शुद्धलेखनांतील अराजक परिणाम आणि उपाय (पूर्वार्ध) 

(१) मुद्रित मराठी भाषेमध्ये एकसारखेपणा राहिलेला नाहीं. संगणकाच्या साहाय्यानें मुद्रण पूर्वीपेक्षां सोपें झालें असलें तरी त्याच्या उपलब्धतेमुळे जे नवीन लोक मुद्रणक्षेत्रांत उतरले त्यांस लेखनाचे कांहीं नियम असतात, आणि ते नियम लिहितांना, किंवा मुद्रण करण्यासाठी संगणकावर अक्षरें जुळवितांना पाळावयाचे असतात हे माहीत नाहीं. परिणाम असा झाला आहे की वर्तमानपत्रांतून आणि मासिकांतूनच नाही तर पुस्तकांमधूनसुद्धां एकसारखें मराठी वाचायला मिळत नाहीं. 

(२) साक्षरतेचें प्रमाण अगदी कमी होतें तेव्हा होणारे लेखनहि साहजिकच मोजकें होतें. विचारांचा किंवा माहितीचा हा ठेवा आपण पुढच्या पिढ्यांच्या स्वाधीन करीत आहोंत अश्या भावनेनें प्रारंभी लिहिलें जात असलें पाहिजे. त्यानंतर अशा लिखित मजकुराच्या नकला करणारांनी ती मूळ भावना न समजतां तें लेखन केवळ पुराणिकासमोर बसलेल्या श्रोत्यांना मोठ्याने वाचून दाखवावयाचें आहे अशा समजुतीने त्याच्या नकला केल्या. ‘श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिलें जी येथ’ अशी दासबोधाची सुरुवात आहे. (त्या पिढ्यांनी विचारांत नवीन भर फार थोडी घातली.) ह्या काळामधल्या नकलांमुळे अभ्यासकांसाठी मूळ लेखन आणखी दुर्बोध होऊन बसलें; आणि त्यासाठी संहिताशोधन हैं एक शास्त्रच अभ्यासकांना नव्यानें जन्माला घालावें लागलें. मुद्रणाच्या उपलब्धतेनंतर साक्षरतेचें प्रमाणहि झपाट्याने वाढू लागलें. वाढत्या साक्षरतेमुळे साध्या चिठ्ठाचपाट्यांसारख्या तात्पुरत्या कामासाठी ही विद्या राबविली जाऊं लागल्यानंतर लेखन हैं पुढच्या पिढ्यांना समजण्याची गरज आहे हा विचार नष्टच झाला. त्यांतहि आमच्या देशांत नवीन, टिकाऊ विचार निर्माण होण्याचे प्रमाण आणखीच घसरले आणि उच्चाराप्रमाणें लेखन असावें अशी मागणी जोमानें पुढें आली. त्या काळांत टिकाऊ लेखनासाठी इंग्रजी भाषेचा वापर सुरू झाला. त्यामुळे आपल्या भाषा आणि टिकाऊ विचार ह्यांचा डोक्यामधला संबंध अजिबातच नष्ट झाला असें मानण्याला जागा आहे. त्या काळांत लिपि हैं आपले उच्चार दर्शविण्याचें साधन आहे असा समज आपल्याच देशांत नव्हे तर सार्वत्रिक झाला. ह्या समजाच्या प्रभावांतून बर्नार्ड शॉ सारखे लेखकसुद्धा बाहेर राहू शकले नाहीत. 

