आधुनिकोत्तरवाद, हिंदू राष्ट्रवाद व वैदिक विज्ञान (२)

एकोणिसाव्या शतकातील नव-हिंदुराष्ट्रवाद्यांनी अध्यात्मकेंद्री हिंदुत्वाच्या आधिभौतिक रूपावर आधुनिक विज्ञानाचा साज चढवायला सुरुवात केली. कर्मकांडे, निसर्गव्यवहार आणि मानवाची नियती यांच्यात साम्ये शोधण्याच्या प्राचीन पंडिती परंपरेचाच तो एक नवा अविष्कार होता. आजचे हिंदुत्वप्रचारक या लोकांचेच वारस आहेत.

आधुनिकोत्तरांचे मत असे विश्वाचे वास्तव रूप अनाकलनीय आहे. सर्वच समाज आपापल्या रचनेप्रमाणे विश्वाबाबतच्या ज्ञानाची पद्धतशीर ‘दर्शने’ उभारतात. सर्वच समाजांची दर्शने स्वेच्छ, रीलळीीरी असतात. त्यांच्यात सत्यासत्यतेवरून डावे उजवे करता येत नाही. त्यांची हवी तशी मिश्र रूपे घडवून वेगवेगळ्या समाजांना वेगवेगळी सांस्कृतिक विश्वे घडवता येतात. विश्वाबाबतच्या वेगवेगळ्या संकल्पनांमध्ये सारखेपणा शोधणे आधुनिकोत्तरांच्या ज्ञानशास्त्राला मान्य आहे. हे विरोधी संकल्पनांमधील साम्ये शोधण्यापर्यंतही जाऊ शकते. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेने त्रिगुणतत्त्व आणि कणांचे विद्युद्भार यांच्यात साम्य शोधणे आधुनिकोत्तरांना विचलित करत नाही. त्यांच्या मते तो पूर्व आणि पश्चिम यांच्या संकराचा प्रयत्न असतो, आणि अशा संकराला, हूलीळवळीं ला विरोध नको. निसर्गाबाबतच्या वाढत्या माहितीच्या आधाराने बिगर-पाश्चात्त्य समाजांना त्यांची दर्शने त्यागायला सांगणे हा मात्र आधुनिकतेचा ‘पॉझिटिव्हिस्ट’ अविष्कार आहे. तो गर्विष्ठ आहे, म्हणून त्याला विरोध करायला हवा.

‘सत्य एकच आहे, आणि वेगवेगळे लोक ते वेगवेगळ्या नावांनी नोंदतात’ हा मंत्र हिंदुत्वाचे प्रचारक स्वतःचे मोठेपण दाखवायला वापरतात. अब्राहमचे धर्म (यहुदी, ख्रिस्ती, इस्लामी) हे बळाच्या वापराने व ‘पटवून देण्यातून’ इतरांना धर्मांतर करायला लावतात. हिंदुधर्म मात्र इतर धर्मांमध्ये जे सांगितले आहे तेच आपलाही धर्म सांगतो, असे म्हणत परकीयांना सामावून घेतो, हे हिंदुधर्मवाद्यांचे चिरंतन सत्य असते. वेगळ्या मताबद्दल ‘तेच ते, फक्त नाव वेगळे आहे’ असे सांगून पुढे वेगळे मत हे हिंदुमताचेच हीन रूप आहे, असे सांगितले जाते आणि केवल आणि वैश्विक सत्य पूर्वीपासूनच वैदिक हिंदूंना माहीत होते. ख्रिस्ती धर्म व इस्लाम हिंसा व रक्तपातातूनही इतर धर्मीयांना बाटवतात, पण ते इतरांची मतभिन्नता तरी मान्य करतात. हिंदुधर्म मात्र आत्मप्रेमी (narcissistic) आत्ममग्नतेतून आपल्या सहिष्णुतेचा उद्घोष करीत इतरांचे वेगळेपण आणि वैशिष्ट्यच नाकारतो.

अभिजात हिंदूधर्म कधी सहिष्णुतेतून तर कधी युयुत्सुपणातून पांथिक भेद हाताळत असे. नवहिंदू-विचारवंत मात्र हा ‘जिंकून घेण्याचा मार्ग सेक्युलर विज्ञानासाठीही चोखाळतात. आधुनिक विज्ञान हे वेदांमधील आध्यात्मिक सत्याचेच वेगळे नाव आहे, हा प्रचार बंगाली प्रबोधनापासून सुरू झाला. आजचे हिंदुत्ववादीही त्याच वाटेवर चालतात.

