मानसोपचार आणि सामाजिक परिवर्तन 

प्रस्तुत लेखाचे केवळ शीर्षक वाचूनच काही वाचकांनी आपल्या भुवया उंचावल्या, तर त्यामुळे कोणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण त्यांच्या मनात असे प्रश्न गर्दी करू लागले असतील, की मानसोपचार आणि सामाजिक परिवर्तन या दोन प्रक्रिया इतक्या भिन्न असताना त्यांना एकाच दावणीला बांधण्याचे धाडस करणे म्हणजे अकारण नसता उपद्व्याप करणे नव्हे काय? सामाजिक परिवर्तनाच्या समस्येची चर्चा आजपर्यंत विचारवंतांनी, समाजसुधारकांनी, धर्माभ्यासकांनी, समाजशास्त्रज्ञांनी, शिक्षणतज्ज्ञांनी, पत्रपंडितांनी अगर तत्सम क्षेत्रांतील धुरीणांनी केली आहे, हे समजण्यासारखे आहे; नव्हे एक प्रकारे ते त्यांचे कामच आहे. परंतु मानसोपचारतज्ज्ञांनी सामाजिक परिवर्तनाच्या प्रश्नाविषयी नसती उठाठेव करण्याचे प्रयोजनच काय? मानसोपचारतज्ज्ञांचे क्षेत्र कोणते? सरळ, सोप्या भाषेत सांगावयाचे म्हणजे, त्यांनी अर्धवट किंवा पूर्ण वेडसर लोकांवर उपचार करून त्यांना थोडेफार सुधारण्याचा प्रयत्न करणे, हा त्यांचा व्यवसाय सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेशी त्यांचा संबंध येतोच कोठे? 

‘जर काही वाचकांच्या मनांत मानसोपचारशास्त्राविषयी वरील दोबळ कल्पना दृढमूल झालेली असेल, तर त्यांना मानसोपचारशास्त्राचा सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेशी काही संबंध असणे निदान सकृद्दर्शनी असंभाव्य वाटणे समजण्यासारखे आहे. परंतु जर त्यांनी मानसोपचारशास्त्राच्या स्वरूपाची व व्याप्तीची ओळख करून घेतली, तर त्यांच्या मनातील शंका हळूहळू मावळू लागतील. आणि त्यांनी जर गेल्या सुमारे पन्नास वर्षांत मानसोपचारशास्त्रात झालेल्या प्रगतीची केवळ रूपरेषा समजावून घेतली, तर त्यांना सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत मानसोपचारशास्त्र कोणती कामगिरी बजावू शकेल, हे सहज लक्षात येईल. 

मानसोपचारशास्त्र स्वरूप आणि व्याप्ती 

अर्थात मानसोपचारशास्त्राचे स्वरूप व त्या शास्त्रात गेल्या अर्धशतकात घडून आलेल्या विकासाचा समग्र आढावा घेणे, हे या लेखाचे उद्दिष्टच नाही. आणि तसा आढावा एका लेखात घेणे जवळजवळ दुरापास्तच आहे. तथापि आजवर विकसित झालेल्या मानसोपचाराचे उद्दिष्ट, सर्वसामान्य सुशिक्षित मंडळींच्या मनांतील त्याविषयीच्या कल्पनेहून किती व्यापक आहे, हे प्रथम थोडक्यात सांगणे आवश्यक आहे. 

