‘पुरोगामी’ मुस्लिम विचारवंतांचा ‘बुद्धिवाद’. 

रफीक झकेरिया, ए. जी. नूराणी आणि असघर अली इंजिनियर हे तिघेही पुरोगामी मुस्लिम विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत. या लेखात गेल्या काही वर्षांत प्रकाशित झालेल्या त्यांच्या प्रत्येकी एका पुस्तकाचा परामर्श घ्यायचा आहे. झकेरिया यांचे ‘कम्यूनल रेज इन सेक्युलर इंडिया’ (पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, 2002) नूराणी यांचे ‘इस्लाम अँड जिहाद’ (लेफ्ट वर्ड, नवी दिल्ली, 2002) आणि इंजिनियर यांचे रॅशनल अॅप्रोच टु इस्लाम’ (ग्यान पब्लिशिंग हाऊस, नवी दिल्ली, 2001) ही ती पुस्तके होत. 

या तीन्ही पुस्तकांत इस्लामचे स्वरूप स्पष्ट करण्यात आलेले आहे. सर्व लेखकांची त्या स्वरूपाबद्दल एकवाक्यता आहे. ते स्वरूप कसे आहे, तर इस्लाम हा शांततेचा धर्म आहे हे तर खरेच आहे पण त्याशिवाय तो आणखी बराच काही आहे. इस्लामविषयी सामान्यपणे जे आक्षेप घेतले जातात त्यांचाही प्रतिवाद हे सर्व लेखक करतात. 

इस्लाम ‘आणखी बरेच काही आहे असे जे वर म्हटले त्याचा अर्थ असा धर्मनिरपेक्षता, बहुविधता, धर्मस्वातंत्र्य, लोकशाही, समाजवाद इत्यादी सर्व आधुनिक मूल्ये इस्लाममध्ये अंतर्हित आहेत असा या सर्व लेखकांचा दावा आहे. ही भूमिका प्रत्येक लेखक मांडीत असला तरी इंजिनियर अधिक विस्ताराने मांडतात एवढाच फरक. 

नूराणी आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ अनेक विद्वानांची अवतरणे देतात. “इस्लाम ही स्वातंत्र्य आणि लोकशाही यांची पूर्णत्वास पोचलेली व्यवस्था आहे” इति मौ. आझाद “प्राचीन इस्लाम म्हणजे एक गतिमान लोकशाही शक्ती आहे” इति कमरुद्दिन खान. नूराणींचे स्वतःचे मत ते पुढील शब्दांत व्यक्त करतात: “समता, सामाजिक न्याय, व्यक्तिस्वातंत्र्य, अन्यायग्रस्तांची मुक्तता आणि स्त्रीपुरुष समानता हे इस्लामने रंगवलेले समाजचित्र आहे”: “अन्यायग्रस्तांची मुक्तता ही संकल्पना इस्लामध्ये विशेष रेखीवपणे व्याख्यित केलेली आहे.” झकेरियांचे मत असे आहे की “इस्लामचे मुळातले खरे स्वरूप” पाहिले तर लक्षात येते की, आपल्या अनुयायांना सारखे प्रगतीच्या मार्गावर जाण्याची प्ररेणा तो देतो, परागतीच्या नव्हे. सर सय्यद अहमद आणि अल्लामा इकबाल यांचा संदर्भ देताना ते म्हणतात: “कुराणाचा जीवनविषयक दृष्टिकोन मुख्यतः गतिशील आहे आणि प्रत्येक पिढीने भूतकाळाच्या ओझ्याखाली न राहता आपला मार्ग आपणच शोधून काढावा अशी शिकवण तो देतो, असे या दोन्ही सुधारकांचे मत होते. 

या लेखात या मतांचा प्रतिवाद करणे हे माझे उद्दिष्ट नाही. या लेखकांच्या इस्लामवरील भाष्यांबद्दल मला काही म्हणायचे नाही. त्यांचा आपल्या विषयाकडे पाहण्याचा जो सर्वसामान्य दृष्टिकोण आहे त्याबद्दलच मी माझे मत नोंदवू इच्छितो आणि त्याबद्दल मला पडणारे प्रश्न मांडू इच्छितो. 