वेदांमध्ये विज्ञान शोधण्याची मोहीम १८९३ मध्ये स्वामी विवेकानंदांच्या (१८६३-१९०२) शिकागोतील जागतिक धर्म संसदेपासून सुरू झाली. त्या विख्यात क्षणी विवेकानंदांनी हिंदुधर्म हे सर्व धर्मांचीच नव्हे तर सर्व विज्ञानाचीही फलश्रुति असल्याचे प्रतिपादन केले. फक्त अद्वैत वेदान्तच विज्ञानाच्या ‘अंतिम’ ऊर्जेचा स्रोत शोधण्याच्या प्रयासाला फलद्रूप करू शकेल, असे त्यांनी म्हटले, ज्या ऊर्जेनेच विश्व घडते व चालते, ती ऊर्जा.

त्यांच्यानंतर श्री अरविंद (१८७२-१९५०) आले. त्यांनी उत्क्रांतीची एका दैवी तत्त्वानुसार मांडणी केली. विश्वात्म्याच्या वाढत्या जाणिवेच्या प्रयासातून जड पदार्थातून मानव व पुढे येऊ घातलेले समाजवादी ‘महा-मन’ (Supermind) घडते, असे त्यांचे म्हणणे होते. आज ‘हरे कृष्ण’वादी मूळ एकसंध ब्रह्मापासूनच्या विघटनाची, अवक्रांतीची मांडणी करतात. ही मांडणी डार्विनच्या उत्क्रांतीची जागा घेऊ पाहते आहे.

विवेकानंद व अरविंदांनी चेतवलेला अग्नी आजवर राष्ट्रवादी कल्पनाशक्तीला ऊर्जा पुरवत आहे. दयानंद सरस्वती, सर्वपल्ली राधाकृष्णन आणि विवेकानंद ह्यांच्या अनेकानेक अनुयायांचे लेखन हिंदुधर्म विज्ञाननिष्ठ असल्याचा दावा करते. नेहरूंसारखा सेक्युलरवादीही मूळ वैदिक हिंदुधर्म आधुनिक विज्ञानाशी सुसंगत होता पण पुढे भ्रष्ट होत गेला, या मांडणीने प्रभावित झालेला दिसतो. विज्ञान हे वेदांचेच दुसरे नाव असल्याचे अनेकानेक गुरु आणि स्वामी सांगतात. महाऋषी (खरे तर ‘महारिषी’ !) महेश योगी व इतरांचे पाश्चात्त्य देशांमधील अनेक आश्रमही हे हिंदुत्वाचे ‘वैज्ञानिक’ (Scientistic) रूप आळवतात.

या सर्वांची रणनीती एकसारखी असते. ‘वेद म्हणजेच विज्ञान’ हे ‘सिद्ध’ करायला विज्ञानाच्या क्षेत्रातल्या मुख्य प्रवाहापासून दूरच्या, बऱ्याच अंशी अंदाज व कल्पनाविलास ह्यांवर बेतलेल्या शिर्लीश्ररींळींश संकल्पना निवडल्या जातात. आधुनिक विश्वोत्पत्तिशास्त्र, पुंजवाद, चैतन्यवादी जीवशास्त्र, परामानसशास्त्र यांच्यातून या कडेच्या संकल्पना निवडून त्यांचे हवे तसे अर्थ लावून त्यांची संस्कृत ग्रंथांशी ‘साम्य’, ‘एकरूपता’, ‘केवळ वेगळे नाव’ अशा रूपात सांगड घातली जाते. थोडेसे ब्रह्म, थोडासा पुंजवाद, मग एकाऐवजी दुसऱ्याचा वापर, ‘ऊर्जा’ या नेमक्या आणि गणिती भौतिकशास्त्रीय संकल्पनेचे जाणिवेशी साम्य, न्यूटनची क्रिया-प्रतिक्रिया संकल्पना कर्मसिद्धान्तावर ‘कलम’ करणे, परामानसशास्त्रात बाद ठरवलेली वनस्पतींमधील जाणिवेची संकल्पना हे सारे वापरून जड-पदार्थात आत्म्याचे अस्तित्व “सिद्ध’ झाल्याचे दावे केले जातात. मग ह्या आत्मतत्त्वाचे ब्रह्माच्या आविष्कारातून उत्क्रांतीशी साम्य रेखले जाते.

