाडी चुकली तरी ती परमेश्वराची इच्छा आणि पोरीचे लग्न हुकले तरी ती परमेश्वराची इच्छा, असे लोक म्हणतच असतात. घटनेचे कारण सापडते का ते पाहायचे, न सापडल्यास, झाले ते परमेश्वराच्या इच्छेने झाले असे म्हणून कार्यकारणभावाच्या मनातील सुप्त गरजेचे समाधान करून घ्यायचे आणि शांत राहायचे असा हा साधा प्रकार आहे. यापेक्षा अधिक प्रगत, गीताप्रणीत व आचरण्यास कितीतरी अधिक कठीण, असाही मार्ग आहे, तो असा : स्वकर्तव्य करीत राहायचे, केलेल्या कामाच्या फळाची आसक्ती बाळगायची नाही, आणि सर्व काही (दुःखच नव्हे, तर सुखही) परमेश्वराला अर्पण करून मन शांत ठेवायचे.
मनःशांतीचा विषय पुढील परिच्छेदात पाहू : सध्या आमच्या थोर पूर्वजांनी सांगितले म्हणून अमुक खरे असले पाहिजे असे म्हणणाऱ्यांना मी एवढेच विचारू इच्छितो, की सांख्यांचे द्वैती तत्त्वज्ञान स्वीकारून वेदान्ती गप्प का बसले नाहीत? सांख्यांनी मन शुद्ध व अंतर्मुख करूनच त्यांचे तत्त्वज्ञान मांडले असणार, अशी वेदान्त्यांची खात्री असेलच ना? गेली कित्येक शतके मात्र, वेदान्त हेच भारतीय तत्त्वज्ञान असे जणू समीकरणच झाले आहे. वास्तविक विसाव्या शतकात वैज्ञानिक संशोधनाने सैद्धान्तिक व प्रायोगिक अशा दोन्हीही क्षेत्रांत केलेल्या प्रगतीमुळे कितीतरी नवे विश्व-रूपदर्शन घडले आहे. त्याची काहीच दखल आपण घेणार नाही? भवसागरात गटांगळ्या खाणार, जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकणार आणि सदाचरण करायचे ठरवलेच तर तेही एरवी नरकात जाण्याच्या भीतीने? वेदान्ती आधीचे तत्त्वज्ञान बदलू शकतात, पण आपण नाही, असे का?
अध्यात्मातून मनःशांती
आजच्या तणावयुक्त आयुष्यात मनःशांती हवी असेल, रक्तदाब, हृदयरोग यांपासून मुक्त हवी असेल, तर अध्यात्मसाधनेशिवाय उपाय नाही असे हिरिरीने सांगितले जाते. आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन, स्तोत्रपठण, ध्यानधारणा, योगाभ्यास, प्रार्थना, भजनपूजन, नामस्मरण यांनी मन शांत होते, जीवनातील संघर्षाला तोंड देण्यास बळ प्राप्त होते, असे जर कोणी स्वानुभवाने सांगत असेल तर त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेण्याचे काहीच कारण नाही. अध्यात्माचा औषधासारखा उपयोग, असे या गोष्टीचे स्वरूप आहे. अॅस्पिरिनने वेदना थांबत असतील तर ते घ्यायला काहीच हरकत नाही, वेदना का थांबतात ते संशोधक बघतील. पण अॅस्पिरिनचे साईड-इफेक्टस असू शकतात, आणि ते कसे टाळायचे, हे मात्र माहीत हवे.
पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र इत्यादींनी केलेल्या प्रगतीच्या पाठोपाठ अलीकडे जैवविज्ञानानेही बरीच मजल मारली आहे; पण शरीरविज्ञानात झालेल्या विकासाच्या मानाने मनोविज्ञान अजून बरेच मागे आहे. मनःशारीरिक क्रियांवर तर अजून पुष्कळ संशोधन व्हायचे आहे. उदाहरणार्थ, ॐकाराचा उद्घोष केल्याने शरीर-मनावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास होणे, त्याहीपेक्षा परिणामकारक उद्घोष शक्य आहेत का ते शोधणे, इत्यादी गोष्टी आवश्यक आहेत. उपकारक परिणाम जाणवत असेल तर तो उद्घोष अवश्य करावा, पण त्याच्या ‘आध्यात्मिक’ साईड-इफेक्टस्पासून मात्र सावध राहावे. नाहीतर ॐकार म्हणजे पूर्णब्रह्म, त्या निर्गुण ब्रह्माची सगुण रूपे देव देवतांपासून तो, असंख्य गुरू आणि सिद्धसाधकांपर्यंत, त्यांची वेळ-श्रम-पैसा घालवून उपासना . . . अशा दुष्टचक्रात गुरफटून माणूस अंधश्रद्धेच्या आणि मानसिक व आर्थिक पिळवणुकीच्या गर्तेत कसा आणि केव्हा फसत जातो ते त्याचे त्यालाही कळत नाही. मग तो तासन्तास पूजापाठ करीत बसतो, तीर्थ यात्रांसाठी जीव टाकतो, देवतेपुढे रक्ताचे पाट वाहवतो, किंवा आत्मोन्नती साधण्याच्या नादात परचक्राला बळी पडतो.
योगक्रिया, प्राणायाम, कुंडलिनीजागृती इत्यादींवर वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणाऱ्या संस्था भारतात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या देखील नाहीत. त्यांना अर्थसाह्य व माणूसबळ मिळाले पाहिजे, त्यांची वाढ झाली पाहिजे. अध्यात्मशिक्षणातून समाजप्रबोधन
व्यक्ती व समाज यांच्या स्वास्थ्यासाठी, निकोप परस्परसंबंधांसाठी, अध्यात्म-शिक्षण आवश्यक आहे अशी अनेकांची धारणा आहे. त्यासाठी विज्ञान व अध्यात्म यांचा समन्वय व्हायला पाहिजे असेही त्यांचे म्हणणे असते. प्रकृति-पुरुष, जन्म-पुनर्जन्म इत्यादी अध्यात्माचा जो ‘पूर्वजांनी सांगितले म्हणून खरे माना’ असा भाग आहे, त्याचा आणि पुरावा-पडताळा इत्यादी तर्कबुद्धीने पुरस्कारलेल्या निष्कर्षांचा आग्रह धरणारे विज्ञान, यांचा समन्वय करायला जाणे म्हणजे जनमानसाला गोंधळात टाकणे होय. परंतु जगावे कसे, चांगले काय आणि वाईट काय, याची जी शिकवण अध्यात्म-ग्रंथातून आहे, तिचा विचार करू. सर्वपरिचित म्हणून गीतेच्या एका भागाचे उदाहरण घेता येईल.
गीतेच्या सोळाव्या अध्यायात ‘दैवी’ गुण व ‘आसुरी’ गुण यांची चिकित्सा केली आहे. निर्भयता, शुद्ध बुद्धी, दान, सौजन्य, अहिंसा, क्रोध-रहितता, निरहंकारिता, दोष टाकून गुण घेण्याची दृष्टी, भूतदया, मृदुता, लज्जा, इंद्रियांच्या क्रियांचा थंडपणा, क्षमा, धैर्य इत्यादी (‘दैवी’) गुण व्यक्तिगत व समाजधारणेला उपकारक आहेत; आणि दांभिकपणा, मद, क्रोध, निष्ठुरता, अज्ञान, दुराग्रह, पापाचरण, अन्यायाने द्रव्यसंचय इत्यादी दुर्गुण (‘आसुरी गुण’) टाळले पाहिजेत यात शंकाच नाही. पण ते का टाळायचे तर तसे न केल्यास नरकात जावे लागेल, पशुपक्ष्यादिकांच्या, आसुरी जन्मात जावे लागेल म्हणून? आणि मी जर नरक आणि पुनर्जन्म मानत नसलो तर?
