विज्ञान ही काय चीज आहे? (उत्तरार्ध)

थॉमस कून यांचा वैज्ञानिक क्रांतींची संरचना (The Structure of Scientific Revolutions) हा ग्रंथ 1962 साली प्रसिद्ध झाला. त्यानंतरच्या चाळीस वर्षांत या ग्रंथावर जगात हजारो शोधनिबंध लिहिले गेले असतील. या ग्रंथामुळे विज्ञानाकडे बघण्याच्या एकूणच दृष्टिकोनात क्रांती घडून आली. विज्ञान म्हणजे काय हा विचार करताना कूनपूर्व आणि कूनोत्तर असे दोन कालखंड पडतात. अर्थात ते अगदी काटेकोर कालगणनेनुसार नव्हेत. कारण इ.स. १९६२ नंतरही कूनपूर्व कालखंडातील दृष्टिकोनाचा पाठपुरावा करणारे अनेक तत्त्वज्ञ आढळतात. किंबहुना कून यांच्या प्रबंधाने सुरू झालेली चर्चा अजूनही संपलेली नाही. एवढे मात्र खरे की १९६२ नंतर ज्याला कूनीय वा कूनोत्तर दृष्टिकोन म्हणता येईल तो रुजत गेला आणि सध्याचा विज्ञानाच्या अभ्यासाचा प्रचलित, अधिकृत, वर्चस्वी दृष्टिकोन तोच आहे. विज्ञानाचा कूनपूर्व विचार लेखाच्या पूर्वार्धात पाहिला, येथे कूनोत्तर विचाराची चर्चा करायची आहे.
कून व त्याचे पॅरडाइम:
कून यांनी असे काय केले की त्यामुळे भक्कम वस्तुनिष्ठ पायावर उभ्या असलेल्या विज्ञानाच्या तत्त्वज्ञानाला हादरा मिळाला? कून यांनी ‘काय आहे? काय घडते?’ या प्रश्नाची प्रामाणिक चर्चा सुरू केली. त्याच्या आधी या प्रश्नाच्या नावे आणि निमित्ताने ‘काय असायला हवे?’ याचीच चर्चा होत असे. कून यांनी विज्ञानाचे सतत वाढणारी राशी असे, संचयात्मक रूप गृहीत धरले. त्यांनी एकेक वैज्ञानिक सिद्धान्त हे अभ्यासाचे एकक घेतले नाही, तर एकमेकांशी संबंधित सिद्धान्तांचा गट, सिद्धान्तावली, हे एकक मानले. त्यांची अशी सिद्धान्तावली एका सामाईक विचारधारेने, पॅरॅडाइमने (ठ्ठद्धठ्ठड्डत्न) बांधलेली असते. पॅरॅडाइम (विचारधारा) हा कूनीय तत्त्वज्ञानाचा कळीचा शब्द. कून यांनी तो दोन अर्थानी वापरला. एक म्हणजे वर दिलेला सिद्धान्तावलीला बांधणारे विचारधारासूत्र हा अर्थ. दुसरा म्हणजे सिद्धान्तावलीचे सामाईक सूत्र स्थापन करणारा नमुनेदार सिद्धान्त. पहिला अर्थ सार्वत्रिक तर दुसरा अर्थ स्थानिक म्हणता येईल. कून यांच्या मते विज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्राची गती एका पॅरॅडाइमकडून दुसऱ्या पॅरॅडाइमकडे अशी असते. ही गती चक्रीय असेत. ते क्षेत्र एका अवस्थाचक्रातून जाते. त्यातील पॅरॅडाइम रुजण्यापूर्वी ते विज्ञानपूर्व (द्रद्धड्ड-द्महत्ढदड़ड्ड) अवस्थेत असते. त्यानंतर तो रुजला, स्थिरावला की ते क्षेत्र नेहमीच्या, प्रसामान्य (ददृद्धश्ट) विज्ञानावस्थेत येते. बहसंख्य वैज्ञानिक कार्य हे या प्रसामान्य अवस्थेतील असते. कालांतराने अशी निरीक्षणतथ्ये जम लागतात की त्यांचा प्रचलित पॅरॅडाइमधील प्रसामान्य विज्ञान उलगडा करू शकत नाही. न सुटलेले प्रश्न, असंगती (ठुददृश्ठ्ठड्डम) वाढू लागल्या की एखाद्या पर्यायी सिद्धान्ताचा जम बसतो; त्याचा स्वतःचा पॅरॅडाइम बनतो आणि तो आधीच्या पॅरॅडाइमची जागा घेतो, प्रचलित होतो. कधी कधी असंगती निर्माण झाल्या, परंतु नव्या पॅरॅडाइमचा उदय झाला नाही, तर अशा काळात एखाद्या क्षेत्रात विज्ञानपूर्व अवस्था चालू राहते.
प्रचलित पॅरॅडाइम, विचारधारा त्या त्या विज्ञानक्षेत्राला एक शिस्त, अनुशासन, बैठक, सुरक्षितता, दिशा देते. जसे, सतराव्या शतकात न्यूटनचे यंत्रशास्त्र आणि गुरुत्वाकर्षणाचा नियम प्रस्थापित झाले आणि एकूणच भौतिकशास्त्रात एक नवीन विचारधारा, पॅरॅडाइम निर्माण झाला; तो रुजला, स्थिरावला आणि अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत भौतिकशास्त्रावर अधिराज्य करता झाला. (एकोणविसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकांत एकामागोमाग एक घडून आलेल्या, हर्झ यांचे विद्युत्चुंबकीय प्रारणावरचे प्रयोग, मायकेल्सन आणि मोर्ले यांचा ईथर नावाचे द्रव्य अवकाश व्यापून राहिलेले आहे, हा विश्वास नाकारणारा प्रयोग, कॅथोड किरणांचा आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनचा शोध, प्रकाशविद्युतीय आणि उष्णताविद्युतीय परिणाम, क्ष-किरणांचा शोध, किरणोत्सर्गाचा शोध अशा भौतिक घटनांचे स्पष्टीकरण न्यूटनीय भौतिकशास्त्राला देता आले नाही. मग अशा वाढलेल्या असंगतींच्या झंझावातात एका बाजूने सापेक्षता सिद्धान्त आणि दुसऱ्या बाजूने क्वांटम भौतिकी यांनी न्यूटनीय पॅरॅडाइमला कायमचे धक्के दिले आणि आपापले नवीन पॅरॅडाइम प्रस्थापित केले.)
पॅरॅडाइम या संज्ञेच्या सार्वत्रिक अर्थामध्ये स्थानिक अर्थ समाविष्ट असतोच, म्हणजे पॅरॅडाइम ज्या नमुनेदार सिद्धान्तामुळे जगापुढे येतो तो सिद्धान्त या अर्थामध्ये सामावलेला असतोच. शिवाय या नमुनेदार सिद्धान्ताशी निगडित अन्य सिद्धान्त आणि मूळ व या अन्य सिद्धान्तांची उपयोजने येतात. तसेच या सर्व सिद्धान्तांना सामाईक अशी कार्यपद्धती पॅरॅडाइमच्या सार्वत्रिक अर्थात अंतर्भूत असते. जसे न्यूटनीय पॅरॅडाइममध्ये न्यूटनचे यंत्रशास्त्रीय नियम, त्याचा गुरुत्वाकर्षणाचा नियम आणि या दोन्हींवरची उदाहरणे, उपयोजने तर येतातच, परंतु या सर्व उपयोजनांना सामाईक अशी औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही स्वरूपांची उद्दिष्टगामी (ण्ड्डद्वद्धत्मद्यत्ड) कार्यपद्धतीही येते. या कार्यपद्धतीनुसार कोणत्याही यंत्रशास्त्रीय समस्येमध्ये आपण मुक्त वस्तू निश्चित करतो, त्या वस्तूवरची बले ओळखतो, तिच्या स्थिति-गतीवर असलेल्या मर्यादा लक्षात घेतो, असंतुलित बल आणि त्वरण यांना जोडणारे (ठुड्डड्डण्डद्धठ्ठद्यत्दृद) गतीचे समीकरण मांडतो, ते सोडवतो आणि उकलीचा अर्थ लावतो. ही न्यूटनीय कार्यपद्धती अवलंबण्यामागे ‘ती चालते’ हा विश्वास निहित असतो. किंबहुना या विश्वातील सर्व वस्तू न्यूटनीय यंत्रवत आहेत, त्याच्यावरील बले आणि स्थिति गतीच्या मर्यादा निश्चित करणे कठीण व गुंतागुंतीचे असेल, पण तत्त्वतः ती न्यूटनीय यंत्रशास्त्रीय पद्धती वापरून समजून घेणे शक्य आहे; थोडक्यात हे विश्वच एक न्यूटनीय यंत्र आहे असा वैश्विक विश्वास त्या मागे असतो. पॅरॅडाइमच्या सार्वत्रिक अर्थात असा विश्वास हे विश्वचित्रही अंतर्भूत होते.
