आदर्श नेतृत्व असे असावे 

सामान्य माणूस हा कोणतीही घटना, व्यक्ती, विचार किंवा प्रश्न यावर वरवर विचार करतो. त्याच्या विचारात सखोलता नसते व त्याचे विचार सर्वकषही नसतात. नेत्याने सामान्य माणसाला त्याचा विचार हा सखोल नाही, हे पटवून द्यायला पाहिजे. आणि त्यासोबतच त्याने कोणतीही व्यक्ती, विचार, घटना किंवा प्रश्न यावर कसा विचार करावा, हे त्याला शिकविले पाहिजे. लोकांच्या खऱ्या गरजा कोणत्या आहेत व लोकांनी आपल्या कल्याणाच्या दृष्टीने कोणती उद्दिष्टे ठेवली पाहिजेत, हेही नेत्याने लोकांना समजावून सांगितले पाहिजे. अशा गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा ठरविलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नेत्याने लोकांसमोर ठोस कार्यक्रम मांडला पाहिजे. हे सर्व करताना आदर्श नेत्याला लोकमताच्या लाटेवर स्वार होता येत नाही. याउलट लोकांचा रोष पत्करावा लागतो. त्याला लोकांची मान्यताही तात्काळ मिळत नाही. कधी कधी नेत्याला अशी लोकमान्यता त्याच्या मृत्यूपर्यंतही मिळत नाही. परंतु तो कुठल्याही परिस्थितीत आपल्या कर्तव्यापासून परावृत्त होत नाही. अशा प्रकारचे नेतृत्व निभावणे हे फार अवघड असते. अशा नेतृत्वातच मूलगामी सामाजिक परिवर्तनाची बीजे सापडतात. मानवाचा इतिहास याची साक्ष देतो. 

सारांश, खरा नेता लोकांना अंतिमतः त्यांच्या हिताच्या गोष्टी, मग त्या लोकांना न आवडणाऱ्या असल्या तरी सांगतो. त्यासाठी लोकांचा रोषही पत्करतो. कालांतराने लोकांना त्याचे म्हणणे पटते व त्यातूनच सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया चालू राहण्यास मदत होते. 

यावर एक प्रश्न पडतो की, बाळासाहेब ठाकऱ्यांचे नेतृत्व हे आदर्श नेतृत्वाच्या निकषांवर टिकते का? मला या प्रश्नाचे स्पष्टपणे नकारात्मक उत्तर द्यावेसे वाटते. 

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे! अगणित शिवसैनिकांचे आत्यंतिक श्रद्धास्थान व प्रेरणास्थान ! बुद्धिवादी समजल्या जाणाऱ्या अनेक जणांनाही बाळासाहेबांविषयी एक प्रकारचे सुप्त आकर्षण असते. अशा लोकांची बाळासाहेबांशी छुपी सहमतीही असते. बाळासाहेबांइतके लोकप्रिय व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रात दुसरे नाही, यात संशय नाही. त्यांना न मानणाऱ्या लोकांनाही त्यांची दखल न घेता पुढे जाता येत नाही. 

बाळासाहेबांच्या या अफाट व संतत लोकप्रियतेचे रहस्य काय असावे, असा प्रश्न सामान्यतः पडायला हवा. पण असा प्रश्न कोणी विचारताना दिसत नाही. कारण बाळासाहेबांची लोकप्रियता लोकांना अगदीच स्वाभाविक वाटते. त्यामुळे सर्वसामान्यांना बाळासाहेबांच्या लोकप्रियतेच्या रहस्यात इंटरेस्ट नसतो. आपण मात्र काही प्रमाणात या रहस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करायला हवा. असा प्रयत्न अगणित शिवसैनिकांच्या नाराजीला कारणीभूत ठरू शकतो, याची मला पूर्ण जाणीव आहे. 

बाळासाहेबांचे व्यक्तिमत्व फार परिपक्क किंवा सखोल आहे, असे म्हणता यावयाचे नाही. तेही तसा आव आणत नाहीत. त्यांना प्रचलित समाजिक, आर्थिक, राजकीय किंवा धार्मिक प्रश्नांची सखोल जाणीव आहे, हेही त्यांच्या वक्तव्यांतून कधी जाणवत नाही. सध्याच्या अधः पतित सामाजिक स्थितीत सकारात्मक परिवर्तन करण्याचे काही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असणारा काही ठोस कार्यक्रमही त्यांनी कधी जाहीर केलेला नाही. तरीही ते अफाट लोकप्रिय आहेत, हे वास्तव उरतेच. 

