मी, मी, मी. 

भारतातील ‘यशस्वी’ वर्ग शासकीय सेवांपासून मुक्त अशी खाजगी क्षेत्रे कशी घडवत आहे, यावर काही वर्षांपूर्वी मी एक लेख लिहिला. त्यावेळी मला वाटले होती की उदारीकरण व लोकशाही यांच्या संयुक्त परिणामाने सार्वजनिक सेवा झपाट्याने सुधारतील, आणि समाजापासून तुटू पाहणारी ही खाजगी ‘बेटे’ घडणे अनावश्यक ठरेल. आज मात्र मला अधिकच अस्वस्थ करणारे दुभंगलेपण घडताना दिसत आहे. 

भिंतींआडच्या दारावर पहारेकरी असलेल्या, स्वतःची वीजपाण्याची सोय जनरेटर- बोअर वेलने करणाऱ्या वसाहती, हे माझे पूर्वी वापरलेले उदाहरण आहे. आज आपल्या परिसरापासून भौतिकदृष्ट्याच नव्हे, तर मानसिक दृष्ट्याही ‘भिंतीआड’ राहणारे समाज घडत आहेत. ते आसपासच्या जगातील घटनांपासून स्वतःला सोडवून घेत आहेत. हा श्रीमंतांचा ‘निर्लेपपणा’ आहे. 

ही ‘मला काय त्याचे?’ वृत्ती आज जास्त जास्त उघड होत आहे. एका वार्ताहराला ‘गुप्त कागदपत्रे’ बाळगल्याबद्दल सहा महिने तुरुंगात ठेवले गेले. ती कागदपत्रे गुप्त नसून सार्वजनिक क्षेत्रांतच उपलब्ध होती, हे तुरुंगवासाशी संबंधित असलेल्या अनेक व्यक्तींना माहीत असणारच, पण त्यांपैकी सर्वांनीच या प्रकरणात गुंतायचे टाळले. 

पोलीस ‘थर्ड डिग्री’ च्या नावाखाली कैद्यांचा छळ करून निरपराध्यांकडून खोटे कबुलीजबाब ‘उकळतात’, हे सर्वज्ञात आहे. पण ही ‘तपास’ आणि ‘कायदापालन यांची’ पाशवी पद्धत सुसंस्कृत समाजधारणेच्या थेट उलटी आहे, आणि याची दखल घ्यायला हवी, असे एकाही ‘विशेषाधिकाऱ्याला वाटत नाही. कायद्याशी कधी संबंध आलाच, तर मूठभर फोन करून किंवा पसाभर नोटा देऊन ते ‘निपटण्याकडे’च कल आहे. 

पदपथच अस्तित्वात नसल्याने रस्त्यांवर चालणे भाग असणारे शेकडो पादचारी दरवर्षी मरतात, गॉल्फ मैदानांवर किंवा आपल्या बागेशिवाय इतरत्र कोठेच चालण्याची सवय नसलेल्यांना ही समस्या जाणवतही नाही. त्यांच्या वाहनाखाली कोणी येऊन अपघात झाल्यास ‘अबोला’ विकत घेण्याची व साक्षीदार पलटवण्याची तंत्रे आज सुविहित झालेलीच आहेत. 

कायद्याची गलथान अंमलबजावणी, त्यातून सरांस कायदेभंग होणे, लाचखोरीतून हा कायदेभंग माफ होणे आणि यातून कायद्यांची अंमलबजावणी आणखीच गलथान होणे हे दुष्टचक्र आज सर्वज्ञात आहे. पण जे यात बदल करण्याचा आग्रह धरू शकण्याइतके प्रभावी आहेत तेच बदल करण्याबाबत निरुत्साही आहेत. (शासकीय) अडवणूक छळवणूक आणि भुरटा भ्रष्टाचार हे नाहीँरेंच्या दैनंदिन वास्तवाचे भाग आहेत. आहेरेना मात्र भ्रष्टाचारामुळे ‘वाटेल ते’ करायची मुभा मिळते. याचे तेजाबासारखे समाजाला ‘खाणारे’ परिणाम काही अज्ञात नाहीत. 

