‘व्हाय आय अॅम नॉट अ मुस्लिम ?’ च्या निमित्ताने (भाग-२)

इब्न वर्राक यांनी एक अत्यंत महत्त्वाची नोंद केली आहे. 1989 साली ‘ला इस्लाम क्वश्चन्स’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यामध्ये पंचवीस अरब लेखकांना विचारल्या गेलेल्या पाच प्रश्नांच्या उत्तरांचे संकलन आहे. ते प्रश्न होते : (1) इस्लामची वैश्विक मांडणी आजही टिकून आहे का? (2) आधुनिक राष्ट्रासाठी इस्लामिक राज्यव्यवस्था लागू होऊ शकते का? (3) मुस्लिम आणि अरब लोकांच्या विकासासाठी इस्लामी व्यवस्थेचे सरकार असणे आवश्यक आहे का? (4) बहुसंख्य मुस्लिम देशांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये इस्लामी पुनरुज्जीवनाचा जो विचार दिसतो तो योग्य आहे का? (5) आज इस्लामचा प्रमुख शत्रू कोण आहे?

या प्रश्नांना अरब लेखक-विचारवंतांनी दिलेल्या उत्तरांतून असे दिसते की त्यांपैकी बहुतेकांना इस्लामी जगातील सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्नांवर इस्लाम हे एकच उत्तर आहे, ही गोष्ट मान्य नाही. त्यांना निधर्मी राज्य हवे आहे. बहुतेकांनी धर्मनिरपेक्ष राज्याचाच आग्रह धरला. पंचवीसांपैकी नऊ जणांनी, ‘आधुनिक राष्ट्रासाठी इस्लामी राज्यव्यवस्था लागू होऊ शकते का?’ या प्रश्नाला ठामपणाने ‘नाही’ असेच उत्तर दिले. इतरांनी ‘हो’ असे उत्तर दिले; पण त्यासाठी अटी घातल्या. मुख्य म्हणजे व्यक्तीच्या हक्कांची जपणूक झाली पाहिजे, आणि जर इस्लामचा आधुनिक दृष्टिकोनातून अर्थ लावला जात असेल तरच, असे म्हटले. इस्लामी पुनरुज्जीवनवाद ही नकारात्मक घटना आहे, धर्मवेड हे मुस्लिमांसमोरचे सर्वाधिक भयंकर संकट आहे, असे सर्वांचेच म्हणणे पडले.

हा सगळा इतिहास देत असतानाच वर्राक म्हणतात की, “रसेलने जे ‘गॉड’ बद्दल म्हटले त्यानुसार मुसलमानांच्या मनातही कायम अल्लाची भीती, नरकाची भीती ठाण मांडून बसलेली असते. त्यानुसारच त्याचे वागणे असते. ईश्वर हा दयाळू असायला हवा, तो भीतिदायक कसा असू शकतो?” वर्राक पुढे म्हणतात की “कुराणात जरी काहीही म्हटले असले तरी इस्लामी व्यवस्थेने स्त्रियांना व्यक्तीचे हक्क, प्रतिष्ठा, समानता, न्याय दिलेला नाही. मुस्लिमेतर लोकांना अत्यंत हीन, अपमानास्पद, क्रूर वागणूक दिली जाते. शक्य झाल्यास त्यांचा समूळ नाश करून टाकण्यात येतो. इस्लाम आत्मचिकित्सा खपवून घेत नाही. इस्लामला लोकशाहीचे आणि मानवी हक्कांचे वावडे आहे. वर्राक म्हणतात, “जोपर्यंत शरियापासून सुटका होत नाही,’ जोपर्यंत राज्यकारभार आणि धर्माची’ फारकत होत नाही तोपर्यंत इस्लाममध्ये लोकशाही आणि मानवाधिकार प्राप्त होणार नाहीत, हे सत्य आहे. पाश्चात्त्य विचारांची आस बाळगणारे अनेक मुस्लिम पुरोगामी विचारवंत आपले विचार लोकांनी मान्य करावेत म्हणून या गोष्टी इस्लाममध्ये आहेतच असे पुरावे इस्लामी पूर्वेतिहासातून काढतात. खऱ्या इस्लामने स्त्रियांना समान हक्के दिलेलेच आहेत किंवा इस्लाममध्ये लोकशाही आहेच असे ते म्हणतात. पण ते खोटे ठरते आणि मुख्य समस्या तशीच राहते. मुख्य प्रश्न आहे की आजच्या काळात शरिया लागू करणे हे योग्य आहे का, या मुद्द्याची चर्चा कोणी करीत नाही.

