नॅशनॅलिझमबाबत टिपणे (भाग २) 

नॅशनॅलिझम्सचे समान गुणधर्म पाहिल्यावर त्यांची (इंग्लंडपुरती तरी) वर्गवारी करायला हवी. नॅशनॅलिझम्सचा प्रसार प्रचंड आहे आणि वर्गवारी सोपी नाही. त्यात भ्रम आणि द्वेषाचे असंख्य प्रकार आहेत, आणि त्यांचे परस्परसंबंध अत्यंत क्लिष्ट आहेत. जगातील काही टोकाचे दुष्टावे तर युरोपीय जातिवाद्यांपर्यंत पोचलेलेच नाहीत. पण मुख्यतः विचारवंत आणि दुय्यम विचारवंत म्हणून सामान्यांच्या नॅशनॅलिझम्स पाहू. 

सरकारी नॅशनॅलिझम

1) नव-टोरीवाद: (पारंपरिक टोरीवाद दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश बल आणि प्रभाव घटला आहे, हे कबूल करतो) नवे टोरीवाद…हे कबूल करत नाही. नव-टोरी नेहमी रशियाविरोधी असतात, पण कधीमधी अमेरिकाविरोधी सूरही लावतात. [उदाहरणांमध्ये माल्कम मगरिज, एव्हेलिन वॉ, टी. एस. इलियट आणि विंड्हॅम लुइस यांची नावे देत ऑर्वेल बरेच तपशील देतो.] 

2) केल्टिक नॅशनॅलिझम [वेल्श, आयरिश व स्कॉटिश लोक केल्टिक वंशाचे, तर इंग्रज सॅक्सन वंशाचे मानले जातात.]…केवळ इंग्रजविरोध नाही, तर त्याला वंशवादी रंगही आहे. केल्टिक माणूस सँक्सनांपेक्षा आध्यात्मिकदृष्ट्या श्रेष्ठ, साधा, सर्जनशील, कमी बटबटीत (vulgar) व कमी भंपक मानला जातो… येट्स आणि जॉईसच्या दर्जाचे लेखकही यापासून पूर्णपणे मुक्त नाहीत. 

3) झिअनिझम (ज्यू-वाद): अमेरिकन आवृत्ती इंग्रज आवृत्तीपेक्षा दुष्ट आहे. मी ह्या प्रकाराला स्थलांतरित नॅशनॅलिझम मानत नाही, कारण तो निरपवादपणे ज्यूंमध्येच दिसते. 

स्थलांतरित नॅशनॅलिझम

1) कम्यूनिझम, 2) राजकीय [दोन्हीचा तपशील नाही] 

3) रंगभेद: जुन्या शैलीतील ‘नेटिवां बद्दल तुच्छतेची भावना बरीचशी मंदावली आहे, आणि श्वेतवर्णीयांना श्रेष्ठ ठरवणाऱ्या वरकरणी वैज्ञानिक ‘थिअऱ्या ही अमान्य झाल्या आहेत. विचारवंतांमध्ये रंगभेद विरुद्ध रूपात दिसतो, की अश्वेत वंश श्रेष्ठ आहेत. इंग्रज विचारवंतांमध्ये हा भाव वाढतो आहे, पण त्याचे मूळ आशियाई व आफ्रिकन राष्ट्रवादाच्या संपर्कात नसून आत्मपीडन (masochism) आणि लैंगिक वैफल्यभावनेत आहे. रंगभेदाबद्दल ठाम मते नसलेलेही इतरांच्या अनुकरणातून प्रभावित होताना दिसतात… जरी ही भूमिका मनापासून पटलेली नसली, तरीही. अश्वेतांची जीवनशैली श्रेष्ठ आहे अशा विश्वासात बरेचदा ‘काळ्यांच्या कथित लैंगिक क्षमतेवरचा विश्वासही मिसळलेला दिसतो. 

4) वर्ग भावना: उच्च व मध्यम वर्गामध्ये कामगार वर्गाला श्रेष्ठ मानण्याचा भाव दिसतो. इथेही विचारवंतांवर ‘जनमताचा दबाव फार आहे. दैनंदिन जीवनात स्नॉबरी, कामगारांशी निष्ठा, आणि तात्त्विक पातळीवर मध्यवर्गाचा दुस्वास सारे एकत्रपणे नांदते. 

