संपादकीय 

2,340,000,000,000 

नुकत्याच संपलेल्या निवडणूक नाट्यासोबत एक ‘आर्थिक’ उपकथानक घडले. 13 मे ला निकाल लागले आणि ‘डाव्यांच्या मदतीने कॉंग्रेसचे सरकार बनणार हे उघड झाले. 14 ते 16 मे या काळात काही डाव्या नेत्यांनी सरकारकडून त्यांना असलेल्या अपेक्षांविषयी काही विधाने केली. या विधानांनी म्हणे भारतीय अर्थव्यवस्थेचे ‘एंजिन’ असलेल्या शेअरबाजारात घबराट माजली. उद्योजक आणि अर्थतज्ज्ञांचे मनोबल खचले. त्यामुळे आर्थिक स्थितीचा निदेशक जो ‘सेन्सेक्स’, तो 17 मे रोजी गडगडला. एका दिवसात भारतीय कंपन्यांच्या भांडवलात सुमारे एक-षष्ठांशाची घसरण झाली. डाव्यांच्या अपरिपक्क अर्थशास्त्रामुळे किती प्रचंड नुकसान झाले, हे दाखवण्याची जणु वृत्तपत्रांमध्ये स्पर्धांच सुरू झाली. 

‘टाईम्स ऑफ इंडिया’ने आपल्या नावाला (masthead) लाल पार्श्वभूमी देऊन खाली नखरेल लिपीत आठ कॉलमी मथळ्यात, 2, 340 अब्जांचा नुकसानीचा (रुपयांमधील) आकडा नोंदला. त्याही खाली पुन्हा आठ कॉलमांमध्ये ‘ग्राऊंड झीरों’ असा मथळा दिला हा शब्दप्रयोग अणुबाँब पडतो त्या जागेसाठी वापरतात. टाईम्सचे भावंड द इकॉनॉमिक टाईम्स. त्याच्या नावाला सन 2004 मधील सेन्सेक्सच्या चढउतारांची आणि राष्ट्रीय घडामोडींच्या आलेखाची पार्श्वभूमी होती. खाली आठ कॉलमांत ‘तेजीचे पुरस्कर्ते ‘मे-डे’ (Mayday विमाने दुर्घटनाग्रस्त होताना पाठवण्याचा हा संदेश) ओरडत दलाल स्ट्रीटवरून पळाले’ अशी बातमी होती. 17 आणि 18 मे रोजी अनेक शहाणीसुर्ती माणसे सुतकी चेहऱ्यांनी नव्या सरकारच्या नुसत्या नावाने इतका तोटा आला, तर सरकारच्या कामाने काय होईल, अशा चिंतेत वावरत होती. ‘इंडियन एक्स्प्रेस’ ने डाव्यांना ‘अर्थशास्त्राचे धडे शिकवणे बंद करा’, असा सल्ला दिला. 

पण नवे पंतप्रधान मागे अर्थमंत्री असताना म्हणाले होते, “शेअरबाजाराच्या चढउताराने माझी झोप चाळवत नाही.” आता तेच पंतप्रधान होण्याच्या घोषणेने पाव भाग नुकसान नफ्यात बदलले! नवे अर्थमंत्री जाहीर झाल्यावरही असाच नफा उद्भवला! 

सामान्य माणसे या प्रचंड आकड्यांना, त्यासोबतच्या अगम्य तांत्रिक परिभाषेला, शेअरबाजाराभोवतीच्या काहीशा गूढ वलयाला घाबरतात. सेन्सेक्स ‘चढला’ की अर्थव्यवस्था सुधारली, तो ‘पडला’ की सत्यानाश झाला- असे समजू लागतात. 

