नैतिक बुद्धिमत्ता

सर्व पालकांना वाटते की आपली मुले आज्ञाधारक असावीत. त्यांना सिगरेट, दारू, अमली पदार्थ यांचे व्यसन असू नये. त्यांनी बाहेर मारामारी किंवा दंगेखोरपणा करू नये. त्यांनी नातेवाईकांशी व मोठ्यांशी आदराने वागावे. परंतु यासाठी नेमके काय करावे हे पालकांना समजत नाही. सदाचाराने कसे वागावे यासाठी कोणतेही नीतिनियम नाहीत. शाळेत मूल्यशिक्षणाचे पाठ गिरवून अनैतिक वर्तणुकीस आळा बसतोच असे नाही. मुलांना सारखे ‘हे कर’ आणि ‘ते करू नकोस’ असे सांगितल्याने मुलांमध्ये सदाचाराचा विकास होत नाही. मुले लहान असताना धाकाने एक वेळ ऐकतील. परंतु मोठे झाल्यावर लादले गेलेले नीतिनियम ती झुगारून देतात. अवतीभवतीच्या निरीक्षणातून ह्या जगात कसे वागावे, दुसऱ्याशी वर्तणूक कशी ठेवावी हे मूल शिकत असते. जन्मल्यापासून इतर लोक कसे वागतात हे मूल पाहत असते, ऐकत असते. आई वडील, नातेवाईक व शिक्षक यांच्या वागण्यावर, बोलण्यावर मुलांचे नकळत बारीक लक्ष असते. यासंबंधी लिओ टॉलस्टॉय ह्या प्रसिद्ध लेखकाने लिहिलेली एक गोष्ट आहे. ‘आजोबा आणि नातू’ असे गोष्टीचे नाव आहे.

आजोबा फार म्हातारे झालेले असतात. वयामुळे ते बरेच अपंग होतात. सर्व दात पडलेले असतात. जेव्हा ते जेवतात, तेव्हा तोंडातून अन्न खाली पडत असते. त्यांचा मुलगा आणि सून आजोबांना टेबलावर एकत्र बसून जेवण द्यायचे बंद करतात. आजोबांना एका कोपऱ्यात जेवण दिले जाते. एकदा सून आजोबांना चिनीमातीच्या ताटात जेवण देते. आजोबा ताट सरकवत असताना ते ताट पडते आणि फुटते. आजोबांनी ताट फोडल्यामुळे व घरात एकडेतिकडे घाण केल्यामुळे सून कुरबूर करायला लागते. ती आजोबांना सांगते की ती आता त्याचे जेवण भांडी घासण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोठ्या लाकडी कटोऱ्यातच देणार. आजोबा काही बोलत नाहीत.

एक दिवस नवरा-बायकोला त्यांचा मुलगा फळ्यांपासून काहीतरी बनवायचा प्रयत्न करताना दिसतो. तो सांगतो, “मी ह्याचा एक लाकडी कटोरा बनवत आहे. जेव्हा तुम्ही आणि ममी म्हातारे व्हाल, तेव्हा ह्या कटोऱ्यात तुम्हाला वाढेन.” हे ऐकून नवरा- बायको एकमेकांकडे बघायला लागतात. त्यांना आपण आजोबांचा अपमान केला याची लाज वाटायला लागते. त्या दिवसापासून ते आजोबांना आपल्याबरोबर टेबलावर घेऊन जेवायला सुरुवात करतात.

