सर्व काही पूर्वनियत आहे काय ? जनुकीय नियतवाद

विज्ञानाच्या प्रगतीबरोबर शास्त्रज्ञांना असे वाटू लागले की विश्वातील प्रत्येक बाबीची माहिती करून घेणे शक्य होईल, इतकेच नव्हे तर, घडणाऱ्या प्रत्येक घटनेची कारणपरंपरा आपण सांगू शकू. ह्याचाच पुढचा भाग म्हणजे एकदा का आपल्याला विज्ञानाचे नियम माहीत झाले तर पुढे काय होणार आहे ह्याचे भाकीतपण आपण करू शकू. जर आपण बरोबर भाकीत करू शकलो, तर पुढे काय होणार आहे, ते पूर्वनिश्चित आहे, असे म्हणावयास प्रत्यवाय नसावा. ह्यालाच वैज्ञानिक पूर्वनियतवाद असे म्हटले गेले. 1930 च्या सुमारास वैज्ञानिक पूर्वनियतवादाची चर्चा होती. पुढे कालांतराने वैज्ञानिक पूर्वनियतवादाबद्दलचा उत्साह कमी झाला. आनुवंशिकता ही जनुकांवर अवलंबून आहे हे मेंडेलच्या प्रसिद्ध प्रयोगानंतर जगाला नाहीत झाले होते. पण त्यावेळी जनुकांबद्दल फारशी माहिती नव्हती. आता पुन्हा एकदा जिनोम प्रकल्पाच्या यशस्विततेनंतर माणसाच्या जनुक कोडची माहिती झाल्याने पूर्वनियतवादाने उचल खाल्ली आहे. जीवनाचे रहस्य डीएनए तंतूतील जनुकांच्या रचनेवर अवलंबून आहे आणि एकदा का आपण ती रचना ओळखू शकलो तर आपण जनुकव्यवस्था ओळखू शकू, आणि त्या आधारे जैविक रचना आणि प्रक्रियांची माहिती आपण करून घेऊ शकू, असा विश्वास शास्त्रज्ञांना आला. प्राण्याची रचना आणि त्या मधील सर्व प्रक्रिया, ह्या जनुकांच्या विवक्षित रचनेवर अवलंबून असल्यामुळे जर ती रचना माहीत झाली तर त्या प्राण्याच्या वर्तनाबद्दलचे भाकीत करणे शक्य होईल अशा प्रकारची खात्री शास्त्रज्ञांना वाटू लागली. ह्याला जनुकीय पूर्वनियतवाद म्हणतात. कॅल्व्हिनच्या वैज्ञानिक पूर्वनियतवादाचा हा नवीन अवतार आहे.

जनुकीय कोड माहीत झाले तर प्राण्याबद्दलचे भाकीत करता येऊ शकेल ह्याचाच पुढचा भाग म्हणजे जनुकीय अभियांत्रिकी! एखाद्या प्राण्यात (किंवा जीवान) आपण जनुकीय बदल करू शकलो तर, त्या जीवाच्या रचनेत आणि कार्यात अपेक्षित बदल करणे आपल्याला शक्य होईल, हे तत्त्वच जनुकीय अभियांत्रिकीच्या मुळाशी आहे. अ प्राण्यातून एखादा उपयोगी जनुक घेऊन, तो तेच उपयोगी कार्य ब मध्ये करेल या अपेक्षेने, ब प्राण्यात प्रविष्ट करावयाचा ह्याच गृहीत तत्त्वावर जनुकीय अभियांत्रिकी आधारित आहे. जनुकीय नियतवादावरच जनुकीय अभियांत्रिकी अवलंबून आहे.