जेव्हा एका पॅरॅडाइमची जागा दुसरा पॅरॅडाइम घेतो, तेव्हा मूळ पॅरॅडाइमदर्शी सिद्धान्त, सिद्धान्तावलीच्या उद्दिष्टगामी कार्यपद्धती आणि या पद्धतीमागील हेतू, तात्त्विक भूमिका आणि विश्वचित्र या तिन्ही पातळीवर बदल घडतो. कून या बदलाला वैज्ञानिक क्रांती म्हणतात. राजकीय क्रांतीसारखाच हा बदल मूलगामी असतो, ‘उलथापालथ’ करणारा असतो. विज्ञानाचा प्रवास असा एका क्रांतीकडून दुसऱ्या क्रांतीकडे होत राहतो. दोन क्रांतींच्यामध्ये मात्र प्रसामान्य विज्ञान घडत असते. या प्रसामान्य विज्ञानाचा कार्यक्रम मूल पॅरॅडाइमचे सबलन (reinforcement) आणि या सबलनाच्या अंगाने समस्यांचे निराकरण (problem solving) हा असतो. हा कार्यक्रम पॅरॅडाइमच्या अनुशासनाखाली, त्याच्याशी सुसंगतपणे चालतो. असंयोज्यता (Incommensurability) कून यांच्या विज्ञानचित्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे असंयोज्यतेची संकल्पना. ज्या वेळेस विज्ञानातील एखाद्या क्षेत्रात आणीबाणीची (crisis) स्थिती उद्भवते, असंगती वाढू लागलेल्या असतात आणि नवीन पॅरॅडाइम येण्याची चिन्हे दिसतात, त्या वेळेस काय घडते? नवा पॅरॅडाइम जुन्या पॅरॅडाइमला बाजूला कसा करतो? कून यांच्या मते नवा क्रांतिकारी पॅरॅडाइम प्रस्थापित जुन्या पॅरॅडाइमशी असंयोज्य असतो. त्याची परिभाषा, त्याच्या मूलभूत संकल्पना, विश्वचित्र आणि मुख्य म्हणजे त्याची प्रमाणे (स्टँडर्डे) — ज्या कसोट्यांच्या द्वारा त्याची योग्यायोग्यता, प्रायोगिक पडताळा व उपयोजनीयता आणि सैद्धान्तिक सुसंगती ठरवायची त्या — वेगळ्या असतात. नवीन पॅरॅडाइम जन्या पॅरॅडाइमच्या सिद्धान्तावलीला न सोडवता आलेली कोणती तरी समस्या सोडवन पढे येतो; ही समस्या जुन्या पॅरॅडाइमच्या आवाक्यातलीही नसते आणि ती सोडवताना नव्या संकल्पना, नव्या कसोट्या, नव्या परंपरा निर्माण होतात. नव्या आणि जुन्या पॅरॅडाइमची तुलनाच करता येणे शक्य नसते. हे पुढील उदाहरणाने स्पष्ट होईल. इ. स. १८८५ च्या सुमारास मायकेल्सन आणि मोर्ले यांनी त्यांचा सुप्रसिद्ध प्रयोग केला. ईथरच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी केल्या गेलेल्या या प्रयोगाचा निष्कर्ष नकारात्मक आला. (ईथर नावाचा द्रव सर्व अंतराळात भरून राहिला आहे आणि प्रकाशतरंग या ईथर माध्यमातील तरंग आहेत असे त्याकाळी मानले जाई. परंतु कोणत्याही निरीक्षणाद्वारा वा प्रयोगाद्वारा ईथर अस्तित्त्वात आहे असे दिसले नव्हते.) त्या काळाच्या (अभिजात) भौतिकशास्त्रानुसार माध्यमाशिवाय तरंगाचे प्रसारणच होऊ शकत नसल्याने ईथरचे अस्तित्व सिद्ध न होणे ही त्या भौतिकशास्त्राच्या दृष्टीने मोठी असंगती होती. अभिजात भौतिकशास्त्राच्या कक्षेत राहून अनेकांनी या असंगतीचे निराकरण करण्याचे प्रयत्न केले, परंतु ते अयशस्वी ठरले. आइन्स्टाइन याच्या विशिष्ट सापेक्षता सिद्धान्ताने ईथरचे अस्तित्वच अनावश्यक मानले; एका अर्थी मायकेल्सन आणि मोर्ले यांच्या प्रयोगाचा निष्कर्ष गृहीत धरला. या सिद्धान्ताने स्थल, लांबी, काल, एकसामयिकता, (simultaneity) वस्तुमान व ऊर्जा यांच्या कल्पनाच इतक्या बदलून टाकल्या, की जुन्या भौतिकशास्त्राच्या संदर्भात त्या समजून घेणे, ज्या कसोट्यांवर नवे भौतिकशास्त्र स्वीकारायचे त्या कसोट्यांचा जुन्या संदर्भात अर्थ लावणे अशक्य ठरले. कून यांच्या मते जुनी (अभिजात) आणि नवी (सापेक्षता सिद्धान्तावर आधारलेले) भौतिकशास्त्रे असंयोज्य आणि म्हणून एकमेकांशी अतुलनीय आहेत.
जर नवीन आणि जुना पॅरॅडाइम असंयोज्य असेल तर कोणत्या कसोटीवर जुना पॅरॅडाइम टाकायचा आणि नवा घ्यायचा? कून यांच्या प्रतिपादनानुसार यासाठी कोणताही तर्कनिष्ठ निकष नाही. हे ठरवायचे वैज्ञानिकांच्या समुदायानेच, म्हणजे हा प्रश्न त्या समुदायाचा समाजशास्त्रीय (sociological) प्रश्न आहे. जुन्या पॅरॅडाइमला चिकटून राहणाऱ्या वैज्ञानिकांची संख्या बवंशी ते वृद्ध वा क्षेत्रातून निवृत्त झाल्याने कमी होते; नवा पॅरॅडाइम स्वीकारणाऱ्यांची संख्या वाढते; काही जण जुन्याकडून नव्याकडे आपली ज्ञाननिष्ठा बदलतात (gestalt switch) आणि कालांतराने नवा पॅरॅडाइम स्थिर होतो. उद्गमनवादाने निरीक्षणांवरून उद्गामी पद्धतीने सिद्धान्त संकल्पना (hypothesis) मांडली जाते असे सांगितले होते; हे सांगणे म्हणजे शोधाचे तर्कशास्त्र (Logic of discovery) पॉपर यांनी अनावश्यक ठरवले. मात्र त्यांनी एकदा सिद्धान्त संकल्पना मांडली गेली की तिचे तार्किक समर्थन द्यावे लागते आणि खोडताळ्याच्या बुद्धिनिष्ठ कसोटीवरच ती स्वीकारली जाते असे म्हटले होते. जर एखाद्या क्षेत्रात दोन प्रतिस्पर्धी पॅरॅडाइमपैकी एकाचा स्वीकार करायचा असेल तर त्यासाठी खोडताळ्याचीच कसोटी वापरली जाईल असा त्यातून अर्थ निघतो. कून यांनी हे समर्थनाचे तर्कशास्त्रही अमान्य केले. यासाठी विज्ञानात काय घडते ह्याची त्यांनी नोंद घेतली. पॅरॅडाइम बदलाच्या वेळी
वैज्ञानिक समुदायाच्या सामाजिक पसंतीनेच हा बदल घडतो असा निरीक्षणावर आधारित युक्तिवाद केला.
