बौद्ध धर्माविरुद्ध बंड, मनुस्मृती व जातिसंस्था

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1916 साली न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात एक शोधनिबंध वाचून हिंदुसमाजातील सतीची चाल, पुनर्विवाहबंदी व बालविवाह ह्या प्रथा जातिव्यवस्था बळकट करण्यास्तव उत्पन्न केल्या गेल्या असे विचार मांडले होते. याचा उल्लेख कुमुदिनी दांडेकरांनी त्यांच्या सतीची चाल बालविवाह, या (आ.सु., जुलै 2003), या लेखात केला. जातिभेदामुळे भारतीय समाज पोखरून गेला, लोकांत एकीची भावना राहिली नाही व त्यामुळे बाहेरील शत्रूंनी त्यांचा नेहमीच पराभव केला, या परिस्थितीची जाणीव महाराष्ट्रात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, इतर पुढाऱ्यांपेक्षा जास्त करून, त्यास खरी धार लावली.

सतीची चाल, पुनर्विवाहबंदी व बालविवाह ही पापे (!) हिंदुसमाजात कोणी, कशी व केव्हा आणली, त्यांचे उद्दिष्ट काय होते याचा मात्र दांडेकरांच्या लेखात उलगडा नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या बऱ्याच लिखाणाद्वारे दिली आहेत. मनुस्मृतीतर्फे आंतरजातीय विवाह व सहभोजन यावर बंदी करून जातिव्यवस्था उभी करण्याची साजिश रचली गेली हे मनुस्मृतीतील अनेक श्लोकांमधून त्यांनी दाखवून दिले आहे.

आंतरजातीय विवाह हिंदुसमाजात आजदेखील होत नाहीत. नावालाच होतात. या अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नावर कोणी लिहीतदेखील नाही. या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘The Triumph of Brahminism’ (Dr. Babasaheb Ambedkar : Writings and Speeches, Vol.3, Govt. of Maharashtra Edu. Dept; 1987, pp266-331) या लेखाचे श्री. म. य. दळवी यांनी अनुवाद केलेल्या ब्राह्मणशाहीचा विजय, (सुगावा प्रकाशन, पुणे) या पुस्तकातले विचार इथे देण्याचा मी प्रयत्न करीत आहे.

बौद्ध धर्माविरुद्ध उठाव :

प्राचीन भारताचा इतिहास हा बौद्ध धर्माविरुद्ध संघर्षाचा इतिहास आहे. अशोकाने बौद्ध धर्माला राज्याचा धर्म बनविला (ख्रि.पू. 273-236). अशोकाच्या साम्राज्यात ब्राह्मणांना त्यामुळे राजाश्रय राहिला नाही. त्यांचा उपजीविकेचा धंदाही बंद झाला; कारण दक्षिणा घेऊन यज्ञाचे पौरोहित्य करणे हा त्यांचा मूळ पेशा होता. उपजीविकेचे साधन बंद झाल्यामुळे मौर्य साम्राज्य अस्तित्वात होते तितकी 140 वर्षे त्यांचे बरेच आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे बौद्धशासनाविरुद्ध बंड करणे याशिवाय दुसरा मार्ग त्यांना राहिला नाही. हे बंड पुष्यमित्राने (ख्रि.पू. 187-157) मौर्य घराण्याविरुद्ध केले. त्याने मौर्यवंशातील शेवटचा बुद्धधर्मीय सम्राट बृहद्रथ याला कपटाने ठार करून सिंहासन बळकावले व शुंग वंशाची स्थापना केली. सत्तेवर आल्यावर पुष्यमित्र शुंगाने बौद्धांवर व बौद्धधर्मावर भयानक अत्याचाराची मोहीम सुरू केली. उदाहरणार्थ : बरनॉफ आपल्या पुस्तकात लिहितो की प्रत्येक बौद्ध भिख्खूचे शिर आणून देणाऱ्यास त्याने 100 सोन्याची नाणी देण्याचा आदेश काढला होता.

पुष्यमित्राची क्रांती ही फक्त राज्यक्रांतीच असती तर त्याला बौद्धधर्मीयांच्या छळाची मोहीम काढणे आवश्यक नव्हते. पुष्यमित्राच्या क्रांतीचे उद्दिष्ट बौद्ध धर्म नष्ट करून त्याच्या जागी नवी जातिसंस्था प्रस्थापित करणे हे होते. हिंदूंच्या चातुर्वर्ण्याचे पुनरुज्जीवन करणे हे त्याचे ध्येय होते. याचा पुरावा म्हणजे मनुस्मृतीला कायद्याचा दर्जा देण्याची घोषणा हा आहे.

मनुद्वारे त्या वेळच्या कायद्यात बदल :

मनुस्मृती ही ईश्वरी आहे असे मानण्यात येते, मनुस्मृती स्वयंभू निर्मात्याने मनूला सांगितली आहे आणि मनूने ती मानवांना सांगितली असे सांगण्यात येते. ही गोष्ट प्रत्यक्ष मनुस्मृतीतही आली आहे.