कोणतीही घटना असो किंवा कोणताही प्रश्न किंवा विचार असो. त्यांच्या मुळाशी न जाता बाळासाहेबांना जे भावते, जे जाणवते ते त्यांच्या परखड व स्पष्ट वक्तव्यांद्वारे किंवा भाषणाद्वारे प्रकट होत राहते. त्यांच्या भाषणात परिणामकारी अशी उत्स्फूर्तता व प्रखर अशी ओजस्विता आढळून येते. जनसामान्यांच्या संवेदनांना व भावनांना हात घालण्याचे सामर्थ्य त्यांच्या भाषणात दिसून येते. 

खरे तर सामान्य माणूस अशा प्रकारचे विचार रस्त्यावर, बसस्टँडवर, रेल्वेत आपापसांत चर्चा करताना सातत्याने मांडत असतो. परंतु त्याच्या या विचारांना आवाज नसतो. किंवा त्यासाठी आवश्यक असणारे व्यासपीठही उपलब्ध नसते आणि अशावेळी एखादे बाळासाहेब तसेच विचार परखडपणे व जाहीरपणे मांडतात तेव्हा सामान्य माणूस रोमांचित होतो. आपल्या विचारांना कोणीतरी जाहीरपणे वाचा फोडतो किंवा आपल्या मनातीलच भावना कोणीतरी बोलून दाखवितो, ही बाब सामान्य माणसाच्या दृष्टीने उत्साहाची व आनंदाची असते. आपण जे जाहीरपणे बोलू शकत नाही किंवा करू शकत नाही, ते आपल्यातीलच एकजण करतो, ही किती रोमांचकारक गोष्ट आहे, हे सांगणे नकोच. आणि यातूनच सामान्य माणूस बाळासाहेबांना आपल्या हृदयसिंहासनावर विराजित करतो. यातच बाळासाहेबांच्या अफाट लोकप्रियतेचे रहस्य दडलेले आहे, असे मला वाटते. 

बाळासाहेबांचे नेतृत्व मात्र आदर्श निकषांवर टिकत नाही. लोकमताला वळण देण्याऐवजी लोकमताच्या लोटेवर स्वार होणे किंवा लोकभावनांना आपल्याला हवे तसे वळण देणे, हेच बाळासाहेबांच्या नेतृत्वाचे सार आहे. बाळासाहेबांच्या या नेतृत्वाला शह देणारे असे नवीन नेतृत्व उदयाला येणे, ही काळाची गरज आहे. 

‘वरील विवेचनावरून’ बाळासाहेबांच्या नेतृत्वाला सकारात्मक अर्थ नाहीच काय ? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. या प्रश्नाचे उत्तर ‘या नेतृत्वाला काही एक सकारात्मक अर्थ आहे, असेच द्यावे लागेल, प्रतिष्ठित असा मराठा समाज व दलित वर्ग यांच्यामध्ये पसरलेल्या संपूर्ण बहुजन समाजाला राजकीय दृष्ट्या जागृत करण्याचे फार मोठे काम बाळासाहेबांच्या नेतृत्वाने केलेले आहे. या बहुजन समाजात मराठा समाजातील उपेक्षित वर्गाचाही समावेश होतो. या लक्षणीय राजकीय परिवर्तनाची म्हणावी तशी दखल तज्ज्ञांनी घेतल्याचे दिसत नाही. परंतु अशा तऱ्हेचे परिवर्तन घडवून आणणे, असा बाळासाहेबांचा उद्देश होता, असे निर्विवादपणे म्हणता येणार नाही, त्याचप्रमाणे ही राजकीय जागृती त्यांच्या लोकप्रियतेचे खरे कारण आहे, असेही सांगता येणार नाही. तथापि राजकीय दृष्ट्या जागृत झालेला हा समाजखंड बाळासाहेबांच्या लोकप्रियतेत फार मोठी भर टाकतो, यात मात्र संशय नाही. 1101, बी-1/रेखा, कोरस टॉवर्स, वर्तक नगर, ठाणे (पश्चिम) 400 600 

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.