कून यांची असंयोज्यतेची ही संकल्पना विवाद्य ठरली आहे. या नव्या जुन्या पॅरॅडाइमच्या असंयोज्यतेमुळे कोणता पॅरॅडाइम ‘वैध’ आहे हे ठरवता येत नाही. प्रत्येक पॅरॅडाइम आपाआपल्या कार्यक्षेत्रात आपआपल्या सुसंगत निकषांनुसार समाधानकारक असतो. तात्त्विक दृष्ट्या असा दृष्टिकोन सापेक्षी (द्धड्डठ्ठद्यत्धमद्य) म्हणता येईल. या युक्तिवादाचा एक परिणाम असा की जुन्याकडून नव्या पॅरॅडाइमकडे जाणे हा बदल, अगदी क्रांती म्हणता येईल, मात्र ती ‘प्रगती’ नव्हे. या अर्थी विज्ञान हे सतत प्रगत होते असे म्हणता येत नाही. आइन्स्टाइन यांच्या सापेक्षता सिद्धान्ताने अभिजात भौतिकशास्त्राचा पुढचा, प्रगत टप्पा गाठला अशी समजूत असणाऱ्या वैज्ञानिकांना हा कूनीय युक्तिवाद योग्य नाही असे वाटले तर नवल नाही. कून यांनाही ती जाणीव होती, परंतु त्यांनी ही उणीव भरून काढण्याचा जोरदार प्रयत्न केला नाही. वरील सापेक्षी यक्तिवाद पॉल फायराबेड यांनी कन यांच्याहीपढे नेला. एखादा पॅरॅडाइम सोडायचा आणि दुसरा स्वीकारायचा यासाठी पॅरॅडाइम-निरपेक्ष, त्याच्या बाहेरील कसोटी नाही; सोडणे-स्वीकारणे हे ठरते ते वैज्ञानिकांच्या सामुदायिक पसंतीनेच हा मुद्दा त्यांनी मांडला. त्यांच्या मते विज्ञान म्हणजे वैज्ञानिकांच्या जमातीने केलेला सांस्कृतिक व्यवहार. विज्ञान हे अन्य प्रकारच्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ नाही. एखाद्या समुदायाने, जमातीने परस्परसंमतीने आपल्याला आवश्यक आणि पुरेसे सुसंगत नियम बनवून त्यांचे आदानप्रदान केले, ‘ज्ञानव्यवहार’ केला, तर तो विज्ञानाइतकाच ग्राह्य धरायला हवा. एखाद्या आदिवासी जमातीच्या जादूटोण्यावर आधारित सांस्कृतिक व्यवहाराला, ज्ञानाला, तेवढीच वैधता आहे जेवढी विज्ञानाला आहे. खरे म्हणजे फायराबेंड यांच्या या कसोटीवर विज्ञान आणि ज्योतिष एकाच पातळीवर येतात.
फायपरबेंड यांचे “Against Method’ हे अतिशय प्रसिद्ध पुस्तक. त्यात त्यांनी आपली ‘अतिसापेक्ष’ भूमिका मांडली आहे. त्यांचे प्रतिपादन हे की विज्ञानाच्या; विशेषतः भौतिकशास्त्राच्या इतिहासात असे दिसते की जिला निश्चितपणे, स्थिरपणे, वैज्ञानिक पद्धत म्हणता येईल अशी पद्धत केव्हाही अवलंबली गेली नाही; किंबहुना विज्ञान विकासाला निश्चित पद्धतच नाही; आहे ती वैज्ञानिकांच्या समुदायाने परस्पर संमतीने वैध ठरवलेला ज्ञानव्यवहार. कशाला ज्ञान म्हणायचे, त्याची उद्दिष्टे काय, कोणता सिद्धान्त स्वीकारायचा हे निर्णय त्या समुदायाचेच असतात.
कून यांचे योगदान:
सापेक्ष युक्तिवादाची उणीव सोडली तर कून यांनी विज्ञानाकडे पाहण्याची दृष्टी क्रांतिकारकरीत्या बदलली यात शंका नाही. त्यांनी विज्ञानाच्या तत्त्वज्ञानाला जमिनीवर आणले. त्यांच्यापूर्वी काय घडायला हवे, विज्ञान कसे असावे याचा आदर्शी (normative) विचार आणि काय घडते याचा वर्णनात्मक (descriptive) विचार याची गल्लत होत होती. विज्ञान कसे असावे याबद्दलचे विचार विज्ञान कसे घडते या चर्चेच्या निमित्ताने विज्ञानावर लादले गेले होते. अर्थात हे विचार तर्कनिष्ठ होते आणि विज्ञानाच्या प्रवाहाची काही अंगे त्यासंबंधीची काही उदाहरणे विशद करू शकत होते, परंतु त्यांच्यात ‘मानवाला’स्थान नव्हते; विज्ञान हे मानवी व्यवहाराचा भाग म्हणून पाहिले जात नव्हते; त्याच्या कसोट्या अतिमानवी, ‘वरून’ कोठून तरी खाली काय चालले आहे हे पाहण्यासारख्या होत्या. कून यांनी एका अर्थी विज्ञानाची गूढता दूर केली, विज्ञान सामान्यांपर्यंत नेले. (किंवा स्टीव्ह फुलर म्हणतात त्याप्रमाणे ‘सामान्याला’ विज्ञानाकडे आणले.)
आधुनिक जगात विज्ञान हा एक संघटित व्यवहार झाला आहे. प्रसामान्य विज्ञानाच्या प्रक्रियेद्वारा कून यांनी या विज्ञानव्यवहाराची नस बरोबर पकडली असे म्हणता येईल. पॅरॅडाइम ही कल्पना त्यांनीच रुजवली. त्यांचा दृष्टिकोन सापेक्षी युक्तिवादाला, रेलटिव्हिझमला, जन्म देणारा होता. परंतु त्यांनी वैज्ञानिक समुदायाची, त्यांच्या निर्णयाची, जी नोंद घेतली ती पूर्वी कोणीच घेतली नव्हती. विज्ञान मानवी आहे आणि म्हणून मानवाच्या उणीवा, अपयश (failing) यांना विज्ञानाच्या वाटचालीत महत्त्वाचे स्थान आहे हे त्यांनी दाखवून दिले. त्यांची तात्त्विक विचारसरणी नैसर्गिकवादी (Naturalistic) म्हणता येईल. त्यांच्या पूर्वीच्या विज्ञानविषयक प्रचलित सिद्धान्तांचा, तार्किक अनुभववादाचा पाया तर्कनिष्ठेचा (Rationalism) होता. कून यांनी जे घडले त्याची नोंद घेऊन त्यावर आधारित नैसर्गिक चर्चा केली. लाकातोश व त्यांचे संशोधन-कार्यक्रम :
कून यांचे समकालीन इमे लाकातोश यांच्या कामाचा उल्लेख खरे म्हणजे लेखाच्या पूर्वार्धात यायला हवा होता. कारण लाकातोश पॉपर यांच्या परंपरेत बसतात. त्यांनीही कून यांच्याप्रमाणेच एकेक सिद्धान्त हा अभ्यासाचा घटक न घेता सामाईक आशयधारेने जोडलेल्या सिद्धान्तांचा गट, संशोधन कार्यक्रमाची परंपरा, हा घटक धरला. संशोधन कार्यक्रमाला (Research programme) दोन अंगे असतात, एक तडजोडनीय नसलेला असा गाभा (hard core) आणि दुसरे गाभ्याभोवतालचे संरक्षक कवच (protective belt). जसे, न्यूटनीय संशोधन-कार्यक्रमामध्ये न्यूटनचे गतिविषयक नियम आणि गुरुत्वाकर्षणाचा नियम या कार्यक्रमाचा गाभा आहेत, तर त्याचे व्यावहारिक उपयोजन करताना जी गृहीते घ्यायची ती संरक्षक कवचाचा भाग समजायची. संशोधन-कार्यक्रमाला आह्वान निर्माण झाले, कूनीय परिभाषेत असंगती दिसू लागली की प्रथम संरक्षक कवचात योग्य बदल करून बघायचा; गाभ्याला हात लावायचा नाही. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर लागलेला नेपच्यून ग्रहाचा शोध न्यूटनीय संशोधन-कार्यक्रमाच्या संदर्भात याच तत्त्वाचा नमुना म्हणता येईल. त्यावेळेस जे ग्रह माहीत होते त्यांचे आणि सूर्याचे गुरुत्वाकर्षण लक्षात घेऊनही युरेनसच्या गतीचा योग्य उलगडा होत नव्हता. गुरुत्वाकर्षणाचा नियमच सोडून देण्याऐवजी, न्यूटनीय संशोधन-कार्यक्रमाच्या गाभ्याला हात लावण्याऐवजी, वैज्ञानिकांनी असे अनुमान काढले की माहीत असलेल्या ग्रहांच्या पलीकडे एखादा ग्रह असला पाहिजे आणि त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम युरेनसवर होत असला पाहिजे. या अनुमानानुसार वरील नव्या ग्रहाची कक्षा, वस्तुमान इत्यादींचा अंदाज घेण्यात आला आणि त्यानुसार नेमके निरीक्षण करता नेपच्यूनचा शोध लागला.
