परंपरा : अभिमान आणि उपमर्द

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवरील संभाजी ब्रिगेडच्या हल्ल्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात चर्चेचा गदारोळ उठल्याचे दिसून येते. जो तो उठतो व सदर घटनेसंबंधीचे आपले आकलन मांडायला सरसावतो. त्यात मीही या निमित्ताने थोडी भर टाकू इच्छितो.

खरे तर मला या घटनेच्या निमित्ताने ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची चर्चा करावयाची आहे. या घटनेच्या अनुषंगाने महाराष्ट्रात हा वाद पुन्हा एकदा चर्चेत येत आहे. हा वाद का निर्माण होतो, या वादाचे मूळ काय, या बाबींचा विचार होणे आवश्यक आहे, असे वाटते. कारण हा वाद महाराष्ट्रात खरोखरच अस्तित्वात आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनात या वादाच्या प्रभावाचे प्रमाण किती आहे, यावर वाद होऊ शकतो. परंतु तो अस्तित्वातच नाही किंवा नसलेला वाद उकरून काढला जात आहे, असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून नाही. एखादी सांस्कृतिक-सामाजिक घटना असो किंवा इतिहासातील एखादे व्यक्तिमत्त्व असो किंवा एखादा विशिष्ट विचार असो किंवा एखादा ग्रंथ असो, त्यावर व्यक्त केल्या जाणाऱ्या प्रतिक्रियांचे, मतांचे दोन गट निश्चितपणे करता येतात. एक गट दूरान्वयाने का होईना परंपराभिमान व्यक्त केल्याशिवाय राहात नाही. आणि परंपरेवर टीका केल्याशिवाय दुसऱ्या गटाचे आकलन पूर्ण होत नाही. दोन्ही गटांना परस्परांच्या या आकलनांची कल्पना असते. कोणत्याही विचार करण्याच्या प्रक्रियेवर व पद्धतीवर आपापल्या संस्कारांचा व सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमीचा परिणाम होत असतो. ज्या गटाची अस्मिता, श्रेष्ठत्व, प्रतिष्ठा, परंपरेने सांभाळलेली आहे, त्यांना परंपरेचा अभिमान वाटणे अगदीच स्वाभाविक आहे. याउलट परंपरेने ज्यांचा सातत्याने उपमर्दच केलेला आहे, त्यांना परंपरेचा अभिमान वाटणे स्वभावतःच अवघड असते. बाह्मण-ब्राह्मणेतर वादाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे, असा माझा समज आहे.

आजच्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या व समतेच्या काळात इहवाद, व्यक्तिस्वातंत्र्य, समता यांसारख्या मूल्यांना प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. त्यामुळे दोन्ही गटांच्या विचारवंतांना या मूल्यांचे समर्थन करावेच लागते. ही मंडळी आपापली अभिमानवस्तू वरील मूल्यांच्या निकषांवर कशी श्रेष्ठ ठरते, हे पटवून सांगतात. यात गैरही काही नाही. परंतु एखाद्या विचाराचा, ग्रंथाचा विपर्यास करून आपल्याला हवा तसा अर्थ घेण्याचा व मांडण्याचा एका गटाचा अट्टाहास दुसऱ्या गटाला उचकावतो आणि त्यातूनच वाद वाढतात. मग सार्वजनिक ठिकाणी वेगळे मत व खाजगीत वेगळे मत असे प्रकार होतात. खाजगीत व्यक्त केली जाणारी मते सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करण्याची हिम्मत तर होत नाही. मग ती कोणत्यातरी त्रयस्थ व्यक्तीकडून वदवून घेण्याचेही प्रयत्न होतात.