5) युद्धविरोधवाद (Pacifism) – बहुतेक युद्धविरोधक कोणत्यातरी लहानशा धार्मिक पक्षांचे तरी असतात, किंवा ‘जीव घेऊ नये’ यापुढे विचार न केलेले असतात. पण एक युद्धविरोधी वर्ग टोटलिटेरिअॅनिझमचा भक्त आणि पाश्चात्त्य लोकशाहीचा विरोधक, असाही आहे. प्रचार असा असतो की (संघर्षातले) दोन्ही पक्ष सारखेच वाईट आहेत. तरुण युद्धविरोधक तटस्थ न राहता ब्रिटनचे आणि अमेरिकेचे द्वेष्टे असल्याचे दिसते. बरे, हा हिंसेलाही विरोध नसतो, तर केवळ पाश्चात्त्य हिंसेला विरोध असतो. रशियनांनी स्वसंरक्षणासाठी केलेली हिंसा क्षम्य मानली जाते. शांततावाद्यांचे साहित्य रशियाचा व चीनचा शक्यतो उल्लेखच टाळते. भारतीयांनी ब्रिटनविरुद्ध केलेली हिंसाही ‘चालून जाते. अनेकदा तर या साहित्यात हिटलरसारखे लोक चर्चिलपेक्षा बरे मानले जातात. हिंसा खूप तीव्र, हिंख असली, तरी ती क्षम्य ठरते. फ्रान्सच्या पाडावानंतर अनेक फ्रेंच शांततावादी नाझींना सामील झाले इंग्रज शांततावाद्यांना हा निर्णय घ्यावा लागला नाही. ‘पीस प्लेज यूनियन’ आणि नाझी यांच्या सदस्यांमध्ये काही समान नावे आढळतात. फॅसिझमच्या जनकांपैकी कार्लाईलवर शांततावाद्यांनी स्तुतिपर लिहिले आहे. शांततावाद छुप्या रीतीने बलपूजक आणि क्रौर्याचा समर्थक असल्यासारखा वाटणेही अवघड नाही. 

नकारात्मक नॅशनॅलिझम

1) इंग्रजद्वेष: इंग्रज विचारवंतांमध्ये ब्रिटनची हेटाळणी आणि सौम्य विरोध सार्वत्रिक नव्हे तर थेट ‘सक्ती’चा आहे. हा खराखुरा विरोध आहे. युद्धकाळात विचारवंतांची मनःस्थिती ‘पराभूत’ होती. जर्मनी आणि त्यांची दोस्त राष्ट्रे जिंकू शकत नाहीत हे उघड झाल्यावरही हा भाव टिकून होता. सिंगापूरचे पतन, ब्रिटिश सेनेची ग्रीसमधून हकालपट्टी, अशा घटनांनी उघडपणे आनंदलेले लोक अनेक होते. उलट्या दिशेने इंग्लंडवरील बाँबवर्षावात जर्मन वायुसेनेची झालेली हानी, एल आलामीनचा विजय, यांबाबत अविश्वास व्यक्त होत असे. इंग्रजी डाव्यांना जर्मनी जिंकून हवी होती असे नव्हे, पण इंग्लंडचे पराजय त्यांना सुखवत आणि अंतिमतः विजय अमेरिका किंवा रशियाच मिळवून देईल, ब्रिटन नव्हे, असे त्यांना वाटत असे. परराष्ट्र धोरणात हे लोक नेहमी ब्रिटन समर्थितांच्या विरोधात असतात, त्यामुळे ‘सुजाण’ मत प्रस्थापितांच्या प्रतिबिंबासारखे किंवा निगेटिव्हसारखे असते. आणि कोलांटउड्या मारून एका युद्धातले शांततावादी पुढच्या युद्धातील जहाल आक्रमकही होऊ शकतात. 

