‘व्हाय आय अॅम नॉट अ मुस्लिम ?’ च्या निमित्ताने (भाग-१)

इब्न वर्राक या अल्जेरियन अरबाने ‘व्हाय आय अॅम नॉट अ मुस्लिम?’ मी मुसलमान का नाही — हे पुस्तक लिहिले-ते 1995 मध्ये अमेरिकेमध्ये प्रसिद्ध झाले. वर्राक यांनी हे पुस्तक कसे काय लिहिले, याचे आश्चर्य तर वाटलेच; पण तेवढीच या लेखकाबद्दल काळजीदेखील वाटली. आपापल्या धर्माची चिकित्सा सतत केली जाणे हे त्या त्या धर्मप्रवृत्तींना, त्या त्या समाजाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असते. त्यामुळेच तो समाज विकसनशील होत जातो. परंतु दिसते असे की तो मार्ग मुस्लिम मानसिकतेने मोकळ्या मनाने अंगीकारलेला नाही. हिंदूधर्मामध्ये तर आरंभापासूनच असंख्य वेळा धर्मचिकित्सेचे लहानमोठे प्रयत्न होत राहिले. त्या त्या वेळी लहानमोठी वादळे उठतात आणि पुढचा मार्ग खुला होतो. ख्रिश्चन धर्मामध्येदेखील असे प्रयत्न होत राहिले. बीड रसेल या जगन्मान्य विचारवंताने 1937 मध्ये ‘व्हाय आय अॅम नॉट ए ख्रिश्चन’ -मी ख्रिश्चन का नाही – यावर, साऊथ लंडन नॅशनल सेक्युलर सोसायटीच्या बॅटरसी टाऊन हॉलमध्ये एक व्याख्यान दिले होते. त्या व्याख्यानाचे पडसाद जगभर उमटले होते. काही लोकांनी त्यांच्या विचारांना पाठिंबा दिला होता. तसेच काही लोकांनी त्यांना पाखंडी ठरवले आणि त्यांची प्रोफेसरशिप त्यांना नाकारली गेली. आपल्या या व्याख्यानातून रसेल यांनी जीजस ख्राईस्टच्या प्रेषितपणाबद्दल आशंका व्यक्त करून तो एक अत्यंत दयाळू, उदारमनस्क सज्जन पुरुष होता असे म्हटले. त्याच्या आदेशातील, शिकवणीतील त्रुटी दाखवून, चर्चने केलेल्या अनन्वित अत्याचारांची निर्भत्सना केली आणि जगातील विकासाच्या प्रयत्नांना चर्चने सतत खीळ घातली, यासाठी चर्चला दोषी ठरवले. पुढे असेही म्हटले की ईश्वरानेच ही सृष्टी निर्माण केली असे म्हणणे म्हणजे मानवाच्या कल्पनाशक्तीचे दारिद्र्य दाखवणे असे आहे. रसेल यांनी देव, धर्म, प्रेषितपणा सगळेच धिक्कारले. स्वतःला सतत पापी म्हणवून घेत, एका अनाकलनीय, कल्पित भीतीच्या आवरणाखाली वावरण्यापेक्षा ज्ञान, समता, धैर्य या गुणांची थोरवी गाऊन आणि तीच मानवी जीवनाची शक्ती असायला हवी, असे रसेल म्हणाले.