प्रथमदर्शनीच ध्यानात येणारी गोष्ट म्हणजे हे तीन्ही लेखक इस्लामच्या धर्मग्रंथांपासून बाजूला सरायला तयार नाहीत. त्यांच्या दृष्टीने ते अतिशय पवित्र आणि अनुलंघनीय आहेत. 

झकेरियांना मुसलमानांमध्ये बदल व्हायला हवा आहे पण कुराणाच्या चौकटीत ते म्हणतात, “आपल्या वैयक्तिक कायद्यांत काही अत्यंत गरजेचे बदल करण्यास मुसलमानांनी तयार असले पाहिजे, मात्र कुराणाची आज्ञा न उल्लंघिता.” “विवाह, घटस्फोट इत्यादीविषयक कायद्यांमध्ये दुरुस्त्या करण्याला शारियामध्ये पुरेसा वाव आहे” (शरिया म्हणजे इस्लामी कायदा.) जिना यांनी वंदे मातरम हे गीत मातृभूमीला प्रणिपात करायला सांगते म्हणून ते इस्लामविरोधी आहे असे विधान केले होते; त्याचा प्रतिवाद करताना झकेरिया म्हणता: “जिना म्हणतात ते खरे नाही. मूळ संस्कृत शब्दाचा (वन्दे) अर्थ ‘मान झुकवणे’ असा आहे, प्रणिपात (साष्टांग नमस्कार) असा नाही.” वंदे मातरम हे गीत कुराणाच्या अनुज्ञेशिवाय म्हणता कामा नये याबाबत जिनांप्रमाणे झकेरियांचाही आग्रह आहे हे यावरून स्पष्ट आहे! मात्र त्यांच्या मते कुराणाची या गीताला अनुज्ञा असली तरी मुसलमानांना त्यांचा सल्ला वेगळा आहे; “ज्या मुसलमानांना ते म्हणायचे नाही त्यांनी म्हणू नये; पण ते म्हटले जात असताना त्यांनी उभे मात्र राहिले पाहिजे. “झकेरिया यांच्या मते जर खरोखरीच कुराणाची अनुज्ञा असेल तर ते गीत न म्हणण्याची सवलत कशासाठी? ” मान झुकवा” असा उपदेशही ते आपल्या धर्मबांधवांना करीत नाहीत हेही लक्षात घेण्यासारखे आहे. वारसा हक्काबद्दल इस्लामी धर्मशास्त्राचे जे निर्बंध आहेत त्यांबद्दलही त्यांना शास्त्रवचन प्रमाण आहे. ते म्हणतात, “महत्वाचे बदल करणे अशक्य आहे (कुराणविरोधी म्हणून?) शिवाय तसे बदल करण्याची गरजही नाही कारण वारसा हक्काबद्दलचा इस्लामी कायदा पूर्णपणे प्रागतिक आहे” वारसा हक्कांत बदल करण्याची गरज भासली तरी’… असं ते पुढे म्हणतात. झकेरियांना गरज वाटते की नाही, असा प्रश्न मनात येऊन वाचक बुचकळ्यात पडतो. असो. गरज भासली तरी तो का करू नये याची कारणमीमांसा करताना झकेरिया जे तर्कशास्त्र वापरतात ते गमतीदार आहे; “मी एकदा इंदिरा गांधी यांना म्हटले होते त्याप्रमाणे, 95 टक्के मुसलमान कंगाल (पॉपर) म्हणूनच मरत असताना वारसा हक्काची उठाठेव कशासाठी करायची? उरलेल्या 5 टक्क्यांना त्यांच्या मालमत्तेची वाटणी जशी करायची तशी करू द्या. त्यासाठी कुराणाच्या आज्ञेचे उल्लंघन करायला त्यांना कशाला सांगायचे?” 

