मन में है विश्वास..

डॉ. विश्वास कानडे ‘आजचा सुधारक’च्या उत्पादकांपैकी एक होते. गेल्या जानेवारीच्या 29 तारखेला ते अनंतात विलीन झाले. त्यांचे ‘देहावसान’ झाले म्हणावे की नुसते ‘निवर्तले’ असे म्हणावे असा क्षणभर मला प्रश्न पडला होता. तसे पाहिले तर ‘दिवंगत’ किंवा त्याहीपेक्षा ‘कैलासवासी’ हा शब्द त्यांच्या निर्वाणला समर्पक झाला असता. कानडे भाषाशिल्पाचे चिकित्सक उपासक होते. ते नुसते कुशल पाथरवट – पथुरिया नव्हते, शिल्पी – शब्दशिल्पी होते. त्यांचे मन शब्दलोभी, शिक्षण शब्दानुशासन जाणणारे आणि वळण जपणारे होते. एक शब्द जरी सम्यक जाणला, सम्यक योजला तरी इह- परलोकी कामधेनू ठरतो असे मानणारी एक भारतीय परंपरा त्यांना आपली वाटे. इंग्लंडमध्ये भाषाशास्त्राचे आपले गुरु पाणिनीचा उल्लेख ‘भगवान पाणिनी’ असाच करीत याचा त्यांना मोठा अभिमान वाटे.

डॉ कानड्यांची अन् माझी जवळपास चाळीस वर्षे जान पहेचान होती. नकळत कधी तरी तिचे दोस्तीत रूपांतर झाले होते. व्यवसायाने ते इंग्लिशचे प्रोफेसर होते. नागपूर विद्यापीठात विभागप्रमुख होते. जे प्रोफेसर कधीच निवृत्त होत नसतात अशांच्यापैकी ते एक होते. नोकरी म्हणाल तर ती 14 वर्षापूर्वी संपली होती. आता सवेतन काम सोडले होते एवढेच.

विश्वास कानडे मराठी, इंग्लिशमधून कविता करीत. त्यांच्या मराठी काव्यसंग्रहाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा एक कथासंग्रह मुंबईच्या ‘लोकवाङ्मयगृहा’ने काढला आहे. नवकवितेचे ते मर्मज्ञ भाष्यकार होते. त्यांचा समीक्षा संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे, त्यांनी टी. एस. इलियटच्या ‘वेस्टलँड’चा मराठी भावानुवाद प्रसिद्ध केला आहे. त्यावर गौरी देशपांडे यांनी लहानसे वादळ उठविले होते. त्याला त्यांनी तत्परतेने उत्तर देऊन ते शांत केले.

कानडे, ‘सत्या असत्यासी मन केलें ग्वाही’ या पंथातले होते. त्यांना सवंगाचे वावडे होते. त्यांनी विद्यापीठातूनच रशियन, स्वप्रयत्नाने थोडेसे फ्रेंच, बंगाली, उत्तम हिंदी, कामापुरते संस्कृत ह्यांचे ज्ञान व्यासंगपूर्वक संपादिले होते. उर्दूची ओळख लिपीच्या झिरझिरत्या पडद्याआडून होऊ शकेल तेवढी करून घेतली होती.

‘आ. सुधारक’च्या संस्थापकांनी 1990 साली ज्या थोडक्या साथीदारांच्या मदतीने हे मासिक काढले त्यात डॉ. कानडे एक होते. ते स्वतः लेखक तर होतेच पण अनियतकालिकांच्या चळवळीत नागपूरला ‘दिशा’ काढणाऱ्यांत ते एक होते. अशी वैचारिक मासिके का व कशी बुडतात याचा अनुभव त्यांच्या पदरी होता. हवे तसे लेखन साहाय्य मिळणे-मिळवणे हे मुख्य दुखणे होते. आपण स्वतः नियमित लेखन करू शकणार नाही हे त्यांनी अजिजीने स्पष्ट केले होते. अंगावर घेतलेल्या कामातून सवड होत नव्हती हे एक आणि दुसरे म्हणजे लेखन मनासारखे झाल्याशिवाय प्रसिद्धीला द्यायचे नाही यावर त्यांचा कटाक्ष होता. याला फार वेळ लागणार होता.