गोष्टी सांगून मुले किंवा त्यांचे पालक सुधारतील असे नव्हे; तर मुले मोठ्यांच्या अनुकरणातून शिकत असतात. पालकांनी आपली वर्तणूक सदाचाराची/नैतिकतेची/ निर्व्यसनीपणाची ठेवली तर त्याचा मुलांवरही परिणाम होतो. पालक अनैतिकतेने वागणार आणि मुलाकडून नैतिकतेची अपेक्षा करणार, हे सर्वस्वी चूक आहे. पालक जरी अनैतिक वागले तरी बहुतेक मुले बऱ्यापैकी व काही वेळेस तर स्वार्थ नसतानाही नैतिकदृष्ट्या फारच चांगली वागतात. काही मुले समाजामध्ये मान्य असलेल्या प्रमाणभूत दंडकापेक्षा वेगळी वागतात. ती स्वतःलाही हानी पोहचवतात आणि दुसऱ्यालाही त्रास देतात. मुले समाजातील चालीरीती कशा आत्मसात करतात, आयुष्यभर नैतिक वर्तणुकीची जबाबदारी कशी पार पाडतात, आयुष्यभर अनैतिकतेने का वागतात? खरे तर या प्रश्नांना मानसशास्त्रज्ञांकडे स्पष्ट उत्तरे नाहीत. बहुतांश वेळा त्यांचा अभ्यास पालकांच्या निरीक्षणातून व अंतर्मनातून प्रकट झालेल्या मतांची खात्री करण्यासाठीच असतो. पालक त्यांच्या पूर्वग्रहदूषित मतांमुळे, अपुऱ्या माहितीमुळे व प्रसारमाध्यमांच्या सनसनाटी बातम्यांमुळे पालकत्वाविषयी वेगळीच माहिती देत असतात. आपला मुलगा किंवा मुलगी असे का वागतात याचे खापर ते आपल्या चुकीच्या पण काटेकोरपणे केलेल्या व संगोपनावर फोडतील. म्हणून मग काटेकोरपणे व शिस्तीने वाढविण्याऐवजी मुलांना अधिक मोकळेपणाने वाढवू लागतील. परंतु त्यामुळे समस्या आणखीनच गंभीर बनू शकते.

अधिकारयुक्त पालकत्व की मुक्तपणायुक्त पालकत्व ?

नैतिक मार्गदर्शनासाठी बहुतांश मुलांचा स्रोत त्यांचे पालक असतात. पालकांचा कोणताही धाक नसताना मोकळेपणाने वाढणाऱ्या मुलांपेक्षा पालकांच्या नियंत्रणात वाढणाऱ्या मुलांमध्ये नैतिक मूल्यांचा विकास खात्रीशीरपणे होतो, असे काही शास्त्रज्ञांनी दाखवून दिले आहे. अधिकारयुक्त पालकत्व प्रकारात कौटुंबिक रीतिरिवाज, शिष्टाचार मुलांवर बिंबवले जातात. अशा वातावरणात जर मोकळी चर्चा आणि स्पष्ट संवाद असेल तर योग्य समर्थनाने नियम बदललेही जाऊ शकतात. याउलट मोकळ्या वातावरणात वाढलेल्या मुलांमध्ये नैतिक रीतिरिवाज पूर्णपणे टाळले जातात. अधिकारयुक्त पालकत्वामध्ये पालकांच्या म्हणण्याप्रमाणे वागले पाहिजे, असे मुलांवर बंधन असते. ‘मी म्हणतो किंवा म्हणते म्हणून’ अशी पद्धत असते. अधिकारयुक्त पालकत्व व मोकळेपणा दिलेले पालकत्व हे दोन्ही प्रकार जरी एकमेकांच्या विरुद्ध वाटले तरी त्यातून पुढे एकसारखीच मुले वाढताना आढळतात. पालकत्वाच्या ह्या दोन्ही प्रकारांत मुलांची नैतिक क्षितिजे विस्तारण्यात मर्यादा पडते. व्यक्तीची नैतिक ओळख किंवा एक चारित्रसंपन्न व्यक्ती म्हणून जो विकास व्हायला हवा त्यामध्ये पालकत्वाच्या ह्या दोन्ही प्रकारांनी अडथळा येतो. मूल्य, रीतिरिवाज अंतर्मनातून प्रकट होण्याऐवजी ती बाहेरून येतात, हा समज जोपासला जातो.