सामान्य भाषेत मानसोपचारशास्त्राची तोंडओळख करून द्यावयाची झाली तर असे म्हणता येईल, की ते शास्त्र माणसाला जीवनातील समस्यांना स्थिरचित्ताने सामोरे कसे जावे, याचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करते. कोणताही माणूस आपल्या जीवनातील समस्यांशी मुकाबला करताना, कोणत्या शस्त्रांचा उपयोग करतो? या प्रश्नाचे उत्तर असे, की तो त्याला जन्मतःच लाभलेले बुद्धीसारखे गुणविशेष व त्याने जीवन जगताना संपादलेले अनुभव (यांमध्ये त्याने प्राप्त करून घेतलेल्या औपचारिक व अनौपचारिक शिक्षणाचाही समावेश होतो), अशा दोन शस्त्रांच्या सामर्थ्यावर स्वतः पुढील समस्यांना सामोरा जातो. परंतु तो जेव्हा आपल्यापुढील समस्या सोडविताना भावनिकदृष्ट्या अस्वस्थ होतो, तेव्हा त्याच्याजवळील ती दोन्ही शस्त्रे निस्तेज होतात व त्यांचे सामर्थ्य क्षीण होते अथवा कधीकधी नष्टप्रायही होऊन जाते. अशा वेळी मानसोपचारशास्त्र त्याच्या मदतीला धावून जाते आणि त्याने अकारण निर्माण केलेल्या अपथ्यकारक भावनांच्या झंझावातातून त्याची सुटका करते. शिवाय, त्याला स्वतःच्या मनात पथ्यकारक भावनांची पेरणी व निगराणी करण्यास शिकविते. मग त्याला स्वतःजवळील दोन शस्त्रांचा अवलंब करून स्वतःपुढील समस्या कार्यक्षमतेने सोडविण्यास प्रेरित करते. मानसोपचारशास्त्राचा हा भाग म्हणजे जो माणूस जीवनसंग्रामात भावनिकदृष्ट्या प्रक्षुब्ध झाला आहे, त्याच्यावर उपचार करण्याचे शास्त्र, असे म्हणता येईल. परंतु या शास्त्राचा दुसरा भाग म्हणजे, माणसाने जीवनसंग्रामात भावनिकदृष्ट्या प्रक्षुब्ध होऊ नये किंवा निदान फार प्रक्षुब्ध होऊ नये, म्हणून त्याला प्रथमपासूनच आवश्यक ते शिक्षण देणे. साहजिकच मानसोपचारशास्त्राच्या या भागाला प्रतिबंधात्मक भाग असे म्हणता येईल. 

परंतु मानसोपचाराची व्याप्ती वरील दोन कार्ये करण्यापुरतीच मर्यादित नाही. माणसाला आणखीही एक उद्दिष्ट साध्य करून घेण्यास मानसोपचारशास्त्र साहाय्य करते. प्रत्येक माणसाला काही क्षमतांचा वारसा उपजतच मिळालेला असतो. तो वारसा त्याच्या मनात सुप्तावस्थेत असतो. आणि कित्येक माणसे स्वप्रयत्नानेच आपल्याला जन्मजात लाभलेल्या क्षमतांचा शोध घेऊन व तो विकसित करून आपले जीवन सफलसंपन्न करतात. परंतु भावनिकदृष्ट्या अस्वस्थ झालेल्या माणसांना हा मार्ग आक्रमणे अवघड जाते. मानसोपचारशास्त्र अशा माणसांना स्वतःच्या मार्गातील अशा स्वरूपाच्या अडचणींवर मात करून आत्मप्रकटीकरणाचा मार्ग खुला करून देण्याचा प्रयत्न करते. 

मानसोपचारशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती यांविषयीची उपर्युक्त स्थूल रूपरेषा ध्यानात घेतली, तर त्या शास्त्राचा सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेशी संबंध कसा असू शकतो, हे समजणे सुलभ होईल. मानसोपचार आणि सामाजिक परिवर्तन हे बाह्यतः एकमेकांशी असंबंधित दिसणारे विषय वस्तुतः एकमेकांशी कोणत्या प्रकारे निगडित आहेत, हे विशद करण्यासाठी जगद्विख्यात अमेरिकी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अल्बर्ट एलिस यांनी एक स्वतंत्र लेखच प्रकाशित केला आहे. मानसोपचारशास्त्राला वाहिलेल्या ‘व्हॉइसेस’ (Voices) नावाच्या व्यावसायिक नियतकालिकातील त्या लेखात, विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राचे जनक असलेल्या डॉ. अल्बर्ट एलिस यांनी मानसोपचारशास्त्राद्वारे सामाजिक परिवर्तन घडवून आणणे कसे शक्य आहे, हेही निदर्शनास आणले आहे. त्या लेखातील विचार सारांशाने संकलित करून, प्रस्तुत लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मराठी भाषेत आजवर अस्पर्शित राहिलेल्या एका विषयाशी वाचकांना परिचय करून घेता येईल, अशी उमेद वाटते. शिवाय, डॉ. अल्बर्ट एलिस यांच्या सारांशाने मांडलेल्या विचारांमार्फत, मानसोपचारशास्त्रात अंतर्भूत असलेल्या काही संकल्पनांचे स्वरूपही काही प्रमाणात स्पष्ट होईल. 