(३) यद्यपि बहु नाधीषे पठ पुत्र त्वं तथापि व्याकरणम् 

स्वजनः श्वजनो मा भूत् सकलं शकलं सकृत् शकृत् । 

संस्कृत भाषेचें व्याकरण शिकतांना हा श्लोक पुष्कळांच्या परिचयाचा होतो. हा श्लोक लेखन हैं पूर्वपरंपरेप्रमाणे झाले पाहिजे, विभिन्न देशानुरूप होणाऱ्या भिन्नभिन्न उच्चारांच्या प्रभावापासून तें मुक्त ठेविलें पाहिजे असें सांगण्यासाठी रचलेला दिसतो. बंगालमधला एक चुणचुणीत बालक काशीच्या पंडिताकडे शिकावयाला गेला तेव्हां त्याला अक्षरओळख झालेली होती. गुरूनें त्याला कांहीं लिहावयास सांगितलें आणि त्या बालकानें आपल्या उच्चाराप्रमाणें सकल हा शब्द शकल असा लिहिला. त्याबरोबर त्याला गुरूनें ‘मुला, तूं दुसरें कांहीं फार शिकला नाहींस तरी व्याकरण शीक; नाहींतर जें सकल (पूर्ण) आहे तें शकल (तुकडा) होईल, जे स्वजन (आपले लोक) आहेत त्यांचे श्वजन (कुत्रे) होतील आणि जे सकृत् आहे (प्रथमदर्शन आहे) ती विष्ठा (शकृत्) होईल, अर्थाचा अनर्थ होईल’, असे बजावलें. लेखनाला आपल्या देशानुकूल उच्चारांच्या पलिकडे जावयाला हवें ह्याचें भान कवीला झालें आहे आणि तें त्यानें ‘यद्यपि बहुनाधीषे’ ह्या श्लोकामधून वाचकांपर्यंत पोहोचविलें आहे असे म्हणावयाला हरकत नाही. लिखित वाढयानें आपल्या काळाच्या पलिकडे जावयाला पाहिजे हैं भान साधित शब्द उच्चाराप्रमाणें न लिहितां शब्दसिद्धीच्या नियमांना अनुसरून लिहिण्याच्या मागें दिसतें तसें ‘स’ ला आपल्या उच्चाराप्रमाणें ‘श’ असें न लिहितां पूर्वीसारखे लिहावें हें सांगण्यामध्येहि दिसतें. 

उच्चाराप्रमाणें लेखन कशासाठीं

(४) आपण वाचावयाला शिकतों तें पूर्वी जे लिहिलेलें, छापलेलें साहित्य आहे तें समजून घेण्यासाठीहि शिकत असतों हैं दैनिक वृत्तपत्रांच्या उपलब्धतेनंतर आपण विसरून चाललो आहोत. मुद्रित वाड्यांत रोज इतकी भर पडत आहे की सर्वसामान्य वाचक जुनीं पुस्तकें हातांत मुळींच धरीनासा झाला आहे. त्याच्या आयुष्यांत जुन्या ग्रंथांचें प्रयोजनच उरलेलें नाही. छापलेल्या पुस्तकांतून वाचकाला कोठल्याहि काळांत सहजगत्या प्रवेश करतां आला पाहिजे आपल्या भाषेच्या लेखनाचे नियम त्यासाठी अनुकूल असले पाहिजेत ह्याचें भान नवीन नियम करणाऱ्यांना राहिलेलें नाहीं. जे लोक उच्चाराप्रमाणे लेखन पाहिजे असें म्हणतात त्यांना लिखित भाषेला देशकाल ओलांडून जाऊन आपला आशय निःसंदिग्धपणें वाचकापर्यंत पोचवावयाचा आहे ह्याची जाणीव नाहीं असें म्हणणें भाग आहे. 