किशोरवयाच्या आधीची मुले मुलांना जर लबाडी करायची संधी दिली तर मुले कशी वागतात, याबद्दलची एक चाचणी 1920 च्या दरम्यान केली गेली होती. आजही ह्या चाचणीचा संदर्भ मानसशास्त्रज्ञ देत असतात. ‘आपण लबाडी पकडू शकू का?’ ह्या विचारावरच मुलांची वर्तणूक आधारलेली होती, असे ह्या चाचणीत आढळून आले. मुलांच्या वर्तणुकीचा अंदाज हा त्यांच्या पूर्वीच्या वर्तणुकीवरून बांधता येत नव्हता. तसेच त्यांच्या धार्मिक नैतिक संस्कारावर किंवा शाळेतल्या मूल्यशिक्षणाच्या नीतिनियमांवरही आधारलेला नव्हता. ह्याच प्रकारची चाचणी नंतर दुसऱ्या एका शास्त्रज्ञाने केली. यामध्ये एक सर्वसाधारण कल आढळला. किशोरवयीन मुलांपेक्षा कमी वयाची मुले अधिक प्रमाणात लबाडी करीत होती. समाजात अधिक वावरल्याने व बुद्धीची-मेंदूची वाढ झाल्याने अप्रामाणिक वर्तणुकीस आळा बसला होता.

हिंसात्मक व्हिडिओ फिल्म्स पाहून किंवा संगणकावरील बंदुकीने गोळी मारण्याचे खेळ खेळून मुलांच्या वर्तणुकीवर काही परिणाम होतो का, याबद्दल एक चाचणी करण्यात आली. ह्या चाचणीतून काही मुलांमध्ये सौम्य प्रमाणात हिंसात्मक वृत्तीत वाढ होते असे आढळले, तर काही मुलांवर काहीही परिणाम झालेला आढळला नाही. ह्या फिल्म्सकडे व संगणकावरील खेळांकडे केवळ करमणूक म्हणूनच मुले पाहात होती.