संज्ञा वैज्ञानिक असतात, पण संदर्भ आणि गाभा धार्मिक असतो. यात ना वैज्ञानिक संकल्पनांचा सुसंगत वापर होतो, ना धार्मिक संकल्पनांचा. अत्यंत आत्मतुष्ट, “शिष्ट’ भावाने दोन्ही क्षेत्रांची तोड-मोड-सांधेजोड केली जाते. ही सारी खिचडी करण्यामागे हेतू येवढाच असतो की कोणी हिंदुधर्मकल्पनांना गूढतेतून बाहेर काढून त्यांच्यावर विवेकवादी टीका करू नये. ही शुद्ध सांस्कृतिक कूपमंडूक वृत्ती आहे.

आता ह्या दोन शतके व्यापलेल्या नवहिंदुधर्माचा आणि त्याही आधीच्या वेद-विज्ञान दाव्यांचा आधुनिकोत्तरवादाशी संबंध काय ? नवहिंदुत्ववाद काही आधुनिकोत्तर-वादातून जन्मलेला नाही. नवहिंदुत्ववाद्यांना आधुनिकवादी ‘विकासा’च्या आणि ‘प्रगती’च्या कल्पनांपलिकडे जाण्याची आधुनिकोत्तर घाईही नाही. नवहिंदुत्व आणि त्यापासूनच घडलेले आजचे हिंदुत्व या प्रतिक्रियावादी चळवळी होत्या/आहेत. त्यांना नवे तंत्रवैज्ञानिक आधुनिकीकरण अविचारी (mindless) त-हेने त्यांच्या पारंपरिक, सेक्युलरविरोधी, अनुदार सामाजिकीकरणाशी जोडायचे आहे. तो त्यांचा अंतिम कार्यक्रम आहे. पण त्यांचे वेद-विज्ञान आणि त्यातील विज्ञान, अध्यात्म, गूढवाद, थेट अंधश्रद्धा, यांची ‘खिचडी’ मात्र आधुनिकोत्तरवाद्यांनाही हवीशी आहे.

आधुनिकतेच्या, प्रबोधनवादाच्या पुरस्कर्त्यांना विज्ञान हवे आहे, कारण त्यांना त्यातून वस्तुनिष्ठ आणि वैश्विक सत्ये मिळवून अज्ञान आणि अंधश्रद्धेवर मात करता येईल अशी आशा आहे. त्यांच्या दृष्टीने निसर्गाकडूनच्या आपल्या अंदाजांना व अभ्युपगमांना काटेकोर, कठोर, प्रत्यक्षदर्शी तपासाच्या चिकित्सक कसोट्यांवर जोखून चूक-बरोबर ठरवणे, ही विज्ञानाची मोठी यशोगाथा आहे. त्यामुळे इतर समाजांनी व संस्कृतींनी (निसर्गव्यवहाराच्या क्षेत्रात) कोणते पुरावे ग्राह्य, कोणती तर्कपद्धती योग्य, याबद्दलचे निकष बदलून ग्रहणीय (justified) ज्ञान आणि साध्या श्रद्धा याबाबतच्या संकल्पना बदलणे त्यांच्यावर बंधनकारक आहे. सोबतच आधुनिकतावाद्यांच्या दृष्टीने विज्ञानाने ईश्वर, विश्वनिर्माता, अंतर्शायी (immanent) आत्मा यांसारख्या अतिनैसर्गिक कल्पनांनाही फाटा दिला आहे.

आधुनिकोत्तरांच्या मते हा विज्ञानावरील विश्वास केवळ सांस्कृतिक साम्राज्यवादी युरोप-केंद्रित विचार आहे. आधुनिकोत्तरांच्या मते (विज्ञानाच्या) विवेकाधिष्ठित दबावामुळे इतर संस्कृतींनी आपापली विश्वरूपदर्शने, पुरावे गोळा करण्याबाबतच्या व अनुमाने बांधण्याच्या भूमिकांमध्ये कोणताही बदल करणे बंधनकारक नाही. त्यांच्या मते वैज्ञानिक तथ्ये’ हीच वस्तुनिष्ठ व वैश्विक आहेत असे नसून इतर संस्कृतींच्या इतर ‘तथ्यां’सारखाच तोही एक संच आहे, एवढेच. निसर्गाबाबतचे वास्तव जबरीने वर्गीकरणे लादल्याखेरीज व ‘अर्थ जोडल्याखेरीज’ समजून घेणे शक्य नाही आणि अर्थ व वर्ग हे सांस्कृतिक रूपके व प्रतिमाने यांच्यामुळेच ठरत असतात. यामुळे सर्व संस्कृतिबद्ध विश्वदर्शने एकाच पातळीवरची मानायला हवीत. पाश्चात्त्यांचे विज्ञानही असेच त्या संस्कृतीतून आलेले आहे आणि त्याच्या सत्यतेचा कोणताही वेगळा दावा करता येत नाही.

