‘आम्ही नागरिक’

शासनाच्या क्रियांमुळे व निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या हक्कांमध्ये सतत झीज होत असल्याचे आपण सारे अनुभवत आहोत. हे राजकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत घडत आहे. आता ही झीज थांबवून एकत्रित नागरी क्रियांमधून नागरिकांचे हक्क पुन्हा मागण्याची वेळ आली आहे. या हेतूने ‘आम्ही नागरिक’ (We, The People) या नावाने एक संस्था स्थापण्यात येत आहे

. 1) केंद्रीभूत मुद्दे : खालील बाबतीत नागरिकांच्या हक्कांचे पुनःप्रस्थापन करणे – क) कायद्याचे राज्य, नेमकेपणाने सांगायचे तर नागरिकप्रेमी कायदा, सुव्यवस्था व निराकरणाच्या यंत्रणांची मागणी करणे. ख) समन्यायी, परिणामकारक व कार्यक्षम तऱ्हेने सार्वजनिक सेवा (Public Services) लोकांपर्यंत पोचवणे. धर्म, जात, संप्रदाय यांनी चळून न जाता मानवी गरिमा (dignity) हे मूल्य जोपासणे. 2) हे होणार कसे? : क) नागरिकांचे हक्क व सामाजिक मूल्यांबाबत जनजागृती करणे. ख) निर्वाचित लोकप्रतिनिधी व त्यांच्या मार्फत शासनयंत्रणेच्या जवाबदेहीची (accountability) खातरजमा करणे. ग) परिणामकारक व कार्यक्षम सेवा पुरवण्यात लोकांचा सहभाग असणे. 3) नेमके प्रकल्प : क) युवकांशी संवादातून नागरी बाबींबद्दल विद्यार्थी व युवकांना शिक्षण देणे. ख) लोकसमित्यांमार्फत सेवा पुरवण्यावर व अन्यायांच्या निराकरणावर देखरेख करण्यासाठी गट घडवणे. ग) कायदा, सुव्यवस्था, नागरी सेवा यांबाबत जाहीर चर्चा व प्रकाशनांमधून मते मांडणे व अशा चर्चांचे व मत पाहण्यांचे निष्कर्ष प्रकाशित करणे. 4) कार्यपद्धती : क) वरील कामे करण्यासाठी आवश्यक अशा प्रत्यक्ष अभ्यासासाठी एक ‘गाभ्या’चा गट घडवणे. ख) कामाच्या विस्तारासाठी समविचारी लोकांशी संपर्काचे जाळे विणणे. होताहोता अनुभवातून आम्ही आमचे हेतू साध्य करण्यासाठी कामांची व्याप्ती वाढवू. हे हेतू संस्थेच्या घटना-टिपणांत (Memorandum of Association) नोंदले आहेत. याच हेतूने आम्ही आपणाला ‘आम्ही नागरिक’चे सदस्य होण्याचे आवाहन करत आहोत. घटना-टिपण

प्रास्ताविक : कायद्याचे राज्य आणि संविधानात केंद्रस्थानी मानलेल्या मूल्यांची झीज होत जाताना आपण आपल्या दैनंदिन जीवनात पाहत आहोत. जसे * धर्माच्या नावाने खून, बलात्कार व विध्वंस होत आहेत. * दलितांवरील अत्याचार सुरूच आहेत. * ‘हप्ते’ दिल्याशिवाय छोटे व्यापारी तगू शकत नाही आहेत. * विवादांना न्यायव्यवस्थेच्या बाहेरच सोडवण्यासाठी ‘दादा’ व खाजगी सेना वापरल्या जात आहेत. * खंडणीसाठी मुलांची अपहरणे होत आहेत. * भिन्न समाजांमधील युवकयुवतींना एकमेकांवर प्रेम करण्यासाठी फाशी दिले जात आहे. * रोज हुंडाबळी होत आहेत. * बालिकांविरुद्ध गुन्हे सार्वत्रिक आहेत. * घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी हत्या होत आहेत. * पोलीस गुन्हेगारांचे हस्तक असल्याची प्रतिमा जनमानसात घडत आहे. * नागरी सेवासुविधांसाठी ‘खाजगी’ मोल मोजावे लागत आहे. * शासकीय नोकऱ्यांचा लिलाव होत आहे.

* लोकप्रतिनिधींचे नवनवे घोटाळे रोज जाहीर होत आहेत. * राजकीय पक्ष काळ्या पैशांच्या पायावरच कार्यरत आहेत. * निवडणुकांमधून संशयास्पद व गुन्हेगारी कलाच्या व्यक्ती पुढे येत आहेत. * औद्योगिक प्रदूषणाची दखल घेतली जात नाही आहे. * सार्वजनिक ठेवी अधिकारी व्यक्तींकडून लुटल्या जात आहेत. हे सारे होत असताना न्यायालये व राजकीय प्रक्रिया यांमधून दाद मागणेही गतार्थ होत आहे. दैनंदिन जीवन सुरू आहे. गरजांच्या पूर्तीसाठी खरेद्या होत आहे. लोक जात येत आहेत. दूरदर्शनसंच ‘घेत’ आहेत. विवाह, जन्म, मृत्यू यांत खंड नाही. पण या सर्व ‘शांत’ व्यवहारांमागे दादा, माफिया, पोलीस, शासकीय व खाजगी संस्थांच्या अधिकाऱ्यांची दहशतही आहे. वर्षानुवर्षे सामान्य नागरिक या लुटारूंपुढे माघार घेत आहेत. नागरी समाज वेढ्यात अडकला आहे. म्हणून आम्ही ही संस्था घडवत आहोत.

आम्हाला राजकीय सत्ता नको आहे, हे आम्ही स्पष्ट करतो. [‘इंट्रोड्यूसिंग ‘वुई द पीपल’, द अलायन्स फॉर सिव्हिल सोसायटी’, ही पुस्तिका आम्हाला उपलब्ध झाली. पत्ता आहे : सेवा कुटीर, 16, महाराष्ट्र सोसायटी, मीठाखली बस स्टॉप, अहमदाबाद 380006. दूरध्वनी : 6463038, फॅक्स : 6464509 पत्रकावर न्यायमूर्ती टी.यू. मेहता, नरहरि मावळंकर, प्रफुल्ल अनुभाई, कल्याणभाई शहा, अरविंद देसाई, कीर्ती शहा, गौरांग दिवेटिया, श्रेणिक कस्तुरभाई, इलाबेन भट्ट व कार्तिकेय साराभाई यांच्या सह्या आहेत. मला हा उपक्रम अनुकरणीय वाटतो – सं . ]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.