इब्न वर्राक यांच्या या पुस्तकाला प्रचंड विरोध तर निश्चितच झाला असणार. परंतु सलमान रश्दीप्रमाणे त्यांनाही जीवे मारण्याचा फतवा काढला गेला होता की नाही, हे मला कळले नाही. हे पुस्तक लिहिण्याचे निमित्त, रश्दी यांना मारण्याचा फतवा निघाला होता, असे वर्राक प्रस्तावनेत म्हणतात. आपण हे पुस्तक लिहीत आहोत त्याचा काय परिणाम होऊ शकतो, याची पूर्ण कल्पनाही त्यांना होती. ते म्हणतात, “माझा जन्म एका कट्टरपंथीय मुस्लिम कुटुंबात झाला. ‘इस्लामिक रिपब्लिक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका देशात मी मोठा झालो, श्रद्धाळू मुस्लिम पद्धतीनेच माझी वाढ झाली. बहुतेक मुस्लिम मुलांचे होते त्याप्रमाणे माझ्या मातृभाषेतले शब्द मला लिहायला वाचायला शिकवण्याअगोदरच, माझ्याकडून कुराण पाठ करून घेण्यात आले. मला त्यातला एकही शब्द कळला नाही. पण जसजसा मी मोठा होऊ लागलो, तसतसा मी स्वतः इस्लामच्या मूलत्त्वांबद्दल विचार करू लागलो. त्यानंतरच मी मानवतावादी, निरीश्वरवादी झालो. सर्व धर्म म्हणजे आजारी वृत्तीच्या माणसाची स्वप्ने आहेत. ती माणसाला चुकीच्या मार्गाने नेणारी आणि माणसाला अपायकारक आहेत असा माझा दृढ विश्वास बनला.” रश्दी प्रकरण उद्भवले, त्यावरच्या तीव्र अशा उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या तेव्हा हे पुस्तक लिहायला वर्शक उद्युक्त झाले. ते काही लेखक नव्हेत. हे त्यांचे पहिलेच पुस्तक.

प्रस्तावनेमध्ये वर्राक म्हणतात, ‘दुसऱ्या महायुद्धानंतर जन्मलेल्या माझ्या पिढीतल्या लोकांना वाटते की नाझीवाद, समाजवाद, लोकशाही, राजा, देश, देशाचे स्वातंत्र्य, वसाहतवाद अशा त्यावेळच्या समाजाच्या जीवनमरणाशी संबंधित अशा मुद्द्यांवर आमच्यासारख्यांनी कोणती भूमिका घेतली असती कोण जाणे; पण रश्दी प्रकरणाच्या निमित्ताने आपण आपली भूमिका स्पष्टपणाने मांडली पाहिजे असे वाटले म्हणून हे पुस्तक लिहिले कारण हा प्रश्न फक्त रश्दीबद्दलचाच नाही तर अल्जेरिया, सुदान, इराण, सौदी अरेबिया, पाकिस्तान यांच्याशीही निगडित आहे. तिथे युद्धे सुरू आहेत. तिथे सर्वसामान्य मुसलमान मारले जात आहेत, मुस्लिम बायकांवर अत्याचार होत आहेत. मुस्लिम विचारवंत, लेखक, कलावंत यांची गळचेपी होत आहे. त्याना मारून टाकण्याचे फतवे निघत आहेत. हे पुस्तक लिहावे की नाही याबद्दल माझे काही निश्चितपणे ठरत नव्हते तेव्हा इस्लामच्या नावाने, अल्लाच्या नावाने अल्जेरिया, इराण, तुर्कस्तान, सुदान वगैरे ठिकाणी मारामाऱ्या होत होत्या. खून पडत होते. त्यामुळेच हे पुस्तक लिहिण्याचा मी निर्णय घेतला.