आ. सु. च्या संस्थापकांशी कानड्यांचा स्नेहसंपर्क व्हायला मी कारणीभूत झालो असा माझा समज आहे. कानड्यांशी माझा संबंध विद्यार्थी म्हणून आला. मी खाजगी परीक्षार्थी असलो तरी विद्यापीठात जमतील तसे एक दोन तास व्याख्याने ऐकण्याची परवानगी घेतलेली होती. कानडे तेव्हा नुकतेच इंग्लंडहून परतले होते. ब्रिटिश कौन्सिलची शिष्यवृत्ती घेऊन मँचेस्टरचा भाषाशास्त्राचा एक वर्षाचा हायर डिप्लोमा घेऊन ते आले होते. इंग्लिश मातृभाषा नसणाऱ्या सर्व विद्यार्थांमध्ये ते पहिले आले होते. भाषाशास्त्र, व्याकरण या तशा किचकट समजल्या जाणाऱ्या विषयांवरची त्यांची पकड लक्षात येण्याइतकी मजबूत होती. पुढे काही वर्षांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांना बसणाऱ्या एका विद्यार्थी समूहाला त्यांनी इंग्लिश अन् मी लॉजिक बरोबरच शिकवले होते. त्यावेळी मला त्यांचे प्रावीण्य विशेषच जाणवले. एकदा आपणही इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करावा असे माझ्या मनाने घेतले. त्यावेळी मी त्यांच्याबरोबर झांडवुर्टचे ग्रामर वाचत असे. त्यांची माझी जवळीक अशी वाढत गेली.

प्रा. दि. य. देशपांडे आणि त्यांच्या पत्नी प्रा. मनूताई नातू यांनी साहित्य संस्कृतिमंडळाकरिता ‘आगरकर वाङ्मया’चे तीन खंड संपादित केले तेव्हाची गोष्ट आहे. आगरकरांनी लिहिलेले ‘वाङ्यमीमांसा आणि वाक्यांचे पृथक्करण’ हे पुस्तक संग्रहात घालताना त्यात चर्चिलेल्या विषयांची आणि उल्लेखिलेल्या इंग्लिश ग्रंथांची चर्चा दि.य. ना कोणाशी तरी अर्थात जाणकाराशी-करायची होती. त्यावेळी मी कानड्यांची व त्यांची भेट घडवून आणली होती. दोघेही समानशील होते. सार्वजनिक सुखाची आस्था जबर असूनही व्यक्तीचे खाजगीपण-व्यक्तिस्वातंत्र्य जपलेच पाहिजे असे कानडेही मानत. समाजात परिवर्तन व्हावे आणि ते समतेच्या दिशेने व्हावे. सर्वांना सुखाची समान संधी मिळावी इत्यादी इत्यादी बाबतीत एकमत झाल्यामुळे पुढे नवा सुधारक काढताना प्रवर्तकांच्या सभांमध्ये कानडे असणे स्वाभाविक होते. आजचा सुधारकची पहिली 5- 7 वर्षे कानडे सल्लागार मंडळावर राहिले. पण नंतर आपले नाव वगळावे असा आग्रह त्यांनी धरला. तोंडी सांगून झाले, पत्रे लिहून झाली. एकदा निर्वाणीचे पत्र आले आणि त्यात एक मजेदार सूचना त्यांनी केली की, ‘माझे नाव वगळण्यात आले आहे व हे माझ्याच विनंतीवरून केले जात आहे’ असा खुलासाही छापावा. हे दुसरे परन्तुक समजण्यासारखे होते. याआधी दोन नावे गाळली ती संबंधितांच्या विनंतीवरून किंवा इच्छेवरून नव्हती. पण मुळात नाव नको ह्या मागणीचे कारण नेमके काय असावे असा प्रश्न आम्हाला पडलेला असे. त्यांची एक सूचना अशी असे की ‘सुधारक’ अवती भोवतीच्या जगापासून तुटलेला दिसतो. सुधारकी दृष्टीने म्हणा की विवेकवादी भूमिकेतून म्हणा सभोवतालच्या महत्त्वाच्या घटनांबद्दल भाष्य करून वाचकांचे जे प्रबोधन केले पाहिजे, ते आपण करत नाही. ही सूचना रास्त होती पण असे सिद्धहस्त लेखक आम्हाला उपलब्ध नव्हते. मी त्या दिवसांत पुष्कळदा त्यांनी आपली व्यथा नेमकेपणाने सांगावी यासाठी प्रयत्न केले. त्यावर आधीच्या पत्रांमध्ये आपण कारण दिले आहे एवढेच त्यांचे उत्तर असायचे. एकदा तर मी त्यांना गंमतीने म्हणालो, “डॉक्टरसाहेब, तुमचं म्हणणं मला काही केल्या समजत नाही. “I am afraid, I must be a bad student.” त्यावर ते लगेच म्हणाले, “No, no, Kulkarni you are alright, I must be a bad teacher.” या उत्तरात उपरोधापेक्षा विनय जास्त होता.