1990 साली सुरू झालेला मानवीय जनुकीय संशोधन प्रकल्प 1999 साली पूर्णत्वास पोहोचला. हजारो मानवीय जनुकांची रचना आणि त्याचा संपूर्ण नकाशा 15 फेब्रुवारी 2001 साली प्रसिद्ध झाला. ज्या जनुकीय कोडची माहिती आपल्याला पाहिजे होती ती मिळाल्यानंतर साहजिकच पुढचा उपयोजनाचा टप्पा आपण लवकरच गाठू शकू असा विश्वास सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाला. जैवतंत्रज्ञानाचे नवीन विश्व त्याच्यापुढे निर्माण झाले. सामान्यतः आढळून येणारे संधिवात, मधुमेह, दमा, हृदयरोग ह्यासारखे अनंत रोग जनुकीय अभियांत्रिकीने दुरुस्त होऊ शकतील अशी त्याची कल्पना झाली. दररोज वर्तमानपत्रात कोणत्या ना कोणत्या रोगाचे जनुक शोधण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाल्याचे लिहिले जाऊ लागले. एकूणच आनुवंशिकता, जनुकसंशोधन ह्याबाबतचे ज्ञान जसजसे वाढू लागले तसतसे जनुकीय नियतवादावरचा सामान्य माणसाचा विश्वास वाढत चालला.

जनुकीय नियतवादाचाच पुढचा टप्पा क्लोनिंगचा आहे. प्रजननाचे नियंत्रण मानवाला शक्य आहे आणि आपल्याला (म्हणजे कोणाला? राज्यकर्त्यांना?) पाहिजे त्या व्यक्तीचे क्लोनिंग करणे शक्य आहे अगदी आईनस्टाईनचेपण-असा ग्रह वृत्तपत्रीय वाचनावरून सामान्य माणसाचा होऊ लागला. जनुकीय नियतवादात डीएनए हा प्राण्याचा जनुकीय कार्यक्रम किंवा नकाशा आहे किंवा जीवाचे पुस्तक आहे, आणि जनुकीय कोड ही जीवनाची भाषा आहे असे गृहीत धरले जाते. जनुक हेच जैविक Phenomenon चे कारण आहेत असा विश्वास हाच नियतवादाच्या मुळाशी आहे. जैविक रचनेच्या आणि वर्तनाच्या मुळाशी पेशीत चालणारी प्रक्रिया असते. ही प्रक्रिया एनझाईमस् द्वारा चालते. आणि हे एनझाईम्स् जनुकांद्वारे नियंत्रित केले जातात. पेशीतील डीएनए आरएनएला बनवतात, आणि हे आरएनए प्रथिने (एनझाईम) तयार करतात, आणि ही प्रथिने आपली रचना किंवा आपले वर्तन ठरवते. थोडक्यात आपले वागणे (प्राण्याचे किंवा माणसाचे) हे पूर्णत्वाने जनुकावर अवलंबून आहे, हे तत्त्वच जनुकीय नियतवादाच्या मुळाशी आहे.

जनुकांसंबंधीच्या नवीन संकल्पना ― जैविक वैशिष्ट्ये (traits) आणि वर्तणूक ही जनुकांवर अवलंबून असते. आणि प्रत्येक जनुक डीएनएची निर्मिती करतो; डीएनए आरएनएची निर्मिती करतो; आणि आरएनए प्रथिनाची (एनझाईमस्) ची निर्मिती करतात आणि ही प्रथिने प्राण्याची वैशिष्ट्ये आणि वर्तणूक ठरवतात ही एकरेषीय कारणपरंपरा गृहीत धरली गेली होती.

1970 पर्यंत जनुक संशोधन फक्त जंतू (बॅक्टेरिया) पुरतेच मर्यादित होते. पण नंतर जसजशी अनेकपेशीय आणि व्यामिश्र रचना असलेल्या प्राण्यांवरच्या संशोधनाला सुरुवात झाली, तसतसे पूर्वी गृहीत धरलेली काही गृहीतके चूक असल्याचे लक्षात आले. उदाहरणार्थ एक जनुक एक प्रथिन हे समीकरण बरोबर नसल्याचे सिद्ध झाले. एक जनुक एकच प्रथिन तयार करतो, ह्या समजाबरोबरच एक प्रथिन एकच कार्य करते, हेही चूक असल्याचे दिसून आले आहे. एका जनुकापासून अनेक प्रथिने आणि एका प्रथिनाची अनेक कार्ये, ह्यामुळे पूर्वीच्या एकरेषीय कार्यकारणपरंपरेला धक्का बसला आहे.