वर्राक यांना सर्वाधिक संताप आला तो पाश्चात्त्य विचारवंतांचा; कारण त्यांनी कट्टरपंथीय मुस्लिमांचा कैवार घेऊन रश्दी प्रकरणाबद्दल लिहिले. हा म्हणजे अत्यंत वाईट तऱ्हेचा, खोटी कृपादृष्टी दाखवण्याचा प्रकार झाला. कितीतरी मुसलमानांनीच रश्दीला उघडपणाने पाठिंबा दिला होता; कारण त्यांना लेखनस्वातंत्र्याचे महत्त्व पटले होते. रोज अल्- युसूफ या इजिप्शियन नियतकालिकाने तर ‘सेटॅनिक व्हर्सिस’ मधला काही भाग जानेवारी 1994 च्या अंकात प्रसिद्ध केला होता. वर्राक यांना तेवढाच संताप आणखी एकदा आला होता. ‘दि लास्ट टेम्प्टेशन ऑफ ख्राईस्ट’ (ख्रिस्ताला पडलेला अखेरचा मोह) या चित्रपटावर बंदी – घालावी म्हणून ख्रिश्चनांनी आंदोलन चालवले होते, तेव्हा मुस्लिमांनी त्या ख्रिश्चनांची बाजू घेतली होती. आपापले हितसंबंध जपणाऱ्यांचे हे जे साटेलोटे चालते त्याला वर्राक यांचा आक्षेप आहे; कारण त्यामुळे विचार मारले जातात, विचारांवर उलटसुलट चर्चाच होत नाही, तर लोक एकदम एकमेकांच्या जीवावरच उठतात. इस्लामवर काहीही टीका केली की व्यक्ती, समाज, देश पेटून उठतात. त्यांचे म्हणणे असते की अशी टीका म्हणजे, ख्रिश्चन आणि ज्यूंनी संगनमताने वंशवादी, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, नववसाहतवादी, फॅसिस्ट वृत्तीने इस्लामवर चढविलेला हल्ला आहे. त्यामुळे इस्लामवर टीका केलेले मुद्दे बाजूलाच राहतात. त्यावर चर्चा होऊच दिली जात नाही. वर्राक म्हणतात ‘बड रसेलचे ‘व्हाय आय अॅम नॉट ए ख्रिश्चन’ हे पुस्तक वाचल्यावर त्यांच्या अल्जेरिअन मित्राला, रसेलने ख्रिस्ती धर्माला मोठाच धक्का दिला म्हणून आनंद वाटला होता, समाधान वाटले होते, परंतु रसेलच्या ‘गॉड’ ऐवजी मी ‘अल्ला’ असे म्हणून हे पुस्तक लिहिल्यावर रसेलने जसा धक्का दिला तसा मी दिला, असे माझ्या मित्राला वाटले का?’

पुस्तकाच्या आरंभीच वर्राक वाचकाला इशारा देतात की मूळ तत्त्व आणि वास्तव यामधला फरक वाचकाने लक्षात ठेवायला हवा. मुसलमानांनी कसे असायला हवे आणि ते कसे असतात, त्यांनी कशावर श्रद्धा ठेवायला हवी, त्यांनी काय करायला हवे आणि ते कशावर श्रद्धा ठेवतात, ते प्रत्यक्षात कसे वागतात; यामधला फरक लक्षात घ्यायला हवा. वक म्हणतात की इस्लामचे तीन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात येते मोहम्मद पैगंबराची शिकवण, जी कुराणात आलेली आहे. दुसऱ्या प्रकारात येते ते मुस्लिम तत्त्वज्ञांनी परंपरा रीतिरिवाजांद्वारे केलेले कुराणाचे विवरण, विश्लेषण, विवेचन, विस्तार, हे सगळे हडीथमध्ये येते. त्यामध्येच शरिया, इस्लामी कायदे यांचा समावेश होतो. तिसऱ्या प्रकारच्या इस्लामध्ये येते मुस्लिमांनी प्रत्यक्षात काय केले, ते कसे वागले, त्यांनी काय कमावले- म्हणजेच इस्लामची संस्कृती. वर्राक म्हणतात, जे या पुस्तकाचे सार आहे, की इस्लामी संस्कृतीने जी उंची गाठली आहे, जी उत्तम कामगिरी करून दाखवली आहे ती कुराण किंवा हडीथमुळे नव्हे तर कुराण आणि हडीथ असूनदेखील. इस्लामी जगाला अत्यंत अभिमान वाटणाऱ्या, ज्याकडे पुन्हा पुन्हा वळून मागे जावे असे वाटायला लावणाऱ्या कला, तत्त्वज्ञान, शास्त्र, साहित्य या क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरी बजावली गेली ती जेव्हा इस्लामचा अरबस्तानच्या बाहेरच्या जगाशी म्हणजे प्रामुख्याने ग्रीक ज्ञान, तत्त्वज्ञान, विज्ञान, साहित्याशी संबंध आला, संपर्क वाढला तेव्हापासूनच. या गोष्टी अरब जगतात नव्हत्याच. तो काळ ‘जाहिलियतचा’ – अज्ञानाचा होता, अशी समजूत रूढ आहेच. ग्रीक साहित्याशी संबंध आल्यावरच या गोष्टी इस्लामी जाणिवेत आल्या. त्याबद्दलचे सगळे पुरावे वर्राक तपशीलवार इतिहासातून देतात.

