वाचकांचे लेखक व्हावे, यासाठी 

‘आजचा सुधारक’ने नेहेमीच असे मानले आहे की वाचकांचे लेखक होऊ शकतात व हा क्रम पुढे सल्लागार, संपादक वगैरेंपर्यंतही जाऊ शकतो. मी (नंदा खरे) असाच वाचक, पत्रलेखक करत कार्यकारी संपादक झालो आहे. 

पत्रे, चर्चा, लेख यांचे एकूण प्रमाण 63% सुमारे दोन-तृतीयांश आहे. संपादक व सहकारी 25% भाग व्यापतात. संपादक व सहकाऱ्यांचा भाग कमी होऊन वाचक-लेखकांचा भाग वाढावा, ही आमची नेहेमीचीच इच्छा आहे. 

पत्रांपैकी बरीचशी चर्चेत भाग घेऊन खंडनमंडन करणारी असतात. हे आवश्यकच आहे, पण तेवढ्यावर पत्रलेखकांनी थांबू नये. नुसतेच खंडनमंडन बरेचदा अतिशय आग्रही, कधीमधी व्यक्तिगत पातळीला जाते. बरे, वाचकांना/पत्रलेखकांना ‘आपले’ वाटणारे विषय असणारच. त्या विषयांवर संयत, अभ्यासू मतप्रदर्शन करणारे लिखाणही बहुतेकांना जमते, असा अनुभव आहे. अशा लिखाणाचे स्वागतच असते. 

‘अमुक विषयावर कोणीच कसे लिहिले नाही?’ या प्रकारचे प्रश्न आम्हाला (मला तरी नक्कीच ‘दुखतात’, ‘आपण का लिहीत नाही?’ असा प्रतिप्रश्नही फारदा उर्मटपणाचा समजला जातो. प्रत्येकाचे अग्रक्रम वेगळे असतात पण आमचाच अग्रक्रम योग्य, असा आग्रह कोणी करू नये. आम्हीही ते टाळतोच. 

सोबतच्या आकडेवारीने ही भूमिका स्पष्ट होण्यास मदत होईल, या आशेने हे टिपण लिहीत आहे. 

1) अनुक्रमणिका, सूची, सूचना वगैरे वगळले आहे. 

2) ‘अर्धे पान’ हे कमीत कमी माप आहे. 

3) संपादक वसंपादक मंडळापैकी लोक यांनी अर्ध्या पानापेक्षा मोठी पत्रोत्तरे दिली असल्यास ती त्यांच्या त्यांच्या लेखनात धरली आहेत. 

(4) कोणत्याही मोठ्या चर्चेचा भाग नसलेले लेख सुटे मोजले आहेत, पण चर्चेतील लेख ‘पत्रे ‘व चर्चा’ यात धरले आहेत. 

5) पत्रांपैकी ‘वजनदार’ नग बरेचदा लेख म्हणून छापले जातात. यांसाठीही वरील चर्चा/ लेख फरक लागू केला आहे. 6) काही वर्गीकरणांबद्दल मतभेद संभवतात, पण त्याने प्रमाणांवर फारसा फरक पडणार नाही. 

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.