(५) ही जाण नसणाऱ्यांमध्यें पुष्कळ थोर मंडळी आहेत. लेखन-नियमांशी, लिपींशी खेळणारी मंडळी जुन पुस्तकें कधींच कोणी वाचू शकणार नाहीत हे समजूं शकत नाहींत ह्याचें अतिशय दुःख होतें. लिपीमधली अक्षरें किंवा शब्द ह्या अर्थपूर्ण आकृति असतात; ती कागदावर उमटविलेली केवळ उच्चार सांगणारी निरर्थक चिह्नं नसतात; त्या आकृतींनीं ज्या ध्वनीचें स्मरण करून दिलें त्या ध्वनींनाच अर्थ असतो असें नाहीं तर आकृतींनाहि तो स्वतंत्रपणे असतो म्हणूनच जन्मबधिर असल्यामुळे ज्यांनी कधीं आवाज ऐकलाच नाहीं अशांनासुद्धां पुस्तकें वाचून त्यांतला अर्थ ग्रहण करतां येतो हें त्यांना कळतच नाहीं. शब्दांच्या कागदावरच्या आकृतींना त्या पुन्हां पुन्हां एका विशिष्ट संदर्भात वापरल्यामुळें अर्थ प्राप्त होतो हैं ज्यांना समजलें नाहीं, तीं फार थोर मंडळी आहेत. ‘महाराष्ट्र राज्य- पाठ्यपुस्तकनिर्मिति आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ’ हे एकटेच त्याबाबतीत अज्ञ आहे असें नाहीं तर त्यांच्या पूर्वीचे नरसिंह चिंतामण केळकर, काका कालेलकर, तात्याराव सावरकर, विनोबा असे लेखनपद्धतीत, तसेंच लिपींमध्ये बदल सुचविणारे कितीतरी लोक त्यांच्यामध्ये आहेत. देवनागरीसाठी रोमन लिपि वापरावी अशी सूचना करणारे मधुकर गोगटे त्यांच्यापैकींच. ह्या मंडळींनी लिपीशीं कोणालाहि खेळतां येतें असा सामान्य वाचकांचा समज दृढ करून दिला आहे. 

(६) आज मुद्रित मराठी आपले प्रमाणीकरण गमावून बसल्यासारखी झाली आहे आणि डॉ. ना. गो. कालेलकरांच्या आणि डॉ. वि. भि. कोलत्यांच्या शिष्यवरांचे बेत सफल झाले तर येत्या कांही वर्षांत आमच्या पिढीच्या नंतरच्या पिढ्यांसाठी मराठी विश्वकोश हा ग्रंथ अत्यंत दुर्बोध होऊन जाईल. कालची मोडी जशी आज आम्ही वाचत नाहीं तशीच ही कालची छापील मराठी, जुन्या लेखनपद्धतीमुळें त्यांच्यासाठी दूरस्थ होऊन बसेल. टंकलेखनयन्त्रावर टंकमुद्रित केलेलें वाचण्याचीच संवय झाल्यामुळे हस्ताक्षरांत लिहिलेली पत्रे वाचतां येईनाशी झाली आहेत. नुकतीच ७० वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका इंग्रजी ग्रन्थाची वही पाहिली. त्या ग्रन्थाच्या लेखकाच्या वारसांना ती प्रकाशित करावयाची इच्छा आहे. पण हस्तलिखिताचें वाचन कष्टप्रद झाल्यामुळें तें लेखन प्रकाशांतच येऊ शकत नाहीं. विश्वकोशाचें वाचन कष्टप्रद होईल किंवा ते आजच तसें झालें आहे असें मी म्हणतों तेव्हां मी अतिशयोक्ति करीत आहे असे वाटू शकतें – पण लेखन वाचून अर्थ ग्रहण करणें हैं ,अत्यन्त अवघड कार्य आहे हे मी अनुभवून चुकलों आहें. एकाच लिपीत लिहिलेली दुसरी भाषा म्हणजे नागरी लिपींत लिहिलेली हिंदी भाषा आम्हाला ऐकून समजते पण ती वाचणें फार कठिण आहे. हिंदीमधल्या कादंबऱ्यासुद्धा आम्ही कोणी वाचत नाहीं बंगालमध्ये ३०-४० वर्षे राहिलेले मराठीभाषी बंगाली बोलावयाला शिकतात पण बंगालीमधली पुस्तकें वाचावयाचा कंटाळा करतात. त्यांना त्या वाचनांत गति येत नाहीं.. आणि गति नाहीं तोंवर आवड वाढत नाहीं आणि आवड वाढत नाहीं तोंपर्यन्त गति येत नाहीं असें हैं दुष्टचक्र आहे. सर्वसामान्य लोक एकच भाषा वाचावयाला शिकतात. 