नूराणीही “धर्मग्रंथांच्या मूळ संहितेकडे वळायला पाहिजे” अशा अर्थाची पंडितांची मते उदधृत करतात. उदा. “इस्लामचे म्हणजेच कुराणाचे व पैगंबर महंमदाचे जे मुळातले मुख्य प्रतिपाद्य आहे त्याचे पुनरुज्जीवन केले पाहिजे: नवे पाखंड नको. “नूराणींचे स्वतःचे मत तेच आहे. “इस्लामचा जो सारभूत भाग आहे तो आत्मसात केला पाहिजे.’ 

एकूण वचनात् प्रवृत्तिः, वचनात् निवृत्तिः” अशी या लेखकांची प्रतिज्ञा आहे. यावर माझे म्हणणे असे की बायबल काय, वेद काय किंवा कुराण काय, कोणताही धर्मग्रंथ आधुनिक जगाच्या गरजा भागवण्यास समर्थ असणार नाही आणि तो आधुनिक मूल्यांचा पुरस्कार करतो असे म्हणता येणार नाही. तसा दावा करणे अनैतिहासिक तर आहेच पण सामान्य बुद्धीलाही पटणारे नाही. तुम्ही आम्ही आज जी मूल्ये- व्यक्तिस्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय इ.- आधुनिक आणि इष्ट म्हणून मानतो (आणि जी या तिन्ही लेखकांना प्रिय आहेत असे त्यांच्या लेखनावरून दिसते) ती मूल्ये नंतरच्या काळात जन्म पावलेली आणि शेकडो वर्षांवर विकसित झाली आहेत. उलट धर्मग्रंथ ज्या देशांत, ज्या काळांत आणि ज्या वातावरणात निर्माण झाले त्यांचा परिणाम त्यांच्यावर झाला असणे अपरिहार्यच समजले पाहिजे. याचे कारण असे की, धर्मग्रंथ या मानवी कृती असतात आणि मानव सर्वज्ञ नसतो. 

पण हेच या तिन्ही लेखकांना मान्य नाही. त्यांच्या मते इस्लामी धर्मग्रंथ ‘परमेश्वराचे शब्द आहेत. 

अशा रीतीने कडवे धर्मनिष्ठ मुसलमान आणि हे ‘पुरोगामी’ मुस्लिम विचारवंत मुळात एकाच जातकुळीचे आहेत असे म्हणावे लागते. फरक इतकाच की परमेश्वरी शब्दांचे ते करीत असलेले अर्थ भिन्न आहेत. 

येथे संवादच खुंटतो. किंबहुना तो सुरूच होत नाही. 

तरीसुद्धा काही प्रश्न उपस्थित करणे भाग आहे कारण सर्वच लेखक आपण ‘बुद्धिवादा’ची कास धरीत आहोत असा दावा करीत आहेत. तुम्हा आम्हांप्रमाणेच त्यांच्यावरही पाश्चिमात्य उदारमतवादी संस्कार झाले आहेत; म्हणून त्यांनी बुद्धिवादी असणे अत्यंत स्वाभाविक आहे. प्रश्न एवढाच की त्यांची कुराणनिष्ठा आणि त्यांचा बुद्धिवाद यांची संगती कशी लावायची ? त्यासाठी त्यांच्या बुद्धिवादाची जात तपासून पाहणे अगत्याचे आहे. 

बुद्धिवादावरचा (‘रीझन’ वरचा) त्यांचा आग्रह स्पष्ट आहे. “नव्या दृष्टीतून (धर्मग्रंथांचे) पुनर्वाचन केले पाहिजे;” “इस्लामी तत्त्वांचे आधुनिकीकरण केले पाहिजे. ” अशी अधिकारी व्यक्तींची मते नूराणी उद्धृत करतात. त्यात एक शबीर अख्तार आहेत. त्यांचा हेतू असा आहे की, “मुसलमानांनी चिंतनशील झाले पाहिजे, ऐहिक बुद्धीच्या न्यायालयासमोर धैर्याने आणि सदसद्विवेकाने उभे राहण्याइतपत बौद्धिक प्रामाणिकपणा त्यांनी अंगीकारला पाहिजे.” मात्र या सर्व पंडितांना मानवी बुद्धीचा वापर हवा आहे तो धर्मश्रद्धा बळकट करण्यासाठी. हेच अख्तार पुढे म्हणतात की बुद्धिवादाचे उपयोजन ‘श्रद्धेच्या मर्यादित’ केले पाहिजे; त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नांचे वर्णन त्यांनी ‘श्रद्धायुक्त संशयवाद’ (रेव्हरंट स्केप्टिसिझम) असे केले आहे. त्याचा अर्थ काय तो एक परमेश्वरच जाणे. 