ही सगळी भूमिका घडली ती अनेक पाश्चात्त्य तत्त्वज्ञानांच्या विज्ञानाच्या तत्त्वज्ञानातून. थॉमस कून, पॉल फेअराबेंड, डब्लू.ओ.क्वाईन, लुविग व्हिट्गेन्स्टाईन, मिकेल फोको ही यांपैकी प्रसिद्ध नावे. १९८० मधल्या ‘वैज्ञानिक वृत्ती’वरील वादविवादानंतर आशिष नंदी, वंदना शिव आणि त्यांचे अनुयायी याच आधुनिकोत्तर भूमिकेतून स्थानिक ज्ञान आणि स्थानिक परंपरांच्या पक्षाचे पुरस्कर्ते झाले. ही पाठराखण फलज्योतिष्यशास्त्र, देवी रोगाच्या हटवणुकीसाठी देवीची पूजा, रजोदर्शनाबाबत निषिद्ध गोष्टी आणि अखेर तर सतीच्या चालीलाही लाभू लागली. नंतरच्या दोन दशकांमध्ये ही परंपरा रूढ होत विवेकवाद हा अपशब्द ठरला आणि प्रबोधन ही वसाहतवादी ज्ञानशास्त्रीय हिंसा गणली जाऊ लागली.

ह्या सांस्कृतिक सापेक्षतावादी भूमिकेतून पाहता आधुनिक विज्ञान आणि परंपरागत (स्थानिक) विज्ञान यांच्यातील संघर्ष हा जास्त आणि कमी वस्तुनिष्ठ ज्ञानातील संघर्ष नाही. तो केवळ दोन वेगळ्या संस्कृतींमधील वेगळ्या पण सारख्याच अपुऱ्या ज्ञान परंपरांमधील लढा आहे. काही स्त्रीवादी व वसाहतकालोत्तर विचारवंत तर याही पुढे जातात. त्यांना आधुनिक विज्ञान एका दमनकारी, पिळवणूक करणाऱ्या शक्तीच्या रूपातच दिसते. आपल्या मूळ हेतूंपासून भरकटत विज्ञान या (विकृत) रूपापर्यंत पोचले आहे, असे मानले जाते. या विचारवंतांना आधुनिक विज्ञानाला ‘स्थानिक’ लोकांनी विरोध करून अखेर त्याला परंपरागत ‘साकल्यवादी’ परंपरेत आणावयाचे आहे.

जेव्हा पारंपरिक समाजांना आधुनिक विज्ञानाची काही अंगे तरी स्वीकारावीच लागतात, तेव्हा काय करायचे? आधुनिकोत्तरांच्या मते नेमका वेदविज्ञानाच्या बाबतीतला ‘संकर’ स्वीकारायला हवा. गुण म्हणजे विद्युद्भार, पुंजवादातील ऊर्जा म्हणजे ‘शक्ती’, कर्म म्हणजे जेनेटिक कोड, असे सारे मानायला हवे. आधुनिकोत्तरांना असली ‘समांतरता’ शोधणे अवैज्ञानिक किंवा अविवेकी वाटत नाही भलेही यात अनेक विसंगती असोत. सर्वच विज्ञान जर सांस्कृतिक मुळाच्या रूपकांमधून येत असले, तर हिंदु-राष्ट्रवाद्यांच्या संस्कृतिरक्षकांना अशी साम्यस्थळे शोधणे पटायलाच हवे. आपले प्राचीन मत बदलण्याऐवजी नवे सिद्ध झालेले ज्ञान त्यात ‘पचवले’ जाते.