बाहेरच्या जगाशी इस्लामचा संपर्क तुटला तो अल गझाली या मुस्लिम विचारवंतामुळे. इ.स. 1059 ते 1111 हा गझालीचा कालावधी. त्याने म्हटले की, सॉक्रेटिस, हिप्पोक्रिटीस, प्लेटो, अॅरिस्टॉटल यांच्याशी आलेला संपर्क हा दुर्दैवी होता; कारण ते नास्तिक होते. आपली बुद्धिमत्ता, वादविवादपटुत्व, पांडित्याच्या जोरावर त्यांनी चलाखी करून, पवित्र संप्रदायाचे कायदेकानू, त्यांच्या धार्मिक श्रद्धा, विश्वास यांना मोडीत काढले. त्यांची तत्त्वे नास्तिक आहेत. त्यांचा पूर्णपणे धिक्कारच केला पाहिजे; कारण त्यांनी म्हटले की हे विश्व अनादिअनंत आहे. व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांशी ईश्वराचा काहीही संबंधच नसतो; कारण हे विश्व मानवजात कोणीही निर्माण केलेली नाही. कयामतच्या दिवसावरही त्यांचा विश्वास नाही. गझालीने गणित, तर्कशास्त्र आणि भौतिकशास्त्र यांच्याबद्दल आक्षेप घेतला नाही. परंतु या विषयांच्या अभ्यासामुळे माणसांना या विषयांच्या कक्षेबाहेरचेही विचार सुचतात. असे स्वतंत्रपणाने केलेले विचार धर्म आणि धर्माधिष्ठित कायदे, या विरुद्ध जातात. म्हणून गझालीने जे ज्ञान कुराणात, हडीथमध्ये नाही त्यावर बंदीच घातली. त्यामुळे इस्लामचा इस्लामेतर ज्ञान, विज्ञान, तत्त्वज्ञानाशी संबंधच तुटला.

वर्राक यांचा हे विधान वाचताना मला आठवले, की युरोपमध्ये प्रबोधनाच्या काळाची – मन्वंतराची सुरुवात झाली तीच मुळी विस्मृतीत ढकलून दिलेल्या ख्रिस्तपूर्व प्लेटो, ॲरिस्टॉटल, सॉक्रेटिस इत्यादी विचारवंतांकडे पुन्हा एकदा मागे वळून पाहून, त्यांची शिकवण नव्या दमाने तपासून पाहिली तेव्हापासून. परंतु खरी सुरुवात झाली ती निकोलस कोपर्निकसपासून. तो चर्चचा पाईक होता, पण त्याचबरोबर तो चित्रकार, कवी, डॉक्टर, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, सैनिक आणि शास्त्रज्ञही होता. म्हणजे या सगळ्या कलाविद्यांमध्ये तो निपुण होता. 1473 ते 1543 हा त्याच्या आयुष्याचा काळ म्हणजे युरोपच्या मन्वंतराची सुरुवात होती. पृथ्वी ही स्थिर नसून ती रोज स्वतःभोवती फिरत असतानाच वर्षभराच्या अवधीत ती सूर्याभोवती फिरत असते, हे तत्त्व त्याने मांडले. त्यामुळे, ईश्वराने निर्माण केलेली पृथ्वी स्थिर असून चंद्र-सूर्य पृथ्वीभोवती फिरतात, या बायबलप्रणीत सूत्राला, पर्यायाने ईश्वराच्या कर्तृत्वालाच धक्का दिला होता. कोपर्निकसनंतर ब्रूनोने पुढे जाऊन म्हटले की अवकाश अनंत आहे आणि दूर कुठेतरी दुसऱ्या एखाद्या ग्रहावर आपल्यापेक्षाही अधिक प्रगत माणसे असू शकतात. त्यासाठी ब्रूनोला नास्तिक, धर्मविरोधी ठरवून 1600 साली जिवंत जाळण्यात आले होते. तरीदेखील विज्ञानाचा पाठपुरावा चालूच राहिला. 1844 मध्ये डार्विनने प्राणिमात्राच्या – मनुष्याच्या उत्क्रांतीचा नकाशाच तयार केला आणि पुन्हा एकदा ईश्वराने सात दिवसांत सर्वसृष्टीची निर्मिती केली या ख्रिश्चन श्रद्धेला मोठाच धक्का दिला आणि मोडीतच काढले. ज्ञानाच्या विविध शाखांमध्ये युरोपने अत्यंत झपाट्याने प्रगती करून घेतली. आता तर टेस्टट्यूबमध्ये माणसाला जन्माला घालणेही साध्य झाले आहे. मागे श्री. म. माटे यांनी एका लेखात म्हटले होते तसे उद्याचे शास्त्रज्ञ कदाचित टेस्टट्यूबमध्ये प्रत्यक्ष ईश्वरालाही तयार करू शकतील! याचा अर्थ एवढाच की माणसाच्या सर्वांगीण विकासाचे सारे दरवाजे युरोपमध्ये खुले झाले. परंतु अल गझालीच्या शिकवणीमुळे इस्लामने ज्ञानाचे दरवाजेच बंद करून घेतल्यामुळे, बाकी सगळे जग विकासापाठोपाठ येणाऱ्या समृद्धीच्या मार्गाने पुढे जात असताना, इस्लामी समाज मात्र त्याच जुन्यापुराण्या जमान्यात रूतून बसला.