पण 17 मे रोजी सगळे जण नेहमीसारखेच कामे करत होते. दुकानातल्या वस्तूंच्या किंमतीही 16 मे किंवा 18 मे ला होत्या तशाच होत्या. सध्या तरी पाऊस वेळेवर (किंवा वेळेआधीच) आणि नेहमीसारखाच येणार, अशी अपेक्षा आहे. हिंदी चित्रपटांत बरेचदा नायक संतापून जो प्रश्न विचारतो, “तो फिर सच क्या है?” तो प्रश्न आपण विचारू या इंडियन एक्स्प्रेसचा सल्ला धुडकावून काही थोडे अर्थशास्त्र जाणून घ्यायचा प्रयत्न करुया. 

न जाणो, त्यातून काही ‘आर्थिक’ अंधश्रद्धांचे निर्मूलन होईल. 

उद्योगांसाठी भांडवल 

कोणत्याही उद्योगाला भांडवलाची गरज असते. अगदी शेतीलाही. एखादा उद्योग सुरू करू पाहणारा हे भांडवल केवळ स्वतःच्या ताकदीवर उभारू शकत नाही. मित्र, नातलग, अगदी टोकाच्या उदाहरणात ‘बायकोच्या बांगड्या, अशांच्या मदतीनेही फार तर लहान उद्योगांपुरते भांडवल उभारता येते. या मर्यादेपेक्षा मोठ्या उद्योगांना लागणारे भांडवल उभारायला अनेकांना अप्रत्यक्षपणे उद्योगात सामील करून घ्यावे लागते. 

उद्योजक मुळात कल्पक असतो, मेहनती असतो, त्याच्यापाशी कोणती तरी कौशल्येही असतात नसते ते पुरेसे भांडवल कर्ज उभारण्यालाही हीच मर्यादा असते, कारण कर्ज देणारा विचारतो “उद्योग बुडाला तर माझ्या पैशाचे काय?” साप्नकार कर्जाला ‘तारण’ मागत असतो आणि ज्याला भांडवल कमी पडत असते त्याच्यापाशी तारण म्हणून देण्यासारखेही फारसे नसते. 

यावर एक तोडगा म्हणजे एखाद्या श्रीमंत पण फार उद्यमशील नसलेल्या व्यक्तीला भागीदार करून घेणे. उद्योजकाची कौशल्ये आणि भागीदाराचा पैसा यातूनही बहुधा निम्न- मध्यम पातळीचेच उद्योग उभारता येतात. पण ही भागीदारी तोट्याच्या बाबतीत हळवी असते. धंदा तोट्यात गेला तर भागीदारही बुडू शकतो. 

यापुढच्या आकाराच्या उद्योगांसाठी भागीदारांची संख्या वाढवावी लागते. त्यांना असे कबूल करावे लागते की त्यांना पैसे द्यावे, नफ्यात वाटाही मिळेलच, पण तोटा आल्यास मात्र मुळात दिलेल्या पैशांव्यतिरिक्त कोणतीही जबाबदारी असणार नाही, म्हणजे एकदा पैसे दिले की ते फारतर परत मिळणार नाहीत, आणि झाला तर नफाच होईल. अशा मर्यादित जबाबदारीच्या यंत्रणेला अर्थातच ‘मर्यादित जबाबदारीची संस्था’ किंवा ‘लिमिटेड लायेबिलिटी कंपनी’ म्हणतात. अनेक कंपन्यांच्या नावांमध्ये जे ‘लि.’ किंवा ‘Lid.’ असे नोंदलेले असते, ते अशी मर्यादा दाखवते. 

अशा कंपन्यांच्या भागीदारांना ‘भागधारक’ म्हणतात. त्यांनी दिलेल्या पैशाच्या मोबदल्यात त्यांना एक प्रमाणपत्र दिले जाते, की त्यांनी अमुक पैसे दिले आहेत आणि त्यांचा अमुक नफ्यावर हक्क आहे, पण तोटा मात्र दिलेल्या पैशांपेक्षा वाढणार नाही. हा कागद म्हणजे ‘शेअर सर्टिफिकेट’ किंवा नुसताच ‘शेअर’ 

मोठे, प्रस्थापित उद्योगही अधूनमधून अशी प्रमाणपत्रे देऊन ज्यादा भांडवल उभारतात. कंपनीला बराच फायदा अपेक्षित असला तर शेअर्स सहजपणे खपतात आणि पुढे त्या शेअर्सनाही इतर मालमत्तेसारखे मूल्य असते. 