” , सौदी अरेबियाचे राजे फहद म्हणाले होते, “जगभर प्रचलित असलेली लोकशाही आमच्या मुलुखात, आमच्या लोकांसाठी योग्य नाही. स्वतंत्र निवडणुकांची पद्धतही आपल्या देशासाठी योग्य नाही.” त्यावर वर्राक म्हणतात, “व्यक्तीला निवडीचे स्वातंत्र्य असणे, त्यासाठी त्याला नैतिकदृष्ट्या जबाबदार धरणे, ही संकल्पनाच इस्लाममध्ये नाही. जिहादची हाक दिली की ती मान्य करणे हे प्रत्येक मुसलमानाचे कर्तव्यच ठरते. जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतरही व्यक्तीच्या प्रत्येक हालचालीवर, विचारांवर, भावनांवर इस्लामचा कब्जा असतो, अधिकार चालतो. आंतरराष्ट्रीय कायद्याने जे स्वातंत्र्य, हक्क व्यक्तीला दिले आहेत, ते स्वातंत्र्य इस्लामी राजवट देत नाही.

आपले हे आक्षेप नोंदवून वर्राक म्हणतात, “पाश्चात्त्य विचारपद्धती, शास्त्रीय दृष्टिकोन, तत्त्वज्ञान आणि सामाजिक विचार आणि विकास यांपासून मुसलमान दूर राहू शकत नाहीत. त्यांचा संबंध प्रत्येक मुसलमान व्यक्तीच्या जगण्याशी आहे, नित्शे, फ्रॉईड, मार्क्स यांच्या शास्त्रीय, तात्त्विक विचारांपासून ते फार काळ दूर राहू शकत नाहीत. डार्विन वगैरेंच्या मांडणीमुळे जुने बायबल, नव्या बायबलमधील रूढ ईश्वरीय संकल्पना, विश्वनिर्मितीबद्दलची कल्पना, माणसाच्या विकासाबद्दलच्या कल्पना मोडीत निघाल्या आहेत. कुराणालाही डार्विनचा विचार मान्य करावाच लागणार आहे. किती काळ अशास्त्रीय जुन्यापुराण्या कल्पनांना चिकटून राहायचे, या प्रश्नाचे उत्तर मुसलमानांना द्यावेच लागणार आहे. पण त्या दिशेने त्यांनी पहिले पाऊल अजूनही उचललेले नाही.

‘ त्याचा दोष वर्राक प्रथमतः इंग्रजांना देतात आणि मग इस्लामची अनाठायी बाजू घेऊन, इस्लामचे गैरलागू कौतुक करणाऱ्या पाश्चात्त्य विचारवंतांना देतात. भारतातील राजकीय डावपेचाचा भाग म्हणून, आपल्या सत्तेसाठी एका गटाला दुसऱ्याविरुद्ध उभे करून त्यांनी मुसलमानांचे लाड केले, अरबांमध्ये फूट पाडली. इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या, ब्रिटिश नागरिकत्व घेतलेल्या मुसलमानांना विशेषाधिकार दिले, पण त्यामुळे तेथील मुस्लिम समाज लोकशाहीतील नागरिकत्वाची कर्तव्ये, जबाबदाऱ्या पत्करण्याऐवजी अधिकाधिक पुनरुज्जीवनवादीच बनत गेला. आपल्यापुढे कोणते ताट वाढून ठेवले आहे, याची कल्पना पाश्चात्त्यांना आलीच नाही असे वर्राक म्हणतात.