बड रसेल यांच्याप्रमाणे इब्न वर्राक ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल काही न बोलता इस्लामचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे जीवनचरित्र, त्यांची शिकवण, वेगवेगळ्या प्रसंगीचे त्यांचे भाष्य, आदेश, वागणूक याची चर्चा करतात आणि इस्लामी कायद्यानुसार शत्रू, मित्र, स्त्रिया, गुलाम यांना दिली जाणारी वागणूक, ज्ञान-विज्ञानाच्या कक्षा, विविध कला, मानवाचे हक्क, न्याय, लोकशाही, गूढवाद, तत्त्वज्ञान यांचे इस्लामधील स्थान, अरबांचे वर्चस्व, सूफीपंथ अशा विविध मुद्द्यांची चर्चा ते करतात. सतरा प्रकरणे आणि 360 पृष्ठांच्या या पुस्तकात वर्राक यांनी कुराण आणि हदीस (प्रेषित मोहम्मद यांनी केलेले न्याय निवाडे, कोणत्या वेळी ते स्वतः कसे वागले, ते काय बोलले, उदाहरणे वगैरे) यांमधील असंख्य पुरावे, मुस्लिम-बिगरमुस्लिम विचारवंतांची वक्तव्ये, इस्लामपूर्व काळापासूनची अरबस्तानातील समाजपरिस्थिती, इतिहासातील अगणित घटनांचे दाखले, यांचे तपशील देतदेत आपल्या विषयाची मांडणी केली आहे.

इस्लामविरोधाची सुरुवात -इस्लामच्या स्थापनेपासूनच मोहम्मद पैगंबरांना आणि त्यांच्या धर्माला कसा आणि का विरोध होत होता, इथपासून सुरुवात करून थेट रश्दीपर्यंत या विरोधाचा विस्तृत आणि साक्षेपाने आढावा घेतला आहे. सुरुवातीच्या काळात या नव्या धर्माचा स्वीकार करण्याची अरबांची इच्छा नव्हती. त्यांचा या धर्माला विरोधच होता कारण इस्लामने दारू- नशा करण्यावर बंदी घातली आणि पत्नीशिवाय इतर स्त्रियांशी लैंगिक संबंध ठेवण्यावर बंदी घातली. भटक्या अरब टोळ्यांना या दोन्ही गोष्टी आवडणाऱ्या नव्हत्या. परंतु मोहम्मद यांच्या सैन्याला छोट्या-छोट्या लढायांत जसजसा जय मिळत गेला आणि त्यांना पराभूतांची लूट करण्याची, त्यांच्या बायकामुलींना पळवून आणून त्यांच्याशी संबंध ठेवण्याची, गुलाम म्हणून ठेवण्याची परवानगी मिळाली, त्याने अरबांना इस्लामकडे आकर्षून घेतले. त्याचबरोबर जे मुसलमान होत नव्हते त्यांना मृत्युदंडाचीच शिक्षा होऊ लागली. हळूहळू मुस्लिमांची संख्या वाढू लागली. इस्लामचा विस्तार होऊ लागला.