भारतीय इतिहासात मनू या नावाला फार मोठी प्रतिष्ठा आहे. ह्या प्राचीन नावाची प्रतिष्ठा या स्मृतीला लाभावी म्हणून मनूचे नाव तीस जोडण्यात आले आहे. हा लोकांना फसविण्यासाठी केलेला बनाव आहे. मनुस्मृतीची खरी लेखिका सुमती भार्गव ही आहे. सुमती भार्गवने ही संहिता ख्रिस्तपूर्व 170-150 या काळात लिहिली. पुष्यमित्राने बौद्धधर्माविरुद्ध बंड ख्रिस्तपूर्व 185 मध्ये केले ही गोष्ट लक्षात ठेवली तर पुष्यमित्रानेच मौर्याच्या बौद्ध शासनाविरुद्ध ब्राह्मणी क्रांतीची तत्त्वे ग्रथित करणाऱ्या मनुस्मृतीला कायद्याचे स्वरूप दिले हे सिद्ध होते. याच मनुस्मृतीच्या आधारे पुष्यमित्राने आर्यांच्या काळात असलेल्या कायद्यांमध्ये बदल करविला. त्याच्या वेळचा आर्यांचा कायदा काय म्हणतो ते पाहा:

1) राजेपद हा क्षत्रियांचा हक्क आहे. ब्राह्मण कधीही राजा बनू शकत नाही. 2) कोणत्याही ब्राह्मणाला शस्त्रास्त्रांचा व्यवसाय करता येणार नाही. व 3) राजाच्या अधिकाराविरुद्ध बंड हे पाप आहे. हे सारे कायदे मनुस्मृतीद्वारे पुष्यमित्राने बदलविले. मनुस्मृतीतर्फे ब्राह्मणांना राजहत्या करण्याचा हक्कदेखील मिळाला. त्यांना जगाचे स्वामी म्हणून संबोधिले गेले व ते तसेच राहतील अशी मक्तेदारी निर्माण करण्यात आली. वर्णाचे जातीत रूपांतर झाले व शूद्रांची, स्त्रियांची अवनती केली गेली. ह्या साऱ्या सवलती व शिवाय अध्ययन व अध्यापन (वेदांच्या) हक्क कायद्याने मिळाल्यामुळे उच्चवर्णीयांना त्यावेळेच्या (जातिरहित) समाजामध्ये परिवर्तन करणे शक्य झाले.

वर्णाचे जातीत रूपांतर : पुष्यमित्राचा उद्देश बौद्धकाळात मागे पडलेल्या चातुर्वर्ण्याचा पुनरुद्धार करणे हे होते. पण मूळचे चातुर्वर्ण्य लवचीक होते. त्याचा (बंदिस्त) विवाहपद्धतीशी संबंध नव्हता. आंतरवर्णीय विवाहास बंदी नव्हती. उदाहरणार्थ शंतनू हा क्षत्रिय तर त्याची पत्नी गंगा ही शूद्र वर्णातील होती. तसेच पराशर हा ब्राह्मण तर मत्स्यगंधा कोळीण होती. मनूने हे सारे बंद पाडले. वर्णांचे जातीत रूपांतर केले याचा अर्थ दर्जा व व्यवसाय हे वंशपरंपरागत करण्यात आले. हा बदल टप्प्याटप्प्याने करण्यात आला. पहिल्या टप्प्यात वर्णाचा दर्जा व व्यवसायाचा काळ माणसाला ठरवून देण्यात आला, त्यानंतर तो माणसाच्या आयुष्यापुरता झाला व नंतर तो वंशपरंपरागत करण्यात आला. कायद्याच्या भाषेत बोलायचे तर सुरवातीला वर्णाने दिलेली इस्टेट ही काही काळापुरती होती; नंतर ती आयुष्यभर व नंतर ती वारसांना मिळू लागली. म्हणजेच वर्णाचे रूपांतर जातीत झाले.

मुलाचा वर्ण ठरविण्याच्या पद्धतीत तीन मूलभूत बदल केले गेले. पहिला हा की मुलांना प्रशिक्षण देणारी व प्रशिक्षणानंतर मुलांचे वर्ण ठरविणारी गुरुकुल पद्धती बंद करण्यात आली. गुरूच्या जागी मनूने मुलाच्या उपनयनाचा विधी करण्याची जबाबदारी त्याच्या पित्यावर टाकली. उपनयनाचा विधी त्याने संस्काराचा विधी बनविला. जुन्या काळी उपनयन हा विधी पदवीदान समारंभासारखा होता. या विधीत गुरु विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार वर्णाची पदवी देत असे. उपनयन करण्याचा अधिकार गुरूऐवजी पित्याला देण्यात आला, हा सर्वांत मोठा व महत्त्वाचा बदल आहे. कारण यामुळे पिता आपला स्वतःचा वर्ण मुलाला देऊ लागला. याप्रमाणे वर्णाचे रूपांतर जातीत केले गेले. यामुळे हिंदूसमाजात इतर गोष्टींपेक्षा फक्त जन्माबद्दलचा आदर निर्माण झाला आहे.