जास्त व्यापक पातळीवर विचार करता गरिबी, निरक्षरता, अनारोग्य ही आहेरेंच्या दुर्लक्षाची लक्ष्ये आहेत. इतरांच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता आणि सहवेदना हे आज ‘समर्थांचे’ गुण उरलेले नाहीत. आंतरराष्ट्रीय पातळीवरही अन्नपेये, फॅशन, प्रवास व क्रीडा यांच्यापलीकडे कशाची दखल घेतली जात नाही. इराकही फक्त काही मिनिटे चघळायला विषय पुरवतो, एवढेच.. 

‘पोटा’ (POTA) सारखे कठोर कायदे जेव्हा दहशतवाद्यांऐवजी साध्या गुन्हेगारांवर किंवा सत्ताधारी पक्षांच्या विरोधकांवर कधीकधी तर 12 वर्षांच्या मुलांवरही रोखले जातात, तेव्हाही श्रीमंत अचल राहतात. नाहीतरी ते सारे इतरांना होते • ह्यांच्या स्वातंत्र्याला धक्का लागत नाही. 

आजच्या सुस्थितांची ही आश्चर्यकारक निर्लेपवृत्ती मागच्या काळातील श्रीमंतांच्या स्वातंत्र्ययुद्धातील सहभागाच्या थेट विरुद्ध आहे. हे घडण्यात संदेशवहनातील क्रांतीचा भाग आहे. या क्रांतीने अंतरे नष्ट केली. आज समाज गट ‘अवकाशा’ने रेखले जात नाहीत, तर वेगळ्याच सूत्रांनी रेखले जातात. भारतातले श्रीमंत आज लंडन किंवा लॉस एंजलिस मधील आंतरराष्ट्रीय समुदायाशी जुळलेले असतात लाजपतनगर किंवा लालबागशी नव्हे. यात विचारप्रणालींच्या (ideologies) अंताचाही भाग आहे. विचारप्रणाली संपताना मूल्येही संपली आणि सहानुभूती आणि सहवेदनेची जागा निर्लेप हावेने घेतली. 

इतिहास सांगतो की सुखवाद आणि निर्लेपपणा टोटलिटेरियन हुकूमशाह्यांना जन्म देतो. ‘इतरांवरचे अन्याय-अत्याचार सुसह्य मानणे हे तसे मानणाऱ्यांवरच बूमरँगसारखे उलटते. हिटलरच्या जर्मनीतील कथा अशी “ते कम्युनिस्टांना पकडायला आले तेव्हा … मग हेच वाक्य कम्युनिस्टांऐवजी ज्यू, मी गप्प राहिलो, कारण मी कम्युनिस्ट नव्हतो.. ट्रेड यूनियनवाले, कॅथलिक वगैरेंबद्दलही म्हणावे लागेल. शेवटी ते मला पकडायला आले तेव्हा माझ्यातर्फे बोलायला कोणीच उरले नव्हते!” 

ही धोक्याची सूचना घंटानादासारखी जोरात घणघणते आहे. पण काही आशेचे किरणही आहेत नव्या उद्योगांमधील काही पेशेवर नवउद्योजक वेगळ्या नमुन्याचे आहेत. त्यांची मूल्ये, संवेदना आणि सहवेदना शाबूत आणि मजबूत आहेत. त्यांना हा त्यांचा समाज वाटतो. नागर सुसंस्कृत समाज घडवू पाहणाऱ्यांनी या नवउद्योजकांना सामील करून घेऊन नव्याने इतरांची काळजी घेणारा समाज उभारायला हवा. 

[टाईम्स ऑफ इंडियाच्या 18 जुलैच्या अंकातील ‘आय, मी अँड मायसेल्फ’ या लेखाचा हा अनुवाद. किरण कर्णिक हे दिल्लीतील NASSCOM या संस्थेचे अध्यक्ष आहेत.] 

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.