लाकातोश यांच्या प्रतिपादनानुसार संशोधन कार्यक्रम पुरोगामी (progressive) आणि प्रतिगामी (degenerate) दोन प्रकारचे असतात. पुरोगामी संशोधन- कार्यक्रम विज्ञानाला पुढे नेतात, ते नवीन शोध लावण्याच्या, ज्ञाननिर्मितीच्या दृष्टीने उत्पादक असतात, तर प्रतिगामी सिद्धान्त यादृष्टीने अनुत्पादक असतात, काळाच्या ओघात ते टिकत नाहीत. जसे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला आइन्स्टाइन यांच्या विशिष्ट सापेक्षता-सिद्धान्ताने आणलेला संशोधन कार्यक्रम किंवा क्वांटम भौतिकीच्या सिद्धान्ताने सुरू झालेला संशोधन कार्यक्रम हे दोन्ही पुरोगामी ठरले, कारण पुढच्या संशोधनासाठी ते अतिशय उपयुक्त व उत्पादक होते. याउलट यासंदर्भात न्यूटनीय यंत्रशास्त्रावर आधारित अभिजात भौतिकशास्त्राचा संशोधन कार्यक्रम अनुत्पादक व म्हणून प्रतिगामी ठरला. वैज्ञानिक क्रांती म्हणजे एखाद्या क्षेत्रातील रूढ संशोधन कार्यक्रमाऐवजी नवीन संशोधन कार्यक्रमाची स्थापना. ही क्रांती तर्कनिष्ठ कसोट्यांच्या, पडताळा आणि खोडताळा यांच्या, जोरावर होते. (लाकातोश यांनी पॉपर यांचा युक्तिवाद बवंशी स्वीकारला होता. मात्र त्यांनी खोडताळ्याइतकेच पडताळ्याला महत्त्व दिले. जर संशोधन कार्यक्रमाच्या संरक्षक कवचामध्ये योग्य बदल करून गाभा टिकवून धरायचा असेल तर पडताळा महत्त्वाचा ठरतो. या आधी दिलेल्या नेपच्यून ग्रहाच्या शोधाच्या उदाहरणातून हेच दिसून येते).
लॉडन आणि संशोधन परंपरा:
कून, लाकातोश यांच्या मालिकेत आणखी एक नाव घेतले जाते ते लॅरी लॉडन यांचे. त्यांनीही सिद्धान्ताचा गट, त्याला ते संशोधन-परंपरा (research tradition) म्हणतात, हे अभ्यासाचे एकक घेतले. विज्ञानातील क्रांती एक संशोधन परंपरा जाऊन दुसरी परंपरा येण्याची असते आणि हे जेव्हा घडते त्यावेळेस पॅरॅडाइमचा बदल होतो. लॉडन यांचा पॅरॅडाइम बदल कून यांच्या कल्पनेपेक्षा वेगळा आहे. कून यांच्या मते पॅरॅडाइम बदलताना सिद्धान्त-त्यांच्या पद्धती आणि हेतू-तीन्ही, बदलतात; तर लॉडन यांच्या मते या तीन्ही गोष्टी एकदम बदलत नाहीत. सिद्धान्त आणि पद्धती बदलल्या तरी हेतू (सिद्धान्तामागील तत्त्वज्ञान) त्याचवेळेस बदलत नाहीत; ते कालांतराने बदलतात. तसेच सिद्धान्त आणि पद्धतीही एकाच वेळेस बदलतील असे नाही. अशा पायरीपायरीने होणाऱ्या बदलामुळे लॉडन कूनीय असंयोज्यता टाळतात. कारण जर हेतू तेच राहिले तर नवीन आलेला सिद्धान्त आणि त्याच्या पद्धती (पॅरॅडाइम) यांची जुन्याशी तुलना करण्याकरता आपल्याकडे मार्ग राहतो. या तुलनेसाठी ज्या कसोट्या वापरायच्या त्या लाकातोश वा पॉपर यांच्या व्यापक तर्कनिष्ठ कसोट्या नव्हेत, त्या मर्यादित अर्थाने तर्कनिष्ठ असतात; अशा तर्कनिष्ठेला, तर्कप्रामाण्याला साधनात्मक तर्कप्रामाण्य (instrumental rationa-lity) म्हणतात. दिलेली तात्कालिक, स्थानिक उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने तर्कदृष्ट्या योग्य निर्णय घेणे म्हणजे साधनात्मक तर्कप्रामाण्याचा वापर करणे. लॉडन यांच्या तत्त्वज्ञानाचे आणखी एक वेगळेपण आहे, ते म्हणजे त्यांचा प्रतिवास्तववाद (antirealism). त्यांच्या मते विज्ञानाचा मुख्य हेतू सत्याकडे जाणे हा नव्हेच. पॉपर आणि त्याच्या समकालीन विज्ञान-तत्त्वज्ञांनी अभिसारी वास्तववादाची (convergent realism) कल्पना मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार विज्ञान जसजसे प्रगत होत जाते, तसतसे ते सत्याच्या अधिकाधिक जवळ जाते. लॉडन आणि त्याच्यानंतरच्या अनेक तत्त्वज्ञांनी अभिसारी वास्तववादावर जोरदार टीका केली आहे. लॉडन यांनी फ्लॉजिस्टॉन आणि ईथर यांची उदाहरणे घेतली आहेत. अठराव्या शतकात ऑक्सिजनचा शोध लागण्यापूर्वी पदार्थ जळणे म्हणजे त्यांच्यातील फ्लॉजिस्टॉन नावाचे द्रव्य निघून जाणे अशी वैज्ञानिकांची धारणा होती. फ्लॉजिस्टॉनचे अस्तित्व सत्य धरूनच त्या काळी रसायनशास्त्रातील चर्चा होत असे. कालांतराने फ्लॉजिस्टॉन कपोलकिल्पत ठरले. ‘अंतराळ व्यापून टाकणाऱ्या’ ईथरचा उल्लेख आधी आलाच आहे.
त्यतेविषयी कोणालाही शंका नव्हती. परंत या कल्पनेचा फोलपणा नंतर सर्वज्ञात झाला. आजचे आपले सिद्धान्त फ्लॉजिस्टॉन वा ईथरसारखे कशावरून नसतील? त्यांच्या सत्याविषयी आपण कोणताही दावा करू शकत नाही असे लॉडन यांचे म्हणणे. म्हणून ते वास्तववाद, विज्ञान सत्यच आहे किंवा सत्याचे प्रितरूप आहे हा युक्तिवाद, नाकारतात. त्यांच्या मतानुसार विज्ञान ही निरंतर समस्या सोडवण्याची, समस्या निराकरणाची कृती आहे. सत्य वगैरेशी त्याचा संबंध जोडणे योग्य नाही. वाद उदंड झाले:
आणखी पुढे जाण्याअगोदर उदंड झालेल्या निरनिराळ्या वादांची’ उजळणी करणे इष्ट ठरेल. वास्तववाद म्हणजे विज्ञान हे सत्य, वास्तव आहे किंवा सत्याचे प्रतिरूप (representation) आहे ही भूमिका. अनुभववाद म्हणजे विज्ञान निरीक्षणापलीकडे जात नाही हे मानणे. या युक्तिवादानुसार सैद्धान्तिक विज्ञान हे निरीक्षणांचा एकमेकांशी संबंध लावण्यासाठी, ते समजून घेण्यासाठीच असते. उदाहरणार्थ, अणूंतून येणाऱ्या प्रकाशाची तरंगलांबी, अणूचे वस्तुमान, आकार, विद्युतीय व चुंबकीय गुणधर्म निरीक्षणांतून माहीत होतात; मात्र बोर यांच्यासारख्या अणूंच्या प्रतिमानामध्ये इलेक्ट्रॉनची, अणुकेंद्रकाची, त्यांच्या परस्परक्रियेची, इलेक्ट्रॉन गतीची इत्यादी जी कल्पना केली आहे ती सैद्धांतिक आहे; हे प्रतिमान निरीक्षणे समजून घेण्यासाठी सोयीचे एकोणिस गाश मानायचे एवढेच; त्याच्यात वास्तव शोधायचे नाही. वास्तववाद विज्ञानाचे कार्य सत्य शोधणे व त्याचे वर्णन करणे असे समजतो; अनुभववाद निरीक्षणे आणि निरीक्षणांचे सुसूत्रीकरण व स्पष्टीकरण हेच विज्ञानाचे कार्य असे मानतो; तर प्रतिवास्तववादानुसार विज्ञानाचे कार्य या दोन्हीपेक्षा वेगळे आहे. उदाहरणार्थ, लॉडन यांच्या प्रतिवास्तववादानुसार, समस्यानिराकरण हेच विज्ञानाचे कार्य. पॉपर यांना आपण तार्किक अनुभववादी परंपरेत बसवले असले तरी ते वास्तववादी (किंबहुना अभिसारी वास्तववादी) होते हे लक्षात घ्यायला हवे. तर्कप्रामाण्यवाद म्हणजे विज्ञान विकासक्रमात वापरले जाणारे निकष केवळ तर्काधिष्ठित असतात असे मानणे. हे निकष वैज्ञानिकांच्या पसंती-नापसंतीच्या, विज्ञानाच्या बोधीय (ज्ञानात्मक) प्रक्रियांच्या निरपेक्ष असतात असे तर्कप्रामाण्यवाद मानतो. नैसर्गिकवाद प्रत्यक्षात काय घडते हे पाहतो. पॉपर व लाकातोश यांना तर्कप्रामाण्यवादी म्हणता येईल, तर कूनना नैसर्गिकवादी. काही नैसर्गिकवादी एका टोकाची भूमिका घेतात; ते पॉपर-लाकातोश पद्धतीचे तर्कप्रामाण्य तर नाकारतातच, परंतु लॉडन यांच्यासारखे साधनात्मक, मर्यादित तर्कप्रामाण्यही नाकारतात. त्यामुळे कोणत्याही ज्ञानप्रणालीची एक दुसऱ्याशी तुलनाच करता येत नाही. हा झाला सापेक्षवाद. फायराबेंड यांचा युक्तिवाद या प्रकारचा होता. आणखी एक वाद आपल्याला लक्षात घ्यायला हवा, तो म्हणजे रचनावाद (constructivism). रचनावादानुसार विज्ञान हे रचले जाते. ते सत्याचे प्रतिबिंब नसते, तर मानवी मनामध्ये त्याची प्रतिमा उमटल्यावर त्यांतून रचले गेलेले ते प्रतिमान असते. सामाजिक रचनावादामध्ये प्रतिमान रचना ही मुख्यत्वे सामाजिक प्रक्रिया असते; वैयक्तिक रचनावादात ती वैयक्तिक प्रक्रिया असते.