किशोरवयीन अवस्थेतील वर्तणूक

नैतिक मूल्यांचा विकास होण्यामध्ये किशोरवयीन अवस्थेचा अडथळा येतो. ह्या वयात मुले बंडखोर बनतात. त्यांचा आज्ञाधारकपणा कमी होतो. ते पालकांचे- शिक्षकांचे सहसा ऐकत नाहीत. शरीरातील हॉर्मोन्समुळे असे बदल घडतात असे मानले जाते परंतु ते एकमेव कारण नाही. किशोरवयीन अवस्थेत मेंदू पूर्णपणे विकसित होण्याच्या अवस्थेतून जात असतो. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत मेंदूची पूर्ण वाढ होत असते, ही प्रचलित कल्पना बरोबर नाही. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत मेंदूच्या वजनात तरुणपणीच्या मेंदूच्या वजनाच्या 95 टक्के इतपत वाढ झालेली असते. पुढची 5 टक्के वाढ जरी कमी असली तरी ती महत्त्वपूर्ण असते. आत्म-नियंत्रण, एकाग्रता व योजना आखणे हे कार्य मेंदूच्या ज्या भागातून होते तो भाग विकसित व्हायचा राहिलेला असतो. वयाच्या 10 ते 12 वर्षादरम्यान ह्या कार्यांचे केंद्र असलेला भाग (Parietal and frontal lobes of brain) अचानक वाढतो. मुलींमध्ये ही घटना जरा अलिकडच्या वयातच घडते. हे वय किशोरवयीन अवस्थेच्या थोडे अलिकडचे असते. ह्या वयानंतर मात्र हा भाग हळूहळू आकुंचन पावून 20 व्या वर्षापर्यंत स्थिरावतो. परिपक्वतेची ही खूण मानली जाते. मुलींमध्ये हा काळ 2-3 वर्षांनी अलिकडचा असतो. मेंदूमध्ये किशोरवयीन अवस्थेत हे बदल होत असतात. त्यामुळे ह्या वयात मुलामुलींना स्वतःवर नियंत्रण ठेवायला अवघड जाते. सेक्सविषयीच्या अज्ञानामुळे त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर व सर्वच वागण्यावर होतो. स्वभावात चिडचिडेपणा, उद्धटपणा व हिंसक वृत्ती येऊ लागते. मनात लैंगिक (अनैतिकसुद्धा) विचार येणे हे नैसर्गिक असते. परंतु त्यांना ते घृणास्पद वाटते. या विचारांना अनुरूप असे वर्तन जर आपण केले तरच त्यास आपण जबाबदार ठरू, ही जाण त्यांना देणे आवश्यक आहे. असे विचार, भावना सर्वांच्याच मनात येतात. ते न येणे आपल्या हातात नाही, परंतु त्याप्रमाणे कृत्य न करणे हे त्यांच्या हातात असते, एवढे जरी त्यांना समजले तरी लैंगिक विकृतीस आळा बसेल. व्यसनी पदार्थांची (सिगारेट, दारू, अमली पदार्थ) सुरुवात करण्याचे हेच वय असते. आत्महत्या करण्याच्या वयाची सुरुवातही 15-16 व्या वर्षापासूनच होते. 12 वर्षापर्यंत आत्महत्येचे प्रमाण जवळपास नगण्य असते. 16-19 या वयात आत्महत्येचे प्रमाण कित्येक पटीने वाढलेले असते. साधारणपणे किशोरवयीन अवस्थेत अपराध करणारी मुले पुढे तरुण वयातही तीच वृत्ती जोपासतात. मुले अनैतिक कृत्याकडे झुकण्याचे हेच वय असते. मेंदूतील स्व-नियंत्रण, एकाग्रता व पूर्वयोजना आखणे हे कार्य करणारे भाग पूर्णपणे विकसित झालेले नसल्यामुळे पालकांनी त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सामाजिक बंधने असतातच, परंतु काही वेळेस सामाजिक बंधने झुगारली जाऊन अपराध घडतात.

नैतिक मूल्यांच्या विकासाचे सहा टप्पे नैतिक मूल्यांच्या विकासाचा एक बऱ्यापैकी मान्य असलेला सिद्धान्त मुलांच्या बौद्धिक वाढीवर आधारलेला आहे. ह्या सिद्धान्तानुसार सद्गुणी व दुर्गुणी मूल्यांची निवड ही सजग जाणिवेतून (conscious choice) येते. ज्यां पिआजे (Jean Piaget) व लॉरेन्स कोह्लबर्ग (Lewrence Kohlberg) ह्या मानसशास्त्रज्ञांनी ‘सजग जाणीवेतून मूल्यांचा विकास होतो’, हा सिद्धान्त सर्वप्रथम मांडला. नैतिक मूल्यांविषयीच्या समजुती सुरुवातीला अगदी लहान मुलांमध्ये अधिकार व हुकूमत गाजविल्यामुळे येतात. 7 ते 12 वर्षे वयाची मुले आपल्या ताकदीप्रमाणे योग्य काय ते ठरवतात. काही काळानंतर त्यांच्या असे लक्षात येते की सामाजिक नियम हे लोकांनी बनविलेले असतात आणि त्यांमध्ये चर्चा होऊन बदल होऊ शकतो. मी दुसऱ्याशी चांगले संबंध ठेवले तर इतर जण माझ्याशी चांगले संबंध ठेवतील, ही भावना कुणाच्यातरी आज्ञेप्रमाणे वागण्यापेक्षा जास्त योग्य आहे असे त्यांना पटू लागते.