व्यक्ती आणि समूह यांचे दुतर्फी परिणाम 

व्यक्ती नेहमी कोणत्यातरी समूहाची घटक असते. इतकेच नाही, तर ती अनेक समूहांची घटक असते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती कुटुंबात, मित्रपरिवारात इत्यादी अनेक समूहात राहून जीवन जगत असते. त्यामुळे त्या व्यक्तीत घडून येणारे बदल, ती ज्या समूहांत वावरते त्या समूहांमध्येही कळत नकळत कमीअधिक बदल घडवून आणत असतात. एखाद्या कुटुंबातील जरी एका व्यक्तीवर मानसोपचार केला, तरी त्यामुळे केवळ त्या व्यक्तीमध्येच बदल घडून येत नाही. ती व्यक्ती ज्या कुटुंबाची घटक असते, ते कुटुंब म्हणजे एक समूह असल्यामुळे, त्या व्यक्तीत झालेला बदल काही अंशी तिच्या कुटुंबरूपी समूहातही काहीतरी फेरबदल घडवून आणतो. त्याचप्रमाणे मानसोपचारतज्ज्ञ जेव्हा एखाद्या संपूर्ण कुटुंबावर उपचार करतो, तेव्हा केवळ त्या संपूर्ण कुटुंबात समूहरूपी झालेले बदल दृष्टोत्पत्तीस येत नाहीत, तर त्या कुटुंबातील व्यक्तींमध्येही वेगवेगळ्या प्रकारचे कमीअधिक बदलझालेले दिसून येतात. व्यक्तीमधील बदल आणि ती ज्या समूहाची घटक असते त्या समूहातील बदल परस्परांवर दोन्ही बाजूंनी परिणाम घडवून आणतात. म्हणजेच व्यक्ती आणि समूह यांच्यामध्ये होणारे बदल दुतर्फी असतात, हा सामाजिक शास्त्रांमधील एक सर्वसामान्य सिद्धान्त आहे, असे म्हणावयास हरकत नाही. तथापि हा सिद्धान्त समजावून घेण्यासाठी पुढील उदाहरणे उपयुक्त होतील. 

1. कामजीवनातील बदल: फ्रॉइडने आपल्या मनोविश्लेषणशास्त्राचा उपयोग करून प्रथम मनोरुग्णांवर वैयक्तिक उपचार करण्यास सुरुवात केली. त्याने प्रवर्तित केलेल्या मनोविश्लेषणशास्त्राची व उपचारपद्धतीची चिकित्सा करून त्यांमधील गुणदोषांची चर्चा अवश्य करात येईल. नव्हे आजवर तशी खूप चर्चा झालेलीही आहे; आणि बहुधा भविष्यकाळातही ती होत राहील. मात्र असे असले, तरी त्याच्या व कालांतराने त्याला कमीअधिक प्रमाणात अनुसरणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञांच्या कार्यामुळे केवळ काही माणसांच्या व्यक्तिगत जीवनातच बदल झाले असे नाही, तर सामाजिक जीवनातही कित्येक दूरगामी परिणाम झाले. किंबहुना वरील प्रकारच्या मानसोपचारतज्ज्ञांच्या कार्यामुळे गेल्या शतकातील सहाव्या दशकात एक लैंगिक क्रान्ती घडून आली, हे सर्वश्रुतच आहे. आजच्या समाजात कामजीवनाविषयी प्रचलित असलेले दृष्टिकोण कितीतरी व्यापक व उदार आहेत, याचे श्रेय वरीलसारख्या मानसोपचारतज्ज्ञांना यावे लागते. 