रचनात्मक अनुभववाद:
लेखाच्या उर्वरित भागात आपण प्रथम व्हॅन फ्रासन यांचा रचनात्मक अनुभववाद (constructivistic empiricism), त्यानंतर एडिंबर्ग स्कूलचा विज्ञानाचा समाजशास्त्रवाद (sociology of scientific knowledge) आणि शेवटी रॉनल्ड गिअर यांचा रचनात्मक वास्तववाद (constructivistic realism) पाहणार आहोत. व्हॅन फ्रासन यांनी अनुभववादाचे पुनरुज्जीवन केले आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानात दोन नवीन मुद्दे येतात. एक म्हणजे कोणताही सिद्धान्त हा मानवरचित प्रतिमान असतो. या प्रतिमानाचे दोन भाग असतात : त्यातील एक भाग औपचारिक (formal) भाषेत, सूत्रात, समीकरणात काही गृहीतके घेऊन विकसित केलेला असतो. याचे ठळक उदाहरण म्हणजे भौतिकशास्त्राच्या क्रमिक पुस्तकांत विकसित केलेला यंत्रशास्त्राचा सिद्धान्त. पूर्वीच्या अनुभववादात अशा सिद्धान्ताचा वास्तवाशी थेट संबंध जोडला जात असे. व्हॅन फ्रासनना असा थेट संबंध मान्य नाही. त्यांच्या प्रतिमानातील दुसरा भागही औपचारिक भागाइतकाच महत्त्वाचा आहे. तो म्हणजे औपचारिक भागाचा वास्तवाशी संबंध लावण्यासाठी घेतलेले अनुबंध (correspondence). उदाहरणार्थ, लंबकाच्या गतीचे गणिती समीकरण यंत्रशास्त्राच्या औपचारिक भागात येते; तर या समीकरणातील विशिष्ट चल (variable) प्रयोगशाळेतील लंबकाचे स्थानांतर दाखवतो असा अनुबंध म्हणजेच त्या चलाची आणि लंबकाच्या स्थानांतराची संगती, यंत्रशास्त्राच्या सिद्धान्ताच्या दुसऱ्या भागात येते. या भागात अनुबंध लागू करण्यासाठी ज्या अटी, जी सन्निकटने (approximation) वगैरे पूर्ण करावी लागतात तीही येतात. व्हॅन फ्रासन यांचा दुसरा मुद्दा आहे तो सिद्धान्ताच्या आनुभविक पुरेशापणाचा. त्यांच्या मते कोणताही सिद्धान्त प्रयोगासाठी वा निरीक्षणाच्या स्पष्टीकरणासाठी पुरेसा आहे की नाही हाच निकष तो सिद्धान्त स्वीकारण्यासाठी लावायचा. प्रत्येक सिद्धान्ताला आनुभविक संरचना असते आणि ती निरीक्षणतथ्यांशी जुळली पाहिजे. सिद्धान्ताला या आनुभविक संरचनेपलीकडे शुद्ध सैद्धान्तिक, अनुभवाशी न जोडता येणारे, अंग असू शकते. व्हॅन फासन यांची त्याला हरकत नाही, पण या अंगाला वास्तव जगाशी जोडणे, त्याला वास्तवता बहाल करणे त्यांना मंजूर नाही. म्हणजे बोर यांचे अणुप्रतिमान आनुभविक, प्रायोगिक दृष्ट्या पुरेसे आहे असे ते मानतील; परंतु त्यातील इलेक्ट्रॉनच्या कक्षा इत्यादी संकल्पना, सोयीसाठी वापरल्या गेल्या तरी, त्या खऱ्या आहेत असे ते मानणार नाहीत.
विज्ञानाचे समाजशास्त्र:
विज्ञानविकास समजून घेताना तीन प्रकारचे घटक लक्षात घ्यावे लागतात, एक प्रकार विज्ञानाच्या अंतर्गत तर्कशास्त्रीय घटकांचा, दुसरा वैज्ञानिकांच्या वैयक्तिक ज्ञानात्मक व भावात्मक मानसशास्त्रीय घटकांचा आणि तिसरा विज्ञान आणि वैज्ञानिक यांच्या समाजाशी होणाऱ्या सामाजिक-सांस्कृतिक आंतरक्रियांचा. खरे म्हणजे या तीन्ही प्रकारच्या घटकांच्या गुंतागुंतीच्या परस्पर परिणामातून विज्ञान पुढे जात असेल पाहिजे. यांपैकी एका प्रकारावर भर देणे एकांगी ठरेल. कून आणि फायराबेंड यांनी समाजिक घटकांचे महत्त्व अधोरेखित केले. एडिंबर्ग विद्यापीठातील समाजशास्त्रज्ञांच्या गटाने, ज्याला एडिंबर्ग स्कूल म्हणतात, या अंगाचा अभ्यास खूपच पुढे नेला. त्यांच्या या संशोधन- कार्यक्रमाला वैज्ञानिक ज्ञानाच्या समाजशास्त्राचा सशक्त कार्यक्रम (the strong programme in sociology of scientific knowledge) असे म्हणतात. हा कार्यक्रम खालील चार मौलिक निकष पाळतो : १) कार्यकारणभाव (वैज्ञानिक विश्वास वा ज्ञान ह्यांमागे सामाजिक वा अन्य कारणे असतात.) २) नि:पक्षपात (खरे वा खोटे, तार्किक वा अतार्किक दोन्हीसाठी स्पष्टीकरण द्यायला हवे.) ३) सममिती (खरे-खोटे, तार्किक वा अतार्किक अशा दोन्ही त-हेच्या विश्वासांच्या मागे एकाच प्रकारची, वेगळी नव्हे, कारणे असतात.) ४) स्वसंगती (या कार्यक्रमातील विज्ञानाच्या स्पष्टीकरणाची पद्धत या कार्यक्रमालाही लागू असली पाहिजे.)
एडिंबर्ग स्कूलचा वरील कार्यक्रम विज्ञानाची उपपत्ती (theory of science) म्हणून नैसर्गिकवादी आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही विज्ञानबाह्य कारणांना थारा नाही. या कार्यक्रमाचे एक प्रवक्ते डेव्हिड ब्लूर यांच्या म्हणण्यानुसार तर्कप्रामाण्याची कसोटी घेतल्यास विज्ञान सहेतुक (teleological) होते; ते घडते ते त्याला तसे घडायला पाहिजे असते म्हणून. ही सहेतुकता कार्यकारणभावाशी विसंगत आहे. लाकातोश यांच्या एका प्रतिपादनाचा उल्लेख वर आला आहे. त्यानुसार एखाद्या क्षेत्रात दोन प्रतिस्पर्धी संशोधन कार्यक्रम असल्यास जो टिकतो तो बहुधा पुरोगामी कार्यक्रम असतो. असे घडणे विज्ञानाच्या आंतरिक तार्किकतेशी सुसंगत असते. जर अशावेळी प्रतिगामी (degenerate) संशोधन कार्यक्रम टिकला तर त्याची कारणे अतार्किक (समाजशास्त्रीय/मानसशास्त्रीय) असतात. लॉडन यांनी अशाच त-हेचा युक्तिवाद केला होता. ब्लूर यांनी समाजशास्त्रीय कारणे फक्त अतार्किकतेचा खुलासा करण्यासाठी वापरण्याच्या या युक्तिवादाची एकांगी म्हणून संभावना केली. मेर्टन यांचे विज्ञानाचे समाजशास्त्र ज्याप्रमाणे तार्किक अनुभववादाला पूरक होते त्याप्रमाणेच सशक्त कार्यक्रम कून यांच्या विज्ञानाबद्दलच्या विचारसरणीला पूरक आहे असे मानले जाते.