आता भागधारकांचे दोन प्रकार पडतात. एका गटाला केवळ कंपनीच्या नफ्यात वाटा हवा असतो तोट्याची जबाबदारी नसतेच. दुसऱ्या गटाला मात्र कंपनीचा विकास कसा होईल याचा अंदाज घेऊन जमल्यास शेअर्सची खरेदीविक्री करायची असते. संभाव्य नफा बराच असला तर शेअर्स मुळात दिलेल्या पैशापेक्षा जास्त भावाने विकता येतात. पण सारे अंदाजी, संभाव्यतेचे, स्पेक्युलेटिव्ह हिशोब असतात. अंदाज चुकायची शक्यता नेहेमीच असते, त्यामुळे या व्यवहाराला काहीसे जुगाराचे स्वरूप येते. 

नव्याने विक्रीला येणारे शेअर्स उद्योगांना भांडवल पुरवतात. जुने, प्रस्थापित शेअर्स मात्र मुख्य उद्योगाशी बरेचसे (खरे तर ‘पूर्णपणे’) असंबंद्ध असतात. तसल्या व्यवहारांपासून उद्योगांना काहीही मिळत नसते. 

पण शेअर्सबाबतचे दोन्ही प्रकारचे व्यवहार एकाच बाजारपेठेत घडतात. नव्याने विक्रीला येणाऱ्या शेअर्सचा व्यापार प्रायमरी’ ‘मार्केट’ म्हणून ओळखला जातो. नुसतेच जुन्या शेअर्सचे देणेघेणे म्हणजे ‘सेकंडरी मार्केट’ दोन्ही प्रकारचे व्यवहार एकाच शेअरमार्केटात होत असतात. 

नव्या कंपन्या, नवी भांडवल उभारणी, ही सठी सहामासी होत असते. जुन्या शेअरांमधली उलाढाल मात्र सतत सुरू असते. म्हणजे शेअरबाजाराचा बहुतेक व्यवहार हा अंदाजांवर बेतलेल्या स्पेक्युलेटिव्ह व्यापाराचा असतो — उद्योगांसाठीच्या भांडवल- उभारणीचा नसतो. 

हळूहळू बोंबला 

पण शेअरबाजाराचे व्यस्थापक, नियंत्रक वगैरे सारे वारंवार सांगत असतात की उद्योगांना भांडवल पुरवण्यासाठीच ‘आम्ही’ आहोत. आम्ही जर प्रस्थापित शेअरांची खरेदीविक्री केली नाही, तर नव्या भांडवल उभारणीच्या शेअरांनाही गिन्हाईक मिळणार नाही. 

‘मार्जिन ट्रेडिंग’ या शेअरबाजाराच्या एका तांत्रिक अंगाबद्दल जॉन केनेथ गॅलब्रेथ (अमेरिकेचा भारतातील माजी राजदूत आणि हार्वर्डचा अर्थतज्ज्ञ) जे लिहितो ते एकूण शेअरबाजारालाही लागू पडते. तो म्हणतो. (‘द ग्रेट क्रॅश 1929 पेलिकन, 1963, प्रथम 

प्रकाशन 1954) – 

हेतू असतो स्पेक्युलेशन सुलभ करण्याचा. पण हा हेतू जाहीर करता येत नाही. जर वॉल स्ट्रीटने हा हेतू कबूल केला तर हजारो नीतिवान स्त्रीपुरुष याला दुष्टावा मानून सुधारणांसाठी आग्रह धरतील. मग बचाव असा केला जातो की व्यवहाराला उत्तेजन देऊन रोगट आणि क्षीण बाजाराला सशक्त आणि दमदार करण्यासाठी हे आवश्यक आहे. एखाद्या सुंदर स्त्रीला मळके कपडे लेवून स्वतच्या पाककौशल्याची जाहिरात करावी लागावी, तसे हे आहे कारण तिचे खरे कौशल्य एखाद्या वेश्येचे आहे. ” 