आशिष नंदी, भिकू पारेख, होमी भाभांची ‘संकरा’बाबतची गूढ लिखाणे वाचणारे, असे सारेजण अशा पाश्चात्त्य आधुनिक विज्ञान व स्थानिक लोकांचे ज्ञान यांच्या संकराला पाठिंबा देतात. परदेशातील सेरा हार्डिंग, डॉना हॅरावेसारख्या स्त्रीवादिनीही याच प्रकारची मांडणी करतात. ब्रूनो लातूर, डेव्हिड हेस वगैरे विज्ञानाचे मानववंशशास्त्र तपासणारेही या आधुनिकोत्तर भूमिकेला येऊन ठेपतात.

अशा तहेने फॅशनेबल आधुनिकोत्तर आणि धार्मिक मूलतत्त्ववादी आपापल्या डाव्याउजव्या भूमिका सोडून विज्ञानाच्या प्रश्नावर एकाच भूमिकेला पोचतात. आधुनिक विज्ञानाबाबतच्या अतीव साशंकतेमुळे आधुनिकोत्तरांना हिंदुत्ववाद्यांचे वैदिक विज्ञानाने-आधुनिक विज्ञानाला “जिंकून घेणे’ मानावेच लागते.

आता मी ‘पर्यायी विज्ञानां’चा तात्त्विक पाया तपासणार आहे. यासाठीचे युक्तिवाद स्त्रीवादी, पर्यावरणवादी, वसाहतवादोत्तर विश्लेषक वगैरेंकडून केले जातात आणि तेही अखेर ‘उजव्यां’च्या ‘साकल्यवादी’ आणि ‘अस्सल’ (authentic) हिंदू विज्ञानाच्या दाव्यांशी जास्तजास्त जुळत जातात. ऐतिहासिकदृष्ट्या हे युक्तिवाद हिंदू पुनरुज्जीवनवादाच्या संदर्भात तपासायला हवेत.

बंगालमधील प्रबोधनकर्ते वैदिक काळाला हिंदुधर्माचे सुवर्णयुग मानणाऱ्या परंपरेतून घडलेले होते. जर्मन आदर्शवाद आणि इंग्रजी रोमँटिसिझममधून एच.टी.कोलब्रूक, मॅक्स म्युलर, पॉल ड्यूसेन वगैरे प्राच्यविद्यातज्ज्ञांनी हिंदू परंपरेचा गाभा वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये आणि शंकराचार्यांच्या अद्वैत-वैदिक परंपरेत असल्याचे सांगितले. ही परंपरा विवेकवादविरोधी आणि आदर्शवादी (जडवादविरोधी) असूनही राजा राममोहन रॉय, बंकिमचंद्र चॅटर्जी, स्वामी विवेकानंद या साऱ्यांना अद्वैत-वेदान्तात आधुनिकता दिसू लागली. अद्वैतवादातच विज्ञानाचे शिखर गाठले जाईल, या मताचा विवेकानंदांनी प्रसार केला. आधुनिक विज्ञान अतिनैसर्गिक असे काही मानत नाही, आणि अद्वैत वेदान्त ईश्वराला निसर्गाचे रूप मानते, हे ‘साम्यस्थळ’ हा या मताचा आधार ठरला.

ब्राह्मणी ज्ञानपरंपरा ही विवेक आणि विज्ञानाच्या सुवर्णयुगाचे चित्र दाखवते, हे मत नवहिंदूंनी वारंवार आणि जोरजोरात मांडले आहे. (आजचे) हिंदुत्ववादी साहित्य नवहिंदुत्वाच्या, हिंदुप्रबोधनाच्या परंपरेचे भरपूर कौतुक करत असते. त्यात ही चळवळ ज्या प्रबोधनाने युरोपातील अज्ञानयुग संपवले, त्याच्याशी समांतर असल्याचे सांगितले जाते. यात काही महत्त्वाच्या बाबी विसरल्या जातात. ग्रीक परंपरेतील मानवतावादी आणि निसर्गवादी अंगे कॅथलिक चर्चमुळे झाकोळली गेली होती. पाश्चात्त्य प्रबोधनाच्या काळात ही मूल्ये नव्याने संशोधित झाली. अॅरिस्टॉटलचा इहवाद आणि सॉक्रेटीसचा क्रिटिकल-रीअॅलिझम या प्रबोधनाने निवडला, आणि प्लेटोचा परलोकवाद नाकारला. याउलट नवहिंदू प्रबोधनकर्त्यांनी वैदिक परंपरेतील सर्वांत गूढवादी आणि मानवताविरोधी अंग, अद्वैत वेदान्त, हे निवडले आणि हिंदू व बौद्ध परंपरेतील वैज्ञानिक व निसर्गवादी अंगे डावलली. नवहिंदुत्ववाद हे प्रबोधन नसून पुनरुज्जीवनच होते.

