आजचे विज्ञान आणि अध्यात्म : उत्तरे व समारोप

या विषयावरील माझा लेख आसुच्या जाने फेब्रु. विशेषांकात प्रसिद्ध झाला. त्याचा उल्लेख करून नव्हे, परंतु त्यातील विषयाशी संबंधित असे काही भ. पां. पाटणकर यांनी लिहिले (मार्च, एप्रिल). ‘दुसरी बाजू’ या शीर्षकाखालील वसंत त्रिंबक जुमडे यांनी लिहिले (एप्रिल). काही मित्रांनी प्रत्यक्ष भेटीत प्रतिक्रिया दिल्या. या सर्वांवर लिहून या विषयाचा माझ्यापुरता समारोप करीत आहे.

सगळीच सामान्य माणसे पाटणकरांना (मार्च-अंक) वाटतात तितकी सामान्य नसतात. उदाहरणार्थ, आजचा सुधारकचा अंक समोर धरल्यावर हातात घेऊन चाळण्याइतपत मूलभूत मानवी कुतूहल ज्याच्याजवळ आहे, त्याला ‘जुन्या’ विज्ञानाला चिकटून न बसता नवे काय आहे त्याची जरा माहिती करून घेऊ, असे वाटेलच.

मूल्ये, भावना इत्यादींसाठी तात्त्विक आधार विज्ञानातून मिळत नाही अशी (अनेकांप्रमाणे असलेली) पाटणकरांची समजूत, ही विज्ञानाकडे संकुचित दृष्टीने पाहिल्याने निर्माण होते. मनोविज्ञान, समाजविज्ञान हेच याविषयीच्या शिक्षणाचे स्रोत असल्याचे माझ्या मूळ लेखातून ध्यानात येण्याजोगे आहे. पाटणकरांच्या एप्रिल- अंकातील पत्रातून विज्ञानाच्या अर्थाविषयीची त्यांची आस्था समजते; तसेच त्यासोबतच्या इंग्रजी उताऱ्यातून विज्ञानविषयक संकुचित दृष्टीचे उदाहरण मिळते. वरील परिच्छेद त्याबाबतीत उपयुक्त व्हावा.

मी विषयाची एकच बाजू मांडली व आपण दुसरी बाजू मांडत आहोत असा, शीर्षकापासूनच पुढे सर्वत्र घेतलेला जुमडे यांचा पवित्रा चुकीच्या पायावर आधारलेला आहे; कारण दोन्हीहीबद्दलचा माझा प्रेमादर व्यक्त करीतच त्या दोन्हींसह मी अनेक संबंधित बाजूंचाही विचार केला आहे.

जुमडे यांनी माझ्या मुद्द्यांना सरळ अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या असत्या तर बरे झाले असते. त्यांच्या लेखातील बराच भाग मूळ मुद्द्यांना सोडून असला, तरी त्यात व्यक्त झालेले विचार इतरही वाचकांच्या मनात असण्याचा संभव लक्षात घेऊन मी जुमड्यांच्या लेखातील परिच्छेदांच्या क्रमाने माझ्या प्रतिक्रिया नोंदवीत आहे.

सर्व वस्तूंना इंद्रियांना दृश्य व अदृश्य अशा दोन बाजू असतात (आणि त्या अनुक्रमे विज्ञानाच्या व अध्यात्माच्या क्षेत्रात पडतात), असे मानणे, मग ‘अदृश्य वस्तू रूपाला आधारभूत असते’ असे मानणे, येथून पुढच्या सर्व विचारांचा ‘तर्काने आपोआपच येतो’ असे म्हणत प्रवास सुरू होतो. ‘दर्शनकारांनी सांगितले म्हणून खरे मानण्याच्या या वृत्तीचा त्याग करून स्वतःची बुद्धी वापरायची ठरवली व मन मोकळे ठेवून सर्व बाजूंचा विचार करण्याची तयारी असली, तरच पायाही नाही व पडताळाही नाही असे सिद्धांत झुगारून देण्याचे बळ लाभेल.