कोह्लबर्ग यांनी नैतिकमूल्य विकसित होण्याचे सहा टप्पे सांगितले. हजारो अभ्यासकांनी या मॉडेलचा उपयोग व्यक्तीमध्ये नैतिक मूल्यांचा विकास कितपत झाला आहे, हे ठरविण्यासाठी केला आहे. 58 तरुणांच्या ते लहान असल्यापासून 20 वर्षांहून अधिक काळ मुलाखती घेऊन त्यांनी काही पुरावे गोळा केले. काल्पनिक घटनांबद्दल द्विधा मनःस्थिती होईल असे प्रश्न विचारून दिलेल्या उत्तरावरून नैतिक विचारांची पातळी ठरविण्यात आली. उदाहरणार्थ, ‘मृत्युशय्येवर असलेल्या बायकोसाठी नवऱ्याने औषधे चोरावीत का?’ जशी मुले मोठी होत गेली, तशी ती नैतिक मूल्यांचा एकेक टप्पा पार करत गेली, अर्थात वेगवेगळ्या गतीने. नैतिक बुद्धिमत्तेची वाढ समजायला हे मॉडेल बऱ्यापैकी यशस्वी झालेले आहे.

पातळी 1 : स्वहित टप्पा 1 : शिक्षा – ‘मी तसे करणार नाही, कारण मला शिक्षा नको आहे.’ टप्पा 2 : बक्षीस – ‘मी तसे करणार नाही, कारण मला बक्षीस हवे आहे.’ पातळी 2 : सामाजिक मान्यता – टप्पा 3 : व्यक्तीव्यक्तींमधील संबंध ‘मी तसे करणार नाही, कारण मी लोकांना आवडावे असे मला वाटते.’ – टप्पा 4 : सामाजिक – ‘मी तसे करणार नाही, कारण त्यामुळे कायद्याचा भंग होईल. ‘ पातळी 3 : आदर्श टप्पा 5 : सामाजिक बंधक – ‘मी तसे करणार नाही, कारण तसे न करणे माझ्यावर सामाजिकदृष्ट्या बंधनकारक आहे.’ टप्पा 6 : सर्वव्यापी योग्य- ‘मी तसे करणार नाही, कारण ते योग्य नाही, इतर लोक काहीही म्हणोत.

‘ ह्या मॉडेलद्वारे चाचणी घेतल्यानंतर असे आढळले की जसजसे वय वाढत जाते तसतसे स्वहिताबद्दलचे टप्पे कमी होत जातात. परंतु ते पूर्णपणे नाहीसे होत नाही. ‘मी चुकीचे वागल्याने कायदा मोडला जाईल व त्याची शिक्षा मला भोगावी लागेल,’ ही जाण 13-14 वर्षांनंतर वाढत जाताना आढळली. आदर्श मूल्यांची जाण वयाच्या 23- 24 वर्षानंतरच वाढताना आढळली.

मॉडेलमध्ये सांगितल्यापेक्षा अधिक प्रमाणात सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये लहान मुलांमध्ये नैतिकता आढळते. ही मुले केवळ शिक्षेच्या भीतीखातर नैतिक कृती करतात असे नव्हे. जेव्हा मुलांमुलांमधील एखादा सवंगडी बिस्किटाचे संपूर्ण ताट हडप करायचा प्रयत्न करतो, किंवा खेळताना एखादा सवंगडी त्याचे कर्तव्य करायला नकार देतो, तेव्हा इतर सवंगड्यांत निषेधाचा सूर निघतो व ‘हे योग्य नाही’ असा सामाईक सूर निघतो. पालकांनी जरी ‘नाही’ म्हटले तरी आपल्यातल्या वाट्यात इतरांना सहभागी करून घेतले पाहिजे, ह्या कर्तव्याची मुलांना जाण असते. ‘माझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला माझ्याविषयी चांगले वाटले पाहिजे’, ‘मी तिची खेळणी वापरते, माझीही तिने वापरली तरी चालतील’, ‘आपणा सर्वांना सारखाच हिस्सा मिळाला पाहिजे.’ ह्या सर्व गोष्टी मुले जेव्हा एकमेकांशी खेळतात, खेळातून भांडणे होतात, तेव्हा त्यांच्या ते लक्षात येते. न्याय्य रीतीने वागले नाही तर भांडणे होतील, हे ते शिकतात.

