नैतिक बुद्धिमत्ता : इतरही अंगे आहेत. 

‘नैतिक बुद्धिमत्ता’ या टी. बी. खिलारे यांच्या लेखात (आ.सु. एप्रिल 04) पुढील मत नोंदविले आहे, ‘अनैतिक वर्तनामागील कारणे कोणती या प्रश्नांना मानसशास्त्रज्ञांकडे स्पष्ट उत्तरे नाहीत व बहुतांश वेळा त्यांचा अभ्यास पालकांच्या निरीक्षणातून व अंतर्मनातून प्रकट झालेल्या मतांची खात्री करण्यासाठीच असतो.’ हे मत अपुऱ्या माहितीवर नोंदविलेले आहे. ज्या लॉरेन्स कोह्लबर्गचे ‘मॉडेल’ त्यांनी मांडले आहे, ते अंतर्मनातून प्रकट झालेल्या मतांच्या खात्रीसाठी नाही. नीतिमानसशास्त्राची (Moral Psychology) इमारत ही अनेक मानसशास्त्रज्ञांच्या प्रयोगांवर उभी आहे. 

सॉक्रेटीसकाळापासून नीतिमूल्यविकासाच्या विविध संकल्पना मांडण्यात आल्या आहेत. ‘कोणीही स्वतःहून चुका करीत नाही. अज्ञानामुळे आपले वर्तन कमी नैतिक बनते’ या सॉक्रेटीसच्या म्हणण्यास ॲरिस्टॉटलचे म्हणणे छेद देणारे होते ते हे की ‘प्राणिमात्रांच्या वाढीबरोबर चांगल्या-वाईटाची वाढ होते. निव्वळ वाढीवर चांगले- वाईट, योग्य-अयोग्य अवलंबून नसते तर मानवाची बोधनक्षमता व निवड या आधारे प्रतिक्रियात्मक स्वरूपात व स्वतःच्या दृष्टिकोणातून ते व्यक्त केले जाते असे नुस्सबोमने म्हटले. एरिक एरिक्सन, ज्यां पिआजे व इतर अनेक मानसशास्त्रज्ञांच्या तत्त्वांआधारे पुढे कोहलबर्गने सजग जाणीव व मूल्य निर्मितीविषयक सिद्धांत मांडला. 

ॲरिस्टॉटीलियन मत कोहलबर्गच्या सिद्धांतात डोकावत असले तरी कोहलबर्गने त्यावेळच्या पारंपरिक नीतिशिक्षणास चार मुद्द्यांच्या आधारे आह्वान दिले. नैतिक विकासास सांस्कृतिक व ऐतिहासिक संदर्भ महत्त्वाचा असतो या त्याच्या मुद्द्यास आधार डॅनियल लाप्सलेच्या प्रयोगाचा आहे. लाप्सलेच्या शाळेतील ‘पॅनेल ऑन मॉरल एज्युकेशन ऑफ द अमेरिकन असोसिएशन फॉर करिक्युलम डेव्हलपमेंट’च्या पथकाआधारे त्याने शालेय विद्यार्थ्यांतील 23 नीतितत्वांची तपासणी केली. सभ्यता व आदर या मूल्यांच्या बाबतीत वेगवेगळ्या सांस्कृतिक गटांत मतभिन्नता आढळली. हर्षटोन मे, रॉस-निसबेट, सर्बीन- अलेन या मानसशास्त्रज्ञांनी हे दाखवून दिले की प्रत्येकाचा ‘विशिष्ट स्वभाव’ असा काही प्रकार नसतो. विशिष्ट स्थितीत व्यक्ती वर्तन करते तेच त्या व्यक्तीचे स्थितीसापेक्ष गुण होत. कोहलबर्गच्या सिद्धांतास याचा आधार मिळाला. पियाजेच्या जनुकीय माहितीतत्त्वज्ञाआधारे 

(Genetic Epistemology) सजग जाणिवेची संकल्पना उभी राहिली. सॉक्रेटीसचे तत्त्व- ‘चांगले जे ते करायचे आहे यासाठी चांगले काय आहे हे माहिती असण्याशी निगडित आहे’ याच्याशी कोहलबर्गचा ‘सर्वव्यापी योग्य’ हा सहावा टप्पा सुसंगत आहे पण कोहलबर्गने ते बोधनक्रियेतून (Cognition) दाखविले. 