त्यावेळेपासून उम्माईद, अब्बासी टोळीवाल्यांनी विरोध केला होता. खारिजी या इस्लामी पंथीयांनीच मोहम्मदाचा जावई अली याला खलिफा होण्यासाठी विरोध केला होता. हा विरोध राजकीय सत्तेसाठी होता. त्यासाठी त्यांचा अतोनात छळही झाला होता. याझिद बिन आर्ब अनिसा या खारिजी तत्त्वज्ञाने मात्र वेगळाच विचार मांडला की ज्यू, ख्रिस्ती, इस्लामसारखाच एका नव्या धर्माचा, नव्या प्रेषिताचा, नव्या कुराणाचा उदय इराणमध्ये होणार आहे! (पृष्ठ 245)

प्रस्थापित इस्लाममध्ये खऱ्या अर्थाने नवा विचार आणला तो मुत्तझिलीट या अरबांनी. त्यांच्यापैकी अहमद बिन हबिट याने तर कुराण, हदीसच्या विश्वासार्हतेलाच आह्वान दिले. त्यांनीच सर्वप्रथम ग्रीक ज्ञान-विज्ञान, तत्त्ववेत्त्यांच्या ग्रंथांचे अरबी भाषेत भाषांतर करून इस्लामच्या कक्षा रुंदावण्याचे, उंचावण्याचे काम सुरू केले. श्रद्धेऐवजी विवेकवादाचा पुरस्कार केला. इ.स. 820 मध्ये जन्मलेला अल रेवंडी हा यांच्यापैकीच सर्वांत महत्त्वाचा विचारवंत. ईश्वराच्या संकल्पनेचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण देता येत नाही म्हणून त्याने सगळ्या देव, धर्म, प्रेषित ह्या कल्पनाच नाकारल्या. इस्लामबरोबरच त्याने ज्यू आणि ख्रिस्ती धर्मही धिक्कारला. पण मुख्य रोख होता तो इस्लामवर; कारण त्यामध्ये रेवंडीला विवेकशीलता, तर्कशुद्ध विचार दिसला नाही. प्रेषिताला सोयीचे, स्वार्थासाठीचे दैवी संदेश मिळाले म्हणून त्याने कुराण, हदीसलाही मोडीत काढले. त्याने खुद्द ईश्वरालाच उद्देशून म्हटले, ‘एखाद्या गावंढळ, दारू प्यायलेल्या माणसाप्रमाणे तू उपजीविकेच्या साधनांची वाटणी तुझ्या लोकांमध्ये करून टाकलीस. जर एखाद्या माणसाने असी वाटणी केली असती तर त्याला आम्ही म्हटले असते की तू लोकांची फसवणूक केलीस. त्यासाठी तुला चांगलाच धडा शिकवायला हवा’ (पृ. 260) रेवंडीच्या या पाखंडी, अतिरेकी विचारांमुळे त्याचा अतिशय छळ झाला. धर्ममार्तंडांनी त्याला गावातून हाकलूनच दिले, परदेशी जाण्यास भाग पाडले. रेवंडी निदान जीवानिशी निसटू तरी शकला. इतर बऱ्याच जणांना अपरंपार छळ सोसावा लागला. अत्यंत क्रूर अशी मृत्युदंडाची शिक्षा भोगावी लागली.