मुले सुरुवातीच्या काळात नैतिक मूल्ये कशी आत्मसात करतात हे महत्त्वाचे नसून खरा प्रश्न आहे तो हा की आत्मसात केलेल्या आदर्शास ते कोणत्या कारणांमुळे चिकटून राहतात किंवा राहत नाहीत. मोठ्या व्यक्तींना जसा मोह होतो, तसा तो लहान मुलांनाही होणे स्वाभाविक आहे. परंतु मोह टाळून, स्वार्थ टाळून, आदर्शाच्या कल्पनेकडे झुकणारी मुले आढळून येतात. जसजशी मुले मोठी होत जातात, तसतसा त्यांच्यातील समजूतदारपणा वाढत जातो, त्यांच्या आदर्श वागणुकीत वाढ होते, असे शास्त्रज्ञांना आढळले आहे. परंतु ही कृती आपोआप घडत नाही. व्यक्तीने आदर्शाच्या समजुती आपल्या व्यक्तित्वाची मुख्य ओळख म्हणून, खूण म्हणून जपल्या पाहिजेत. ‘लोकांनी प्रामाणिक असले पाहिजे,’ असा संदेश व्यक्ती स्वतःला देत असते आणि स्वतःच्या वर्तणुकीतून व्यक्तीने हे सत्य सांगण्याची शक्यताही असते. व्यक्ती नैतिक तत्त्वांचा आपल्या जीवनात जेव्हा वापर करते, तेव्हा त्याला किंवा तिला त्यातून स्वतःची ओळख व्यक्त करायची असते.

बहुतांश मुले व मोठ्या व्यक्ती दुसऱ्याचे दुःख पाहून हळहळतात व तसे आपले मतही व्यक्त करतात. परंतु त्यांतील फारच थोड्यांना दुःखी माणसांविषयी काहीतरी करावेसे वाटते. उदाहरणार्थ गुजरातमधील धार्मिक हिंसेत होरपळलेल्यांना किंवा भूकंपात जखमी झालेल्यांच्या मदतीला कोणी पैशाच्या-कपड्याच्या रूपात मदत केली. कोणी प्रत्यक्ष तेथे जाऊन पीडितांना मदत केली. कोणी सामाजिक संस्थांना पैशाच्या रूपात वा अन्य रूपांत मदत केली. मानवी दुःखाविषयी त्यांना कळवळा असतो, म्हणूनच व्यक्तिगत संपत्तीस तोशीस सोसून काहीतरी कृती करणे हे ते आपल्या जीवनातील एक जबाबदारी मानतात. कोसोवे आणि रवांडा येथील वांशिक कत्तली फार दूर घडत असतात, त्यामुळे त्यांच्या दृष्टीने त्या क्षुल्लक वाटतात. डोक्यातून त्या लगेच दूर सारल्या जातात.

घराशेजारी घडणारी जरी घटना असली समजा तुमच्या वर्गमित्राला एक टोळके धमकी देत आहे, तरीही ही समस्या माझी नाही, दुसऱ्या कोणाची तरी आहे, म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. निष्क्रिय राहणेच असे लोक पसंत करतात. नैतिक कृती करण्यासाठी त्यांच्याजवळील केवळ नैतिक ज्ञान पुरेसे ठरत नाही.

