मनुष्यस्वभाव : एकीतली विविधता

आपण आपल्या भूतकाळाने घडवलेले असतो-डार्विनच्या उत्क्रांतीबाबतच्या मांडणीत ही एक कळीची संकल्पना आहे. आपण देवाने आपल्याला घडवले असे न मानताही आपण घडवले गेलेलो आहोत असे मानू शकतो. आपल्या पूर्वजांच्या पुनरुत्पादनाच्या (प्रजननाच्या) निवडीतून आपण अजाणताच काही विशिष्ट जीवनशैलीसाठी घडवले जातो. एका सामाजिक, द्विपाद, मूळच्या आफ्रिकन कपीच्या आयुष्यक्रमासाठी मानवी स्वभाव घडलेला आहे. अशीच माणसाची पचनसंस्थाही एका सर्वाहारी, मांसाहाराची चटक असलेल्या आफ्रिकन कपीसाठी घडलेली आहे.

या माझ्या सुरुवातीने दोन प्रकारची माणसे चिडली असणार. ज्यांना एका दाढीवाल्या माणसाने सांत दिवसांत हे जग घडवले असे वाटते, आणि याचे उपप्रमेय म्हणून मनुष्य- स्वभाव निवडीतून नव्हे, तर त्या दाढीवाल्याच्या बुद्धीने घडला असे वाटते, त्यांना माझे अभिवादन. ते आणि मी यांच्यात संवाद साधायला ‘किमान समान’ असे काहीच नाही.

जे सांगतात की मनुष्यस्वभाव उत्क्रांत न होता संस्कृती नावाच्या काही प्रकारातून नव्याने घडला, त्यांच्याबद्दल मी आशावादी आहे. त्यांचा दृष्टिकोन माझ्या दृष्टिकोनाशी विसंगत नाही. संस्कृती मनुष्यस्वभाव घडवते, पण मनुष्यस्वभाव संस्कृतीही घडवतो आणि उत्क्रांती दोघांनाही घडवते.

याचा अर्थ असा नव्हे की मी ‘सारे काही जीन्समध्ये असते’ असे म्हणतो आहे. कोणतीही मानसशास्त्रीय बाब शुद्धपणे जेनेटिक असते, हे मी ठामपणे नाकारतो आणि तितक्याच ठामपणे हेही नाकारतो की कोणतीही ‘वैश्विक मानवी’ बाब जीन्सच्या प्रभावाबाहेरची असते. आपली ‘संस्कृती’ आत्ता आहे तशीच असायला हवी असे नाही. ती आजच्यापेक्षा आश्चर्यकारक तऱ्हेने वेगळी-वेगवेगळी असू शकते. आपले सर्वांत जवळचे नातलग जे चिंपांझी, त्यांची जीवनशैली पाहा-माद्या शक्य तेवढे नर-जोडीदार शोधतात. नर आपण ज्यांच्याशी जुगलो नाही त्या माद्यांची पिल्ले मारून टाकतात. कोणत्याही मानवी समाजात दूरान्वयानेही यासारख्या गोष्टी घडत नाहीत. कारण चिंप-स्वभाव मनुष्यस्वभावापेक्षा वेगळा आहे.

असे जर असेल, तर मनुष्यस्वभावाचा अभ्यास अनेकानेक शास्त्रांसाठी कळीचा आहे. इतिहास, समाजशास्त्र, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, राज्यशास्त्र, ही सारी माणसांची वागणूक समजून घेण्याची शास्त्रे आहेत. जर मनुष्यस्वभावात काही तरी वैश्विक असेल, आणि ते उत्क्रांतीतून आलेले असेल, तर कोणत्या उत्क्रांतीच्या दबावांमधून ते घडले, हे या सर्व शास्त्रांसाठी महत्त्वाचे असणारच.

पण मला जे हळूहळू जाणवायला लागले आहे ते असे, की ही सर्व शास्त्रे 1859 साल न घडल्यासारखीच वागतात. 1859 साली डार्विनचे ‘ऑरिजिन ऑफ स्पीशीज’ प्रकाशित झाले. पण ही शास्त्रे मात्र आवर्जून आपली संस्कृती ही इच्छास्वातंत्र्य, ईहा आणि आपले शोध (सामाजिक) यातून घडल्यासारखी वागतात. ही शास्त्रे सांगतात की मनुष्यस्वभाव समाजामुळे घडले याच्या उलट झालेले नाही.

ज्यांना सामाजिक एंजिनीयरिंग विश्वासार्ह वाटते, त्यांना ही शास्त्राची वागणूक पटेलही पण ती खऱ्या गोष्टींवर आधारलेली नाही. नैतिकदृष्ट्या मानवी समाजे आणि व्यक्ती स्वतःला नवनव्या रूपांत ‘ढाळू’ शकतात पण आपण तसे करत नाही. आपण आपले व्यवहार त्याच त्या मानवी आकारात करत राहतो. जर आपण साहसी असतो तर आपण प्रेमभावना नसलेला समाज घडवला असता, महत्त्वाकांक्षा नसलेला समाज घडवला असता, लैंगिक आकर्षण नसलेला समाज घडवला असता-विवाहसंस्था, कला, व्याकरण, संगीत, स्मिते सारे टाळता आले असते, आणि त्याऐवजी नवे काहीतरी ‘घालता’ आले असते. स्त्रियांनी एकमेकांचा जीव घेणे पुरुषांनी एकमेकांना मारण्यापेक्षा जास्त ठेवता आले असते. वृद्धांना तरुणांपेक्षा सुंदर मानता आले असते. संपत्तीने सत्ता विकत घेता आली नसती. लोक आपल्या मित्रांना अपरिचितांपेक्षा जास्त महत्त्व देत नसते. आईबापांना आपलीच मुले आवडली नसती.