2) अँटिसेमिटिझम नाझींनी केलेल्या ज्यूंवरील अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर विचारी माणूस ज्यूंची बाजू घेतो. आणि आपण अँटिसेमिटिझमपासून मुक्त असल्याचे सांगतो. साहित्यात ज्यूविरोधी सूर आवर्जून टाळला जातो. पण तरीही विचारवंतांमध्ये ज्यूविरोध विस्तृत प्रमाणात आहे, आणि आजची ‘शांतता’ त्या विरोधाला जहाल करेल. याला डावेही अपवाद नाहीत. शिवाय ट्रॉट्स्कीवादी व अराजकवादी गटांमध्ये बरेच ज्यू असल्याने डाव्यांच्या विरोधाला एक वेगळीच छटा येते. नव-टोरी आणि राजकीय कॅथलिकांना ज्यू लोक राष्ट्राचे मनोधैर्य खच्ची करतात असे वाटते, आणि ते सहज अँटिसेमाईट होतात. 3) ट्रॉट्स्कीवाद हा शब्द सैलपणे सामाजिक अराजकवादी, लोकशाही समाजवादी, उदारमतवादी वगैरेंना चिकटवला जातो. मी इथे पोथीनिष्ठ पण स्टॅलिनविरोधी मार्क्सवाद्यांसाठी हा शब्द वापरतो. मुळात ट्रॉट्स्कीवाद समजून घेण्याला ट्रॉट्स्कीचे लिखाण वाचण्याऐवजी ‘सोशलिस्ट अपील’ सारखी दुर्मिळ व आडवळणाची पत्रके जास्त उपयोगी पडतात, कारण ट्रॉट्स्की काही एकाच कल्पनेचा पुरस्कर्ता नव्हता. अमेरिकेत मात्र ट्रॉट्स्कीवादी संघटित झाले आहेत व त्यांनी एक क्षुद्रसा फ्यूरर’ही (एकुलता एक चालक) घडवला आहे. कम्यूनिस्ट जसे स्टॅलिनधार्जिणे असतात, तसे ट्रॉट्स्कीवादी स्टॅलिनविरोधी असतात. दोघांनाही जग बदलायचे नसते, तर केवळ आपापल्या पंथाचे महत्त्व वाढते आहे हे दाखवायचे असते. दोघांनाही शक्याशक्यतेच्या विचारातून मत घडवायचे नसते, तर केवळ एकाच विषयावरील एकच मत सातत्याने मांडायचे असते. मुळात ट्रॉट्स्कीवादी अल्पसंख्य आणि छळ भोगलेले आहेत. त्यांच्यावरचा फॅसिझमला मदत केल्याचा आरोपही खोटा पडला आहे. या साऱ्यामुळे ते बौद्धिक व नैतिकदृष्ट्या कम्यूनिस्टांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे एक शंकास्पद चित्र दिसते. प्रातिनिधिक ट्रॉट्स्कीवादी हा माजी कम्यूनिस्ट असतो, किंवा कोणत्यातरी डाव्या विचारांतून आलेला असतो. कम्यूनिझमच्या खुंटाला न बांधला गेलेला कोणताही कम्यूनिस्ट सहज ट्रॉट्स्कीवादी होऊ शकतो. उलटा प्रवाह मात्र दिसत नाही. 

वरच्या वर्गीकरणात मी अनेकदा अतिशयोक्ती केली आहे, अतिसुलभीकरण केले आहे, नको ती गृहीते धरली आहेत आणि सद्हेतू मानण्याचे टाळले आहे, असे वाटेल. ते अटळ आहे, कारण मी आपल्या धारणांना विकृत करणाऱ्या आपल्याच मनातील प्रवृत्ती नोंदतो आहे – सातत्याने आणि ‘शुद्ध’ रूपात काम करणाऱ्या वृत्ती नोंदत नाही आहे. सर्व माणसांना सदासर्वदा नॅशनॅलिझमची लागण झालेली नसते. मर्यादित आणि अधूनमधून दिसणारी ती बाब आहे. एखादा शहाणा माणूस कधीमधी स्वतःलाच विक्षिप्त आणि वेडसर वाटणाऱ्या मताला बळी पडू शकतो, दीर्घकाळपर्यंत ते मत दूर ठेवू शकतो, रागाच्या किंवा भावनेच्या भरात पुन्हा ते उकरून काढू शकतो. बिनमहत्त्वाच्या चर्चांमध्येही ते मत उफाळून वर येऊ शकते. आणखी एक लक्षात ठेवायला हवे, की अविवेकी सद्भावना नॅशनॅलिझममध्ये परिणत होऊ शकते, आणि एकाच वेळी दोन एकमेकांना काट मारणारी नॅशनॅलिस्ट मतेही एकाच व्यक्तीत आढळू शकतात. 