नैतिक मूल्यांच्या विकासासाठी पालकांनी योग्य प्रकारच्या मित्रत्वाच्या संगतीस प्रोत्साहन दिले पाहिजे. कारण मित्रांमधील संपर्कामुळे मुलांच्या मनात असलेल्या आधीच्या कल्पना आणि समाजातील प्रत्यक्ष वास्तव यात मतभिन्नता निर्माण होऊन योग्य नैतिक विकासास वाव मिळेल. विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये स्वतःची ओळख प्रस्थापित करण्यात मित्रांमधील संपर्काचा फार महत्त्वाचा वाटा आहे. अर्थात त्यासाठी घरचे वातावरण नैतिक असणे, ही पूर्व अट आहे. समविचारी सवंगड्याशी संगत वाढवण्याचा मूल प्रयत्न करेल व त्याच्या किंवा तिच्या मतांशी सहमत नसेल किंवा विसंगत वागेल तर त्याला किंवा तिला झिडकारले जाईल. यासाठी किशोरवयीन व त्या अगोदरच्या वयात पालकांनी छोट्या-छोट्या गोष्टीत नैतिक मूल्यांकडे जास्त लक्ष दिले पाहिजे.

‘प्रामाणिकपणा’ हे मूलभूत मूल्य आहे. याच्याशी सर्वजण सहमत असतात. विद्यार्थ्याने परीक्षेत कॉपी करून फसवणूक करणे शिक्षकांना मान्य नसते. पालकांना आपले मूल खोटे बोलल्याचे खपत नाही. आपला संघ जिंकावा म्हणून संघातील खेळाडूंनी नियम मोडावेत असे संघप्रशिक्षकाला वाटत नाही किंवा संघ-प्रशिक्षक नियम मोडण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहित करीत नाही. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना त्यांच्या-त्यांच्या मित्र-मैत्रिणीकडून खुलेपणाची-पारदर्शीपणाची अपेक्षा असते. परंतु हे जरी खरे असले तरी काही वेळेस शिक्षकांनी मुलांना त्यांच्या फसवणुकीबद्दल किंवा शाळेतील कामचुकारपाबद्दल किंवा दंगामस्तीबद्दल शिक्षा केली किंवा तंबी दिली तर पालकांना ते आवडत नाही. अशा वेळी मुलांना जो योग्य नैतिक संदेश पोहचायला पाहिजे तो पोचत नाही. उलट अनैतिक गोष्टीस प्रोत्साहन दिल्यासारखे होते. घरी किंवा घराबाहेर मुलांनी चुकीच्या गोष्टी केल्यास आपल्याच मुलाचे बरोबर म्हणून त्याची बाजू घेतल्यास मुलाच्या नैतिकतेच्या वाढीच्या दृष्टीने चुकीचा संदेश पोहोचतो. सर्व जीवनभर पालक आणि त्यांची मुले कृतिशील नैतिकतेची (प्रामाणिकपणा, सहकार, परोपकार, न्याय्य रीतीने वागणे) जोपासना करतील तरच ते स्वतःची ओळख एक चारित्र्यवान व सामाजिक बांधिलकीशी समर्पित व्यक्तिमत्त्व म्हणून देण्यात यशस्वी होतील. मूल्य सार्वत्रिक असतात काय?

नैतिक मूल्ये ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी असतात की ती सर्व देशांत, देशातील वेगवेगळ्या प्रदेशांत सारखीच असतात? नैतिक मूल्ये सर्व ठिकाणी सारखीच असतील तर ती रुजवण्यासाठी मार्गदर्शन करणे सोपे होईल. वेगळ्या सांस्कृतिक वातावरणात वाढलेली किंवा वेगळ्या ठिकाणी वाढणारी मुले वेगल्या चालीरीती आत्मसात करतात काय? भारतातील हिंदू ब्राह्मण कुटुंबातील मुले आणि अमेरिकेतील ख्रिश्चन कुटुंबात वाढलेली मुले यांच्या तुलनात्मक अभ्यासातून खूपच फरक दिसून आला. भारतीय मुले लहानपणापासूनच परंपरागत चालीरीती जपायला शिकतात, नातेसंबंधात आदर राखण्यासाठी काही ठराविक नियम ते पाळतात. गरजू व्यक्तींना मदत करतात. याच्या तुलनेत अमेरिकन मुले स्वतंत्र निर्णय घेणे, मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य, आपले व्यक्तिगत हक्क जपणे ह्या गोष्टीकडे झुकलेली आढळली. भारतीय मुलांचा परंपरागत चालत आलेल्या रूढी व मूल्ये पाळण्याकडे कल असतो. परंपरागत रीतिरिवाजांचे उल्लंघन करणे ते गैर मानतात. उदाहरणार्थ गाईचे मांस खाणे किंवा वडिलांना त्यांच्या नावाने हाक मारणे ते निषिद्ध समजतात.