भाजपची डॉ. आंबेडकरांविषयीची सार्वजनिक भूमिका वादग्रस्त नसते. परंतु खाजगीत मात्र त्यांचे अवमूल्यन केले जात असते, असा एका गटाचा दावा असतो. कारण भाजपमधूनच कुणीतरी अरुण शौरी डॉ. आंबेडकरांविषयी आपले त्या प्रकारचे अभ्यासपूर्ण (?) मत पुस्तकरूपाने प्रकट करीत असतो. आंबेडकर, फुले यांना मोठी माणसे म्हणायचे व नंतर परंतुकाखाली त्यांचे दोष दाखवायचे, असे प्रकार दिसून येतात. यामागे केवळ चिकित्सा- समीक्षा असती तर प्रश्न निर्माण झाला नसता. परंतु असे होत नाही. कारण आद्य शंकराचार्य, ज्ञानेश्वर, एकनाथ यांच्याविषयी लिहिताना या गटाची लेखणी उत्साहित होते; परंतु पूर्वोक्त समीक्षा येथे डोकावत नाही. त्यांचे दोष दाखवितानाही परंतुकाखाली त्यांचे दोष झाकून टाकायचीच प्रवृत्ती आढळून येते किंवा प्रत्यक्षात ते दोषच कसे नाहीत, हे पटविण्याचा प्रयत्न होतो. चातुर्वर्ण्याचा निषेध तर करायचा; परंतु त्या काळात ती आदर्श व्यवस्था होती, हे मांडायचे. चातुर्वर्ण्याचा खणखणीत निषेध एका गटाला का करता येत नाही, याचा विचार होणे आवश्यक आहे. मनुस्मृतीवर एक जरी दृष्टिक्षेप टाकला तरी हा ग्रंथ विषमतासमर्थक विचारांनी किती परिप्लुत आहे, याचे दर्शन घडते. शूद्रातिशूद्रांचा त्यात किती उपमर्द केलेला आहे याचाही सहज प्रत्यय येतो. या ग्रंथाचे दोष दाखविताना परंतुकाखाली तो त्याकाळचा कसा आदर्श समाजशास्त्र सांगणारा ग्रंथ आहे, समाजशास्त्राविषयी त्यात किती मूलभूत विचार मांडलेला आहे, असे विचार मांडले जातात. मनुस्मृती सहजपणे चाळली तरी बहुजन समाजाला कुठल्याच कारणासाठी हा ग्रंथ अभिमानास्पद वाटणार नाही, हे दुसऱ्या गटाने समजावून घेतले पाहिजे. बाह्मण विचारवंत व ब्राह्मणेतर विचारवंत यांच्या दृष्टिकोनातील फरक हाच या वादाचे मूळ आहे, असे वाटते.

ब्राह्मणेतर विद्वानांतही परंपरेचा सकारात्मक विचार क्वचितच केला जातो. तुकारामांचे श्रेष्ठत्व प्रकट करताना त्यांना ज्ञानेश्वर-रामदासांचा जातीयवाद दाखविणे आवश्यक वाटते. सावरकरांचे श्रेष्ठत्व प्रतिपादित करीत असताना, त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात ते कसे चुकीचे वागत होते, याचे वर्णन करून त्यांची आंबेडकरांच्या वागण्याची तुलना केली जाते. संत एकनाथांचे श्रेष्ठत्व मान्य करूनही ते ब्राह्मण म्हणून त्यांची प्रतिमा डागाळण्याची प्रवृत्ती दिसून येते.