विज्ञान या शब्दाचा संकुचित अर्थ आपण जितक्या लवकर सोडून देऊ, तितके बरे. या दृष्टीने माझे विचार मी पृ. 418-419 वर मांडले आहेत. आंब्याची कोय पेरणाऱ्या माणसाचा हेतू काय, काय चांगले काय वाईट, हे प्रश्न अर्थशास्त्र व समाजशास्त्र या विज्ञानक्षेत्रांच्या कक्षेत येतात. जुमडे यांनी उद्धृत केलेले विचार व त्यांवरील त्यांची मल्लीनाथी यांवरूनही वैज्ञानिकांची नम्रता व अध्यात्मवादींची तीव्र आत्मपरताच दिसून येते. सर्व मानवी ज्ञानाला गवसणी घालणारा सिद्धांत समजा मिळालाच, तरी त्याचा तार्किक पाया कितपत भक्कम असेल, शिवाय त्यानंतर काय करावे लागेल, त्या सर्वांचा विचार वैज्ञानिक आत्ताच करीत आहेत. तर अध्यात्मवादी आपल्या अंतरातच सर्व अनुभवण्यात मग्न आहेत -हजारो वर्षे ते हेच करीत आहेत, तरी होते तेथेच आहेत. बाहेर, तसेच आतही.

मूळ वस्तू व त्यांचे गुणधर्म कुणी निर्माण केले, नियम कुणी, का, कसे, कशासाठी बनवले, याची उत्तरे विज्ञानाकडे आहेत का, असे जुमडे विचारतात. ‘विज्ञानाच्या काही मर्यादा आहेत, त्यापलीकडे अध्यात्माची गरज भासते’ या तर्कदुष्ट विधानातूनच अखेरीस वरील प्रश्न निर्माण होतो. त्याचे उत्तर असे आहे :

वस्तूंचे गुणधर्म व नियम काय आहेत हे पूर्णपणे कळण्यापूर्वीच, ते कुणी व का व कसे निर्माण केले याविषयी शेकडो-हजारो वर्षांपूर्वीच्या मानवाने केलेले बिनबुडाचे तर्क, विश्वाच्या स्वरूपाविषयी माहिती विशेषतः गेल्या चारपाच शतकांत पुढे आलेली असता, आजही ग्राह्य धरणे, हा सर्व प्राण्यांमध्ये सर्वश्रेष्ठ अशी जी मानवाची तर्कबुद्धी, तिचा घोर अवमान आहे. विज्ञान अजून नम्रपणे वस्तू आणि नियम काय आहेत त्याचाच शोध घेत आहे. कुणी आणि का याचाही शोध विज्ञान घेईलच, परंतु तो तर्कशुद्ध रीतीने. कुणी आध्यात्मिक साधु-महात्मा आपल्याला समाधिस्थितीत त्याचे ज्ञान झाल्याचे सांगू लागला, तर मेंदूतल्या कोणत्या भागाने आणि का त्याला ही संवेदना दिली, याचाही शोध विज्ञान घेईल. सध्याही तसे प्रयत्न चालू आहेत; त्यांना बळ देणे हे प्रत्येक सत्यान्वेषी व्यक्तीचे कर्तव्य आहे. थोडक्यात असे म्हणता येईल, की अनुभवांचे विश्लेषण हे विज्ञानाचे काम आहे; त्यांतच तथाकथित ‘आध्यात्मिक’ अनुभवही आले.

भोंदूबाबा, अनिष्ट प्रथा यांचे वावडे जुमडे यांनी व्यक्त केलेलेच आहे. त्यांच्यासारखी अनेक मंडळी चमत्कार, अंधश्रद्धा यांना आपला विरोध व्यक्त करतात. पण मग दृश्य-अदृश्य, चैतन्यतत्त्व इत्यादींवर (पुराव्याविना) श्रद्धा, ही अंधश्रद्धाच नव्हे का? तर्कबुद्धीवर श्रद्धा हीदेखील अंधश्रद्धा नव्हे का, असा प्रतिप्रश्नही कुणी करतील. उत्तर असे की, होय, तर्कबुद्धी ही एकच मानवाने श्रद्धा ठेवण्याजोगी गोष्ट आहे मग त्या श्रद्धेला आंधळी म्हणा वा डोळस. मुख्य कारण असे, की तर्कबुद्धीचा लोप होणे म्हणजे माणसाचा ‘साक्षात् पशुः पुच्छविषाणहीनः’ होणेच आहे.

‘पाश्चात्त्यांनी विज्ञानामुळे धार्मिक परंपरा सोडल्या नाहीत’ – प्रार्थना इत्यादींतून मनःशांती मिळत असेल तर त्यांची मदत अवश्य घ्यावी, पण औषधांचे साईड इफेक्ट्स् असू शकतात हेही लक्षात ठेवावे, असे मी म्हटले आहे (पृ.424).