त्यानंतरच अल गझालीचा उदय झाला आणि स्वतंत्रपणे विचार करण्यावर बंदी आली. कुराण, हदीस, शरियामध्ये इस्लाम बंदिस्त केला गेला. तरीदेखील धर्मचिकित्सा चालू राहिली हे विशेष. 1280 मध्ये इब्न कम्मून या ज्यू तत्त्वज्ञ आणि निष्णात डॉक्टरने तर्कशुद्ध दृष्टिकोनातून ज्यू, ख्रिस्ती, इस्लाम या तिन्ही धर्मांची परखड चिकित्सा केली. इस्लामबद्दल त्याने म्हटले की ज्यू, ख्रिस्ती धर्मापेक्षा वेगळे असे प्रेषित मोहम्मदाने काहीही सांगितलेले नाही. जे सांगितले ते स्वतःच्या सोयीचे, स्वार्थासाठी. मुसलमानांनी केलेल्या अत्याचारांमुळेच लोक मुसलमान होतात. त्याच्या या म्हणण्यामुळे बगदादचे मुस्लिम सरकारी अधिकारी त्याच्या घरावर चालून गेले. बगदादच्या अमीरने कम्मूनला जाळून मारण्याची शिक्षा ठोठावली. परंतु त्याच्या मित्रांनी त्याला एका पेटाऱ्यात बंद करून मोठ्या शिताफीने गावाबाहेर काढले, म्हणून तो वाचला.

अल दस्ती याने 1937 मध्ये लिहिलेल्या पुस्तकात असे म्हटले होते की, कुराणातील नीतिवचने वैशिष्ट्यपूर्ण नाहीत, ईश्वराला शोभणार नाही असा कुराणातील देव हा क्रूर, संतापी, गर्विष्ठ आहे. त्याचे हुकूम न पाळणाऱ्याला तो जबर शिक्षा देतो. त्यामुळे त्यांचे भक्तगणही तसेच क्रूर, संतापी, गर्विष्ठपणाने वागून अन्याय करणारे असतात. पण हे पुस्तक प्रसिद्ध झाले 1974 साली इराणमध्ये. इराणमधल्या खोमेनीप्रणीत इस्लामी क्रांतीनंतर त्याला तुरुंगात टाकले गेले. तिथे पराकोटीच्या छळाला तोंड देत देत, वयाच्या 83 व्या वर्षी अल दस्ती 1983 मध्ये मरण पावला. त्याअगोदर 1925 मध्ये कैरो येथील अल अझर युनिव्हर्सिटीमधील प्राध्यापक अली अब्द अल रझीक यांनी त्यांच्या ‘इस्लाम अॅण्ड दि प्रिन्सिपल्स ऑफ गव्हर्मेंट’ या पुस्तकामध्ये म्हटले होते की धर्म आणि राजकारण यांची फारकत केली पाहिजे कारण इस्लामची शिकवण मुळात तीच आहे. असे म्हटल्याबद्दल रझीक यांची इतर शेख -प्राध्यापकांसमोर चौकशी झाली. त्यांना पाखंडी ठरवून नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते.

इब्न वर्राक यांनी एक अत्यंत महत्त्वाची नोंद केली आहे. 1989 साली ‘ला इस्लाम क्वश्चन्स’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यामध्ये पंचवीस अरब लेखकांना विचारल्या गेलेल्या पाच प्रश्नांच्या उत्तरांचे संकलन आहे. ते प्रश्न होते- 1) इस्लामची वैश्विक मांडणी आजही टिकून आहे का? 2) आधुनिक राष्ट्रासाठी इस्लामिक राज्यव्यवस्था लागू होऊ शकते का? 3) मुस्लिम आणि अरब लोकांच्या विकासासाठी इस्लामी व्यवस्थेचे सरकार असणे आवश्यक आहे का? 4 ) बहुसंख्य मुस्लिम देशांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये इस्लामी पुनरुज्जीवनाचा जो विचार दिसतो तो योग्य आहे का? 5) आज इस्लामचा प्रमुख शत्रू कोण आहे? (क्रमशः) [ ‘अनुभव’ जाने 2004 मधून हा लेख प्रतिभा रानडे यांच्या परवानगीने घेतला आहे. सं . ] बी-10, मेदिनी निकेतन, बामनवाडा, विलेपार्ले पूर्व, मुंबई – 57

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.