या कार्यक्रमात हितसंबंधांना (interests) महत्त्वाचे स्थान आहे. विज्ञानातील विश्वास (त्यात ज्ञान आलेच) हे विविध हितसंबंधांनी ठरतात. (समाजशास्त्रांच्या मते ज्ञान हा मानवाच्या विश्वासाचाच भाग असते, मात्र ते वैयक्तिक, व्यक्तिविशिष्ट नसते, तर समूहाने, समाजाने मान्यता दिलेले असते.) विशेषतः सतराव्या शतकापासून वैज्ञानिक कार्याच्या मागे नैसर्गिक घटनांचे भाकीत करणे आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे हा मानवाचा महत्त्वाचा हितसंबंध राहिला आहे. मात्र असे आढळून येते की हा हितसंबंध कितीही महत्त्वाचा असला तरी त्याने विज्ञानातील विश्वास व ज्ञान निश्चितपणे ठरू शकत नाहीत. ते निश्चितपणे ठरण्यासाठी अन्य हितसंबंध लक्षात घ्यावे लागतात. या अन्य हितसंबंधांपैकी एका प्रकारचे हितसंबंध सामाजिक वर्गावरून किंवा स्थानावरून उद्भवतात. दुसऱ्या प्रकारचे हितसंबंध वैज्ञानिकांच्या व्यावसायिक गटाचे, त्यांनी घेतलेले काम पुढे नेण्याचे, त्यांच्या प्रतिष्ठेचे, किंवा तांत्रिक वा आर्थिक प्रश्नांशी निगडित असे असू शकतात. तिसऱ्या प्रकारचे हितसंबंध वैज्ञानिकांचे वैयक्तिक, त्यांच्या वैयक्तिक दर्जाचे वा प्रतिष्ठेचे असतात. विज्ञानाच्या अभ्यासात वरील प्रकारचे हितसंबंध कसे गुंतलेले असतात याचा सखोल अभ्यास सशक्त कार्यक्रमाच्या समाजशास्त्रज्ञांनी केला आहे. उदाहरणार्थ, एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी ब्रिटिश आणि अमेरिकन खगोलशास्त्रज्ञांमध्ये मंगळावरच्या कालव्यासंबंधी वाद निर्माण झाला होता. जॉन लॅकफर्ड यांनी या वादाचा अभ्यास केला; ते अशा निष्कर्षाला पोहोचले की या वादात अमेरिकनांची भूमिका त्यांच्या उपकरणांची गुणवत्ता जास्त चांगली आहे या व्यावसायिक हितसंबंधावर आधारलेली होती. आर्थिक, तांत्रिक वा औद्योगिक विकासाशी वैज्ञानिक सिद्धान्ताच्या विकासाचा अनेक वेळा जवळचा संबंध असतो. वाफेच्या आणि अन्य इंजिनांच्या तांत्रिक विकासामुळे उष्मागतिकीशास्त्राला चालना मिळाली हे अनेक अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. आधुनिक क्वांटम सिद्धान्त आणि अनिश्चितता तत्त्वाचा जन्म जर्मनीतील पहिल्या महायुद्धानंतरच्या असुरक्षित, विज्ञानविरोधी बौद्धिक वातावरणात कसा झाला याचा मागोवाही समाजशास्त्रीय संशोधनात घेतला गेला आहे. या संशोधनानुसार जर्मन भौतिकशास्त्रांच्या बौद्धिक पर्यावरणाची मूल्ये त्यांच्या विज्ञानाच्या आशयात चपखलपणे बसलेली आढळून येतात.
वरील समाजशास्त्रीय भूमिका अगदी स्पष्टपणे सापेक्षी (relativist) आहे. किंबहुना या विचारधारेच्या प्रवक्त्यांचे म्हणणे असे की समाजशास्त्रात, मानसशास्त्रात, संस्थांच्या आणि कल्पनांच्या इतिहासात आणि अगदी बोधीय (किंवा ज्ञानात्मक) मानसशास्त्रात सापेक्षी भूमिकाच योग्य आहे. कारण येथे अभ्यासवस्तूच्या बाबतीत कोणत्याही एका प्रकाराला (तार्किक निकष लावून) श्रेष्ठत्व/कनिष्ठत्व बहाल करणे अयोग्य आहे. वरील भूमिका विज्ञानालाही लावल्यास विज्ञान आणि ज्योतिष यांना एकाच मापाने मोजावे लागेल याचा उल्लेख पूर्वी आला आहे. विज्ञानातील विश्वास आणि ज्ञान समजून घेण्यासाठी व्यापक, तर्कनिष्ठ, बोधीय प्रक्रियांच्या निरपेक्ष, कसोट्या लावणे योग्य आहे का असा प्रश्न उपस्थित करणे ही एक गोष्ट आहे. परंतु आजचे विज्ञान अनेक दृष्टींनी कालच्या विज्ञानाच्या पुढे गेले आहे ही वस्तुस्थिती नाकारणे ही अगदी वेगळीच गोष्ट आहे. विज्ञानाच्या कोणत्याही सिद्धान्ताने खरे म्हणजे या वस्तुस्थितीचा खुलासा करायला हवा.
काही समाजशास्त्रज्ञांना संशोधन-कार्यक्रम हा तौलनिक, काटेकोर अभ्यासासाठी जास्त मोठा व म्हणून ढोबळ घटक वाटतो. म्हणून त्यांनी प्रत्यक्ष प्रयोगशाळेत काम कसे चालते, वैज्ञानिकांची एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण कशी चालते याचे सूक्ष्म स्तरावर निरीक्षण करायला सुरुवात केली आहे. अशा अभ्यासातून प्रत्यक्षात काय चालते याची जास्त चांगली विश्वसनीय माहिती होईल असे त्यांना वाटते. ब्रुनो लटूर आणि स्टिफन वुल्गर यांचे Laboratory Life (प्रयोगशाळेतील जीवन) हे १९७९ मध्ये प्रसिद्ध झालेले या त-हेचे पहिले पुस्तक. त्याचे उपशीर्षक वैज्ञानिक तथ्यांची सामाजिक रचनाक्रिया (Social Construction of Scientific Facts) बोलके आहे हे सांगायची जरूरी नाही. रचनात्मक वास्तववाद:
रॉनल्ड गिअर यांनी विज्ञान हे काय आहे यासंबंधीच्या वेगवेगळ्या भूमिकांचे संश्लेषण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. गेल्या काही दशकात मनुष्याला ज्ञान (बोध) कसे होते हे समजून घेण्याचे बोधविज्ञान (cognitive science) उदयाला आले आहे; गिअर त्याचा आधार घेतात. गिअर यांचा युक्तिवाद नैसर्गिकवादी आहे, म्हणजे ते व्यापक तर्कनिष्ठ कसोट्यांची गरज नाकारतात; विज्ञानाच्या एखाद्या क्षेत्रात वैयक्तिक पातळीवर प्रयोगशाळेत आणि एकूण क्षेत्रपातळीवर काय चालले आहे याचे निरीक्षण करतात व त्यावर आपला सिद्धान्त उभारतात. त्यात प्रतिरूपण (representation) आणि निर्णय (judgement) या दोन बोधीय प्रक्रिया केंद्रस्थानी आहेत. बोधविज्ञानानुसार आपल्याला कोणत्याही गोष्टीचे ज्ञान होते याचा अर्थ ती गोष्ट (उदाहरणार्थ, सायकल चालवणे) एक किंवा अनेक आयोजनांच्या (schema) रूपात आपल्या स्मरणात असते आणि त्या आयोजना आपण जरूर तेव्हा आठवू शकतो व कार्यान्वित करू शकतो. या आयोजना म्हणजे त्या गोष्टींचे आपल्या मेंदूतले (मनातले) चित्र, नकाशा, प्रतिरूपण. हे प्रतिरूपण वास्तवाचे जसेच्या तसे प्रतिबिंब नसते, तर पूर्वज्ञानाच्या संदर्भात मेंदूने तयार केलेले प्रतिमान असते. गिअर यांचे म्हणणे असे की विज्ञानातील सिद्धान्तही अशाच त-हेची प्रतिरूपणे आहेत. या बाबतीत ते व्हॅन फ्रासन यांचा आधी आलेला युक्तिवाद स्वीकारतात. विज्ञानातील सिद्धान्त निसर्गातील गोष्टींची मानवरचित प्रतिमाने आहेत. त्यांचा वास्तवाशी थेट संबंध नाही. मात्र गिअर हे व्हॅन फ्रासन यांच्यासारखे अनुभववादी नाहीत; तर ते वास्तववादी आहेत. केवळ थेट निरीक्ष्य वस्तूंनाच नव्हे, तर सिद्धान्तातील अमूर्त संकल्पनांनाही (उदाहरणार्थ, अणूच्या आतली इलेक्ट्रॉनची गती) वास्तव म्हणण्यास त्यांची हरकत नाही. वास्तव आणि सिद्धान्त यांचा संबंध गिअर यांच्या मते सदृश्यतेचा, समरूपतेचा (similarity) आहे; अभिन्नतेचा, एकरूपतेचा (identity) नाही.