2. व्यक्तिस्वातंत्र्यवाद गेल्या शतकातील सहाव्या दशकापासून मानसोपचारज्ज्ञांनी आपल्या दैनंदिन कार्यामार्फत व्यक्तिस्वातंत्र्याचे महत्त्व वारंवार अधोरेखित केले आहे. त्याचप्रमाणे आधुनिक काळातील मानसोपचारतज्ज्ञ आपल्याकडे आलेल्या व्यक्तीने स्वतःचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जीवनातील विविध क्षेत्रांत जाणीवपूर्वक उपयोगात आणावे म्हणून तिला प्रोत्साहनही देतात. आणि कोणत्याही व्यक्तीने स्वतःचा वैयक्तिक विकास करून घ्यावा म्हणूनही तिला उत्तेजन देणे हेही आपले काम आहे, अशी मानसोपचारतज्ज्ञांची धारणा असते. 

3. शांततेसाठी चळवळ अगदी फ्रॉईडच्या काळापासून मानसोपचारतज्ज्ञ शांततेसाठी चळवळ करणाऱ्या समाजधुरीणांच्या प्रयत्नात सहभागी होत आले आहेत. उदाहरणार्थ, मानसोपचारतज्ज्ञांनी ‘सायकॉलॉजिस्टस् फॉर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ सारख्या संघटनांना व ‘अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन’ या मानसशास्त्रज्ञांच्या व्यावसायिक संस्थेच्या ‘पीस डिव्हिजन’ नावाच्या विभागाला सक्रिय राहून हातभार लावला आहे. शांततेसाठी आयोजित केलेल्या मेळाव्यांना त्यांनी लेख व पुस्तके लिहून उत्तेजन दिले आहे. 

विकसित व्यक्तिमत्त्वाचे पैलू 

मानसोपचारतज्ज्ञाचे साहाय्य ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती घेऊ शकते, त्याचप्रमाणे एकादा लहानमोठा समूहही घेऊ शकतो, ही गोष्ट येथवरच्या विवेचनातून स्पष्ट झालेलीच आहे. परंतु समाजशिक्षणाचे उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून मानसोपचारतज्ज्ञ व्याख्याने, चर्चासत्रे, प्रशिक्षणाचे वर्ग, लेख, पुस्तके, ध्वनिफिती, इत्यादी माध्यमांच्या मार्फत जनसामान्यांच्या जीवनतत्त्वज्ञानामध्ये, भावनांमध्ये व वर्तनामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करीत असतात. यांपैकी कोणत्याही माध्यमांच्या साह्याने आपण स्वतःमध्ये कोणते बदल घडवून आणू शकतो, ते पाहा: 

1. आपल्या मनावरील अनिष्ट दडपणांचा त्याग करून आपले विचार मोकळ्या मनाने व्यक्त करणे व त्यानुसार वर्तन करणे. 

2. आपल्या मनातील हेकट, हट्टी, एकांगी व अनिष्ट मागण्याची हडसून खडसून उलटतपासणी घेऊन, त्यांचा त्याग करणे. 

3. प्रयोगशील राहून, साहसास सिद्ध होऊन, जीवनात कमी-जास्त प्रमाणात धोका पत्करणे; आणि प्रसंगी प्रचलित आचार-विचारांच्या विरोधात जाऊन आपल्या स्वतंत्र मार्गानि जीवनाची वाटचाल करणे. 

4. आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा विचार करताना सामाजिक हिताचाही विचार करणे. 5. कोणाच्याही वागण्याविषयी, स्वतःकडे अकारण न्यायाधीशाची भूमिका न घेणे. उलट, सहिष्णुतेचा व सहनशीलतेचा अंगीकार करणे; आणि स्वतःची अगर इतरांची निर्भर्त्सना करीत न बसणे. 

6. आपल्याशी मानसोपचारतज्ज्ञ ज्याप्रमाणे मित्रत्वाच्या नात्याने वागतो, त्याचप्रमाणे आपणही इतरांशी मित्रत्वाच्या नात्याने वागण्याचा प्रयत्न करणे. 

7. आपल्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी, आपल्यामधील सुप्त गुणविशेषणांना व सर्जनाला वाट मोकळी करून देण्यास प्रेरित होणे. अशा प्रकारे 

8.  इतरांमधील परिवर्तनास अप्रत्यक्षपणे चालना देणे. आपली नजीकची व दूरवरची अशी दोन्ही प्रकारची उद्दिष्टे साध्य करून घेण्यासाठी झटणे. तसेच, आपल्या आजच्या व दूरवरच्या सुखावर नजर ठेवून वागण्यास शिकणे. 

9. आपले आणि आपल्या सभोवतालच्या मानवी समाजाचेच नव्हे, तर पर्यावरणाचेही रक्षण करण्यास तयार असणे. 

10. आणि आपल्यामध्ये व सभोवतालच्या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी स्वतःला शिस्त लावून घेऊन अथक परिश्रम घेण्यास प्रोत्साहित होणे. 

बदल नेहमीच हितकारक

मानसोपचारतज्ज्ञाच्या साह्याने एखाद्या व्यक्तीमध्ये वरीलसारखे जे बदल घडून येतात, ते सर्वच हितकारक असतात असे म्हणता येईल का? नक्कीच नाही! कारण मानसोपचारतज्ज्ञाकडे जाणारी व्यक्ती अखेर स्वतःच्या विचारांमध्ये व वागण्यामध्ये नेमके कोणते बदल करील, हे कोणी सांगावे? एखाद्या मानसोपचारतज्ज्ञाने ज्या व्यक्तीवर अगदी परिणामकारकरीत्या उपचार केला आहे असे म्हणता येईल, ती व्यक्तीही स्वतःच्या मनातील फक्त अनिष्ट निर्बंध झुगारून देण्याऐवजी जवळजवळ सर्वच निर्बंध झुगारून देऊ शकेल; नव्हे कधीकधी ती तसे करतेही! त्याचप्रमाणे जीवनात थोडा धोका पत्करण्याच्या इच्छेने उत्तेजित होऊन ती व्यक्ती भलत्याच अवास्तव धोक्याला मिठी मारावयास धावते! तसेच व्यक्तिस्वातंत्र्यवादाच्या प्रेमात पडून ती व्यक्ती बेहोषपणे इतर माणसांच्या स्वातंत्र्याचा कसलाच विचार न करता, अत्यंत आत्मकेन्द्रितपणे वागेल. समाजात लोकांशी मिळून-मिसळून वागण्याची आकांक्षा मनात बाळगून, ती व्यक्ती झपाटल्याप्रमाणे इतरांच्या जीवनात नको तेव्हा व नको इतकी लुडबूड करू लागेल. न जाणो ती व्यक्ती स्वतः ला हेकटपणे शिस्तीकरता शिस्त लावत बसेल. आणि ती व्यक्ती दूरवरच्या हिताचा इतक्या एककल्लीपणे पाठपुरावा करील, की त्यामुळे ती नजीकच्या काळातील सर्व आनंदापासून स्वतःला वंचित करून घेईल! 

वरीलसारखे जे अचाट बदल एखाद्या व्यक्तीच्या विचारांमध्ये व वर्तनांमध्ये घडून येतात, त्यांच्यासारखेच बदल लहान-मोठ्या समूहातही घडून येतात. अनेक समूह अथवा सामाजिक संघटना मानसोपचारतज्ज्ञाच्या साह्याने (किंवा साह्याशिवायही!) कमालीच्या आक्रमक अथवा कमालीच्या निष्क्रिय होऊ शकतात: अगदी अनिर्बंधपणे अगर अगदी बंदिस्तपणे वागू शकतात; किंवा अतोनात समाजाभिमुख अथवा अतोनात आत्मकेन्द्रितपणे वागू शकतात. 