अध्यात्म निराशावादी आहे असे मी कुठेच म्हटले नाही. स्वर्ग-नरक हे केवळ ‘संकेत’, ‘त्या काळातील रूढ कल्पना’ असे म्हणून गीतेत भगवंतांच्या तोंडी असलेल्या कोणत्याही गोष्टींची बोळवण करणे कोणत्या श्रद्धाळू मनाला सहन होईल? आणि तसे पाहिले तर दैवी गुण बाणवायला आणि आसुरी टाकायला, स्वर्ग-नरक, अशुभ योनीत ढकलले जाणे, याशिवाय कोणती कारणे गीतेने दिली आहेत? ‘संकेत’ ही उपपत्ती मानली तर वाईट टाळावे कारण ते वाईट असते, एवढेच विधान शिल्लक उरेल.

ऋग्वेदादी भारताच्या प्राचीन मानदंडाविषयी मी पुरेपूर आदरच व्यक्त केलेला आहे. मात्र पुष्पक विमान इत्यादी कल्पना विज्ञानाने प्रत्यक्षात आणल्या आहेत वगैरे वल्गना आपण जितक्या लवकर थांबवू तितक्या लवकर आपली खऱ्या आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.

भारताच्या विचारांना परकीय आक्रमणांमुळे खीळ बसली असे नसून त्या विचारांमुळेच परकीय आक्रमकांना आपल्यावर कब्जा करणे सोपे गेले असे म्हटले पाहिजे. आपल्यात ‘रुजलेल्या सहिष्णुते’ मुळे आपण ‘परकीयांना सामावून घेतले हे वाचून हसावे की रडावे कळेना. अहो, शत्रू आपल्या नाकर्तेपणामुळे घरात घुसून आपल्या छातीवर पाय ठेवून उभा राहतो, आणि आपण म्हणतो आम्ही किती थोर सहिष्णु ? का नाही आपण अधिक धारदार तलवारींची एकजूट केली? का नाही अधिक चांगल्या बंदुकांचे कारखाने उभारले? ब्रह्मचर्चा करीत ‘चित्तीं असों द्यावें समाधान’ असले समाधान गोंजारत शतकानुशतके गुलामगिरीत खितपत पडलो. नाठाळाचे माथी हाणायला काठी हातात असली तरच कासेची लंगोटी सोडून देणारा भला ठरतो, हे काय संतवाङ्गयाच्या अभ्यासकांना सांगायला पाहिजे?

‘सामान्य श्रोता किंवा वाचक’ यांच्याबद्दलच्या जुमडे यांच्या मताचे पाटणकरांच्या मताशी साम्य पाहून आश्चर्य वाटले नाही. ही मंडळी समजतात त्याहून सामान्य माणसाची प्रत अधिक उच्च आहे. ‘चर्चा/वाद’ उडवून लावण्यापेक्षा, ‘इलेक्ट्रॉन… ईशतत्त्व’ या विषयीच्या मी उद्धृत केलेल्या विधानांवर तरी (निदान) जुमडे यांनी आपली सरळ प्रतिक्रिया दिली असती तर सर्वांना उपयोगी ठरली असती.

आज सापेक्षता सिद्धांत शाळा कॉलेजातल्याही मुलांच्या परिचयाचा झाला आहे, तसेच उद्याच्या विज्ञानाचे सिद्धांतही सर्वसामान्यांना परिचित होतील, ही स्टीफन हॉकिंग यांची उमेद जुमडे यांच्या नजरेतून सुटलेली दिसते.

अध्यात्म, औषध आणि साईड इफेक्ट्स या तिन्हींचा एकाच वेळी उच्चार केल्यामुळे, श्वा, युवा, मघवा यांना एकाच सूत्रात गोवल्यामुळे कोणाचा झाला नसेल इतका काही मित्रांचा जीव कासावीस झाला आहे. भगवद्गीतेवरील माझ्या विधानांमुळेही काहींची तशीच अवस्था झाली. होय, ‘राउळाच्या कळसाला लोटा कधीं म्हणूं नये’ अशी ही भावना आहे. या भावनेचा मी आदर करतो, कारण अशा भावनांच्या अभिव्यक्तींतूनच आपले भावजीवन समृद्ध होत असते. त्याचबरोबर विचारतो, की आपल्याला आज स्वखर्चाने देवळाला कळस उभारायचा असेल, तर काल विकत घेतलेल्या लोट्याला किती पैसे पडले, त्याची तुलनाही आपल्या मनात तरळून जाईलच ना? निदान भावनांचा भर ओसरल्यावर तरी आपल्या भावनांचे आपली बुद्धी वापरून जो विश्लेषण करू इच्छित नाही, त्याच्या भावनांचे उन्नयन कधी होतच नाही. आणि असे उन्नयन करणे हे तर माणूस म्हणून जगण्यासाठीच्या आद्य कर्तव्यांपैकी एक आहे. ‘स्वप्न’, 44 विजयनगर कॉलनी, 2096 सदाशिवपेठ, पुणे – 411030

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.