खरा पेच कोणता

कोहलबर्गने जरी नीतिविकासाचे टप्पे मांडले तरी नैतिक कृतींबाबतीत त्याचे ‘मंडल’ अपुरे पडते. एका उदाहरणातील पेच हे दाखवून देते. उदाहरण असे. हेंजची बायको कॅन्सरने आजारी आहे. एक नवीन औषध तिचे प्राण वाचवू शकेल, मात्र ते खूप महाग आहे. हेंजकडे तेवढी रक्कम नाही व औषध विक्रेत्याने उधारीस नकार दिला आहे. हेजने औषध चोरावे का? का नैतिक आचरणापोटी पत्नीचा जीव घालवावा? कोहलबर्गने यातील चूक-बरोबर सांगण्याऐवजी ‘कारणे कोणती हेच सांगितले. 

कोहलबर्गच्या सिद्धांताचे समर्थक जसे आहेत तसे विरोधकही आहेत. वरील उदाहरणात कोणत्या टप्प्यावर नीतिजाणीव कोणती आहे, हे तत्त्व लागू केले तरी योग्य काय हे प्रत्येकाचे वेगवेगळे उत्तर येऊ शकते. त्यामुळेच गर्भपात, कामनीती व अणुकार्यक्रमविषयक प्रश्न यांत ठोसपणे योग्य-अयोग्य ठरविणे जड जाते. नीतिविकासाचे टप्पे वयवाढीशी निगडीत असतात याला छेद देणारे काही निष्कर्षही पुढे आले आहेत. नीतीमूल्यविकास व वर्तन याचा सखोल अभ्यासक गस ब्लासीने कोहलबर्गच्या तिसऱ्या पातळीपलीकडे जाऊन नीतिविकासासाठी कारणीभूत ठरणाऱ्या अन्य अनेक घटकांची मांडणी केली. यावर कोहलबर्गसमर्थकांनी नीतिविकासाचा बहुमुखी सिद्धांत (Multifactor Model of Moral rasoning) पुढे आणला आहे. ‘व्यक्तीला स्वतःला जसे बनायचे असते तशी ती ती मूल्ये आत्मसात करून ती व्यक्ती स्वतःची नैतिक प्रतिमा उभारते’ असा ‘नैतिक स्व’ वर भर देणारा सिद्धांत ब्लासी ने मांडला आहे. डॅन हार्ट, मॉनिका केलेट, क्लार्क पॉवर आदि अनेकांनी त्यास उचलून धरले आहे. 

तरुण वयातील टप्प्याचा कोहलबर्गचा सिद्धांत हार्ट व फेंगले यांनी तपासला आहे. ऐच्छिक समाजकार्य करणाऱ्यांच्या नैतिक विकासाची चाचणी घेतली गेली. त्यासाठी नियंत्रित व तुलनेचा अशा दोन्ही गटांस प्रश्नावली दिली व सध्याचे त्यांचे व्यक्तिमत्व व त्याचे गुण, पूर्वीचे व्यक्तिमत्व, कोणत्या प्रकारचे व्यक्तिमत्व त्यांना असावेसे वाटते, कोणते व्यक्तिमत्व अयोग्य आहे, या आधारे प्रश्न दिले. त्यांचे वय व नैतिक विकास यांचा संबंध यातून दिसला नाही. कोलबे व डॅमॉन्स यांनी ‘सम डू केअर’ या पुस्तकातून मांडलेल्या दुसऱ्या एका अभ्यासाचे तपशील आहेत. समाजकार्य केलेल्यांची चरित्रे तपासून त्यांना नैतिकतेची प्रेरणा केव्हा मिळाली याचा शोध घेतला तेव्हा कोलबर्गच्या पहिल्या स्वहित (Preconventional) पायरीपासून शेवटच्या पायरीपर्यंत प्रेरणा मिळालेले विविध चरित्रकार आढळले. 

नैतिकता एक सामाजिक संकेत (Convention) म्हणून जशी पाळली जाते तशी वैयक्तिक निवड, व्यवहारवाद (Pragmatics) या कारणाने देखील पाळली जाते. येथे नीतिविकासाचे टप्पे महत्त्वाचे दिसत नाहीत. स्मेताना या मनोवैज्ञानिकेने गर्भपात करणाऱ्या स्त्रियांना गर्भपाताचे कारण विचारून ते नैतिक-अनैतिक कृत्य आहे का हे विचारले. वैयक्तिक इच्छा, खाजगी बाब, जीव हत्येचे पाप, अशी अनेक कारणे आढळली, जी नैतिक विकासाच्या विविध टप्प्यांवर आढळून आली. 