वर्राक पुन्हा पुन्हा मांडतात की, इस्लाममुळे मुस्लिमांचेच सर्वाधिक नुकसान झाले आहे. इस्लाम आपल्याच लोकांना अत्यंत कोंडलेले, विकासाच्या दिशा बंद करणारे जीवन जगायला भाग पाडतो, याचे त्यांना अतिशय दुःख होते.

सर्वसामान्यतः एक समजूत रूढ आहे की, इस्लाममध्ये आत्मपरीक्षा, धर्मचिकित्सा होत नाही. परंतु वर्राक यांनी किती कठोरपणाने आत्मपरीक्षा आणि धर्मचिकित्सा होत होती, याचा इतिहासच दिला आहे. हे प्रयत्न पुरेसे नाहीत, परिणामकारकही ठरले नाहीत, परंतु परीक्षा आणि चिकित्सा करणाऱ्यांना ज्या तऱ्हेच्या शिक्षा होत होत्या त्या पाहता ते प्रयत्नही खूपच म्हणायला हवेत. फरक एवढाच आहे की इतर धर्मांच्या संदर्भात परीक्षा-चिकित्सा झाल्यानंतर तो विचार हळूहळू का होईना त्या त्या समाजामध्ये झिरपत जातो गेला. त्याचे परिणाम वास्तवामध्ये, रोजच्या व्यवहारात दिसतात. इस्लाममध्ये ही प्रक्रिया अत्यंत धीम्या गतीने होताना दिसते; कारण जर नवा विचार मांडला, प्रयत्न केले तर काफर ठरवले जाण्याची, समाजबहिष्कृतीचीच नव्हे तर मारूनच टाकले जाण्याची धास्ती मनात असते. त्यामुळे ती हिंमत दाखवणे परवडत नाही.

तसे धारिष्ट्य काही मुस्लिम राज्यकर्त्यांनी दाखवले हे विशेष. इजिप्त, तुर्कस्तान, इराक यांनी शरियाला काय मंजूर आहे किंवा नाही याची चर्चा न करता, आजच्या काळाशी सुसंगत असे नागरी कायदे करून, व्यक्तीच्या आणि समाजाच्या विकासाचा, समानतेचा, न्यायाचा मार्ग मोकळा केला. प्रयत्न स्तुत्य असूनदेखील ते लोकशाहीच्या मार्गाने झाले नाहीत, तर ते हुकूमशहांनीच केले; कारण ते स्वतः पुरोगामी विचारांचे होते. पण परंपरेच्या पोलादी चौकटीत असलेल्या इस्लामी राजवटी ज्याअर्थी परंपरांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याअर्थी त्या समाजवादी-डाव्या विचारांच्याच असणार, (अर्थात ते बऱ्याच प्रमाणात खरेही होते) असे गृहीत धरून, लोकशाहीवादी, व्यक्तिवादी, उदारमतवादी वगैरे अमेरिकेने, त्यांना सतत विरोधच केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा विरोध करताना अत्याधुनिक विचारांच्या अमेरिकेने, परंपरावादी इस्लामी शक्तींना हाताशी धरले! हीच विसंगती सगळ्या जगाला भोवते आहे.

