विसावे शतक: विज्ञानाचा दुतोंडीपणा

विज्ञान हा कधीच मूल्य-विरहित उद्योग नव्हता. आणि विज्ञानाच्या दुतोंडीपणाची व दुधारीपणाची वस्तुस्थिती अत्यंत नियमितपणे विसाव्या शतकात प्रकट झालेली आहे. ‘रसायनशास्त्राद्वारे अधिक सुखकर जीवन’ ही घोषणा रंगविली जाण्यापूर्वीच पहिल्या महायुद्धाच्या आघाडीवर क्लोरीन वायूच्या ढगांनी मृत्यूचे थैमान घातले होते. त्यानंतर दुसरे महायुद्ध व शीतयुद्ध यांनी अणुविभाजन व अणुसम्मीलन यात दडलेल्या भयावह शक्तीचे दर्शन घडविले आणि एका नवीन प्रकारच्या प्रलयंकारी भीतीला जन्म दिला. त्यानंतर रेचल कार्सन आल्या. मानवनिर्मित रसायने विस्तृत प्रमाणावर परिसरात विखुरली गेल्याने जागतिक पातळीवरील पर्यावरणाला निर्माण झालेल्या धोक्याकडे त्यांनी जगाचे लक्ष वेधले. त्यांचा इशारा 1970 च्या व 1980 च्या दशकांत अधिकच ठाशीवपणे जाणवला, कारण या काळात औद्योगिकरणाची प्रक्रिया व त्यातील उत्पादने यांचा ओझोनच्या थराला पडलेले छिद्र आणि जागतिक तापमानाची वाढ अशा पृथ्वीवरील जीवसृष्टीला धोकादायक ठरणाऱ्या बदलांशी असलेला संबंध लक्षात आला.
सध्या आपली जनुकीय जडणघडण समजून घेण्याची आणि तीत बदलही घडवून आणण्याची क्षमता झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे वैद्यकीय पातळीवर जवळजवळ आदर्श वाटणाऱ्या शक्यता दिसू लागल्या आहेत. परंतु भविष्यातील या चमचमणाऱ्या स्वप्नांच्या जोडीला गर्भगळित करून टाकणारे धोकेही उभे आहेत. नोकरीधंद्यात जनुकीय घडणीवर आधारित भेदभाव येण्यापासून ते थेट भविष्यातील सर्व पिढ्यांच्या जनुकीय घडणीत अक्षरशः घोटाळा करून टाकणारी चूक होण्याच्या शक्यतेपर्यंत. आपल्या वाढलेल्या व्यापामुळे आणि प्रभावामुळे विज्ञान आता मानवी समाजातील सर्वात महत्त्वाच्या मूल्यांतही गुरफटले गेले आहे. आणि यामुळे येत्या सहस्त्रकातील वैज्ञानिकांच्या शिरावर अभूतपूर्व अशी जबाबदारी आलेली आहे.
– संपादकीय टिपणातून, ‘सायन्स’ सहस्त्रक विशेषांक,

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.