इंजीनियर ‘चिकित्सक बुद्धीला कमी लेखणाऱ्या’ ‘सनातनी’ मुस्लिमांवर शस्त्र उगारतात मात्र चिकित्सक बुद्धीचे मार्गदर्शन ते स्वतः पूर्णपणे घेतात असे दिसत नाही. किंबहुना ते प्रांजलपणे असे सांगतात की आपण धर्मग्रंथांकडूनही मार्गदर्शन घेतो. ‘माझी ‘श्रद्धा’ (व्हॉट आय बिलीव्ह) या शीर्षकाच्या एका प्रकरणात त्यांनी आपल्या आध्यात्मिक प्रवासाची हकीकत वर्णन केली आहे. त्यात ते म्हणतात की इस्लामचे धार्मिक वाङ्मय वाचल्यानंतर त्यांना जीवन आणि जीवनाचा अर्थ यांबद्दल नवी दृष्टी प्राप्त झाली. पुढे ते म्हणतात: ” मी अशा निष्कर्षाला आलो की मानवाच्या वैचारिक विकासासाठी तार्किक बुद्धी अत्यंत आवश्यक आहे पण ती पुरेशी नाही. आंतरिक विकासासाठी आणि मार्ग दाखविण्यासाठी ईश्वरी शब्द हे महत्त्वाचे स्फुरण आहे. बुद्धीला कुणालाही दिसतील अशा मर्यादा आहेत. आणि जीवनाचा शेवटी अर्थ काय आणि त्याची दिशा कोणती असावी अशा सनातन प्रश्नांचे उत्तर ती देऊ शकत नाही. माझी अशीही खात्री झाली की ईश्वरी शब्द आणि मानवी बुद्धी यांत अनेक लोक समजतात तसा विरोध नाही. ईश्वरी शब्द बुद्धीच्या जाणवलेल्या सत्याला खोटे पाडीत नाही. 

ईश्वरी शब्दाचा प्रांत हा ‘स्पिरीट’ चा प्रांत आहे असे इंजीनियर म्हणतात. ‘स्पिरिट’ ला ‘अध्यात्म’ असे आपण म्हणू या. तर हे अध्यात्म म्हणजे काय आहे? इंजीनियर म्हणतात : “मानवी कल्याणासाठी केलेली कोणतीही कृती ही आध्यात्मिक कृतीच असते.” ही आध्यात्मिक वृत्ती आपणाला परमेश्वरी शब्द आणि तो ज्यात व्यक्त झाला आहे ते इस्लामी धार्मिक वाङ्मय यांतून प्राप्त झाली आणि मग पंथनिष्ठाविरोध, वर्चस्ववादाला विरोध, करुणा, सामाजिक न्यायाची भावना, अहिंसा, संस्कृतिवैविध्याविषयी आदर, सर्व धर्म मुळात सारखेच आहेत अशी समज, विविध धर्मांविषयी उदार दृष्टिकोण इत्यादी गुणांचा आपणात प्रादुर्भाव झाला असे त्यांनी पुढे म्हटले आहे. आणि अखेरीस ते कुराणाला शरण गेले आहेत. या प्रकरणाची अखेरची वाक्ये अशी आहेत: “अल्ला हा सर्व विश्वाचा धारणकर्ता आहे असे कुराण सांगते. म्हणून त्याच्या (अल्लाच्या) निर्मितीचे अभंगत्व टिकवून धरण्यासाठी विनम्रपणे त्याची इच्छा शिरोधार्य मानणे आणि त्याचा नम्र सेवक होणे हे आपले कर्तव्य आहे” (इं.259) 

खरे म्हणजे नैतिक विकासाला परमेश्वर, धर्म इत्यादींची काही गरज नाही कारण अनेक नास्तिक माणसे नीतिमान असल्याचे दिसून येते. पण नीतिमूल्यांचा प्रांत हा बुद्धीचा प्रांत नाही हे इंजीनियर यांचे म्हणणे मान्य करता येईल. त्यामुळे नैतिक गुणांची शिकवण त्यांना धर्मग्रंथातून मिळाली असेल तर आपणांला तक्रार करण्याचे कारण नाही. तेवढी सवलत त्यांना आपण देऊ या. 