इस्लामच्या जुनाटपणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न म्हणजे ते पाश्चात्त्य संस्कृतीचे म्हणजेच ख्रिश्चनांनी इस्लामी संस्कृतीवर केलेले आक्रमण आहे, असा अर्थ लावला जातो. पाश्चात्त्यांचा हा नव-वसाहतवाद आहे. त्यांना आमच्यावर राजकीय सत्ता गाजवायची आहे. त्यामुळे स्वातंत्र्य, आमची अस्मिता धोक्यात येते. तिची जपणूक करायची असेल तर पुन्हा नव्या जोमाने इस्लामच्या मुळांकडे परतून जाणे, इस्लामचे पुनरुज्जीवन करणे भाग आहे, हा विचार बळावत जातो. पुनरुज्जीवनवादातून दहशतवाद जन्म घेतो. त्याची विध्वंसक शक्ती जोपासली जाते. याच शक्तींना हाताशी धरून अमेरिकेने डाव्या विचारांच्या शक्तींशी लढण्याचा व्यूह रचला. अमेरिका आणि इस्लामी पुनरुज्जीवनवादी, कट्टरपंथीयांच्या या विपरीत, कुटिलतापूर्ण कारवायांच्या शक्ती एकमेकांच्या साहाय्याने वाढत राहतात आणि एकमेकांना छेदही देत राहतात. असे हे दुष्टचक्र निर्माण होते. त्यामध्ये सगळे जग ओढले जाते, पुन्हा एकदा इस्लामी प्रवृत्ती, व्यक्ती, समाज, संस्कृती कुंठित होते. ही गोष्ट अफगाणिस्तान, इराकच्या निमित्ताने सिद्ध झालेली आहे.

पूर्वी फ्रेंच वसाहत असलेल्या मुस्लिम अल्जेरियातच आयुष्य काढलेल्या समाजशास्त्रज्ञ मेरी ॲमी हेली ल्यूकास हिने म्हटले आहे, ‘एक धर्म आणि सांस्कृतिक अस्मिता म्हणून इस्लाम हा सतत संकटातच असतो. त्याला भीती वाटते ती वसाहतवादाची, भांडवलशाहीची, समाजवादाची, कम्युनिझमची, मुस्लिमेतर तत्त्वज्ञानाची, परक्या आध्यात्मिकतेची, इतर धर्मांची. इस्लामचे व्यक्तिमत्त्व संरचनात्मकरीत्या मांडता येत नसल्यामुळे इस्लामचे राजकारण, अर्थकारण, समाजकारण यांचा आराखडा काढून तो लोकांना पटवून देऊन, स्वतःची उन्नती करता येत नसल्यामुळेच, मुस्लिम कट्टरपंथीय यशस्वी झालेले आहेत. त्यांचे सगळे प्रयत्न, सगळा भर असतो तो शरिया आणि कुटुंबजीवन यांवरच. शरियत आणि वैयक्तिक कायदे याचेच मुस्लिम राजकारण होते. इस्लामची इतर सगळी वैशिष्ट्ये शरियामध्येच कोंबून बसवली जातात. इस्लामला धोका असतो तो बाहेरील शक्तींचा, तथाकथित अतिदुष्ट प्रवृत्तींचा. त्यांपासून संरक्षण करण्यासाठी स्वतःभोवती कवच घालायचे असते. पण सुशिक्षित मुस्लिम पुरुष आणि स्त्रिया यांमुळे ही संरक्षणव्यवस्था कच्ची राहते. त्यामुळे स्त्रियांना ताब्यात ठेवणे हे इस्लामच्या रक्षणाच्या दृष्टीने समर्थनीयच असते. कट्टरपंथीयच स्त्रियांच्या वागणुकीचे, अधिकारांचे मापदंड ठरवितात आणि इस्लाम वाचविण्याची जबाबदारीही स्त्रियांवरच टाकतात, (हेली ल्यूकास दि प्रेफरेन्शियल सिम्बॉल फॉर इस्लामिक आयडेंटिटी : विमेन लिव्हिंग अंडर इस्लामिक लॉज, डोसिअर 11-12- 13 मे 1993 पृष्ठ 5-6)