नैतिक विकासाचे घटक नैतिक कृती 

नैतिक विचाराची पातळी व व्यक्तीची प्रत्यक्ष कृती यांचा कोणताही संबंध आढळलेला नाही. ज्या प्रयोगात असा संबंध आढळला (गिलिंगन 1977, हान व इतर 1968) तो अतिशय गुंतागुंतीचा होता. उदा. कॉलेजमधील काही नैतिक कृत्ये कोहलबर्गनुसार सहाव्या टप्प्यावर आढळावयास हवी होती ती काही जणात आढळली, काही जणात नाही. 

व्यक्तींच्या ज्ञानाचा साठा, त्या आधारे बनलेली मते, समाजघटकांतील त्याचे स्थान, त्याची सामाजिक कृती, त्याची मानसिक स्थिती, असे अन्य घटक नैतिक विकास व नैतिक कृती यांत अंतर्भूत आहेत. नैतिक पायरी व वर्तन या ऐवजी सामाजिक बोधन संस्थेतील (Social Cognitive System) स्वायत्त नैतिकता, जी आयुष्यातील कोणत्याही वैकासिक स्थितीत मार्गदर्शन करते, अशा स्वायत्त नैतिकतेचा सिद्धांतही बळावत चालला आहे. 

जैविक कारणांचे काय

त्याच लेखात म्हटले आहे- ‘(लैंगिक) विचार, भावना सर्वांच्याच मनात येतात. परंतु त्याप्रमाणे कृत्य न करणे त्यांच्या हातात असते, एवढे जरी त्यांना समजले तरी लैंगिक विकृतीस आळा बसेल.’ हे मत जैविकदृष्ट्या एकांगी आहे. उभयलिंगी व समलिंगी संभोग करणाऱ्या पुरुषांच्या मेंदूची तपासणी केली असता त्यात भिन्नता आढळल्याचे अलिकडचे संशोधन सांगते. एड्स्ने वारलेल्या समसंभोगी पुरुषांच्या मेंदूतील हायपोथॅलॅमस् हा भाग (जो कामवर्तनाशी संबंधित आहे) तो स्त्रियांच्या हायपोथॅलमससारखा आढळला आहे. व तो उभयलिंगी पुरुषांहून वेगळा आहे. कामवर्तनाच्या या जैविक कारणास आळा घालण्यास ‘बाहेरून वैद्यकीय उपचार करावे लागतील! असेच एक दुसरे मत- ‘मेंदूतील भाग विकसित न झाल्याने पालकांनी (अनैतिक कृत्यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.’ (पान 19). अनैतिक कृत्यात खिलारेंनी व्यसनाधीनतेस टाकले आहे. मद्यासक्तीविकार हा आनुवांशिक असावा असे काही निष्कर्ष मिळू लागलेत. मद्यासक्त पित्याची मुले मद्याधीन होण्याची शक्यता पटींनी जास्त असल्याचे आढळले आहे. उंदरांच्या प्रयोगातही मद्य रिचविणारी विशिष्ट उंदीरजात दिसून आली आहे. पुरुषांच्या जठरात अल्कोहोल डीहायड्रोजनेज हे वितंचक जे आढळते ते स्त्रियांच्या जठरात अत्यल्प असते. हे वितंचक दारू ‘पचविते’ त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या दारु सेवनानंतर ती जास्त प्रमाणात थेट रक्तात मिसळते, म्हणून दारूसेवन क्षमता अत्यंत कमी होते व त्या यकृत रोगास लगेच बळी पडतात. पालकांनी अशी जैविक कारणांवर नियंत्रण कसे ठेवायचे? अशा वेळी नैतिकतेचा मापदंड कसा लावणार? 

नैतिक विकास व नैतिक कृतीला बाधा आणणारा जनुकीय व जैविक घटक रिचर्ड डॉकीन्सने ‘सेल्फिश जीन्स मधून समोर आणलाच आहे, तोही विसरू नये, म्हणून हे लिहिले. 

‘चावांक’, 6564, जुना कुपवाड रोड, सांगली 416416 

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.