दुसरी भाषा (Second language) म्हणून शाळेत शिकविली जाणारी भाषा आयुष्यभर दुसरीच राहते; दुकानांवरच्या पाट्या किंवा आमंत्रणपत्रिका वाचण्यापुरती. आपल्या डोळ्यांना एकाच प्रकारच्या लेखनाची म्हणजे एकाच पद्धतीनें लिहिलेल्या शब्दांची, रूपांची संवय करणे इष्ट असतें. कोणतीहि भाषा नव्यानें शिकणाऱ्याला (त्या लेखनामध्यें पर्यायी रूपें फार आली तर, म्हणजेच प्रमाणीकरणाचा, Standardization चा अभाव असला तर त्या भाषेचें वाचन अवघड होऊन बसतें. तसें आज मराठीचें झालें आहे. 

(७) कोणत्याहि भाषेचें लेखन कसे असावें? तें लेखनाच्या नियमांनुसार असावें. हे लेखनाचे नियम पूर्वी होऊन चुकलेल्या लेखनावर आधारलेले असावेत. हे लेखनाचे थोडेसे नियम शिकल्यानंतर पूर्वीचें, नियमानुसार लिहिलेलें सर्व वाङ्य असंदिग्धपणें समजण्याची पात्रता येते. म्हणजेच त्यायोगें अपरिचित गद्यपद्यामधील शब्दांचे अर्थनिश्चयन करण्याची (नियम पाळून लिहिल्यामुळें) वाचकांची सोय होते. शब्दांना निश्चितार्थता येते.. वाचक कोणत्याहि काळामधला, कोणत्याहि प्रदेशांतला आणि वेगळीच मातृभाषा असलेला असूं शकतो ह्याचें भान ह्याची जाणीव ठेवून लेखनाचे नियम केलेले असावेत. एक विशिष्ट अर्थ दाखविणारा शब्द सर्वत्र एकाच प्रकारें लिहिलेला वाचावयास मिळणें हा वाचकाचा हक्क आहे. वाचकाचा हा हक्क डावलला न जाईल असे लेखनाचे नियम असावेत. लेखनाचे नियम सर्व साक्षरांच्या आटोक्यांतले असतील अशी गैरसमजूत करून घेऊं नये. नियम कितीहि कमी केले किंवा सोपे केले तरी ते सर्व (यच्चयावत्) साक्षरांच्या आटोक्यांत येणार नाहींत, असे सोपे नियम केल्यामुळे वाचकाची मात्र त्रेधातिरपीट होईल हे ध्यानांत घ्यावें. एखाद्या मराठी भाषकाने उर्दू शिकावयाला सुरुवात केल्यानंतर एकच शब्द निरनिराळ्या प्रकारें लिहिलेला आढळू लागला तर त्याच्या डोळ्यांना एक आकृति व तिचा अर्थ अशी सांगड घालतां येणार नाहीं; वाचनाला गतिच येणार नाही. वाचन कष्टप्रद आणि कंटाळवाणें होईल. प्रमाणीकृत भाषेच्या लिखित रूपांमध्ये निश्चितार्थता येत असल्यामुळे वाक्यांतील कांहीं निवडक शब्द वाचून भागतें. पूर्ण वाक्यें वाचण्याची, आणि त्यांचा उच्चार करून पाहण्याची गरज राहत नाही. त्याशिवाय द्रुतवाचन शक्य होत नाही. लेखनाचे नियम वारंवार बदलून आज मराठीचें तसें झालेलें आहे, तरी आतां लेखननियमांत एकवाक्यता आणण्याची तांतडीची गरज आहे. 

कालानुरूप भाषेचे स्वरूप बदलत असतें व त्या बदलाचें प्रतिबिंब अपरिहार्यपणे लेखनांत पडते हैं मान्य आहे. पण हा बदल शब्दांच्या निवडीमध्ये व्हावा. जुने गति, मति, कीर्ति, नीति, धृति, भीति, ह्यांसारखे शब्द गती, मती, किर्ती, निती, घृती, भिती – असे लिहून हा बदल सिद्ध करू नये. हे सर्व कृत्रिम साधित शब्द कोणाच्याच उच्चाराप्रमाणे लिहू नयेत एवढेच ह्या निबंधाद्वारें मला सुचवावयाचे आहे. 