कोणाला दुखवणे, बोचेल असे बोलणे त्यांना नको असे. आ.सु. सुरू करताना आम्ही प्रवर्तकांनी अल्पशी रक्कम आपापला वाटा म्हणून त्यात घातली होती. कानड्यांनी सुधारक सोडल्यावर आम्ही त्यांना ती परत देऊ केली पण त्यांनी ती घेण्याचे नम्रपणे नाकारले. कधी कधी वाद-संवादातही त्यांचे बोलणे काहीसे आडवळणाचे वाटे. शैली नागमोडी किंवा ज्यादाच जनरल वाटे. याचे कारण हेच की त्यांना कोणा विशिष्ट व्यक्तीला टीकेचे लक्ष्य करायचे नसे. परनिंदा तर फारच दूर. सभेतील भाषणात सुद्धा ते अस्खलित-प्रवाही शैलीत बोलत नसत.

कोठे समर्पक शब्दासाठी ते क्षण-अर्धाक्षण घुटमळत, कोठे अभिव्यक्ती नेमकी व्हावी यासाठी धडपडत आहेत असे वाटे. मात्र एक विलक्षण संवेदनशील, नितळ, डोळे बोलके, भुवयांची हालचाल सतत चालू, डोळ्यांचे विस्फारणे, त्यांच्या आवाजातला चढउतार हे सारे एका आर्त मनाचे आविर्भाव असत. सामाजिक ओढ असलेले आत्मरत कविमन त्यांना लाभले होते.’ त्यांचे बैठकीचे दालन बरेच बोलके होते. एका ठळक जागी सुबक, गुटगुटीत, सुघड शेंदऱ्या गणपतीचे शिल्प शो पीस वाटावे असे ठेवलेले, दुसरे लक्ष वेधून घेणारे चित्र होते किशोरी आमोणकरांची एक गानमुद्रा. भिंतीवर तसेच हॉल बाहेर पार्लरमध्ये भाऊ समर्थांची अमूर्त शैलीतली दोन चित्रे त्यांच्या रसिकपणाची साक्ष देत. समोरच्या तिपाईवर मान्यवर निवडक हिंदी, इंग्रजी नियतकालिके नीटनेटकी मांडलेली दिसत. त्यांना शास्त्रीय संगीताची ओढ होती तशीच नवचित्रकलेची जाण होती. नवकविता अवगत होती. मुक्तिबोध त्यांचे आदर्श होते, दोघेही, शरच्चन्द्र आणि गजानन माधव हिंदीचे त्यांचे वाचन मातृभाषा वाटावी इतके सघन होते. मी एकदा ग्रेसच्या दुर्बोधतेचा विषय काढला. ते म्हणाले, आपल्याला एखादी भाषा वाचता येते, समजते म्हणून तिच्यातले साहित्य समजते असे नाही. कान तयार झाल्याशिवाय शास्त्रीय संगीताची, नजर आल्याशिवाय चित्राची आस्वाद्यता कळत नाही.

कवि, कथाकार समीक्षक, साहित्येतिहासकार या नात्यांनी त्यांनी लिहिले आहे. त्याची व्हावी तेवढी प्रसिद्धी झाली नसेल. पण याला एक कारण म्हणजे त्यांचा स्वभाव, त्यांची मते, त्यांचे आदर्श, त्यांच्या निष्ठा.

ते स्वतःबद्दल जसे बोलत नसत तसेच आपल्या लिखाणाबद्दलही तुम्ही बोलल्याशिवाय बोलत नसत. मी मुंबईला लोकवाङ्मयगृहामध्ये त्यांचे पुस्तक माहीपर्यंत त्याआधी कितीदा तरी आमची भेट झाली असेल, ते त्याबद्दल बोलले नव्हते. एकदा ‘तरुण भारता’च्या दिवाळी अंकात (इ.स. 2001) मी त्यांची भोलेमियाँ, कथा वाचली. ती मला आवडली. तिच्यातल्या गूढार्थाबद्दल त्यांच्याशी बोलावे म्हणून भेटलो तेव्हा त्यांना सहाजिकच आनंद झाला. बऱ्याच गप्पा झाल्यावर त्यांनी हळूच हंसचा दिवाळी अंक दाखवला त्याच्यातही त्यांची कथा होती. मला मात्र भोलेमियाँ जास्त अर्थपूर्ण वाटली. एका अशिक्षिताची, आंतरिक ओढीने दगडात शिल्पाकृती पाहणाऱ्या मूर्तिकाराची ती कथा. त्याला डोंगरकपारीतून येणारी आर्त हाक ऐकू येते. पाषाणांची भाषा समजते. स्वतःचे काही नसलेला, निस्संग, वेगळेपण विसरलेला, निसर्गाशी विश्रब्ध नाते जोडलेला तो शिल्पी निर्मितीचा ब्रह्मानंद घेतो. अशी काहीशी ती कथा कानड्यांनी कमालीच्या आत्मीयतेने फुलवली आहे.