वेदांमध्ये आधुनिक विज्ञान शोधणे मर्यादित अर्थाने उपयुक्त होते. एकदा आपला धर्म हा सर्व विज्ञानाचा जनक आहे असे स्वतःला पटवून दिले की कर्मठ हिंदूनाही विज्ञानाची भीती वाटेनाशी होते. विज्ञान हे वेदांचेच वेगळे नाव आहे असे म्हटल्याने विज्ञान शिकण्यास उत्साहही येतो. उच्च वर्णांच्या ब्राह्मणी अभ्यास आणि कल्पकतेच्या परंपरांनी त्यांना इंग्रजी शिकायला जोम पुरवला. आणि इंग्रजी शिक्षणात वैज्ञानिक विषयही होते. विज्ञानाचा वापर स्पष्टपणे पारंपरिक ज्ञानाला आव्हाने देण्यासाठी करणारे वर्णव्यवस्थेच्या ‘खालच्या’ गटांमध्ये तरी होते, नाहीतर ‘काफीर (godless) साम्यवादी’ तरी होते. दोघांकडेही दुर्लक्ष करणे सोपे होते. नवहिंदू प्रबोधनाने विज्ञानाला वेदान्ताच्या कह्यात आणले परंपरेत विज्ञान विवेकाच्या कह्यात होते. संघ परिवाराला ह्या परंपरेला शिक्षणसंस्थांमधून व सार्वजनिक व्यवहारातून संस्थात्मक रूप द्यायचे आहे.

भारताच्या वैचारिक इतिहासात सर्वाधिक भर बहुधा एकोणिसाव्या शतकातील हिंदू प्रबोधनावर दिला गेला आहे. आज वसाहतवादानंतरची, स्वातंत्र्यानंतरची वैचारिक मांडणी करणारे बहतेक जण या नवजागरणाचे बाळकडू प्यालेले बंगाली ‘भद्रलोक’ आहेत आशिष नंदी, पार्थ चतर्जी, गायत्री स्पिव्हाक, दीपेश चक्रवर्ती आणि सबाल्टर्न इतिहासकार. या सर्वांचे वैशिष्ट्य हे की ते तटस्थ आणि वस्तुनिष्ठपणे भोवतालच्या जगाचे ज्ञान होऊ शकेल, ही शक्यताच नाकारतात. अशा ज्ञानाची शक्यता मग ती निसर्गाच्या क्षेत्रात असो की सामाजिक क्षेत्रात नाकारणे, ही आधुनिकोत्तर, पोस्ट-स्ट्रक्चरलिस्ट परंपरा आहे.

एडवर्ड सैदने वसाहती काळाच्या अभ्यासकांमध्ये मिकेल फोको (Michel Focault) या फ्रेंच विचारवंताचे राजकीय लेखन लोकप्रिय केले. त्याचे अनुयायी असलेले हे (नंदी इत्यादी) अभ्यासक असे मानतात की पाश्चात्त्य विज्ञान मानणे, आणि गैर-पाश्चात्त्य ते हीन, अविवेकी व अवैज्ञानिक मानणे, हे (फक्त) साम्राज्यवादाच्या गरजेतून घडले. फोको-सैदची तत्त्वे या भारतीय विचारवंतांनी वापरली आणि ती भारतीय स्थितीला लागू केली.

