राजकारण, प्रसारमाध्यमे आणि पैसा

आपल्यापैकी बऱ्याच जणांना अधूनमधून असा ‘भास’ होतो की प्रसारमाध्यमे ही केवळ श्रीमंत आणि सबळ लोकांच्या प्रचारकांसारखी वागतात. सर्वसामान्यांना माहिती पुरवण्याऐवजी माध्यमे काहीतरी ‘खपवत’ असतात, असा दृष्टिकोन ठेवल्यास त्यांची वर्तणूक जास्त नेमकेपणाने दिसते. 

[नोम चोम्स्की आणि एड्वर्ड एस. हर्मन ह्यांच्या प्रसारमाध्यमांबाबतच्या ‘मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट’ या ग्रंथाचा परिचय आजचा सुधारकच्या वाचकांना लवकरच करून दिला जाणार आहे. हा विषय महत्त्वाचा का आहे ते जाणून घेण्यासाठी तहलका प्रकरण आठवावे. 

काही बाबतीत तहलकाला समांतर असे एकोणीसशे सत्तरीतले अमेरिकेतले वॉटरगेट प्रकरण होते. आधी सरकारी कर्मचारी वापरून रिचर्ड निक्सनच्या रिपब्लिकन पक्षाने डेमोक्रॅटिक पक्षाच्या वॉटरगेट या इमारतीतल्या कार्यालयात छुपे मायक्रोफोन्स बसवायचा प्रयत्न केला. हे उघडकीला आल्यावर ते प्रकरण दडपून टाकण्यासाठी निक्सन प्रशासनाने बरीच कसरत केली. ती विफल ठरून निक्सनला राष्ट्राध्यक्षपद सोडावे लागले. या घटनांनंतर चोम्स्की- हर्मन यांना आलेला हा अनुभव आहे. सं.] 

वॉर्नर मॉड्युलर बुक्सचा प्रकाशक क्लॉड मॅक्कॅलेब याला 1973 साली वाटले की वॉटरगेट प्रकरण हे अमेरिकेच्या सर्वांगीण -हासाचे केवळ एक लक्षण आहे. यामुळे त्याने ही कल्पना तपासणारी पुस्तकांची एक मालिका प्रकाशित करायचे ठरवले. या मालिकेत एक ‘काऊंटर – रेव्होल्यूशनरी व्हायलन्स’ नावाचे नोम चोम्स्की आणि एडवर्ड एस. हर्मन यांचे एक छोटेखानी पुस्तक होते. त्याबद्दल असा उल्लेख आहे की अविकसित देशांमधील क्रांतिकारी चळवळींचे दमन करण्याच्या प्रयत्नात अमेरिका त्या देशातील लोकांविरुद्धच्या हिंसेचा प्रमुख स्रोत बनत आहे; हे त्या पुस्तकाचे मुख्य सूत्र होते. (‘द मीडिया मोनॉपोली, बेन. एच. बागडिकियन) 

जरा थांबून पात्रपरिचय करून घेऊ. वॉर्नर मॉड्युलर बुक्सची मालक कंपनी होती वॉर्नर पब्लिकेशन्स – जिचे अध्यक्ष होते विल्यम सॉनॉक, वॉर्नर कम्यूनिकेशन्स कंपनीचे कारखाने पश्चिम जर्मनीपासून ब्राझीलपर्यंत पसरले होते आणि कंपनी पुस्तके, चित्रपट, रेडिओ प्रसारण, व्हिडिओ गेम्स आणि रिचर्ड निक्सन या क्षेत्रात कार्यरत होती. 

वॉर्नर मॉड्युलर बुक्सच्या आगामी प्रकाशनांच्या जाहिरातपत्रकात ‘काऊंटर- रेव्होल्यूशनरी व्हायलन्स’ या पुस्तकाची जाहिरात पाहून सॉनॉक भडकले. त्यांनी मक्केलेबला तर भरपूर शिव्या दिल्याच, पण आगामी प्रकाशनांचे जाहिरातपत्रकही नष्ट करण्याचे आदेश दिले. पुस्तकाच्या छापील प्रतीही अर्थातच नष्ट केल्या गेल्या. 

राजकारण, प्रसारमाध्यमे आणि पैसा यांच्याशी लढताना भाषणस्वातंत्र्याचा विजय होण्याची सुतराम शक्यता नाही. [डेव्हिड कॉग्जवेल आणि पॉल गॉर्डन यांच्या चोम्स्की फॉर बिगिनर्स’ (ओरिएंट लॉंगमन, 1996 ) या पुस्तकातील हा उतारा. ‘मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट च्या परिचयाशिवाय चोम्स्कीच्या विचारांचा परिचय करून देणारे इतरही लेख प्रकाशित केले जाणार आहेत. सं.] 

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.