सतीची चाल, पुनर्विवाह बंदी, व बालविवाह : ब्राह्मणशाहीने केलेल्या कृत्यांतील तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्राह्मणेतर जनतेपासून ब्राह्मणांना विभक्त करणे, ब्राह्मणेतर जनतेचे निरनिराळे उच्च-नीच सामाजिक स्तर करून त्यांना परस्परापासून दूर ठेवणे, ही आहे. आंतरवर्णीय विवाह आणि सहभोजन यांवर मनूने बंदी घातली. मनूने शूद्रांबद्दल व स्त्रियांबद्दल कितीतरी उबग आणणारे उद्गार काढले आहेत. आंतरजातीय विवाहांना बंदी व सहजीवनाला बंदी या दोन खांबांवर जातिव्यवस्था उभी आहे. जातिव्यवस्था व तिचे आंतरजातीय विवाह व सहभोजन यांच्यावरील बंदी यांचे संबंध साधन आणि साध्य असे आहेत. दुसऱ्या कोणत्याही साधनांनी हे साध्य झाले नसते. मुलींच्या विवाहाबाबत आणि विधवांच्या जीवनाबाबत मनुस्मृतीत जी तरतूद केली आहे तिच्याशी याचा संबंध आहे.

मुलीच्या विवाहाबद्दल मनूने असे आदेश दिले- ‘मुलगी वयात आली नसली, बालिका असली, तरी तिचा विवाह करावा.’ विधवांबद्दल मनू लिहितो की त्यांनी पुनर्विवाह करू नये. तसे केल्यास त्यांचा अधःपात होईल. मनूइतकाच ज्याचा अधिकार आहे त्या याज्ञवल्क्याने विधवेने स्वतंत्र राहू नये, एकटे राहू नये असे म्हटले. विज्ञानेश्वर यांनी “पतीबरोबर सती जाण्यात मोठे पुण्य आहे.” असे आपले मत दिले आहे.

सतीची चाल, पुनर्विवाहास बंदी व बालविवाह या प्रथा आंतरजातीय विवाहांवर बंदी घालण्यासाठी अंमलात आणल्या गेल्या. ज्या गटांना जातिव्यवस्था निर्माण करायची आहे त्यांच्या दृष्टीने समाजातील पुरुष आणि स्त्रियांच्या संख्येतील समानता हेच अंतिम ध्येय ठरते. त्याशिवाय जातीतच व्यवहार (विवाह) करणे शक्य नाही. यामुळे विवाहयोग्य पुरुष व स्त्री यांच्यामधील संख्येतील विषमता सतत दूर करावी लागते. पत्नीच्या आधी पती मेला तर एक अधिक स्त्री शिल्लक राहते. तिला काहीही करून दूर करावे लागते, म्हणून ‘सती’! जर पत्नी मेल्यानंतर पुरुष जिवंत राहिला तर एक पुरुष अधिक होतो. या अधिक पुरुषाला दूर करावे लागते. जातीतील स्त्री-पुरुषांतील संख्येतील विषमता चार मार्गांनी टाळता येते. 1) स्त्रीला मृत पतीबरोबर जाळणे. 2) स्त्रीवर सक्तीचे वैधव्य लादणे. 3) विधुरावर ब्रह्मचर्य लादणे. 4) त्याचा विवाह योग्य वयापेक्षा कमी वयाच्या मुलीशी लावणे. याचबरोबर संन्याशाचा गौरव, विधुराने संन्यास घ्यावा अशी प्रेरणा देण्याचा प्रयत्न, हाही एक मार्ग आहे. इतकेही करून जर कोणी जातीमध्ये न राहता जातीबाहेर विवाह करतो त्यास जातिबाह्य करावे असे मनू सांगतो. जातिबाह्य माणसास सर्व सामाजिक बंधनापासून तोडण्यात येते व तो कोणत्याही अधिकारास पात्र नसतो. मनूचे जातिबाह्य व्यक्तीबाबतचे कायदे मानवतेला धरून नाहीत. ते लादले गेले. कारण जातीबाहेर जाणाऱ्यांना शिक्षा केली तरच जातिव्यवस्था टिकून राहू शकते याची मनूला पूर्ण जाणीव होती.

आज सतीची चाल, बालविवाह ह्या प्रथा जवळजवळ बंद झाल्या आहेत; पण पुनर्विवाहास पाहिजे तेवढी मान्यता आजदेखील नाही. आंतरजातीय विवाह एखाददुसरा सोडल्यास होतच नाहीत. त्यामुळे जातिव्यवस्था टिकून आहे व देशात एकतेची भावना अजून जोर पकडत नाही. जोपर्यंत महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे नेते देशात पुन्हा तयार होत नाहीत तोपर्यंत हा प्रश्न तसाच पडून राहणार. ऑस्टिन, टेक्सास (अमेरिका)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.