हेली ल्यूकास यांचे दहा वर्षांपूर्वीचे हे म्हणणे आजही तेवढेच सत्य आहे. अमेरिका–पाश्चात्त्य संस्कृती-ख्रिस्तीधर्माचा आणि बिगर इस्लामी धर्मसंस्कृतीबद्दलचा संशय आणि विद्वेष जेवढा वाढत जात आहे, तेवढ्या प्रमाणात मुस्लिम स्त्रियांवरची बंधने वाढतच चालली आहेत. शरियाबद्दलचा हट्ट वाढतच चालला आहे. बिगरइस्लामी जगाविरुद्ध जिहाद पुकारणाऱ्यांकडून आपल्याच आयाबहिणींना, मुलीसुनांना चौदाशे वर्षे मागे ढकलण्याचा व्यूह रचला जात आहे. त्यांच्या जिहादएवढीच ही गोष्ट भयावह आहे, कारण या लढाईत मुस्लिम स्त्रिया एकट्या पडतात. त्यांच्या मदतीला कोणीही जाऊ शकत नाही. कोणी मदतीला गेलेच तर त्याचा उलटाच परिणाम होतो, ‘आमच्या’ बाबतीत ‘तुम्ही’ बोलू नका, तो अधिकार तुम्हाला नाही, असे म्हटले जाते आणि जर मुस्लिमांनीच मदत केली तर ते शरियाविरोधी ठरतात, त्यांना काफर ठरवले जाऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या धमक्या त्यांना मिळतात. इतरांनी मदत केली तर तो इस्लामी अस्मितेचा प्रश्न बनवला जातो, त्याचे राजकारण केले जाते. पुनरुज्जीवनवादी शक्तींचे बळ जसजसे वाढते तसतसे स्त्रियांवरचे अन्याय, अत्याचार वाढतच जाताना दिसतात. हे सगळे अत्यंत दुर्दैवी आहे. भयावह आहे.

इब्न वर्राक यांच्या या पुस्तकाची किंवा हेली ल्यूकास यांच्या वक्तव्याची दखल कशासाठी घ्यायची? वर्राक यांच्या अल्जेरियन मित्राला बड रसेल यांचे पुस्तक वाचून जसा आनंद, समाधान वाटले होते तसे वाटण्यासाठी नाही, तर आज सगळ्या जगाला भीतीच्या आवरणाखाली लोटणाऱ्या, इस्लामी दहशतवाद्यांची, कट्टरपंथीयांची मानसिकता कशी तयार होते, ती का, त्यांच्या ऊर्मी कोणत्या असतात, हे समजून घेण्यासाठी. वर्राक यांच्या पुस्तकातील विवेचनावरून ते कळते. इस्लामला बिगरइस्लामी जगाची भीती वाटते, कोणत्याही परिस्थितीत, कितीही किंमत मोजून इस्लामी अस्मिता टिकवण्याची आवश्यकता वाटते. तशीच भीती अमेरिकेला इस्लामी जगाची वाटते. आपली भांडवली गुंतवणूक, आर्थिक हितसंबंध, यांमध्ये राज्यकर्त्यांच्या खासगी हितसंबंधांना तर फारच महत्त्व असते, ते जपण्याची गरज वाटते. जगातील महासत्ता म्हणून असलेली आपली अस्मिता टिकवण्यासाठी कोणालाही, अगदी स्वकीयांनादेखील बळी देण्याची अमेरिकेची तयारी असते. अमेरिकेचाही हा दहशतवादच आहे. या दोन्ही दहशतवाद्यांच्या कारवायांपासून जगाला कसे वाचवायचे, ही आजची सर्वांत मोठी समस्या आहे. त्यांच्या कारवाया अमुक किंवा तमुक ठिकाणीच होत असल्या तरी त्यांचे पडसाद जगभर उठतात. त्याचे परिणाम जगावर होतात.