पण तसे केल्यावर काही महत्वाचे प्रश्न उभे राहतात. सर्व धर्म समान आहेत असा साक्षात्कार जर इंजीनियर यांना झाला असेल तर केवळ कुराणातूनच त्यांनी नैतिक प्रेरणा का घ्याव्या हे कळत नाही. (‘आपले कर्तव्य’ असे म्हणताना ‘आपले’ हा शब्द ‘सर्व मानवजातीचे’ अशा अर्थाने त्यांनी वापरला नसून ‘स्वतःचें’ या अर्थी वापरला आहे असे मी समजतो.) 

पुढचा मुद्दा असा की ज्याला ‘धर्म’ असे म्हणतात त्यात केवळ नैतिक नियम नसतात, किंवा केवळ अध्यात्म नसते. तो सर्व जीवनाला गवसणी घालतो आणि प्रत्येक धर्माचा हा मोठा भाग असतो, लग्र केव्हा करावे, कुणाशी करावे, दत्तक घ्यावा की नाही, स्पर्शास्पर्श उच्चनीचता मानावी की नाही, पैतृक संपत्तीची वाटणी कशी करावी, स्त्रीचा दर्जा काय असावा इत्यादी शेकडो गोष्टींबद्दल धर्माचे काही ना काही म्हणणे असते. शिवाय आचारधर्मही असतो. प्रार्थना किती वेळा करावी, कोणत्या दिशेला तोंड करावे, चालताना पहिले पाऊल डावे की उजवे टाकावे, मूर्तिपूजा असावी की नसावी अशा अनेक गोष्टीविषयी धर्माचे आदेश असतात. शिवाय धर्मात काही तथ्यांचा किंवा तथ्य म्हणून भासणाऱ्या गोष्टींचा अनुषंगाने केलेला उल्लेख असतो. आता धर्मग्रंथांमधला नैतिक भाग इंजीनियरांना श्रद्धेने स्वीकारण्याचे कारण काय? धर्माचा नीत्युपदेशाचा भाग पवित्र आणि अपरिवर्तनीय पण इतर भाग परिवर्तनीय, असे का समजू नये? पण इंजीनियर हा फरक करीत नाहीत आणि संपूर्ण कुराणापुढे शरणागती पत्करतात, संपूर्ण कुराणच परमेश्वरी शब्द आणि म्हणून अनुल्लंघनीय समजतात. हा बुद्धिवाद नव्हे, याचे खरे नाव बुद्धिवादाला तिलांजली किंवा (अंध) श्रद्धेचा स्वीकार असे आहे. 

त्यांनी मानवी बुद्धीचा पूर्णपणे वापर केला असता तर धर्मग्रंथांतून आदेशिलेल्या कित्येक आचारांचा उच्च प्रकारच्या सार्वत्रिक नीतीशी काही संबंध नाही आणि धर्मग्रंथांच्या काळात जी तथ्ये किंवा सत्ये म्हणून भासत होती त्यांना विज्ञानाने असिद्ध ठरवले आहे, असे त्यांच्या लक्षात आले असते. किंबहुना त्यांच्या ते लक्षात आलेच असणार असाही संशय येण्यास जागा आहे; कारण ते उच्चशिक्षित आहेत. असे असूनही संपूर्ण धर्मग्रंथ हा ईश्वर शब्दच आहे असे ते का समजतात हे कळत नाही. 

मग या सर्व लेखकांनी बुद्धीचा निकष वापरला, या त्यांच्या दाव्याचा अर्थ काय करावा? शंका अशी येते आणि भीती अशी वाटते की त्यांनी बहुधा आधुनिक काळाला सुसंगत असा अर्थ धर्मग्रंथातून काढण्यासाठी ‘चतुराई’चा उपयोग केला असावा. पण चतुराई म्हणजे बुद्धिवाद नव्हे. 