सुधारणा, नियंत्रण, यांची स्पेक्युलेशनला, जुगाराला धास्ती असणारच. फेडरल रिझर्व या अमेरिकेच्या रिझर्व बँकेने एकदा सुधारणेचा प्रयत्न केला तेव्हा बँकेवर जे आरोप झाले, त्याबद्दलचे एक उदाहरण गॅलब्रेथ देतो, प्रिन्स्टन विद्यापीठातील जोसेफ लॉरेन्स या प्राध्यापकाचे हे म्हणणे- 

” (हे नियंत्रणाचे प्रयत्न) एका हेतूंच्या संघर्षातून घडत आहेत. श्रीमंत, सुसंस्कृत, स्थितिशील किनारपट्टीवरील लोक आणि दरिद्री, निरक्षर, मूलभूत बदल हवे असणारे अंतर्भागातील लोक यांच्यात नैतिक व बौद्धिक वैर असते. त्यातून हे प्रयत्न होतात. ” 

पण एवढ्यावर लॉरेन्स थांबत नाही. पुढे 

“ख्रिस्ताब्द 1929 साली वरकरणी हुषार सार्वजनिक व्यक्तींनी गावंढळ (Provin cial) अडाणीपणातून असल्या तीव्र भावनांना थारा देणे अकल्पनीय आहे- कर्मठ सनातनीपणा आणि चळवळ्या गावंढळपणातून या निर्दोष समूहावर (शेअरबाजारावर) नसते हेत्वारोप केले जातात.’ 

सत्य कटु असते हेच खरे! नाही तर हर्षद मेहताला ‘हिज म्याजेस्टी’ म्हणणाऱ्या ‘कम्यूनिटी’ ला निर्दोष म्हणण्याइतका तोल का जावा? 

सेन्सेक्स 

पण आज स्पेक्युलेटिव्ह शेअरबाजार हे वास्तव आहे. केवळ शेअर्स विकून विकत घेऊन जगणारे काही हजार लोक आहेत. ते ज्या शेअरांची उलाढाल करतात त्या कंपन्यांबद्दल ते माहिती गोळा करतात, यात नवल नाही. यातली काही माहिती कायद्यानेच भागधारकाला मिळत असते, तर काही मेहेनतीने कमवावी लागते. 

सोबतच या लोकांना एकूण शेअरबाजार कोणीकडे जात आहे याबाबतही कुतूहल असते. त्यांचे शेअर्स बऱ्याच अंशी इतर शेअरांसोबतच स्वस्त महाग होत असतात. यासाठी शेअरबाजाराच्या ‘तब्येती’चे काही निदेशक (indicators) घडवले गेले. ‘सेन्सेक्स’ उर्फ ‘बाँबे स्टॉक एक्स्चेंज सेन्सिटिव्ह इंडेक्स’ हा यांपैकी लोकप्रिय निदेशक आहे. कधीतरी 1980 च्या जरा आधी तीसेक कंपन्यांच्या (प्रस्थापित) एकूण शेअर्सची शेअरबाजारील किंमत काढली गेली, व तिला ‘शंभर’ मानले गेले. आज जर याच कंपन्यांच्या एकूण शेअर-किंमतीचा आकडा काढला, त्याला मूळ आकड्याच्या टक्केवारीत व्यक्त केले, तर येणारे उत्तर म्हणजे आजचा सेन्सेक्स, दोनच कंपन्यांच्या शेअर्सच्या उदाहरणातून हे स्पष्ट करू. 