खोडकर किंवा गैरवर्तणूक करणाऱ्या मुलांना छडीने मारणे किंवा नवऱ्याच्या परवानगीशिवाय बायको चित्रपटाला गेल्यास नवऱ्याने बायकोस मारणे ह्या गोष्टीत भारतीय मुलांना काही चूक वाटत नाही. याउलट शारीरिक शिक्षा करणे अमेरिकन मुलांना धक्कादायक वाटते. परंतु परंपरेमध्ये निषिद्ध असलेले अन्न खाणे किंवा वडिलांना नावाने हाक मारणे यामध्ये गंभीरतेने घेण्यासारखे काही आहे, असे अमेरिकन मुलांना वाटत नाही.

जसजशी मुले मोठी होत गेली व त्यांच्यात समंजसपणा यायला लागला तसतशी भारतीय व अमेरिकन प्रौढांमध्ये विरुद्ध टोके आढळली. ज्या नैतिक मूल्यांशी भारतीय मुले थेटपणे परिचित होती त्याच नैतिक मूल्यांपर्यंत परिस्थितीनुसार ती मर्यादित राहत होती. भारतीय प्रौढ व्यक्ती सर्वसामान्यपणे मान्य अशा सामाजिक बंधनाच्या चौकटीत नैतिक मूल्यांची जपणूक करताना आढळली.

परिस्थिती जरी बदलली तरी एका पूर्वीच्याच मूल्याशी ती चिकटून राहिली. याउलट अमेरिकन मुलांचे म्हणणे होते की नैतिक मूल्ये ही सर्वांना सारख्याच प्रमाणात लागू असली पाहिजेत. मुलांसाठी एक नैतिक प्रमाण आणि मोठ्यांसाठी वेगळे प्रमाण, असे चालणार नाही. अमेरिकन प्रौढ व्यक्ती सामाजिक परिस्थिती बदलली की आपल्या मूल्यांमध्ये बदल करताना आढळली. दोन्ही गटांतील मुलांना लबाडीचे वागणे चुकीचे वाटले. मुलांना दिलेले वचन वडिलांनी न पाळणे किंवा निर्दयपणाची वागणूक (आजारी मुलांसह असणाऱ्या भिकाऱ्याकडे दुर्लक्ष करणे) ह्या गोष्टी दोन्ही संस्कृतीतील मुलांना खटकतात. चोरी, मालमत्तेची नासधूस, निरपराध लोकांना मारू देणे ह्या गोष्टीबद्दलही त्यांना तिटकारा वाटतो. या मतांवरून आणि सामाईकपणे लोकांना खटकणाऱ्या गोष्टी यावरून सार्वत्रिक लागू होणारी नैतिक मूल्ये शोधता येतात. ही मध्यवर्ती नैतिक मूल्ये अशी : – सहकार्य, परोपकार / – न्याय्य रीतीने वागणे / – प्रामाणिकपणा समाजातील मानवी संबंध चालू राहण्यासाठी आवश्यक अशी ही मूल्य आहेत. 23/7, शिंदेनगर, चांदणी चौकाजवळ, बावधन, पुणे- 21

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.