जेम्स लेनने शिवाजी महाराजांवर काही विपर्यस्त लेखन केले असेल तर जेम्स लेनचा निषेध व्हायला हवा. लेनच्या लिखाणाविरुद्ध प्रतिक्रिया म्हणून पुस्तकाची होळी करणे अपेक्षित होते. मोर्चे काढून त्या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी करणे अपेक्षित होते. (मी येथे वरील मार्ग अपेक्षित होते, एवढेच म्हणतो. कारण अशा लेखनाचा प्रतिवाद संशोधनपूर्वक विचारानेच करणे अधिक महत्त्वाचे व चिरंतन ठरू शकते, असे माझे मत आहे. कारण इथे जेम्स लेनचा निषेध होतो. महाराष्ट्रात त्याच्या पुस्तकावर बंदीही आणली जाते. परंतु महाराष्ट्राबाहेर व देशाबाहेर सदर पुस्तक वाचले जाईलच. कालांतराने अशा पुस्तकाचा आधार घेऊन एखादा नवीन लेखक आपल्या पांडित्याचे प्रदर्शनही करील. परंतु जर या पुस्तकातील प्रमेयांचे संशोधनपूर्वक खंडन केले तर अशा पुस्तकाला व त्यातील विपर्यस्त प्रमेयाला सार्वकालिक व सार्वदेशिक बंदी आणल्यासारखे होईल.) परंतु या प्रकरणात जेम्स लेनच्या निषेधापेक्षाही अधिक निषेध भांडारकर संस्थेचा व त्या संस्थेशी संबंधित विद्वानांचा झालेला आहे. श्रीकांत बहुलकरांच्या तोंडाला काळे फासणे, भांडारकर संस्थेवर हल्ला करणे या अघोरी मार्गाने हा निषेध व्यक्त झालेला आहे. यामागे जेम्स लेनला माहिती देणाऱ्यांविरुद्ध संताप व्यक्त करणे हा उद्देश होता, असे म्हटले जाते. जेम्स लेन हा पुण्यात येतो. संस्थेतील साहित्याचा अभ्यास करतो. काही विद्वानांबरोबर चर्चा करतो व आपले संशोधन, आकलन पुस्तकाद्वारे जगासमोर मांडतो. यात संस्था हा निषेधाचा विषय नाहीच. संस्थाचालकांमध्ये ब्राह्मण विद्वानांचा भरणा अधिक असून ही मंडळी शिवाजी महाराजांविषयक विपर्यस्त माहिती जेम्स लेनला देण्याची शक्यता गृहीत धरूनच हा हल्ला झालेला आहे. हा हल्ला सदर गृहीतावर आधारित असला तरी व एकवेळ हे गृहीतक खरे मानले तरी तो समर्थनीय होऊ शकत नाही. उलट संभाजी ब्रिगेडचा सर्वांनीच खणखणीत निषेधच करायला हवा. कारण एखाद्या संस्थेवर किंवा व्यक्तीवर हिंसक हल्ला करणे हा संताप, असंतोष व्यक्त करायचा मार्ग नव्हे. प्रश्न फक्त उपरोक्त गृहीतक बहुजन समाजाच्या डोक्यात का बसते, त्यावर त्यांचा विश्वास का बसतो, हे आहेत. याचा विचार सर्व स्तरांवर होणे आवश्यक आहे. संशोधक हाही माणूस आहे. तोही आपल्या पूर्वसंस्कारांपासून पूर्णपणे मुक्त होण्याची शक्यता नाही. आगरकरांसारख्या कट्टर समाजसुधारकाबाबतही हे सत्य आहे. नरहर कुरुंदकरांच्या विचरसरणीतही असे संस्कार मधूनमधून डोकावतात, असे म्हटले जाते. परंपरेविषयी ज्ञानदेवांपेक्षा नामदेव-तुकारामांच्या जाणिवा वेगळ्या भासतात. याला अपवाद नाहीत, असे नाही; परंतु ते नियम सिद्ध करण्यापुरतेच. मध्ययुगीन काळामध्ये बसवेश्वर व चक्रधर ही दोन महान व्यक्तिमत्त्वे असे अपवाद आहेत, असे वाटते. मला या दोन व्यक्तित्वांचे नेहमीच आश्चर्य वाटत आलेले आहे. या दोन ब्राह्मणांच्या चरित्रात व विचारात ब्राह्मणत्वाचा किंवा परंपरेचा अभिमान किंवा तशा विचारांकडे त्यांचा कल दिसून येत नाही. त्यामुळे ब्राह्मणी परंपरेतील विद्वान त्यांना ते ब्राह्मण असूनही अनुल्लेखाने मारतात. कारण आधुनिक मूल्यांच्या आलोकात त्यांच्यावर फारशी टीका करता येत नाही. आणि ब्राह्मणेतर विद्वानांनाही ते ब्राह्मण असल्यामुळेच की काय, त्यांच्याबद्दल फारशी आपुलकी वाटत नाही. चक्रधरस्वामींबद्दल याचा अधिक प्रत्यय येतो.

बसवेश्वर-चक्रधर यांच्याइतके आपल्या जातीपासून, संस्कारापासून विद्वानांना मुक्त होता येईल काय? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाची सोडवणूक झाल्याशिवाय हा वाद संपणार नाही, हे निश्चित. 1101, बी-1/रेखा, कोरस टॉवर्स, वर्तक नगर, ठाणे (पश्चिम) 400606.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.