त्यासाठी सर्वाधिक प्रयत्न आणि सुरुवात त्या त्या शक्तींच्या अंतर्गतच व्हायला हवी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अफगाणिस्तान, इराकवर हल्ले केले त्यावेळी त्यांना अमेरिकेतूनच विरोध झाला होता. विशेषतः इराकवर युद्ध घोषित केले तेव्हा तर मोठ्या प्रमाणावर विरोध झाला होता. तसा तो जगभरातून झाला होता. त्या त्या वेळी तो विरोध दडपून टाकण्याचा प्रयत्नही झाला. परंतु त्यानंतर मात्र अफगाणिस्तानात आणि इराकमध्ये अमेरिकेला शांतता, सुव्यवस्था स्थापन करता आलेली नाही. इराककडे कोणतीही जीवघेणी रासायनिक शस्त्रास्त्रे सापडली नाहीत, ती अफवा कशी मुद्दामहून पसरवली गेली, या गोष्टी जसजशा स्पष्ट होत आहेत तसतसे अमेरिकेचे पितळ उघडे पडत आहे. ही स्वागतार्ह गोष्ट आहे.

असेच प्रयत्न इस्लामी जगतातही मोठ्या प्रमाणावर व्हायला हवेत. लहानसहान प्रयत्न होत असतात. वर्राक यांचे पुस्तक हादेखील असाच एक प्रयत्न आहे, असे म्हणता येईल. गंमतीची गोष्ट म्हणजे अलीकडेच इराणमधल्या इस्लामी क्रांतीचे जनक, अयातोल्ला खोमेनी यांचा नातू सय्यद हुसेन खोमेनी याने म्हटले की धर्म आणि राजकारण यांची फारकत केल्याशिवाय मुस्लिम देशांना ऊर्जितावस्था येणार नाही. आपल्या आजोबांवर, त्यांच्या धार्मिक कट्टरपणावर टीका केली होती म्हणून काही वर्षांपूर्वी सय्यद हुसेन खोमेनी यांना इराणमध्ये तुरुंगातही टाकले होते. इराणचे मुल्लामौलवींचे सरकार ही जगातली सर्वाधिक वाईट हुकूमशाही आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. धर्मनिरपेक्ष राज्यघटना असेल तरच इस्लामी कट्टरपंथीय हुकूमशाहीचा अंत होईल आणि मानवजातीची धर्मापासून सुटका होईल. मुल्लामौलवींनी इस्लामला हवे तसे वापरून मुस्लिम समाजाचे, अपंरपार नुकसान केले आहे, असेही सय्यद खोमेनी म्हणतात. क्रूरकर्मा सद्दाम हुसेनचा पाडाव झाला हे बरेच झाले. आता इराकने अमेरिकेच्या मदतीने तिथे धर्मनिरपेक्ष लोकशाही रुजवावी आणि इस्लामी देशांपुढे एक आदर्श घालून द्यावा, असे ते म्हणतात, तर लोकशाही, धर्मनिरपेक्षता, उदारमतवाद यांवर दावा करणारे अमेरिकन सरकार युद्धखोरीवरच उतरते. युद्धाने जगातील कोणताही प्रश्न सुटलेला नाही; उलट एक युद्ध नंतरच्या युद्धासाठी पार्श्वभूमी तयार करीत असते. कट्टरपंथीय, दहशतवादी ओसामा बिन लादेन, स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारा क्रूरकर्मा सद्दाम हुसेन, त्याची मुले यांचा निपटारा अमेरिका करते म्हणून जगावर एकापाठोपाठ युद्धे लादण्याचे स्वातंत्र्य अमेरिकेला मिळता कामा नये. त्यावर अंकुश ठेवण्याचे काम विवेकवादी शक्तींनाच करावे लागणार आहे. त्यामध्ये मुस्लिम असतील, बिगर मुस्लिमही असतील. ही हिंमत, ताकद, कोण कोण दाखवते, किती कौशल्याने दाखवते, यावरच उद्याच्या जगाचे स्वास्थ्य अवलंबून राहणार आहे. (समाप्त) [ अनुभव जाने. 2004 मधून हा लेख प्रतिभा रानडे यांच्या परवानगीने घेतला आहे. सं . ] बी-10, मेदिनी निकेतन, बामनवाडा, विलेपार्ले पूर्व, मुंबई – 57.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.