बहुतांशी या लोकांनी नवहिंदूंच्या वेद म्हणजे विज्ञान या मांडणीवर टीकाच केलेली आहे. पण याचसोबत त्यांनी आजच्या हिंदुत्ववाद्यांच्या वैदिक विज्ञानाला मोकळी वाटही करून दिली आहे. नंदी आणि चतर्जी या दोघांनीही भारतीय विचारांच्या सध्याच्या स्थितीबद्दल लिहिलेली पुस्तके जगभर लोकप्रिय झालेली आहेत. दोघांनीही विवेकानंद, अरविंद, बंकिमचंद्र यांसारख्या हिंदुधर्मसमर्थकांपासून ते मानवतावादी सेक्युलरिस्ट नेहरूंपर्यंत ज्याने कोणी आधुनिकतेचा पुरस्कार केला त्याला धारेवर धरले आहे. दोघांचाही राग स्वतःच्या हेतूंसाठी खोटेपणाने आधुनिक विज्ञानाला धार्मिक कर्मठपणासाठी वेठीला जुंपण्याला नाही. विज्ञान आणि मिथकांची गल्लत करण्यावरही त्यांचा राग नाही. तसल्या टीकेसाठीही विज्ञानाची वैशिष्ट्ये आणि धर्मावर उतारा म्हणून विज्ञानाचे स्थान मान्य करावे लागेल आणि ते आज कालबाह्य म्हणून नको आहे. तसली टीका ‘पॉझिटिव्हिस्ट’ ठरेल, असे आपल्या आघाडीच्या विचारवंतांना वाटते. नंदी-चतर्जी आणि त्यांचे अनुयायी भारतीय राष्ट्रवाद्यांना धारेवर धरतात, कारण त्यांना वसाहतवादी, परकी संज्ञा (उदा. आधुनिक विज्ञान) पारंपरिक ज्ञानाला लागू करणेच चुकीचे वाटते.

हिंदू राष्ट्रवाद्यांनी शतकानुशतके अज्ञान आणि सामाजिक विषमता पोसणाऱ्या उच्चवर्णीय हिंदू परंपरेचा बचाव करणे हे महत्पाप वाटत नाही. त्यांना हिंदुधर्माच्या सेवेसाठी का होईना, आधुनिक वैज्ञानिक विचाराचा वापरच पापी वाटतो. त्यांना सेक्युलर प्रबोधनासाठीही आधुनिक विज्ञानाचा वापरही (मासिस्ट, नेहरू) तसाच पापी वाटतो. हिंदुत्व आणि सेक्युलर प्रबोधनाचे प्रयत्न, या दोन भूमिकांमध्ये राष्ट्रवादी विचार संपतो, असे यांना (नंदी आदि) वाटते. बाबासाहेब आंबेडकर, ई.व्ही.रामस्वामी पेरियार, ज्योतिबा फुले, ज्योती थास (दास ?) अशांनी नव्या ज्ञानाच्या सहाय्याने परंपरेच्या बेड्या तोडून मुक्ती मिळवायसाठी केलेले भगीरथ प्रयत्न या आधुनिकोत्तरांना दिसतही नाहीत आणि त्यांना आधुनिक विज्ञान हे साम्राज्यवादी, वसाहतवादी दमनाचे हत्यार आहे, हे दाखवणे मात्र आवडते. आधुनिक विज्ञानाला स्वतःचे काही स्थान असेल, केवळ भारतीय विचारांची ते बटीक नसेल, केवळ भारतीय मनांमध्ये ते ‘वसाहती’ उभारत नसेल, हेच नाकारले गेले. हिंदुत्व असो की नेहरूवाद, आधुनिक विज्ञानाचा आधार घेतला रे घेतला की त्यांना वसाहतवाद्यांच्या कळसूत्री बाहुल्याच म्हटले जाते.

या विचारानुसार अस्सल स्वातंत्र्य म्हणजे प्राचीन भारतीय परंपरा अस्सल रूपात नव्याने शोधून मान्य करणे, जे म्हणे फक्त महात्मा गांधींनाच जमले होते. आधुनिकोत्तर कोणत्याही वादा’त काही ‘सार’ (essence) नसते असे सांगत सांगत आधुनिकतेवर टीका करायला एक ‘धोरणात्मक सारवाद’ (strategic essentialism) वापरतात. या गायत्री स्पिव्हाकच्या संज्ञेनुसार खरी भारतीय परंपरा भारतीय सोडून कोणाला समजू शकतच नाही. या विचारांमध्ये खरी भारतीय परंपरा साकल्यवादी आणि अद्वैती आहे. पाश्चात्त्य विचारांमध्ये वस्तूंना संदर्भापासून सुटे करायची वृत्ती आहे, जी भारतात नाही. भारतीय विचार ना आधुनिक विज्ञानाच्या आवृत्तीसारखा आहे, ना प्रत्यक्षदर्शी ज्ञानाचा त्यात अभाव आहे तो एक वेगळ्याच प्रकारचे विज्ञान सांकेतिक रूपात मांडत असतो. आधुनिकोत्तर, सेक्युलरोत्तर विचारवंतांचे काम हे की त्यांनी हा सांकेतिक विचार उलगडून जोपासायचा.