थोडक्यात, वैज्ञानिक उपपत्ती/सिद्धान्त गिअर यांच्या प्रतिपादनानुसार वास्तवाची मानवरचित प्रतिमाने असतात. वास्तवाशी त्यांचा संबंध समरूपतेचा, एकरूपतेचा नव्हे, असतो. आधी उल्लेखल्याप्रमाणे प्रतिमानाचे दोन भाग असतात, एक औपचारिक, सूत्रमय भाग आणि दुसरा या औपचारिक भागाला वास्तवाशी जोडणारे अनुबंध. समरूपतेच्या संबंधांविषयी थोडे अधिक स्पष्टीकरण द्यायला हवे. प्रत्यक्ष वास्तव आणि प्रतिमान यांच्यातील समरूपतेला मात्रा (degree) आणि बाबी (respect) ही दोन अंगे असतात. प्रत्यक्षातील लंबकाचा आंदोलनकाल किती हे त्याच्या गणिती प्रतिमानाद्वारा सांगता येते. गणिती प्रतिमानामध्ये सुधारणा केल्यास लंबकाच्या आंदोलन कालाचे भाकित अधिकाधिक अचूक वर्तवता येते. येथे आपण गणिती प्रतिमान आणि लंबक यांतील समरूपतेची मात्रा वाढवली. अणुकेंद्रकीय भोतिकशास्त्रामध्ये अणुकेंद्रक एखाद्या द्रवाच्या थेंबासारखे आहे अशी कल्पना केली जाते. हे द्रवाच्या थेंबाचे प्रतिमान घेतल्यास अणुकेंद्रकाचे काही गुणधर्म, विशेषतः त्याच्या विभाजनाची प्रक्रिया, चांगल्या त-हेने समजू शकते. परंतु अणुकेंद्रकाच्या इतर काही गुणधर्मासाठी कक्षांचे प्रतिमान (शेल मॉडेल) वापरावे लागते. म्हणजे अणुकेंद्रक हा एखाद्या द्रवाचा थेंब नव्हे. द्रवाच्या थेंबाचे प्रतिमान अणुकेंद्रकाच्या काही बाबींसाठी (in some respects) लागू आहे.
वास्तव आणि प्रतिमान यांच्यातील समरूपतेचे नाते लक्षात घेतल्यास फ्लॉजिस्टॉन व ईथर बाबतीत लॉडन यांनी मांडलेला युक्तिवाद अप्रस्तुत ठरतो. ज्वलन-प्रक्रियेचे फ्लॉजिस्टॉनच्या कल्पनेवर आधारित प्रतिमान या प्रक्रियेचे काही गुणधर्म विशद करू शकले, ते काही बाबींसाठी योग्य होते. कालांतराने या प्रक्रियेचे आणखी गुणधर्म कळल्यानंतर तिचे वेगळे प्रतिमान तयार झाले आणि फ्लॉजिस्टॉनची गरज राहिली नाही. अशीच स्थिती मायकेल्सन–मोर्ले प्रयोगानंतर ईथरची झाली. समरूपतेची संकल्पना विज्ञानाच्या प्रगतीशी जोडता येते. एखाद्या क्षेत्रात विज्ञान पुढे जाते याचा अर्थ जुन्या प्रतिमानांपेक्षा नवीन प्रतिमाने वास्तवाशी (मात्रा किंवा बाबी या दृष्टीने) अधिक समरूप, जवळची असतात. दोन किंवा अधिक प्रतिमानांपैकी कोणते स्वीकारायचे याचा निर्णय वैज्ञानिकांना वैयक्तिक पातळीवर करावा लागतो. पॉपर, लाकातोश यांच्या परंपरेतील विज्ञानाचे तत्त्वज्ञ हा निर्णय तर्कनिष्ठ मूल्यमापनाच्या कसोट्यांवर होतो असे मानतात हे आपण आधी पाहिलेच आहे. या उलट समाजशास्त्रज्ञ ( उदाहरणार्थ, एडिंबर्ग स्कूलचे सदस्य) तो वैज्ञानिकांच्या हितसंबंधांवरून ठरतो असे मानतात. बोधवैज्ञानिकांच्या दृष्टीने ही निर्णयप्रक्रिया (judgement) समाजशास्त्रज्ञ म्हणतात त्यापेक्षा फार वेगळी नसते. मात्र निर्णयप्रक्रिया कितपत परिणामकारक आहे हे तपासण्याची त्यांची तयारी असते. वैज्ञानिक निर्णय घेताना व्यापक, वैश्विक कसोट्या वापरत नाहीत, तर आपल्या कामाची तात्कालिक, स्थानिक गरज पूर्ण करण्याच्या, उद्दिष्टे सफल करण्याच्या, दृष्टीने जास्तीत जास्त परिणामकारक पर्याय शोधतात असे बोधवैज्ञानिकांचे मत आहे. उद्दिष्टांच्या संदर्भातील असे धोरण एका मर्यादेत तर्कनिष्ठ म्हणता येईल. (लॉडन यांच्या युक्तिवादाच्या संदर्भात आपण साधनात्मक अशी संज्ञा वापरली. ती येथे लागू होईल. वैज्ञानिकांचा एक प्रमुख इंटरेस्ट (हितसंबंध) असतो तो म्हणजे ज्ञानात्मक (epistemic) हितसंबंध. उपलब्ध ज्ञानाच्या आणि पुराव्याच्या आधारे ते जास्तीत जास्त अचूक वा योग्य सिद्धान्त वा उपपत्तीकडे जाण्याचा (ती शोधण्याचा वा स्वीकारण्याचा) प्रयत्न करतात. या हितसंबंधाशी हाबरमास यांनी दाखवलेला नियंत्रण आणि भाकितक्षमता यांचा हितसंबंधही जोडता येईल. वैज्ञानिक स्वतःला, सहकाऱ्यांना आणि अन्य वैज्ञानिकांना आपला युक्तिवाद, निर्णय पटवून देण्याचा प्रयत्न करतात. (पटवण्याच्या या प्रक्रियेला दड्ढढदृद्यत्कृयत्दृद असा शब्द इंग्लिशमध्ये वापरला गेला आहे.) पटवण्याच्या प्रक्रियेत वैयक्तिक, सामूहिक, व्यावसायिक, सामाजिक असे अन्य हितसंबंध गुंतलेले असतात व ते निर्णायक ठरू शकतात.
एका बाजूने प्रतिरूपण आणि दुसऱ्या बाजूने निर्णय या दोन चाकांवरती (गिअर यांचे) विज्ञान पुढे जाते. विज्ञानाचे प्रतिमान क्रांतिनिष्ठ नाही तर उत्क्रांतिनिष्ठ आहे. उत्क्रांतिनिष्ठ हा शब्द क्रांतीच्या विरुद्ध वापरलेला नाही, तो जीवशास्त्रीय अर्थाने वापरलेला आहे. जीवजातींमध्ये नैसर्गिक कारणांनी उत्परिवर्तन (mutation) होत असते. भिन्न-भिन्न उत्परिवर्तित जीवांमध्ये भोवतालच्या परिस्थितीमध्ये टिकून राहण्याची क्षमता कमी अधिक असते. तसेच हे जीव आपले आनुवंशिक गुणधर्म पुढच्या पिढ्यांकडे संक्रमित करतात. यामुळे भोवतालच्या परिस्थितीमध्ये टिकून राहण्याची जास्त क्षमता असणारी उत्परिवर्तित जाती टिकून राहते, आणि दुसऱ्या कालौघात नष्ट होतात. जीवशास्त्रीय उत्क्रांतीची ही कल्पना विज्ञानाला लावता येते. एखाद्या प्रतिरूपणाच्या (सिद्धान्ताच्या वा उपपत्तीच्या) उत्परिवर्तित, थोडाफार फरक असलेल्या, आवृत्ती वैज्ञानिकांच्या समुदायात उपलब्ध असतातच. प्रत्येक आवृत्तीला टिकून राहण्याची कमीअधिक क्षमता असणारच. वैज्ञानिकांची निर्णयप्रक्रिया ही जीवशास्त्रातील नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेसारखी असते. या प्रक्रियेतून सर्वांत सक्षम आवृत्ती टिकून राहते, आणि पुढच्या वैज्ञानिकांच्या पिढ्यांसाठी, त्यांच्या अभ्यासासाठी, उपलब्ध होते. अशा उत्क्रांतीचा वेग एखाद्या क्षेत्रात एखाद्या सिद्धान्ताबाबतीत जास्त असू शकतो. मग त्या क्षेत्रात क्रांती झाली असे वाटू शकते. वर्चस्वी विचारधारा, परॅडाइम या कल्पनेशी विज्ञानाचे वरील प्रतिमान विसंगत नाही; परंतु या टिकाणी पॅरॅडाइमच्या असंयोज्यतेची कल्पना मात्र अग्राह्य आहे.