नॅशनॅलिस्टांच्या वृत्ती दाखवताना मी टोकाची, वेडसर मते घेतली आहेत. तटस्थ भाव नसलेली, बलपरीक्षेने झपाटलेली उदाहरणे घेतली आहेत. खरे तर असे बरेच लोक असतात. त्यांचा प्रतिवाद करावा, इतकीही त्यांची लायकी नसते. पण वास्तवात लॉर्ड एल्टन, एझरा पाऊंड आणि त्यांच्या रटाळ भाईबंदाशी लढावे लागते पण यासाठी त्यांच्या बौद्धिक मर्यादा दाखवून देण्याची गरज नसते. एकाच विषयात रमणारे वेड कंटाळवाणे असते. कोणताही नॅशनॅलिस्ट काही वर्षांनीही वाचनीय वाटेल असे पुस्तक लिहू शकत नाही, ही तशी सुखाची बाब नॅशनॅलिझम जिंकलेला नाही आणि भावनिक न होता निर्णय घेऊ शकणारे अनेक लोक आहेत, हे मान्य करू. पण तरीही भारत, पोलंड, पॅलेस्टाईन, स्पॅनिश यादवी, मॉस्को खटले, अमेरिकन नीग्रो, रूसो जर्मन करार आणि तसल्या विषयांवर विवेकी चर्चा होतच नाही. एल्टनसारखी माणसे सतत मोठ्याने ओरडणाऱ्या तोंडांसारखी असतात पण स्वतःला फसवू नका आपणही बेसावध क्षणी त्यांच्यासारखे वागू शकतो. एखादा कठोर सूर लागतो, एखाद्या दुसऱ्या जागेला धक्का लागतो आणि ज्यांच्या निःपक्षपाती सौम्यपणावर एरवी शंकाही घेता येत नाही अशी माणसे सट्कन दुष्ट आणि जहाल होतात. केवळ ‘शत्रू’ला हरवायला खोटारडेपणात शिरतात. फारच थोडे लोक हे टाळू शकतात. गोऱ्या स्त्रीने अपमानित केलेला नीग्रो, अमेरिकनाची अडाणी टीका ऐकणारा इंग्रज, सगळे साधारण एकच प्रतिसाद देतात. नॅशनॅलिझमची हळवी नस चाळवली गेली की बौद्धिक चर्चेतली सभ्यता संपलीच ऐतिहासिक सत्य बदलले जाते आणि धादांत खऱ्या गोष्टी नाकारल्या जातात. 

आपल्या मनात कुठेतरी एखादी नॅशनॅलिस्ट निष्ठा असली, द्वेषभावना असली की ज्यांच्या सत्य असण्याची खात्री असते, अशा बाबीही अमान्य ठरतात. काही उदाहरणे पाहा – 

क) कम्यूनिस्ट : ब्रिटिश- अमेरिकन मदत नसती तर जर्मनीने रशियाचा पाडाव केला असता. 

ख) ट्रॉट्स्कीवादी रशियन जनतेने स्टॅलिन राजवट स्वीकारली आहे. 

ग) शांततावादी आपल्यातर्फे कोणीतरी हिंसा करत असेल, तरच आपण हिंसा टाळू शकतो. 

वरच्या गोष्टी भावनिक ओझी नसली तर उघड आहेत. पण त्या वेगवेगळ्या नॅशनॅलिस्टांना असह्य आहेत आणि म्हणून त्या नाकारल्याही जातात आणि नकाराला खोटे आधारही दिले जातात. 

पुन्हा एकदा युद्धाबाबतच्या भाकितांकडे येऊ. असे म्हणता येईल की सामान्यांचे अंदाज विचारवंतांच्या अंदाजापेक्षा जास्त प्रमाणात बरोबर ठरले. सर्वसाधारण डाव्या विचारवंतांना 1940 सालीच लढाई हरली असे वाटले, 1942 साली जर्मनी इजिप्त व्यापणार असे वाटले, जिंकलेल्या क्षेत्रांतून जपान्यांना हाकलता येणारच नाही असे वाटले, अमेरिकन ब्रिटिश बाँबहल्ल्यांचा जर्मनीवर परिणाम झाला नाही असे वाटले. ही सारी मते सत्ताधारी वर्गाबाबतच्या द्वेषातून उपजली. मी अनेकदा ऐकले की मुळात अमेरिकन फौजा युरोपात लढण्यासाठी आल्या नाहीत, तर ब्रिटनमधली बंडाळी मोडायला आल्या. असल्या गोष्टी सामान्यांना विश्वासार्ह वाटत नाहीत तो मूर्खपणा विचारवंतच करू शकतात. जर्मनीने रशियावर हल्ला केला तेव्हा रशिया सहा आठवड्यांत कोलमडेल असे सूचना- प्रसारण मंत्रालयाने जाहीर केले. उलट कम्यूनिस्टांना अगदी कॅस्पियन समुद्रापर्यंत पीछेहाट होत असतानाही दर टप्प्यावर रशियन विजयीच दिसत होते. मुद्दा असा की भीती, हेवा, द्वेष, बलपूजा आले की वास्तवाचे भान हरपते, भल्याबुऱ्याचे भान सुटते, ‘आपले’ वाटेल ते गुन्हे माफ करण्याजोगे ठरतात. मुळात गुन्हा घडला असे मानले तर हे होते, इतर वेळी गुन्हे केले हेच आठवत नाही. बौद्धिक पातळीवर गुन्ह्याचे समर्थन करता येत नाही हे मानले गेले तरी त्यात ‘गैर’ वाटेनासे होते. निष्ठा जास्त झाली की दया हाकलली जाते. 