या त्यांच्या भूमिकेचे तीनही लेखकांच्या लेखनावर काही परिणाम झाल्याचे दिसते. 

1) जसे इस्लामचे समर्थक वाङ्मय आहे असे इस्लामच्या त्रुटी दाखवणारेही वाड्मय आहे आणि ते सर्व बिगरमुस्लिमांनी लिहिले आहे असेही नाही. दोन ग्रंथलेखकांचा येथे उल्लेख करतो. ‘मी मुसलमान का नाही?” या शीर्षकाचे पुस्तक इब्न वर्राक यांनी 1995 साली प्रसिद्ध केले. कार्डिफचे अन्वर शेख’ गेली कित्येक वर्षे इस्लामवर वेगळ्या प्रकारचे भाष्य करीत आहेत. अशा टीकांना युक्तिवादपूर्वक उत्तरे देण्याच्या फंदात हे कुणीही लेखक पडत नाहीत. टीकाकारांशी ते वाद घालताना किंवा चर्चा करताना दिसत नाहीत. 

2) सर्व लेखकांना हे मान्य आहे की केवळ इस्लामच्या शत्रूंनी इस्लामचे विकृत स्वरूप रंगविलेले आहे असे नसून मुसलमानही या पापाचे धनी आहेत. नूराणी म्हणतात, “इतरांप्रमाणेच मुसलमानांनीही जिहादचा अर्थ जिहादचा अर्थ युद्ध असा केला आहे.” जिहादवर अनेक वेळा “मुसलमानांनी त्याप्रमाणेच बिगरमुसलमानांनी विकृत भाष्य केले आहे.” “चिराग अली यांनी दाखविले आहे की काही मुस्लिम भाष्यकारांनी मुसलमानांची आणि मुसलमानेतरांची दिशाभूल केली आहे.” इंजीनियरही तेच म्हणतात: “मुसलमान आणि मुसलमानेतर या दोघांनीही जिहादची संकल्पना समजावून घेतली नाही. “झकेरिया म्हणतात, “काही मुस्लिम गटांनी आपले हितसंबंध जपण्यासाठी जिहादच्या संकल्पनेचा हेतुपूर्वक गैरवापर केला आहे. “अशा गैरसमजुतींना मुसलमानही काही कमी जबाबदार नाहीत.” “काही आयतींचे एका बाजूने कडव्या मुसलमानांनी तर दुसऱ्या बाजूने इस्लामच्या शत्रूंनी विकृतीकरण केले आहे. “काही मुस्लिम राज्यकर्त्यांनी कुराणाच्या आज्ञा धुडकावून लावून हिंदूंवर अत्याचार केले आहेत.” “आज मुसलमानांनीच इस्लामचे विकृत स्वरूप लोकांपुढे मांडले आहे आणि इस्लामच्या भक्तांनीच त्यांची उदात्त तत्त्वे झिडकारली आहेत. ” 

एकाच इस्लाममधून इतके ध्रुवभिन्न अर्थ मुसलमानच कसे काढू शकतात याचे वाचकाला आश्चर्य वाटत रहिते आणि त्याचा निरास करण्याचा प्रयत्नही आपले ग्रंथलेखक करीत नाहीत. 