या परंपरा आधुनिकोत्तरांना स्त्रिया, शेतकरी, ग्रामीण लोक, विखुरलेले सबाल्टर्न गट यांच्यात सापडतात. हा ‘लोकाभिमुख’, गांधीवादी असा विचार मानला जातो. या खास भारतीय परंपरेचे दैवत आहे गांधी हे. ‘खरा भारत’ म्हणजे गांधी अधिक आधुनिकतेचा स्वीकार न केलेल्या ‘समाजा’च्या “निरागस परंपरा’. जर कोणी हे नाकारले, तर त्याच्यावर त्याचे मन ही ‘पाश्चात्त्यांची वसाहत’ असल्याचा शिक्का बसतो. हिंदुत्ववादी आपल्याशी मतभेद असणाऱ्यांना ‘मॅकॉलेपुत्र’ म्हणतात, त्याची ही आधुनिकोत्तर आवृत्ती सं.

आधुनिकोत्तर धडपडून स्वतःला आजच्या हिंदुत्ववाद्यांपासून दूर ठेवू पाहतात. हिंदुत्ववाद्यांनीही ‘भारतीय मनातील वसाहतवाद संपवण्याचा’ विडा उचललेला आहेच. आपले वेगळेपण दाखवायला नंदी व इतर आधुनिकोत्तर हिंदू राष्ट्रवादाला आधुनिकतेशी जोडतच त्यावर टीका करतात. हिंदुत्ववाद्यांच्या आधुनिक-विज्ञानवादी भाषणांचा संदर्भ देत ते आजच्या हिंदुत्ववादाला आधुनिकतेचेच एक लक्षण मानतात.

हिंदुत्ववाद ही आधुनिक कल्पनांना हिंदू संज्ञांमध्ये ढाळू पाहणारी प्रतिगामी चळवळ आहे पण आधुनिक संज्ञांचा वापर ही आधुनिक विचारांची खूण नाही. हिंदुत्वाला तंत्रज्ञान तर हवे आहे, पण त्यासोबतचे सेक्युलर प्रबोधन नको आहे.

पण गांधींमागे लपणेही आधुनिकोत्तरांना जमत नाही, कारण हिंदुत्ववाद्यांनी गांधींनाही दत्तक घेतले आहे. त्यांना गांधीचा सखोल सेक्युलरविरोधी, आधुनिकताविरोधी भाव हवाच आहे त्यांना फक्त अहिंसा नको आहे. (अपूर्ण)

पुिण्याच्या वाचक मेळाव्यात एक मत व्यक्त केले गेले की ‘आजचा सुधारक’ विज्ञानवादी तर आहे, पण त्यासोबतच तो मूळ विवेकवादापासून दूर जात आहे. (मला) यात दोन गोंधळ जाणवतात.

एक म्हणजे विवेकवाद म्हणजे केवळ निरीश्वरवाद किंवा सेक्युलर धर्मविरोध नाही. त्यात इतर बरेच काही येते आणि त्यापासून आ.सु. रेसभरही दूर हटलेला नाही. बरे, नुसते ‘देव नाही, धर्म नको’ असे म्हणत राहिल्याने लोकांची मानसिकता बदलेल, असेही नाही. त्यासाठी देवधर्मादि संकल्पनांऐवजी काय, ते ठसवणे आणि त्याची उपयुक्तता दाखवून देणे जास्त परिणामकारक ठरेल, हे माझे मत आहे.

दुसरे म्हणजे फॅशनेबल विचारवंत आज आधुनिक विज्ञानाच्या तंत्रवैज्ञानिक यशोगाथेला घाबरून, आपले लोकाभिमुख डावेपण सोडून कर्मठ मूलतत्त्ववाद्यांजवळ जात आहेत. स्त्रीवादी, पर्यावरणवादी, सर्वोदयी, वैचारिक खुलेपणावादी (ऊर्फ सांस्कृतिक सापेक्षतावादी) हे सारे भरकटल्यासारखे स्वतःच अनुदार मूलतत्त्ववादाच्या कुशीत शिरत आहेत. व्यक्तीपेक्षा आपण समष्टीला महत्त्व देतो, असे सांगत प्रतिगामी होत आहेत. याला विरोध करणे, यातील विसंगती दाखवून देणे, हे थेट देवधर्मविरोधाइतकेच आवश्यक होत आहे सं.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.