मी ‘स्वभावाला औषध नाही’ किंवा ‘मानवी स्वभाव बदलता येत नाही’ असे म्हणत नाही आहे. वंशवादाविरुद्ध कायदे नसावे, असे मी म्हणत नाही-तशा कायद्यांचा परिणाम होतोच, कारण माणसे आपल्या क्रियांचा फायदा-तोटा मोजतात. मनुष्यस्वभावाचे ते एक मोहक अंग आहे. मी म्हणतो आहे ते हे, की हजार वर्षे वंशवादविरोधी कायदे करूनही नंतर एके दिवशी आपण ‘वंशवाद संपला’ असे म्हणून कायदे सोडू शकणार नाही.

दोन पिढ्या हुकूमशाही भोगल्यानंतरही आज आपण रशियन लोक त्यांच्या आजी- आजोबांसारखेच असतात असे मानतोच ना? मग सामाजिक शास्त्रे याची दखल का घेत नाहीत ? माणसे समाजानेच घडतात असे ती का मानतात?

माझ्या कवटीत एक मेंदू आहे. तो तीस लक्ष वर्षांपूर्वीपासून एक लक्ष वर्षांपूर्वी- पर्यंतच्या काळात आफ्रिकी कुरणामध्ये जगण्यासाठी घडलेला आहे. मी गोरा युरोपीय आहे. माझे पूर्वज जेव्हा सुमारे एक लक्ष वर्षांपूर्वी युरोपात आले तेव्हा त्यांच्या शारीरक्रिया त्या नव्या वातावरणाशी जुळत्या झाल्या. रिकेटस होऊ नयेत म्हणून कातडी फिकुटली. पुरुषांच्या दाढ्या दाट झाल्या. रक्ताभिसरण थंडी झेपण्यासाठी बदलले. पण इतर फारसे बदलले नाही. कवटीचा आकार, शरीराची प्रमाणे, दात, सारे माझ्या एक लक्ष वर्षांपूर्वीच्या पूर्वजांसारखे किंवा आजच्या आफ्रिकन टोळ्यांमध्ये असते तसेच आहे. कारण एक लक्ष वर्षे, सुमारे तीन हजार पिढ्या, हे जीवशास्त्रीयदृष्ट्या ‘पापणी लवते न लवते तोच’ अशा मापाचे आहे.

बरे, अगदी आत्ताआत्तापर्यंत युरोपीय आणि आफ्रिकन लोक एकाच तऱ्हेने जगत होते. शिकार करत, वनस्पती गोळा करत, टोळ्यांमध्ये जगत, पौगंडावस्था ओलांडेपर्यंत आईबापांच्या देखरेखीत दोन्ही समाज जगत होते. दगड, हाडे, लाकूड, तंतू, यांपासून दोघेही हत्यारे घडवत होते. क्लिष्ट भाषेद्वारे दोघेही ज्ञान एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित करत होते. शेती, धातू, लिप्या, हे सारे माझ्या मनावर ठसा उमटवण्याइतके जुने नाही— फार ताजे आहे.

———————————————- माणसांच्या बाबतीत एक खास बाब आहे कोणतीही दोन माणसे एकसारखी नसतात. हे कसे घडते? मनुष्यस्वभावात काहीतरी वैश्विक, सर्व मानवप्राण्यांना लागू पडणारे आहे, पण प्रत्येक व्यक्ती मात्र खास आहे ?

दोन शास्त्रज्ञ सांगतात, “याचा अर्थ असा एक पेरुवियन शेतकरी आणि त्याचा शेजारी, किंवा एक स्विस खेडूत आणि त्याचा शेजारी यांच्यातला जेनेटिक फरक मोजा. ‘सरासरी’ पेरुवियन आणि ‘सरासरी’ स्विस यांच्यातल्या जेनेटिक फरकापेक्षा तो बारापट जास्त असेल.” आपल्या जेनेटिक फरकांपैकी फक्त सात टक्के फरक वंशांवर अवलंबून असतात, आठ टक्के राष्ट्रे किंवा जमातींवर अवलंबून असतात इतर सारे 85 टक्के फरक केवळ व्यक्तींमधले फरक असतात.

पत्त्यांच्या खेळातून हे स्पष्ट करता येईल. प्रत्येक संचात एक्यांपासून राजांपर्यंत तेराच मूल्यांचे पत्ते असतात. एखाद्या खेळाडूला उत्तम पत्ते येतात पण त्याचा कोणताच पत्ता ‘खास’ नसतो. खोलीतल्या इतरांकडेही तसले पत्ते असतात. पण फक्त तेराच मूल्यांच्या पत्त्यांमध्ये प्रत्येक संच वेगळा असतो आणि काही संच इतर संचांपेक्षा आश्चर्यकारक प्रमाणात ‘चांगले’ असतात.

पत्ते पिसले जातात ते लैंगिक व्यवहारातून-संपूर्ण जीवजातीच्या संचातून, त्यांच्या एकारलेपणातून खास संच बनतात. ते लिंग व्यवहारामुळेच. [ मॅट रिडलीच्या ‘द रेड क्वीन’ (उपशीर्षक: सेक्स अँड द इव्होल्यूशन ऑफ ह्यूमन नेचर), पेरेनियल 2003, या ग्रंथातील हे उतारे. ‘मनुष्यस्वभाव’, त्याची मूलभूत एकता, त्यातली विविधता, त्यांचे लैंगिक व्यवहारातले मूळ, अशा साऱ्याबद्दलचे हे पुस्तक आहे. पुढेही त्यातील काही उतारे द्यायचा प्रयत्न करू. – सं . ]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.