तीन-तीनही लेखक इस्लामी जगतातील सामाजिक परिस्थिती कशी दुरवस्थेची आहे याचे वर्णन करतात. ‘ऑनर किलिंग्ज’ आणि ‘कुराणाशी विवाह’ या ग्रंथांच्या संदर्भात इंजीनियर म्हणतात: “असे खून आणि अशी लग्ने यांना इस्लामी कायद्याची अनुमती नसूनही अनेक मुस्लिम देशात अशा प्रथा सरसकट चालू आहेत. त्या इस्लामच्या आज्ञा उल्लंघिणाऱ्या असल्या तरी धर्मपंडित (उलेमा) मात्र त्या बाबतीत मूग गिळून बसतात किंवा त्यांना पाठिंबा देतात.” “सौदी अरेबियासारखे काही देश धर्मनिरपेक्षता हे पाप (हराम) आहे असे समजतात आणि धर्मनिरपेक्ष देशांना इस्लामचे शत्रू समजतात.” “जमात इ-इस्लामीचे संस्थापक मौ. मौदुदी म्हणाले की धर्मनिरपेक्ष राज्यसंस्था हराम आहे आमि जे धर्मनिरपेक्ष राजकारणात भाग घेतात ते इस्लामविरुद्ध बंडखोरी करणारे आणि अल्लाच्या प्रेषिताचे शत्रू आहेत.” “नागरी समाज (सिव्हिल सोसायटी) ही संकल्पना अजून इस्लामी जगाने समजावून घेतलेली नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. बहुसंख्य मुस्लिम देशांमध्ये लोकशाही नाही आणि मानवी हक्कांचा मान राखला जात नाही. किंबहुना मानवी हक्क ही पाश्चात्य आणि गैरइस्लामी संकल्पना आहे अशी तीवर टीका करून इस्लामी राज्यकर्ते ती झिडकारतात. ” (इं. 147) “बहुसंख्य मुस्लिम देश कुराण आणि सुन्ना यांमध्ये तर्भूत असलेल्या बहुविधता (प्लूरॅलिझम) या तत्त्वाचा मान राखत नाहीत. 

हे असे का होते याबद्दल वाचक बुचकळ्यात पडतो. त्याला प्रश्न असा पडतो की इस्लामी धर्मग्रंथांतून गेली तेरा-चौदा शतके व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही, मानवाधिकार, धर्मनिरपेक्षता, शांती, सहिष्णुता, बहुविधता, सामाजिक न्याय इत्यादी तत्त्वांचा उद्घोष अखंडपणे चाललेला असूनही बहुसंख्य मुस्लिम देशांमध्य अशी अनवस्था का असावी? तीनही लेखकांच्या विवेचनातून या प्रश्नाला उत्तर मिळत नाही. 

याचे मुळात कारण ते कठोर बुद्धिवादी निकष लावून धर्मग्रंथांची तपासणी करीत नाहीत. खरा बुद्धिवादी तो की जो मानवी बुद्धी हे आपल्याभोवतीचे जग समजावून घेण्याचे आणि त्याचे परीक्षण करण्याचे एकमात्र हत्यार आहे असे समजतो. या अर्थाने हे सर्व लेखक, त्यांचा काहीही दावा असला तरी, बुद्धिवादी नाहीत असे म्हणावे लागते. पुरोगामी मुस्लिम विचारवंत बुद्धिवादी नजरेने इस्लामकडे पाहतील तरच त्यांच्या शब्दांना वजन लाभेल. 

टिपा: * ‘इस्लाम इन ए बिनाइन लाइट’ या इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली, फेब्रुवारी 21-27, 2004 या अंकात प्रसिद्ध झालेल्या स्वतःच्या लेखाचा लेखकानेच केलेला अनुवाद, 1. Ibn Warraq, Why I am not a Muslim, Prometheus Books, New York. 1995. 

2. Anwar Shaikh. Islam : The Arab National Movement, Principality Publishers, Cardiff, Great Britain, 1995: This is Jehad. A. Ghosh, Houston, U.S.A., 1999 आणि इतर पुस्तके. 

3. खानदानाला धुडकावून कुणी विवाह केला तर त्याची हत्या करणे 

4. इस्लामी धर्मशास्त्राप्रमाणे स्त्रीला वडिलार्जित संपत्तीत वाटा मिळतो. कुटुंबातच मालमत्ता राहावी म्हणून मुलींची लग्ने जवळच्या नातेवाइकात लावून दिली जातात. हे नेहमीच शक्य होते असे नाही म्हणून मुलीचे ‘लग्न’ कुराणाशी लावून दिले जाते म्हणजे वास्तवात ती कुमारिकाच राहते. ( वर उल्लेखिलेला वर्राक यांचा ग्रंथ, पृ. 326) 

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.