जनुकीय अभिव्यक्ती ही फक्त जनुकावर अवलंबून असते हाही समज नवीन संशोधनाने मागे पडला आहे. जनुकाभोवती असणारे जनुकीय परिवलय (Epigenetic centre) हे अनेक एनझाईमस् तयार करत असते आणि ती एनझाईम्स् जनुकीय अभिव्यक्तीवर परिणाम करत असतात. जनुकीय परिवलयात अनेक गोष्टींची, उत्क्रांतीतील अनेक बदलांची, इतिहासाची तसेच सांस्कृतिक वारशाची माहिती साठवून ठेवलेली असते. भोवतालच्या परिस्थितीचे आकलन आणि त्याला द्यावा लागणारा प्रतिसाद हे अत्यंत महत्त्वाचे कार्य जनुकीय परिवलय करत असते.

जनुकीय अभिव्यक्ती फार मोठ्या प्रमाणावर या परिवलयावर अवलंबून असल्याने प्राण्याच्या वर्तणुकीवर ह्या परिवलयात होणाऱ्या प्रक्रियांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सभोवतालची परिस्थिती, परिवलयाचा प्रतिसाद आणि पेशीत (जनुकात आणि जनुकांबाहेर) सारभूत करून ठेवलेल्या आठवणी (मेमरी) ह्या तीन्हींच्या प्रक्रियेतून येणाऱ्या उत्तराची संभावना एकचएक असणे अशक्य आहे. गणितीय पद्धतीने या संभावना असंख्य असू शकतात. म्हणून जनुकाद्वारे होणारे कार्य हे एकाच प्रकारे होऊ शकेल हे संभवत नाही. जनुकासंबंधीच्या जैविक प्रक्रिया (DNA replication, the rate -of mutation, the transcription of coding, sequencing, selection of pro- tein function) ह्या जनुकाभोवतालच्या पेशीतील इतर घटकावर अवलंबून असतात. ह्या सर्व प्रक्रिया एकरेषीय असत नाहीत. त्या गुंतागुंतीच्या असतात. म्हणूनच जनुकीय अभिव्यक्ती ही बदलत्या परिस्थितीप्रमाणे बदलत असते.

एखाद्या रोगाचा जीन असला तर तो रोग त्या व्यक्तीला होतो असे समजले जाते. (जनुक हे रोगाचे जनक आहेत ही कल्पनाच चुकीची आहे.) नुसता जनुकाच्या असण्यावर किंवा नसण्यावर किंवा त्यात बदल होण्यावर रोग होणे किंवा न होणे अवलंबून असेल असे नाही. उदाहरणार्थ हृदयरोग होणाऱ्या जनुकाच्या नुसत्या अस्तित्वामुळेच हृदयरोग होईल असे नाही. (वास्तविक हृदयरोग, मधुमेह, दमा ह्यासारख्या रोगाकरता एकापेक्षा अधिक जनुकांची आवश्यकता असते. हृदयरोगाकरता 100 पेक्षा अधिक परस्परावलंबी जनुक अभिव्यक्तीची आवश्यकता असते. एक जनुकीय रोगांचे प्रमाण हे माणसात फार अत्यल्प आहे. फक्त 2% रोग एका जनुकावर आधारित असतात.) त्या जनुकाला कार्यप्रवण करण्याचे कार्य हे जनुकीय परिवलयावर अवलंबून असते. या परिवलयाचा प्रतिसाद हा स्वभावावर (परिवलयात साठवून ठेवलेल्या उत्क्रांतीतील हजारो वर्षांच्या माहितीच्या आधारे अनुभवाचे परिशीलन करून प्रतिसाद देण्याची क्षमता) व त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. माझ्यावर आलेला मानसिक ताण (बहिर्गत कारण) आणि त्याला प्रतिसाद देण्याची माझी क्षमता-जी माझ्या पूर्वानुभवावर अवलंबून असते- (अंतर्गत कारण) ह्यावर काय घडेल हे ठरणार आहे. शिवाय मी जे उपचार घेणार आहे त्याचाही परिणाम होणार आहे. मला हृदयरोग होण्याची अटकळ जरी जनुकीय नकाशावरून बांधता आली तरी त्याचा माझ्यावर होणारा अंतिम परिणाम हा जनुकाशिवाय अनेक बाबीवर अवलंबून असतो.