कानडे नुसतेच साहित्यिक नव्हते, विचारवंत होते. उत्कट सामाजिक आस्था आणि परिवर्तनाची आस बाळगणारे होते. त्यांना तत्त्वज्ञानात उपजत रुची होती. राजकीय- सामाजिकदृष्ट्या त्यांच्या मनाचा कल डावीकडे झुकलेला असे. पण तत्त्वज्ञानात मात्र त्यांना कांट, त्याचे Transcendent and Immanent, अतीत आणि अनावृत यांच्याबद्दल ओढ होती. भारतीय तत्त्वज्ञानात उपनिषदे, गूढानुभव, रामकृष्ण, रमण महर्षि यांचे अनुभव त्यांना चिंतनीय वाटत. गुरुदेव रानडे यांचे उपनिषद्भाष्य त्यांना आवडे. प्रोफेसर रेग्यांचे धर्म-धार्मिक भाषा-विश्वास श्रद्धा या बाबतीतले विवेचन विवेकवादी समजतात तसे त्यांना त्याज्य वाटत नसे.

त्यांच्या घराचे नाव ‘श्रीनिवास’ होते. मी एकदा गमतीने त्यांना म्हणालो, डॉक्टरसाहेब, तुम्ही विद्यासेवक ! घराला ‘शारदा निवास’ न म्हणता श्री कडे का धाव घेतलीत? यावर ते म्हणाले, “ते माझ्या आजोबांचे नाव आहे. त्यांना माझे फार कौतुक होते. मी नाव काढावे या आशेने त्यांनी माझे नाव ‘विश्वास’ ठेवले होते. त्यांच्या आशीर्वादाबद्दलची कृतज्ञता या ‘श्रीनिवासा’त उमटली आहे. ”

आपले सगळे शिक्षण त्यांनी नोकरी करून घेतले होते. जुन्या एकत्र कुटुंबातला मोठा मुलगा म्हणून येणारी कर्तव्ये पार पाडली होती. एकूणच प्रतिकूल परिस्थितीत धडपडणाऱ्यांबद्दल त्यांना फार आत्मीयता होती. चाकोरीबाहेरचा विचार मांडणारे त्यांना आवडत. विचाराच्या स्वतंत्रपणाचे ते अगत्यपूर्वक कौतुक करीत. आ.सु. मधील हिंदू- हिंदूधर्म यासंबंधी प्रोफेसर घोंगे यांचे लेखन आवडले तेव्हा माझ्याकडून त्यांचा पत्ता घेऊन मनमोकळी दाद द्यायला ते चुकले नाहीत.

कानडे नवतेचे कैवारी असले तरी परंपरेचा धागा त्यांनी कोठेतरी धरून ठेवला होता असे मला वाटते. एरवी अखेरपर्यंत गळ्यातले जानवे त्यांनी का जपावे? स्नान केल्यावर धूतवस्त्र नेसून घरातल्या देवाला दोन फुले वाहून नमस्कार करण्याचा परिपाठ त्यानी का ठेवला असेल याची उपपत्ती मला लागत नाही. उत्तर कर्नाटक मधील आपल्या कुलदेवतेला एकदा त्यांना जायचे होते. ‘वो सुबह कभी तो आयेगी’ असा ‘मन में है विश्वास’ हे तर खरेच पण आणखी काही एक ‘विश्वास’ त्यांच्यात असावा. मार्क्सिस्ट अशी सरधोपट ओळख आपली नसावी असे त्यांनी म्हटले आहे. साम्यवाद ही जीवननिष्ठा आहे-प्रभावी जीवनदर्शन आहे हे त्यांना मनोमन मान्य होते. पण नकार, अभाव याऐवजी सकार सत्भाव त्यांना ओढत असावा म्हणून वर म्हटले तसे नुसते ‘अनंतात विलीन’ होण्यापेक्षा ‘कैलासवासी’ होणे त्यांना आवडले असते. असा माझा कयास आहे. 16, शांतीविहार, सिव्हिल लाइन्स, नागपूर-440001.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.