प्रयोगशील आणि लवचीक दृष्टिकोण 

असे असेल, तर कोणत्याही व्यक्तीने, समूहाने किंवा सामाजिक संघटनेने कसे वागले पाहिजे? अगदी संतुलितपणे वागावे काय ? का कोणत्याही एका विशिष्ट परिस्थितीत एका रीतीने वागावे आणि दुसऱ्या परिस्थितीत अगदी वेगळ्या रीतीने वागावे? या प्रश्नांना कोणती उत्तरे कोण देणार? खरोखर सर्वकाळी माणसांनी नक्की कसे वागावे, हे कसे सांगता येईल? परंतु वरील प्रश्नांना उत्तर द्यावयाचेच झाले तर असे म्हणता येईल, की व्यक्तीने किंवा प्रमूहाने कोणतीही कृती करताना प्रयोगशीलता आणि लवचीक दृष्टिकोण यांचा स्वीकार करावा. येथे असेही नमूद करता येईल, की प्रयोगशीलता व लवचीक दृष्टिकोण या विज्ञानाच्या क्षेत्रातही कळीच्या संकल्पना आहेत. कारण वैज्ञानिकही प्रयोग करून आपले सिद्धान्त चूक असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे ते लवचीक दृष्टिकोण स्वीकारून आपल्या सिद्धान्तांमध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा नवे सिद्धान्त पडताळून पाहण्यासाठी मोकळ्या मनाने सिद्ध असतात. विज्ञानातील प्रमेये प्रयोगक्षम व तर्कशुद्ध तर असतातच, पण ती लवचीकही असतात. ती त्रिकालाबाधित सत्याचा दावा करण्याच्या फंदात पडत नसतात. 

तेव्हा व्यक्ती आणि समष्टी यांच्यामधील कोणते बदल हितावह समजावे, याविषयी आज आपल्याजवळ निर्णायक उत्तर नाही. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या मानसिकतेत व समाजाच्या मानसिकतेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपल्यापाशी कोणताही रामबाण उपाय नाही; अथवा त्याविषयी एखादी नितान्तसुन्दर स्वप्नसृष्टीही आपल्या दृष्टिपथात नाही. परंतु मानसोपचारतज्ज्ञांनी वैज्ञानिक दृष्टिकोणाबरोबरच मानवतावादी दृष्टिकोणाचाही जाणीवपूर्वक स्वीकार केला, तर ते सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला महत्त्वपूर्णपणे हातभार लावू शकतील. कारण वरील दोन्ही दृष्टिकोणांचा अवलंब केल्यामुळे ते प्रयोगशील व लवचीक भूमिका घेऊन, व्यक्तींना अथवा समूहांना स्वतःमध्ये व समाजामध्ये कोणते बदल घडवून आणता येतील, याबद्दल डोळसपणे मार्गदर्शन करू शकतील. 

शिवाय, मानसोपचारतज्ज्ञही सर्व माणसांप्रमाणेच प्रमादशील असतात. त्यामुळे त्यांना जेव्हा असे आढळून येईल, की आपल्या प्रयत्नांचे परिणाम व्यक्तीच्या व समाजाच्या दृष्टीने पाहता अहितकारक आहेत, तेव्हा ते आपल्या विचारांमध्ये, सिद्धान्तांमध्ये व वर्तनामध्ये आवश्यक ते बदल करून, पुन्हा नव्या जोमाने आपल्या अंगीकृत कार्याचा पाठपुरावा करू लागतील. 

44/डी/मनीषनगर, जयप्रकाश रस्ता, अंधेरी (पश्चिम), मुंबई-400.053

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.