शुद्ध वैज्ञानिक दृष्टीने पाहिले म्हणजे लक्षात येते, की हे गुण मानसशास्त्राच्या, समाजशास्त्राच्या कक्षेतले आहेत, आणि त्या दृष्टीने त्यांचे शिक्षण लहानपणापासून दिले पाहिजे—-स्वर्ग-नरक इत्यादी सर्व उल्लेख बाजूला ठेवून. दुसऱ्याचे धन का लुबाडू नये, तर माझे धन लुबाडले गेल्यास मला किती दुःख होईल, मग तोही माझ्यासारखाच माणूस आहे ना, सर्वच जण असे दुसऱ्याची पर्वा न करता वागू लागले तर समाजाची घडी कशी विस्कटेल . . . अशा त-हेचे, मानवाविषयी सहसंवेदना आणि सामाजिक जाणीव जागत करणारे, शिक्षण दिले पाहिजे. खरे तर ‘देव शिक्षा करील’ अशा त-हेची ‘आध्यात्मिक’ भीती घालण्याचा. शिक्षकाच्या छडीइतकाही उपयोग होत नाही हे गेल्या काही हजार वर्षांच्या इतिहासातून सिद्ध झालेले आहे.
एके काळी, भारतातच नव्हे तर अखिल जगात, तत्त्वज्ञान, धर्म, अध्यात्म, विज्ञान ही सर्व एकाच छत्राखाली वावरत होती. किंबहुना, ही सर्व तत्त्वज्ञानाचाच प्राण होती. त्यामुळे, वेदात सृष्टिविज्ञान सांगितले आहे या गोष्टीचा काही खास म्हणून उल्लेख करण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. आज मात्र या प्रत्येक ज्ञानशाखेने स्वतःचे स्वतंत्र साम्राज्य उभारले आहे. त्यांचे शिक्षणही, त्यांची विनाकारण एकमेकांत गल्लत न करता, जनसामान्यांना दिले पाहिजे.
वेद-उपनिषदादि ग्रंथ, योगशास्त्र, आयुर्वेद इत्यादी हजारो वर्षांच्या भारतीय अनुभवातून जन्मलेल्या साहित्यात शरीरविज्ञान, मानसशास्त्र, पदार्थविज्ञान, रसायन, औषधी इत्यादींविषयक ज्ञान तज्ज्ञांनी अभ्यास करून अवश्य वेगळे काढले पाहिजे. या विषयांत अर्वाचीन काळात भारतात व विशेषतः पाश्चात्त्य जगतात जी वेगवान प्रगती झाली आहे, तिचाही तौलनिक अभ्यास करून या दोन्हींचा जनतेच्या उपभोगासाठी समन्वय घडवला पाहिजे. ‘अध्यात्म’ व विज्ञान यांचा समन्वय कुठे शक्य, आवश्यक व इष्ट असेल तर तो फक्त या बाबतीत आहे.
एरवी, उदाहरणार्थ शरीर-मनाच्या स्वास्थ्यासाठी योगासनांचे शिक्षण देताना आम जनतेला पातंजलयोगाच्या आध्यात्मिक बंधात अडकवण्याचे काहीच कारण नाही. पारंपरिक अध्यात्मविचारांच्या जाळ्यात अडकूनच माणसे अंधश्रद्धेच्या प्रवाहात वाहत जातात. कुणी कशासाठी आणि कोणते आसन कसे करावे, प्राणायामात मोडणाऱ्या श्वासोच्छ्वासाच्या कोणत्या क्रिया कराव्यात यांविषयीचे तज्ज्ञांचे मार्गदर्शन योगासने शिकू इच्छिणाऱ्या आजच्या व्यक्तीला पुरेसे आहे.
स्वप्न, 44, विजयानगर कॉलनी, 2096 सदाशिव पेठ, पुणे — 411 030

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.