आकलनातील अडथळा

आपल्याकडे थोर व्यक्तींना देवपण देण्याची खोड आहे. यामुळे त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाला खरीखुरी बाधा जरी येणार नसली तरी आपल्या आकलनाला निश्चितच येते. त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाकडे आपण नेमकेपणाने पाहू शकत नाही. देवच म्हटल्यावर काय हो? तो काहीही करू शकतो. तो श्रेष्ठच असतो. त्याला वेगळ्या कष्टांची काही जरूरच नसते. दुसरे अशा ‘देवांच्या’ कर्तृत्वातून आपण कोणतीही प्रेरणा खऱ्या अर्थाने घेऊ शकत नाही. तो देव आहे, आपण मात्र माणूस. आपले हात लहानसे असतात. परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य त्यांत कुठून असणार — अशी एक सबब आपसूक तयार होते. श्रेष्ठ व्यक्तींच्या जीवनपटाकडे बघण्यामागचा तुमचा-आमचा — सामान्य माणसांचा जो हेतू असतो —- असायला हवा, तो पुराच होत नाही. म्हणून अगदी थोर व्यक्तींकडेदेखील माणूस म्हणून बघता यायला हवे. त्यांच्या काळाच्या संदर्भात विविध दृष्टिकोनांमधून तपासता यायला हवे, त्यातले चांगले-वाईट, दोन्हीही पारखता यायला हवे. . . आणि आपल्या काळाच्या दृष्टीने त्याची योग्यायोग्यता ठरवता यायला हवी.
पालकनीती, १६ फेब्रुवारी २००४ च्या अंकाच्या ‘संवादकीया’तून.