नॅशनॅलिझम का उद्भवतो, हा प्रश्न इथे हाताळण्याइतका लहान नाही. इंग्रजांपुरते मानता येईल की इतर जगातील संघर्षाचे ते विकृत प्रतिबिंब असते. देशभक्ती आणि धार्मिक श्रद्धांच्या -हासातून नॅशनॅलिझम उद्भवते असे मानले तर आपण एका तऱ्हेच्या स्थितिवादाशी आणि राजकीय निष्क्रियतेशी जाऊन पोचतो. असेही मानता येईल की देशप्रेमाची ‘लस’ नॅशनॅलिझमच्या रोगापासून संरक्षण देते, राजेशाही हुकूमशाहीपासून वाचवते, संघटित धर्म अंधश्रद्धेपासून वाचवतो. असेही मानता येईल की विवेकी, पूर्वग्रहविरहित विचार शक्यच नाही. सगळेच धर्म आणि इझम्स एकाच असत्यावर बेतलेले असतात आणि एकाच तऱ्हेच्या चुका आणि बर्बरतेला जन्म देतात. बरेचदा ही भूमिका राजकीय व्यवहारच टाळण्याकडे नेते. अशी हताश निष्क्रियता, असा सर्व इझम समभाव फारदा दिसतो. 

मला हे पटत नाही. आजच्या जगातला कोणीही विचार करणारा स्वतःला राजकारणापासून अलिप्त ठेवू शकत नाही. राजकारणाचा अर्थ विस्तारित करून आपण राजकारण करायलाच हवे. त्यात अमुक हवे, तमुक नको असे वस्तुनिष्ठपणे ठरवायला हवे – जरी चांगल्या गोष्टी वाईट तऱ्हेने मांडल्या जात असल्या, तरीही हे करायला हवे. नॅशनॅलिस्टिक रागलोभ आपल्याला आवडोत की न आवडोत, ते आपल्यात असतात. ते पूर्ण त्यागता येतात की नाही हे मला माहीत नाही, पण त्यांच्याशी लढता येते, आणि ही लढाई नैतिक असते. आपण कोण आहोत, आपल्या भावना कश्या आहेत, हे जाणून घेऊन त्यांना हाताळायला शिकायला हवे. तुम्हाला रशियाची भीती वा द्वेष वाटत असेल, अमेरिकेच्या श्रीमंतीचा आणि शक्तीचा हेवा वाटत असेल, ज्यूंचा तुम्ही तिरस्कार करत असाल, सताधारी वर्गापुढे तुम्हाला न्यूनगंड पछाडत असेल; तर हे विचारांनी नष्ट करता येणार नाही. त्या भावना नोंदून त्यांच्यामुळे आपले विचार दूषित होणार नाहीत याची काळजी मात्र घेता येते. राजकीय कृतीसाठी भावनिकता आवश्यकच आहे. आणि तिला वास्तवासोबत नांदता यायलाच हवे. पण पुन्हा सांगतो-याला नैतिक प्रयास लागतो आणि आजचे इंग्रजी साहित्य असा प्रयास करायला आपल्यापैकी किती कमी जण तयार आहेत ते दाखवते. 

[जॉर्ज ऑर्वेलच्या ‘नोट्स ऑन नॅशनॅलिझम’ या 1945 सालच्या निबंधाचा हा उत्तरार्ध. ‘समांतर भारतीय उदाहरणे देण्याचा मोह’ इथे टाळला आहे, पण भारतीय संदर्भातील समांतर विश्लेषणाचे स्वागत होईल.] 

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.