गिअर यांच्या विज्ञानाच्या प्रतिमानाने आपला विज्ञान ही चीज काय आहे हे समजून घेण्याचा कार्यक्रम संपत आला आहे. येथून पुढे काय? आपला कार्यक्रम संपत आलेला असला तरी त्यातून अंतिम, निदान खूप समाधानकारक, उत्तर मिळाले आहे असा दावा करणे योग्य होणार नाही. समारोपाच्या निमित्ताने दोन गोष्टी. एक म्हणजे विज्ञान आर्किमिडीजच्या, नंतर न्यूटनच्या आणि शेवटी आजच्या काळात एकाच त-हेने विकसित झाले आहे हे म्हणणे किंवा तसे दाखवणेही बरोबर नाही. प्रस्तुत लेखामुळे वाचकांचा तसा समज होऊ नये, ही अपेक्षा. दुसरी गोष्ट स्टिव्ह फुलर यांच्या अलीकडच्या कूनीय चित्रावरच्या टीकेची. फुलर हे नव्या दमाचे समाजशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी एडिंबर्ग स्कूलसारख्यांची समाजशास्त्रीय विश्लेषणपद्धती कून यांच्या विज्ञानाच्या तत्त्वज्ञानालाच लावली आहे. त्यांनी कुन यांच्या प्रसामान्य विज्ञानाच्या अवस्थेला जास्त महत्त्व दिले आहे. प्रसामान्य अवस्थेत प्रचलित पॅरॅडाइमच्या शिस्तीत वैज्ञानिक काम करीत राहतात. त्यांची वृत्ती पॅरॅडाइमच्या बाबतीत कोणतेही प्रश्न उपस्थित करण्याची नसते; किंबहुना ते अनुसरणवादीच (conformist) असतात. कून यांच्या ग्रंथलेखनाचा काळ, १९६२ आणि तत्पूर्वीची काही वर्षे, हा जागतिक शीतयुद्धाचा होता. त्याकाळच्या सोविएत युनियनने स्पुटनिक, पहिला उपग्रह, सोडून अमेरिकेवर विज्ञान-तंत्रज्ञानात आघाडी घेतली होती. कून हे त्या वेळेस हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक होते, आणि ही त्यांची उमेदवारीची वर्षे होती. त्यांचे मार्गदर्शक होते विख्यात रसायनशास्त्रज्ञ जेम्स कॉनंट. कॉनंट हे हार्वर्ड विद्यापीठाचे कुलगुरू (अध्यक्ष) होते. त्यांनीच अमेरिकेतील विज्ञानाला सोविएत
आव्हान पेलण्यासाठी चालना देता यावी म्हणून नॅशनल सायन्स फौंडेशन (NS F) या संस्थेची स्थापना करण्यात पुढाकार घेतला होता. साम्यवादविरोधी वैचारिक नेतृत्व करणाऱ्या मंडळींमध्येही ते अग्रेसर होते. त्यांना विद्यापीठीय संशोधनाला व्यावसायिक स्वरूप द्यायचे होते. विज्ञानाचे पॅरॅडाइमप्रणीत, अनुसारी स्वरूप त्यांच्या मनातील विद्यापीठीय संशोधनाच्या प्रतिमानाशी जुळणारे होते. त्यांतून येणारी वैज्ञानिक समुदायाच्या स्वायत्ततेची, पॅरॅडाइममधील बदलही वैज्ञानिक समुदायाच्याच अंतर्गत समाजशास्त्रीय प्रक्रियेने ठरतो ही कल्पनाही कॉनंटना आकर्षक वाटत होती. शीतयुद्धाच्या काळातील विज्ञानाचे चित्र कॉनंट-कून द्वयाने विज्ञानाच्या संपूर्ण इतिहासावरच प्रक्षेपित केले. या चित्राचा आणखी एक विशेष ते लोकांना पटवून देण्यासाठी उपयुक्त होता, तो म्हणजे विज्ञान हे तर्कनिष्ठ वगैरे नाही, ते अन्य मानवी व्यवहारांसारखेच आहे हा युक्तिवाद. एका अर्थी आधी म्हटल्याप्रमाणे या चित्राने विज्ञान आणि समाज यांना जवळ आणले; त्यासाठी त्यांनी विज्ञानाला समाजाकडे नेण्याऐवजी ‘समाज विज्ञानात आणला’. कॉनंट यांच्या स्फूर्ती व सल्ल्यातून आणि कून यांच्या युक्तिवाद व लेखणीतून विज्ञानेतिहासाचा नवा पॅरॅडाइम तयार झाला.
फुलर यांना एकूणच पॅरॅडाइमपासून मुक्ती पाहिजे. त्यांना विज्ञान पॅरॅडाइमखाली भरडले जाणारे, अनुसारी आणि त्यामुळे लोकतंत्रवादाचा अभाव असलेले असे नको आहे. त्यांना काय घडते यावर भर देणाऱ्या नैसर्गिकवादामुळे काय घडायला पाहिजे ही दृष्टी कायमची हरपते असे वाटते. या करता तर्कप्रामाण्यवादाकडे परत फिरण्याची मात्र जरूरी नाही; कारण तर्कप्रामाण्यवादाने काय घडते आणि काय घडायला पाहिजे याची गल्लत केली. शिवाय तर्कप्रामाण्यवादानुसार विज्ञानविकासक्रमामध्ये दोन सिद्धान्तांची तुलना करायची तर तर्कनिष्ठ कसोट्या, ज्या वैज्ञानिकांच्या बोधप्रक्रियेच्या बाहेर असतात त्या वापराव्या लागतात. काय घडायला पाहिजे हा आदर्शवादी विचार हाही अखेर मानवाच्या बोधप्रक्रियेचा भाग आहे हे ओळखायला हवे. गिअर तशी शक्यता दर्शवितात. त्यांनी डी.टी. कँपबेल यांच्या १९८५ च्या संशोधनाचा संदर्भ दिला आहे. त्यांत कँपबेल यांनी नैसर्गिकवादी, समाजशास्त्रीय ज्ञानमीमांसेतून विज्ञान धोरण कसे उद्भवते, त्याचे स्वरूप काय आहे, विज्ञान कसे असायला हवे याची मानके कशी तयार होतात ह्याची चर्चा केली आहे. परंतु हे काम अजून नेटाने पुढे नेण्याची गरज आहे. फुलर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या उत्तराच्या दिशेने अधिक वाटचाल होण्याची गरज आहे. विज्ञान ही चीज काय आहे याचा सिद्धान्त, याचे विज्ञान उद्गमनवादाच्या खूप पुढे गेले आहे; त्याला मानवी चेहरा आला आहे; त्याच्या सामाजिकतेचा शोध घेतला गेला आहे आणि वैज्ञानिकांच्या वैयक्तिक बोधप्रक्रियेशी त्याची चांगली सांगड घातली गेली आहे. विज्ञानाविषयीच्या बोधविज्ञानावर आधारित अशा नैसर्गिक, रचनात्मक वास्तववादी भूमिकेत खूप तथ्य आहे यात शंका नाही. परंतु अधिक समाधानकारक भूमिकेचा शोध चालूच राहणार आहे, चालूच ठेवावा लागणार आहे.
मुख्य संदर्भ : दोन मुख्य संदर्भ लेखाच्या पूवार्धात (आजचा सुधारक, जानेवारी-फेब्रुवारी २००४ दिले होते. आणखी मुख्य संदर्भ खालीलप्रमाणे : १. Knowledge and Social Imagery – David Bloor, Second Edition, University of Chicago Press, Chicago (1991) २. Thomas Kuhn, A Philosophical History of Our Times – Steve Fuller, University of Chicago Press, Chicago (2000)].
होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र टाटा मूलभूत संशोधन संस्था वि. ना. पुरव मार्ग, मानखुर्द, मुंबई ४०००८८.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.