कंपनी एकूण शेअर्स 1980 चा बाजारभाव  आजचा बाजारभाव 

अ  100  10  150 

ब  1000  10  125 

मुळात सेन्सेक्स घडवला तेव्हा अ, ब या कंपन्यांचे बाजारी भांडवल होते 11,000 (100 × 10 + 1000*10), आज ते आहे 1.40.000 (100×150 + 1000*125). म्हणजे आजचा सेन्सेक्स आहे. (1,40,000 * 100=11,000), सुमारे 1,273. आणि आजचे ‘बाजारी भांडवल आहे रु. 1,40,000/- (market capitalisation). 

इथे दोनतीन बाबी नोंदायला हव्यात. एक म्हणजेच सेन्सेक्स घडवताना हजारो कंपन्यांपैकी मूठभर कंपन्यांचाच विचार होतो आहे. सांख्यिकीच्या दृष्टीने हे अपुरे आहे, कारण निवडलेल्या कंपन्या ‘प्रातिनिधिक नाहीत, तर केवळ ज्यांच्यात बरीच चढउतार होते अशा आहेत. 

दुसरी बाब ही की ‘बाजारभाव’ हा कंपन्यांच्या स्थावर-जंगम संपत्तीशी निगडित नसतो, तर पूर्णपणे स्पेक्युलेटिव्ह असतो. म्हणजे शेअरबाजाराचा केवळ एक ऑफिस असलेल्या कंपनीवर विश्वास बसला तर शेअर किंमत वाढून बाजारी भांडवल आणि सेन्सेक्स वाढेल. उलट भरपूर संपत्ती असलेल्या कंपनीवरचा विश्वास उडला तर सेन्सेक्स कमी होईल. 

बाजारी भांडवलाचा खऱ्या संपत्तीशी थेट संबंध नाही. 

तिसरे म्हणजे इथे कृत्रिमपणे बाजारी किंमती पाडणे-चढवणे सहज शक्य आहे. आज मी माझ्याकडील एखादाच शेअर माझ्या एका मित्राला चढ्या किंवा पड्या भावाने विकला, तरी सेन्सेक्स चढेल किंवा पडेल. असे मूठभर शेअर्सच्या खोटारड्या खरेदीविक्रीने सेन्सेक्सवर परिणाम करता येतात, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. बहुतेक वेळी एखादी कंपनी नव्या भांडवल उभारणीआधी आपल्या शेअर्सच्या किंमती ‘चढवते’. पण याचा राजकारणासाठीही उपयोग केला जातो, हेही दिसत आहे. 

एकूण ‘बाजारी भांडवल’ आणि सेन्सेक्स यांना किती महत्त्व द्यायचे, हा जरा गूढ प्रश्न आहे. सातत्याने फार काळ शेअर किंमती खऱ्या संपत्तीपासून दूर ठेवता येत नाहीत. तात्कालिक विकृती मात्र उत्पन्न करता येतात. गंमत म्हणून तीन वर्षांमधील सरासरी सेन्सेक्स पाहू. 

वर्ष  सेन्सेक्स 

1990-91  1069 

1999-00  4655 

2004  5200 

यावरून दिसते की बाजारी भांडवल हे खरोखरीच वाढते आहे, चलनफुगवट्यापेक्षा वेगाने. पण हे आकडे प्रातिनिधिक नाहीत, खऱ्या मालमत्तेशी संबंधित नाहीत, कृत्रिमपणे विकृत केले जाऊ शकतात वगैरे, वगैरे. 

शेवटी 

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ए. बी. बर्धन म्हणे म्हणाले, “भाड मे जाय शेअरमार्केट” मनमोहनसिंगाच्या झोप चाळवण्याच्या वाक्यापेक्षा इथे फक्त सूर वेगळा आहे. अर्थशास्त्रीय ‘गाणे’ तेच आहे. त्याचे खरे शब्द आहेत “के खुशबू आ नही सकती/ कभी कागज के फूलों से.” 

आश्चर्य हेच की बहुतांश लोकांना एखादा नेता आला गेला कोणीतरी काहीतरी म्हणाले, येवढ्याशाने अर्थव्यवस्थेत प्रचंड बदल होतात असे वाटते कसे! 

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.