ह्याउपर ज्यांना मराठीचें लेखन हें बहुजनसंमुखच असावें असें वाटतें त्यांनी जुनें जाउं द्या मरणालागुनि जाळुनि किंवा पुरून टाका’ ह्या निश्चयानें नवे नियम करून ते ताबडतोब प्रसिद्ध करावेत. श्रीमती सत्त्वशीला सामंत, बसन्त दावतर आणि दिवाकर मोहनी ह्यांच्या विरोधाची पर्वा न करतां ते अंमलात आणावेत; परंतु तसे करतांना शास्त्रपूत लेखन दण्डार्ह मानूं नये. 

प्रमाणभाषेचें बोलीभाषांशी नातें कोणतें असावें तें आतां पाहूं – 

(८) हस्ताक्षर चांगलें काढावें हा विवादाचा विषय नाहीं, पण शुद्धलेखन हा विवादाचा विषय झालेला आहे ह्याची कारणे पुष्कळ आहेत. पहिले कारण असें कीं प्रमाणभाषा आणि बोलीभाषा ह्यांच्या परस्परसंबंधांविषय आणि त्यांच्या सापेक्ष किंवा तौलनिक स्थानांविषयीं मराठी भाषकांमध्ये नुसता मतभेदच नव्हे तर गोंधळ आहे; आणि दुसरें कारण असें कीं भाषेचें लेखन उच्चाराप्रमाणें असावें असें कांही पाश्चात्य पंडितांनी सांगितलें तें आमचे लोक योग्य धरून चालले आहेत. आणखी एक लहानसें कारण आहे तें संस्कृतपासून भ्रष्ट होऊन आजच्या बोली निघाल्या ह्या समजावर आधारलेलें, म्हणजे भाषा नित्य सोपी होत जाते असें मानणारें आहे. भाषेचें सतत सुलभीकरण केलें गेलें पाहिजे असें म्हणून नवशिक्या लेखकाला फार नियम लक्षांत ठेवावे लागू नयेत म्हणून, एकच ईकार आणि एकच उकार वापरणें योग्य होईल ह्या समजावर आधारलेलें आहे. कसेंहि आणि कांहींहि लिहा; वाचकाला, जो पूर्वीपासून मराठी चांगली जाणतो त्यालाच कसाबसा अर्थ समजला म्हणजे झालें असें मानणाऱ्यांचे सध्या बहुमत आहे. जे लोक नवशिक्षितांसाठी लिखित भाषेचें सुलभीकरण व्हावे अशी मागणी करतात ते नवशिक्षित जाती कमी बुद्धीच्या आहेत असा समज करून देत असतात. आमचे नवशिक्षित बांधव ब्राह्मणांपेक्षा मुळीच कमी बुद्धीचे नाहीत. त्यांच्यासाठी केलेली सुलभीकृत लेखननियमांची मागणी ताबडतोब परत घेतली पाहिजे. ह्या विवादामधून बाहेर पडण्यासाठीं कांहीं उपाय माझ्या मनांत येतात ते पुढे मांडतों. 

(अपूर्ण) 

[गेली अनेक वर्षे मुद्रकाचे काम करीत असल्याकारणाने मला लिपी ही डोळ्यांसाठी आहे आणि भाषेचे लेखन कोणत्याही एका स्थानिक बोलीप्रमाणे करू नये हे स्पष्टपणे कळून चुकले. तेव्हापासूनच उच्चाराप्रमाणे लेखन केल्याने होणारे समाजाचे तोटे दिसू लागले. महाराष्ट्र साहित्य महामंडळाकडे प्रस्तुत निबंध पाठवून लेखननियमांमध्ये बदल घडवून आणण्याचा एक निकराचा प्रयत्न मी केला आहे. आजचा सुधारकच्या वाचकांची ह्या विषयासंबंधीची मते अजमावून पाहावी ह्या इच्छेने सदर निबंध दोन भागांत प्रसिद्ध करीत आहोत- दिवाकर मोहनी.] 

खरे टाऊन, धरमपेठ, नागपूर- 10 

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.