जनुक हे डीएनए ची अखंडित किंवा खंडित मालिका असून, जनुकांना विशिष्ट कार्य असते हा समज नवीन संशोधनाने मागे पडला आहे. क्रोमोझोम्स् प्रमाणे जनुकाचे भौतिक अस्तित्वच आता नाकारले जात आहे. जनुकाची रचना आणि कार्य हे दोन्ही भोवतालच्या जनुक परिवलयातील गतिमान रासायनिक प्रक्रियेवर अवलंबून आहे असे आता वाटू लागले आहे म्हणून जनुक ही भौतिक गोष्ट न मानता ती एक संकल्पना समजली जात आहे. अर्थातच जनुकाची रचना आणि कार्य हे नेहमीच परिस्थितीनुरूप बदलते आणि जनुक परिवलयातील प्रक्रियेवर ते अवलंबून असते. जनुकाला एकच एक कार्य असते हे आता गृहीत धरता येत नाही. शिवाय जनुक कार्यशील असतात हाही समज खोटा ठरवला गेला आहे. त्यांना नेहमी कार्यप्रवण करावे लागते आणि ही कार्यप्रवणता जनुकाच्या भोवताली असलेल्या जनुकीय परिवलयावर अवलंबून असते. म्हणूनच गर्भावस्थेत पेशींच्या विभाजनानंतर सर्व पेशीत एकाच प्रकारचे क्रोमोझोम्स् असले तरी त्यातील काही पेशी स्नायू बनतात, काही रक्त पेशी बनतात, इ. विविध प्रकारचे कार्य करणारे पेशीसमूह तयार होतात त्याचे कारणच जनुकनकाशा एकच असला तरी कोणते जनुक कार्यप्रवण करावयाचे हे नंतरच्या विकास प्रक्रियेवर ठरवले जाते.

जनुकीय अभियांत्रिकी रोगनिवारणाकरिता किंवा रोगप्रतिबंधाकरता जनुकीय अभियांत्रिकीची कल्पना पुढे येत आहे. पण वर सांगितल्याप्रमाणे बह्वंश रोग हे अनेक जनुकांच्या अभिव्यक्तीवर अवलंबून असतात. एक जनुकीय अभिव्यक्तीमुळे होणारे रोग 2 टक्केदेखील असत नाहीत.

शिवाय नवीन वातावरणात जनुकीय अभिव्यक्ती बदलते. त्यामुळे एका प्राण्याचे जनुक दुसऱ्या प्राण्यात ठेवल्याने अपेक्षित परिणाम मिळेल असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही. शिवाय पहिल्या प्राण्यात अभिव्यक्त न झालेले अनेक परिणाम (अवांछित ) नवीन प्राण्यात अभिव्यक्त होण्याची शक्यताही असते.

नियतवाद आणि नियतिवाद नियतवाद आणि नियतिवाद ह्यांतला फरकही आपण लक्षात घेतला पाहिजे. मी आजारी पडलो तर दोन शक्यता निर्माण होतात. एक-मी बरा होणार आणि दोन-मी बरा होणार नाही. दोन्ही परिस्थितींत मला डॉक्टरकडे जाऊन औषधोपचार करण्याचे कारण नाही. हा नियतिवाद झाला. पण जनुकीय नियतवादामुळे एखादा रोग मला होण्याचे भाकीत करता आले तरी त्याची परिणती अनेक बहिर्गत आणि अंतर्गत कारणपरंपरांवर अवलंबून असते. ती बहिर्गत आणि अंतर्गत कारणे मानवी मर्यादांच्यापलीकडे असतात हे सांगण्याचे कारण नाही.

माणसाचे निर्णयस्वातंत्र्य आणि जनुकीय नियतवाद वर आलेल्या माहितीवरून हे लक्षात येऊ शकेल की मानवी जनुकीय आराखडा माहीत झाल्यामुळे आपल्या शारीरिक रचनेबद्दल आणि शारीरिक कार्याबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळू शकते. आणि काही प्रमाणात पूर्वनियत असलेल्या परिस्थितीचे अंतिम परिणाम मात्र आपल्या निर्णयस्वातंत्र्यावर अवलंबून असतात. हे निर्णयस्वातंत्र्य आपल्या स्वभावावर अवलंबून असेल आणि ते पूर्वानुभवावर अवलंबून असल्याने प्रत्येकाचा प्रतिसाद हा त्याचा स्वतःचा असेल. शेवटी जनुकीय नियतवाद खरा आहे का? ह्या प्रश्नाचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल. देशमुख हॉस्पिटल, उदगीर – 413517

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.